योगविद्या, अतिसुलभीकरणाचा बळी (योगदिनाच्या निमित्ताने)

Submitted by अतुल ठाकुर on 20 June, 2016 - 02:53

spa21.jpg

जमाना गोंजारण्याचा आहे. कमीतकमी त्रास करुन घेण्याचा आहे. खरं म्हणजे कमीत कमी का म्हणुन? कसलाच त्रास नको. शाळा नकोत. शाळा असतील तर भिंती नकोत. दोन्ही असतील तर निदान अभ्यास तरी नकोच. दुर्दैवाने तो करावा लागलाच तर परीक्षा नकोतच. परीक्षा असली तर पास नापास असणार. मग आळशी विद्यार्थ्यांच्या कोमल मनावर परिणाम होणार. शिक्षकांनी संस्कार करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मुलांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला नव्हे काय? त्यापेक्षा प्रत्येक शाळेत कोमल मनांना समजुन घेणारा समुपदेशक हवा. अभ्यास कसा हसत खेळत व्हायला हवा. बाकी अलिकडे मुक्तांगणसारख्या व्यसनमुक्ती केंद्रात सगळे वॉर्ड मिळुन दाखल झालेल्या मुलांची संख्या पाहिली तर खास त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड काढता येईल इतकी असते आणि दाखल करताना रडुन भोकांड पसरणारी, हातपाय झाडणारी, चावण्याचा प्रयत्न करणारी ही बाळे व्यसनासाठी पैसे मिळवताना आईवडिलांच्या डोळ्यात महिनोनमहिने धुळ फेकण्याइतकी कोमल मनाची असतात हे येथेच नमुद केलेले बरे. तर लिहिण्याचा उद्देश हा कि या "हसतखेळत" पणाचे लोण सगळीकडे पोहोचले आहेत. त्याला योगासारखे कमाईचे कुरण मोकळे कसे राहणार? या "हसतखेळत" च्या आग्रहाने या प्राचिन विद्येचे जे काही नुकसान झाले आहेत त्याचा जमाखर्च या लेखात मांडण्याचा उद्देश आहे. योग दिनाच्या निमित्ताने जगभर सनईचौघडे वाजत असताना आम्ही लावलेला विसंवादी सूर अनेकांना न रुचण्याचा संभव आहे. पण गालिच्याखाली कचरा दडवुन सारे काही आलबेल आहे हे सांगण्याइतका "हसतखेळत"पणा मजजवळ नाही. या लेखनाचा सूर जुने ते सोने असा आणि परंपरावादी वाटला तर त्याला इलाज नाही. मात्र तसा तो वाटु नये असा माझा प्रयत्न राहिल.

सुलभीकरणाचे स्वतःचे एक महत्त्व असते ते नाकारण्यात अर्थ नाही. किंबहुना काही बाबतीत ते आवश्यकदेखिल असते. योगासारख्या विषयात तर त्याचे महत्त्व फारच आहे. उदा. सुप्तवज्रासनासारखं आसन. ज्यात आधी वज्रासनात बसावं लागतं. त्यानंतर हळुहळु एक एक हात मागे घेऊन पंजा जमिनीवर टेकवायचा. हे करताना बोटं पुढच्या बाजुला ठेवायची. मग हळुहळु मागे जात कोपरं जमीनीवर टेकवायची. मग वज्रासन न हलवता पाठीवर झोपायचे. अशाअर्‍हेचे आसन करताना सुलभीकरण आवश्यकच आहे. गुरुवर्य निंबाळकरांसारख्यांनी आधी फक्त वज्रासनावर भर दिला. कारण बहुतेकांना तेच जमत नाही. त्यातही सुलभ वज्रासन. घोटे दुखु लागले तर त्याखाली मऊ टॉवेल घ्या. मग पूर्व सुलभ सुप्त वज्रासन. फक्त हात मागे घ्यायचे. असा काही दिवस अभ्यास झाल्यावर पुढची पायरी सुलभसूप्तवज्रासन. यामुळे वृद्ध, कडक शरीर असलेली, जास्त वजन असलेली मंडळीसुद्धा नाराज न होता पायरी पायरीने पूर्ण आसन करण्याचा प्रयत्न करतात. प्राणायामाचेही तसेच. विवेकानंदकेंद्रासारख्या संस्थेने तर कुंभक, म्हणजे श्वास रोखणे हे ठेवलेच नाही. ते फक्त पुरक आणि रेचकच करतात. रेचक केल्यावर सहजपणे जो बाह्यकुंभक घडतो त्यावरच त्यांचा भर असतो. याचा अर्थ हा कि सुलभीकरण काही एका टप्प्यापर्यंत आवश्यकच नव्हे तर योग शिकण्याच्य्या दृष्टीने ते अपरिहार्यदेखिल आहे. मात्र येथे ज्या सुलभीकरणाचा विचार केला आहेत त्याचा योगाच्या बाजारीकरणाशी देखिल थोडा संबंध आहे. कुठलीही गोष्ट एकदा "मार्केट"शी जोडली गेली कि त्याला आकर्षक रुप देणे आले आणि त्याबरोबर ती जास्तीत जास्त विकली कशी जाईल हे पाहणे आले. या दृष्टीने आधुनिक जिम्स मध्ये योगाचे मार्केटींग कसे होते ते पाहणे मनोरंजक ठरेल.

