शब्दपुष्पांजली - विषय पहिला: कुणा एकाची भ्रमणगाथा/ यशोदा

Submitted by जिज्ञासा on 26 February, 2016 - 23:56

गोनीदांची पुस्तके वाचणे हा नेहमीच आनंददायी अनुभव असतो. अफाट शब्दकळा, चित्रदर्शी भाषा आणि पुनःपुन्हा वाचले तरी काहीतरी नवीन सापडेल अशी साहित्यिक समृद्धी. ह्या साऱ्याबरोबर गोनीदांच्या लेखनाचं खास वैशिष्ठ्य म्हणजे त्यातील अनुभवांचा अस्सलपणा. आता शाळा कॉलेजचं तोंडही न पाहता आयुष्याच्या शाळेत धडे गिरवलेल्या व्यक्तीच्या लेखनात हा अस्सलपणा न येता तरच नवल.

शाळेत असताना माचीवरला बुधा, पवनेकाठचा धोंडी, शितू, जैत रे जैत, दास डोंगरी राहतो, पडघवली ह्या कादंबऱ्यांमधून गोनीदांच्या लेखनाचा परिचय झाला होता. पण ह्या सर्व कादंबऱ्यांच्या बाजापेक्षा निराळ्या बाजाचे गोनीदांचे पुस्तक एके दिवशी माझ्या हाती लागले - कुणा एकाची भ्रमणगाथा. ह्या पुस्तकाची मी पहिल्यांदा वाचलेली प्रत होती माझ्या आईची - तिने तिच्या कॉलेजच्या दिवसांत सेकंडहँड विकत घेतलेली. त्या बांधणी खिळखिळी झालेल्या पुस्तकाने मला आजवर बांधून ठेवले आहे! अर्थात माझ्या आवडत्या दहात याचा समावेश आहेच.

कुणा एकाची भ्रमणगाथा मराठीतले एक अभिजात पुस्तक आहे. वयाच्या तेराव्या वर्षी घर सोडून पळालेल्या कुणा एकाची, जो जगाच्या रगाड्यात धक्के खात, बरे वाईट अनुभव घेत आता नर्मदा परिक्रमेला निघाला आहे - त्याची कहाणी. त्याच्या परिक्रमेत त्याला भेटणाऱ्या माणसांची कहाणी. त्या कुणा एकाशी जुळणारी स्वतः गोनीदांच्या आयुष्याची गोष्ट आहे हे मला फार उशिरा कळलं.

ह्या पुस्तकाची जादू अशी की पुस्तक वाचताना आपण केवळ वाचक रहात नाही तर त्या कुणा एकाचे सोबती बनून जातो. कारण ह्या पुस्तकाची मांडणी फार मजेदार आणि हटके आहे - स्वतःशीच बोलल्यासारखी. निवेदनात्मक शैली वापरणं काही नवीन नाही पण हे प्रथमपुरुषी असलं तरी हे खरंतर निवेदन नाही. हा कुणी एक जणू स्वतःशीच बोलतो आहे. कुणी ऐकायला आहे/नाही ह्याची फिकीर न करता. बरेचदा ते स्वगत आहे आणि कधी कधी स्वसंवाद.

गोनीदांच्या चित्रदर्शी वर्णनशैलीमुळे वाचता वाचता तुम्ही त्या प्रसंगी तिथे जाऊन पोहोचता. मग नर्मदेवर येऊन पुर्र पुर्र करीत पाणी पिणारं सरस्वतीचं वाहन आपणही तिथेच वाळवंटात झोपून हातभर अंतरावरून धडधडत्या हृदयाने पाहू लागतो. नाशिकला ब्राह्मणांच्या पंगतीच्या पंगती ताटभर सुग्रास अन्न जेवून उठत असताना भुकेल्या पोटी बाहेर फेकल्या जाणाऱ्या अन्नाकडे आणि पत्रावळीच्या ढिगाकडे आपणही त्याच नजरेने पाहू लागतो - इतके अगतिक, असहाय्य आणि पोटात आगीचा डोंब उठल्यासारखे वाटायला लागणे - केवळ कागदावरच्या ओळी वाचून - ही केवळ उत्तम साहित्याची अनुभूती!

