LCHF डाएट आणि मधुमेहासाठी माझा अनुभव - भाग १

Submitted by नलिनी on 23 August, 2016 - 09:20

ऑगस्ट २०१५ च्या एका दुपारी जरा एका ऑफीसमध्ये काम होते म्हणून जेवण उरकून लेकाला घरीच ठेवून सायकलने निघाले होते. वाटेवर एका झाडाच्या ४-५ चेरी तोंडात टाकून जरा पुढे गेले आणि काही कळायच्या आतच चक्कर येऊन पडले. नशिबाने सायकल रस्त्याच्या कडेला गवतावर घेतली होती. विजेच्या पोलाच्या एक फूट पुढे जाऊन आणि मुख्य रस्त्याला लागण्यापूर्वीच पडले होते.

सर्वात आधी एका गोष्टीचे बरे वाटले की, पिल्लू माझ्या सायकलवर मागे नव्हता. पण दुसरी काळजी अशी वाटली की, मला काही झालं असतं तर? नवरा भारतात गेलेला आणि लेकरू घरी एकटंच.

घरी जाऊन आधी दवाखान्यात फोन केला. अचानक चक्कर येऊन सायकलवरून पडल्याचे सांगितल्याने दुसऱ्या दिवशीची सकाळची भेटण्याची वेळ मिळाली. डॉक्टरला रक्त, लघवी तपासल्यानंतर दोन्हीकडे साखर असल्याचे आढळले. दुसऱ्या दिवशी उपाशी पोटी परत रक्ततपासणी केल्यानंतर कळाले की रक्तात साखरेचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे.

डॉक्टरच्या मते, माझ्या पोटाचा घेर फारसा फार वाढलेला नसल्याने आणि मी दिसायलाही अगदीच गलेलट्ठ म्हणावी अशी दिसत नसल्याने, ती म्हणाली की, तुला मधुमेह प्रकार १ असण्याची शक्यता आहे. उद्या आपण मुख्य दवाखान्यात तपासणी करून पाहू.

घरी आल्यावर सर्वात आधी मधुमेहावर माहिती वाचायला सुरुवात केली आणि जाणवले की, आता जर आपण इथेच आवर घातला नाही तर पुढे बऱ्याच आजारांना आमंत्रण देणार आहोत.
मुख्य दवाखान्यातून सांगण्यात आले की, भारतीय लोकांमध्ये कमी वजनाच्या लोकांनासुद्धा मधुमेह प्रकार २ असू शकतो; त्यामुळे मला मधुमेह प्रकार २ असण्यावर शिक्कामोर्तब झाले.

मधुमेह प्रकार १ मध्ये तुमच्या शरीरातील स्वादुपिंड (pancreas) इन्सुलिन बनवायचे थांबवते त्यामुळे तुम्हाला गोळी किंवा इंजेक्शन स्वरूपात जेवणापूर्वी इन्सुलिन घ्यावे लागते. तर मधुमेह प्रकार २ मध्ये तुमच्या शरीरातील स्वादुपिंड इन्सुलिन कमी प्रमाणात बनवते किंवा जे इन्सुलिन उपलब्ध आहे ते वापरण्याची शरीराची क्षमता कमी झालेली असते.

मला मेटफोर्मीन घेण्यास सांगण्यात आले. आठवडाभर एकच गोळी घ्यायची, तिची सवय झाली की १ वाढवायची. अश्या प्रकारे सकाळी २ आणि रात्री २ अशी चारापर्यंत प्रगती केली. मेटफोर्मीनने पोटाचा त्रास सुरू झाला. मधुमेह झाला म्हणजे आता इतर तपासण्या ही करणे आलेच. डोळ्यांची तपासणी झाली तेव्हा कळाले की, डोळ्यांना अजून तरी काही इजा झालेली नाही. हृदय, किडनी, डोळे सुरळीत कार्यरत आहे तोवरच यातून बाहेर पडायचे ठरवले. साखर पहिल्या दिवसापासूनच बंद केली होती. चॉकलेट, बिस्कीट, केक, शीतपेय, आइस्क्रीम ह्यांची फारशी आवड नसल्याने त्यांच्यापासून फारकत घेणे सोपे गेले. झेपेल तितकाच पण नियमित व्यायाम दररोज करण्यास सांगितले.

