मालवणी मसाला

Submitted by साधना on 22 October, 2008 - 02:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ दिवस
लागणारे जिन्नस: 

बेडगी मिरची १ किलो
जाडी मिरची १/२ किलो (तिखटपणासाठी)
काश्मिरी मिरची १/४ किलो (लालभडक रंगासाठी)
धणे १/४ किलो
खसखस १/४ किलो
दालचिनी २० ग्रॅम
लवंग २० ग्रॅम
मिरी २० ग्रॅम
सफेद जायपत्री १० ग्रॅम
जायफळ २ नग
हळकुंडे १०० ग्रॅम
जिरे ५० ग्रॅम
शाहजिरे १० ग्रॅम
चक्रफुल १० ग्रॅम
दगडफुल १० ग्रॅम
मसाला वेलची १० ग्रॅम
तमालपत्र १० ग्रॅम
बडिशेप १०० ग्रॅम
खड्याचा हिंग १०० ग्रॅम

क्रमवार पाककृती: 

१. मिरच्यांना दोन-तीन तास उन दाखवावे. मग हाताने देठ तोडुन, साफ करुन अजुन दोन दिवस उन्हात वाळवाव्या. चांगल्या कडक व्हायला पाहिजेत. मिरची हाताने तोडल्यास कटकन तुटली पाहिजे.

२. मिरच्या आणि इतर सर्व साहित्य वेगवेगळे भाजुन घ्यावे. भाजताना आवश्यक तेवढे तेल वापरावे. (१ किंवा १-१/५ चमचा). मिरच्यांना परत एकदा उन दाखवावे. मिरच्या कडकडीत असल्या की मसाला चांगला बारीक कुटला जातो आणि चाळल्यानंतर मागे उरणारा भुस्साही खुपच कमी निघतो.

३. मिरच्या आणि इतर सर्व साहित्य एकत्र मिसळुन थंड झाल्यावर डंकन मध्ये कुटुन आणावे.

४. कोरड्या काचेच्या बरणीत मसाला भरावा. भरताना मध्ये मध्ये हिंगाचे खडे ठेवावेत म्हणजे मसाला खराब होत नाही.

वाढणी/प्रमाण: 
-
अधिक टिपा: 

जानेवारीत नव्या मिरच्या येतात. तेव्हा मसाला करायला घ्यावा. साधारण दोन-तीन दिवस जातात ह्या कामात.

माहितीचा स्रोत: 
आई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाडी मिरची म्हणजे कुठली? वाळवलेलीच का?आणि हा मसाला कुठल्या शाकाहारी पदार्थांमध्ये वापरता येतो? मी कधीतरी थोडासा विकत आणून उसळ/मिसळ साठी वापरते, पण घरी कधी केला नाहीये.

यात तिरफळ नसते का? मालवणी मसाल्यात तिरफळ असते असा माझा समज होता.

गोव्याच्या माश्याचा मसाला असतो त्यात तिरफळ असते. तो तळणीच्या माशाला,सुका बोंबील्,कालवण ह्यातच वापरतात.

मंजु, जाडी मिरची जरा बुटकी, जाड सालीची असते. तिचे नेमके नाव माहित नाही. ती साधारण काश्मिरी मिरचीसारखीच दिसते, पण दुकानदाराला नेमके माहित असते, रंगासाठी कुठची आणि तिखटपणासाठी कुठची ते Happy

हा मसाला माझी आई/तिची आई वगैरे मंडळी पुर्ण वर्षाचा करुन ठेवत आणि शाकाहारी पदार्थ जसे आमटी, उसळी, भाज्या इ. त वापरत. मांसाहारी पदार्थात आई वरील इतर मसाल्याच्या जिन्नसांपैकी उपलब्ध जिन्नस परत एकदा भाजुन घेऊन वेगळे वाटुन घालायची. पण मी ही डबल मेहनत घेत नाही. दोन्हीकडे एकच मसाला वापरते. ह्यातच सगळे असल्यामुळे वेगळा गोडा मसाला वापरावा लागत नाही.

तिरफळे माश्याच्या ओल्या वाटणात घालतात बहुतेक. बांगड्यांच्या कालवणात घातली की आहाहा........ लहानपणी सावंतवाडीला राहात होतो तिथे तिरफळांचे झाड होते. खाली पडलेली तिरफळे आम्ही थोडा वेळ तोंडात धरत असु, काहीतरी वेगळीच चव लागायची आणि बराच वेळ तोंडातुन पाणी सुटत राहायचे.

साधना.

रेशमपट्टी म्हणतात ती मिरची का ? मिरची रुंद असते अन जाडपण. जरा त्रिकोणी भासणारा आकार असतो...

