गंधर्वाचं देणं - श्रीमती कलापिनी कोमकली

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

Kalapini1.jpg

रात्री अकरासाडेअकरा वाजता मला झोपेतून अचानक जाग येते. खोलीत मी एकटीच. भवताली अंधार. पण आईच्या गाण्याचा आवाज येतोय. मी धावत बाहेर जाते. बाबा आईला गाणं शिकवत असतात. मी आईच्या मागे जाऊन गळ्यात हात टाकते, आणि म्हणते, "आई, तू गाऊ नकोस ना.." माझ्या लहानपणीची ही माझी पहिली आठवण. मी डोळे उघडले तेच मुळी गाण्याच्या विश्वात. गाणं आमच्या घरातच होतं. घरात मी सर्वांत लहान. बाबा गायचे, आई गायची. माझा मोठा भाऊ मुकुलदादा गायचा. आईबाबांचे शिष्यही असायचेच घरी. सत्यशीलदादा (देशपांडे) घरीच राहायचा. पण घरात एवढं गाणं असूनही लहानपणी मात्र मी संगीताकडे अजिबात आकृष्ट झाले नव्हते. ’मी अगदी लहानपणापासूनच गातो आहे, चार वर्षांचा होतो, तेव्हापासून रियाज करतो’, असं आपण मुलाखतींमध्ये वाचतो, ऐकतो. माझ्या बाबतीत असं काही झालं नाही. गाणं सतत कानावर पडायचं, पण मी अजिबात गात नसे. घरातल्या इतर कोणीही गाता कामा नये, असं मला वाटायचं. आईनं तर मुळीच नाही. कारण गायला लागले की आईबाबा मला फार लांबचे वाटू लागत. मंचावर बाबा गायला बसले की, हे आपले बाबा नाहीत, हे आपल्या ओळखीचे नाहीत, असंच वाटायचं. मंचावरती फार वेगळे असायचे ते. पण घरातल्या गाण्याचा गहिरा प्रभाव त्या वयात माझ्यावर नक्की पडला असावा. फक्त गाण्याचाच नव्हे, तर इतर कलांचा, वाचनाचा आणि बाबांच्या निसर्गप्रेमाचाही. त्या नकळत्या वयात झालेल्या संस्कारांमुळंच माझ्या आयुष्याला आजची दिशा मिळाली असावी.

Kalapini2.JPG

शाळेत असताना लताबाई, आशाबाई यांची हिंदी गाणी गुणगुणणं, एवढाच माझा गाण्याशी संबंध होता. चित्रपटसंगीतावर माझं फार प्रेम होतं. गुंगून जात असे मी ती गाणी ऐकताना. शाळेत गाण्याच्या स्पर्धा व्हायच्या, त्यांतही मी फिल्मी गाणीच गायचे. अभ्यास करताना, झोपताना रेडिओ माझ्या कानाशी असायचा. शाळेतून घरी आल्यावर आधी रेडिओवर क्रिकेटची कॉमेण्ट्री किंवा सिनेमाची गाणी लावायचे. अमीन सयानीची बिनाका गीतमाला मला अतिप्रिय होती. लताबाई, आशाताई, महंमद रफी, किशोर कुमार हे माझे अत्यंत आवडते गायक. त्यांच्या क्षेत्रातले फार उंचीचे कलावंत आहेत हे सारे, आणि त्यांची गाणी ऐकताना मी तल्लीन होत असे. शास्त्रीय संगीत सुरू झालं की मात्र मी आत जाऊन झोपायचे. हे गाणं नकोच, असं तेव्हा वाटायचं. त्यामुळं मी गाणं शिकण्याचा प्रश्नच नव्हता. आई गाते, वडील गातात, भाऊ गातो, बाबांचे विद्यार्थी गातात, त्यात आपणसुद्धा कशाला? पण घरात मी अगदीच कान बंद करून वावरत नसणार, कारण बाबांच्या, आईच्या गाण्याच्या माझ्या लहानपणीच्या आठवणी आजही ताज्या आहेत.

कुमारजी आणि वसुंधराताईंनी ’मला उमजलेले बालगंधर्व’ हा कार्यक्रम बालगंधर्वांच्या पहिल्या पुण्यतिथीला सादर केला तेव्हा मी फार लहान होते. मला आठवतंय, बाबा आणि आई तासन्‌तास ग्रामोफोनवर बालगंधर्वांच्या रेकॉर्ड्स ऐकायचे घरी. बालगंधर्वांच्या ताना कुठल्या अंगानं जातात, हे त्यांनी लिहून काढलं होतं. अनेक महिने आईबाबांनी त्या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले होते. ’तुलसीदास - एक दर्शन’ हा एक फार निराळ्या ढंगाचा कार्यक्रमही बाबांनी सादर केला होता. तुलसीदास म्हटलं की सर्वांना ’रामचरितमानस’ आठवतं. पण ’विनयपत्रिका’, ’गीतावलि’ अशा त्यांच्या रचना बाबांनी गोळा केल्या. या पुस्तकांमधलं प्रत्येक पान त्यांनी अनेकदा वाचून काढलं होतं. सकाळी आठ वाजता बाबा वाचायला बसायचे. दुपारी तीन - साडेतीनपर्यंत त्यांना इतर कशाचं भानच नसायचं. मग फारच उशीर होतोय बघून आई मला त्यांना जेवायला बोलवायला पाठवायची. जेवून तासभर विश्रांती घेतली की ते परत कामाला लागत. अगदी रात्रीपर्यंत. ’तुकाराम - एक दर्शन’च्या वेळीही त्यांचा असाच दिनक्रम असे. पुण्याच्या प्रा. अरविंद मंगरुळकर, प्रा. चिरमुले यांच्याशी हा कार्यक्रम नेटका अणि निर्दोष व्हावा, म्हणून त्यांनी बरीच चर्चा केली होती. पण या सार्‍याचा बाबांवर ताणही खूप यायचा. नवं काही घडवताना येणारा अपरिहार्य असा ताण तर होताच, पण त्यांना ब्राँकायटीसचा खूप त्रास व्हायचा. अनेक कार्यक्रमांच्या आधी मी त्यांना तब्येतीमुळं बेजार झालेलं पाहिलं आहे. तासन्‌तास ते पलंगावर खोकत पडून असायचे. मला आठवतं, गांधीमल्हार राग रचण्याच्या वेळी तर ते काळजीनं, वैचारिक ताणामुळं अक्षरश: काळवंडले होते. एकप्रकारच्या प्रसूतिवेदनाच होत्या त्या. अशावेळी ते फार कोपिष्ट होत. पण आई त्यांना सांभाळून घ्यायची. कित्येकदा बाबा नुसते तंबोरे जुळवून खोलीत बसून राहत. आई किंवा मुकुलदादा तासन्‌तास तंबोरे वाजवायचे. कोणीच एकमेकांशी एक शब्दही बोलत नसे. कधीकधी ते बराच वेळ बागेत काम करत किंवा तांदूळ निवडत बसायचे. आमच्यावरही त्यांचा राग मग निघत असे. मुकुलदादानं तर फार सहन केला आहे त्यांचा राग. मी लहान असल्यानं पळून जायचे, पण दादा त्यांच्या तावडीत सापडायचा.

