प्रवास

Submitted by श्वेता़क्षरा on 15 May, 2016 - 13:14

दोघांचं प्लानिंग आधीच झालेलं होतं. मेक, मॉडेल, रंग, सीट कव्हर्स, गणपती कुठे लावायचा ते अगदी थेट त्यावेळी पेन ड्राईव्ह मध्ये कुठली गाणी टाकायची आहेत इथपर्यंत. म्हणता म्हणता डाऊनपेमेंट जमलं, इ.एम.आय. अड्जस्ट झाला, दोघांनीही ड्रायव्हिंग क्लास लावला. तो जरा पटकनच शिकला. सवय ना रोजच्या बाईक च्या प्रवासाची. तीही शिकत होतीच जमेल तसं पण तिला चिंता नव्हती. नाहीच जमलं आपल्याला तर तो आहेच की ! ऐटीत ग्लासेस लावून, शिफॉन ची साडी नेसून कारमधे बसायचं. गेली काही वर्ष सक्त ताकीद होती ना, बाईकने जायचं असेल तर साडी नेसायची नाही. तिची चिडचिड व्हायची मग, पण आता कळी खुलली होती. कपाटात सुबकतेने रचलेली साड्यांची चळत खुणावत होती. खालच्याच ड्रॉवर मधली ज्वेलरी, परफुम्स आणि मेक-अप कीट सुद्धा वापरता येणार होता.

जसजशी कारची डिलीव्हरी डेट जवळ येत होती, दोघांच्या चर्चा सुरु झाल्या, पहिल्या रोड ट्रीप बद्दल ! ती म्हणत होती कुलदेवतेला जावं किंवा अष्टविनायक वगैरे, त्याचं कोकण किंवा एखादं नेचर रीसॉर्ट चाल्लं होतं. शेवटी असं ठरलं की आधी कुलदेवतेला जाऊन मग कोकणात शिरायचं.

त्यादिवशी दोघेही तरंगतच ऑफीस मधून आले. उद्या चारचाकी अवतरणार. चटचट जेवणं उरकून उद्यासाठी औक्षणाचं तबक, नारळ, पेढे अशी तयारी केली. हार तिथेच देतात म्हणे आणि इनिशिअल पेट्रोलही, त्याने जाहीर केलं.

(एक महिन्यानंतर...)

तो गाडीला मस्त सरावला होता. सुखासीनता देहावर झळकत होती. ती मात्र धडपडतच होती. तिचं म्हणणं, जाऊ दे ना तू आहेस ना. त्याचं म्हणणं, नाही! असं कसं बरं जमत नाही ? इतकी हुशार आहेस. हेही जमायलाच हवं. तिची रोजची टाळाटाळ !

रोड ट्रीपची तयारी जोरात सुरु होती. लॉंग वीकेंड ला जोडून सुट्टी टाकून बुकिंग्ज केले होते. रात्री जागून पॅकिंग केलं. आता कार आहे म्हटल्यावर हेही घेऊ तेही घेऊ असं म्हणत म्हणत अर्धा संसार गोळा झाला होता. झोप अशी लागलीच नाही दोघांनाही. पहाटेच ती उठली, चहा टाकला, त्याला उठवलं. तोही आज एका हाकेत जागा झाला. चहा घेता घेता तिला आठवलं की नेहमीचं त्याला लागणारं आफ्टर शेव्ह संपलंय. उगाच प्रवासात हिरमोड नको म्हणून तो आंघोळीला गेला असतानाच तिने बाहेरून ओरडून सांगितलं. शॉवरच्या आवाजात तिचे शब्द विरले. असेल काहीसं म्हणत तो पुन्हा आंघोळीत मग्न झाला. बाहेर येऊन आवरायला घेतो तोच बेल वाजली. शेजारचा पोरगा विचारत होता वहिनी आहेत का घरात ? त्यांच्याच सारखा ड्रेस दिसतोय. रस्ता क्रॉस करताना उडवलंय कार ने कुणाला तरी . त्याने टी-शर्ट अडकवत धाव घेतली. ती निपचीत पडली होती. हातात आफ्टर शेव्हची बाटली गच्च धरलेली. कार बाजूलाच उभी होती. त्याने चमकून बघितलं ! सेम कार, रंग , सीट कव्हर्स, गणपती...हुबेहूब तस्संच !

सगळं उरकून दोन दिवसांनी तो बेडरूम मधे शिरला...पलंगावर जरी काठाची अंजिरी साडी, नाजुक मोत्यांची माळ काढून ठेवली होती आणि उघड्या कपाटामधून परफ्युम्सच्या बाटल्या बाहेर डोकावत होत्या. तो वेड्यासारखा पेन ड्राईव्ह शोधत राह्यला, तिने साठवलेली गाणी प्रवासात ऐकण्याकरता...

श्वेताक्षरा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sad Sad

Sad

आभार !