सातकापे घावन

Submitted by इन्ना on 20 August, 2016 - 05:46

काही चवी, वास , पदार्थ , बाहेरच वातावरण , सणवार ह्याच एक घट्ट नातं असत. अन प्रत्येक घराच आपापल असत! आईकडे श्रावण म्हणजे नारळी भात गोकुळाष्टमीचा भरगच्च प्रसाद, फराळ आठवत मला. पण सासरी श्रावणी सोमवार ,नारळीपोर्णिमा ,पंचमी ची सवाष्ण , अन वार्षीक सत्यनारायण असे ठळक कार्यक्रम असतात. अन काही पदार्थ केवळ ह्याच दिवशी बनतात. आल्याच रायत, मिरचीच पंचामृत, वाल घालून पडवळाची भाजी , आंबट बटाटा, पातोळ्या , खांडवीच्या वड्या, काकडीच धोंडस केळ्याची कोशिंबीर वगैरे.

मी तरी श्रावणाची वाट ह्या पदार्थांसाठी पहाते. Happy काल पंचमी आणि सत्यनारायण असा डबल धमाका होता! पातोळ्यांचा बेत केला होता. तांदुळ गुळ अन नारळ हे माझे ऑटाफे इन्ग्रेडियंट्स. कोकणात गोडाचे पदार्थ ह्याच ३ स्टार कलाकाराना घेउन होतात बर्‍याचदा.

पातोळ्या म्हणजे हळदीची पानं शोधणं आल. ऐन वेळी ऑफिसात डोंगरभर काम उपसावी लागल्यानी हळदीची पान काही मिळाली नाहीत. मग हा सातकाप्याचा घाट घालायचा ठरवल. ह्या आधी आळश्याची सातकापी घावनं ( डोश्याच्या पिठात चुन ( गुळ खोबरं) ) करण्याचा प्रचंड (?)अनुभव गाठीशी होताच. पण ओरिजिनल रेसिपी तांदुळ भिजत घालून , वाटून घावन , हा आजवर न जमलेला प्रकार. त्यात 'मी काही कधी केली नाहीयेत हां, पण माझी काकी मस्त करायची , खरपूस!कोकणातल्या घरी! ' अस म्हणून आम्च्या ज्ये नांनी उत्साहाला सूरूंग लावायचा प्रयत्न केला . पण माझे स्वैपाकघरातले प्रयोग म्हणजे , आ बैल मुझे मार प्रकारातले अन एकूणच नाही जमणार म्हटल की दाखवतेच असा ( मूर्ख) बाणा असल्यानी, हेच्च करणार अस डिक्लेअर केल. Uhoh

आदल्या रात्री लक्षात आलं की मैत्रीणीनी नेलेला बिडाचा तवा घरात परत आला नाहिये , तांदुळ भिजत घालून वाटून पुरेसा चिकटपणा येइल का ह्याची रंगित तालिम केलेली नाहीये , नेहेमीचा नॉनस्टिक तवा कोटिंग गेल्यानी बदलायला झालाय अन म्हणून सध्या वापरायचा नाही अस ठरवलय . Uhoh

प्लॅन बी म्हणून शेवया आहेत ना घरात हे पाहून ठेवलं .
अन घावनाना उकडीच्या मोदकाची पिठी वापरायची ठरवली. एक लहान फ्राय्पॅन आहे ते वापरायच ठरवल. घावनाचा आकार लहान झाला तर तसही सोपच जाणार होतं Wink

पुजेच्या दिवशी बाकिचा स्वैपाक पटकन हाता वेगळा केला . अन मग हात घातला घावनाना.

चार वाट्या ओला नारळ खवून त्यात २ वाट्या गुळ. जायफळ्/वेलची पावडर अर्धा चमचाभर , काजूचे तुकडे. हे एकत्र करून एखाद मिनिट परतून घ्यायच मंद धगीवर.(किंवा एक मि. माय्क्रोवेव्ह मधे)
हे अस दिसतं

IMG_6173.jpg

तांदळाची पिठी + दुध्+पाणी अस मिसळून पातळ पिठ तयार केल. त्याची व्हिस्कॉसिटी साधारण अशी दिसायला हवी नैतर जाळीदार घावन होत नाहीत , जाड धिरडी सदृश पदार्थ होतो अन दुमडताना मोडतो)

IMG_6176.jpg

आता बेस्ट केस मधे बिडाचा ( निट सिझनिंग केलेला) तवा गॅसवर तापत ठेवायचा. नैतर नॉनस्टिक झिंदाबाद.

