वृध्दांसाठी रूग्ण-शुश्रुषा व पुनर्वसन केंद्रे

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 29 May, 2016 - 07:40

वृध्दापकाळात तब्येतीचे अनेक प्रश्न उद्भवू शकतात. जोवर पेशंट हालता फिरता असतो तोवर खूप प्रॉब्लेम नसतो. परंतु काही कारणामुळे जर पेशंट रूग्णशय्येस खिळला तर त्याची काळजी खूप काटेकोरपणे घेणे आवश्यक असते. पेशंटचे पथ्यपाणी, औषधे, व्यायाम वगैरे वेळचे वेळी व व्यवस्थित होणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे पेशंटची स्वच्छता, वैद्यकीय तपासणी व देखभालही अनिवार्य असते. काही वेळा शस्त्रक्रिया झालेले किंवा अपघात झालेले वृध्द पेशंट मेडिकल सुपरविजनखाली असणे गरजेचे असते. हॉस्पिटल्स त्यांच्या नियमांनुसार पेशंटला फार दिवस ठेवून घेत नाहीत व डिसचार्ज देतात. अशा वेळी जर पेशंटला मेडिकल सुपरविजन आवश्यक असेल, किंवा स्वत:चे स्वत: करणे शक्य नसेल व घरी तसे कोणी करणारे मनुष्यबळ नसेल अथवा पेशंटसाठी घरातील जागा लहान पडत असेल तर अशा वेळी रूग्ण-शुश्रुषा व पुनर्वसन केंद्र हे पेशंटसाठी मोठा आधार ठरू शकते.

पुणे-मुंबईसारख्या मोठ्या शहरांत, मोठी लोकसंख्या - लहान जागा - अपुरे मनुष्यबळ - असुरक्षितता या गोष्टी लक्षात घेता अनेक वृध्द पेशंट्स थोडे बरे होईपर्यंत त्यांची सोय त्यांचे नातेवाईक पेशंट केअर युनिट किंवा रूग्ण शुश्रुषा केंद्रांत करतात. घरातील सर्व व्यक्ती काही कारणासाठी दूरदेशी किंवा दूरगावी जात आहेत... घरातील वृध्द व्यक्ती प्रवास करून त्यांचेसोबत जाण्यास शरीराने असमर्थ आहे व तब्येतही बरीच ठीक नाही... मग घरी त्या व्यक्तीला एकटे किंवा कोणाच्या सोबतीने ठेवणेही असुरक्षित वाटू शकते. अशा वेळी पेशंट केअर युनिटमध्ये मेडिकल सुपरविजन व शुश्रुषा सेवांसहित ती व्यक्ती इतर पेशंट्ससोबत ठेवणे हा उपाय जास्त चांगला वाटू शकतो.

वेगवेगळ्या पेशंट केअर युनिट्स मध्ये निरनिराळ्या सुविधा सोयींसहित सशुल्क सेवा दिल्या जातात. पेशंटची वैद्यकीय गरज व बजेट यांचा ताळमेळ घालून उपलब्ध केंद्रांमधून आपल्याला योग्य केंद्र निवडावे लागते. कागदावर लिहिलेल्या सोयी प्रत्यक्षात असतातच किंवा चालू स्थितीत असतातच असे नाही. त्याची खातरजमा करून घ्यावी लागते. तेथील स्टाफ ट्रेनिंग घेतलेला आहे ना, अटेंडंट - डॉक्टर - नर्स यांची उपलब्धता व पेशंटबरोबर रेशो (दर २ पेशंट्समागे १ अटेंडंट वगैरे) हेही पाहावेच! सामान्यत: अशा ठिकाणी पाणी, वीज, कचरा यांची सोय नीट केलेली असतेच. तरी खात्री करावी. जनरेटर / बॅकअप वगैरे. डॉक्टर्स तिथे २४ तास उपलब्ध असतील तर उत्तमच! तसे नसल्यास डॉक्टर ऑन कॉल, फिजिओथेरपिस्ट, डाएटिशियन व आवश्यकतेनुसार इतर विशेषज्ज्ञ डॉक्टर्स तिथे येतात का, हे पाहावे. स्टाफची पेशंट्ससोबत वागणूक, केंद्रातील स्वच्छता, सोयी, सुरक्षा यंत्रणा हेही पाहावे. अँब्युलन्स सेवा, जवळचे हॉस्पिटल, आयसीयूची जवळची सोय हेही महत्त्वाचे. तसेच आनंदी किंवा प्रसन्न वातावरण, थोडीफार हिरवाई, जरा हिंडू फिरू शकणाऱ्या पेशंट्सना फिरण्यासाठी जागा, मनोरंजनाची सोय असेल तर त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होतो.

