१५ मार्च - जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने...

Submitted by मुंबई ग्राहक पं... on 10 March, 2016 - 21:33

"ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा राजा आहे; उत्पादक, व्यापारी, सेवांचे पुरवठादार इ. वर्गांचा तो पोशिंदा आहे, त्याच्या मागणीमुळे अर्थव्यवस्थेच्या चक्राला गती मिळते इ. वाक्ये अर्थशास्त्राच्या पुस्तकात वाचतांना मन सुखावते. मात्र प्रत्यक्ष व्यवहारात ग्राहकाला कशी वागणूक दिली जाते याचे दर्शन याच संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या सत्यकथांवरून घडते. ग्राहकाचे अर्थव्यवस्थेतील मध्यवर्ती स्थान आणि त्याचे मूलभूत हक्क यांचा प्रथम उच्चार केला तो अमेरिकेचे प्रे. जॉन एफ. केनेडी यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून तेथील प्रतीनिधीगृहात १५ मार्च १९६२ रोजी केलेल्या पहिल्या भाषणात! आपण सर्वजण ग्राहक आहोत. परंतु सर्वात मोठा गट असूनही ग्राहकांचे मत सहसा ऐकून घेतले जात नाही अशी खंत व्यक्त करून त्यांनी ग्राहकांच्या चार हक्काची सनद मांडली. सुरक्षिततेचा हक्क, माहिती मिळण्याचा हक्क, आपल्या पसंतीच्या वस्तू व सेवा निवडण्याचा हक्क व ग्राहकांवर परिणाम करणारे निर्णय घेण्यापूर्वी मत ऐकले जाण्याचा हक्क हे ते चार हक्क होत. नंतरच्या काळात त्यात तक्रार निवारणाचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क, आरोग्यपूर्ण पर्यावरणाचा हक्क आणि मूलभूत गरजा भागवल्या जाण्याचा हक्क या चार हक्कांची भर पडली. यापैकी पहिल्या सात हक्कांचा समावेश ग्राहक संरक्षण कायद्यात केलेला असून त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी परिषदांचीही तरतूद त्यात केलेली आहे.

मात्र ग्राहकांना हे हक्क आहेत याची जाणीव वस्तू व सेवांचे उत्पादक, व्यापारी, जाहिरातदार, शासन आणि खुद्द ग्राहक यांनाही नाही ही वस्तुस्थिती केवळ भारतातच नाही तर थोड्या फार फरकाने जगात सर्वत्र आहे. त्यामुळे १९८३ पासून आंतरराष्ट्रीय ग्राहक संघटनेच्या (Consumer International) सूचनेनुसार दरवर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून पाळला जातो. त्याला केवळ उत्सवी स्वरूप येऊ नये म्हणून संघटना दरवर्षी ग्राहकांच्या दृष्टीने महत्वाचा एक विषय जाहीर करते. त्यावर सभासद संघटनांनी वर्षभर काम करून वर्षाअखेरीस आपला अहवाल सादर करावा अशी अपेक्षा असते. (मात्र सभासद आपल्या सोयीने व आपल्या कार्यक्षेत्राच्या गरजेनुसार अन्य विषयही निवडू शकतात) या वर्षासाठी जाहीर केलेला विषय आहे Antibiotics off the Menu (अन्नसाखळीतून/आहारातून प्रतिजैविके हद्दपार करा) याची पार्श्वभूमी अशी की जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, जंतुसंसर्गावर परिणामकारक ठरणारी प्रतिजैविके (antibiotics) त्यांच्या अतिरेकी सेवनामुळे निष्प्रभ ठरू लागली आहेत. याचे कारण असे की अलीकडच्या काळात खाद्य उत्पादनासाठी वाढवल्या जाणाऱ्यां जनावरांना मोठ्या प्रमाणावर प्रतिजैविके दिली जात आहेत. ही प्रतिजैविके चिकन, मांस या सामिष आहारातून आपल्या पोटात थोड्या प्रमाणात पण सातत्याने जातात. त्यामुळे पूर्वी जी प्रतिजैविके, ज्या प्रमाणात परिणामकारक ठरत होती ती आता निष्प्रभ ठरत आहेत. त्यामुळे आणखी जास्त क्षमतेची प्रतिजैविके वापरावी लागतात. या बाबतीत ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि McDonalds, Subway व KFC सारख्या जगभर मोठ्या संख्येने दालने असलेल्या कंपन्यांना अशा मांसाचा त्यांच्या खाद्यपदार्थात वापर न करण्याचे आवाहन करणे असे या कार्यक्रमाचे स्वरुप असेल.

