इतर भाषीय चित्रपट पाहणे - एक अनुभव

Submitted by पायस on 16 December, 2014 - 16:07

चित्रपट पाहण्याची आवड तशी जुनीच. लहानपणी दूरदर्शनवर (शक्तिमान, कॅप्टन व्योम वगळता) तसेही इतर काही पाहावेसेही वाटत नसे. अर्थात तेव्हा चित्रपट समजायचे वय नव्हते. त्यामुळे आमचा हीरो तिरंगाचा देशभक्त वागळे. दर १५ ऑगस्ट/२६ जानेवारीला झेंडावंदन करुन आल्यावर न चुकता तिरंगा बघायची सवय असल्यावर दर्जेदार चित्रपट बघण्याबाबत आनंदच होता. पण तरीही त्याचा एक फायदा झाला; अफाट सहनशक्ती निर्माण झाली. अगदी खंडहर सारख्या आर्ट फिल्म्स कळत नसतानाही अतिशय एकाग्रतेने पाहण्याची कला अवगत झाली. मग एवढी कला असताना कळणार्या भाषेतलेच (येथे इंग्रजी/हिंदी/मराठी असे वाचावे)सिनेमे कोण बघेल?

त्यातून सबटाईटल्सचा शोध लागल्यामुळे काम बरेच सोपे झाले. आणि त्या सुमारास एक अत्यंत सुंदर चित्रपट पाहण्यात आला - अमेली. मूळ फ्रेंच असलेला हा सिनेमा कसा पाहण्यात आला हे आता नीटसे आठवत नाही पण इंग्रजी/हिंदी/मराठी वगळता इतर कोणत्या भाषेतला सिनेमा पाहण्याचा हाच पहिला अनुभव! सुदैवाने हि निवड खूप चांगली होती. संवादांपेक्षा दृक अनुभवावर दिग्दर्शकाचा भर असल्याने भाषा फारशी कळत नसतानाही याने खूप मनोरंजन केले. विशेषतः ऑड्री टॉटो (अभिनेत्री) च्या तर प्रेमातच पडलो (तेव्हा प्रेमात पडण्यासारखे इतर कोणि नव्हते हा भाग अलाहिदा). यातून नवा शोध असा लागला कि अमेरिका आणि मुंबई च्या बाहेरही चित्रपट बनवले जातात आणि बर्याचदा ते उत्तम मनोरंजनही करतात!

इंजिनिअरिंग करत असताना मोकळा वेळ भरपूर मिळायचा आणि कॉलेज कडून फुकटचे इंटरनेट! मग विविध आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्सचे अर्काईव्स शोधणे सुरु झाले. सनडान्स, बर्लिन इंटरनॅशनल, कान, वेनिस, टोरांटो, बुसान अशा कित्येक फेस्टिव्हल्सच्या विजेत्यांची नावे शोधायची आणि ते पाहायचे. मग त्यांच्याशी रिलेटेड सिनेमे पाहायचे. बरेचसे मिचेल जॉन्सनच्या बाऊन्सरप्रमाणे वाटले. काही तर निव्वळ आचरट वाटले. तर अनेकदा हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीतून सुटलाच कसा हा प्रश्न मनात डोकावला. पण कुठलाही अर्धवट सोडला नाही. याचा अर्थ असा नाही कि इंग्रजी/हिंदी पाहिलेच नाहीत. उलट ते चित्रपट पाहताना या चित्रपटांशी तुलना करत पाहण्याची सवय लागली.

