योगविद्या, अतिसुलभीकरणाचा बळी (योगदिनाच्या निमित्ताने)

Submitted by अतुल ठाकुर on 20 June, 2016 - 02:53

spa21.jpg

जमाना गोंजारण्याचा आहे. कमीतकमी त्रास करुन घेण्याचा आहे. खरं म्हणजे कमीत कमी का म्हणुन? कसलाच त्रास नको. शाळा नकोत. शाळा असतील तर भिंती नकोत. दोन्ही असतील तर निदान अभ्यास तरी नकोच. दुर्दैवाने तो करावा लागलाच तर परीक्षा नकोतच. परीक्षा असली तर पास नापास असणार. मग आळशी विद्यार्थ्यांच्या कोमल मनावर परिणाम होणार. शिक्षकांनी संस्कार करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मुलांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला नव्हे काय? त्यापेक्षा प्रत्येक शाळेत कोमल मनांना समजुन घेणारा समुपदेशक हवा. अभ्यास कसा हसत खेळत व्हायला हवा. बाकी अलिकडे मुक्तांगणसारख्या व्यसनमुक्ती केंद्रात सगळे वॉर्ड मिळुन दाखल झालेल्या मुलांची संख्या पाहिली तर खास त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्ड काढता येईल इतकी असते आणि दाखल करताना रडुन भोकांड पसरणारी, हातपाय झाडणारी, चावण्याचा प्रयत्न करणारी ही बाळे व्यसनासाठी पैसे मिळवताना आईवडिलांच्या डोळ्यात महिनोनमहिने धुळ फेकण्याइतकी कोमल मनाची असतात हे येथेच नमुद केलेले बरे. तर लिहिण्याचा उद्देश हा कि या "हसतखेळत" पणाचे लोण सगळीकडे पोहोचले आहेत. त्याला योगासारखे कमाईचे कुरण मोकळे कसे राहणार? या "हसतखेळत" च्या आग्रहाने या प्राचिन विद्येचे जे काही नुकसान झाले आहेत त्याचा जमाखर्च या लेखात मांडण्याचा उद्देश आहे. योग दिनाच्या निमित्ताने जगभर सनईचौघडे वाजत असताना आम्ही लावलेला विसंवादी सूर अनेकांना न रुचण्याचा संभव आहे. पण गालिच्याखाली कचरा दडवुन सारे काही आलबेल आहे हे सांगण्याइतका "हसतखेळत"पणा मजजवळ नाही. या लेखनाचा सूर जुने ते सोने असा आणि परंपरावादी वाटला तर त्याला इलाज नाही. मात्र तसा तो वाटु नये असा माझा प्रयत्न राहिल.

