निसर्ग, पर्यावरण आणि आपण १: प्रस्तावना
नैसर्गिक असंतुलनामध्ये मानवाची भुमिका
मागच्या लेखात आपण बघितलं की, निसर्गाच्या नियमानुसार सर्व सृष्टी चालते. त्याची एक व्यवस्था असते. जर ह्या व्यवस्थेवर ताण पडला, तर निसर्गही बदलतो. जसं गुरुत्वाकर्षण हा एक नियम आहे. जर आपण वाकडे तिकडे चाललो तर आपण ह्या नियमामुळेच पडतो. त्याच प्रकारे आपण आणि निसर्ग ह्यांच्यात तणाव निर्माण होऊ शकतो. आणि जसं चुकीच्या प्रकारे चालल्यावर आपल्याला गुरुत्वाकर्षण पाडतं, तसंच आपल्या चुकांमुळेच निसर्ग दुष्काळ, पूर, अवकाळी पाऊस किंवा भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती आणतो. ह्या अर्थाने खरं तर क्लाएमेट चेंजला ह्युमन चेंज म्हणायला पाहिजे. कारण ह्या बदलाचं मूळ कारण माणूसच आहे. आधीच्या भागात बोललो त्याप्रमाणे माणसाकडे प्रगती करून वर जाण्याची किंवा अधोगती करून खाली उतरण्याची अद्भुत क्षमता आहे आणि म्हणून मानवाचं अस्तित्व अतिशय वेगळं ठरतं. मानव निसर्गाचे रक्षणही करू शकतो आणि त्याची अपरंपार हानीसुद्धा करू शकतो.

आपल्याला निसर्गाचं व्यापक अस्तित्व मान्य करायला हवं. त्याचे अनंत विस्तार आणि आयाम आहेत. त्यांच्या असंख्य अभिव्यक्ती असतात. पृथ्वीपुरतं बोलायचं तर पृथ्वीवर सगळ्या प्रकारचं हवामान, वातावरण आणि भूप्रदेश आहेत. उणे पन्नासपासून अधिक पन्नास सेल्सियस तपमानही आहे. त्याशिवाय वाळवंट, सस्यशामल प्रदेश, पर्वत, नद्या, समुद्र, ज्वालामुखी हे सर्व आहे. आणि इतकीच विविधता जीवसृष्टीमध्येही आहे. कारण जीवसृष्टी हा त्याच निसर्गाचा अविष्कार. किंबहुना, इतकीच विविधता माणसातही आढळते. पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मानवी संस्कृतींमध्ये अतिशय विविधता आढळते. आणि ती फक्त भाषा, रंग, वर्ण, शरीर रचना इतकीच नाही. ह्या विविधतेचे इतरही अनेक पैलू आहेत. उदाहरणार्थ एखाद्या गरम हवेच्या प्रदेशातले लोक सामान्यत: फार सक्रिय असणार नाहीत. कारण गरम हवामानामध्ये काही न करताच खूप घाम येतो आणि ऊर्जा खर्च होते. त्याउलट थंड व शीत प्रदेशातले लोक अधिक सक्रिय असतील- नैसर्गिक स्वभाव म्हणून. ज्या अनेक कारणांमुळे युरोपियन लोकांनी अनेक शतकं जगभर विस्तार करून वसाहती केल्या, त्यामध्ये हेही एक कारण आहे. युरोप थंड प्रदेश आहे आणि इंग्लंडचा विचार केला तर ते लहानसं बेट आहे. त्यामुळे तिथे तिथल्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण न होणं स्वाभाविक होतं. त्यामुळेसुद्धा ते बाहेर पडून जगभरात गेले. आणि छोटासा देश असल्यामुळे राष्ट्रवाद अतिशय स्पष्ट राहिला.
आपला देशही जगाचं छोटं रूप आहे. आपल्याकडेही प्रत्येक प्रकारचं हवामान, प्रत्येक प्रकारची जमीन आणि वातावरण आहे. आणि मुख्यत: गरम हवेचा प्रदेश असल्यामुळे बाहेर जाऊन विस्तार करणे किंवा संघर्ष करत राहणे आपल्याल स्वभावात नाही. व्यक्ती अपवाद असतील, पण समाजाचा नैसर्गिक स्वभाव हा नाहीय. हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच, की आपण जिथे असतो किंवा जिथले असतो, त्यानुसार आपली विचारशैली विकसित होते. जर ग्रामीण भागात जाऊन बघितलं तर जे गाव बाजाराचं असेल किंवा जे गाव हायवेच्या जवळ असेल, तिथल्या लोकांचं राहणीमान इतर गावांपेक्षा अगदी वेगळं दिसतं.
ह्याच प्रभावाचं आणखी एक उदाहरण म्हणजे असे देश जिथे आज पर्यावरणाची जास्त काळजी घेतली जाते व नामशेष होणा-या प्रजातींना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातात- असे देश कोणते आहेत? ऑस्ट्रेलिया, स्वीडन, डेन्मार्क, कॅनडा अशी नावं अनेक असतील, पण त्यातही एक गोष्ट स्पष्ट आहे की हे देश संपन्न आहेत आणि कमी लोकसंख्येचे आहेत. ह्या देशांची लोकसंख्येची घनता विरळ आहे. आणि इथल्या नैसर्गिक संपदेवर लोकसंख्येचं 'बर्डन' कमी आहे. जर आपण आज जगभरात दिल्या जाणा-या डोनेशनचाही विचार केला, तर हेच देश इतर देशांना मदत पाठवतात किंवा चॅरिटीसाठी पुढे येतात. कारण काय असेल? कारण हेच की, जर नैसर्गिक संपदांवर मानवाचं बर्डन नसेल, तर मनुष्यालाही त्या संपदेमधून खूप जास्त मिळेल. सतत मिळत राहील. आणि मग त्याच्यामध्ये देण्याची वृत्तीही येईल. देण्याची वृत्ती अशी अचानक येत नसते. त्यासाठी पहिले संपन्नता लागते. संपन्न असलेली व्यक्तीच देऊ शकते. आणि हे तेव्हा होतं जेव्हा नैसर्गिक संसाधनांवर मानवाचं बर्डन कमीत कमी असतं. जरा ह्या देशांची भारतासोबत तुलना करूया. . . आपल्याकडे मानवाचं निसर्गावर असलेलं बर्डन प्रचंड आहे. आणि निसर्गासोबत त्याचा सर्वांत जास्त फटका मानवालाही बसतो. मानवाच्या जीवनातही तितकाच संघर्ष, जगण्यासाठी गळा कापणारी स्पर्धा व तणाव येतो.