बरं हे सर्व ज्यांना आपण 'आर्ट फिल्म्स' म्हणतो तसे असतात असे नाही. बर्फीच्या पहिल्या हाफवर अमेलीचा प्रभाव स्पष्ट जाणवतो पण त्यात कमर्शिअल तत्त्वे नाहीत असं कोणी म्हणणार नाही. किंबहुना ती बेमालूम पणे मिसळून, शुगर कोटिंग करून आपल्यासमोर सादर केली आहेत. अजून एक उदाहरण देतो. २०१० साली कानचा सर्वोत्कृष्ट चित्रपट होता लुंग बूनमी रालु छात (Uncle Boonmee Who Can Recall His Past Lives). थाई नाव कानाला विचित्र वाटले तर वाटू द्यात पण चित्रपट जबरदस्त आहे. हा चित्रपट पुनर्जीवनाच्या संकल्पनेवर बेतलेला होता. तुम्हाला खोटे वाटेल पण पहिले काही शॉट्स पाहिल्यावर रामसेपटांची आठवण होते. खासकरुन रामश्यांची खासियत असलेले अस्वलसदृश भूत पाहून तर मी सीनचे गांभीर्य विसरून १ मिनिट हसत बसलो होतो. मग फरक कुठे होता? कथेत आचरटपणा नावाला सुद्धा नव्हता. पुराना मंदिर मधल्या जगदीप ला गब्बर बनवून लांबी वाढविण्यासाठी जोडलेल्या सीन्ससारखी ठिगळेही नव्हती. बाकी तत्त्वज्ञान गेले उडत; निव्वळ भूतपट म्हणून देखील हा चित्रपट दर्शनीय वाटतो.

यातून काही वाईट सवयी देखील लागतात. जसे गेल्या आठवड्यात मित्राने बिपाशाच्या आगामी चित्रपट अलोन चा ट्रेलर दाखविल्यावर "च्यामारी! सिनेमा तर थाईलंडच्या अलोन वरुन उचलेला स्पष्टच आहे. पण या वेळेला भट काकांनी ट्रेलरची देखील शॉट टू शॉट कॉपी केली आहे." अशा कमेंट्स देणे हि त्यातील एक! मग तुम्हाला अनेकदा सिनेमाला यायची बंदी घातली जाते (खासकरुन सलमानच्या चित्रपटांना! "हा आधीच सीनमध्ये काय होणार सांगतो मग याला शिव्या घालण्याच्या नादात सल्लुभाईचे अ‍ॅक्शन सीक्वेन्स जातात." ज्यांना दाक्षिणात्य चित्रपट पाहायची सवय आहे त्यांना हे चटकन कळेल. किक तर म्हणजे अगदी वेषभूषेसकट रवितेजाची नक्कल आहे)

आता थोडेसे कल्चर शॉकबद्दल! जागतिकीकरणानंतर आपल्या कक्षा खूप विस्तारल्या. खासकरुन आंतरजाल आल्यावर तर जग खूप जवळ आले आणि आपण कधी नव्हतो इतके आंग्रजाळलो. आता हे चांगले का वाईट हा येथील विषय नाही पण इंग्रजी चित्रपट विशेषतः अ‍ॅक्शनपट आपल्याला जवळचे वाटू लागले. अगदी तिथले सामाजिक चित्रपटही कदाचित बरेच जण पचवतील. (उदा. ब्रोकबॅक माऊंटन, डल्लास बायर्स क्लब) पण आपण कोरियन, जापानी चित्रपट पचवू का याबद्दल मला शंका आहे. अनेकदा तिथे सेन्सॉर बोर्ड नावाची काही चीज अस्तित्त्वातच नाही असे वाटते. ज्यांना अधिक उत्सुकता आहे त्यांनी 'ऑडिशन' नावाचा चित्रपट आवर्जून बघावा. अवाक शब्द थिटा वाटू लागतो. थोडी शोधाशोध केल्यावर असे लक्षात आले कि ज्या देशांचा HRI(Human Resource Index) जास्ती आहे तिथे सेन्सॉरचे नियम सामान्यतः शिथिल आहेत. मग त्यांची रुपकात्मक कथा स्वीकारण्याची क्षमता अधिक आहे कि इतर काही कारण आहे? अर्थातच याला अपवाद आहेत.