मधुमेहाबद्दल वाचायला सुरुवात केल्यानंतर, जिथे वाचावे तिथे हेच दिसायचे की, हा आजार बरा होण्यातला नाही. पण एक दिवस एक जाहिरात दिसली. त्यात त्यांचे म्हणणे होते की आमच्या पुस्तकात आम्ही बरे होण्याचे रहस्य दिले आहे. तासभर त्यांचे 'औषध कंपन्या किती स्वार्थी आहेत' आणि 'ते किती काळजीवाहू आहेत', तसेच 'एकाच पुस्तकाचा खर्च केला की तुम्ही कसे बरे होणार आणि औषधांवरचा खर्च कसा कमी होणार'! हे असे तासभराचे प्रवचन ऐकल्यावर एक मात्र कळले की, दालचिनी आणि हेम्प प्रोटीन ह्यांच्या सेवनाने मधुमेहींना नक्की फायदा होऊ शकतो. त्यावर अधिक माहिती काढली असता ते खरोखरीच माझ्या कामाचे आहेत हे कळले आणि मी त्यांचा माझ्या आहारात समावेश केला.

दरम्यान दवाखान्यातूनच आहारतज्ज्ञाच्या भेटीची वेळ मिळाली. मला असलेल्या सगळ्या शंका मी लिहून नेल्या होत्या. मी आहारात केलेले बदल सांगितले; उदाहरणार्थ, साखर, मैदा, बटाटा, चॉकलेट, आईसक्रीम, शीतपेय पूर्णपणे बंद केले आहेत. ह्यातले काही खावेसेच वाटले तर काय काय खाऊ शकते ही शंका विचारल्यावर तिने सांगितले की, सगळे थोड्या प्रमाणात चालते. एखादा बटाटा, दिवसाला २ ब्रेड स्लाईस, जरासे शीत पेय पण जरासेच हं, शिवाय मांसाहार, सलाडचे प्रमाण वाढवण्यास आणि लो फॅट आहार घ्यायला सांगितला. हिरव्या रंगाचे 'की होल'चे ट्रेडमार्क असणारे सगळे बाजारात मिळणारे खाद्यपदार्थ खाणे उत्तम आहे हे सुचवले.
पुढच्यावेळी खरेदीला गेले तर ब्रेड, पास्ता, दही, तांदूळ असे बरेच काही त्या ट्रेडमार्कचे सापडले. अमुक ह्या ट्रेडमार्कचे आहे आणि खायला चालते म्हणून मग ब्रेड, पास्ता खाणे वरचेवर होवू लागले आणि स्थिरावणारी रक्तातली साखर परत वाढू लागली. चपातीपेक्षा भाकरी बरी म्हणून (दगडापेक्षा वीट मऊ या नात्याने) बाजरीची भाकरी खाणे सुरू केले. दिवस रात्र एकच विचार डोक्यात घोळत असायचा की आपल्याला मधुमेह झाला आहे. हा विचार काही केला डोक्यातून जात नसे मग ठरवले की रात्री झोपताना (स्वतःलाच झोपण्यापूर्वीच) स्लीप टॉक द्यायचे; सकारात्मक विचार करायला सुरुवात केली की, आपल्याला बरे व्हायचेच आहे आणि औषधांपासून मुक्ती मिळवायची आहे.

नवर्‍याने एक दिवस समजावले की, हा आजार बरा होण्यातला नाही पण पथ्य पाळले तर काही त्रास होत नाही. मधुमेह वाढू नये ह्याची काळजी घेणे आता आपल्या हातात आहे. त्याच काळात प्रमोदकाकांचा मायबोलीवर लिहीलेला लेख वाचला. त्याचा फायदा मला शांत राहायला झाला. आता मधुमेह झालाच आहे तर त्याच्याशी मैत्री करून जगायचे. परंतु तो बरा होण्यासाठी माहिती शोधणे सुरूच होते. असेच एक दिवस वाचनात आले की, जर लिव्हर फॅट कमी करता आले तर मधुमेह बरा होऊ शकतो. लिव्हर फॅट कमी करणे हे मनावर घ्यायचे ठरवले. साखर बंद केल्याने वजन साधारण ३ कि. कमी झालेच होते. आणखी वजन कमी करणे गरजेचे होते. माझी डायबेटीस नर्स मी सगळी पथ्ये पाळते म्हणून आणि रक्तातले साखरेचे प्रमाण कमी कालावधीच बरेच खाली आले होते म्हणून खूष होती.

