चांदोबा आता ऑनलाइन

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

'कॉमिक बुकं' हा आपल्यापैकी बहुसंख्यांनी लहानपणी केलेल्या रेल्वेप्रवासातल्या आठवणींचा अविभाज्य घटक आहे. चाचा चौधरी, फँटम वगैरे कॉमिक बुकांच्या जोडीने 'चांदोबा' हे तसं रूढार्थानं कॉमिक बुक नसलेलं नियतकालिक बालगोपाळांमध्ये तुफान लोकप्रिय होतं! त्या चांदोबाची मराठी ऑनलाइन आवृत्ती आता उपलब्ध झाली आहे.
पूर्वीच्या चंदामामा (भारत) प्रकाशनसमूहाच्या सध्याची मालक असलेल्या जिओडेसिक लिमिटेड कंपनीने मराठीसह कन्नड, तमिळ, हिंदी, इंग्लिश व तेलुगू भाषांमध्ये चांदोबाची ऑनलाइन आवृत्ती काढण्यामागे भारतातील आंतरजाल-वापरकर्त्यांचा वाढता ग्राहकवर्ग (मार्च २००९ मधील आकडेवारीनुसार डायल-अप, ब्रॉडबँड इत्यादी प्रकारांच्या जोडांची एकंदरीत संख्या १ कोटी ३४ लाख) चाचपण्याचा हेतू आहे. सध्या तरी या संस्थळावर ऑनलाइन आवृत्तीचे वर्गणीशुल्क नसले, तरीही (बहुधा) यात छापील आवृत्तीतला १००% आशय नाहीये. ताज्या कथा, कॉमिकांखेरीज काही जुन्या अंकांमधल्या (साठीच्या दशकातल्या) कथा व जाहिराती त्यांच्या जुन्या संग्रहांमध्ये ऑनलाइन उपलब्ध आहेत. विशेषकरून त्या जुन्या जाहिराती वाचून स्मृतिकातर व्हायला होतं!
याविषयी अधिक वृत्तं इकडे उपलब्ध :
१. (इंग्लिश वृत्त) http://www.medianama.com/2009/09/223-geodesics-chandamama-adds-5-indian-...
२. (इंग्लिश वृत्त) http://www.alootechie.com/content/chandamamacom-now-also-available-kanna...

प्रकार: 

या लिंकला मला एरर येतेय Sad
फेव्हरीट मधे टाकणार होते Happy
लहानपणी मावशीकडे सुट्टीत रहायला जायचं एकच आकर्षण असायचं ते म्हणजे तिच्याकडे असलेले अगणित चांदोबे. तिचे मिस्टर चांदोबा वाचत Proud

पण चांदोबाची क्वालिटी तशी आधीसारखीच राहिली नाहीय आता. पानं अगदी गुळगुळीत, चित्रं पण कंप्युटराईज वाटतात. Sad

हि साईट सेव केली पाहिजे. मला लहानपणी शाळेत मराठी नसल्याने तेवढे वाचता यायचे नाही, तेव्हा पप्पा वाचून दाखवून सुद्धा मजा यायची. ती चित्रे इतकी देखणी होती ना. मग हिंदी व ईंग्रजी स्वताहून वाचायला लागले,मजा यायची.

किशोर आणि चांदोबाच्या आठवणी कधीही न विसरण्यासारख्या. महिन्याच्या अखेरीस आम्ही अगदी चातकासारखी वाट पहायचो. वडील किशोर आणि चांदोबाचे नवीन अंक घेऊन यायचे. मग काय लगेच बसून फडशा पाडायचा. Happy
योगीताला अनुमोदन.. आधीची चित्र पहाण्यांतही मौज होती.

जबरदस्त !!... घरी जुने चांदोबा, चंपक, किशोर, छावा वैगेरे बांयिंडिंग करुन ठेवलेत..
चांदोबा आजही वाचायला मजा येते... त्यातल्या विक्रम-वेताळ, महाभारत-रामायण च्या सिरिज, आणि जोडीला साजेशी चित्रे... मस्त एकदम..

लिंक साठी धन्यवाद !!