याबाबत तुमचे काही अनुभवाचे बोल असतील किंवा तुमच्यापाशी अधिक माहिती असेल तर जरूर शेअर करावीत. पुणे मुंबई सोडून भारतात इतर ठिकाणी काय सोयी आहेत? काय अनुभव आहेत? पुणे-मुंबईचे अनुभवही सांगावेत.

तसेच एक नमूद करावेसे वाटते की अनेक वृध्दाश्रम व ज्येष्ठ नागरिक वसाहती त्यांच्याकडे राहात असलेल्या व शस्त्रक्रियेनंतर क्रिटिकल कंडिशन असलेल्या, किंवा नाजूक कंडिशन झालेल्या निवासी वृध्दांना आसरा देण्यास असमर्थता दर्शवितात. यावर त्यांची सोय पेशंट केअर युनिटमध्ये करणे हा उपाय ठरू शकतो. घर जरी नाही तरी घरासारखी प्रेमळ शुश्रुषा वेळीच मिळाली तर पेशंटलाही मानसिक हुरूप येतो.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) हिंडताफिरता वृद्ध असेल तर पैसे कमी लागतात/घेतात।.उदा० खडवली स्टेशनजवळ नदीपलीकडे एक आहे.८०/८० स्त्रि पु जागा आहेत. छोटी मोठी शस्त्रक्रिकया तपासण्या राजावाडी घाटकोपरला नेऊन करवतात.
२) सुश्रुशा हवी असलेले /देणारे आश्रम उदा बेरु - राहटोली ( बदलापूर )उपचार असल्याने महिन्याचे पंधरा हजार खरच होऊ शकतात.
जेमतेम ऐपत असेल तर वांगणी पूर्व शाळेजवळ आहे.
वैद्यकीय सेवा ,सहायकांचे पगार ,व्यवस्था फार महाग झाल्या आहेत.काही अनावश्यक उपचार लादणे,डिपॅाझिट परत न देणे वगैरे अनपेक्षित आणि छुपे खर्च असतातच. सरकारी मदत मिळणाय्रा ठिकाणी स्वस्त असते परंतू मदत कधीही बंद झाली तर आबाळ होते..चालकांनी थोडा धंदा म्हणून उपक्रम चालवला तर तिकडे कानाडोळा करण्याशिवाय उपाय नसतो.

पेशंटच्या नातेवाईकांनी पेशंटला भेटायची वेळ ठराविक असली तरी कुटुंबियांनी अधून मधून अनपेक्षितपणे व ठराविक वेळ वगळून पेशंटला भेट द्यावी. (पेशंटचे विश्रांतीचे व फिजिओचे तास वगळून). त्यामुळे पेशंटची काळजी नीट घेतली जात आहे ना, हे बघता येऊ शकते. पेशंट शुध्दीत असेल वा बोलू शकत असेल, मनस्वास्थ्य ठीक असेल तर तक्रार नोंदवू शकतो. पण बेशुध्दावस्थेत, बोलू शकत नसलेला किंवा मनस्वास्थ्य ठीक नसलेला पेशंट तसे करू शकत नाही. त्या वेळी जास्तच काळजी घ्यावी लागते.

मायबोलीकर समीर देशपांडे यांनी शेअर केलेली माहिती इथे त्यांच्या परवानगीने देत आहे :

१. कोणतेही पुनर्वसन / शुश्रुषा केंद्र असो, किंवा घरी पेशंटची शुश्रुषा करत असाल तरी बेड सोअर्सची काळजी अतिशय महत्त्वाची आहे. बेड सोअर्स होऊ नयेत म्हणून काही स्पेशल पावडरी, सोल्युशन्स मिळतात. (आणखी एका ठिकाणाहून बेड सोअर्स होऊ नयेत म्हणून पॅचेसही मिळतात असे ऐकले आहे.)

२. शुश्रुषा केंद्रातल्या नर्सिंग स्टाफला इंग्लिश कळत असेलच असे नाही. औषधांसाठी वेगवेगळ्या पेट्या / बॉक्सेस बनवा व त्यांवर स्पष्ट, ठळक खुणांसह औषधे गोळ्यांसंबंधी सूचना, डोसेस वगैरे माहिती मराठीत व इंग्रजीत सुवाच्य अक्षरात लिहा.

३. शुश्रुषा केंद्राखेरीज तुम्हांला अशी काळजी घेणारी ठिकाणे, संस्था, सेवा हव्या असतील तर Geriatric Care in Pune हे शब्द वापरून गूगल करा. बरेच रिझल्ट्स मिळतील. रेटिंग्ज, रिव्ह्यूज वाचून मगच ठरवा. त्या संस्थांकडून त्यांच्याकडून सेवा घेतलेल्या काही व्यक्ती / त्यांचे नातेवाईक यांचे नंबर्स घेऊन त्यांचा फीडबॅक अवश्य विचारा.

