इतर भाषीय चित्रपट पाहणे - एक अनुभव

Submitted by पायस on 16 December, 2014 - 16:07

चित्रपट पाहण्याची आवड तशी जुनीच. लहानपणी दूरदर्शनवर (शक्तिमान, कॅप्टन व्योम वगळता) तसेही इतर काही पाहावेसेही वाटत नसे. अर्थात तेव्हा चित्रपट समजायचे वय नव्हते. त्यामुळे आमचा हीरो तिरंगाचा देशभक्त वागळे. दर १५ ऑगस्ट/२६ जानेवारीला झेंडावंदन करुन आल्यावर न चुकता तिरंगा बघायची सवय असल्यावर दर्जेदार चित्रपट बघण्याबाबत आनंदच होता. पण तरीही त्याचा एक फायदा झाला; अफाट सहनशक्ती निर्माण झाली. अगदी खंडहर सारख्या आर्ट फिल्म्स कळत नसतानाही अतिशय एकाग्रतेने पाहण्याची कला अवगत झाली. मग एवढी कला असताना कळणार्या भाषेतलेच (येथे इंग्रजी/हिंदी/मराठी असे वाचावे)सिनेमे कोण बघेल?

त्यातून सबटाईटल्सचा शोध लागल्यामुळे काम बरेच सोपे झाले. आणि त्या सुमारास एक अत्यंत सुंदर चित्रपट पाहण्यात आला - अमेली. मूळ फ्रेंच असलेला हा सिनेमा कसा पाहण्यात आला हे आता नीटसे आठवत नाही पण इंग्रजी/हिंदी/मराठी वगळता इतर कोणत्या भाषेतला सिनेमा पाहण्याचा हाच पहिला अनुभव! सुदैवाने हि निवड खूप चांगली होती. संवादांपेक्षा दृक अनुभवावर दिग्दर्शकाचा भर असल्याने भाषा फारशी कळत नसतानाही याने खूप मनोरंजन केले. विशेषतः ऑड्री टॉटो (अभिनेत्री) च्या तर प्रेमातच पडलो (तेव्हा प्रेमात पडण्यासारखे इतर कोणि नव्हते हा भाग अलाहिदा). यातून नवा शोध असा लागला कि अमेरिका आणि मुंबई च्या बाहेरही चित्रपट बनवले जातात आणि बर्याचदा ते उत्तम मनोरंजनही करतात!

इंजिनिअरिंग करत असताना मोकळा वेळ भरपूर मिळायचा आणि कॉलेज कडून फुकटचे इंटरनेट! मग विविध आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्सचे अर्काईव्स शोधणे सुरु झाले. सनडान्स, बर्लिन इंटरनॅशनल, कान, वेनिस, टोरांटो, बुसान अशा कित्येक फेस्टिव्हल्सच्या विजेत्यांची नावे शोधायची आणि ते पाहायचे. मग त्यांच्याशी रिलेटेड सिनेमे पाहायचे. बरेचसे मिचेल जॉन्सनच्या बाऊन्सरप्रमाणे वाटले. काही तर निव्वळ आचरट वाटले. तर अनेकदा हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीतून सुटलाच कसा हा प्रश्न मनात डोकावला. पण कुठलाही अर्धवट सोडला नाही. याचा अर्थ असा नाही कि इंग्रजी/हिंदी पाहिलेच नाहीत. उलट ते चित्रपट पाहताना या चित्रपटांशी तुलना करत पाहण्याची सवय लागली.