चांदोबाचे संस्थापक सम्पादक कै. बी नागी रेड्डी याना मुलांची खूप आवड होती म्हणून त्यानी चांदोबा काढला. हे बी. नागी रेड्डी दक्षिणेतले मोठे चित्रपट निर्मातेही होते. ते गेले अन चांदोबाला उतरती कळा लागली. मुलांचेही विश्व बदलले . कॉमिक्स हा प्रकार आला. पुढे कॉम्प्युटर गेम्स वगैरे ... म्हणजे चांदोबा कालबाह्य झाला असे पटत नसले तरी म्हणावे लागेल.
शैक्षणिक मानसशास्त्राच्या दृष्टीने चांदोबाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या प्रत्येक पानावर चित्र असे. खालच्या वर्गातील पाठ्यपुस्तकात जास्तीत जास्त चित्रांचा समावेश असावा असे शिक्षणशास्त्र म्हणते. कारण लहान मुलांची' इमेजरी' विकसित झालेली नसते त्यामुळे तो संबोध डोळ्यासमोर उभा करण्यासाठी चित्रांची गरज असते. मासिकाच्या प्रत्येक पानावर चित्र छापणे म्हणजे कसे खर्चाचे आणि वेळेचे (आणि तेही त्या तंत्रदृष्ट्या मागासलेल्या काळात) काम असते हे मुद्रण व्यवसायाशी परिचय असलेल्याना समजू शकेल. बहुधा चांदोबा प्रकाशन त्याही वेळी तोट्यातच असावे. पण रेड्डीनी ते व्रत म्हणून चालल्विलेले असल्याने व बहुधा स्टुडीओतून तोटा भरून निघतही असावा.
त्यात 'वडपळणी, मद्रास 'हा पत्ता मला अजूनही आठवतोय. चांदोबातील चित्रे म्हनजे 'बच्चा भी देखेगा और बच्चेका बाप भी देखेगा' अशा थाटाची असत. वेताळाच्या गोष्टीखाली असलेले कंसातील (कल्पित) हा शब्द मला लेखकाचे नाव वाटे. पात्रांची नावे कुठले कुठले वर्मा अन प्रताप, असली असत. त्याचे संपादक कुणी चक्रपाणी म्हणून होते. आम्ही बाबूराव अर्नाळकरांकडे वळण्यापूर्वीचा हा काळ. रामायण महाभारतादि पौराणिक चित्रात खूप बारकावे असत. तसेच पात्रांची चित्रे विविध कोनातूनही काढलेली असत. आता बहुधा केवळ परम्परा म्हणून चांदोबा चालविला जात असावा. आता ही मुले चांदोबाकडे आकर्षित होणे कठीण आहे.
जसे रेडीओ सीलोन (श्रीलंका ) गेल्यावर्षी बन्द झाले हे त्याच्या असंख्य चाहत्याना माहीतही नाही कारण ते चाहते मिरच्या, वांगी बटाटे, अमूक पॉईन्ट तमुक मध्ये हरवून गेले आहेत..........

चांदोबा ऑनलाईन, सही Happy
लहानपणी धमाल यायची, घरी असलेल्या अंकांची पारायण करायचो नविन "चांदोबा" येईपर्यंत आणि नविन चांदोबा घरी आला रे आला कि मग धाड पडायची सगळ्या आजुबाजुच्या मुलांची, ते सगळे मग नंबर लावून वाचायचे नवीन चांदोबा Happy
फ, लिंक बद्दल धन्यवाद!

चांदोबा हे आम्ही लहानपणी वाचत असलेल्या मासिकांमधले दादा मासिक. कसल्या भन्नाट गोष्टी आणि पात्रांची नावे पण काहीशी विचित्र वाटणारी (जयशील, सिद्धसाधक, मकरकेतू वगैरे). चांदोबा ५० पैशांना मिळायचा तेव्हापासून वाचत आलो.
किशोर, आनंद हे उल्लेख झाले, पण कुमार विसरलात का रे मित्रांनो?

>>मला कोण बायंडीं ग करुण ठेवलेय म्हणे! >> Lol चंपक मला वाटलंच होतं तुमची अशी एखादी तरी पोस्ट या बाफवर सापडणार म्हणून... Happy
फ, मस्तंच आठवण जागी केलित... चांदोबा, चंपक सगळं आवडीने वाचायचो लहानपणी..
ते कमी पडलं तर... पोपटात जीव असणार्‍या राक्षसाच्या गोष्टी... Happy
लहानपण देगा देवा.... सगळं मिस करते Sad

माधुरी.. तुला अनुमोदन.. माझेही लहानपण चांदोबावर पोसले गेले आहे..