मसाला वेलची म्हणजे भेंडी वेलची का? कारण तिच्या बिया भेंडीच्या बियांयेवढ्या टपोर्‍या असतात. खूप छान वास येतो मसाल्याला त्यानी.

shonoo - बहुतेक तीच असावी.

मसाला वेलची म्हणजे काळ्या रंगाची, मोठी वेलची. तिच्या बिया भेंडीच्या बियांयेवढ्या टपोर्‍या असतात.

रेशमपट्टी खूप झणझणीत असते. रंग सुंदर लाल असतो. बहुतेक लोणच्यासाठी वापरतात.

खुप बरं केलंस गो... माझी सासू यावेळी मला द्यायलाच विसरली मा. मसाला. माहेरी फक्त बॅडगी मिरची पूड वापरतात. पण नवरा कसला खवय्या. त्याला या माम. ची सवय. धन्स गो खूप डिटेल्ड कृती दिल्याबद्दल आणि आईलाही!!!...:)

साधना, मसाल्याच्या कृती बद्दल तुला आणि तुझ्या आईंना धन्यवाद. इथे मिरच्या मिळणार नाहीत. पण बाकी जिन्नस आहेत. तेव्हा नुसताच मसाल करेन आणि शिजवतानावरून तिखट घालेन.

_/\_
I did this, using all Kashimiri mirchi powder,
excellent taste to all recipes,
Tons of Thanks,
wid Prayers,

फेसबूक वर रुचकर पदार्थ म्हणून गृप आहे. त्यात ही रेसिपी, फक्त 'सौजन्य मायबोली डॉट कॉम' असे लिहून जशीच्या तशी पेस्ट केली आहे. मी विचारल्यावर या पानाचे स्क्रीन शॉट टाक्लेत कॉमेंटमधे . :रागः

दोन आठवड्यांपूर्वी केला हा मसाला . एक किलो मिरचीच्या प्रमाणात करणे मला झेपले नसते. म्हणून मी असा तक्ता केला एक्सेल मधे आणि शंभर ग्रॅम मिरची च्या प्रमाणात केला.
रंग तर एकदम सुरेख आला आहे. फिश फ्राय साठी पहिल्यांदा वापरल्यावर बारका म्हणे 'धिस इज डिफरंट मसाला . आय लाइक इट.'. मग मायबोलीवर रेसिपी पाहून मी घरीच केलाय म्हटल्यावर पदार्थांची नावे इंग्रजीतून लिहून ही रेसिपी प्रिंट करुन ठेव Happy

बेडगी मिरची १ किलो 1000 Byadagi Mirchi 100
जाडी मिरची १/२ किलो (तिखटपणासाठी) 500 Thick Mirchi 50
काश्मिरी मिरची १/४ किलो (लालभडक रंगासाठी) 500 Kashmiri Mirchi 50
धणे १/४ किलो 250 Corriander seeds 25
खसखस १/४ किलो 250 Poppy Seeds 25
दालचिनी २० ग्रॅम 20 Cinnamon 2
लवंग २० ग्रॅम 20 Clovers 2
मिरी २० ग्रॅम 20 Pepper 2
सफेद जायपत्री १० ग्रॅम 10 Jaaypatri - white 1
जायफळ २ नग 2 Nutmeg 0.25
हळकुंडे १०० ग्रॅम 100 Turmeric 10
जिरे ५० ग्रॅम 50 Cumin 5
शाहजिरे १० ग्रॅम 10 Black Cumin 1
चक्रफुल १० ग्रॅम 10 Star Anise 1
दगडफुल १० ग्रॅम 10 Dagad ful 1
मसाला वेलची १० ग्रॅम 10 Big cardamom 1
तमालपत्र १० ग्रॅम 10 Bay leaves 1
बडिशेप १०० ग्रॅम 100 Fennel 10
खड्याचा हिंग १०० ग्रॅम 100 Asa Foetida 10

मी घरीच ऑस्टर ब्लेंडर अन त्यावर बसणारं भारतातून आणलेलं भांडं वापरुन दळला. त्यात एका वेळेस सगळं सामान मावलं नसतं . ४-५ वेळा राउंडस मधे सर्व वाटून एका मिक्सिंग बोल मधे एकत्र केलं. मग बारीक चाळणीतून गाळून घेतलं सर्व .

अरे वा मेधा, ग्रेट.

मी मध्यंतरी थोडे वेगळे मसाले बनवलेले, पण शेवटी ह्याच मसाल्या वर परतोनी आले .. थोडी काश्मिरी मिरची वापरलीकि सुरेख रंग येतो.

बाकि एक्सेल शीट साठी ____/\____ Happy

मस्तच, मी आतापासून मसाले घरीच बनवणार आहे, आयत्या मसाल्यात खुप शिसं असतं म्हणे पण ते मूळ मसाल्याच्या जिन्नसांतच असतं कि बनवताना पडतं ते माहीत नाही पण घरचा मसाला मस्तच लागेल.

