ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना १७

Submitted by स्वप्ना_राज on 26 October, 2016 - 00:45

लम्हों की खुली किताब है जिंदगी
खयालों और सासोंका हिसाब है जिंदगी
कुछ जरुरते पूरी, कुछ ख्वाहिशें अधुरी
इन्ही सवालोंके जवाब है जिंदगी

आजकाल ना मला जगणं म्हणजे सापशिडीचा खेळ वाटायला लागलंय. खर्या सापशिडीच्या खेळात साप किती आणि शिड्या किती असतात काय माहीत. पण जगण्याच्या खेळात मात्र निदान मला तरी जिकडेतिकडे सापच दिसताहेत. शिड्या नसतातच. असल्या तरी दिसत नाहीत. दिसल्या तरी चढता येत नाही. चढलो तर पडायला होतं आणि मग साप बसलेले असतातच तोंड वासून गिळायला. जगण्याला उगाच 'सुहाना सफर' वगैरे गोंडस नाव देतो आपण. "एक पाउल पुढे आणि दोन मागे" ह्याला काय प्रवास म्हणतात? एकाच जन्मात किती किती आणि काय काय करायचं असतं आपल्याला. पण १०% सुध्दा नाही जमत. आणि जे जमलंय असं वाटतं ते मुळात जमलेलंच नसतं अनेकदा. ते आपल्याला कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

त्यातून हा एकच जन्म असेल तर प्रश्नच मिटला. फारसं काही होणार नाही आपल्या हातून. पण अनेक जन्म असले तरी ह्या जन्मीचं पुढल्या जन्मी लक्षात ठेवायची सोय आहे का? नाहीतर नवा जन्म, नव्या चुका. का त्यापेक्षा जगावं बिनधास्त? कशाला स्वत:ला सुधारायचं? पण मग आतल्या आवाजाचं काय करायचं? तो म्यूट करता का नाही येत? होऊन गेलं ते सोडून का नाही देता येत? सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच पाहिजेत हा हट्ट का? सगळा हिशोब शेवटी करू की. रोजचा जमाखर्च मांडायची माथेफोड का?

नाहीतरी जमेपेक्षा खर्च जास्तच होता, आहे आणि कदाचित राहील.
-------------------------------------------
'अय्या, हे बघ काय मिळालं?' घराचं रेनोव्हेशन चाललं होतं तेव्हा कुंभमेळ्यात हरवलेले भाऊ अनेक वर्षांनी भेटावेत तश्या अनेक वस्तू आम्हाला सापडत होत्या. मदत काही नाही आणि वर माझी कॉमेन्ट्री ऐकून मातोश्रींना मला जन्माला घातल्याचा पश्चात्ताप होत होता.

'आता काय मिळालं तुला?'

'अग ही बघ मी तुम्हाला आणि तुम्ही मला लिहिलेली पत्रं' मी काही वर्षं परदेशात होते तेव्हाचा हा पत्रव्यवहार होता.

'आता ते बाजूला ठेव हं. नंतर बघ. हे आवरून ठेवायचं आहे वर. एकदा तो माणूस गेला की तुला किंवा मला वर चढून माळ्यावर ठेवावं लागेल नाहीतर'

नाईलाजाने मी पिशवी टेबलवर ठेवून दिली. मग टेबलवरून ती टेबलाच्या बाजूला गेली आणि तिथून टेबलाखाली. रेनोव्हेशनचं काम संपलं आणि मी त्या पिशवीबद्दल विसरून गेले.

मग एके दिवशी दुपारी घरात एकटीच होते. पुस्तक वाचायचा मूड नव्हता, गाणी ऐकायचा मूड नव्हता आणि टीव्ही बघायचासुध्दा मूड नव्हता. खरं तर काहीच करायचा मूड नव्हता. मला अचानक ती पिशवी आठवली. मग वाकून टेबलाखालून ती ओढून काढली. पुढला अर्धा तास मजेत गेला. किती विसरून गेलेल्या गोष्टी नव्याने आठवल्या. किती छोट्याछोट्या गोष्टी आपण लिहून कळवायचो ह्यावर हसून झालं. केव्हढा पेशन्स होता आपल्यात असं आश्चर्य करून झालं. आणि ते पत्र हातात आलं.