मुळात योग ही एक जीवनशैली आहे, योगाला काही हजार वर्षांची परंपरा आहे, योगाचे स्वतःचे वेगळे असे तत्त्वज्ञान आहे, त्याचे प्राचिन साहित्य आहे, काही प्रमाणभूत असे ग्रंथ आहेत, निरनिराळ्या शाखा आहेत याचा या दिशेला पत्ताच नसतो. जिम्स मध्ये योग हा पॅकेज डिल मध्ये असतो. म्हणजे असं कि अलिकडे लोकांना सर्वसमावेशक विचार करण्याची सवय जडली आहे. सर्वात महत्त्वाचे हार्ट, मग त्यासाठी चालणे, जॉगिंग किंवा रनिंग. पण शरीर पिळदार तर दिसायला हवेच. त्यासाठी वेट ट्रेनिंग. मग लवचिकपणा तर हवाच, त्यासाठी "योगा". पुढे हे सारं केल्यावर व्यायाम कम रेक्रिएशन म्हणुनही असेल कदाचित, झुंबा कि ठुंबा सारखा डान्स. हे सारं एका पॅकेजमध्येच असतं. कंप्युटर प्रोग्रामिंगच्या कोर्समध्ये सी, सी++, जावा, ओरॅकल सर्व एकत्र असावं तसंच हे देखिल. त्यातही योगविद्येसाठी काही नियम आहेत. आसने प्राणायाम कधी करावेत, काय आधी काय नंतर करावं, वेट ट्रेनिंग, धावणे, पळणे केल्यावर योगाभ्यास करावा कि नाही? केल्यास त्या दोन्हीत किती वेळाचे अंतर असावे याची कितपत माहिती हे सर्व एकाचवेळी करणारांना आणि शिकवणारांना असते ते एक भगवान पतंजलींनाच ठावुक. त्यातही येथे शिकवला जाणारा 'योगा" हा पारंपरिक असण्याची शक्यता कमीच. तो पॉवर योगा, बिक्रम योगा अशासारखं काहीतरी असणार. म्हणजे वाफाळलेल्या खोलीत योगा करुन घाम काढणे, सूर्यनमस्कारासारखे काहीतरी करणे यासारखं काहीही असु शकतं. हे झालं आधुनिक जिम्स मध्ये. पण आपल्या नेहेमीच्या योगवर्गाची कथा तरी काय वेगळी आहे?