बाबांना येणारा ताण पाहून, त्यांचं रागवणं बघूनही मी कधी गाणं शिकण्याचा विचार केला नव्हता. बाबा नेहमी म्हणायचे की, चांगला गायक होण्यासाठी अगोदर चांगला विद्यार्थी होणं आवश्यक आहे. संगीत ही गायकाची मूळ प्रेरणा असतेच, पण संगीताचा विद्यार्थी होण्याची प्रेरणाही मिळायला हवी. जोपर्यंत तुम्ही उत्तम विद्यार्थी होत नाही, तोपर्यंत तुम्ही चांगला गायक होऊच शकत नाही. त्यामुळं संगीतशिक्षणात शॉर्टकट नाही. लंबी रेस का घोडा व्हायचं असेल, तर भरपूर मेहनत करायलाच हवी. त्यातच महत्त्वाचं म्हणजे आपण चांगले विद्यार्थी आहोत का, हे सतत स्वत:ला विचारत राहायला हवं. संगीताचं अध्ययन करण्यासाठी आपण विद्यार्थी झालो आहोत, की संगीताची एक झगमगती बाजू आपल्याला आकर्षित करत आहे, हे आपण सतत तपासून पाहिलं पाहिजे. फक्त मैफिली गाजवणं हा संगीत शिकण्यामागचा उद्देश कधीच नसावा. संगीताचं विद्यार्थीपण आपण किती आत्मसात केलं आहे, आपण संगीताकडे किती गांभीर्यानं बघतो, याकडे लक्ष देणं अधिक महत्त्वाचं. आपण विद्यार्थी आहोत, ही भावना घेऊन तुम्ही वावरलात तरच तुम्ही काहीतरी मिळवू शकाल, ही बाबांची भूमिकाच सतत माझ्यासमोर होती. बाबांच्या या विचारांमुळं त्यांच्याकडे आलेले बरेचसे विद्यार्थी लवकरच गळून पडले, असं मला कधीकधी वाटतं. पण म्हणून त्यांच्याकडे शिकायला सुरुवात करायची तर आपल्याला हे पेलवेल की नाही, आपल्याला हे जमेल की नाही, त्यांच्याकडे शिकण्याची आपली कुवत आहे का, असे प्रश्न मला पडले होते. आपल्या घरातलं गाणं अतिशय उच्च दर्जाचं आहे, हे मला कळत होतं. पण गाणं शिकण्याबद्दलची धास्तीही मनात होती. अशा एकंदर वातावरणात मी आईसमोर गाणं शिकायला बसू लागले. तिच्याच सांगण्यावरून. विद्यार्थ्यांना शिकवत असताना तू येऊन बस, नुसतं ऐक, असं ती सांगायची. तिथून माझं गाणं शिकणं सुरू झालं. अनिच्छेनंच अर्थात. आई एखादी बंदीश शिकवायची, आणि दोनदा आईपाठोपाठ गायलं की ती माझ्या गळ्यावर चढत असे. सतत गाणं ऐकल्यानं झालेल्या संस्कारांमुळं कदाचित, पण मी चटकन शिकत असे. पण तरीही संगीतशिक्षणाकडे मी फार गांभीर्यानं बघत नव्हते. बाबांबद्दल, त्यांच्या गाण्याबद्दल अजूनही मला फारशी माहिती नव्हती.

