रबरबँड

Submitted by rmd on 3 August, 2016 - 10:14

आज नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला जाताना केसाला काळा रबरबँड लावत होते. हो, रबरबँडच. इथे अमेरिकेत बहुतेक त्याला हेअरबँड म्हणतात. पण माझ्या लहानपणी आम्ही याला रबरबँडच म्हणत असू. वॉकला जाताना केस बांधून गेलेलंच बरं पडतं. केसांचा गुंता होत नाही आणि घामाने केस चेहर्‍यावर चिकटतही नाहीत. इथे या शहरात चालण्यापेक्षाही धावण्याचं मोठं प्रस्थ! सकाळी कितीतरी मुलं, मुली, काका, काकू, आजी आजोबा सुद्धा इथल्या नदीकिनारी असलेल्या जॉगिंग ट्रॅकवरून धावताना दिसतात. मला मॉर्निंगवॉकची सवय पण इथे येऊनच लागली. माझा नवरा पळायला जातो पण मी त्याला म्हणाले मला आधी नित्यनेमाने चालणं जमलं तरी पुष्कळ आहे. शिवाय इथे चालणारे अगदीच नसतात असंही नाही. आपल्याच नादात गाणी ऐकत जाणारे, कुत्र्याला फिरवणारे किंवा मैत्रिणीशी/मित्राशी गुजगोष्टी करत चालणारे खूप असतात. मला मात्र एकटीलाच फिरायला आवडतं. तेवढाच स्वतःला दिलेला वेळ!

तर आज केस बांधताना लक्षात आलं की लहानपणी हे असे रेशीम गुंडाळलेले रबरबँड आम्ही हमखास टाळत असू. त्याने केस लूज बांधले जातात आणि थोड्यावेळाने हे बँड्स कधी सुटून पडून जातात कळतही नाही. इथे नाइलाज म्हणून ते वापरतेय खरी. पण भारतात असताना किती काय काय प्रकार मिळायचे केसांना लावायला. मन एकदम शाळा कॉलेजच्या दिवसांतच गेलं.

शाळेत असतानाचे सोबती होते साधे छोटे छोटे रबरबँड्स. वेण्या घालून झाल्या की त्यांच्या शेंड्यांना रिबीनीच्या आतून लावायला. अजून काही शाळेत चालतच नसे. पण तेव्हा बाहेर जाताना लावायला मात्र अगदी फॅशनेबल रंगीबेरंगी रबरबँड्स होते. कित्येकदा त्याला मणी, प्लॅस्टीकची फुलं, लोलक, पिसं असं काय काय लावलेलं असायचं. असले रबरबँड्स लावून बाहेर जायला मी अगदी खुश असायचे. त्यात पुन्हा ते खराब झाले की त्याला लावलेला हा सगळा खजिना हस्तगत करता यायचा. प्रत्येक ड्रेसला मॅचिंग रबरबँड्स ची जोडी आणण्यासाठी मी आईकडे हट्ट करायचे.

पुढे कॉलेजमधे गेल्यावर तर काय केसांना लावायच्या वस्तूंचे कित्तीतरी पर्याय हाती आले. सर्वात आधी आवडली ती बनाना क्लिप. काहीकाही मुलींचे केस त्यात खूप सुंदर बसायचे आणि दिसायचे. पण आमचे केस इतके सुळसुळीत की त्या क्लिपा केसांना लावल्या की काही मिनीटांतच घसरून खाली यायच्या. मग बटरफ्लाय क्लिप नावाचं मोठ्ठं प्रकरण सापडलं. त्यात मात्र केस मस्त बसायचे. आणि त्या क्लिपा तरी किती सुंदर. अगदी नावाप्रमाणे. आत्तासारख्या या क्लिपा छोटुकल्या मात्र अजिबात नसत. मग टेलिफिनच्या वायरप्रमाणे दिसणारं काहीतरी होतं जे ब्रेसलेट म्हणून पण वापरता यायचं. केसांना लावायला रंगीबेरंगी बीड्स मिळायचे.

एक पॉमपॉम नावाचं काहीतरी कापडी मिळायचं. यात तर इतकी व्हरायटी होती आणि इतके रंग की काही विचारूच नका. ते एक स्टाइल स्टेटमेंटच होऊन बसलं होतं. माझ्याकडे बांधणीच्या कापडाची, सिल्कची थोडी महागातली अशी, काही काळी-पांढरी वगैरे अशी खूप पॉमपॉम्स असत तेव्हा. आता बहुतेक ही मिळत नाहीत. मधेच कधीतरी 'अशिकी' सिनेमा आला होता तेव्हा रंगीबेरंगी नेटच्या रिबीनींची फॅशन आली होती. तश्या पण एक-दोन अर्थातच होत्या माझ्याकडे.