खरं तर घरगुती वातावरणात चालवले जाणारे हे वर्ग आणि वर्षानुवर्षे एकाच शिक्षकाडुन मिळणारे वैयक्तीक मार्गदर्शन, एखाद्या फॅमिली डॉक्टरला असावी तशी योगशिक्षकाला असलेली विद्यार्थांची माहिती, मनात साचलेलं दु:ख किंवा अडचण योगशिक्षकाला सांगुन आपले मन हलके करण्याची असलेली सोय या पारंपरिक वर्गाच्या जमेच्या बाजु. अनेक योगशिक्षक हे कळत न कळत समुपदेशकसुद्धा झालेले मी पाहिलेत. ज्याचा फायदा निश्चितपणे विद्यार्थ्यांना होतो. पण आता इथेही "धंदा" येऊन चिकटला आहे. काहीवेळा हळदीकुंकु, सहली, वाढदिवस यांसारख्या कार्यक्रमाचे स्वरुप पाहता या योगवर्गांना कळतनकळत "क्लबज्"चे स्वरुप येऊ लागले आहे कि काय असे वाटत राहते. वर्षानुवर्षे तेथे येणार्‍यांच्या आसनांमध्ये फारशी प्रगती किंवा सुधारणा दिसत नाही. त्याची करणार्‍यांना आणि शिकवणार्‍यांना खंत नसते. एखादी सवय असल्यासारखी मंडळी तेथे येतात. कदाचित सर्वसमावेशक व्यायाम आपण घेतला पाहिजे म्हणुन तिथुनच जिमलाही जात असतील. त्यातुन टिव्हीवर योगाचे कार्यक्रम पाहुन येणारे तर चमत्कारिकच असतात. त्यांना ताबडतोब प्राणायाम आणि ध्यान शिकायचं असतं. बाजुला मोबाईल ठेऊन योगाभ्यास करायचा असतो. कानात हेडफोन खुपसुन म्युझिकचा आनंद घेत योग करण्याचे दिवस दूर नाहीत, किंवा ते सुरुही झालं असेल. परंपरेप्रमाणे आधी आसने, त्यामुळे होणारी शरीरशुद्धी, त्यानंतर प्राणायाम आणि अशा टप्प्याने तयार झालेल्या शरीर, मनाच्या आधारे ध्यान असा हा क्रम असतो. पण लोकांना तेवढा दम राहिलेला नसतो. ते असल्या पायर्‍यांची पत्रास बाळगत नाहीत. एकदम समाधी साधायची असते त्यांना. दुर्दैवाने अजुनही निसर्गाला ही घाई मंजुर नसावी. अजुनही पोटात बाळ नऊ महिने वागवावंच लागतं.

या सुलभीकरणाने झालंय हे कि आता बागांमध्ये जिकडेतिकडे योगसाधक दिसु लागलेत. चालावे, धावावे, मग दगडी बाकावर बसुन कसलेही आसन न लावता तसेच पाय खाली सोडुन आजुबाजुला येणार्‍या जाणार्‍या प्रेक्षणिय गोष्टी निरखीत फूर्र फूर्र करीत एकेक नाकपुडी बंद उघड करीत अनुलोमविलोम करावा. मग करायला अत्यंत कठिण अशी नौली सर्वांनी एकत्र करावी. म्हणजे उड्डीयान लावण्याची गरज नाही. दोन्ही हातांचा जोर वाकुन गुडघ्यावर देऊन पोटाचे मधले स्नायु पुढे आणण्याची गरज नाही. तो दाब कमी जास्त करीत नौली फिरवण्याची गरज नाही. फक्त वाकुन गुडघे आणि मांड्या चोळल्यासारखे करावे कि झाली नौली. एखाद्या दुखण्यात लोक अगदी हिरीरिने सांगतात, डॉक्टर एकदम चांगला आहे. काहीही खायला प्यायला बंदी केली नाही. पाहिजे ते खा. पथ्य पाळायला सांगाणारा कुणालाच आवडत नाही. तसेच प्राणायाम करताना आजकाल शिकवणारेच घाईघाईने सांगतात पद्मासन करण्याची गरज नाही. त्यावेळी शिकणार्‍याच्या चेहर्‍यावरचा आनंद तर हाताने गोळा करता येईल इतका दाट असतो. कष्ट करायचे नाहीत. सारे काही हसत खेळत. योगगुरु अय्यंगार म्हणे पश्चिमोत्तानासन शिकवताना विद्यार्थ्याच्या मागे जाऊन त्याच्या पाठिवर आपला गुडघा रोवीत असत. हा कठोरपणा कदाचित सर्वांनाच झेपेल असे नाही. पण अतिसुलभीकरणामुळे बागेत बसुन हा तथाकथित योगाभ्यास झाला कि टकलावर केस उगवण्यासाठी किंवा असलेले पांढरे केस काळे करण्यासाठी नखांवर नखे घासणारी मंडळी आता दिसु लागली आहेत. येथेही सर्वसमावेशकता आहेच. हे सर्व झाल्यावर हसीं का जोरदार ठहाका आणि कदाचित बाहेर पडल्यावर कडुनिंब, दुधी यांचे रसप्राशन.

हे सर्व विवेचन करण्याचे कारण म्हणजे योगदिनाच्या उकळत्या देशभक्तीच्या आणि प्राचिन परंपरेच्या अभिमानाच्या निमित्ताने "योग घरोघरी पोहोचला आहे" असे जेव्हा सर्वजण म्हणतात त्याचा अर्थ तो अतिसहज करुन, त्यातील नियमांकडे दुर्लक्ष करुन, आपल्या सुखासीन आयुष्याला सजेसे असे रुप त्याला देऊन लोक योगाभ्यास करु लागले आहेत हे न विसरलेले बरे. योगदिन साजरा करण्यात काहीच गैर नाही. पण त्या निमित्ताने या प्राचिन विद्येला लागलेली अतिसुलभीकरणाची किड कशी नाहीशी करता येईल याचा विचार होणे आवश्यक आहे असे मला वाटते.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख!
पण आता उत्तम योगशिक्षक कसा असावा आणि उत्तम योगशिक्षण कसे असावे याचेही विवेचन येऊ द्या.