मी सहावीत असतानाची एक आठवण आहे. आमच्या शाळेच्या वार्षिकासाठी माझ्या वर्गशिक्षिकेनं मला काहीतरी लिहायला सांगितलं. लेख, कविता काहीही चालेल, असं म्हणाल्या. गाण्याबद्दल, किंवा आईवडिलांबद्दलच लिही, असं काही त्या म्हणाल्या नाहीत. माझे आईबाबा गातात, हेच मुळी मला देवाससारख्या गावात पटवून देता यायचं नाही. ’तुझे वडील काय करतात?’ असं कोणी वर्गात विचारलं की मी सांगे, माझे आईबाबा गातात. त्यावर त्यांचा प्रश्न असे, ’अच्छा, पण करतात काय?’ फक्त विद्यार्थीच नाही, शिक्षकांच्या बाबतीतही हे घडत असे. घरी येऊन मी आईला विचारलं की, मी काय लिहू? आई म्हणाली, बाबांबद्दलच का लिहीत नाहीस? मी म्हटलं, अगं, पण मला माहीत नाही बाबांबद्दल फार काही. ती म्हणाली, तुला माहिती नसेल, तर माहिती मिळव. तू त्यांच्याबद्दल वाच, त्यांच्याबद्दल प्रश्न विचार. त्यांनी भरपूर लिहिलं आहे, त्यांच्याबद्दलही भरपूर लिहिलं गेलं आहे. त्यांचं गाणं ऐक, आणि लिही त्यांच्याबद्दल. मग मी बाबांवर लिहिले गेलेले अनेक लेख वाचले. ते लेख वाचून लक्षात आलं की, अरेच्चा, आपल्याला तर आपल्या बाबांबद्दल खरंच काही माहिती नव्हती. ते लेख मी पुन:पुन्हा वाचले, आणि नंतर शाळेच्या वार्षिकासाठी बाबांवर एक लेख लिहिला. त्या वयात अर्थातच वाचलेल्या त्या सर्व लेखांचं पूर्ण आकलन होणं शक्य नव्हतं, आणि जे कळलं ते पुन्हा स्वत:च्या शब्दांत मांडणंही शक्य नव्हतं. पण हा अमुक लेख वाचून काय वाटलं, तमुक लेख वाचून काय वाटलं, ते एकत्र करून, थोडी माझी भर घालून मी लेख लिहिला. तो लेख मी आधी मुकुलदादाला दाखवला. त्यानं तो वाचला आणि म्हणाला, छान लिहिलं आहेस. पण ही माहिती तुला कुठून मिळाली? त्याला मी काय ते सांगितलं. तो म्हणाला, हा लेख तू बाबांना दाखव. आता आली का पंचाईत! घरात आमचे बाबा म्हणजे साक्षात जमदग्नी. त्यांना हा लेख आवडला नाही तर? काही चुका झाल्या असतील तर? पण दादानं आग्रह केल्यावर शाळेला जायच्या आधी घाबरत घाबरत मी तो लेख त्यांना दिला. म्हटलं, शक्य झालं तर हा लेख तुम्ही वाचा, तुमच्यावरच लिहिलाय, आणि कसा झाला ते मला संध्याकाळी सांगा. ते माझ्याकडे जराही न बघता म्हणाले, ठेव त्या टेबलावर. मी गेले शाळेत. संध्याकाळी घरी आले तेव्हा त्यांनी तो वाचला होता. मला म्हणाले, राहुलला फोन लाव. राहुलजी बारपुते हे बाबांचे अतिशय जवळचे मित्र. थोर साहित्यिक आणि ’नई दुनिया’ या वर्तमानपत्राचे संपादक. मी फोन लावून दिला त्यांना. बाबा फोनवर म्हणाले, अरे राहुल, आमच्या पिनूडीनं माझ्यावर एक लेख लिहिलाय रे, आणि तू तो वाचलास पाहिजेस. बाबांचं हे बोलणं ऐकून माझा जीव भांड्यात पडला. नंतर आईकडेही त्यांनी माझं कौतुक केलं, पण ’तू खूप छान लिहिलंस’, असं बाबा मला मात्र म्हणाले नाहीत.

मुलांना सिनेमा बघायला घेऊन जाणं, बाहेर फिरवायला घेऊन जाणं, असं बाबांनी कधीच केलं नाही. त्यांना स्वत:ला शौक होता टांग्यातून फिरायचा. अहमदमियांच्या टांग्यातून ते फिरायचे. आम्हांला कधीकधी ते त्यांच्याबरोबर न्यायचेही. पण मुलांचे लाड करणं, कौतुक करणं वगैरे त्यांना जमायचं नाही. त्या वयात आम्हांला मात्र त्याचं वाईट वाटायचं. आमच्या घराच्या मागे कडुलिंबाचं मोठ्ठं झाड होतं. तिथे ’सावन के झू्ले’ लागायचे. आमच्या माळव्यात या झुल्यांचं प्रस्थ फार आणि मला झुला झुलायला अतिशय आवडायचं. त्यामुळं मी तिथं जाऊन झुल्यांवर बसत असे. मग एक दिवस बाबा म्हणाले की, मी तुझ्यासाठी घरीच झुला तयार करतो. मग बाबांनी बाजारातून लालचुटुक दोरी आणली, बांबू आणले आणि मला स्वत:च्या हातानं झुला करून दिला. आम्ही गावाच्या पार एका टोकाला राहायचो. घरामागच्या त्या झाडाखाली झुल्यांमुळे थोडी गजबज असायची, पण तसं एकाटच होतं सगळं. म्हणून कदाचित बाबांनी मला घरीच झुला बांधून दिला असावा. मी खूप खूश झाले होते तेव्हा. घरी झुला झुलता येईल, यापेक्षा बाबांनी स्वत: तो बांधला याचा जास्त आनंद झाला होता. त्याचवेळी किशोरीताई आमोणकर आणि पद्माताई जोगळेकर (आताच्या तळवलकर) घरी आल्या होत्या. देवासला त्यांचं गाणं होतं. किशोरीताई आणि पद्माताई मला त्या झुल्यावर झोका देत आहेत, ही माझी एक लाडकी आठवण आहे. बाबांच्या अशा आठवणी तशा विरळाच आहेत. त्यांनी माझ्याशी बोलावं, माझ्याशी खेळावं, असं मला फार वाटे. त्यांच्याशी बोलायला जावं, तर ते कायम लोकांच्या गराड्यात असत. इतक्या लोकांसमोर कसं बोलणार त्यांच्याशी? त्यांना मुलंच आवडत नसत, असं नाही. त्यांना आमच्याबद्दल प्रेम वाटत नसे, असंही नाही. पण ते त्यांच्या सृजनात्मक, क्रियाशील जगात इतके रमले होते, की त्यांना या गोष्टी करण्यासाठी वेळच नव्हता. आता वाटतं, त्यांनी तसा वेळ घालवला नाही, हेच बरं. नाहीतर कदाचित आजचे कुमार गंधर्व आपल्याला दिसलेच नसते. पण आईवडिलांकडून, मोठ्या भावाकडून काही गोष्टी आपल्याला कधीच मिळू शकल्या नाहीत, याची खंत आजही मनात कुठेतरी आहे. सृजनात्मक पातळीवर विचार केला, तर मात्र लक्षात येतं की एक खूप मोठी सृजनात्मक शक्ती बाबांच्या, आईच्या ठायी होती, आणि ती त्यांच्याकडून अनेक सांगीतिक गोष्टी करवून घेई. भारतीय संगीताच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं होतं हे.