अक्षर पाहिल्यावरच माझ्या लक्षात आलं की हे तिचं पत्र आहे. मोठं सुट्टं सुट्टं अक्षर. एक मोठा कागद पाठपोट लिहिलेलं पत्र. ती मी परदेशात रहात असताना असलेल्या माझ्या रूममेट्सपैकी एक. माझ्या आणि तिच्या स्वभावात जमिन-अस्मानाचा फरक. मी बोलकी आणि ती अबोल. मनातलं घडाघडा बोलणार नाही. एकटी रडत बसणार. तिला काय दु:ख होतं ते मला कधीच समजलं नाही. पण तिच्या डोळ्यात दिसायचं ते. आणि मी आनंदी असले की मला कानकोंडलं व्हायचं अगदी. पण दुसऱ्याना आपल्या खाजगी गोष्टीत लक्ष घालू द्यायचं नाही आणि दुसर्याच्या खाजगी बाबीत आपण लक्ष घालायचं नाही हे मी कधीच ठरवलंय. तिने कधी सांगितलं नाही आणि मी कधी विचारलं नाही. पुढे तिच्या त्या दु:खात प्रेमभंगाची आणखी भर पडली तेव्हा मी जवळपासच होते. सगळं माझ्या डोळ्यासमोर घडलं पण ति नाही बोलली त्याबद्दल माझ्याशी आणि मी नाही बोलले त्याबद्दल तिच्याशी. माझा एक मित्रच तिचा बॉयफ्रेंड होता. पण तो एक विषय टाळून आमचं बोलणं चालू राहिलं. पुढे पुढे तेही खुंटलं. मग एक दिवस् मी ऑफिसमधून घरी आले तेव्हा ती सगळं सामान घेऊन निघून गेली होती. नाहीच समजली ती मला कधी. मी किती चांगलं वागले तिच्याशी आणि ही मात्र काही न सांगता सवरता निघून गेली. एक बोटभर चिठ्ठी न ठेवता गेली. काय झालं असतं घडाघडा बोलली असती तर? तिची ही तर्‍हा पाहून मी पुन्हा रूममेटच्या भानगडीत नाही पडले. नकोच ती कटकट. आपण एवढा विचार करायचा दुसऱ्याचा आणि दुसऱ्याने असं वागायचं.

मनातले विचार आवरून मी पत्र वाचायला घेतलं. आमच्यात अबोला होता तेव्हा कधीतरी तिने हे लिहिलं होतं बहुतेक. मी ते का ठेवलं होतं काय माहीत. कदाचित ते घर सोडताना फाडायचं राहून गेलं असेल. पुढे ती पत्रांची चवड काढून बघायला जमलं नसेल. आणि मग बाकीच्या सामानातून तेही भारतात आलं. नाही म्हटलं तरी इतक्या वर्षांनंतर ते वाचताना थोडी उत्सुकता होतीच. पण पत्र वाचत गेले आणि माझी ओळख मलाच लागेना. मी अशी होते? छे! मी अशी कधी होते? शक्यच नाही. पण मी तशी होते हे खरं. तिच्या घरून आलेला फराळ तिने देऊ केला तरी मी घेतला नव्हता. तिने केलेली नवी डिश खाऊनसुध्दा कशी झालेय ते मी एका शब्दाने तिला सांगितलं नव्हतं. तिचे फ्रेंड्स आले तेव्हा मी दार बंद करून आत बसले होते. ऑफिसमधून यायला लेट होणार हे मी तिला सांगितलं नव्हतं आणि ती माझी वाट बघत एक तास जेवायला थांबली होती. मला हिच्या बरोबर रहायचं नाही हे तिला ऐकू जाईल अश्या आवाजात मी माझ्या फ्रेंड्सना सांगितलं होतं. कोणीतरी फाटकन मुस्काटात मारावी असं वाटत असूनही मी पत्र वाचत गेले. पांढऱ्याचं काळं आणि काळ्याचं पांढरं होत राहिलं. मी सगळं पत्र वाचलं आणि मग फाडून तुकडे केले.

नाण्याच्या दोन बाजू असतात. मी एक बाजू होते. आणि ती दुसरी. त्या दिवशी मला दोन्ही दिसल्या होत्या. आणि हे मी जन्मात विसरणार नाही.