आवडलं आणि पटलं।
फक्त {शिक्षकांनी संस्कार करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मुलांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला नव्हे काय? त्यापेक्षा प्रत्येक शाळेत कोमल मनांना समजुन घेणारा समुपदेशक हवा. अभ्यास कसा हसत खेळत व्हायला हवा.} हे. नाही पटलं.
योगदिनाच्या निमित्ताने तुम्ही त्यातल्या सुलभीकरणाबद्दल लिहिताय. पण योगदिन एका इव्हेंटफलीकडे काही ठरेल का?

जेव्हा 'शास्त्रोक्त' जमत नाही त्यावेळी 'शास्त्रापुरते' करावे लागते. खेड्यात पुजेच्या वेळी एखादी गोष्ट नसेल तर सांगतात काका घ्या 'चालतं' करुन. धर्मसंकटात अशा 'चालत करुन' चा आधार सर्रास घेतला जातो

घाटपांडे, सहमत.

लेख पटला आणि 'अतिसुलभ योगा' हा पुढे स्टँडर्ड योगा बनू नये हे खरं पण जिम कार्डिओ झुंबा च्या जास्त पॉप्युलर ट्रेंड मध्ये योगा हा पनिशमेंट सारखा राबवून एखाद्याला १० दिवस फक्त पद्मासनाचा सराव करायला लावला आणि ते येत नाही म्हणून पुढे जाणं नाकारलं तर लोक यापासून जास्त दूर जातील.

'योगा नीट स्पेक्स प्रमाणे कराल तरच फायदे' हा डिसक्लेमर शिक्षक देऊ शकेल, पण 'असेच करणे जमवा नाहीतर गेलात उडत' असा असेल तर १०% सोडून बरेच जण उडत झुंबा/अंजली मखिजा/अंजली मुखर्जी डायट्/अ‍ॅरोबिक्स्/फॅट कटर/ग्रीन कॉफी पिल्स्/हर्बालाईफ कडे जाणं पसंत करतील.

'स्ट्रिक्ट योगा' आणि 'लिनीयंट योगा' असे दोन प्रभाग करता येतील, स्कॉलर बॅच आणि नॉर्मल बॅच सारखे.ज्याला ज्यात जायचं आणि ज्यात बसतो त्यात जाईल.

माझ्या नशिबाने मला कसलाही बेशिस्तपण आणि शॉर्टकट खपवून न घेणार्‍या योगशिक्षिका भेटल्या. त्यांनी मला कुंभकातले प्राणयाम शिकवले. २ महिने नुसती आसनं करून शरीर पुरेसं लवचिक, आणि पद्मासनबैठक पक्की झाली आहे याची खात्री केल्यावरच प्राणाया शिकवले, तेही कुंभकातले! त्यामुळे तुमचा वरचा लेख अगदी अगदी पटला. सुप्त वज्रासन, उड्डीयान बंध लावणं वगैरे किचकट गोष्टी वेळ घेऊन शिकवल्या-शिकल्या पाहिजेत. नुसते इकडे तिकडे हात पाय हलवून आणि अनुलोम-विलोम, कपालभातीच काय तो उरकून योगाभ्यस होत नाही.

Agree.

पूर्णतः सहमत.
आमच्या बॅच मधेही थोडे वॉर्मिंग अप, थोडे प्रणायाम व थोडी आसनं असंच घेतात. त्यात परत व्हेरिएशन्स, अप डाऊन व वेगवेगळाली पोश्चर्स. हे खरे योगा नसेलही, पण हेही नसे थोडके, म्हणून करतो.

पटला लेख. प्रत्येकाने खडतर योगच करावा असं नाहीय, पण जे काही कराल ते नीट करावे. उगा वाकल्यासारखं करायचं नी कुठलंतरी आसन केलं म्हणायचं. चुकीचं वाकलात की कायतरी मुरगळलं नी दुखलं म्हणून तो प्रकारच सोडून द्यायचा! मजा असते एकएक.

