सैराट - रिव्यु (रीडः कौतूक)

Submitted by वैद्यबुवा on 10 June, 2016 - 16:29

पाहिला बॉ एकदाचा! अंमळ उशिरच झाला म्हणायचा बघायला. खरं तर बघायचा प्लन पण नव्हता आजिबात, असच टिपिकल स्टोरी असेल जरा चांगली गाणी असलेली म्हणून फार लक्ष नाही दिलं. पुढे थेट्रात पुढे जाऊन पबलिक नाचतय वगैरेचे व्हॉट्स अ‍ॅप विडियो यायला लागले आणि मसालाच आयटम दिसतोय असं मनोमन अधोरेखित झालं आणि नाद सोडून दिला.
मग आत्ता काही दिवसांपुर्वी माझे बेकरी फ्रेंड फारएण्ड ह्यांनी टिपापा ह्या ठिकानी येऊन नव्यानं एकदा सैराटच्या कौतूकाचं खातं उघडलं तेव्हा माझे कान परत वर गेले. मग पुढे बाकी इतर फ्रेंडांनी पण तीच री ओढली आणि ते टाकत असलेल्या पोस्टींमुळे माझ्या डोक्यात वातावरण तयार होऊ लागलं. निव्वळ ह्या पोस्टींमुळे मी सैराटची गाणी एकायला आणि पिकचर बघायला घेतला!
२-३ दिवसांपुर्वी सुरवातीची फक्त २० मिनिटं हा सिनेमा बघितला आणि मला त्या सिनेमानी खिशात घातलं! कित्येक दिवसांनी किंवा वर्षांनी एखाद्या पिकचरची झिंगं चढली असं झालं!!!
कुठल्या शॉट बद्दल अन कुठल्या गाण्याबद्दल किंवा कुठल्या एक्स्प्रेशननांबद्दल बोलावं अन किती बोलावं हेच समजेनासं झालय. लोकं आपापल्या अँगलनी सिनेमे बघतात, त्यांना त्यातून बरच वेगळं काही काही सापडतं आणि वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा सिनेमा त्यांना आवडतो.
एक सिनेमा म्हणून स्वतंत्रपणे तो पिकचर छान असला तरी माझ्याकरता तरी ह्या पिकचरनी काही केलं असेल तर कॉलेजच्या दिवसांपासूनचा पुढचा काही काळ मला अक्षरशः परत जगवून आणलय!

सुरवातीच्या मंजुळेंच्या कॉमेंट्री पासून जी काही एकेक प्रसंगांना सुरवात होते, माणूस त्यात हरवूनच जातो!
काय त्यांची ती कॉमेंट्री अन ते रखरखलेल्या उन्हातलं मैदान अन ते पॅविलियन, ते ढोल तडम ताशे वाले अन सरवात महत्वाचं म्हणजे मॅच सुरु असलेल्या दरम्यान त्या प्लेयरांचं एकेक बोलणं!
लंगड्याच्या "हे हलगथ कोन पाठवलं रे ." " मंग्या मंग्या आरं नीट खेळ मंग्या नीट खेळ!अरं बॉल बघाय आधी बॅट नगं न फिरवू" पासून पुढे परत मंगेश मोहिते पाटलांनी बॉल हुकवल्यवर त्याच्या संतापाचा अक्षरशः अंत होतो तेव्हा " मला खेळायचच नै जा..." म्हणून बॅट सोडून ऑल्मोस्ट तो चालायलाच लागतो हा प्रसंग त्यातली लंगड्याची तळमळ किती लोकांनी अनुभवलेली आहे? Lol कधी आपण लंगड्याच्या बोटीत शिव्या घालत असतो तर कधी कधी मंग्याच्या सुद्धा बोटीत कारण "अर किती फाष्टाक्तोय बघ्तोन तू?" असाही प्रसंग येऊन गेला असेलच (तुम्ही अगदी स्टार बॅट्समन नसाल तर नक्कीच येउन गेला असेल).
मधल्यामध्ये बिली बाऊडींग अन शकुना आत्याचा सीन पण खल्लास आहे! किती वेळा पोरं आया, आज्या बोंबल्त आल्याकी बॉल बॅट हातात जे असेल ते टाकून पळायचे. फोर सिक्सच्या अ‍ॅक्शन पण कहर आहेत! एकदम किडमिडीत अंगकाठी अन त्यावर बनियन, डोक्याला आधी फडकं अन मग त्यावर कॅप! पुर्वी अंपायर लोकं खुप वेळा तसं करायचे! निरिक्षण सॉलिड आहे मंजुळेंचं किंवा ज्यानी कोणी डिटेलिंग केल्य त्याचं.
पर्श्यानी आधी फोर सिक्स मारल्यावर लंगड्याच्या एकेक शिवीसुचक हातवारे (काही न बोलता नेमकी काय शिवी दिली हे लगेच कळतं Lol ) अन पुढे म्याच जिंकून दिल्यावर आडम तिडम मुद्दाम हारलेल्या टीम समोर केलेला नाच!
इतकं बारिक आणि चोख निरिक्षण म्हणजे काय चेष्टाय का राव? अन त्यापेक्षाही ते बरोबर शॉट मध्ये उतरवणं म्हणजे फार भारी! नागराज मंजुळेकी जय!

