शब्दपुष्पांजली - मला आवडलेली गोनीदांच्या "पडघवली" मधील व्यक्तिरेखा - अंबावहिनी

Submitted by शुगोल on 29 February, 2016 - 23:19

काही वर्षांपूर्वी एक कादंबरी अभिवाचन ऐकायचा योग आला. कादंबरी होती गो. नी. दांडेकर लिखीत "पडघवली." हे अप्रतिम अभिवाचन केलं होतं त्यांची कन्या वीणा देव व त्यांचे कुटुंबीय यांनी. आधीच आवडती कादंबरी पुन्हा एकदा मनात ठसली.

"पडघवली" पहिल्यांदा वाचली तेव्हा आवडलं होतं गोनीदांनी केलेलं "पडघवली"चं, कधीही न पाहिलेल्या कोकणाचं वर्णन. त्यांची ओघवती भाषा. काही वर्षांनी पुन्हा वाचली तेव्हा अगदी भिडली कादंबरीची नायिका "अंबावहिनी."

१९५०चं दशक. कोकणपट्टीतील एक गाव. निसर्गाने आपलं वैभव अनंत हस्ते जिच्यावर उधळलंय अशी पडघवली. घनदाट जंगल झाडी. त्याला नारळी पोफळीची डौलदार झालर. अशा या सुंदर गावी आली एक देखणी, गोरीपान आठ वर्षाची पोर. लग्न म्हणजे काय हे न कळायच्या वयातच लग्न होऊन तिनी पडघवलीतील आपल्या घराचा ऊंबरठा ओलांडला. तीच ही अंबा किंवा अंबूवहिनी. तिचं माहेरघर दाभोळखाडीपासून दहा कोस आत. पाण्याचं सततचं दुर्भिक्ष. अशा रुक्ष गावातून अंबा आली ते हिरव्यागार पडघवलीमधे. अष्टौप्रहर वाहणारा थंड पाण्याचा पन्हाळ बघून ती हरखली. घरी बरोबरीचे नणंद आणि दीर, गणुभावजी. हे तिचे खेळ सवंगडी. सासुबाई आणि मामंजी. अगदी प्रेमळ. वयाच्या दहाव्या वर्षी विधवा होऊन माघारी आलेल्या आतेसासुबाईंची आईविना वाढलेल्या अंबेवर अपार माया होती. अंबेचं घर हे गावकीतलं मुख्य घर. तिचे मामंजी खोत होते न गावचे! घरासमोर अंगण, मागं परसू, भोताली नारळी-पोफळीच्या बागा. पावसाळ्याचे चार महिने सोडले तर एरवी सात आठ महिने अंगणात मांडव. खाली सावली आणि वर वाळवणं. पोफळं, आमसुलं, साठं, कडवे वाल, गरे, आंबोशी, केळ्याचे काप, कडधान्य अन् काय काय. पडघवलीतलं प्रत्येक घर असंच खपत असे.

अशा या कामसू गावाला त्यांच्या नव्या खोतीणीचा फार आदर होता. अंबावहिनी होतीही तशीच! मनमिळावू, प्रेमळ, गावाविषयी आत्मीयता असणारी. आतेसासूबाईंकडुन शिकलेल्या, झाडपाल्याच्या औषधांनी, तिनी कितीतरी गाववाल्यांना बरं केलं होतं आणि अनेक बाळंतिणींना सोडवलं होतं. अंबेचा नवरा महादेव, तिची खूप काळजी घ्यायचा. बोलून दाखवलं नाही तरी त्याला अंबेचं कौतुक असावं. मात्र अंबेला जशी गावासाठी कळकळ होती तशी काही त्याला नव्हती. तो स्वार्थी नव्हता पण जरा आपल्यापुरतं पहाणारा होता.अंबेला याचं आश्चर्य वाटे. गावच्या खोताचा मुलगा ना हा? असा कसा?

गावकर्‍यांमधे अंबूवहिनीचा आणखी एक भरभक्कम आधार होता. तो म्हणजे गुजाभावजी. गुजा हाअंबूचा नवरा, महादेव याचा अगदी जवळचा मित्र. महादेवाबरोबरच अंबूचीही गुजाशी छान मैत्री झाली. गावावरची अपार माया आणि कळकळ हा यांच्या मैत्रीतला दुवा. जिथे नवर्‍याबरोबर चारचौघात दोन शब्द बोलणं म्हणजे अगोचरपणा मानला जाई असा काळ तो. अशा काळी नवर्‍याच्या मित्राशी मैत्री? अशक्यच! पण "पडघवली" वेगळी होती. गुजाभावजी आणि अंबूवहिनी यांची निर्मळ आणि नितळ मैत्री पडघवलीच्या गावकर्‍यांनाच काय पण खुद्द महादेवाला देखील मान्य होती. त्यांच्या ह्या विश्वासाला तडा जाईल असं वर्तन गुजा आणि अम्बूकडुन कधी घडलं नाही.