बरं हे सर्व ज्यांना आपण 'आर्ट फिल्म्स' म्हणतो तसे असतात असे नाही. बर्फीच्या पहिल्या हाफवर अमेलीचा प्रभाव स्पष्ट जाणवतो पण त्यात कमर्शिअल तत्त्वे नाहीत असं कोणी म्हणणार नाही. किंबहुना ती बेमालूम पणे मिसळून, शुगर कोटिंग करून आपल्यासमोर सादर केली आहेत. अजून एक उदाहरण देतो. २०१० साली कानचा सर्वोत्कृष्ट चित्रपट होता लुंग बूनमी रालु छात (Uncle Boonmee Who Can Recall His Past Lives). थाई नाव कानाला विचित्र वाटले तर वाटू द्यात पण चित्रपट जबरदस्त आहे. हा चित्रपट पुनर्जीवनाच्या संकल्पनेवर बेतलेला होता. तुम्हाला खोटे वाटेल पण पहिले काही शॉट्स पाहिल्यावर रामसेपटांची आठवण होते. खासकरुन रामश्यांची खासियत असलेले अस्वलसदृश भूत पाहून तर मी सीनचे गांभीर्य विसरून १ मिनिट हसत बसलो होतो. मग फरक कुठे होता? कथेत आचरटपणा नावाला सुद्धा नव्हता. पुराना मंदिर मधल्या जगदीप ला गब्बर बनवून लांबी वाढविण्यासाठी जोडलेल्या सीन्ससारखी ठिगळेही नव्हती. बाकी तत्त्वज्ञान गेले उडत; निव्वळ भूतपट म्हणून देखील हा चित्रपट दर्शनीय वाटतो.

यातून काही वाईट सवयी देखील लागतात. जसे गेल्या आठवड्यात मित्राने बिपाशाच्या आगामी चित्रपट अलोन चा ट्रेलर दाखविल्यावर "च्यामारी! सिनेमा तर थाईलंडच्या अलोन वरुन उचलेला स्पष्टच आहे. पण या वेळेला भट काकांनी ट्रेलरची देखील शॉट टू शॉट कॉपी केली आहे." अशा कमेंट्स देणे हि त्यातील एक! मग तुम्हाला अनेकदा सिनेमाला यायची बंदी घातली जाते (खासकरुन सलमानच्या चित्रपटांना! "हा आधीच सीनमध्ये काय होणार सांगतो मग याला शिव्या घालण्याच्या नादात सल्लुभाईचे अ‍ॅक्शन सीक्वेन्स जातात." ज्यांना दाक्षिणात्य चित्रपट पाहायची सवय आहे त्यांना हे चटकन कळेल. किक तर म्हणजे अगदी वेषभूषेसकट रवितेजाची नक्कल आहे)

आता थोडेसे कल्चर शॉकबद्दल! जागतिकीकरणानंतर आपल्या कक्षा खूप विस्तारल्या. खासकरुन आंतरजाल आल्यावर तर जग खूप जवळ आले आणि आपण कधी नव्हतो इतके आंग्रजाळलो. आता हे चांगले का वाईट हा येथील विषय नाही पण इंग्रजी चित्रपट विशेषतः अ‍ॅक्शनपट आपल्याला जवळचे वाटू लागले. अगदी तिथले सामाजिक चित्रपटही कदाचित बरेच जण पचवतील. (उदा. ब्रोकबॅक माऊंटन, डल्लास बायर्स क्लब) पण आपण कोरियन, जापानी चित्रपट पचवू का याबद्दल मला शंका आहे. अनेकदा तिथे सेन्सॉर बोर्ड नावाची काही चीज अस्तित्त्वातच नाही असे वाटते. ज्यांना अधिक उत्सुकता आहे त्यांनी 'ऑडिशन' नावाचा चित्रपट आवर्जून बघावा. अवाक शब्द थिटा वाटू लागतो. थोडी शोधाशोध केल्यावर असे लक्षात आले कि ज्या देशांचा HRI(Human Resource Index) जास्ती आहे तिथे सेन्सॉरचे नियम सामान्यतः शिथिल आहेत. मग त्यांची रुपकात्मक कथा स्वीकारण्याची क्षमता अधिक आहे कि इतर काही कारण आहे? अर्थातच याला अपवाद आहेत.

याचा अर्थ असा अजिबात नाही कि इतर भाषांमध्येच फक्त दर्जेदार चित्रपट बनतात. जिथे सोने आहे तिथे कचरा पण भरपूर आहे. जसे आपल्याकडे रामसे भूतपट बनवायचे तसा शॉ बंधूनी हाँगकाँगमध्ये आचरट कूंगफूपटांचा धूमाकूळ घातला होता. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल तर बोलायलाच नको. पण याच कचर्यामधून अनेकदा कमालीच्या कल्पनापण स्फुरतात. लेख संपवण्यापूर्वी हा एक शेवटचा किस्सा.