म्हणजे निदान सध्या तरी मला असं वाटतंय.
------------------------------------------------

'हा कितवा गणपती?' आईने विचारलं
'हा सातवा' मी फोनमधले फोटो बघत सांगितलं.
'आता पुढचे दोन करून घरी जाऊ या. खूप उन आहे'.
'ओके'

दोघी फाटकातून आत शिरलो. एका इमारतीच्या आवारात असलेला हा गणपती. आम्ही दर वर्षी येतो दर्शनाला. तसंही बाप्पा नेहमीच क्यूट दिसतात. मागच्या वर्षी कृष्णाच्या रुपातली खूप मस्त मूर्ती होती. ह्या वेळी मंडपात शुकशुकाट दिसला. फक्त नाईटगाऊन घातलेली एक वृध्दा एका खुर्चीवर बसली होती. आम्ही पुढे झालो.

पुढे जाताना माझं लक्ष सहज त्या वृध्देकडे गेलं आणि मी एकदम दचकले. क्षणभर माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तिने तिचा गाऊन गुडघ्यांपर्यंत वर ओढला होता आणि आत घातलेला adult diaper ती शांतपणे खाली सरकवत होती. मला कसं रिअ‍ॅक्ट व्हावं तेच कळेना. पुढे गेलेल्या आईला मी दंडाला धरून खसकन मागे ओढलं.

'झालं दर्शन? चल'
'अग पण....प्रसाद?'
'चल तू आधी इथून.'

ती वृध्दा काहीतरी बोलत होती. आम्हाला प्रसाद घेऊन जायला सांगत होती बहुतेक. मी ऐकायला थांबले नाही. मी बाप्पाच्या मूर्तीकडे पाहिलं नाही. आजूबाजूला कुठेच पाहिलं नाही. मंडपात येऊन दर्शन न घेता मी अशी कधीच बाहेर पडले नव्हते. पण मन काहीतरी विचित्र झालं होतं. बाप्पाचं दर्शन घेऊन नेहमी कसं प्रसन्न वाटतं पण उदास, भकास, निराश वाटत होतं. श्वास मधल्या मध्ये अडकलाय असं वाटत होतं. आपण आता रडणार अशी भीती वाटत होती. पण रडल्याशिवाय मोकळं वाटणार नाही हेही माहीत होतं. मला नक्की काय वाटत होतं ते आजही नीट नाही सांगता येणार. किळस, लाज, दया, राग (स्वत:वर), भीती, गोंधळ, आश्चर्य, निराशा, दु:ख, हतबलता............सगळ्या भावभावनांचं एक जबरदस्त कॉकटेल.....

मी आजही विचार करते तेव्हा प्रश्न पडतो. मी कसं रिअ‍ॅक्ट व्हायला हवं होतं? मी झाले तसंच? का शांतपणे दर्शन घेऊन प्रसाद घेऊन बाहेर पडायला हवं होतं? मी रिअ‍ॅक्ट व्हायला हवं होतं का?
-------------------------------------------

'सर, बघा तुम्हाला कबूल केलं होतं तसं घेऊन आलेय स्वप्नाला' माझी मैत्रीण सरांना सांगत होती. माझ्या नववी-दहावीच्या क्लासमधले हे सर माझ्या मैत्रिणीच्या सोसायटीत ग्राउंड फ्लोअरला रहातात हे नुकतंच कळलं होतं. मैत्रिणीच्या घरी गणपतीला गेले तेव्हा ती आवर्जून त्यांच्याकडे घेऊन गेली होती. खूप मस्त वाटलं सरांना इतक्या वर्षांनी भेटून. अगदी काल परवा क्लास संपल्यासारखं गप्पा मारल्या सरांशी.

'तुझा फोन नंबर देऊन ठेव बघू' सरांना माझा फोन नंबर दिला, त्यांचा सेव्ह करून घेतला. मग कामाच्या धबडग्यात सरांना विसरून गेले.

अचानक एके दिवशी व्हॉटसॅप वर सर दिसले.
'अय्या, सर, व्हॉटसॅप वर आहेत' मी मैत्रिणीला कौतुकाने सांगितलं सुध्दा.

मग दसरा आला. सरांना विश करायला हवं. उगाच इमेज वगैरे पाठवून त्यांना डाऊनलोड कशाला करायला लावा, त्यांना जमेल की नाही असा विचार करून नुसता 'दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर' असा मेसेज पाठवला. १५ मिनिटांनी सरांचा मेसेज आला. चक्क एक इमेज. पाटीवर काढलेल्या सरस्वतीची.