दृष्ट लागावी असं सगळं. आणि ती लागलीच, अंबेचा चुलतदीर, व्यंकुभावजीच्या रूपानी. अंबेला माणसांची उत्तम पारख होती. तिला पहिल्यापासूनच व्यंकुच्या कारनाम्यांची शंका यायची. तिचा संशय दरवेळी खरा ठरे. पण तिच्या नवर्‍याचं, भावावरील आंधळं प्रेम हेच अंबेचं मोठं दु:ख होतं. बाहेरख्यालीपणा, गावातील लोकांच्या पैशांच्या अफरातफरी करणं, बेकायदेशीर जंगलतोड करणं.. अशा सगळ्या व्यंकूच्या कारवाया बघूनही आपला नवरा काही करत नाही म्हणून अंबू व्यथित होत असे. नवर्‍याचं नाकर्तेपण तिलाअसह्य होत असे. पण ही व्यथाच तिला दिवसेंदिवस खंबीर बनवत होती. या सगळ्या कोंडमार्‍याचा स्फोट व्हायचा तो झालाच एके दिवशी.

व्यंकूनी सिमेंटचा बांध घालून महादेवाच्या आणि गावातील इतरांच्या बागेचं पाणी अडवलं. तो बांध फोडायला अंबा स्वतः हातात कुदळ घेवून निघाली. अंबेचा तो अवतार बघून नवरा चरकला, पण स्वतः गेला नाही. मात्र तिलाही
अडवलं नाही. इतर काही गावकरी मदतीला आले आणि बांध फोडला गेला. अंबेनी सार्‍या गावासाठी पाणी वाहातं केलं. व्यंकुनी गावकर्‍यांचा वानवळा मुंबईला नेऊन विकला. गावकर्‍यांना बोटी बुडाल्या असं सांगून त्यांचे पैसे हडप केले. हे प्रकरण मात्र महादेवाला खूप लागलं. स्वतःच्या खोत असण्याची त्याला जाणीव झाली. त्यानी जमीनीचा तुकडा विकून गाववाल्यांना नुकसान भरपाई दिली. कोण अभिमान वाटला अंबूला नवर्‍याचा. मनातून ती फार फार सुखावली. महादेवानी मात्र ह्या प्रकरणाचा धसका घेतला आणि त्यातुन तो सावरलाच नाही.

महादेवानंतर अंबेनी गुजाभावजीच्या मदतीनी मुलग्याचं शिक्षण केलं. आधी तालुक्याला आणि मग मुंबईला. गुजाला अंबेच्या कर्तृत्वाची जाण होती आणि आदरही. त्याच्यासारखा ताकदवान गडी. कोणा गुरूची दीक्षा घेतली. मग तो गावातील चांगल्या कामासाठी देखील त्याच्या ताकदीचा वापर करेनासा झाला. यासाठी अंबा त्याची वेळोवेळी निर्भत्सना करे. तिची पडघवलीची ओढ व कळकळ समजून गुजा शेवटी ती सांगेल ते काम करायला तयार होई. अगदी गुरुवचनभंगाचा प्रमाद पत्करुन सुद्धा.

व्यंकुच्या कारवायांनी पडघवलीला उतरती कळा लागलीच होती. तरूणाई नोकरी धंद्याच्या नावाखाली गाव सोडून जात होती. त्यात भर म्हणून की काय महाभयंकर असं जौळ(वादळ) आलं. त्यानी तर पडघवलीची उरली सुरली रया पण घालवली. या जौळात या खोतांच्या दारचं सर्वात जुनं आंब्याचं झाड जमीनदोस्त झालं. गणुभावजी हळहळला. एरव्ही एवढ्या तेव्हढ्यासाठी जीव पाखडणारी अंबावहिनी. पण तिनी गणुची समजूत घातली, "काय राह्यलंय जुनं त आंब्यासाठी रडायचं? सगळं जातंय. जाऊ दे!" अंबेच्या तोंडचे हे पहिलेच निराश उद्गार! याच जौळात शेजार्‍यानी मदत न केल्यामुळे गावातल्या वृध्द यादोकाकी आणि त्यांची वासरी यांचा अंत झाला. अंबेला, गावानी तिच्यावर केलेला हा शेवटचा घावच वाटला आणि तिनी गाव सोडायचा ठरवलं.

पण पडघवली सोडून जाणार कुठे? मुंबईला? मुलग्याकडे? नाही नाही. अंबेची पराकोटीची घालमेल सुरू झाली. मामंजी- आतेसासुबाई- महादेव- यांची पडघवली? साक्षात पडघवली? वाडवडीलांनी वसवलेली पडघवली? माडापोफळांनी झाकलेली पडघवली? सोडायची? नाही! नाही!! अंबेला हे सहन झालं नाही. अंबूवहिनी माघारी फिरली. पडघवलीला कधीही अंतर द्यायचं नाही हे ठरवून माघारी फिरली.