याचा अर्थ असा अजिबात नाही कि इतर भाषांमध्येच फक्त दर्जेदार चित्रपट बनतात. जिथे सोने आहे तिथे कचरा पण भरपूर आहे. जसे आपल्याकडे रामसे भूतपट बनवायचे तसा शॉ बंधूनी हाँगकाँगमध्ये आचरट कूंगफूपटांचा धूमाकूळ घातला होता. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल तर बोलायलाच नको. पण याच कचर्यामधून अनेकदा कमालीच्या कल्पनापण स्फुरतात. लेख संपवण्यापूर्वी हा एक शेवटचा किस्सा.

क्वेंटिन टारांटिनो हा एक प्रसिद्ध दिग्दर्शक! किल बिल, Django Unchained, पल्प फिक्शन इ. त्याचे गाजलेले चित्रपट. एकदा कान महोत्सवात अनुराग कश्यपशी बोलता बोलता त्याने एक मजेशीर गोष्ट सांगितली. किल बिल मध्ये अ‍ॅक्शन सीन्स अ‍ॅनिमेटेड सीक्वेन्सच्या स्वरूपात अत्यंत भन्नाट रीतीने दाखविलेत. ही कल्पना त्याला एक चित्रपट पाहिल्यावर सुचली होती. अनुरागचा विश्वास बसेना कारण हा चित्रपट त्याने पाहिला होता व तो सुपरफ्लॉप होता. हे ऐकल्यावर क्वेंटिनचा विश्वास बसेना कि हा चित्रपट पडूच कसा शकतो. तो चित्रपट होता कमल हसन लिखित-अभिनित आलावंदन (हिंदी नाव अभय)! आता बोला!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

The Intouchables हा मूळचा फ्रेंच चित्रपट, इंग्लीशमधे द अनटचेबल्स नावाने मिळेल. दोन मित्रांची सत्यकथा.
खुप सुंदर आहे..

काही कोरियन आणि काही जापनीज सिरियल्स पण चांगल्या आहेत. पण १ तासाच्या असतात त्या!!!>>> मी कोरीयन सिरीयल्स बघते तुनळीवर. सध्या My Girl चालू आहे. जनरली कोरियन सिरियल्स Bollywood style, एकता कपूर छापाच्या असतात. पण हलफुलक्या असतात, बघायला बर्या वाटतात.

अरे हे वाचायचं सुटूनच गेल होतं..
लेख वर आणल्याबद्दल धन्यवाद सुलू..
काही काही चित्रपट सुटलेच बघायचे..
मलातर कोरियन, जपानी सिनेमे आवडतात.. त्यांचे अ‍ॅनिमेशन पट जास्त पाहिले जातात म्हणा तरी..
काही चायनिज, जर्मन चित्रपट सुद्धा बघितले आहे.. आता उगा किडा घुसला मुव्ही पाहण्याचा..

पहिला पॅरा टोटल रिलेट झाला पायस.. अगदी वर्ड टू वर्ड Lol
मला आत्ता बघायला दिला तरी बघु शकते मी तिरंगा Wink
कॉलेजमधे गेल्यावर माझंपन डीट्टो झाल.. शोधुन शोधुन मुव्हीज मिळवायचे..
जोडीला युट्युब वगैरे प्रकार.. अधिक कॉलेजच वायफाय.. आपल्यापलिकडे पन हुशार जग आहे हे (मित्र मैत्रीणी) ज्यांना यात खतरनाक गती आहे हे माहिती होणे.. इत्यादी इत्यादी..
छान लिहिलयसं..

लेख वर आणल्याबद्दल धन्यवाद सुलू..>>> तुझे स्वागत आहे टिना.

खर तर उपग्रह वाहिनी विभागात इतर देशान्च्या/भाषेच्या सिरियल्स्/सिरिज असा भाग असायला हवा होता. माझ्या साऱख्या इतर आस्वादकान्ची सोय झाली असती.