सुलभीकरणाचे स्वतःचे एक महत्त्व असते ते नाकारण्यात अर्थ नाही. किंबहुना काही बाबतीत ते आवश्यकदेखिल असते. योगासारख्या विषयात तर त्याचे महत्त्व फारच आहे. उदा. सुप्तवज्रासनासारखं आसन. ज्यात आधी वज्रासनात बसावं लागतं. त्यानंतर हळुहळु एक एक हात मागे घेऊन पंजा जमिनीवर टेकवायचा. हे करताना बोटं पुढच्या बाजुला ठेवायची. मग हळुहळु मागे जात कोपरं जमीनीवर टेकवायची. मग वज्रासन न हलवता पाठीवर झोपायचे. अशाअर्‍हेचे आसन करताना सुलभीकरण आवश्यकच आहे. गुरुवर्य निंबाळकरांसारख्यांनी आधी फक्त वज्रासनावर भर दिला. कारण बहुतेकांना तेच जमत नाही. त्यातही सुलभ वज्रासन. घोटे दुखु लागले तर त्याखाली मऊ टॉवेल घ्या. मग पूर्व सुलभ सुप्त वज्रासन. फक्त हात मागे घ्यायचे. असा काही दिवस अभ्यास झाल्यावर पुढची पायरी सुलभसूप्तवज्रासन. यामुळे वृद्ध, कडक शरीर असलेली, जास्त वजन असलेली मंडळीसुद्धा नाराज न होता पायरी पायरीने पूर्ण आसन करण्याचा प्रयत्न करतात. प्राणायामाचेही तसेच. विवेकानंदकेंद्रासारख्या संस्थेने तर कुंभक, म्हणजे श्वास रोखणे हे ठेवलेच नाही. ते फक्त पुरक आणि रेचकच करतात. रेचक केल्यावर सहजपणे जो बाह्यकुंभक घडतो त्यावरच त्यांचा भर असतो. याचा अर्थ हा कि सुलभीकरण काही एका टप्प्यापर्यंत आवश्यकच नव्हे तर योग शिकण्याच्य्या दृष्टीने ते अपरिहार्यदेखिल आहे. मात्र येथे ज्या सुलभीकरणाचा विचार केला आहेत त्याचा योगाच्या बाजारीकरणाशी देखिल थोडा संबंध आहे. कुठलीही गोष्ट एकदा "मार्केट"शी जोडली गेली कि त्याला आकर्षक रुप देणे आले आणि त्याबरोबर ती जास्तीत जास्त विकली कशी जाईल हे पाहणे आले. या दृष्टीने आधुनिक जिम्स मध्ये योगाचे मार्केटींग कसे होते ते पाहणे मनोरंजक ठरेल.

मुळात योग ही एक जीवनशैली आहे, योगाला काही हजार वर्षांची परंपरा आहे, योगाचे स्वतःचे वेगळे असे तत्त्वज्ञान आहे, त्याचे प्राचिन साहित्य आहे, काही प्रमाणभूत असे ग्रंथ आहेत, निरनिराळ्या शाखा आहेत याचा या दिशेला पत्ताच नसतो. जिम्स मध्ये योग हा पॅकेज डिल मध्ये असतो. म्हणजे असं कि अलिकडे लोकांना सर्वसमावेशक विचार करण्याची सवय जडली आहे. सर्वात महत्त्वाचे हार्ट, मग त्यासाठी चालणे, जॉगिंग किंवा रनिंग. पण शरीर पिळदार तर दिसायला हवेच. त्यासाठी वेट ट्रेनिंग. मग लवचिकपणा तर हवाच, त्यासाठी "योगा". पुढे हे सारं केल्यावर व्यायाम कम रेक्रिएशन म्हणुनही असेल कदाचित, झुंबा कि ठुंबा सारखा डान्स. हे सारं एका पॅकेजमध्येच असतं. कंप्युटर प्रोग्रामिंगच्या कोर्समध्ये सी, सी++, जावा, ओरॅकल सर्व एकत्र असावं तसंच हे देखिल. त्यातही योगविद्येसाठी काही नियम आहेत. आसने प्राणायाम कधी करावेत, काय आधी काय नंतर करावं, वेट ट्रेनिंग, धावणे, पळणे केल्यावर योगाभ्यास करावा कि नाही? केल्यास त्या दोन्हीत किती वेळाचे अंतर असावे याची कितपत माहिती हे सर्व एकाचवेळी करणारांना आणि शिकवणारांना असते ते एक भगवान पतंजलींनाच ठावुक. त्यातही येथे शिकवला जाणारा 'योगा" हा पारंपरिक असण्याची शक्यता कमीच. तो पॉवर योगा, बिक्रम योगा अशासारखं काहीतरी असणार. म्हणजे वाफाळलेल्या खोलीत योगा करुन घाम काढणे, सूर्यनमस्कारासारखे काहीतरी करणे यासारखं काहीही असु शकतं. हे झालं आधुनिक जिम्स मध्ये. पण आपल्या नेहेमीच्या योगवर्गाची कथा तरी काय वेगळी आहे?