kalapini4.jpg

बाबांचं गाण्याइतकंच निसर्गावर प्रेम होतं. आमच्या घरी कमीत कमी शंभर सव्वाशी झाडं होती. लहानपणी प्रत्येक झाडाजवळ नेऊन बाबांनी मला त्या झाडाचं नाव सांगितलं होतं. हे अमुक झाड आहे हं, याची पानं बघ, किती सुरेख आहेत, असं बाबा मला सांगत. जुईची फुलं कशी, जाईची कशी, त्यांच्या वेली कशा, चमेलीची वेल वेगळी कशी, तिची पानं कशी, हे बाबांनी मला लहानपणी सांगितलं होतं. झाड म्हणजे काय, झाडं कशासाठी असावीत, झाडं कशी असावीत हेसुद्धा बाबा आम्हांला सांगत. आमच्या घरी तो उंचच उंच वाढणारा विलायती अशोक नव्हता. झाड कसं असावं? सावली देणारं, फळं देणारं आणि फुलं देणारं. ते अशोकाचं झाड यांपैकी काहीतरी देतं का? नाही. नुसतंच आपलं वाढतं. मग नको ते झाड आपल्या घरी, असं बाबा म्हणत. बाबांनी शिकवल्याबरहुकुम घरी आलेल्या पाहुण्यांना बाग दाखवणं, हे माझं काम असायचं. कुठल्या झाडाला कधी आणि किती पाणी द्यायचं, त्यांना फुलं कधी येतात, ती फुलं कशी खुडायची हे मी पाहुण्यांना सांगत असे. इतक्या लहान मुलीला एवढं ज्ञान कसं, याचं त्यांना आश्चर्य वाटत असे.

संगीत आणि सांगीतिक क्षेत्रातली वाटचाल जितकी महत्त्वाची, तितक्याच महत्त्वाच्या इतर अनेक गोष्टी आहेत, असा बाबांचा दृष्टिकोन होता. आपल्या मुलांनी, शिष्यांनी भरपूर वाचावं, असं त्यांना वाटे. पण म्हणून आमच्या हातांत पुस्तकांचा गठ्ठा ठेवून आम्हांला मारूनमुटकून वाचायला ते बसवत नसत. मला जेव्हा वाचनाचा शौक लागला तेव्हा त्यांना फार आनंद झाला. मी नववीदहावीत असताना मला इरावती कर्व्यांचं ’युगान्त’ वाचायचं होतं, पण बाबा म्हणाले की, तुला ’युगान्त’ समजून घ्यायचं असेल, तर आधी महाभारत वाचावं लागेल. मला फार राग आला होता तेव्हा. मला ’युगान्त’ वाचायची खूप इच्छा होती. शिवाय पुस्तकाचा आकार बघता ते महाभारतापेक्षा मला माझ्या आवाक्यातलं वाटत होतं. माझं शिक्षण हिंदी माध्यमातलं. त्यामुळं मराठी वाचनात फार गती नव्हती. बरं, महाभारत वाचायचं तेही न. र. फाटकांनी संपादित केलेलं. सर्व सात खंड. पुढची तीन वर्षं मी महाभारत वाचत होते. पण अतिशय आनंददायक असा अनुभव होता तो. एक परिपूर्ण, भारतीय ग्रंथ वाचल्याचं आनंद मला मिळाला. आणि बरंच काही शिकायलाही मिळालं. मानवी स्वभावाबद्दल केवढं शिकवून जातो हा ग्रंथ. नंतर अर्थातच मी ’युगान्त’ वाचलं. पण बाबांनी मला आधी महाभारत वाचायला लावलं, याचा कायम मला आनंद वाटत राहिला. अशी अनेक पुस्तक बाबांमुळं मी वाचली. राहुल सांकृत्यायनांची ’वोल्गा ते गंगा’ आणि ’जय योद्धेय’ ही दोन पुस्तकं त्यांनी मला वाचायला लावली. हिंदीतल्या सूर्यकांत त्रिपाठीजी ’निराला’, महादेवी वर्माजी, भवानीप्रसाद मिश्र अशा अनेक कवींची ओळखही मला बाबांमुळंच झाली. महादेवी वर्मांच्या चार ओळी एकदा बाबांनी मला ऐकवल्या होत्या. अजूनही स्मरतात मला त्या.

मैं नीर भरी दुख कि बदली
विस्तृत नभ का कोई कोना,
मेरा न कभी अपना होना,
परिचय इतना, इतिहास यही-
उमड़ी कल थी, मिट आज चली!