खरं सांगू? मला स्वत:ची लाज वाटली. सर सत्तरीच्या घरात आहेत म्हणून त्यांना व्हॉटसॅप वगैरे जमणार नाही असं धरून चालले होते मी. आणि आपण कोणाबद्दल असं काहीएक गृहीत धरून चालत नाही असं स्वत:बद्दल गृहीत धरून चालले होते मी.

सरांनी ह्या दसऱ्याला मला पुन्हा एकदा धडा दिला. आता आमच्या फाटक्या झोळीत तो किती दिवस राहतो ते पाहू.
------------------------------------------------

"दहा मिनिटं लेट झालाय निघायला. आज टॅक्सी मिळते की नाही काय माहीत." असं पुटपुटतच मी लिफ्टमध्ये घुसले. वरून खाली येईपर्यंत फोन, चावी वगैरे घेतलंय की नाही पाहून घेतलं. लिफ्टचा दरवाजा ते सोसायटीचं मेन गेट एव्हढं अंतर उडून जाता आलं असतं तर काय बहार आली असती. आता गेटबाहेर एखादी टॅक्सी थांबलेली असली की अर्धी लढाई जिंकली.

'गुड मॉर्निग'

आं? हे कोण बोललं म्हणून बघितलं. सोसायटीच्या दारातच मला त्या बाई दिसल्या. आमच्या सोसायटीत २-३च ख्रिश्चन कुटुंबं आहेत. त्यातल्या एका कुटुंबातल्या ह्या बाई. त्यांचं आडनाव मला आधी आठवेचना. मग नाव माहीत असण्याचा तर प्रश्नच नव्हता. ह्याआधी कधीच त्या माझ्याशी बोलल्या नव्हत्या. ह्यात त्यांची चूक नाही म्हणा. मी एकूणातच सोसायटीतल्या लोकांशी अंतर राखून आहे. त्यांनी आज मला विश का करावं ते मला कळेना. सौजन्यसप्ताह चालू आहे की काय? एका सेकंदात किती विचार मनात येऊन जातात नाही?

'गुड मॉर्निग' पुढे 'आंटी' म्हणावं का नाही ह्या दुग्ध्यात मी पडले. त्यांच्या आणि माझ्या वयात मी त्यांना आंटी म्हणण्याइतपत अंतर आहे का नाही कोण जाणे. बरं आडनाव आठवत नसल्याने 'मिसेस सो एन्ड सो' म्हणायची सोय नाही. मग नुसतीच हसले. त्याही हसल्या.

'हॅड बिन टू चर्च?' प्रश्न विचारायचा म्हणून आपण कायतरी विचारतोय हे कळत होतं मला पण इलाज नव्हता. उशीर होतोय ही जाणीव होतीच. डोळ्यांच्या कोपऱ्यातून समोर उभी असलेली टॅक्सी दिसतही होती.

'येस. हॅव अ नाइस डे' त्या बाई हसून म्हणाल्या.
'यू टू.' मीही हसून म्हणाले आणि ट्रॅफिक सुरु व्हायच्या आत रस्ता क्रॉस करून पळाले.

मग पुढे पुढे माझी ऑफिसला जायची आणि त्यांची चर्चवरून यायची वेळ जवळपास एकच होती हे माझ्या लक्षात आलं. त्या रोज मला मी त्यांना पहिल्यांदाच भेटतेय अश्या रीतीने हसून ग्रीट करायच्या. मीही हसून प्रतिसाद द्यायचे. व्हॉटसॅप वर गुड मॉर्निग ची इमेज बरेच दोस्त लोक पाठवतात. पण प्रत्यक्षात कोणी असं विश करणं किती छान असतं. मग माझा जॉब बदलला, ऑफिसला जायची वेळ बदलली आणि त्या बाई दिसायच्या बंद झाल्या.