खरं तर घरगुती वातावरणात चालवले जाणारे हे वर्ग आणि वर्षानुवर्षे एकाच शिक्षकाडुन मिळणारे वैयक्तीक मार्गदर्शन, एखाद्या फॅमिली डॉक्टरला असावी तशी योगशिक्षकाला असलेली विद्यार्थांची माहिती, मनात साचलेलं दु:ख किंवा अडचण योगशिक्षकाला सांगुन आपले मन हलके करण्याची असलेली सोय या पारंपरिक वर्गाच्या जमेच्या बाजु. अनेक योगशिक्षक हे कळत न कळत समुपदेशकसुद्धा झालेले मी पाहिलेत. ज्याचा फायदा निश्चितपणे विद्यार्थ्यांना होतो. पण आता इथेही "धंदा" येऊन चिकटला आहे. काहीवेळा हळदीकुंकु, सहली, वाढदिवस यांसारख्या कार्यक्रमाचे स्वरुप पाहता या योगवर्गांना कळतनकळत "क्लबज्"चे स्वरुप येऊ लागले आहे कि काय असे वाटत राहते. वर्षानुवर्षे तेथे येणार्‍यांच्या आसनांमध्ये फारशी प्रगती किंवा सुधारणा दिसत नाही. त्याची करणार्‍यांना आणि शिकवणार्‍यांना खंत नसते. एखादी सवय असल्यासारखी मंडळी तेथे येतात. कदाचित सर्वसमावेशक व्यायाम आपण घेतला पाहिजे म्हणुन तिथुनच जिमलाही जात असतील. त्यातुन टिव्हीवर योगाचे कार्यक्रम पाहुन येणारे तर चमत्कारिकच असतात. त्यांना ताबडतोब प्राणायाम आणि ध्यान शिकायचं असतं. बाजुला मोबाईल ठेऊन योगाभ्यास करायचा असतो. कानात हेडफोन खुपसुन म्युझिकचा आनंद घेत योग करण्याचे दिवस दूर नाहीत, किंवा ते सुरुही झालं असेल. परंपरेप्रमाणे आधी आसने, त्यामुळे होणारी शरीरशुद्धी, त्यानंतर प्राणायाम आणि अशा टप्प्याने तयार झालेल्या शरीर, मनाच्या आधारे ध्यान असा हा क्रम असतो. पण लोकांना तेवढा दम राहिलेला नसतो. ते असल्या पायर्‍यांची पत्रास बाळगत नाहीत. एकदम समाधी साधायची असते त्यांना. दुर्दैवाने अजुनही निसर्गाला ही घाई मंजुर नसावी. अजुनही पोटात बाळ नऊ महिने वागवावंच लागतं.

या सुलभीकरणाने झालंय हे कि आता बागांमध्ये जिकडेतिकडे योगसाधक दिसु लागलेत. चालावे, धावावे, मग दगडी बाकावर बसुन कसलेही आसन न लावता तसेच पाय खाली सोडुन आजुबाजुला येणार्‍या जाणार्‍या प्रेक्षणिय गोष्टी निरखीत फूर्र फूर्र करीत एकेक नाकपुडी बंद उघड करीत अनुलोमविलोम करावा. मग करायला अत्यंत कठिण अशी नौली सर्वांनी एकत्र करावी. म्हणजे उड्डीयान लावण्याची गरज नाही. दोन्ही हातांचा जोर वाकुन गुडघ्यावर देऊन पोटाचे मधले स्नायु पुढे आणण्याची गरज नाही. तो दाब कमी जास्त करीत नौली फिरवण्याची गरज नाही. फक्त वाकुन गुडघे आणि मांड्या चोळल्यासारखे करावे कि झाली नौली. एखाद्या दुखण्यात लोक अगदी हिरीरिने सांगतात, डॉक्टर एकदम चांगला आहे. काहीही खायला प्यायला बंदी केली नाही. पाहिजे ते खा. पथ्य पाळायला सांगाणारा कुणालाच आवडत नाही. तसेच प्राणायाम करताना आजकाल शिकवणारेच घाईघाईने सांगतात पद्मासन करण्याची गरज नाही. त्यावेळी शिकणार्‍याच्या चेहर्‍यावरचा आनंद तर हाताने गोळा करता येईल इतका दाट असतो. कष्ट करायचे नाहीत. सारे काही हसत खेळत. योगगुरु अय्यंगार म्हणे पश्चिमोत्तानासन शिकवताना विद्यार्थ्याच्या मागे जाऊन त्याच्या पाठिवर आपला गुडघा रोवीत असत. हा कठोरपणा कदाचित सर्वांनाच झेपेल असे नाही. पण अतिसुलभीकरणामुळे बागेत बसुन हा तथाकथित योगाभ्यास झाला कि टकलावर केस उगवण्यासाठी किंवा असलेले पांढरे केस काळे करण्यासाठी नखांवर नखे घासणारी मंडळी आता दिसु लागली आहेत. येथेही सर्वसमावेशकता आहेच. हे सर्व झाल्यावर हसीं का जोरदार ठहाका आणि कदाचित बाहेर पडल्यावर कडुनिंब, दुधी यांचे रसप्राशन.

