भक्तिपीठः माझुली

Submitted by मंजूताई on 6 June, 2016 - 13:15

मागच्या वर्षी ज्ञानसेतू (ज्ञान प्रबोधिनी) तर्फे रोईंग (अरुणाचल)ला जाण्याचा योग आला अन तिथल्या निसर्गसौंदर्याच्या व लोकांच्या प्रेमातच पडलेपरतीला विवेकानंद केंद्र, गुवाहाटीला एक दिवस मुक्काम केला. मीरादिदींबरोबर एक दिवस त्यांच्या बरोबर अनेक केंद्रांना भेटी देत, कामाख्य मंदिराला भेट असा मस्त मजेत घालवला. तेव्हाच त्यांनी नोव्हेंबरमध्ये होणार्‍या खोंसा (तिराफ) ला आरोग्य शिबिरासाठी मदतीसाठी येण्याचं आमंत्रण दिलं. मनापासून इच्छा होती आणि ती फलद्रुपही झाली. खोंसाला शिबीर करायचं व आजूबाजूचा प्रदेश बघायचा असं ठरवलं होतं. पूर्वांचलातील ह्या सात बहिणीतील इतकी ठिकाणं बघायची होती की नक्की कोणती निवडावी कळत नव्हतं. जगातलं एकमेव नदीतलं बेट म्हणून ‘माझुली’ ह्या जागेची निवड केली आणि ती अगदी सार्थ ठरली. . आणि असं म्हणतात की एकदा तुम्ही ब्रह्मपुत्रा ओलांडली की सात वेळा ब्रह्मपुत्रेच्या भेटीचा योग येतो खरं खोटं देव जाणे पण असे सातच वेळा काय अनेक वेळा अश्या ह्या योगाला सामोरं जायला कुठल्याही वाहनातून पायी, आगगाडीतून, नावेतून, आकाशात उडून हसत खेळत. नाचत तयार असेन. दिहींग व ब्रह्मपुत्रेला आलेल्या महा भयंकर पुरामुळे जैव विविधतेने नटलेल्या माझुली बेटाची निर्मिती साधारण सतराव्या शतकात झाली. निर्मितीच्या वेळी असलेले बाराशे पन्नास स्क्वेअर किमी क्षेत्रफळ पर्यावरणीय बदलामुळे आता पाचशे चौर्‍यांशीवर आलंय.Assam_Majuli_Village-in-Majuli.jpg
‘ली’ अंती शब्द कानाला ऐकायला फार गोड वाटतात नाही का ? छकुली, गोडुली, हे शब्द कानावर पडले की गोबर्‍या गालाची मुलगी डोळ्यासमोर येते, माउली, ह्या शब्दात तर गोडव्याबरोबर जिव्हाळा ओतप्रोत भरलाय अन मागच्या वर्षी अरुणाचलमध्ये हिरवाईतून, बांबूच्या वनातून उबडखाबड रस्त्यातून वाट काढत जाणार्‍या मोटर गाड्या ‘नाजुली’ आणि हे आसामामधले गोड, शांत, निवांत ठिकाण ‘माझुली’! माझुलीचा अर्थ देवी माँ लाखी (धन व ऐश्वर्याची देवी) भांडार घर. आंतरजालावरून जुजबी माहिती मिळाली होती ती तिथल्या सोत्र (सत्र)बद्दल बंगालीप्रमाणेच आसामी पण गोलगोल उच्चार करतात. जोरहाटातील कमलाबारी घाटावरून चार वाजता शेवटच्या फेरीत बसलो. सूर्य अस्ताला जाऊ लागला होता. डोळ्यात साठवून ठेवावं असं दृश्य! दीड तासाचा बोटीचा अविस्मरणीय प्रवास! कमलाबारी पोचेपर्यंत अंधारलं होतं. अनोळखी प्रदेश, अनोळखी भाषा! व्हिकेवीमधल्या वासुसरांना आम्ही येत असल्याचं कळवल्यामुळे त्यांनी हॉटेल व टॅक्सी आरक्षित करून ठेवल्यामुळे खूपच सोय झाली होती.
दोन दिवस टॅक्सी आमच्या दिमतीला होती अन ड्रायव्हरला हिंदी भाषा समजत होती पण बोलायचा मात्र आहिंदी (आसामी+हिंदी)भाषेत! माझुली म्हणजे ‘सत्र’! पाचशे वर्षांची परंपरा असलेले ही सत्रीय संस्कृती माझुलीची ओळख आहे. आज एकूण लहान मोठे पासष्ट सत्र आहेत त्यापैकी औनति, भोगपुर, दखिनपथ,गारमुर, कमलाबारी, सामोगुरी ही प्रमुख आहेत. वासूसरांनी थोडक्यात सत्राविषयी माहिती दिली होती. सत्र म्हणजे कलेच माहेरघर, गुरुकुल, मठ, विद्यापीठ, भक्तीपीठ, आश्रम, ....इ. सत्र संस्कृतीचे संस्थापक स्रीमंत संकरदेव व माधबदेव ह्या द्वयीने सुमारे चारशे वर्षांपूर्वी सत्राची स्थापना केली. ही एक फक्त धार्मिक संस्था नसून हे एक सांस्कृतिक व समाज प्रबोधनाचं एक व्यासपीठ आहे. माझुलीकर अतिशय उत्सवप्रिय, बारा महिन्यात तेरा उत्सव साजरी करणारी. रासलीला फाल्गुनोत्सव, पालनाम, जन्माष्टोमी, बिहु व गुरुकिर्तन हे प्रमुख उत्सव. त्यापैकी सर्वात मोठा उत्सव म्हणजे चारशे वर्ष जुनी परंपरा असलेली ‘स्री स्री कृष्ण रासलीला’ व देशविदेशातून पर्यटक रासलीला पाहायला येतात. तीन दिवस चालणार्‍या ह्या उत्सवाला कार्तिक पौर्णिमेपासून सुरुवात होते. आमचं भाग्य असं की आम्ही ह्याच सुमारास तिथे पोचलो आणि ह्या रासलीलाची रंगीत तालीम बघायला मिळाली अन अभाग्य असं की मुख्य रासलीला व इतरही काही गोष्टी पाहता नाही आल्या कारण माझुलीयन इतके रासलीलामय झाले होते की रासलीलेशिवाय इतर काही दाखवायला, बोलायला त्यांना सवडच नव्हती. संपूर्ण माझुली अगदी बाळापासून ते जख्खड म्हातार्‍यांपर्यंत सगळे रासलीलेत मग्न होते. आपआपले नोकरी, कामधंदे सांभाळून तालीम करत होते. कुठलंही व्यावसायिक शिक्षण न घेतलेले नेपथ्यकार, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्र्या सगळे स्थानिक कलाकार! कलावंतांना व्यावसायिक शिक्षण घ्यायची गरजच पडत नसेल कारण त्यांना त्याचं नुसतंच बाळकडू मिळालेलं नसावं तर गर्भसंस्कारातूनच त्यांच्या रोमरोमात भिनलेलं असावं. कोकणी लोकं ज्याप्रमाणे गौरी गणपतीला न चुकता कोंकणात जातात त्याप्रमाणे माझुलीकर ‘रासलीले’साठी माझुलीत येतात. आपल्या दहीहंडी सारखी रासलीलेत आसामी सिनेकलावंताची हजेरी व सहभागाची नवीन प्रथा इथेही सुरू झालीये.
सामोगुरी (सामुग्री ह्या शब्दाचा अपभ्रंश असावा) हे एक प्रसिद्ध सत्र आहे. ह्यात मुखवटे बनवण्याची कला जोपासण्यात येते. ह्या सत्रातही नाम भाओना, जन्माष्टमी, पालनाम सारखे उत्सव इतर सत्राप्रमाणे साजरे करतात. सामोगुरी सत्राच्या रासलीलेचं वैशिष्ट्य म्हणजे मुखवट्यांच्या वापर जो इतर बाकी सत्रांमध्ये नसतो.