लेख अतिशय पटला. पण एकीकडे हे ही वाटतंय की मुळात लोकांना योगाभ्यासाकडे वळवणे हे आधी महत्वाचे आहे.

<<खरं तर घरगुती वातावरणात चालवले जाणारे हे वर्ग आणि वर्षानुवर्षे एकाच शिक्षकाडुन मिळणारे वैयक्तीक मार्गदर्शन, एखाद्या फॅमिली डॉक्टरला असावी तशी योगशिक्षकाला असलेली विद्यार्थांची माहिती, मनात साचलेलं दु:ख किंवा अडचण योगशिक्षकाला सांगुन आपले मन हलके करण्याची असलेली सोय या पारंपरिक वर्गाच्या जमेच्या बाजु. अनेक योगशिक्षक हे कळत न कळत समुपदेशकसुद्धा झालेले मी पाहिलेत. <<<

अगदी हेच अनुभवलं! नुकतेच नाशिक/त्रिंबकेश्वर जवळ पिंपळद येथे डोंगराच्या कुशीत असलेल्या पिंपळद या गावी विवेकानन्द केन्द्रातर्फे होणारे १५ दिवसाचे योग शिबीर अटेन्ड करुन आल्याने सगळ्या आठवणी ताज्या आहेत. १८ ते ६५ वयोगटातळे आम्ही ३० जण होतो. योगशिक्षिका अतिशय समंजस, प्रत्येकाच्या व्यक्तिगत अडचणी ओळखून, कुणालाही न दुखावता वैयक्तिक उत्तेजन देऊन उत्तम मार्गदर्शन करणार्या होत्या.(एक दोन मानसिकरित्या डीस्टर्ब्ड मुलीन्मधे पहिल्या ८ दिवसातच आश्चर्यकारक बदल घडुन आले...हा अनुभव फारच सुखावह होता) १५ दिवसात योगासन, सूर्यनमस्कार, प्राणायाम, धारणापद्धती, आवर्ती ध्यान, ओंकार ध्यान, जलनेती, वमन , या क्रियांद्वारे शारीरिक , मानसिक अश्या सर्वांगीण विकासावर भर होताच. त्याचबरोबर, योगिक जीवनशैली, पंचमहायज्ञाचा खरा अर्थ, भारतीय संस्कृतीचे पाठ, श्रीमद्भगवद्गीता, संस्कृत श्लोकातील / वेदातील उच्चारपद्धती, विवेकानंदाचे तत्वज्ञान याचाही अभ्यास झाला. संध्याकाळी टीमबिल्डीन्ग वर आधारित सामूहिक खेळ होते. या सर्वांमुळे मानसिक शांतीचा लाभ झालाच आणि तिथल्या वास्तव्यात एक प्रकारची सकारात्मकतेचा अनुभव आला.

तुम्ही म्हणता तसं, केवल कुंभक/ बाह्यकुंभक स्थिती म्हणजे सहजगत्या होणाऱ्या कुंभक स्थिती पर्यंत शिकवले. पण या सहजगत्या होणार्‍या कुम्भकाचा अनुभव ही खुप छान होता.
मुळात योगासने ही कुठेही शरीराला अनावश्यक ताण न येता जेवढी सहजतेने शक्य होतील तेवढीच करायची असतात हे समजले. योगासनात मुख्यतः: अंतिम स्थिती जास्तीत जास्त काळ मेंटेन करण्यास महत्व आहे हे समजले.

एकदम मार्मिक लेख.

योगवर्गाला येणार्‍यांपैकी ९०% लोक हे चाळीशी पार केलेले असतात. या वयात बहुतेकांची शरीरे rigid झालेली असतात. त्यामुळे सुलभीकरण आवश्यकच आहे. आसनांच्या बाबतीत तर ते अत्यंत गरजेचे आहे - 'स्थिरं सुखं आसनं' असे पतंजली मुनींनीच सांगून ठेवलय. आपल्याला सुखप्रद होईल इतपतच आसनाच्या अंतीम स्थीतीत जायचा आणि रहायचा प्रयत्न करायचा असतो.

पण कपालभातीनंतर अनुभवास येणारा केवलकुंभक, पुरक-रेचक यांचे १:२ गुणोत्तर अशा सहजसाध्य गोष्टींकडेही दुर्लक्षच केले जाते, खूर्चीवर बसून ऊड्डीयान लावला जातो, खाण्याच्या सवयींवर नियंत्रण आणले जात नाही. हे सगळे बघितल्यावर असा योग करणार्‍यांना नक्की काय फायदा होणार आहे असा पश्न सहाजीकच पडतो.