निसर्गाचे वर्णन तर गोनीदांचा हातखंडा. मात्र कुणा एकाची मध्ये निसर्ग मधून मधूनच डोकावतो. वैशाखाचा फुफाटा आणि सतत सोबतीला असणारी रेवामैया ह्यांच्या वर्णनांतून. एरवी कुणा एकाला भेटणाऱ्या मनुष्याप्राण्याशी आपली गाठ अधिक पडते. माणसांच्या ना ना तऱ्हा - मनुष्य स्वभावाचे अजब नमुने -भली, बुरी, रागीट, प्रेमळ, स्वार्थी, उदार हरप्रकारची माणसं - जणू छोटं विश्वरूपदर्शनच. ह्या बरोबरीने बोली भाषांचे विविध नमुने, विशेषतः नर्मदेकाठची बोली हिंदी ("कूणं गांव? परिकम्मावासी हो?" )कादंबरीचा काळ साधारणतः १९४०-५० चं दशक असावा. त्या काळाचं समर्थ चित्रण पुस्तकात आहे - त्या काळची मुंबई, त्या काळचं नाशिक, नर्मदातीरावरची वस्ती, साधुजनांच्या मठ्या. ह्या पुस्तकाचा पसारा अफाट आहे म्हणूनच आजवर अनेक पारायणं करूनसुद्धा हे पुस्तक दरवेळी मला नवीन काहीतरी शिकवतं.

गोनीदांनी हे पुस्तक वेदनेला अर्पण केले आहे - ती युगा अठ्ठावीसांची वेदना. पहिल्या एका पानावर गोनीदांनी लिहिले आहे – “कुंतीने देवाकडे विपत्ती मागितली. देव म्हणाला तथास्तु. त्या देवदत्त दानाने विश्व भावसमृध्द झालं आहे.” कुणा एकाची मध्ये अर्पणपत्रिकेतल्या वेदनेची असंख्य रूपं आहेत. पहिल्यांदा वाचताना काही प्रसंग तर अक्षरशः अंगावर आले होते. आयुष्याच्या विदृपतेचं अत्यंत poignant (मराठी शब्द?) दर्शन ह्या पुस्तकातून घडतं. ह्या वेदनेने, दुःखाने भरलेल्या आयुष्याचा अर्थ तरी काय ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणारे अनेक उतारे आहेत - त्या कुणा एकाची स्वगतं. पुस्तकांत मानवी वेदनांचं गहिरं दर्शन असलं तरी पुस्तकाचा सूर उदास नाही. एरवी परदुःख शीतल भासत असले तरी ह्या वाटेवरचे सहप्रवासी म्हणून आपण वेदनेची सहानुभूती घेतो तेव्हा आपल्याला वेदनेपेक्षा वात्सल्याची, करुणेची अधिक जाणीव होते. हे पुस्तक वाचल्यावर आपण अधिक चांगले माणूस होतो असे मला वाटते!

कुणा एकाची मधल्या एका व्यक्तिरेखेविषयी लिहायचे झाले तर मी यशोदेबद्दल लिहीन. यशोदा फार कमी बोलते. पण तरीही तिची कहाणी आपल्यापर्यंत पोहोचतेच. कारण दुर्दैवी आहे. स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी असं म्हटलं की जी दुःखं, ज्या वेदना एका स्त्रीच्या आयुष्यात आल्या असतील असे आपल्या मनात येते त्या यशोदेच्या कहाणीत हजर आहेत. बालवयात विवाह आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर अकाली वैधव्यामुळे माहेरी परत येणं - त्या काळच्या अनेक मुलींच्या नशिबी ही कहाणी लिहिली जायची त्यातलीच एक यशोदा. पण तरीही तिच्या दर्शनाने मला ती कधीच अबला वाटत नाही. दैवाचं दान अनुकूल नसताना देखील आयुष्याचा डाव खेळत रहायला एक धैर्य लागतं. ते यशोदेकडे आहे. यशोदा तिचा डाव मजबुरीतून खेळत नाहीये. ती मोठ्या निश्चयाने मिळालेलं दान स्विकारून आपलं आयुष्य जगत्येय. तिच्या परिघात शक्य असतील तितके choices घेण्याचं स्वातंत्र्य तिने अबाधित राखलंय. म्हणूनच एका अनोळखी, तरुण, तापाने फणफणलेल्या परिक्रमावासीला, त्या कुणा एकाला, तिचे बब्बाजी परगावी निघालेले असताना घरात ठेवून घेण्याचा, त्याची सुश्रुषा करण्याचा निश्चय ती बोलून दाखवते आणि निभावतेही. लोक काय म्हणतील ह्यापेक्षा यशोदेला आपल्या मनाची ग्वाही अधिक महत्वाची वाटते. हे सोपे नाही.