काय एक एक मस्त गोष्टी असायच्या त्यात. मला लहानपणी चांदोबातली विक्रम वेताळाची गोष्ट वाचताना मजाही यायची व भितीही वाटायची... राजा विक्रम ते झाडावर उलटे लटकवलेले प्रेत घेउन यायला घाबरत कसा नाही याचे मला नेहमी आश्चर्य वाटायचे. तसेच प्रेतात असलेल्या वेताळाने.. गोष्ट सांगुन झाल्यावर... राजा विक्रमाला दिलेला अल्टिमेटम वाचुन राजा विक्रमाच्या ऐवजी मलाच घाम फुटायचा....." या माझ्या प्रश्नांची उत्तरे तुला माहीत असुनही तु जर मौन पत्करलेस तर तुझ्या डोक्याचे हजार तुकडे होउन इकडे तिकडे पडतील!" Happy

फ.. या लिंकबद्दल मनापासुन धन्यवाद..

वेताळाची कॉमिक बुक्स व मँड्रेक,लोथार,नार्डा हे त्रिकुट असलेल्या इंद्रजाल कॉमिक बुक्सनेही माझ्या लहानपणात मला खुप आनंद दिलेला आहे.. मला मँड्रेकच्या त्या हाय टेक "झनाडु"चेही खुप कौतुक वाटायचे.

तुझ्या डोक्याचे हजार तुकडे होउन इकडे तिकडे पडतील
>>>

नाही नाही , ते वाक्य , "तुझ्या डोक्याची शम्भर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील" असे असायचे . Happy

धन्यवाद फ, चांदोबाचे मूळ चेन्नईत असल्याने त्यातली सगळी माणसं दाक्षिणात्य थाटाची असायची. म्हणजे नाकात चमकी घालणाऱ्या बटबटीत चेहेऱ्याच्या अम्मा, लुंगी नेसणारे बाप्ये ... वेगळंच वाटायचं ते विश्व त्यामुळे.

लुंगी नेसणारे बाप्ये
>>>
हे नाही कधी दिसले. उलट धोतरवालेच दिसायचे सगळे. जमीनदार, परोपकारी गोपाळ वगैरे.

कालच सप्टे.म्बरचा चांदोबा विकत आणला. अजूनही बहुतेकदा मी चांदोबा विकतच घेते पण आता चेहरा मोहरा पूर्ण बदल्लाय. गोष्टी कमी झाल्यात. Sad आणि ज्ञानवर्धक सदरे वाड्।अवली आहेत. निखळ मनोरंजन हा यु एस पी मात्र हरवल्यासारखा वाटतोय.

"या माझ्या प्रश्नांची उत्तरें माहित असूनही तूं मौन पत्करलेस, तर तुझ्या डोक्याचे हजार तुकडे होऊन इकडेतिकडे पडतील.’’

इथे पहा : http://www.chandamama.com/lang/heroes/hero.php?lng=MAR&mId=9&cId=1&stId=...

आता बहुधा लेखक बदलला असेल पण पूर्वी शकलेच असत कारण आयुष्यात पहिलांदा तो शब्द चान्दोबातच भेटला. वेताळ कथांची सुरुवातही टिपिकल असे. 'विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तो पुन्हा त्या झाडाजवळ जाऊन प्रेत खांद्यावर टाकून चालू लागला. तोच प्रेतातील वेताळ बोलू लागला. आणि नन्तर ती जातक कथा असे. वर्षानुवर्षे हे वाचले त्यावेळी वाटे हे कधी सम्पणार आहे आणि राजा हा उद्योग कशासाठी करतोय ? कथेच्या शेवटी वेताळ झाडाकडे उडत जाताना दाखवलेला असे आणि त्याची निमुळती शेपटी लाम्बलचक पसरलेली दिसे. आणि राजाचे सिल्युट तलवार घेऊन पुन्हा त्या दिशेला निघालेले कोपर्‍यात दिसे.

Pages