IMG_6179.jpg

पहिल एखाद घावन तुटणार ह्याची खात्री बाळगून असा. एकदा न तुटता घावन जमल की मुळ पदार्थ करायला सुरवात करायची.

IMG_6180.jpg

घावन बनता बनता त्याच्या कडा तव्यापासून सुटायला लागतात. तेव्हा अर्ध्या भागावर गुळखोबरं (चुन) पसरवायच. अन त्यावर उरलेला भाग दुमडून घ्यायचा

IMG_6181.jpg

आता उरलेल्या तव्यावर परत पातळ मिश्रण ओतून घ्यायच, हे बनत आल की त्यावर चून पसरून आधीच सेमिसर्कल दुमडायच.हे झाले ३ पदर. हेच सात पदर होइतो करायच !! आपापला वकुव , तव्याचा आकार पहाता ४-७ मधे खेळायला हरकत नै!

IMG_6182.jpgIMG_6183.jpgIMG_6185.jpg

प्रत्येक परतणी च्या वेळी तुप सोडल की मस्त खरपूस होतात घावन.
अशी ही माझी सातकप्प्याची कहाणी चारकप्प्यात सफळ संपूर्ण झाली

नवसुगरणीना/नवबल्लवाना महत्वाच्या सुचना!
१) वकुबापलिकडाचे प्रयत्न करण्यात जी मजा आहे ती नेहेमीच्या खेळपट्टीवर खेळण्यात नाही ( कंसिडर दिस अ‍ॅज अ ब्लाइंड डेट Wink )
२) एकदा करायचा ठरवला पदार्थ की तो मनातल्या मनात करून पहायचा, साहित्य , सामग्री , अन उपकरण ( जी सुगरणी /बल्लव गृहित धरतात ) यांच्या गाळलेल्या जागा भरायला उपयोग होतो.
३) आपण असे घाट घातले की नाउमेद करणारे बरेच असतात त्यांच्याकडे १००% दुर्लक्ष करायच.
४) शक्यतो नविन पदार्थ करताना अज्जिबात मल्टिटास्किंग करू नये. आपण काय माशे चे कन्टेस्टंट नाही ६० मि. मधे ११० स्टेप्स ची पाककृती करून दाखवायला .
५) प्रत्येक पदार्थाचा एक गाभा (इसेन्स) असतो , तो आधी समजून घेतला की तो निट होणे ह्याकडे विशेष लक्ष द्यायच. बाकी गोष्टी जराश्या बदललया , हाताशी असलेल्या साधनांप्रमाणे सुटसुटीत केल्या तरी चालतात
६)मुळातले सातकापे घावन जवळपास ८-१० इंच असतात, बिडाच्या तव्यावर एकदा भट्टी जमली की फटाफट होतात. वाढताना कापून , लेयर्स दाखवणे ( कौशल्य अन नजाकत) अस असत पण मी केल ते भातुकली तल असाव इतक लहान पॅन होतं त्यामुळे ह्याच नाव कोकोनट अ‍ॅन्ड जॅगरी विथ नट्स अ‍ॅन्ड नट्मेग इन सॉफ्ट राइस टॅकोज अस ठेवायची इच्छा होतेय .

IMG_6186.jpg

माहितीचा स्त्रोत -लहानपणीच्या आठवणी , शैलजाचा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. आणि लेखनही छानच.
मालवणात फार फ्येमस होते हे आणि तिथेही एखादीच सात कप्प्याचे करू शकायची ! आता हाटीलातही मिळत असावेत तिथल्या Happy

जबरी रे बाबा! नाव ऐकले होते पण पाहिले नव्हते. खूप छान पद्धतीने स्टेप बाय स्टेप कृतीने समजावल्याने मस्त वाटले.

काय छान पदार्थ दिलात हो! तितकच तुमचे लिखाण देखिल मस्त.
तान्दुळाचे पीठ +पाणि +दुध यान्चे प्रमाण सान्गा ना.

काय छान पदार्थ दिलात हो! तितकच तुमचे लिखाण देखिल मस्त.
तान्दुळाचे पीठ +पाणि +दुध यान्चे प्रमाण सान्गा ना.

सुरेख! देशावर वाढल्याने मला ह्या पदार्थाच अप्रुपच वाटते, काही पदार्थाची नाव सुद्धा मी इथे मायबोलिवरच एकली आहेत.
(एखादा क्रॉससेक्शन फोटो पण टाकायला हवा होतास)

"कोकोनट ॲंड जॅगेरी विथ नट्स अॅंड नटमेग्स इन साॅफ्ट राईस टाॅकोज"
मस्त, मंजुताई! Proud हा प्रतिसाद आधी वाचला नव्हता.