ह्या परीक्रमेतले यशोदेसोबत घालवलेले दिवस हे कोण्या एकाच्या आणि यशोदेच्याही आयुष्यातील मोलाचे दिवस आहेत. हे दोन अभागी जीव - ज्यांना लहान वयात अपार दुःख, वेदना सोसाव्या लागल्या (ज्याने दोघांना अकाली प्रौढत्व आले आहे) - ज्यांना आयुष्याने स्नेहापासून वंचित ठेवलं ते अक्षरशः 'यथा काष्ठं च काष्ठं च' अशाप्रकारे एकमेकांसमोर येतात. त्या दिवसांत त्यांच्यात जे स्नेहबंध निर्माण होतात ते मानवी नात्यांमध्ये क्वचित पहायला मिळतात. म्हणूनच कदाचित ही नाती नेहमी अनाम राहिली आहेत. '

यशोदा ज्ञानी आहे, व्यवहारचतुर आहे पण तरीही तिच्यात एक निरागस भोळेपणा दडलेला आहे. कारण तिने अजून हे जग पाहिलेलेच नाही. तिच्या मर्यादांनी आखून दिलेल्या वर्तुळातच तिचे आजवरचे आयुष्य गेले आहे. ह्याउलट तो कुणी एक - पायाला चक्र असल्यासारखा, आयुष्याची कोणतीही चौकट नसलेला, जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अनेक लबाड्या, दुष्कृत्ये पाहिलेला. यशोदेशी कधी कोणी कामाशिवाय फारसे बोलत नसावे. त्यामुळे ती अबोल, अंतर्मुख झाली आहे. आणि त्या कुणाला तर आपुलकीची, विचारपुशीची सवयच नाही. मात्र यशोदेसारखा श्रोता लाभताच तो तिच्यापाशी आपले मन मोकळे करू लागतो. तिलाही उत्सुकता आहे बाहेरच्या जगात डोकावण्याची. त्याच्या वाणीत तिलाही बोलतं करण्याचं सामर्थ्य आहे. त्यांच्यात संवाद सुरु होतो. तिच्याशी कोणी बोलणारं नाही आणि त्याला कोणी पुसणारं नाही. नियतीने एक सुंदर अवकाश या दोन जीवांना मिळवून दिला आहे. त्यांच्या ह्या संवादाचे मूक साक्षीदार म्हणजे आपण!

यशोदा उत्तम गृहिणी आहे. आभाळाएवढे दुःख पदरी पडूनही ती कडवट, उदासीन झालेली नाही. उलट बब्बाजींच्या पाठशाळेतल्या विद्यार्थ्यांवर तिची निरपेक्ष माया आहे, प्रेमळ धाक आहे - त्यांची ती आईप्रमाणे काळजी घेते आहे. तिच्या ह्या गुणांची, प्रेमाची, औदार्याची जाणीव त्या कुणा एकाला होते. त्याला हेही जाणवतं की यशोदेला किती गृहीत धरलं जातं. भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीत समाजातलं स्त्रियांचं दुय्यम स्थान आणि त्यापायी त्यांच्या वाट्याला येणारी दुखः हा विषय चिरंतन आहे. त्या दुःखाची जातकुळी ओळखणाऱ्या आणि त्याची जाण असलेल्या लेखकांमध्ये गोनीदांचे नाव अग्रभागी येईल. कदाचित म्हणूनच कुणा एकाची भ्रमणगाथा हे पुस्तक त्यांनी तिला अर्पण केले आहे - ती- युगा अठ्ठाविसांची वेदना.