साधारण सहा महिन्यापूर्वीची गोष्ट. उगाच त्रागा त्रागा करायला लावणारे काही दिवस येतात. काही म्हटल्या काही मनासारखं होत नाही. त्यातून मकर रास म्हणजे विचारायलाच नको. कुठून जन्माला आलो असं होतं कधीतरी. असल्याच दिवसातला तो एक दिवस. त्यातून आदल्या रात्री झोप नीट नव्हती झाली. लिफ्टमधून बाहेर पडले तेव्हाही मन इथेतिथेच होतं. ग्राउंडफ्लोअरला लिफ्ट उघडलं, मी बाहेर पडले आणि समोर त्या बाई. बरोबर त्यांचा मुलगा. पण मी आपल्याच तालात. त्या जवळून गेल्या, लिफ्टमध्ये शिरल्या, लिफ्ट बंद झालं आणि मला लक्षात आलं आपण बोललो नाही त्यांच्याशी, कशा आहात हे विचारलं नाही, आजकाल आपण भेटत नाही असं बोलले नाही. पुढल्या वेळी भेटतील तेव्हा बोलू असं म्हणून निघाले.

नंतर एक आठवडा झाला असेल नसेल. शनिवार होता. ख्रिश्चन लोकांच्या फ्युनरलला वाजवतात तसं म्युझिक अचानक वाजताना ऐकून मला आधी वाटलं शेजारच्या बिल्डींगमध्ये कोणीतरी गेलंय. खाली वाकून बघते तर आमच्याच सोसायटीत. बाप रे! कोण गेलं? जवळपास एक तास थांबूनथांबून म्युझिक वाजत होतं. मध्ये एकदा खाली वाकून पहाते तर त्या बाईंचा मुलगा उभा होता. मी चरकले. त्या बाईंचे मिस्टर सदोदित आजारी असतात असं आमची कामवाली बाई म्हणाली होती मध्यंतरी. देवा! प्लीज तेच गेलेले असू देत. काळी hearse आलेली पाहिली तेव्हा मी बाल्कनीतून घरात निघून आले. कोण गेलंय ते पहायचं धाडस माझ्यात नव्हतं. संध्याकाळी बाहेर पडले तेव्हा नोटीस बोर्डवर त्या बाई गेल्याचं वाचलं. त्यांचं नाव तेव्हा कळलं मला.

आणि आता ही कायमची रुखरुख लागली आहे. खरं तर मी विश केलं किंवा नाही ह्याचा विचार करायच्या पलीकडे त्या गेल्या आहेत. त्यांच्या धर्माच्या दृष्टीने विचार केला तर त्या आणि मी शेवटच्या निवाड्याच्या दिवशी भेटू कदाचित. हिंदू धर्माच्या दृष्टीने विचार केला तर पुनर्जन्म आहे म्हणतात आणि ह्या जन्मीचं माझं त्यांना देणं बाकी आहे म्हणजे पुढल्या कुठल्यातरी जन्मी भेटणार. ह्या दोन्ही धर्माचं गणित चुकलं असेल तर पुन्हा भेटण्याचा प्रश्नच नाही.

मग असं असताना ही बोच का राहिली आहे मनात? सांगा, काय करायचं तिचं?
------------------------------------------------

मनाची मेणाची बाहुली होणं परवडणारं नाहीये. पण त्याचा अगदीच दगड व्हावा असंही नाही वाटत. खूप पसारा पडलाय मनात. आवरला की अजून होतोय. रोजचा दिवस भर घालतो ती वेगळीच. "सवडीने करू या" म्हणायची संधी मिळेल की नाही काय माहीत. कधी कधी ही आठवणींची पानं जमून मनात पिंगा घालायला लागतात. स्वतःतच मिटून कुठेतरी जाऊन बसावं, कोणाशी बोलू नये असं वाटतं. सगळं आवरून ठेवावंसं वाटतं. पण पुन्हा कुठून तरी वारा येणार आणि सगळं इकडेतिकडे उडवून लावणार. वारा थांबवता येणार नाही. हा पिंगा थांबवता येणार नाही.

परवा कोणीतरी व्हॉटस् एप वर ह्या ओळी पाठवल्या:

सबके कर्जे चुका दू मरनेसे पहले ऐसी मेरी नियत है
मौतसे पहले तू भी बता दे जिंदगी तेरी किमत क्या है

वारा आला आणि पिंगा सुरु करून गेला. तो थांबायची वाट पाहायची आता फक्त.
--------------------------------------------
वि.सू. १ - कोणाच्याही कसल्याही भावना दुखावायचा हेतू नाही. तरी त्या दुखावल्या गेल्यास क्षमस्व
वि.सू. २ - ह्याआधीच्या पन्न्यांची लिंक माझ्या विपूत आहे
वि.सू. ३ - लेखातले दोन्ही शेर फॉरवर्डेड आहेत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना, तू फार मोजकं लिहीतेस पण जे काही लिहीतेस ते फार सुंदर असतं! खूप खाणारा जसा खवय्या असतोच असं नाही तसंच खूप लिहिणारा चांगला लेखक असतोच असं नाही. So I won't complain that you don't write more often. You write very well!
ह्या हृदयीचे त्या हृदयी पोहोचले असे लिहिले आहेस. जियो! You made my day!