दोस्तांमुळे/नात्यामुळे मी तामिळ, बांगला आणि गुजराती पाहयची. पण आता वेळ नसतो.

मुलांमुळे जापनीज, स्पॅनिश पाहिलेत. (लहान मुलांचेच ज्यास्त). मला जापनीज खूप आवडले. एकतर त्यांचे विषय चांगले असतात.
मध्ये अफगाणी, मिडलईस्ट ( बहुधा त्याला ऑस्कर नॉमिनेशन असल्याने) बघितले. आवडले.
माझा प्रॉबलेम , मला नंतर नाव पटकन कधीच आठवत नाहीत. फक्त प्रसंग लक्षात रहातात.

बाकी ईंग्रजी, हिंदी ज्यास्त पाहायची. मराठी अलीकडेच बघायला लागले. नाहितर दोन चार अति भयानक मराठी फार पुर्वी पाहिलेत.
त्यात ते लक्ष्मीकांत बेर्डे , अलका कुबल नावं पण अंगावर यायचीत. Proud

आता विषय चांगले असतात मराठीत म्हणून बघते.

बेस्ट लिहिलेय.

मला एखादा मुव्ही आवडला की त्याचा डायरेक्टर आणी स्क्रीनप्ले रायटर शोधून त्यांचे इतर चित्रपट पहायचा झपाटाच लावून टाकतो.
आयएमडीबीचा वापर मग 'सेव्ह वॉचलिस्ट'साठी Happy

चित्रपटांचे वेड असणारे दोन मित्र आहेत आणी त्यांचे कार्यक्षेत्रही 'फिल्म फेस्टीवल'शी संबधीत. निव्वळ चित्रपटच नाहीत तर चांगल्या डॉक्युमेंट्रीज, शॉर्ट फिल्म्स, सीरीज असा सगळा खजिनाच मिळतो. हार्डडिस्क फिरत राहतात मग टिबी टिबी डाटा घेऊन Wink

डॉक्युमेंट्रीज, शॉर्ट फिल्म्स, सीरीज असा सगळा खजिनाच मिळतो. >>> इथे पण देत जा मग नावे आणि जमल्यास लिंक्स पण.

कोरिअन चित्रपट बरेच बघितले. तेही कोरियात, त्यामुळे शॉक वगैरे नाही बसला. पण दुसर्‍या देशाचं कल्चर माहीती नसताना, "अरे, हा असा विचार आपण तर कधी केलाच नव्हता" हा धक्का बसणे साहजिकच असते. अगदी सुरुवातीला इंग्लिश चित्रपट बघतांना काही गोष्टी खटकायच्या, आता ते सहज वाटते. उलट हिंदी चित्रपटात तेच ओंगळवाणे वाटते आणि खटकते.

अरे हा धागा परत जिवंत झाला? Happy नवीन प्रतिसादांना धन्यवाद!
यानिमित्ताने मध्ये पाहिलेल्या एका वेगळ्या चित्रपटाचे नाव देतो. आवडेलच अशी अपेक्षा अजिबात ठेवू नका. पण नेहमी बघतो त्यापेक्षा एकदम वेगळी शैली पाहायची इच्छा असेल तर आवर्जून पाहा.
किंग इज अलाईव्ह (२००१) - ही एक डॅनिश फिल्म आहे पण इंग्रजी भाषेत. थोडक्यात गोष्ट सांगायची तर काही पर्यटक नामिबियाच्या वाळवंटात अडकतात. त्यातील एकजण त्यांना वेळ घालवायला किंग लिअरचा खेळ मांडूयात असे सुचवतो नव्हे गळी उतरवतो. आणि जसा जसा त्यांचा खेळ वाळवंटाच्या साक्षीने पुढे सरकतो तसे तसे रिअ‍ॅलिटी आणि नाटक यांच्यातील सीमा धूसर होत जातात. ही डोग्मे ९५ फिल्म आहे (https://en.wikipedia.org/wiki/Dogme_95).