हे सर्व विवेचन करण्याचे कारण म्हणजे योगदिनाच्या उकळत्या देशभक्तीच्या आणि प्राचिन परंपरेच्या अभिमानाच्या निमित्ताने "योग घरोघरी पोहोचला आहे" असे जेव्हा सर्वजण म्हणतात त्याचा अर्थ तो अतिसहज करुन, त्यातील नियमांकडे दुर्लक्ष करुन, आपल्या सुखासीन आयुष्याला सजेसे असे रुप त्याला देऊन लोक योगाभ्यास करु लागले आहेत हे न विसरलेले बरे. योगदिन साजरा करण्यात काहीच गैर नाही. पण त्या निमित्ताने या प्राचिन विद्येला लागलेली अतिसुलभीकरणाची किड कशी नाहीशी करता येईल याचा विचार होणे आवश्यक आहे असे मला वाटते.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

I have seen my dad doing this stuff in front of TV, the way u mention.. I have seen him slim down tremendously, his tummy reducing and all his reports coming in better range or almost normal range from earlier scary reports.. I guess, doing it is like eating sugar - once in mouth its sweet always.
I of course understand, what you want to say. Ultimate aim of yogasan is not just physical well being, but is lot deeper and goes to self realization level, with the kind of approach my dad is following, it remakns on physical level and I guess that is what is bothering u , am I right? Even so, I guess he is achieving what he is aiming for..

>>> हे वाचल्यावर मला माझ्या लेखाची (आणि स्वतःची देखिल) दया येऊ लागली आहे. <<< Lol
अहो तुम्ही इतकेही "लोड" घेऊ नका टणटण्याच्या पोस्टचे..... Happy
तुमचा आक्षेप योग्यच आहे.
काये ना, की राजाच्या दरबारात जे शास्त्रीय गायन नृत्य होते, जितक्या अचुकतेची परमावधी गाठायचा तिथे प्रयत्न होतो, ते च गायननृत्य तथाकथित "जनसामान्यांमधे" येऊन पोहोचले की त्याचे लावणी पासुन तमाशापर्यंत विविध रुपे गाठली जातात, व शेवटी डान्सबारमधिल नृत्यांगनांच्या अंगाखांद्यावर नोटांच्या उधळपट्टी करण्यापर्यंत "चीप" खालचा स्तर गाठला जातो. इतकेच काय, तर एखादी सुंदर ललना बघुन दोन बोटे तोंडात घालुन मारलेली शिट्टी हिणकस न ठरता पराक्रमाचे लक्षण ठरते... नै का?
तर हे असे होतेच, होणारच.
ज्यांनी त्यातिल पावित्र्य /अचूकता जपायचा ध्यास घेतला आहे, त्यांनी त्यांचा वसा /व्रत सुरु ठेवावा, बाकी तथाकथित श्रमजीवी वगैरे जनसामान्य "दर्शनमात्रे मन" नंतर हमखास "स्मरणेमात्रे मन" अशी भर घालतानाच दिसतिल.

सुरेख लिहिला आहे लेख.