पुढे तात्यासाहेबांचं भाषण ज्यात खरं एक पुढे होऊ घातलेल्या काही गोष्टींना किती महत्व आहे हे अधोरेखित करणारं वाक्य आहे. "अहो तालुक्याचं राहुद्या आधी आपल्या बायका संभाळा म्हना ह्यांना..." असं ते म्हणतात.
थोडक्यात घरातल्या बाया/मुली ह्यांच्याशी स्वतःची अन घराण्याची इज्जत बांधलेली आहे ह्या टाईपची विचारसरणी असलेलं घर आहे. आणि हे बोलताना त्या सोनलताई का कोण असतात त्या शेजारीच बसलेल्या असतात. Happy
(ह्याच संदर्भात अजून एक गंमत म्हणजे तात्यासाहेबांच्या बंगल्याचे नाव अर्चना असतं))

नंतर विहिरीचा सीन. तिथे आर्चीची हापिशियल एंट्री होते अन क्या बॉस एंट्री बोले तो एंट्री आहे पोरीची! अर काय एक्स्प्रेशन अन काय तो कान्फिडन्स अन काय तो हेल बोलण्याचा! झन्नाट! ती ज्या पद्ध्तीनी येऊन विहिरीवर एक पाय ठेवून वाकून खाली बघते त्यातच सगळं येतं! पाटलाची पोरगी असल्याचा शुद्ध माज!
अय रत्ताळ्या निग्ग्कीरं भैर... आत्तागंबया भैरा बिराएकाकाय.... अय अय खुळखुळ्या उभाssssर!!!!

खलाssssस... अरे लेडी गब्बर वाटते ती इथे!!! (थांबा अजून! पुढे मी अजून तिचे अन तिच्या अ‍ॅक्टिंगच्या तारिफांचा पूल बांधणारच आहे. ही नुसती सुरवात आहे! Happy )

त्यानंतरची होते ती लंगड्याची होलपट तर निव्वळ कमाल आहे! त्याचे ते तसं चालणं असल्यामुळे ते आण्खिनच विनोदी झालय सगळं. ह्याउपर काय दिसतं ते म्हणजे मैत्री. येवढा पायानी अधू असून सुद्धा लगबगीनी (साबण अंगावर असताना) जाऊन आधी परश्याला सांगतो. (ते कसं सांगतो ते वाचण्यापेक्षा बघण्यातच मजा आहे). पण मी पवायला गेल्तो तिकडं आर्चिनं मला हाकल्ला हे सांगताना मला हाकल्ला ह्याचं तुसभर सुद्धा दु:ख किंवा लाज नाहीचे कुठे! नसतेच. सगळ्यात महत्वाचं काम त्यावेळी असतं ते मित्राला त्याचं सामान (आवडणारी मुलगी) कुठेतरी येऊन उभी आहे हा मेसेज जाणं! त्यात आपली इज्जत गेली तरी बेहत्तर पण मित्राचं झ्यंगाट हे जमवून दिलच पाहिजे, ते परम कर्तव्य असतय लगा!!