एकदा बाबांबरोबर मी विंदाकाकांच्या घरी गेले होते. विंदाकाकांनी मला दोन पुस्तकं दिली. ’आकाशाचा अर्थ’ आणि ’स्पर्शाची पालवी’. ही दोन्ही गद्य पुस्तकं वाचून मी फार प्रभावित झाले. विंदाकाकांची कविता मला काही कळत नसे. या पुस्तकांमधले लेख कळले, असं काही मी म्हणणार नाही. पण हे काहीतरी खूप भव्यदिव्य आहे, एवढं मात्र जाणवलं. बाबांना मी तसं सांगितल्यावर त्यांनीही ती पुस्तकं वाचून काढली. त्यांना एखादी गोष्ट आवडली की, आमच्याकडे आल्यागेल्या प्रत्येकाला ते त्याबद्दल सांगायचे, तिचा आस्वाद घ्यायला लावायचे. बाबांनी लगेच राहुलजींना फोन केला, त्यांच्याशी पुस्तकांबद्दल बोलले, त्यांच्या घरी पुस्तकं पाठवून दिली. विष्णूजी चिंचाळकरांकडे पुस्तकं पाठवली. मग त्या पुस्तकांवर अनेकदा चर्चा झाल्या. त्यांतल्या आवडत्या वेच्यांची पारायणं झाली. असं अनेकदा व्हायचं. बाबा त्यांना आवडलेल्या पुस्तकांचा रसास्वाद घ्यायचेच, पण आपल्या स्नेह्यांनाही तो आनंद मिळावा म्हणून धडपडायचे. बाबांच्या या स्नेह्यांकडूनही मला खूप शिकायला मिळालं. एकदा श्रीपुकाका घरी आले होते. ते आणि राहुलजी गप्पा मारत बसले होते, आणि बाबा एकटेच झोपाळ्यावर काहीतरी वाचत होते. बाबांना एकटं बसलेलं पाहून मी त्यांच्याशी बोलायला जाणार इतक्यात श्रीपुकाका म्हणाले, "मनुष्य एकटा बसलेला असला तरी तो एकटा असेलच असं नाही". केवढी मोठी शिकवण होती ही माझ्यासाठी! चित्रकार गुरुजी चिंचाळकर आणि चित्रकार डी. जे. जोशी यांच्याबरोबर प्रवास करताना लक्षात यायचं की, त्यांना कुठेही चित्रं दिसतात. आकाशात, झाडामध्ये, जमिनीवर अशी कुठेही त्यांना चित्रं दिसायची. नजर फिरवली की चित्र तयार. पण यासाठी जबरदस्त तपश्चर्या लागते, याचं भान मला तेव्हा आलं. भाईकाका (पुलं), विंदाकाका, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, रणजीत देसाई, राहुलजी बारपुते, नाना बेंद्रे, शरद जोशी, अशोक बाजपेयी, नरेश मेहता असे साहित्यिक - कलावंत घरी येऊनजाऊन असायचे. अनेक गांधीवादी नेते, आर्किटेक्ट्स बाबांच्या बैठकीत असत. या गुणिजनांच्या चर्चा आमच्या घरी चालायच्या, तेव्हा मी तिथे जाऊन बसायचे. लक्षपूर्वक ऐकायचे. अनेक वेगवेगळे विषय त्यांच्या बोलण्यांत असायचे. चित्रकला, शिल्पकला, साहित्य, समीक्षा अशा अनेक विषयांवर चर्चा व्हायच्या, मतं मांडली जायची. त्यातलं मला किती कळायचं तो भाग वेगळा, पण जे काही बोलणं सुरू आहे, ते महत्त्वाचं आहे, ते ऐकलं पाहिजे, ही जाणीव मात्र होती. त्यामुळं झालं काय की, आपल्यालाही वेगवेगळ्या विषयांतली माहिती असावी, आपल्यालाही असं बोलता आलं पाहिजे, असं मला वाटू लागलं. आपण ज्या कलेसाठी आयुष्य वाहिलं आहे, तिला पुरेसं समजून घ्यायचं असेल, तर इतर कलांमध्ये आपण रस घेणंही महत्त्वाचं आहे, आणि बाबांमुळं ही सवय सुरुवातीपासूनच अंगी बाणण्याचा मी प्रयत्न केला. यामुळंच असेल कदाचित, पण बाबांचं गाणं किती वेगळं आहे, हे मला हळूहळू ध्यानी येऊ लागलं.

मी आठवीत असेन तेव्हा मंचावर मी पहिल्यांदा शास्त्रीय गायन सादर केलं. बाबा आमट्यांना भेटायला आम्ही सर्वजण आनंदवनात गेलो होतो. दरवर्षीप्रमाणे आनंदमेळावा होता तिथे. राहुलजी, गुरुजी चिंचाळकर, त्यांचा मुलगा दिलीप, बाबा डिके, आईबाबा आणि मी असे सगळे एक छोटी बस करून देवासहून गेलो होतो. पुण्याहून भाईकाका, वसंतराव देशपांडेकाका आले होते. पहिल्याच दिवशी सोहळा सुरू होण्यापूर्वी बाबा आमटे बाबांना म्हणाले, "कुमारजी, तुमची मुलगी गाईल का हो आज?" हे ऐकून मी हादरूनच गेले. आपल्याला इथे गावं लागेल, हे माझ्या डोक्यातही नव्हतं. बाबा आमट्यांचं बोलणं ऐकून मला घामच फुटला. बाबा म्हणाले, "म्हणेल की गाणं ही". मला न विचारताच बाबांनी पटकन सांगून टाकलं. बाबांनी रचलेलं एक मंगलगान मला पाठ होतं. मी आईला एका खोलीत घेऊन गेले आणि तिला ते म्हणून दाखवलं. खूप घाबरले होते तेव्हा मी. पण आई म्हणाली, "छान म्हटलंस. असंच तिथेही म्हण". गाण्याच्या वेळी मंचावर बाबा आमटे, साधनाताई, विकासदादा, भाईकाका, वसंतराव देशपांडे असे सगळे होते. गायला मी आणि रवींद्र साठे. रवी साठे त्या वेळी एक उत्तम गायक म्हणून गाजत होते. त्यांची अनेक गाणी लोकप्रिय झाली होती. अर्थात मला तेव्हा हे काही माहीत नव्हतं. ते माझ्यानंतर गाणं म्हणणार होते. समोर अफाट मोठा जनसमुदाय. माझी घाबरगुंडी उडाली होती. तशच अवस्थेत मी ते गाणं म्हटलं. बोल होते - ’धन धन मंगल गाओ’. मंचावर गायलेलं हे माझं पहिलं गाणं. ते मी आनंदवनात इतक्या महान विभुतींसमोर गायलं, याबद्दल आज मलाच धन्य वाटतं.