बाकी कुठे छान नटून बाहेर जायचं असेल तर मात्र केस मोकळेच सोडायचे मी. तो एक सोपस्कारच असायचा. शॅम्पू करून, छान ड्रायरने केस जमतील तेवढे नीट सेट करून बाहेर पडेपर्यंत भरपूर वेळ जायचा. पण स्वतःचेच ते सिल्की, चमकदार केस पाहून मनाला अश्या काही गुदगुल्या व्हायच्या म्हणता! आता केस कापण्याच्या बाबतीत टंगळमंगळ करणारी मी तेव्हा मात्र अगदी नियमित केस ट्रिम करत असे.

एका साध्या छोट्या रबरबँडने भूतकाळाची केवढीतरी मोठी सफर काही क्षणांत घडवून आणली. नवर्‍याची हाक आली 'अगं, जाणारेस ना वॉक ला?' आणि मी एकदम भानावर आले. तेव्हा स्वतःला अपटूडेट फॅशनेबल ठेवत होते तसंच पुन्हा एकदा करून पहावं असा मी मनोमन निश्चय केला आणि नव्या उमेदीने वॉकसाठी बाहेर पडले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेण्या घालून झाल्या की त्यांच्या शेंड्यांना रिबीनीच्या आतून लावायला.>>>> ह्यातलं बेसिक तत्व वापरुन आल केसांचा पिसारा छानपैकी आवरुन बसवलाय. एरव्ही बटरफ्लाय क्लिप केसांच्या वजनाने कोसळायची किंवा थोडेसेच केस त्यात राहून बाकीचे सैरावैरा पळायचे. आज जेवढे घ्यायचे तेवढे केस रबरात बांधून वरुन क्लच लावून टाकलं. मस्त नॅचरल फेदरी पोनीटेल दिसतोय असं पब्लिक म्हणतंय. असलं करायला म्हणे पार्लरमध्ये रोलर्स वगैरे लावून बसायला लागतं. माझं फुकटात काम झालं आणि केसही मस्त आवरले गेलेत.

कुणाचं काय तर कुणाचं काय Uhoh Biggrin

काय आठवणी काढल्यात. Happy रिबीनींचा आम्हा दोघी बहिणींना लई शौक होता. रविवारी स्वतः धुबून वाळवत असू. शाळेच्या पांढ-या, इतर लाल,गुलाबी,प्लेन, डिझाइन्च्या इ.इ. असायच्या. नंतर रबरबॅन्ड्स आले. हेअरबॅन्डस लांब केस असल्याने दोघींना वाप्रा यला मिळाले नाहीत. दो बदन मात्र चांगलेच आठवतात. Happy

ओएम जी विडंबन आहे? तरीच अहो काय मस्त जमले आहे.( लेट करंट/ वयाचा प्रिणाम )

सीमंतिनी: ही ही ही. सही पक् डे हैं

"एरव्ही बटरफ्लाय क्लिप केसांच्या वजनाने कोसळायची किंवा थोडेसेच केस त्यात राहून बाकीचे सैरावैरा पळायचे. "

केश्विनी, मी शेअर करु का केसांचा लोड थोडा? Happy

त्या दो बदनलाच एक लव्ह इन टोकिओ असे ही नाव होते. ह्याचा संदर्भ गॉड ऑफ स्मॉल थिंग्स मध्ये आहे. ते साउंड ऑफ म्युझीक सिनेमा बघायला जातात तेव्हा राहेल ला एक जुट्टू( हैद्राबादी शब्द) लव्ह इन टोकिओ लाओन घातलेला असतो. फाउंटन म्हणते लेखिका. सध्या असल्या साध्या गोष्टी पण मॉल मधून फॉरएव्हर २१ मधून घेतल्या जातात.

येस...लव्ह इन टोकियो!

आणि "ओढणी" बद्दल सहमत. आणी वर कुणीतरी म्हटल्या प्रमाणे "नवरा" असं न म्हणता त्याचं नाव सगळ्या जगाला ठाऊक आहे अशा अविर्भावात लिहीणं.......
अगदी अगदी!!
Biggrin

अरे देवा! हे विडंबन आहे! माबो वाचन कमी पडतंय माझं Proud अर्थात आता सगळे संदर्भ लागत आहेत!
सी, सहीचा प्रतिसाद भारी!

हा लेख मस्त आहे.मला विडंबन म्हणून पेक्षा साधा म्हणून आवडला.
केस मोठे नाहीत, पण शेंडी येईल इतके वाढल्यावर हे सर्व प्रकार आवडीने विकत घेतल्याचे आठवतेय.
रात शबनमी(आशा भोसले चा जानम समझा करो आल्बम) गण्यातली क्लिप पण फेमस होती.
ते एक गुलाबाचं फुल पण मिळायचं लोकल मध्ये.आणि ब्रिटिश बाया घालायच्या तशी अंबाड्याची जाळी.

किती मस्त. माझे केस लांब नाहीत. विरळ असल्याने वाढवत नाही.
लेख खूप आवडला. अशी हौसमौज असणं फार महत्वाचं असतं. लहान लहान आनंद.

Pages