परश्याला स्वप्न पडतं तो प्रसंग आणि त्या भोवतीचे डायलॉग तर हसून हसून पुरेवाट आहेत. "कुठं दिवस भर कुत्री मारत हिंडत असतं कै म्हाईत" इति पशाचा बाप. ते नगं घरचे उठतीन आर्चे म्हणताना परश्याचा आवाज अशक्य दबलेला, चिरका अन लाडिक होतो! (स्वप्नात किस सुरु असतो ना?) Lol स्वप्न पडतात त्यात सुद्धा घरच्यांची भिती असतेच हे टीनेजर असताना काही आजिबात नवीन नसावं!

आता परशाची एंट्री!! म्हणजे सैराट एंट्री ह्या अर्थानं. फायन्ली लंगड्याची तगमग एकदाची "तिथं आर्चि आली आर्चि....." म्हणत कानावर पडल्यावर मग खरी जादू सुरु होते. याड लागलं! भन्नाट म्युजिक, बॅकड्रॉप अन सिनेमॅटोग्राफी! खरं डोळे मिटले आणि फक्त म्युजिक एकलं तर असं वाटेल की एखादा हॉलिवूडमधल्या जबरी म्युजिकलच सुरु असावं. मागची सीनरी जब्बरदस्त जमलीये. डिस्नी म्युजिकल सारखं ग्रँड वाटावं असं म्युजिक पण त्यात आपली माती, गवत, पक्षी अन आपला गावरान परश्या पण अगदी लिलया फिट्टं बसतात! कशाला बॉलिवूडवाले उगच झकमारी करत स्विझरलंडला जाऊन त्या हिरोंना गरम कपड्यात अन हिरवणींना स्लीव्लेस ब्लाऊजांमध्ये बरफात नाचायला लावतात देव जाणे!
पुढे आवरुन सावरुन भांगपट्टी करुन आलेला परशा कपडे अन सँडलांसकट जी उडी मारतो आगा ना पिच्छा बघत व्हिरीत त्यावर मी तर थेट्रात पैशे फेकले असते! ह्याला मंतेत जिगर! आधी उडी मारली, बघून घेतलं आर्चिला आता पुढचं पुढं बघू!
आत्तगंबया हे कुठून पड्लं व्हिरीत यून!
अssय निघ भायेर..
सॉरी सॉरी,
हss सॉरी सॉरीच्या लाडक्या.. आधी निघ भायेर..
मला मैतीच नवतं, बघितलच न्हाईमी..
बरं डोळं झाकून पडला रं हिरीत... आता बघितलं ना? हो भाएर..

आता खरं सीन बाय सीन कौतूक करत बसलो तर तो पर्यंत मंजुळेंचा दुसरा पिच्चर यायचा एखादा! त्यापेक्षा जरा फॉरमॅट बदलून, ज्या गोष्टी मला जास्त आवडल्या त्या बद्दलच लिहितो.

सैराट झालं जी:
ह्या गाण्यानी नुसतं वेड लावलय. खरं खुप सारे फॅक्टर्स आहेत ते गाणे आवडण्यामागे. एक तर आर्ची, परशा आणि त्यांचं एकेक प्रसंगातून फुलणारं प्रेम ह्या गाण्यात एकदम tempo धरतं (मालवहातुक वाला टेंपो नाही, गाण्यातला टेंपो असतो तो!).
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि त्याला साजेसं तेवढच अत्यंत ग्रँड ग्रँड पण थोडा गावाकडला टच असलेलं म्युजिक! (ढोलांचा वापर आणि ग्रामिण बाज असलेली भाषा)
खरंही वाटत नाही की हे करमाळ्याचं वगैरे शुटिंग आहे! काय एकसे एक अ‍ॅंगल घेतले आहेत!
गाण्यातले काही मोमेंट्स पण मस्त टिपले आहेत.