अरेच्चा, एवढ्या वर्षांत हा धागा वाचलाच नव्हता. पायस, खूप छान लिहिलं आहे आणि प्रतिसादात तयार झालेली लिस्ट पण मस्तच. त्यातले काही पाहिलेले मुव्हीज विस्मृतीत गेले होते, नावं वाचून परत आठवणी / प्रसंग / लोकेशन्स आठवली. जे पाहिले नाहीत ते नोट करून शोधून काढावे लागतील.

मी काही महिन्यांपूर्वी पाहिलेला बंगाली सिनेमा - 'माछेर झोल' आवडला होता. रित्त्विक चकबोर्ती आणि ममता शंकर (आई मुलगा) यांच्या 13 वर्षांनंतरच्या भेटीबद्दल आणि जगप्रसिद्ध मास्टर शेफ मुलाने हॉस्पिटल बेडवर असणाऱ्या आईला तिच्या ईच्छापूर्ती साठी स्वतःच्या हातचं माछेर झोल ( पण चव मात्र तिच्या हातची) करून घालण्या बद्दलची मुख्य कथा आहे. मग उपकथांमध्ये त्याचे आणि वडिलांचे ताणलेले भावनिक संबंध, तो 13 वर्षांपूर्वी मागे सोडून गेलेली बंगाली बायको, त्याची परदेशी गर्लफ्रेंड, त्याची भारतात आल्यावर झालेली हॉटेल मधली शिष्या कम मैत्रीण आहेत. खूप साधी पण ओघवती कथा, उत्तम अभिनय ( दोघे आई आणि मुलगा अभिनयात मात्र बाप आहेत) आणि एकूणच सगळ्या भावभावनाच संयमित पण सुंदर सादरीकरण..... उत्तम सिनेमा

हा लेख वर काढल्याबद्दल आभार! या निमित्ताने मध्ये बघितलेल्या काही सुंदर इतर भाषीय चित्रपटांच्या आठवणी ताज्या झाल्या. वेळ झाल्यास त्यांच्यावर वेगळा धागा काढून लिहेनही Happy

आदि शंकराचार्य >> +१ हा मी पाहिला आहे. छान सिनेमा आहे आणि यातले संस्कृतही तुलनेने कळण्यास तितके कठीण नाही. शंतनूने छान चित्रपट सुचवला आहे.
माछेर झोल >> इंटरेस्टिंग! हा चित्रपट सुचवल्याबद्दल धन्यवाद मीरा. वेळ होईल तसा नक्की बघेन.

मस्त धागा आहे. पायस पुन्हा एकदा धन्यवाद.

मी माझ्या क्लास मध्ये Intouchables कायम दाखवतो. विद्यार्थ्यांना आवडतो.

इथे मी दोन फ्रेंच फिल्म्स सुचवतो.
१) Irréversible
हा अक्षरशः उलटा चित्रपट आहे. शेवटापासून सुरू होत मागे जात जात परत एका विषण्ण शेवटाशी संपतो. जरूर पहा.

२) Sex is comedy
नावाप्रमाणेच बोल्ड आहे. विषय असा आहे की एका दिग्दर्शिकेला चित्रपटातील बेड सिन शुट करायचा आहे. कथेत नायिकेचा हा पहिला अनुभव आहे. हिरो हिरॉईन च एकमेकांशी पटत नाहीये. त्यात क्रिएटिव्ह डिफरन्सेस. यातून मार्ग काढत सिन शुट होतो.

मला इतर भाषिय सिनेमे पाहताना सबटायटल्स वाचून सिनेमा पहायची सवय लागली आहे. ती इतकी वाढली आहे की जर एखाद्या हिंदी किंवा मराठी सिनेमाला जरी इंग्रजी सबटायटल्स असतील तर मी ते वाचतो. माझ्या असे लक्षात आले आहे की मला संवाद ऐकू येत नाहीत. जर सबटायटल्स उपलब्ध नसतील तर मात्र संवाद स्पष्टपणे ऐकू येतात.
इंग्रजी सिनेमे पाहताना एखादा उच्चार नाही समजला तर रिस्क नको म्हणून मी सबटायटल्स वाचत असे. पण थेटरात पाहताना सिनेमा समजला नाही असे झाले नाही.
ही काय भानगड असावी ?