माझुलीच्या आणखीन काही वैशिष्ट्ये म्हणजे इथलं कुंभारकाम, बांबू व वेळूच्या वस्तू, पंखे व टोपल्या, आदिवासींनी विणलेल्या हातमागावरच्या शाली.
गोडी अपूर्णतेची ... खरंच बरंच काही बघायचं, जाणून घ्यायचं होतं... परदेशी पर्यटकांप्रमाणे सायकलीवरुन रपेट मारत माझुली बघायचंय, पक्षी निरीक्षण करायचं, सत्रात अख्खा दिवस घालवायचाय, स्थानिक पाककृती खायच्या, शिकायच्या आहेत....... झाडं लावणारा पद्मश्री जावेद पायेंगला भेटायचंय......ही यादी बरीच मोठी आहे .... गोडी पूर्णतेची घ्यायला माझुली साद घालतंय .....
ब्रह्मपुत्रेवर पुल बांधण्याची योजना विचाराधीन आहे व त्याला असलेला सत्राधिकार्‍यांचा विरोधही मावळला आहे. पुलामुळे स्थानिक लोकांची सोय होईल, विकास होईल पण प्रश्न हा आहे की हा विकास शाश्वत असेल का?
वैष्णव धर्माची पताका फडकवत भक्तिरसात डुबलेल्या ह्या माझुली बेटाला एकदा तरी भेट द्यायलाच हवी.IMG_3587.JPGIMG_3519.JPGIMG_3626.JPGdownload_1.jpgimages_0.jpg
फोटो सौजयः आंतरजाल व मृण्मयी
इतरत्र पूर्वप्रकाशित

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा! टाकला का इथे?
विवेक विचार मधे वरवर वाचला होता हा लेख!
आता डीटेलवर वाचला. सुन्दर माहिती दिलीत.

पुन्हा माझुली ला जाल तेव्हा माझा नम्बर लावुन ठेवा. Happy

फार सुंदर पण अजून सविस्तर लिहायला हवे होते. पूर्वाचल नावाच्या पुस्तकात याबद्दल सविस्तर लेख आहे पण त्यात फोटो नाहीत. ती कसर इथे भरुन निघाली.

कायम वस्ती असलेले, नदीतील जगात सर्वात मोठे बेट.. असा त्याचा लौकिक आहे.

दिनेशदा, मलाही अपूर्णच वाटतंय ...दोनच दिवस होतो आणि लेखात म्हटल्याप्रमाणे अख्ख बेट रासलीलामय होतं....
कुंभारकामही पाहण्याजोग आहे... जोरहाट ते माझुली फेरीने अपडाऊन करणारे बघून रोज कसे काय करतात बुवा पण मुंबईवाले लोकलने करतात ना!

लेख आवडला मंजूताई.
<<<असं म्हणतात की एकदा तुम्ही ब्रह्मपुत्रा ओलांडली की सात वेळा ब्रह्मपुत्रेच्या भेटीचा योग येतो>>> _/\_