असं शक्यच नाही की यशोदेला एका भटक्याला घरात ठेवून घेण्याचे परिणाम माहिती नव्हते. पण कदाचित त्या दोघांना याची कल्पना नसते की या काही दिवसांत त्यांच्यात स्नेहाचे बंध निर्माण होतील. दोघांना त्यांच्या मर्यादांची जाणीव आहे. तिला तिच्या जागेहून हलता येणार नाही. तिला वाटतं ह्याने बब्बाजींच्या पाठशाळेचा भार स्वीकारावा त्या निमित्ताने इथेच रहावं. पण तो भटका आहे - एका जागी स्थिरावणं त्याच्या प्रकृतीत नाही. शिवाय परिक्रमा? ती अर्धवट सोडता येणार नाही. त्याला निघावंच लागेल. त्याच्या मनात येतं एकदा तिला विचारावं, माझ्या बरोबर चल. तू नाव देशील ते नातं मला मान्य आहे. पण तो बोलू शकत नाही. जसं त्याला स्थिरावणं अशक्य तसं तिला बंडखोरी करून चौकटीबाहेर पडणं अशक्य. जेव्हा समाजाच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येते तेव्हा ती त्याला साफ सांगते - "भैय्या तुम्ही परिक्रमेला निघा!" तिचा विश्वास आहे स्वतःवर, स्वतःच्या निर्णयांवर. त्याक्षणी आपल्याला यशोदेच्या आत्मबलाची जाणीव होते. आणि तो कुणी एक पुनःश्च परीक्रमेसाठी बाहेर पडतो. ह्या बिंदूवर येऊन कादंबरी संपते. पण केवळ कागदावर संपते. आपल्या मनात तर ती चालूच रहाते - आयुष्यभर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवांतर तरीही महत्वाचे!
१. मुखपृष्ठापासून वाचनीय अशी ही कादंबरी आहे. ह्या म भा दिच्या निमित्ताने पुन्हा एकदा पुस्तक उघडताना सुरुवातीच्या पानावर 'कुणा एकाची भ्रमणगाथा - प्रथम पर्व' हे दृष्टीस पडले आणि चमकले. म्हणजे ह्या कादंबरीचं दुसरं पर्व लिहायचं गोनीदांच्या मनात होतं का? त्यांनी ते लिहिले का? कुठलं पुस्तक आहे ते?

२. इंग्रजी साहित्यामध्ये fan fiction हा एक लोकप्रिय प्रकार आहे.अनेक उत्तमोत्तम पुस्तकांचे (सिनेमा आणि टीव्ही मालिका यांचे ही) चाहते ह्या प्रकारात लिहित असतात. मराठीत असं फार पहायला मिळत नाही. मध्यंतरी जी. ए.च्या एका कथेवर आधारीत एक कथा मायबोलीवर आली होती. मला नेहमी वाटतं की गोनीदा यांच्या कादंबऱ्या ह्या ideal fan fiction material आहेत.

३. मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

जिज्ञासा , अशा साहित्यकृती म्हणजे आशयाचं शिवधनुष्य. ते पेललं आहेस. रचनेची ताकद तुझ्या रसग्रहणात प्रकटली आहे.

ह्या बिंदूवर येऊन कादंबरी संपते. पण केवळ कागदावर संपते. आपल्या मनात तर ती चालूच रहाते - आयुष्यभर.>>> +1
खूप सुंदर लिहिलं आहेस, जिज्ञासा..

मस्तच Happy

ह्या बिंदूवर येऊन कादंबरी संपते. पण केवळ कागदावर संपते. आपल्या मनात तर ती चालूच रहाते - आयुष्यभर.>>> +१ क्या बात है!!!