माझं ग्रॅज्यूएशन पूर्ण झालं तेव्हा मी गाणं शिकायला सुरुवात केली होती. आईसमोर बसत असे मी शिकायला. गाण्याचं शास्त्र आणि व्याकरण मी आईकडूनच जास्त समजवून घेतलं. क्वचित बाबांकडूनही शिकत होते. गुरू म्हणून बाबा खूप कडक होते. मी बाबांसमोर शिकायला बसायचे, तेव्हा मला त्यांचं शिकवणं बरेचदा कळायचंच नाही. तरी मी रोज तास-दोन तास त्यांच्याकडे शिकायचे, पण नंतर मात्र आत आईजवळ जाऊन रडायचे. मग आई मला जे कळलेलं नसे, त्याचा उलगडा करून सांगायची. तेव्हा कुठं माझ्या डोक्यात थोडासा प्रकाश पडायचा. गुरूकडून ज्ञान मिळवण्यासाठी शिष्याचीही थोडीशी तयारी असावी लागते. बाबा ज्या पातळीचं गाणं शिकवायचे, तिथवर माझी पोच नव्हती. माझी तेवढी ताकद नव्हती. आईनं नंतर ते समजावून सांगितल्यावर दुसर्‍या दिवशी त्यांच्या समोर बसताना आपल्याला थोडंबहुत कळलं आहे, असं वाटायचं. एक जर आपण आकार ठरवला, तर तो आकार घडवत पुढे कसं जायचं, हे आई शिकवत असे. बाबांचं शिकवणं फार अमूर्त असायचं. मुळात पाया तयार नसल्यानं मला त्यातलं काहीच कळत नसे. मंदिरावर नुसता सोन्याचा कळस चढवून उपयोग नसतो. पाया पक्का असावाच लागतो. आईनं माझ्या संगीतशिक्षणाचा पाया पक्का करून घेतला. मुकुलदादाच्या बाबतीतही असंच घडलं. आई आणि तो बरेचदा पूरक रियाज करायला समोरासमोर बसत. बाबा कधीकधी बगिच्यात पाणी घालताघालता खिडकीपाशी यायचे, आणि सांगायचे की, बिलासखानी तोडीमध्ये ’मध्यम’ (स्वर) हा असा लावा. आता हा जो ’मध्यम’ लावायचा आहे, तो कुठल्या प्रतीचा लावायचा, तो किती रुतवायचा, किती फुलवायचा हे सांगणं, आणि बाकीचा बिलासखानी यांत समतोल साधलेला असायचा. हा समतोल साधण्यासाठी आधी तुम्हांला संपूर्ण बिलासखानी तोडी समजलेला असावाच लागतो, नाहीतर त्या ’मध्यमा’ची किंमत कळणार कशी? त्या ’मध्यमा’चं महत्त्व सांगण्याचं काम बाबा करायचे, पण त्यासाठी आधी बिलासखानी तोडी शिकवायची, बारकावे समजवायची, पाया तयार करून घ्यायची ते आई. जुन्या बंदिशी, रचना आम्हांला शिकता आल्या, त्यांच्यातलं सौंदर्य अनुभवता आलं ते आईमुळं. ग्वाल्हेर घराण्याच्या पद्धतीनं ती शिकवत असे. तिनं बाबांचं मोठेपण मनोमन जाणलं होतं, आणि आईच्या या शिकवण्यामुळंच बाबा किती मोठे गायक आहेत, त्यांचं शिकवणं किती वेगळं आहे, हे उमजायला लागलं.

kalapini5.jpg

मुंबईला देवधर गुरुजींकडे राहून बाबा अनेक वर्षं शिकले होते. या काळात त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांचं संगीत ऐकलं, त्यांचे सांगीतिक विचार समजवून घेतले. अनेक वेगवेगळ्या कलाकारांकडून त्यांनी ठेवणीतल्या चिजा, बंदिशी मिळवल्या, त्या शिकून घेतल्या. वेगवेगळ्या घराण्याच्या गायकांची राग हाताळण्याची पद्धत जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळाली. देवधर गुरुजींच्या विद्यालयात शिक्षणाच्या दृष्टीनं फार मुक्त वातावरण होतं. त्या काळी अशी वैचारिक मोकळीक इतरत्र मिळणं अवघड होतं. घराणेशाही जोरात होती तेव्हा. आणि म्हणून देवधर गुरुजींसारखा मुक्त विचारांचा गुरू मिळणं, ही बाबांसाठी मोठी भाग्याची गोष्ट होती. बाबांनीही हे मुक्त विचारांचं लेणं जबाबदारीनं पेललं. एखाद्या घराण्याचा गायक एखादा राग कसा पेलतो, तो एखादी बंदिश पारंपरिक पद्धतीनं गातो, की स्वत:चं काही वेगळेपण आणतो हे बाबांनी फार छान टिपून घेतलं असल्यानं आम्हां विद्यार्थ्यांनाही ते या दृष्टीनं शिकवत. रजब अली खाँसाहेबांची तोडी कशी होती, ते कशी बंदिश पेश करायचे, त्यांची स्वरलावणीची पद्धत कशी होती, ग्वाल्हेर घराण्याचे गायक ’जा जा रे’ हा बडा ख्याल कसा पेश करायचे, हे बाबा आम्हांला गाऊन दाखवायचे. पण ’मी या अमुक गायकाच्या पद्धतीनं गाऊन दाखवलं, आता तुम्हीही असंच गा’, असं कधीच ते म्हणाले नाहीत. वेगवेगळ्या शैलींची, पद्धतींची ओळख हा त्यांच्या शिकवण्याचा एक भाग होता. दुसरं म्हणजे, परंपरेची कास त्यांनी कधीच सोडली नाही. एका आख्यायिकेचा अनेकजण उल्लेख करतात. बाबा एका मैफिलीमध्ये भूप रागातली बंदिश गात होते, आणि त्यांनी मध्यम लावला. समोर भाईकाका होते, ते म्हणाले, "अरे, भूप रागात ’मध्यम’ लागत नाही". बाबा म्हणाले, "हा ’मध्यम’ कधीचा दारात येऊन उभा आहे, आणि मला ’आत येऊ दे, आत येऊ दे’ म्हणतोय. मी विचार केला, तोही आपला मित्र आहे, येऊ दे त्याला". कुमारजींनी परंपरेला कसा विरोध केला, हे सांगण्यासाठी बरेचदा ही आख्यायिका सांगितली जाते. पण कुमारजींनी भूप गाताना प्रत्येकवेळी मध्यम लावला नाही, हे आपण विसरतो. हे केवळ एका मैफिलीत घडलं, आणि ती बंदिश नंतर त्यांनी चैतीभूप या नावानं लिहिली. हा चैतीभूप मांडण्यासाठी बाबांनी आपल्या विद्रोही दृष्टिकोनाचा वापर केला. प्रत्येक कलाकाराला हे जमतंच असं नाही. ही ताकद आणि हा आधिकार मिळवण्यासाठी परंपरागत गोष्टी आधी पचवाव्या लागतात. परंपरेच्या मुळाशी जावं लागतं. परंपरेला पूर्णपणे समजून तुम्ही त्या चौकटीबाहेर एखादी रचना केली, तरच त्याला काही अर्थ असतो. बाबा या बाबतीत अतिशय रूढिप्रिय होते. त्यांना शास्त्राशी खेळ केलेला आवडत नसे. त्यांनी रचलेली प्रत्येक बंदिश ही रागरूपाला धरूनच होती.