मूळ जिन्नस जितक्या प्रमाणात घ्यायचे होते ते ग्रॅम्समधे लिहिले एका कॉलम मधे. मग त्याला १० ने भागून शेवटच्या कॉलम मधे टाकले. त्या शेवटच्या कॉलम मधल्या मापाने बनवला मसाला .
किचनच्या खिडक्या उघड्या ठेवून, मंद आचेवर भाजले सगळे पदार्थ. पूर्ण थंड झाल्यावर मग मिक्सरमधून काढले.
चाळून बरणीत भरताना थोड्या शिंका आल्या खर्‍या . मुलं घरी नव्हती तेंव्हा उरकून घेतलं .

मनी, मी धणे जिरे पूड, गोडा मसाला, गरम मसाला, सांबार मसाला घरीच करते आहे गेले काही वर्षे . शिसे वगैरे माहिती नाही, पण घटक पदार्थांच्या क्वालिटी वर आपला कंट्रोल असतो. शिवाय लागेल तसा थोडा थोडा मसाला केला की ताजा रहातो . पावभाजी मसाला, चाट मसाला, हलीम मसाला, धनसाक मसाला असे विकतचे पण असतातच . सर्वच मसाले घरी करण्याइतकी माझी जिगर नाही Happy

मी धणे जिरे पुडीसकट सगळे मसाले घरीच करते. एकतर आपल्याला लागतात एवढुस्से, त्यामुळे ग्रॅम्समध्ये साहित्य आणले तरी पुरते आणि ताजे मसाले मिळतात. संपले की परत साहित्य आणुन करायचे. लाल मिरची पुडही मी काश्मिरी मिरच्या विकत आणुन करते. रंगाबरोबर सुंदर वासही येतो घरच्या मिरची पुडीला.

मेधा, पाकृचोरीबद्दल तुझी तिथली पोस्ट बघितल्यावर जागुने सांगितलेले मला. पण तो ग्रुप क्लोजड आहे त्यामुळे मला तिथे काही कमेंट अरता आली नाही. मायबोलीवर टाकलेले फोटो, रेसिपीज, लेख खुप वेळा चोरीला गेल्लेले आहेत. हल्लीच जागुची एक रेसिपी अशीच एकाने टाकली आणि वर खुप उद्दामपणे वागत होता. शशांक पुरंदरेंचा लेख एकाने स्वतःचा म्हणुन एका पेपराच्या ए-आवृत्तीत छापलेला. सांगितल्यावर त्यांनी लेख काढला.

मायबोलीवरचे साहित्य कॉपीपेस्ट करता येऊ नये यासाठी प्र्शासकांनी काहीतरी उपाय करणे गरजेचे आहे.

साधना मीही सर्व मसाले घरीच करते. फक्त वर्षाचा काळा/गोडा मसाला डंखावरून दळून आणते. तो जास्त लागतो ना...मुलांकडे देण्यासाठी आणि एकंदरीतच घरच्या वापरालाही.
बाकी गरम मसाला, सांबार मसाला , इतर पुडीही घरीच.

हो, मीही मालवणी मसाला, मिरची पूड कुटून घेते डंखावरून, चव खूप सुंदर येते त्याने. बाकी धने जिरे पूड वगैरे घरी

साधना,
मिरची पूड करताना मिरच्यांचे वर दिल्याप्रमाणेच प्रमाण घ्यायचे का? मी मिरची पूड करताना संकेश्वरी आणि बेडगी वापरते.

मिरची पुडीला तू घेतेस त्या मिरच्याही चालतात, फक्त लालभडक रंगासाठी त्यात पाव किलो काश्मिरी मिरच्या घाल. मिरची पूड बनवताना मिरच्या भाजायच्या नाहीत, फक्त कडकडीत सुकवून घ्यायच्या. कटकन तुकडा पडायला हवा मिरचीचा.

धन्यवाद साधना.
जाडी मिरचीलिहिली आहेस त्याला पांडी मिरची म्हणतात.यावेळी पाहू कधी मि.पू.करायचा योग येतो ते.माझ्या बाईच्या सोयीने करायला हवी.अंबारी मिरचीपूड पण मस्त मिळते/लागते..

साधना, घरच्या अस्सल मसाल्याची सर खरच बाहेरच्या विकतच्या मसाल्यांना नसते. तुमच्या घरगुती सर्वच पाकृ मी वाचत असते.
आपापल्या आई, आजी, आणि इतर जेष्ठ महिला वर्ग हयात असतानाच हा अनमोल ठेवा सर्वांनी संग्रहीत करावा म्हणजे आपल्या पुढील पिढ्यांना त्याचा अभिमानाने उपयोग करता येईल.