मला तुम्ही स्काईपवर नौली शिकवू शकाल का प्लीज? मला नौली शिकायचीच आहे. बाकी इतर बरीच आसने येतात. पण नौली नाही शिकलो कधी कुणाकडून संधीच नाही मिळाली.

लोकांना जीम जास्त प्रिय झाला आहे. आणि बायसेप हवेतच.

अंशतः असहमत.योग प्रशिक्षणासाठी तुम्ही म्हणता ते योग्य आहे. पण रोजच्या सामान्य घरी करता येणाऱ्या योगासाठी सुलभ योग वाईट नाही.

सुलभसोपा योग मीसुद्धा करते आणि मला फायदा झाला आहे. लोक योग थोडा सोपा करुन शिकले तर बिघडल कुठे? जगाला शिकवायच असेल तर सोप्प करावच लागेल. आपल्या ह्याच वृत्तीने आपण आपल्या प्राचीन पद्धती नष्ट केल्या.आपण गोष्टि complicated करतो. मग लोक त्यापासुन दुर पळायला लागतात. नेमक ह्याच् गोष्टिचा फायद दुसर कुणीतरि घेत. मग आपण पुन्हा बोंबा मारत सुट्तो. अमक्यातमक्याने लावलेला शोध नवीन नसून तो तर आमच्या पुराणात आहे. तोपर्यंत तो दुसरा देश स्वतःच्या नावावर खपवून मोकळा होतो. बऱ्याच पाश्च्यात्य देशात योग हा चायनीज आहे असाच समज आहे. सुदैवाने तो समज दूर करण्याची संधी मिळाली आहे ह्या योग्य दिवसाच्या निमित्ताने.

आधीच चीनने हळदीचं patent मिळवलंय. योगाचा तस होऊ नये म्हणून आपणच जागरूक राहायला हवे.

सुलभीकरण काही एका टप्प्यापर्यंत आवश्यकच नव्हे तर योग शिकण्याच्य्या दृष्टीने ते अपरिहार्यदेखिल आहे. (परिच्छेद क्र.२)

माझ्या लेखातला दुसरा परिच्छेद कुणी वाचतच नाहीय बहुतेक. असो.

<कानात हेडफोन खुपसुन म्युझिकचा आनंद घेत योग करण्याचे दिवस दूर नाहीत, किंवा ते सुरुही झालं असेल>

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाच्या रंगीत तालमीत/सराव सत्रात रामदेव बाबांनी कैलाश खेरच्या लाइव्ह गाण्यावर लाइव्ह योगा पर्फॉर्म केला

जौद्या हो अतुलराव, यावरुन एक नक्की की तुम्ही लेखात अचूकरित्या नेमक्या मुद्यांना हात घातला आहे.

[अवांतर (क्षमस्व पण अगदीच रहावत नाहीये): मला तो वरचा फोटो आवडला. फक्त एक प्रश्न असा आहे, (उत्तरादाखल प्रयोग करुन बघायचा आहे कधीतरि जमले तर) की पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकुन त्यात डुंबताना शरिराला खरोखरच त्या पाकळ्यांमुळे काहि फायदा होतो की नाही? की केवळ दृष्टी सुख अन मनाचे समाधान? Lol
नै, या तरंगत्या गुलाबाच्या पाकळ्यांवर अजुन कोणा "समाजसुधारकांची" नजर वळलेली दिसलि नाहीये जशी एरवी ती योगा/आयुर्वेद/ज्योतिष वगैरेवर वळते, वळली असती तर दोन चार ज्ञानकण त्यांचेकडुनही मिळवले असते, नै का? Proud
यंदाच्या वविमधे पोहायला/डुम्बायला पाण्यात उतरल्यावर अशा गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्याचे आयोजक मनावर घेतिल काय? Wink ]

लिंबुजी, मी कधी पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकुन डुंबण्याचा प्रयोग केलेला नाही. त्यामुळे सांगता येणार नाही. तुम्ही प्रयोग करुन पाहताय म्हणता तर नक्की लिहा तुमचा अनुभव Happy

Pages