परंपरा अतिशय प्रवाही असते. परंपरा म्हणजे साचून राहिलेलं पाणी नव्हे, तर ती एका नदीसारखी आहे. समुद्राला भेटायला निघालेली. तीत जर आपल्याला गोता मारायचा असेल, पोहायचं असेल, तर त्या परंपरेच्या प्रवाहाला जाणून घेणं आवश्यकच ठरतं. आणि ही ताकद फार कमी लोकांच्या ठायी असते, असं मला वाटतं. बाबांनी परंपरेच्या मदतीनंच नवतेची वाट चोखाळली होती. ’आवारा मसीहा’ हे शरश्चंद्र चट्टोपाध्यायांच्या आयुष्यावर लिहिलं गेलेलं पुस्तक आहे. श्री. विष्णू प्रभाकरजींनी लिहिलं आहे ते. या पुस्तकात शरश्चंद्रांच्या आयुष्यावर, त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीवर अतिशय मार्मिकपणे लिहिलं आहे. खूप सुरेख पुस्तक आहे हे. या पुस्तकात एक किस्सा आहे. एकदा कोणीतरी गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुरांना म्हटलं की, "तुम्ही आणि शरश्चंद्र चट्टोपाध्याय समकालीन. तुम्ही म्हणता की तुम्हांला त्यांचं साहित्य आवडतं. पण त्यांच्यापेक्षा तुमचं साहित्यच जास्त प्रसिद्ध आहे. तुमची पुस्तकंच अधिक नावाजली जातात. असं कसं?" यावर गुरुदेव उत्तरले होते, "मी लोकांसाठी लिहीत असलो, तरी शरदबाबू माझ्यासाठी लिहितात". असाच फरक, मला वाटतं, संगीतकारांसाठीचा संगीतकार, आणि संगीतकार सर्वांसाठी, यांच्यात आहे. संगीत हा बाबांचा प्राण होता, आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा विकास करण्यासाठी काय करता येईल, याचा विचार ते सतत करत असायचे. बंदिशी रचून ते गप्प बसले नाहीत. व्याकरणात अडकून राहिल्यामुळं अभिजात संगीतातलं सौंदर्य कमी होत असल्याचं पाहून त्यांनी तसं होऊ नये, म्हणून काय करता येईल याचा विचार केला. संगीताच्या सौंदर्यवृद्धीसाठी लोकसंगीताचा वापर त्यांनी केला. आज एखाद्या विषयाला वाहिलेल्या संगीतसभा होत असतात. बाबांनी कित्येक वर्षांपूर्वी ही पद्धत सुरू केली होती. सूरदास, तुकाराम, तुलसीदास, कबीर त्यांनी गाण्यातून व्यक्त केले. या कवींबद्दलचा त्यांच्या दृष्टिकोन त्यांनी श्रोत्यांसमोर मांडला. त्यांच्या विचारांमधलं खुलेपण आणि परंपरा जपण्याची धडपड त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरले.

पुढं अशा काही घटना घडत गेल्या की ज्यांमुळे बाबांबरोबर प्रवास करण्याची, त्यांना साथ करण्याची आवश्यकता निर्माण झाली. काही कौटुंबिक कारणं होती, शिवाय बाबांच्या तब्येतीच्या तक्रारी होत्या. त्यामुळे माझ्या आवडीनिवडीचा प्रश्नच नव्हता, मला गाण्याकडे वळावंच लागलं. गाण्याकडे मग मी जरा गंभीरपणे बघायला सुरुवात केली. बाबांबरोबर दौर्‍यावर जाणं, त्यांच्या मागे तंबोर्‍यावर बसणं, कार्यक्रमात ते काय गाणार आहेत ते समजून घेऊन शिकून घेणं, तशी त्यांना साथ करणं हे मग हळूहळू वाढतच गेलं, आणि माझ्या लक्षात आलं की, आपण गाण्याला जास्त वेळ देत नाही, हे काही योग्य नाही. आईकडून गाणं शिकण्यात, बाबांबरोबर दौर्‍यावर जाण्यात माझा रस वाढतच गेला. दरम्यान एमएससीसाठी मी अ‍ॅडमिशन घेतली होती, आणि त्यामुळे माझी फार ओढाताण होत होती. प्रॅक्टिकल्स, प्रोजेक्ट्स यांत बराच वेळ जायचा. कॉलेजात संध्याकाळपर्यंत वेळ जायचा, आणि घरी आल्यावर परत गाणं शिकायला बसायला शक्तीच नसायची. एक दिवस मग मी बाबांना सांगितलं की, आज मी कॉलेजात जाऊन माझी अ‍ॅडमिशन रद्द करून येते. अर्धं वर्षं झालं असलं, तरी मी माझ्या प्रोफेसरबाईंना सांगते की, आता पुढे शिकणं मला शक्य नाही. बाबांना जरा याचं वाईटच वाटलं. सुरुवातीपासून त्यांचं आणि आईचंही म्हणणं होतं की, शिक्षण व्यवस्थित पूर्ण व्हायलाच हवं. त्या दिवशी मी कॉलेजला जात असताना बाबा मला गेटापर्यंत सोडायला आले होते. म्हणाले, "तू अजूनही नीट विचार कर. असा निर्णय लगेच घेऊ नकोस". पण माझा निर्णय झाला होता. मी कॉलेजात जाऊन काय ते सांगून आले. आपण हा निर्णय आधीच का नाही घेतला, याचं आता वाईट वाटतं. फार पश्चात्ताप होतो. मी अगोदरच गाण्याकडे वळायला हवं होतं. हा निर्णय घेतला त्याच्या निदान पाच वर्षं आधी मी गाण्याचा गंभीरपणे विचार केला असता, तर मला गुरू म्हणून बाबांचा बराच जास्त सहवास लाभला असता, आणि माझ्या झोळीत आज आहे, त्यापेक्षा बरंच काही जास्त असतं. पण मला असंही वाटतं की, जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सहजासहजी मिळत नाही, आणि ती तशी न मिळाल्याची खंत असते, तेव्हा आपण तिच्याकडे अधिक विचारपूर्वक बघतो. जास्त डोळसपणे तिला आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो.