आणि जर आपण शेकडो वर्षांपूर्वीची जीवनशैली आजही सुरू ठेवण्याचा हट्ट धरत असू, तर ही स्थिती आणखीन बिघडते. जेव्हा पूर्वी शेकडो वर्षांपूर्वी मानवाचं निसर्गावर असलेलं बर्डन नगण्य होतं, तेव्हा जुन्या काळातल्या गरिबीतही एक संपन्नता असायची. त्यामुळे तशी जीवनशैली तेव्हा बनली असेल. जसं पूर्ण गावाला जेवण देणं, मोठा लग्नाचा कार्यक्रम करणं, प्रत्येक पिढीने घर बनवणं इत्यादी. जेव्हा निसर्गावर मानवाचं बर्डन कमी होतं, तेव्हा हे सोपंही होतं. पण आज विशेषत: भारतासारख्या देशांमध्ये मानवाचं निसर्गावर खूप जास्त बर्डन आहे. तेव्हा अशा पूर्वीच्या जीवनशैलीच्या धारणा अतिशय वेडगळ ठरतात. आपण अनेकदा बघतो की, रस्त्यावर एखादा अशा थाटात थांबलेला असतो किंवा वाहन चालवत असतो की त्या संपूर्ण रस्त्यावर तो एकटाच आहे. दुसरं कोणीच नाहीय. आपण निसर्गासोबत अगदी असंच वागतोय.

प्राचीन काळात लुकमानच्या जीवनातला उल्लेख आहे की एकदा त्याने एका माणसाला आयुर्वेदाबद्दल जाणण्यासाठी भारतात पाठवलं. त्याने त्याला सांगितलं की, तू बाभळाच्या झाडाखालीच मुक्काम करत भारतात पोहच. दुस-या कोणत्या झाडाखाली झोपू नकोस किंवा आराम करू नकोस. जेव्हा तो माणूस भारतात आला, तेव्हा क्षयरोगाने अशक्त झाला होता. कश्मीरमध्ये आल्यावर त्याने पहिल्या वैद्याला सांगितलं की मी तर मरायला टेकलोय. मी आयुर्वेद शिकायला आलो होतो, पण आता शिकायची इच्छा नाही. मला फक्त बरं करून परत पाठवा. त्या वैद्याने त्याला म्हंटलं, तू एखाद्या विशिष्ट झाडाखाली झोपत झोपत आलास ना? त्याने लगेच म्हंटलं, मला माझ्या गुरूंनी आज्ञा दिली होती की, फक्त बाभळाच्या झाडाखालीच झोपत जा. त्यावर तो वैद्य हसला. त्याने सांगितलं, तुला काहीच करायची गरज नाही. तू फक्त कडुलिंबाच्या झाडाखाली मुक्काम करत परत जा.
तो कडुलिंबाच्या झाडाखाली मुक्काम करत करत परत पोहचला. पोहचेपर्यंत निघताना जशी त्याची तब्येत होती, तितकी त्याची तब्येत सुधारली. लुकमानने त्याला विचारलं, तू जीवंत परत आलास! नक्कीच आयुर्वेदात काही अर्थ असला पाहिजे. त्याने सांगितलं की, त्याला तर काहीच उपचार दिला गेला नाही. तेव्हा लुकमान म्हणाला की, तुला ज्या झाडाखाली झोपायला सांगितलं होतं, त्यानुसार तू वाचलाच नसतास. पण तू जीवंत आला तरी कसा? नक्कीच दुस-या कोणत्या तरी झाडाखाली झोपत आलास ना. त्यावर त्याने सांगितलं की, वैद्यांनी त्याला बाभळापासून दूर राहून कडुलिंबाच्या झाडाखाली झोपत जायला सांगितलं होतं. तेव्हा लुकमान म्हणाला की, म्हणजे खरच त्यांना ज्ञान आहे.
आज आपल्या निसर्ग अनेक प्रकारे इशारे देतोय. वारंवार सांगतोय. त्याचे सिग्नल आता पिवळ्याचे लाल होत जात आहेत. आपण हे समजून घ्यायला हवं. आपण निसर्गासोबत जे वर्तन करतोय, त्याचा तितकाच विपरित परिणाम आपण सर्वांवरही होतोय. आपण दिवसेंदिवस त्या टोकाकडे जातोय. आणि तथा कथित विकासाच्या पद्धतीमुळे व आर्थिक अनर्थामुळे आपण ही समस्या आणखीनच भीषण करत आहोत ज्याबद्दल पुढील भागात चर्चा करूया.
पुढचा भाग: निसर्ग, पर्यावरण आणि आपण ३: आर्थिक विकासातला अनर्थ
माझे सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी- माझा ब्लॉग
हा भाग पन छानच..
हा भाग पन छानच..