क्वेंटिन टारांटिनो हा एक प्रसिद्ध दिग्दर्शक! किल बिल, Django Unchained, पल्प फिक्शन इ. त्याचे गाजलेले चित्रपट. एकदा कान महोत्सवात अनुराग कश्यपशी बोलता बोलता त्याने एक मजेशीर गोष्ट सांगितली. किल बिल मध्ये अ‍ॅक्शन सीन्स अ‍ॅनिमेटेड सीक्वेन्सच्या स्वरूपात अत्यंत भन्नाट रीतीने दाखविलेत. ही कल्पना त्याला एक चित्रपट पाहिल्यावर सुचली होती. अनुरागचा विश्वास बसेना कारण हा चित्रपट त्याने पाहिला होता व तो सुपरफ्लॉप होता. हे ऐकल्यावर क्वेंटिनचा विश्वास बसेना कि हा चित्रपट पडूच कसा शकतो. तो चित्रपट होता कमल हसन लिखित-अभिनित आलावंदन (हिंदी नाव अभय)! आता बोला!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळ Chan-wook Park च्या oldboy बद्दलच बोलतो आहे. सस्पेन्स/शेवट अतिशय चीप(cheap),सवंग वाटला.
सस्पेन्स/twist चित्रपट किंवा लेखनाचा महत्वाचा rule म्हणजे प्रेक्षकाला/वाचकाला शेवट पाहिल्यावर आपल्याला फसवण्यात आलं आहे असं वाटता कामा नये. मला ओल्ड बॉयचा सस्पेन्स/twist पाहिल्यावर ते feeling आलं. दिग्दर्शकाने धक्का देण्यासाठी cheap trick वापरून फसवले असं feeling आलं.

मला एक ओल्ड बॉय नावाचा सिनेमा सापडला त्याच्या स्टोरीवरून संजय गुप्ता-संजय दत्त जोडीचा झिंदा सिनेमा बेतला होता असे दिसते. तोच का हा ओल्ड बॉय? Park Chan-wook याचा ओरिजिनल दिसतो आहे.

हो. चर्चा Park Chan-wook याच्या (ओरिजिनल) ओल्ड बॉयबद्दल(निर्मिती साल - २००३) चालली आहे.

मला तरी काही फसवण्यासारखे वाटले नाही. कदाचीत तुमची अजून धक्कादायक चित्रपट पहायची तयारी झाली नाही वाटते!

मला तरी काही फसवण्यासारखे वाटले नाही. कदाचीत तुमची अजून धक्कादायक चित्रपट पहायची तयारी झाली नाही वाटते! >> +१. नवा मात्र नक्कीच तुम्ही म्हणता तसा चीप वाटला होता.

पायस, वाद घालण्याचा माझा हेतू नव्हता. शॉ बंधूंच्या फील्मोग्राफी वर विकिपिडीया आर्टिकल आहे. ५० च्या दशकापासूनच्या सर्व चित्रपटांची मोठी यादी तिथे आहे. The Love Eterne हा शॉ बंधूंच्या सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक आहे.

पायस,

नेब्रास्का - हा एक सिनेमा जो की अलिकडला आहे आणि कृष्णधवलमधे सादरीकरण केलेले आहे. एकही मिनिटं तुम्हाला बोअर होणार नाही. इतका अफाट सुंदर सिनेमा आहे. मी फ्लाईट मधे पाहिला आणि परत येताना परत तिच फ्लाईट होती मग परत बघायला मिळाला त्याचे अप्रुप वाटले. मानवी स्वभावाच्या अनेक छटा गमतीदार पद्धतीने इतक्या सुंदररित्या चितारल्या आहेत की हॅट्स ऑफ टु टीम!

http://en.wikipedia.org/wiki/Nebraska_(film)