बाबा गेल्यानंतर पहिल्यांदा मी स्वतंत्रपणे गायले. तोपर्यंत त्यांना तंबोर्‍यावर साथ करायचे केवळ. आपण स्वतंत्रपणे गायला पाहिजे, किंवा तसं गाऊ शकू, असं मला कधी ते असेपर्यंत वाटलंच नाही. १२ जानेवारी, १९९२ला बाबा गेले. ’आता तू स्वतंत्रपणे गायला लाग’, असं मला तेव्हा अनेकांनी सांगितलं. सुरुवातीला माझी तशी इच्छा नव्हती. हिंमतही नव्हती. पण बाबा गेल्यानंतरही मला त्यांच्या अलौकिक उपस्थिती जाणवत होती. वडील म्हणून ते अजूनही अवतीभवती आहे, असं मला वाटत होतं, आणि मग मी स्वतंत्रपणे गायला सुरुवात केली. आजही मी गाते, किंवा गायचा प्रयत्न करते, हे म्हणणं तितकंसं बरोबर नाही. गाण्याच्या निमित्तानं खरं म्हणजे माझ्या बाबांनाच भेटत असते मी. पुन:पुन्हा.

Kalapini3.JPG

***

या लेखातली सर्व छायाचित्रे श्रीमती कलापिनी कोमकली यांच्या खाजगी संग्रहातून

***

पूर्वप्रसिद्धी - 'माहेर' - दिवाळी २०११

***

हा लेख मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्यास अनुमती दिल्याबद्दल श्रीमती कलापिनी कोमकली आणि श्रीमती सुजाता देशमुख यांचे मनःपूर्वक आभार

***
विषय: 
प्रकार: 

वा, सुरेख लेख !! हा लेख आधी वाचनात आला नव्हता. इथे दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद.

मी लहान असताना कुमार गंधर्व आणि कलापिनी कोमकली आमच्या घरी आले होते. ते मोठे गायक आहेत हे माहीत असलं तरी त्यांचं, त्यांच्या गायकीचं श्रेष्ठत्व पुरेपूर उमजण्याचं वय नव्हतं. लेकीला सतत 'पिन्या' हाक मारणारे वडील आणि त्यांची अतिशय काळजी घेणारी समंजस, जबाबदार लेक ही ओळखच आधी ठसली मनात.

मस्त लेख!

माझ्या पहिल्या ऑफिसच्या कृपेने मला कलापिनी कोमकलींचं गाणं ऐकायला मिळालं. ऑफिसचं ऑडि. पूर्ण भरून लोक खाली मांडी घालूनही बसले होते. खूप अप्रतिम अनुभव होता तो!

@ चिनूक्स, व्वा!!! अप्रतिम लेख!!! एकाच लेखात आई, वडील आणि मुलीच्या व्यक्तिमत्वाची ओळख झाली. नवीन माहिती कळली. धन्यवाद.

खूपच सुंदर लेख आहे. स्पष्टता, पारदर्शकता, प्रगल्भता, किती गुण दिसतात त्यांच्या लेखनात. किती विचार आहे प्रत्येक वाक्यात. वय काय असेल त्यांचं? जेमतेम चाळिशीच्या वाटतात.
वाचताना एकीकडे रविन्द्र पिंग्यांचा 'कुमार गंधर्वांचं शांत, तृप्त जग' हा आणखी एक सुंदर लेख आठवत राहिला.
धन्यवाद चिन्मय, या आठवड्यात छान छान खाऊ मिळतोय.

वाचताना एकीकडे रविन्द्र पिंग्यांचा 'कुमार गंधर्वांचं शांत, तृप्त जग' हा आणखी एक सुंदर लेख आठवत राहिला.
>>
येस्स मलाही.
सुंचिन्मय, इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद चिन्मय

सुंदर लेख. इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल धम्यवाद, चिन्मय!
कुमार गंधर्वांबद्दल बोलताना कुणीतरी शापित गंधर्व असा उल्लेख केल्याचं आठवतंय, पण नक्की कोण असं म्हणालं आठवत नाहीये. त्यांचं वैयक्तिक आयुष्य पाहिलं तर थोडंफार तरी खरं असावं. अलौकिक प्रतिभेचा गायक आणि रचनाकार. त्यांची निर्गुण भजनं ऐकताना उदास वाटत वाटत अचानक शांत वाटतं. विलक्षण अनुभव.

@ सई., @ टण्या, वाचताना एकीकडे रविन्द्र पिंग्यांचा 'कुमार गंधर्वांचं शांत, तृप्त जग' हा आणखी एक सुंदर लेख आठवत राहिला.>>> कृपया, आपणांस जमत असेल तर लिंक द्याल काय?

लिंक शोधावी लागेल सचिन. 'सर्वोत्तम पिंगे' संग्रहात मिळेल तो लेख. मूळ कोणत्या पुस्तकात आहे त्याची कल्पना नाही.

सुरेख लेख आहे. कुमारांच्या गाण्याबद्दल तर अफाट लिहिता येईलच, त्याचबरोबर त्यांच्या गायनच नव्हे, तर इतर क्षेत्रातील व्यासंगाबद्दल खूप ऐकले आहे. मराठी लोकांमध्ये पॉलीमॅथ असणारे जरा दुर्मिळच वाटतात. त्यांपैकी एक असलेल्या कुमार गंधर्वांचं खरंच कौतुक आहे. श्रीमती कलापिनी ह्यांनी त्यांच्या आईच्या सहभागाबद्दलही छान लिहिले आहे. हा लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद चिनूक्स! ह्या महिन्यात मायबोलीवर सुंदर मेजवानी आहे अशा लेखांची!

वाचताना एकीकडे रविन्द्र पिंग्यांचा 'कुमार गंधर्वांचं शांत, तृप्त जग' हा आणखी एक सुंदर लेख आठवत राहिला.
>> येस्स मलाही. >> +१

@सचिन काळे

ही घ्या 'सर्वोत्तम पिंगे' ची लिंक Happy

http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5696097916680432122?BookNa...

http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b81645&language=mar...

http://www.majesticonthenet.com/product.php?id_product=1158

Pages