अयायियो... मस्तच पन्ना.
तुझ्या पन्न्यांचं कायै.. ते एकदा वाचले की मनात पिंगा चालूच. लिहीत रहा बाई.. लिहीत रहा

खूप दिवसानी लिहिलंस पण जे लिहलं ते अगदी टचिंग

त्या बाईंचा किस्सा वाचून तर अगदी, प्रत्येकाच्या आयुष्यात असा एकतरी प्रसंग येतोच, तेव्हा राहून गेलेली गोष्ट अगदी किरकोळ का असेना कायमची राहून जाते तेव्हाची रुखरुख अंतापर्यंत राहते.

क्या बात है!
मस्तच लिहिलंय

खूप दिवसानी लिहिलंस पण जे लिहलं ते अगदी टचिंग)))आशु +10000

मस्त लिहिलेय Happy
वरील प्रतिसादांना प्लस वन
माणूस गेला की बरंच काही आठवतं .. सर्वांनाच लवकरात लवकर त्या आठवणींच्या पुढे निघून जायला आवडते.. पण सर्वांनाच ते जमत नाही

स्वप्ना..स्वप्ना..स्वप्ना... जियो!!!!
किती सेंसिटिव्ह आहेस गं.. वाचताना मन जड जड होतंय!!! आपल्याही काही बाही करून झालेल्या , करायच्या राहून गेलेल्या आणी आता वेळ ही निघून गेलेल्या गोष्टी आठवून कसंनुसं वाटतंय..

मनाची मेणाची बाहुली होणं परवडणारं नाहीये. पण त्याचा अगदीच दगड व्हावा असंही नाही वाटत... हे वाक्य तर हायलाईट आहे !!!

का कोण जाणे हे गाणं ही आठवलं..

गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे
माझ्यापास आता कळ्या आणि थोडी ओली पाने...

____/\____ धन्य हो तुम.

किती सुरेख लिहिलस गं... पहिला किस्सा तर खूप चटका लावून गेला. अशाच नकळत राहून गेलेल्या आणि आता कायम छळणाऱ्या गोष्टी परत समोर उभ्या राहिल्या.

हा पन्ना बर्याच दिवसांनी आला... लिहीत राहा गं.

बऱ्याच दिवसांनी माबो वर आले नी तुझा पन्ना दिसला ...थोड्या उखडलेल्या मूड मधेच होते म्हणून तर आले होते ना माबो वर ...वाचायची इच्छा नव्हती पण तू आवर्जून वीपू केलीस म्हणून निदान डोळ्या खाली घालावं म्हणून वाचायला सुरु केलं नी कधी गुंतून गेले ते कळलंच नाही ...अगदी मनापासून लिहितेस तू म्हणून इतकं आत वर पोहचत नी बांधून ठेवत ... Big thank u ..u made my day

स्वप्ना तुझ्या" पन्न्याची" मी नेहेमीच आतुरतेने वाट पहात असते.ह्या वेळी जरा जास्त वाट पहावी लागली.पण नेहेमी
प्रमाणे सुरेख लिहीले आहेस.

स्वप्ना, तू फार मोजकं लिहीतेस पण जे काही लिहीतेस ते फार सुंदर असतं! खूप खाणारा जसा खवय्या असतोच असं नाही तसंच खूप लिहिणारा चांगला लेखक असतोच असं नाही. So I won't complain that you don't write more often. You write very well!
ह्या हृदयीचे त्या हृदयी पोहोचले असे लिहिले आहेस. जियो! You made my day! >>>>>+१११११ Happy

@ स्वप्ना_राज, फारच छान लिहिलंय. बऱ्याचदा आपल्या मनात काय चाललंय हे आपण दुसर्यास समजावून सांगू शकत नाही. पण आपणांकडे, आपल्या मनाला भुंगा लावणारे विचार, लिखाणात उतरवण्याची अलौकिक शक्ती आहे. त्या शक्तीला माझा सलाम!

Pages