आपला मेंदू दोन्हीवर एका वेळी लक्ष एकाग्र करू शकत नाही.सब टायटल्स आधी आणि ज्याबद्दल आहे ती घटना फिल्म मध्ये नंतर घडली तरी आपल्याला पिक्चर मध्ये लक्ष घालायला त्रास होतो.शिवाय ऑटो जनरेटेड सब टायटल ही स्पीच टू टेक्स्ट वरून असतात.(कम्प्युटर ने उच्चार ऐकून त्याचे टेक्स्ट बनवणे).यात एरर होतात.(व्हॉट चे व्हा वगैरे).
जर भाषा थोडे कान लावून कळणार असेल तर सब टायटल ऑन न केल्यास बरे.)

यु ट्यूब वर हरिवू आणि नेटफलिक्स वर नतीचारामी कन्नड चित्रपट मस्त आहेत. नातीचारामी तीळ गाणी सुंदर आहेत

'शोनार पहार' ( सोन्याचा पहाड) हा बंगाली मुव्ही पाहिला. अतीशय आवडला. 'माछेर झोल' नन्तर मला बंगाली मुव्हीजची आवड निर्माण झाली आहे.
तनुजा आणि (जो कोणी) बाल कलाकार आहे त्यांनी अतिशय छान काम केलं आहे. कथा साधीशीच पण खूप सुंदर आहे. दिग्दर्शन उत्कृष्ट. एकदा बघावाच असा मूव्ही नक्कीच आहे.

इतर भाषीय चित्रपट पाहायची सुरुवात आणि धीर कधी झाला आठवत नाही पण सध्या लक्षात राहिलेले आणि खूप आवडते दोन चित्रपट म्हणजे प्रेमम (मल्याळम) आणि 96 (तमिळ) दोन्ही आपापल्या जागी फार कमाल आहेत. सर्वच पात्रांचे अभिनय सुरेख. कोणी प्रेमम बघणारच असाल तर तो मल्याळम आहे याची खात्री करूनच पहा कारण त्याचा तेलगू रिमेक बनला आहे आणि तो आधीच्या मानाने फारच बोर केलाय असं ऐकिवात आहे. 96 तर जेव्हा जेव्हा आठवतो तेव्हा आतल्या आत काहीतरी वेगळंच फीलिंग यायला लागतं.

९६ साठी १००% सहमत ...

मी जवळ जवळ १० वेळा तरी ती मूवी पहिली असेंन. ...दरवेळेला वेगळाच काहीतरी वाटत,...अतिcशय
आवडता चित्रपट.... अप्रतिम संगीत

प्लिज प्लिज हिंदीत पाहू नका. बरंचसं म्युझिक वगैरे कापलं आहे असं मित्र सांगत होता. तमिळ विथ सबटायटल्स बघा खरा आनंद घेण्यासाठी.

म्युझिक नाही कापलेले. गाणी कापली आहेत. सुरूवातीची गाणी नाही पाहिली तर इतका फरक पडत नाही. पण काही त्या दोघांचे चालत जातानाचे गाणे नक्की पहा. मी बर्‍याचदा जिथे गाणी असतील तिथे तमिळ गाणी बघतो आणि मग हिंदी परत सुरू करतो म्हणजे काही राहून जात नाही

>>धनि<<
ओह अच्छा अच्छा. मला तरी सगळीच गाणी आवडली. ते चालत जातानाचं गाणं म्हणजे थाबंगळे म्हणताय बहुतेक तुम्ही. सुरेखच आहे. गाना ऍप वर आहेत सगळी.

Pages