४. पानशेत येथे असलेल्या जनसेवा फाऊंडेशनतर्फे चालवले जाणारे शुश्रुषा केंद्र चांगले आहे. धनकवडीचे माऊलीसेवा केंद्रही ठीक आहे. खराडी येथील अण्णासाहेब बेहेरे वृद्धाश्रमातही रुग्णशय्येला खिळलेल्या पेशंटसाठी पेशंट केअरची सोय आहे.

५. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला पेशंट्ससाठी डे केअर सुविधा आहे. परंतु ती रुग्णशय्येवर खिळलेल्या पेशंट्सच्या उपयोगाची नाही.

६. पेशंट वृद्ध वयात रुग्णशय्येवर खिळलेला असेल तर अनेकदा डिप्रेशनचा बळी ठरू शकतो. डिमेन्शिया, भास होणे, जुना काळ भूतकाळ व त्यातील घटना सध्याच घडत आहेत असे समजून वागणे व बोलणे हेही होऊ शकते. अशा वेळी वैद्यकीय सल्ल्याने उपाययोजना करावी. पेशंटला बोलून बरे वाटत असेल तर बोलू द्यावे.

पुण्यात अत्यंत गरज असूनही चांगलं रुग्ण-शुश्रुषा केंद्र नाही. गेल्या महिन्यात आमच्या घरी तशी गरज निर्माण झाली असता असं केंद्रच पुण्यात नसल्याचं लक्षात आलं.. 'अथश्री'मध्ये असं एक केंद्र आहे, पण गंभीर आजार असलेल्या रुग्णांना तिथे ठेवून घेत नाहीत. शिवाय तिथल्या वैद्यकीय सेवाही अगदी प्राथमिक अवस्थेतल्या आहेत. काही ठिकाणी शय्येला खिळलेल्या रुग्णांना ठेवून घेतात, पण तिथे तातडीची वैद्यकीय सेवा, निर्जंतुक वातावरण आणि वातानुकुलन इत्यादी उपलब्ध नाही.

कोथरुड डेपोच्या जवळपास एक शुश्रुषा केंद्र आहे. बहिणीच्या सासूबाईंना तिथे ठेवलं होतं. तिथली सेवाही चांगली होती. तिच्याकडून नीट माहिती घेऊन इथे नंतर लिहीन.

शोभा१, त्या केंद्राचं नाव सुविधा नर्सिंग होम. ठीकठाक आहे, स्वच्छ आहे, वातावरण बरं आहे. प्रेमाने करणारा स्टाफ आहे. परंतु काही त्रुटीही आहेत. एकतर ते अंडरस्टाफ्ड आहे. एका शिफ्टला साधारण ८-९ पेशंट्सचे बघायला १ नर्स व २ आया असतात. पेशंट संख्या जास्त झाली तर मग गडबड होते. त्यात कोणा पेशंटची भरती होत असेल, कोणी अत्यवस्थ असेल वा निरोप / डिसचार्ज घेत असतील तरी हा स्टाफ त्या कामात बिझी राहातो व बाकी पेशंटची गैरसोय होते. पेशंटच्या रूम्स स्वच्छ व हवेशीर असल्या तरी एका रूममधे जेव्हा तीन-तीन पेशंट दाखल असतात तेव्हा ते गर्दीचे होते. डॉक्टर ऑन कॉल सुविधा उपलब्ध आहे परंतु ते डॉक्टर लगेच उपलब्ध होतील याची गॅरंटी नसते. राऊंड द क्लॉक व्यवस्थापक नाहीत. जे आहेत ते दिवसातून थोडा वेळ येऊन जातात. बाकी तिथे ऑक्सिजन, सलाईन वगैरे प्राथमिक सुविधा आहेत. आस्थेने करणारा स्टाफ आहे. ट्रीटमेंट होत नाही. फिजिओथेरपी उपलब्ध आहे. फिरायला मोकळी जागा, हिरवाई नाही. फ्लॅट्सचे रूपांतर नर्सिंग होमात केल्यामुळे येणाऱ्या मर्यादा आहेत. डेपोपासून जवळ असल्यामुळे सोयीचे आहे. स्टाफची संख्या व व्यवस्थापन सुधारण्यास तसेच देण्यात येणाऱ्या सेवेची गुणवत्ता सुधारण्यास भरपूर वाव आहे. तसेच येथे तुम्ही पेशंटसाठी प्रायवेट नर्स किंवा आया ठेवू शकत नाही.