अगं झन्नानलं काळंजामंदी
अन हत्तामंदी हात आलं जी....
सैराट झालं जीssss
सैराट झालं जीssss

ह्या शॉट मध्ये आधी परशा आर्चिला गोल फिरवतो आणि नंतर आर्चि खाली वाकून खळाळून हसताना दाखवलीये.
ही हसतानाची आर्चि माझ्या करता कायमची स्मरणात गेलीये. Happy

नंतर गाण्यातच आर्चि परशाच्या बहिणीला स्कुटरवरुन घेऊन जाताना दाखवलीये आणि पुढे आर्चि मंदिरातून बाहेर गाभार्‍यात येते आणि तिथे तिच्या रंगीत चपलांमध्ये गुलाबाची फुलं ठेवलेली असतात. ती इकडे तिकडे बघते शोधत कोणी ठेवले असतील आणि तिला दोन खांबांमधून बसलेला परशा दिसतो, तो पाया पडल्या सारखं करुन मग हाथ जोडतो, मी ठेवले आहेत हे सांगत. मग आर्चि ती फुलं उचलून त्याचा वास घेते आणि मग छातीशी कवटाळते. पुढे आर्चि आणि सपनी, परशा, सल्या अन लंगड्या बसलेले असतात त्यांच्या शेजारून जातात तेव्हा लंगड्या सपनीवर फुल फेकल्याची अ‍ॅक्शन करतो! आणि त्या पुढे गेल्या की मग आल्या अन लंगड्या दोघंही बाबा प्रेमीपरशांच्या पाया पडतात की काय बॉ आय्ड्या काढली लगा बाबांनी!!! पोरगी फिदाssss...
(हा शॉट सुरु असताना मला वाटतं मागे आधी वायोलिन आणि नंतर बासरी आणि सॅक्सोफोन आहे. अप्रतिम जमून आलाय शॉट, म्युजिक, चित्रिकरण, सगळ्यांचे एक्स्प्रेशन्स सगळ्याच दृष्टिनी!! टोटल गुंडाळून खिशात जाणार हे असले शॉट दाखवले की आशिक दिलाचा प्रेक्षक!) Happy

नंतर घोडेस्वारीच्या शॉट मध्ये लंगड्या, सल्या आणि आनी असतातच. बघताना गंमत वाटते पण आपल्याकडे तरुण मुलं मुलींना घोडेस्वारीच काय एकांतात कुलफ्या पण खाऊ देतील कोणी तर शपत. आपल्याला नेमून दिलेली कामं सोडून तरुण मुलं मुलींच्या एकांतात व्यत्यय आणण्यात पोलिस, गावातली इतर लोकं वगैरे अशी सगळी बिन प्रेम करताच कुटुंबवत्सल झालेली मंडळी अगदी तरबेज असतात. सतत बिचार्‍या प्रेमींना आपलं लक्ष ठेवावं लागतं, कोणी पाहतय का, किंवा मग असं मित्रांना तरी राखणाला ठेवावं लागतं.
(असं कसं? असं आडनिड्या वयातल्या मुलं मुलींना एकांतात कसं काय सोडायचं, नाही? उद्या काही वेडंवाकडं झालं तर? आपल्या इज्जतीचं काय होईल? अहो आम्ही पण बरीच वेडीवाकडी कामं करतोओ पण ते बंद दरवाज्या आड, तिथे कोणाला कळतय?) Proud

कवळ्या पानात ह्या
सावल्या उन्हात ह्या
पवळ्या मनात ह्या भरलं… भरलं च्या वेळेस जेव्हा परशा हवेत किस सोडतो तेव्हा लंगड्याचा "आयो.." वासताना स्लो मोशन मध्ये स्पष्ट दिसतो!! Lol

पुढच्या कडव्यात रंगा खेळतात तो प्रसंग आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काय आहे खरं? आपल्या इथे ग्रामिण परिसरात असतात तशी दगड मातीच्या भिंती असलेली घरं, आजूबाजूला उगवलेलं कोरडं गवत, त्या दगडमातीच्या घरांमधून असलेल्या धुळीच्या वाटा! ह्या असल्या बॅकग्राऊंड असताना सुद्धा आधी बिल्ड केलेल्या वातावरणामुळे आणि म्युजिक, सिनेमॅटोग्राफी मुळे काय जब्बरदस्त भाव खाल्लाय ह्या प्रसंगानी?!