मुंबई ग्राहक पंचायतीने गेल्या वर्षभरात बृहन्मुंबई, ठाणे, कोकण, पुणे इ. विभागात "शुद्ध दुध आपला हक्क" हे अभियान राबवण्यास सुरवात केली आहे. त्यातील ६५० नमुन्यांच्या पाहणीवर आधारित एक अहवालही संस्थेने प्रसिद्ध केला आहे. त्यातील महत्वाचे निष्कर्ष असे .......
*३०% नमुन्यात भेसळ आढळली.
*५०% नमुने शासनाने निर्धारित केलेल्या मानकांपेक्षा (standards) कमी दर्जाचे होते.
*२५% नमुन्यांमध्ये पाण्याची भेसळ आढळली.
* ५% नमुन्यांमध्ये युरिया, स्टार्च, साखर इ. ची भेसळ होती.
दुधातील भेसळीचा हा विषय विशेषतः बाल आणि वृद्ध ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महात्वाचा असल्याने पंचायतीच्या पुणे विभागाने याच प्रश्नाचा पाठपुरावा करण्याचे ठरवले आहे. दूध भेसळीबद्दल जागृती व कृति करण्याच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून १५ मार्च २०१६ रोजी एक जाहीर सभा विभागाने आयोजित केली आहे. त्यात दुधातील भेसळ घरच्याघरी कशी ओळखता येईल याचे प्रात्यक्षिक शासकीय प्रयोगशाळेतील तज्ञ दाखवणार आहेत. प्रमुख पाहुणे मा. शशिकांत केकरे (सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन) हे दुधातील भेसळ, त्यासंबंधीचे तक्रारनिवारण, इ. बाबतीत मार्गदर्शन करतील. तर पोलिस खात्याचे प्रतीनिधी तक्रारनिवारणातील त्यांच्या सहभागाबद्दल माहिती देतील.

वरील कार्यक्रम मंगळवार दि. १५ मार्च रोजी दुपारी ३ ते ६ या वेळात विशाल सह्याद्री सभागृह, हॉटेल विश्व समोर, टिळक रोड येथे होईल. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. उपस्थित राहू इच्छिणाऱ्या ग्राहकांनी खालील मोबाइल क्रमांकावर पूर्वसूचना दिल्यास सोयीचे होईल.
श्रीमती छाया वारंगे --- ९५५२५९८८५१
श्री . मिलिंद चुटके --- ९९६०३९११११
श्रीमती ललिता कुलकर्णी --- ९७६७२१८५९१

मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग

#WCRD

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सप्रेम नमस्कार ,
दुधाच्या अहवालासंबंधी आलेल्या प्रश्नाचे उत्तर या अभियानाच्या प्रमुख शुभदा चौकर यांच्याशी चर्चा करून देत आहे .
" चाचण्यांसाठी वापरलेला चाचणी संच National Dairy Development Board ( N.D.D.B. )चा Reagent Kit तसेच analyser प्रमाणित होता . ही तपासणी आमच्या ग्राहक जागृती कार्यक्रमाच्या संदर्भात केलेली होती . ब्रांड नेमसह अहवाल प्रसिद्ध करावयाचा असेल तर शासनाच्या आधिकृत प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी लागते . त्यामुळे आम्ही प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये ब्रांडसचा उल्लेख नाही ."