त्याच दरम्यान आमची एक कुटुंबाशी ओळख झाली. एकमेकांकडे जाणे-येणे वाढले. गप्पांच्या ओघात त्या मित्राने सांगितले की, त्यालाही मधुमेह होता; तसेच त्याच्या बायकोला पिसीओडीचा त्रास होता. पॅलिओ डाएटने दोघांनाही फायदा झाला आहे. पॅलिओ डाएटबद्दल त्याने सांगितल्याप्रमाणे फक्त मांसाहारावरच जास्त भर असल्याने मला ते जमण्यासारखे नव्हते. पोळी, भात एकदमच खायचाच नाही हे तर कठीणच होते.

मी पॅलिओ डाएटबद्दल अधिक माहिती वाचायला सुरुवात केली. त्याने फेसबुक वर एका पॅलिओ गटात मला सहभागी केले. त्यावरच्या तमिळ पोस्ट मी भाषांतरीत करून वाचू लागले. तिथल्या सक्सेस स्टोरी वाचतानाच मी अधिक माहिती मिळवायला सुरुवात केली. पॅलिओ डाएट, अ‍ॅटकीन्स डाएट हे 'लो कार्ब हाय फॅट' प्रकारात मोडतात हे समजले.

सवयीप्रमाणे मायबोलीवर चौकशीचा धागा काढला (http://www.maayboli.com/node/57088). तिथे काहीजणांकडून ह्या डायटबद्दल सकारात्मक प्रतिक्रीया मिळाळ्या. किटोजनीक डाएटची लिंकपण मिळाली (http://www.ketogenic-diet-resource.com/ketogenic-diet-plan.html) तिथेही बरीच माहिती मिळाली तसेच बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देखील मिळाली.
एका डॉ. सदस्याकडून हे कळले की, किटोसिस होऊ नये ह्याची काळजी घ्यायला हवी; तसेच किटोजनीक डाएटच्या लिंक वरून कळले की, ह्या डाएट प्रक्रियेत किटोसिस होणे अपेक्षित आहे परंतु किटोऑसिडोसिस होऊ न देणे, ह्याची काळजी घ्यायला हवी. अर्थात ही सगळीच माहिती माझ्यासाठी उपयुक्त होती कारण किटोसिस होणे अपेक्षित आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतेच.

अखेर मी डाएट करायचे ठरवले. नवर्‍याने पण वाचन सुरू केले. डायबेटीस बरा होत नाही हे त्याचे पूर्वीचे मत बदलायला लागले. मी हे मला झेपेल तसे करायलाच हवे, असे त्यालाही वाटू लागले.

हिच लेखमालिका मी मैत्रीण.कॉम वर पुर्वप्रकाशित केली आहे.

LCHF डाएट आणि मधुमेहासाठी माझा अनुभव - भाग २
LCHF डाएट आणि मधुमेहासाठी माझा अनुभव - भाग ३

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख नलिनी. डायबेटिक ते प्रीडायबेटिक प्रवासाबद्दल तुमचे अभिनंदन आणि पुढिल टप्प्यासाठी शुभेच्छा.
कृपया पूर्ण लेखमाला इथे टाकावी.

धन्यवाद! लवकरच आणते इकडे सगळी लेखमाला.
anilchembur >> खजूर, खारी, केळी नाही चालत. कच्चा पेरू(अगोड, तुरट असल्यास उत्तम) आणि अवाकाडो एवढीच फळे खाता येतात.

हे लो कार्ब डाएट आहे. आपल्याला दिवसाला किती कार्ब (२० ग्रॅम पेक्षा कमी, ५० ग्रॅम पेक्षा कमी, १०० ग्रॅम पेक्षा कमी) घ्यायचे हे ठरवायला लागते.

नलिनी, बायको सोडून जाते पण मधुमेह जात नाही असे म्हंटल्या जाते.