गाणं संपत असतानाचे शॉट्स (त्या कळसाच्या छोट्या गच्चीवर वगैरे) मला वाटतं ड्रोन वापरुन शॉट्स घेतले आहेत. सिंपली (अ‍ॅज इन सिंपल) इन्क्रेडिबल! Happy

आर्चि:
आर्चि मला वाटतं एका पिकचर मधलं एक पात्र नसून एक फिनोमेनॉन होऊन गेली आहे. ह्यात खरं तिच्या अ‍ॅक्टिंगला दाद द्यावी की मंजुळेंच्या परफेक्ट कास्टिंगला हे समजत नाही कारण ती अ‍ॅक्टिंग करते असं मला वाटतच नाही इतकी ती फिट बसली आहे त्या रोल करता. ह्याच अर्थ इथे मी झुकतं माप मंजुळेंच्या कास्टिंग ला देइन, पण ते देत असताना तिनी ज्या प्रकारे रोल पेलला आहे त्याला जवाब नाही. हे मान्य की रिंकु राजगुरु रियल लाईफ मध्ये बरीचशी तशीच चालते बोलते पण पिकचर मध्ये फक्त तिचं चालणं आणि बोलणं नाहीये ना ? खुप ठिकाणी तिला स्ट्राँग इमोशन्स दाखवावे लागले आहेत, एका अल्लड पाटल्याच्या पोरी पासून पुढे हलाखीत दिवस काढून नंतर एकदम मचुअर, आत्मविश्वासानी संसार करणारी तरीही आई वडीलांच्या आठवणीनी झुरणारी आर्चि हे ट्रान्सफॉर्मेशन तिला पेलावं लागलेलं आहे and oh my god has she done it well!!!

आता खरं खुप काही लिहिता येइल पण एक शेवटचा माझ्या कायमचा लक्षात राहिल असा प्रसंग आहे त्या बद्दल लिहून आवरतं घेतो. हा प्रसंग खरं मंजुळेंचं डायरेक्शन, परशा आणि आर्चिच्या अ‍ॅक्टिंगमुळे अत्यंत रियलिस्टिक होऊन आपल्या अंगावर येतो अगदी.
त्या फोनच्या पासवर्ड वरुन आधीच परशा जरा उखडलेला असतो, दुसर्या दिवशी कामावर जायच्या आधी पण त्यावरुन खटका उडतो आणि आर्चि निघत असे पर्यंत सुरुच असतं भांडण.
"तिथं कामावर कोणी फोन बघू नये म्हनून बदल्लाय" इथे खरं परशा थोडा शरमल्या सारखा होतो, कारण त्याला स्वतःची चूक लक्षात येते बहुतेक पण तो पर्यंत डॅमेज झालेलं असतं.आर्चिचा संयम संपलेला असतो.
"कुडं चालली?"
"चालली मसनात! कुटं जाती रोज मी?" "तुझ्या ह्या असल्या सबावाचा लै वैताग आला मला"
"काय यवडा वैटे का मी?"
"मंग मी वाईटे का?"
"मी आसकुडं म्हनलं?"
"म्हनायची काय गरजे?"
"कामावर जावच लागल का?"
"लोडय कामाचा, सर वोरड्त्याल"

काम संपवून आर्ची परशाच्या डोसा टपरीवर येते.
परश्या अजून घुसाट्यातच असतो.
"परश्या..... ओ साह्येब... पिकचरला जायचं का?"
"कामय मला.."
"मी इचारतीकी सुमनताईला"
"दुसरं कामेमला"
"चल ना..."
"तुला एकदा सांगितलेलं कळतय का?"
"हळू बोल की मग येवडं वरडतो कशाला?"'
"लै गाजलेला पिच्चरय, तुझ्या आवडत्या हिरोचा"
"...."
"मी एकटी जाईना?"
"जां..."
"खरच एकटी जाईन"
"निग्की मग कशाला थामली!"
"लै इगोए तुला, बस तसाच..."
असं म्हणून आर्चि एकटी पिकचर ला जाते....