सुमुक्ता अहो माझाही नाहिए. काय म्हणतात त्याला हा, हेल्दी डिबेट फक्त. Happy
ल्व्ह इटर्न, नेब्रास्का देखील आता लिस्टवर.
सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल खूप धन्यवाद, खूप आवडल्या. मला वाटले नव्हते इतर भाषांच्या चित्रपटांचे चाहते माबोवर इतक्या संख्येने सापडतील. लवकरच एखाद्या चित्रपटावर सविस्तर अवश्य लिहिन. वेळ होताच लेख माबोवर पोस्ट करेन. तोवर आणखी काही नावे सुचवणार असाल तर सुचवत राहा. Happy

लेख आवडला .
१५ ऑगस्ट म्हणजे क्रांतीवीर आणि तिरंगा ,अगदि अगदि ते समीकरण झालय ,नाही लागले हे चित्रपट तर चुकल्यासारखे वाटावे इतके. तसंही १५ ऑगस्ट ला कधी कधी रक्षाबंधन पण येतं त्यामुळे तिरंगातलं गाणं लागु पडतं या दिवशी.
अफाट सहनशक्ती >> Happy
किल बिल मध्ये अ‍ॅक्शन सीन्स अ‍ॅनिमेटेड सीक्वेन्सच्या स्वरूपात अत्यंत भन्नाट रीतीने दाखविलेत . किलबील अ‍ॅक्शन सीन्स ची कल्पना अभय या चित्रपटावरुन घेतली आहे हे माहीत नव्हते. किलबील चे सीन्स बरेच सहनेबल होतात ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट केल्यामुळे .
अगदी रवि तेजाच काय ....ज्यांनी टी वी वर साउथचे चित्रपट ड्ब पाहिलेत त्यांना नागार्जुन ,आर माधवन, प्रकाश राज, महेशबाबु ,सुर्या माहीत असणारच. मी 'गजनी' सुर्या वाला आमीर च्या गजनी आधी पाहीला होता.आणि मग आमीरचा ,सेम कथा पण शेवट वेगळा, हिंदीतला शेवट बरा वाटला .

देशातले वाईट देशाबाहेरचे चांगल्या दर्जाचे असं काही नाही.भारतातले प्रादेशीक चित्रपट अजिबात कमी दर्जाचे वाटत नाहीत .तीतकेच सफाईदार आणि उच्च कलात्मक नजरेने आणि मेहनतीने बनविलेले असतात. उदा. 'हरीचंद्राची फॅक्टरी' किंवा बरयाच वर्षापुर्वी आलेला गिरिष कर्नाड यांचा 'चेलुवी' नक्की बघावेत असे चित्रपट आहेत .
वेगळ्या भाषेतले मी अजुन जास्त पाहीले नाहीत. सगळ्यांनी दिलेले पाहायला हवेत. भारतात एका इंग्रजी चॅनल वर 'अमेली' सारखा लागतो .बर्फीचा संदर्भ असेल तर पहायला हवा.

एक नोर्वेगिअन मोविए suggest करतो - Into The White

world war मध्ये एकाच बर्फाळ ठिकाणी एक german आणि एक ब्रिटीश प्लेन कोसळते आणि मग ते मिळून काम करतात to survive .
Netflix वर आहे ... खूप मस्त मोवी.

संस्कृतमधे (की हिंदी ?) असलेला विवेकानंदांवरील एक चित्रपट (दाक्षिणात्य दिग्दर्शक आहे आणि कालिमाता हेमामालिनी आहे, बहुतेक मिथुन पण आहे). कोणी पाहिलाय का ? कुठे मिळू शकेल ?

कोरियन चित्रपट खुप पाहिले आहेत, The Beast and the Beauty, Always...
मस्त आहेत अगदी. काही कोरियन आणि काही जापनीज सिरियल्स पण चांगल्या आहेत. पण १ तासाच्या असतात त्या!!!

कास्ट अवे ऑन द मून.. हा कोरीयन चित्रपट पाहिला का ? यू ट्यूबवर आहे. कथाकल्पनाच भन्नाट आहे.
मी एक फ्रेंच चित्रपट बघितला होता. नाव आठवत नाही पण न जन्मलेल्या बाळांची एक युनियन असते आणि ते जन्माला न यायचा निर्णय घेतात असे कथानक होते.. त्या कथाकल्पनेवरून मी एक कथाही मायबोलीवर लिहिली होती.

