सायबरबुलिंग!

Submitted by साती on 21 September, 2016 - 01:32

तर मुलांनो फार फार वर्षांनंतरची गोष्ट आहे.
एका कम्युनिटीत एक माणूस ऑनलाईन असायचा.
त्याला सगळ्यांनी आपल्याला 'भाई' म्हणावंसं वाटायचं!
म्हणजे कसं स्ट्राँग, भारी वाटतं वगैरे!
अगदी भाई असा आय डी पण घेऊन झाला.
पण कुणी त्याला भाई म्हणतच नसे.
उलट अवलोकनात (प्रोफाईल) जाऊन त्याचे खरे नाव पाहून त्या नावाने हाक मारत, संबोधत!

माणूस अगदी फ्रस्टेट होऊन होऊन शेवटी ती कम्युनिटी सोडायच्या विचारात आला. शेवटी शेवटी तर चक्क ऑफलाईन राहू लागला.

शेवटी एका काकूंना त्याची दया आली.
त्या म्हणाल्या ' माणसा माणसा, ऑनलाईन ये'
'कसा मी येऊ'
'एक वसा देते तो घे. उतू नको, मातू नको'
'सांगा काकू'
' उद्यापासून कुणी तुला 'भाई' म्हणाले की आकांडतांडव कर, अ‍ॅडमिनकडे तक्रार कर, मला सटल सायबर बुलिंग होतंय म्हण!'
'त्याने काय होईल काकू?'
'अरे, लोक तुला आणआणखी 'भाई' म्हणतील. मग तू आणखी रागाव. शेवटी तुझं नाव 'भाई' पडून जाईल.'
'नक्की ना काकू?'
'नक्की बरं माणसा! माझं नावही असंच पडलंय बरं 'काकू' '
'धन्यवाद काकू!'

त्या रात्री एका फोरमवर काकू माणसाला मुद्दामून 'भाई' म्हणाल्या.

माणूस त्यांच्यावर खोटाखोटा चिडला.
त्यामूळे आणखी चार आय डी त्याला 'भाई' म्हणाले.

माणसाने अ‍ॅडमिनकडे तक्रार केली.
माणसाने 'सटल सायबर बुलिंग' वर धागा काढला.

अ‍ॅडमिनने भाईकडे दुर्लक्ष केलं. कारण भाई काही वाईट शब्द नाही.
मग भाईने खूप गळे काढले. मला भाई म्हणू नका असे ज्या त्या फोरमवर जाऊन सांगू लागला.
जे फोरम त्याला ओळखतही नव्हते तिथे त्याच्या 'भाई' पणाची चर्चा होऊ लागली.

मग हळुहळू काकूंच्या सल्ल्याने भाईने तक्रारीचा सूर कमी केला.

आता 'भाई' आनंदाने पूर्ण कम्युनीटीचा 'भाई' आहे.
थँक्स टू त्याची कणव आलेल्या काकू!

तर...
अशी ही 'सटल सायबर बुलिंगची' कहाणी. जशी तुम्हाला लाभली तशी इतरांना लाभू द्या.
तुम्हाला तुमच्या आवडीचे संबोधन तुमच्या तुमच्या कम्युनिटीत मिळू द्या.

उतू नका, मातू नका. सायबरबुलिंगला घाबरू नका.

साठा फोरमची कहाणी पाचा फोरमांत सुफळ संपूर्ण!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोळा मारणं हे सायबर बुलिंगमध्ये येत का हो? माझ्या निम्म्या वयाच्या एक *** (संबोधन आपल्या आवडीप्रमाणे टाकून घ्यावे) मला अनेकदा डोळा मारतात. मी त्यांच्या विरोधात अ‍ॅडमिनबुवांकडे तक्रार करु शकतो का?

{अवांतर - वास्तविक जीवनात जर एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला पाहून डोळा मिचकावला / मारला तर तो त्या स्त्रीचा विनयभंग समजला जातो आणि ती स्त्री त्या पुरुषा विरोधात कायदेशीर कारवाई पासून तर थेट चपलेने मारण्यापर्यंत काहीही अ‍ॅक्शन घेऊ शकते असं इथे मायबोलीवरच एका धाग्यात वाचलं होत. सायबरविश्वात हा गुन्हा ठरत नाही का?}

मस्त

तुम्ही राजकारणात का गेला नाहीत हो? तुमची खूप प्रसिद्धी झाली असती असल्या युक्त्या वापरून नि लगेच पंतप्रधान!
Happy

कायैना,
मी जन्मले पण नव्हते तेव्हा तुम्ही जाऊन बसलात अमेरिकेत.
मग मला राजकारणात जायला कुणी प्रोत्साहनच दिले नाही हो.
आता तुमच्या कृपेने ते ट्रंपकाका पुढे आले.
पण मी येऊन पडले इकडे बहामनीत.

आता जास्तीतजास्त किचन पॉलिटिक्स करू शकते, ते पण धड नाही!
Wink

सगळ्यांना धन्यवाद!
लहानपणी 'तेनालीराम' आणि 'बिरबल' या दोघांच्याही चातुर्यकथात ही गोष्ट वाचली आहे.

त्यात एका माणसाला लोकांनी आपल्याला 'शेटजी' म्हणावेसे फार वाटत असे.

तर इथे मी काकूंना 'बिरबल' 'तेनालीराम' बनविले आहे.

किस्सा वही, सोच नयी!

धाग्यातील व्यक्तीला लोकांनी भाई म्हणावेसे वाटत असतं त्या प्रमाणे पहिल्या प्रतिसादाच्या आयडीच्या मनातील अपेक्षा पोष्टीतुन कळली Proud

Pages