त्या प्रेमानी म्हणलेल्या ओ सायेबाला पुढे जी अत्यंत तुसडी वागणूक मिळते ती बघून आणि एस्पशली विहिरीवरची ७-८ पोरांना दमात घेऊन हाकलणारी आर्चि आठवून ह्रदयाला खिंडारं पडतात!
पाटलाची पोरगी म्हणून येवढा माज केलेली, तेवढच ह्या परशावर प्रेम करणारी अन त्याला वाचवताना स्वतःच्या वडिलांकडून मार खाणारी, आबावर गोळी झाडणारी पण नंतर परिस्थितीशी दोन हात करत पण प्रेमानी राहू बघणार्या आर्चिची वाताहत बघवत नाही. पुढे प्रकरण आण्खिन थोडं विकोपाला जाऊन नंतर शेवटी परत ती दोघं आपल्याला एक मेकांशिवाय कोणी नाही हे समजून परत एकत्र येतात.
परशा तसा चांगला दाखवलाय आणि पिकचर मध्ये आर्चिच्या घरचे खुप जास्त कडक दाखवले आहेत पण एकंदरितच हे सगळं आपल्याकडच्या बर्‍याच मुलीं/स्त्रियांबद्दलचं खुप बोलकं असं उदाहरण आहे.
पळून जाऊन लग्न केलेलं नसलं आणि घरच्यांनी करुन दिलेलं असलं तरी एकदा लग्न करुन दिलं की आपली जबाबदारी संपली आणि माहेरपणाला आनंदानी ये असं म्हणाले तरी टेकनिकली घरी परत जायचे दरवाजे बंद असतात. सो उद्या काही अनबन झाली तरी एक तर तुम्ही ते निभावून न्यायचं किंवा मग आपला आपण मार्ग बघायचा येवढच उरतं.
असो..... Happy

अकरित घडलया
सपान हे पडलया
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं
साता जन्माच नात रूजलया काळजात
तुला र देवागत पुजलं
रूजल बीज पिरतीच सजणी रुजलं
भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरलं
हरलं ह्या पीरमाला समद हरलं
कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…….

_/\_

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेडमास्तर प्रिन्सदादाची तक्रार करायला येतात आणि उलटे त्याच्या। वादि चे झेंगट गळ्यात घालून घेतात त्या सिनमध्येही बहुतेक आहेत.

नाही त्या सीनमध्ये नाहीत मंजुळे.
सुरुवातीला कमेंट्री करताना , कटिंग सलुन मध्ये आणि झिंगाट मध्ये आहेत मंजुळे.

At least तो सल्या ला एखादा फोन करतो असा सीन हवा होता. >>> आर्ची-परश्या फ्लॅट बघायला गेलेले असताना आर्ची तिच्या आईशी बोलते आणि फोन ठेवल्यावर बाळ्याचा मिस्ड कॉल येऊन गेला, त्याला फोन कर असं सांगते. परश्या त्याच्या मित्रांशी संपर्क ठेवून असतो ह्याची हिंट दिलीय ह्या संवादातून.

लंगडा बाळ्या उर्फ प्रदीप,
प्रदीप नाव सांगताना कसला कॉलर टाईट करुन उभा राहतो , जबरी एक्स्प्रेशन्स आहेत त्याचे.

सैराटची टीम "चला हवा येऊ द्या" मध्ये प्रमोशनला आली होती, तेव्हाचे एपिसोडस बघताना मजा आली.

http://www.ozee.com/shows/chala-hawa-yeu-dya-maharashtra-daura/video/cha...

http://www.ozee.com/shows/chala-hawa-yeu-dya-maharashtra-daura/video/cha...

बिली बाउडिंग असला तरी गुरं ढोरं सोडुन खेळत बस्तुय हुय रं ? Lol
अयं अयं चन्नय एक्सप्रेस हु मागं , आलाय तोंडाला साबण लावून , हुsss मागंss !

माझं नाव आर्चना पाटील , मला बारावी ५५ टक्केय , मला पोहायला आवडतं , पिच्च्रर बघायला आवडतो , बुलेटबी चालवायला आवडती ........... आनीला विचारते , 'आजुन काय गं ? ' आनी म्हणते, ' बयाsss मला म्हाइती तुला काय आवडतं ? तु़जं काय बी आसतं ' Lol

आणि ते दोघं एकमेकांच्या डान्स स्टेप्स करताना किती गोड निरागस दिसतात. कवायत चालू असताना परश्यामुळं लंगड्याचं उचकणं Lol आयुष्यातला सर्वात सुंदर काळ.