अशी ही गावकर्‍यांशी आणि त्याहूनही जास्त गावाशी एकनिष्ठ असलेली अंबा. ज्या मातीत वाढली त्या मातीशी बेईमानी न करणारी अंबा. परपुरुषाशी निखळ व निर्मळ मैत्री कशी असावी हे दाखवून देणारी अंबा. खेडयातल्या आपल्या जीर्णशीर्ण, कोसळू पहाणार्‍या घरकुलांकडे लक्ष पुरवा हा संदेश देणारी अंबा. १९५० च्या दशकातला हा संदेश आजच्या काळातही किती तंतोतंत लागू पडतोय! ग्रामसंस्था उध्वस्त होत आहेत. परंपरागत चालत आलेले व्यवसाय सोडून माणसं नवनवीन व्यवसायांचे मनोरे रचू पहात आहेत. खेडोपाड्यातील सर्जनशील मनुष्यशक्ति शहरात विलीन होते आहे. पण हे होताना जुनी समाजव्यवस्था मोडली तर नवी रूढ होणार का? झाली तर ती कशी असेल? तिथे समाजव्यवस्थेबरोबर माणुसकीचे संकेत पाळले जाणार आहेत का? "जुने जाऊ द्या मरणालागून, जाळूनी किंवा पुरूनी टाका, सावध ऐका पुढल्या हाका" हे तर खरेच! पण ही नवी पिढी ऐकण्यातला "सावध"पणा जाणेल का? या आणि अशा अनेक प्रश्नांचे समाधानकारक उत्तर मिळेल का? हो! नक्कीच मिळेल!! त्यासाठी अशा हजारो अंबावहिनी मात्र तयार व्हायला हव्यात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुगोल, छान ओळख करून दिलीत. माझ्या खूप आजारी पडून अंथरुणाला खिळलेल्या आतेला मी रोज थोडी थोडी अशी ही कादंबरी वाचून दाखवत असे. त्यात तिचा वेळ चांगला जाई, आजारपण विसरून ती कादंबरीतल्या पात्रांचा विचार करत राही. त्यांच्याविषयी बोलत राही. तिला आजारातून बरे करण्यात 'पडघवली'चा आणि 'स्वामी'चाही हात होता. त्यामुळे पडघवली मला खास जवळची आहे.

फार सुंदर.. या कादंबरीला फार वर्षांपूर्वी दूरदर्शनवर दृष्य रुप दिले होते. त्यातले काही भागच मला पाहता आले ( नंतर मी परदेशी गेलो ) स्मिता जयकर, रोहिणी हत्तंगडी, सुमन धर्माधिकारी, माधव वझे... असे उत्तम कलाकार होते त्यात. हा अगदि १९८९ चा सुमार असावा.

या कादंबरीला फार वर्षांपूर्वी दूरदर्शनवर दृष्य रुप दिले होते.>>> कुछ खोया कुछ पाया. यादोंकी धुंदले दर्पन में कुछ खोया है कुछ पाया है... रोहिणी हट्टंगडी = अंबूवहिनी.

हो दिनेशदा.. कुछ खोया कुछ पाया नाव होत मालिकेच.

शुगोल, मस्त.. पडघवली पुन्हा उभी केलीत डोळ्यासमोर.

गजानन, किती छान! अगदी मर्मबंधातली आठवण आहे तुमची!

अशा सुंदर आठवणीच आपलं आयुष्य समृद्ध करत असतात.

पडघवलीतले ते गाव वसवतानाचे वर्णन अप्रतिम आहे. आज आपण शहरात राहतो. गावे पण वसलेलीच आहेत. पण त्यांची सुरुवात किती कष्टांनी झाली असेल याची पुरेपुर कल्पना गोनीदा देतात.

तुमचा लेख सुंदर आहे.

आभार प्रज्ञा,
त्याकाळातले चित्रीकरण खुपसे कादंबरीशी प्रामाणिक होते. आजकालच्या मालिकेत असतात तसे ढॅण ढॅण संगीत, ठोकळेबाज अभिनय, अनावश्यक क्लोज अप्स, अनैसर्गिक संवादशैली नव्हती. भाषा हिंदी होती तरी मराठी वातावरण छान पकडले होते. माधव वझे ( श्यामची आई मधले श्याम ) बर्‍याच वर्षांनी दिसले होते.

दिनेश, प्रज्ञा९ , दोघांचेही खूप आभार. पडघवलीवर आधारित मालिका होती हे मला माहितच नव्हते. दिनेश मी तुमच्याही आधी भारताबाहेर गेले.

रोहिणी हट्टंगडीनी अंबूवहिनीच्या भूमिकेचं नक्कीच सोनं केलं असणार. याजुन्या मालिका पुनःप्रक्षेपित करायला हव्या. कमीतकमी यूट्यूबवर टाकायला हव्या किंवा त्याच्या सीडीतरी काढायला हव्यात.

सुंदर लेख! माझ्या बाबांची आवडती कादंबरी!
जुन्या मालिका बघता येतील असे काहीतरी केले पाहिजे >>+१११

शुगोल, अगदी खरंय.. पण फक्त भारत एक खोज सिडीवर दिसली. तमस यू ट्यूबवर आहे. मला वाटतं, कुछ खोया कुछ पाया चे शीर्षकगीत लता मंगेशकरने गायले होते. रथचक्र वर पण मालिका आली होती, तिचे शीर्षकगीत आशा भोसले ने गायले होते.

Pages