@मंजुताई, वरदा, हार्पेन, झिंगाट - प्रतिसादाबद्दल खुप खुप आभार Happy

@साती - प्रतिसादाबद्दल आभार Happy
योगाभ्यासाच्या बाबतीत माझे स्वतःचेच डोळे फार उशीरा उघडले त्यामुळे उत्तम शिक्षक आणि विद्यार्थ्याबद्दल लिहिण्याचा मला अधिकार आहे असे वाटत नाही. पण योगवर्गातील योगाभ्यास ही तीन भागांची एक मालिका लिहिली होती.

@भ्रम - प्रतिसादाबद्दल आभार Happy इवेंट म्हणुन जरी योगदिन झाला तरी हरकत नाही. मात्र त्या निमित्ताने त्यावर चर्चा व्हायला हवी असं मात्र वाटतं.

@प्रकाश घाटपांडे - प्रतिसादाबद्दल आभार घाटपांडेकाका. खरं तर पूर्व सुलभ, सुलभ अशा पायर्‍या योगात उपलब्ध आहेत. पण अलिकडे लोकांना तेवढा दम राहिलेला नाही. त्यामुळे काहीतरी करुन "चालवुन" घेण्याचा प्रकार सुरु आहे.

पहिला संपूर्ण परिच्छेदात तुम्हाला ज्या गोष्टीवर लेखातभर द्यायचाय, ते सोडून (ज्याला इतरांनी/ तुम्ही केलेल्या रिसर्चचं पाठबळ असेल असं न वाटणारी, असेल तर रेफरन्स न देता केलेली) जनरल विधानं अजिबात आवडली नाहीत. नंतर बिक्रम योगा, पॉवर योगा नंतर झुम्बा इ. ला नावे ठेवणे. या सगळ्याने प्रचंड निगेटिव्ह एनर्जी तयार होत गेली. तुम्ही म्हणताय ते बरचसं पटण्यासारख आहे, पण ४ मुख्य परिच्छेदांच्या लेखात खूप जास्त मुद्दे आणि सरमिसळ जाणवली.

तुम्ही चिडून लेख लिहीलायात असं वाटलं. राग मानू नये. क्षमस्व.
“Everything should be made as simple as possible, but no simpler.” - Einstein

@ mi-anu - प्रतिसादाबद्दल आभार.

'योगा नीट स्पेक्स प्रमाणे कराल तरच फायदे' हा डिसक्लेमर शिक्षक देऊ शकेल, पण 'असेच करणे जमवा नाहीतर गेलात उडत' असा असेल तर १०% सोडून बरेच जण उडत झुंबा/अंजली मखिजा/अंजली मुखर्जी डायट्/अ‍ॅरोबिक्स्/फॅट कटर/ग्रीन कॉफी पिल्स्/हर्बालाईफ कडे जाणं पसंत करतील

मी खरं सांगु का, याबद्दल माझी मतं सिनिकल वाटावीत इतकी टोकाची आहेत. तुम्ही म्हणताय तसं खरोखर झालं आणि कसोटीला टिकणारी फक्त १०% माणसं योगाच्या वाट्याला आली तर योगाचं फार भलं होईल असं माझं प्रामाणिक मत आहे.

लेख पूर्ण वाचला कालच.
प्रतिसाद एकही वाचला नाहीये (वेळ अपुराहे)
लेखातील कळकळ जाणवली, काही अंशी पटलीही, पण तरीही विषयाशी पुर्ण सहमत होऊ शकत नाही. मात्र विषय बरोबर आहे, व या दृष्टीनेही विचार होणे गरजेचे आहेच हे मान्य.

