तुम्हीच का ते?

Submitted by मुग्धमानसी on 25 April, 2016 - 03:27

तुम्हीच का ते? ज्यांच्याबद्दल
ती शेवटी बरळत होती?
तुमचीच छबी बहुदा तिच्या
डोळ्यांमध्ये तरळत होती...

तुम्ही थोडे चांदण्यातल्या
डोहासारखे दिसता का?
तुमचाच गंध पहिल्या पावसात
मातीत उमलून येतो का?

तसं असेल तर तुम्हीच ते...
ज्यांची बाधा जडून तिनं,
रात्री काढल्या तळमळून अन्
धगीत लोटलं सगळं जिणं!

शेवटी शेवटी सांगते अश्शी
लालबुंद रक्ताळलेली...!
डोळे जड मधाळलेले...
थोडी थोडी स्वप्नाळलेली...

काय होतंय?... कुणालाही
सांगू शकली नाहीच ती
अखेरपर्यंत तुमचं नाव
घेऊ शकली नाहीच ती...

फार हाल झाले तिचे...
तुमच्यापायी झुरताना...
निरोप द्यावा कुणापाशी?
तुमच्यासाठी मरताना?

फक्त म्हणाली 'जाळू नका...
नव्हतंच मुळी जे तुमचं',
भल्या पहाटे तुमची झाली...
ऐहिक सोडून कायमचं!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

....

अफाट लिहिलयं!!
फक्त,

फक्त म्हणाली 'जाळू नका...
नव्हतंच मुळी जे तुमचं', >>>

याचा अर्थ लागला नाही . सांगाल काय ?

Happy

फक्त कविता म्हणून वाचली तर आवडली.
अवांतर - एक विचार आलाच मनात. मला नीट शब्दात मांडता येत नाहीये. इक दुनिया उजड़ गयी हो तो क्या दुसरा तुम जहाँ (जहान) क्यों बसाते नहीं ? असे काहीसे..
कोणावर मन जडावे हे तिच्या हातात नसेल कदाचित. ( प्रेमाच्या ज्ञात नियमांनुसार ते संबंधितांच्या हातात नसतच :)) काही कारणाने ते प्रेम प्राप्त झाले नाही तर त्यासाठी झुरून हाल करून घ्यावेत हे पटले नाही.

!!!!!