मधुमेहासाठी योगाभ्यास अर्धमच्छिंद्रासन नावाचे एक सोपे आसन आहे. ते आसन केल्यास किडनीवर दाब पडून मधुमेही लोकांना खूप फायदा होतो. तू नाचणीचे फुलके का खात नाही? मी लिहितो नाचणीच्या फुलक्यांची पाककृती. अगदी सोप्पी आहे. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, पोळी ह्यापेक्षा नाचणीची भाकरी वा फुलके छान असतात आरोग्याला.

हर्ट, धन्यवाद!
अर्धमच्छिंद्रासन करायला नक्की शिकेन.

मी सध्या कोणतीच भाकरी, चपाती, भात खात नाही.

बायको सोडून जाते पण मधुमेह जात नाही असे म्हंटल्या जाते.>> मधुमेह ही जाऊ शकतो. नाहीच गेला तरी आहारात बदल केले की औषधांपासून तरी मुक्ती मिळू शकते. गेले ७ महिने माझी रक्तातली साखर औषधांशिवायही नॉर्मल रेंज मध्ये आहे.

तसे असेल तर छान नलिनी.

तू LCHF बद्दल इथे लिहू शकशील का? मी LCHF बद्दल अलिकडे खूप ऐकत वाचत आहे पण मनावर घेत नाही आहे. लो कार्ब - हाय फॅट शरिरासाठी चांगले असते का, आजार असो वा नसो?

मधुमेहासाठी योगाभ्यास अर्धमच्छिंद्रासन नावाचे एक सोपे आसन आहे. ते आसन केल्यास किडनीवर दाब पडून मधुमेही लोकांना खूप फायदा होतो.>>मी तज्ञ नाही पण किडनी की स्वादुपिंडाचा मधुमेहाशी संबंध असतो?
येथिल तज्ञांनी कृपया शंका निरसन करावे!

मी पुर्वी योगासने वर्ग केलेला तेंव्हा आमच्या योगाच्या बाईंनी आम्हाला वज्रासन योगमुद्रा हे करताना सांगितलेले की ह्या आसनामुळे स्वादुपिंडाच्या कार्यात सुधारणा होते!

किडनी की स्वादुपिंडाचा मधुमेहाशी संबंध असतो?>> मधुमेह हा स्वादूपिंडाशी संबंधित आजार आहे. त्याने किडनी, हृदय, डोळे इतर अवयवांच्या विकारांना आमंत्रण मिळते. विशेषतः किडनीचे सर्वाधिक नुकसान होते.

तू LCHF बद्दल इथे लिहू शकशील का?>> ह्या संपुर्णलेखमालेत मी त्याबद्दल लिहिले आहे.

Ardha Matsyendrāsana allows the spine to be twisted all the way from the base of the spine to the very top. This asana tones the spinal nerves and ligaments, and improves digestion.and also improve liver and pancreas health[8]
- हे विकी बर आहे.

डाळी , कडधान्य , फुटाणे , खारे वाटाणे चालतात का ?

शाकाहारी माणसाने मांसाहाराला काय पर्याय वापरायचे ?

तीस चाळीस कॉमन पदार्थांची खावे / टाळावे अशी यादी दिल्यास बरे होइल

नलिनी

LCHF डाएट आणि मधुमेहासाठी माझा अनुभव ह्या धाग्याबद्दल धन्यवाद !!

स्वतःवर केलेल्या यशस्वी प्रयोगाच्या आधारावर दिलेल्या माहीतचा ईथल्या जनतेला उपयोग होईलच.
खास म्हणजे मधुमेह न बरा होणारा रोग असुन आता औषध आयुष्य भरासाठी, त्यातुन मुक्तता नाही वैगेरे च्या बंधनात न अडकता मधुमेह बरा होऊ शकतो हे सिद्ध करुन दाखवले.

मधुमेहा बद्दल डोळे उघडणारा व्हिडीओ

https://www.youtube.com/watch?v=A0qeIwiPpdA

मधुमेह बरा होऊ शकतो ह्यावर अजुन एक वाचनीय धागा श्री विटेकर याम्नी मिसळपाव वर लिहीलेला आहे !!

anilchembur, पुढील भागात ह्याचा समावेश असणार आहे.

मिलिंद जाधव, लिंकसाठी धन्यवाद!
मी मिपावरचा श्री विटेकरांचा लेखपण वाचला आहे. त्यांचा प्रयत्नही कौतूकास्पद आहे.