माझ्या मते, एखादा किचकट (कित्येकदा सोपाही) विषय "तथाकथित जनसामान्यांपर्यंत" पोहोचविण्यासाठी त्याचे अतिसुलभीकरण केले जाते जे बरेचदा "विकृततेकडे" वळते हे शब्दशः मान्य. याचे उत्कृष्ट उदाहरण माझेपाशी आहे ते म्हणजे देवनागरी लिपी शिकवताना "अर्धी वाटी, उभी वाटी, दांडी" अशी अक्षरांचि मोडतोड करुन अक्षरे काढणे शिकवले जाते, त्या सुलभीकरणाविरुद्ध आमचे आईने खूप आधीच सलग पेन्सिल टेकवली की ते वळण, ते अक्षर पूर्ण पणे काढायला शिकवलेले होते, अन जेव्हा शाळेतील बाई तक्रार करु लागल्या की अहो हा सांगितल्याप्रमाणे अर्धीवाटी वगैरे काढत नाही ( सलग काढतो) तेव्हा आईने आख्ख्या शिक्षण खात्याचा उद्धार भर शाळेत केला होता , तिचे सर्व भाष जसेच्या तसे देणे शक्य नाहि, पण तथ्यांश असा होता की अहो मी त्याला अडीच वर्षाचा असल्यापासुनच शिकवले आहे सलग अक्षर काढायला, तर तुमच्या इथे बाकीच्यांना समजत नाहि म्हणूनच्या पद्धति आता त्यावर का लादता? असो. इथे एका गोष्टीची काळजी वाटली ती म्हणजे "जनसामान्यांना" नीट पणे समजावुन सांगितले तरी समजणारच नाही हे गृहितक गैर आहे. अन म्हणुन त्या त्या कृतिचेही यांत्रिकीकरणाप्रमाणे तुकडेकरण करुन अतिसुलभीकरण करण्याचि घातक प्रथा शिक्षण क्षेत्रात सर्वदूर पसरली आहे.

तरीही मी म्हणू इच्छितो, की योग सारखा विषय, जो जनसामान्यांना उण्यापुर्‍या पंधरावीस वर्षांपर्यंत परिचयाचाही नव्हता, त्याचा परिचय घडविण्यास काही विशिष्टच निवडक आसने सुलभरित्या सादर करुन "योगाची" प्रसिद्धी व प्रसार होत असेल, तर ते होणेही अपरिहार्यच आहे, अन्यथा पूर्वीच्या काळच्या संगितातल्या "निवडक घराण्यांच्या गायनशैलीप्रमाणे' ही विद्याही कालौघात नष्ट होऊ शकते.

दुसरे असे की, शाळेत पूर्वापार करीत असलेल्या पीटीच्या तासातील "हातवारे" हे देखिल मी योगाचेच सुलभीकरण केलेले प्राथमिक रुप मानतो. व आजही अगदी जिम मधिल व्यायाम केला तरि तेव्हांचे ते प्राथमिक शाळकरी मुलांकडुन करवुन घेतले जाणारे व्यायाम प्रकार (हातवारे) मी आजही करतो, ज्यामुळे मला फायदाच होतो आहे असे अनुभवास आले आहे.

एक सावधगिरिची सुचना, म्हणून वरील अतिसुलभीकरण्याच्या विषयाकडे बघावे लागेल, व तारतम्य ठेवुनच अतिसुलभीकरण करावे वा नाही, केले तर कोणत्या विषयात/बाबित, व किती मर्यादेपर्यंत करावे हे ठरवावेच लागेल.

एक नक्की की, कोणत्याही विषयात "मास्टरी" हुकमत मिळवायची असेल, त्या त्या विषयातील अत्युच्च्य स्थितीपर्यंत पोहोचायचे असेल, तर बौद्धिक व शारिरीक "कष्टाला " पर्याय नाही. तिथे सुलभीकरण वगैरे काहिही नाही.

अतुलजी,
योग्याभ्यासावरच्या प्रेमामुळेच तुमची चिडचिड होत आहे आणि ते योग्यच आहे.

मात्र जर योगाभ्यासाचे नियम अगदी कडक ठेवले तर दहा टक्के उत्तम अभ्यासक बनतात, नव्वद टक्के योगापासून दूरच राहातात.

जरी योगाभ्यासाचे नियम शिथिल केले तरी वर नमूद केलेले दहा टक्के कायम व्यवस्थितच योगाभ्यास करतात. त्यांना त्यांच्या अभ्यासाची फळं चाखायला मिळतातच.

शिवाय आणखी पन्नास टक्के जमेल तितपत योगासनं करतात आणि त्यांना थोडाफार फायदा मिळतो. मिळालेला फायदा बघून यातले दहा टक्के व्यवस्थित अभ्यास करायला सुरू करतात.

वीस टक्के अतिसुलभ योगासने करतात. मात्र अतिसुलभ व्यायाम करणारे कुठलाच व्यायाम फार दिवस करीत नाहीत. थोड्याच दिवसात नवीन फॅडकडे प्रयाण करतात.

उरलेले वीस टक्के कधीच कुठल्याच व्यायामाकडे वळंत नाहीत.

तात्पर्य काय, तर सुलभीकरणानी Greatest good of the greatest number हासिल होतं असा अनुभव आहे.