हयला, कसल अजबरी रिव्युव आहे.
मी आजपर्यंत सैराटचा एकही रिव्यु वाचला नव्हता.
आत्ता मायबोलीवरून लॉगआऊट झालेलं तेंव्हा एखाद्या धाग्यावरून लॉगिन करावं म्हणून हा धागा उघडला आणि दिवस सार्थकी लागला की.....
क स लं च भन्नाट लिहिलंय राव.... सैराट झालं जी च्या मी प्रेमात (केवळ आणि केवळ इथल्या डिटेलिंग मुळे)..
पहावासा वाटू लागलाय सैराट..

बुवा जियो! असलं काही बाही सतत लिहित रहा हो लै पोटेंशिअल आहे तुमच्या.
(एकाच रिव्यु मधे (खरतर आत्तापर्यंत मी तुमचं हे एवढं एकच लिखाण वाचलंय) मी तुमच्या फॅन क्लाबत)

ते आर्ची बोर्डावरच्या कविता वाचताना दाखवलिये.

परश्याची कविता-
मुके पैजण
एकटेपणाचे हे जीवघेणे तट
तू आता भराभर ढासळून टाक
पुन्हा कधीच न बांधण्यासाठी
फाटलेल्या आभाळाला
टाके घालून सांधण्यासाठी
कारण
आता मी माझ्याकडचा रस्ता
झाडून पुसून साफ केलाय
तुझ्या पायातल्या
मुक्या पैजणाला
मुक्त गाणी गाण्यासाठी
- प्रशांत काळे

लंगड्या ची कविता शेजारीच लिहीलेली
तू
तू वर्गात
मी सर्गात
तू गैरहजर
मी नर्कात
तू हसलीस
माझा सुकाळ
तू रुसलीस
माझा दुष्काळ
माझ्या जीवनात
आता फक्त तू
फक्त तू फक्त तू
- प्रदीप बनसॉडे (कवी)

तिकडे दुसर्‍या एका धाग्यावर जव्हेरगंज ह्यानींही लिहील्या आहेत ह्या. ते म्हणतात ४ वेळा पिक्चर बघितला त्यामुळे कळल्या.

मी आठ वेळा बघीतला Happy एकवेळ ठरवून दुसरी कविता वाचली ती लंगड्याची होती.
जव्हेरगंजनी कुठे लिहीली माहीत नाही. पुन्हा रिपीट झाल्याबद्दल सॉरी.

रीया Happy

लंगड्याची कविता अशक्य आहे!
तू वर्गात मी सर्गात Rofl काय नेमक्या शब्दात वर्णन केलय आपल्या सप्नीला बघून होणार्या अत्यानंदाचं लंगडेश्वर माऊलीनी!

मी पण फॅन क्लब मध्ये. मस्त लेख आणि प्रतिसाद.
एकेक डिटेलिंग वाचुन परत परत ते सीन्स पहावेसे वाटताहेत.
वैद्यबुआ, जियो !! इतक्या छान लेखासाठी !!!

बुवांनी लिहिलेला रिव्ह्यु वाचून सध्या युट्यूबवर शोधून टिव्हीवर पाहिलाच ह्यो पिच्चर! भारीयेन्काय!

shriramk सॉरी वगैरे म्हणू नका हो. मला आठवलं की अजूनही कोणीतरी तुमच्यासारखंच आहे पारायणं करून एका खेपेत अजिबात धड न दिसलेल्या कविता नीट वाचून (पाठ करून) इकडे परत लिहीलेलं. इकडे आहेत त्या दोन कविता आणि त्यांच्या स्वतःच्याही एक-दोन.

http://www.maayboli.com/node/58643

अरे, सुरुवातीचा सीन कसे विसरले सगळे? मॅच सोडून कॅप्टन परश्या शेतात लपतछपत आर्चीला बघायला जातो आणि तिची एक झलक दिसेल म्हणून बायकांना हापश्याने पाणी भरून देतो. बाळ्या येऊन त्याला हात धरून घेऊन जातो. तेव्हा कसला निरागस आणि गोड दिसतो परश्या!! Happy
अर्चना या बंगल्याच्या नावावर उभी राहून बाल्कनीत बोलणारी आर्ची, कुठल्यातरी सीनमध्ये तिने निळे गोल क्विलिंगचे कानातले घातलेत Happy बॉटलिंग प्लॅन्टमध्ये कामगार ते क्लर्क अशी बढती झाल्यावर तिला जुनी कामगार मैत्रीण चहा आणून देते.. शेवटी चहापाणी देताना नाना, हात.. बराय ना विचारते तो तोच माणूस आहे ज्याच्या हातावर तिने गोळी झाडली होती..