महेश.. तो चित्रपट खासच होता. मिथुनने परमहंसांचा रोल केला होता. सर्वमदन बॅनर्जी विवेकानंद होता.
त्यात राखी, जयाप्रदा, मिनाक्षि शेषाद्री, तनुजा असे बरेच कलाकार होते.

महेश ही घ्या कास्ट अवे ऑन द मून ची तूनळी लिंक. खूप सुंदर चित्रपट सुचविला आहे दिनेशदांनी! अवश्य पहा.
https://www.youtube.com/watch?v=jeQ6zY4DMHw

दिनेशदा तुम्ही कुठला फ्रेंच चित्रपट म्हणताय? मी खूप शोधून पाहिले पण अशा कथानकाच्या कुठल्याच चित्रपटाचा उल्लेख नाही मिळाला. Sad

तो सर्वदमन बॅनर्जी-मिथुन कॉम्बो म्हणजे १९९८ चा स्वामी विवेकानंद, त्याचे असेच नाव आहे आणि तो हिंदीत होता. दूरदर्शनवर पूर्वी हमखास १२ जानेवारीला युवकदिनाचे/विवेकानंद जयंती निमित्त साधून दाखवायचे; अजूनही कदाचित दाखवित असावेत. मिथुनला राष्ट्रीय पुरस्कार होता त्याच्यासाठी. जणु एक पुरावाच कि त्याने ठरवले तर तो अत्युच्च प्रतीचा अभिनय करु शकतो.
ही त्याची तूनळी लिंक >>> https://www.youtube.com/watch?v=ZzI1FchBs4s

सुंदर लेख पायस, आवडला Happy

मलाही इतर भाषिक चित्रपट आवडतात. मिळाल्यास 'पोस्टमॅन इन द माऊंटेन्स' (चायनीज), 'माय मदर द मर्मेड' (कोरीयन), 'द बँण्ड्स व्हिजीट' (इजिप्शियन), माजीद मजिदीचे सर्व इराणी चित्रपट, असगर फरहादीचा 'अ सेपरेशन', 'देरसू उझाला' (रशियन) हे चित्रपट नक्की पाहा.

मिथुनला राष्ट्रीय पुरस्कार होता त्याच्यासाठी. जणु एक पुरावाच कि त्याने ठरवले तर तो अत्युच्च प्रतीचा अभिनय करु शकतो.>>>>

मिथुन च्या पहिल्याच चित्रपतासाठी (मृगया १९७६) त्याला नॅशनल अ‍ॅवर्ड मिळाले आहे. तसेच त्याला एकूण तीन नॅशनल अवार्ड्स आहेत अभिनयाची . त्यामुळ त्याने ठरवण्याचा प्रश्न नाही त्याला कसा वापरावा हा प्रश्न आहे. अगदी गुरु मध्ये देखील त्याचा ठसा छोट्या भूमिकेतही उठवला होताच....

<<<मिथुन च्या पहिल्याच चित्रपतासाठी (मृगया १९७६) त्याला नॅशनल अ‍ॅवर्ड मिळाले आहे. तसेच त्याला एकूण तीन नॅशनल अवार्ड्स आहेत अभिनयाची . त्यामुळ त्याने ठरवण्याचा प्रश्न नाही त्याला कसा वापरावा हा प्रश्न आहे. अगदी गुरु मध्ये देखील त्याचा ठसा छोट्या भूमिकेतही उठवला होताच....>>>>

सहमत आहे रॉबीनहूड Happy
1977 - सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार मृगया साठी
1993 - सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार तहादेर कथा साठी
1996 - सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय फ़िल्म पुरस्कार स्वामी विवेकानंद साठी

त्याखेरीज बहुधा अग्निपथ साठी सहाय्यक अभिनेता म्हणून फिल्मफेअर होते.