अतिसुलभीकरण हा सुलभीकरणाचा वाईट पण अपरिहार्य साइड इफेक्ट आहे असं म्हणून कानाडोळा करणं बरं.

स्वीटटॉकर, अगदी अगदी.... Happy पटले.
[आता फक्त माबोवरिल काहि अतिशहाण्यांनी येऊन तुम्हाला विचारु नये म्हणजे झाले की वरील टक्केवारीला "पुरावा/स्टॅटिस्टिकल डाटाबेसचा आधार" काये? तुम्ही कुठे कुठे फिरुन ही आकडेवारी गोळा केलीत... वगैरे वगैरे... काये ना आपल्याकडे शन्कासूर जरा जास्तच आहेत. Proud ]

माझे लहानपण ज्या भागात गेले तिथे ३० वर्षापुर्वी साधारण प्रत्येक लहान मूल तालमीत जात असे. संध्याकाळी अजून काही करणे माहिती नव्हते. बर्‍याचश्या तालमीत लहान मुलांसाठी योगासने शिकवत. आता त्यातले काही जण खरेच योगाभ्यास करू लागले असतील मात्र बहुसंख्यांना योगासने आयुष्यभरासाठी मिळाली. हे सुलभीकरण आहे का? असेल तर याने नेमकी काय हानी झाली?
दुसरा मुद्दा म्हणजे हे सुलभीकरण आजच वा गेल्या ५०वर्षात सुरू झाले आहे की पुर्वापार चालूच आहे?
ज्यांनी योगाभ्यास केला त्यांना या लहानपणच्या सुलभीकरणाने थोडा तरी पुश मिळाला असावा. कदाचित १० पैकी ८ जणांनी योगाभ्यास केलाच असता लहानपणी योगासने शिकले नसते तरी.
पण ज्यांनी योगाभ्यास केला नाही त्यांना किमान थोडी योगासने, सूर्यनमस्कार हे 'व्यायामप्रकार' तर जमू लागले, करता आले.

तुमच्या लेखातून असे जाणवते आहे की तथाकथित 'योगाभ्यास' सुलभ झाल्यामुळे प्रत्येक जण स्वत:ला साधक म्हणवून घेतोय त्यामुळे जे खरे अभ्यासक/साधक आहेत त्यांच्या प्रत्यत्नांचे व साधनेचे मूल्य कमी होत आहे.
हे म्हणणे म्हणजे मी धृपद धमार चा आयुष्यभर ध्यास घेऊन अभ्यास केला मात्र सिनेसंगीतकारांनी सुलभीकरण करून जास्त पैसे / नाव कमावले. त्यामुळे सिनेसंगीत बंद करावे वा त्याला संगीत म्हणू नये. सरकारने जरी कायदा पास केला की उद्यापासून सिनेमातल्या संगीताला संगीत म्हणू नये म्हणुन लोकं थोडी ना धृपद ऐकायला गर्दी करणार?

तुमच्या लेखातून असे जाणवते आहे की तथाकथित 'योगाभ्यास' सुलभ झाल्यामुळे प्रत्येक जण स्वत:ला साधक म्हणवून घेतोय त्यामुळे जे खरे अभ्यासक/साधक आहेत त्यांच्या प्रत्यत्नांचे व साधनेचे मूल्य कमी होत आहे.

अरे देवा! टण्या खरंच तुम्हाला माझ्या लेखातुन असं जाणवलं? मला आता माझ्या लेखनाची पद्धतच बदलायला हवी त्यातुन असं जाणवत असेल तर.

हे म्हणणे म्हणजे मी धृपद धमार चा आयुष्यभर ध्यास घेऊन अभ्यास केला मात्र सिनेसंगीतकारांनी सुलभीकरण करून जास्त पैसे / नाव कमावले. त्यामुळे सिनेसंगीत बंद करावे वा त्याला संगीत म्हणू नये.

हे वाचल्यावर मला माझ्या लेखाची (आणि स्वतःची देखिल) दया येऊ लागली आहे.

स्वीट टॉकर + टण्या >> +१
ज्यांना खरचं जमत नसेल त्यांना थोडी सुलभ योगासन शिकवलं तर फारसं नुकसान होणार नाही .
जे निष्णात असतील त्यांचीच चीड्चीड होत असेल , राग आवरत नसेल तर ' योगाभ्यास' कुठेतरी कमी पडतोय.

ज्यांना खरचं जमत नसेल त्यांना थोडी सुलभ योगासन शिकवलं तर फारसं नुकसान होणार नाही

दुसर्‍या परिच्छेदात आहे हे.

Pages