सिग्नलला मराठीत प्रतिशब्द काय तर म्हणे "अग्नीरथ गमनागमन दर्शन सूचक लोह ताम्र पट्टिका" याची आठवण इंग्रजीत भारतीय पदार्थांचे वर्णन सांगणा‍रे मेनु वाचताना मला नेहमी होते.

घावन साठी असेच वर्णन लिहावे लागेल.

खासच लिहिलंयस आणि पदार्थही खास एकदम Happy
आवडता पदार्थ आहे. आणि गोड न आवडणा-यानंही आवडीनं खावा असा.

नमन, लेखन, उत्तरार्ध अगदी सातकाप्या घावनांसारखंच साग्रसंगीत झालंय. लिहीत जा ना गं नेहमी!
फोटो आणि मुख्य म्हणजे सगळ्या टिपा अत्यंत उपयोगाच्या दिल्यायस Happy

मस्तच, खटपट आहे जरा.
एकदोनदा खाल्लाय पण घरी नाही झाला कधी. याचं तिखट व्हर्जन करून बघावं का?
जपानी ऑम्लेटही असेच लेयर रचून करतात चौकोनी तव्यात.

चून वरून चुनकापं आठवली. गूळखोबऱ्याची ही कापं (वड्या) शाळेबाहेर मिळायची मालवणात, मिट्ट गोड पण चविष्ट. छोट्या सुटीत बऱ्याचदा घ्यायचो.

धन्यवाद! Happy
दिनेशदा , हॉटेलात्पण मिळेनात हल्ली. म्हणूनच पारंपारीक रेसिपीज ,करून , लिहून ठेवाव्याश्या वाटतायत. Happy
अमेय , प्रत्येक कुडाळ वारीत आजही चुनकाप , दाण्याचे लाडू , शेवकांडीचे लाडू असतातच! Happy
सई , अधूनमधूनच भूत शिरत डोक्यात , तेव्हा हे प्रयोग करते , नैतर मी कमीत कमी वेळ स्वैपाकघरात !
मानीनी, घावनाचे अर्धगोल a -b असे धरले तर सात आर्धगोल
a-b
a-b-c
d-a-b-c
d-a-b-c-e
f-d-a-b-c-e
f-d-a-b-c-e-g असे येतील .एक थर दोन वेळा तव्यावर असणार हे गृहित धरून होत आला की उलटायचा , पूर्ण होइतो थांबायच नाही. म्हणजे खरपूस होइल पण करपणार नाही.
मी अजूनच क्लिष्ट केल का? Uhoh

चक्क गणिती उकल!
आमचे बाबा माझे (दिव्य) गणित पाहून," अरे थोडे लक्ष दे, जगात स्वयंपाकापासून रॉकेटपर्यंत सर्व गोष्टींना गणित लागते", म्हणायचे ते खरेच होते तर!

a-b
a-b-c
d-a-b-c
d-a-b-c-e
f-d-a-b-c-e>>>>>>> अरे देवा! त्यापेक्षा आधी सांगितलेले बरे होते.मी ही कृती पाहिली/खाल्ली आहे.घावन घालताना तुटकी धिरडी माझ्याकडून झाल्यामुळे त्यावाटेला परत गेले नाही.

मस्तच.
सुगरण आहेस हो बाळे.
आल्याचं रायतं हा प्रकार कोंकणातली असूनही मी खाल्ला नाहीये कधी.
रेसिपी नक्की लिही.

बी, पहिल्यांदा घावणाचे दोन हाफ समजून उजव्या अर्ध्यावर सारण पसरायचे.
आता डावीकडचा अर्धा रिकामा भाग पलटून कप्पा बंद करायचा.
मग डावीकडे पीठाने अर्धे घावण घालायचे. ते शिजत आले की त्यावर उजवीकडचा घावण सारण घावण असा सगळा कप्पा डावीकडे टाकायचा.
म्हणजे दर वेळी सारण घालून झाल्यावर नव्याने टाकलेला पीठाचा भाग तव्याच्या आचेवर तहातो.
आलटून पालटून डावी उजवीकडचा.

हा प्रकार शैलजाने टाकला होता पूर्वी माबोवर.
त्यात फोटो मिळतात का बघायला हवे.

शैलजाच्या धाग्यावर http://www.maayboli.com/node/41375
फोटो नाही मिळाले, पण तिथे निलूने एक लिंक दिली होती.
http://enjoyindianfood.blogspot.in/2010/09/saat-kappi-ghavan-for-ganapat...

त्यात यथासांग फोटो आहेत.

भम नी एक व्हिडीओ लिंकही दिली होती पण मी तो पाहिला नाहीय.

Pages