करमाळ्यातून एसटीत बसल्यावर सल्या विचारतो एसटी कुठे चालली? आणि उत्तर मिळतं बिटरगाव!! तेव्हाचे सगळ्यांचे एक्सप्रेशन्स !! (बिटरगाव नाव ठेऊनच नागराजने भारी कोटी केलीये)

करमाळ्यातून एसटीने निघताना एक मुलगा जो अंगठा चोखत असतो तो सारखा या चार जणांकडे बघत असतो.
मला तर धाकधूक वाटत होती की हा मुलगा काही चुगली करेल की काय?

बुवा मस्त धागा काढलात.

आर्ची म्हणते गैराटा सारखा गुटखा खाऊ नको लेका . गैराट म्हणजे काय ?

अजय अतुल चे संगीत ग्रेंतच. श्रेया आणि चिन्मयी ने कसली गाणी म्हटली आहेत, जब्रदस्त. चिन्मयी चे तर मराठी मध्ये सैराट हे debut गाणे आहे.

टन्या लिंक बद्दल थनक्स. locations वर जाण्याचा प्रयत्न करण्यात येइल.

हा रिव्ह्यू खूप आवडला. अगदी मनापासून फुलं उधळत लिहिलाय :-). समाजातील दोन स्तर जरी असले आणि त्याच्याच चर्चेमुळे सिनेमातील बलस्थानं, सौदर्यस्थळं झाकोळली जात होती. पण ह्या रिव्ह्यूमध्ये आणि प्रतिसादांमध्ये त्या स्थानांना न्याय मिळालाय. निव्वळ आणि निखळ सिनेमाचा रसास्वाद आहे ह्यात. जियो!!!

यु टृय्बवर गेल्या आठवड्यात कोणीतरी सेन्सॉर कॉपी म्हणुन ७-८ भागात हा चित्रपट अपलोड केलाय. एच्डी प्रिंट आहे. पण मजा अशी की त्यातले काही संवाद आणि दृष्य पडद्यावरच्या चित्रपटात नाहीयेत. सैराट झाले जी ची सुरवात आणि शेवट पुर्ण वेगळा आहे. शेवटाच्या डोरलंच्या कडव्यात लग्नाच्या जागी पुर्ण मोबाईलचे सिन्स आहेत. आत्ता गं बया गाण्यातले सिन्स वेगळे आहेत, जे चित्रपटात नाहीयेत. आता गं बया मध्ये सर आर्चिला ओरडतात वर्गात लक्ष दे म्हणुन, तेव्हा ती डोळ्यांनीच तुमचे काम करा म्हणत खुणावते. Happy बिली बावडींग आईचा मार चुकवुन परत कसा मैदानात परततो ती गंमतही आहे. Happy बोर्डावरच्या कविता मात्र नाहीत. पहिल्या भागात ह्या गंमती खुप आहेत. दुसरा भाग अजुन पुर्ण पाहिला नाही पण जे पाहिले त्यातही थोडा थोडा फरक आहे.

श्री, येस, त्या दॄष्यात मंजुळे नाहीत.

कालच पाहिला. मंजुळे अमेझिंग स्टोरीटेलर आहे आणि सिनेमा हे त्याचे माध्यम आहे Happy

मी पण फॅन क्लब मध्ये. मस्त लेख आणि प्रतिसाद. एकेक डिटेलिंग वाचुन परत परत ते सीन्स पहावेसे वाटताहेत.
वैद्यबुआ, जियो !! इतक्या छान लेखासाठी !!! >> +१००

वरती आर्ची च्या costume बद्दल ( नताशा ?) जे लिहीले आहे, त्याला ही अनुमोदन!

Pages