१९७७ नंतर 'सुरक्षा' आला ('वारदात', 'डिस्को डान्सर' आले) आणि साहेब मग मधे बरीच वर्षे भलत्याच पिचवर खेळून आले Happy

त्यामुळ त्याने ठरवण्याचा प्रश्न नाही त्याला कसा वापरावा हा प्रश्न आहे.>>> १९७७ नंतर 'सुरक्षा' आला ('वारदात', 'डिस्को डान्सर' आले) आणि साहेब मग मधे बरीच वर्षे भलत्याच पिचवर खेळून आले >>> सहमत. माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये अनेकदा अशा चित्रपटांमुळे मिथुनची टर उडवली जाते. अति झाले की त्यांना काऊंटर करायला विशालने सांगितलेले चित्रपट उपयोगी पडतात.
असो मूळ विषय. अजून बरीच नावे सुचवलेली दिसत आहेत. या धाग्याचा हा एक चांगला उपयोग होत आहे Happy

वर एक प्रतिसादात Incendies या कॅनेडिअन चित्रपटाचा उल्लेख आला आहे तो अतिशय रास्त असा आहे. मध्यपूर्वेतील लेबनॉन देशातील एक स्त्री कॅनडात स्थलांतरीत म्हणून राहते....आणि धक्क्याने तिचे निधन होते. मरण्यापूर्वी तिने आपली मुलगी आणि मुलगा याना दोन स्वतंत्र पत्रे लिहून ठेवली आहेत आणि आपला पूर्वेतिहास सांगितला आहे, जो मध्यपूर्वेतील राजकीय आणि लष्करी घडामोडीमध्ये गुंफला आहे. मात्र पत्रात इतकाच उल्लेख नसून आणखीनही काही बरेच (जे इथे प्रतिसादात सांगणे योग्य नाही)....जे फार धक्कादायक सिद्ध होते. हे सारे इतक्या सविस्तरपणे कथेत सांगण्यात येते आणि खुद्द मध्यपूर्वेतील देशातच चित्रिकरण केले असल्याने कथेला जो अस्सलपणा आणला गेला आहे ते पाहताना मन थक्क होऊन जाते. कलाकारांनी साकारलेल्या भूमिका अशा काही समोर येतात की वाटते आपण तेथील घटनांचे साक्षीदार असून त्यांच्यासमवेत त्या लेबनॉनमध्ये फिरत आहोत.

या चित्रपटाला बेस्ट फॉरेन फिल्मचे ऑस्कर नॉमिनेशन मिळाले होते.

लेख आणि प्रतिक्रियाही आवडल्या. इथे वाचुन काही चांगले चित्रपट पाहीलेत. अजुन लिस्ट येउ द्यात. ऑन्लाईन बघण्यासाठी लिंक असेल तर उत्तम.

तो चित्रपट मलाही परत बघायचा आहे.
जग आतंकवादाने बरबटल्याने, पोटातील बाळांनी जन्मालाच यायचे नाही. असे ठरवलेले असते.. पण तो ठराव एक जन्माला आलेला लहान मुलगाच मोडायला लावतो असे काहीसे कथानक आहे.
लाईक इन हेव्हन, ऑन अर्थ.. असे काहीसे नाव होते. पण ते मूळ नाव नाही. या नावाने सर्च केल्यावर मिळत नाही तो.

नोस्टाल्जिया फॉर द लाईट http://www.imdb.com/title/tt1556190/

हा मूळ स्पॅनिश चित्रपट ( माहितीपट ) अवश्य बघा. चिलीमधील माता आणि अवकाश संशोधक... असा विषय असला तरी चित्रीकरण, अभिनय ( तो अभिनय नाही, सर्व कलाकार प्रत्यक्ष व्यक्ती आहेत ) आणि एकंदरच विषय केवळ अप्रतिम आहे.

वरती अशोक यांनी जो लेबनॉन चा उल्लेख केलाय, त्या लेबनॉन नावाचाच एक चित्रपट आहे. तो ८० टक्के एका रणगाड्याच्या आत चित्रीत केलाय.. अंगावर येणारा चित्रपट आहे तो.

Pages