पुस्तकांत मानवी वेदनांचं गहिरं दर्शन असलं तरी पुस्तकाचा सूर उदास नाही. >>> एकदम अचूक निरीक्षण आहे. गोनीदांच्या प्रत्येक पुस्तकात वेदना असतेच. अगदी त्रीपदीसारख्या लेखसंग्रहात पण वेदना आहेच. पण त्यांचे लिखाण कधीच उदास करत नाही, फक्त अंतर्मुख करते. आपल्या दु:खाचे perspective दाखवून देते.

तुमचा लेख उत्तम झालाय. हे पुस्तक वाचायला सुरुवात केली होती पण काही कारणाने सोडून द्यावे लागले होते. आता मिळवून वाचायलाच हवे.

फारच छान लिहिलंय.. बरेच दिवस झाले हे पुस्तक वाचून पण चटकन सगळे संदर्भ कळले
या सुंदर शब्दपुष्पांजली ने पुन्हा हे पुस्तक लगेच वाचण्याची उर्मी निर्माण झाली..

लेखिका जिज्ञासा गोनीदांच्या या विलक्षण आत्मकहाणीमध्ये किती गुंतून गेल्या आहेत ते त्यानी त्यामागील कारणासह फार सुरेखरित्या सांगितले आहे. सर्वांचीच ही अवस्था झालेली आहे हे पुस्तक वाचताना. या कथेचा पसारा अफाट आहे...लेखिकेची ही नोंद अगदी टिपून ठेवण्यासारखीच. सुरेख सारे.

poignant साठी "भेदक" हा शब्द वापरा जिज्ञासा.

गोनीदांचे 'स्मरणगाथा ' नावाचे आत्मचरित्र आहे. मात्र ते फिक्शन नाही. भ्रमणगाथा फिक्शन आहे. भ्रमणगाथेचा पट मर्यादित आहे. परिक्रमेपुरताच. मात्र स्मरणगाथेत गोनीं च्या आयुष्याचा पट घेतला आहे. भ्रमणगाथा हा स्मरण्गाथेचा 'सब सेट 'म्हणता येईल. एकेकाळी गोनींची पुस्तके फार अधाशासारखी वाचलेली आहेत दोनेक वेळा भेटही झालेली आहे . आता ती अनुभूती परत येण्याची शक्यता कमीच. गोनींच्या लिखाणावर उरबडवेपणाचा आरोप केला जातो. साहित्यसम्मेलनाध्यक्ष म्हणूनही गोनींनी निराशाच केली होती. मात्र गोनींची शब्दकळा आणि प्रादेशिक बोलींचा वापर याबाबत सलाम...

जिज्ञासा, खुप सुंदर आढावा घेतलास, यशोदाचं चित्रण यथार्थ उतरलंय. तिच्या प्रेमात पडायला भाग पडतं माणूस. वर्णनासाठी ताकदीची व्यक्तिरेखा निवडलीस.

मला गोनिदांच्या ह्या पैलूबद्दल नेहमीच आश्चर्य वाटत राहिलंय ते म्हणजे, त्यांचं 'भ्रमणगाथे'त आलेलं आयुष्य पहाता आणि ज्या काळात ते लिहित होते त्या मानाने त्यांच्या बहुतेक सर्वच नायिका किती सशक्त आहेत. तू आत्मबल म्हणलंयस ते, ह्या प्रत्येकीत किती प्रकर्षाने दिसून येतं. मग ती यशोदा असो, अंबा असो, सुमन असो, तिची मैत्रिण सारा असो, रानभूलीची मनी असो की चिंधी. चिंधी तर सर्वश्रुत आहे. मुख्य म्हणजे त्यांचा स्वतःचा पिंड तसा भाबड्या अंगाने जाणारा, पण ते वैशिष्ट्य ह्या स्त्री रुपांमधे प्रतीत होताना दिसत नाही. प्रत्येक स्त्री पात्रासाठी केलेलं भरतकाम निराळ्या टाक्यांचं आहे, मनभावन आहे. ह्या काळात वाचतानाही ते कुठेच विसंगत वाटत नाही.

पादुकानंद, प्रतिक्रियेतल्या दोन मुद्द्यांचं प्रयोजन समजलं नाही. प्रत्येक कलाकार-लेखकाकडे प्रत्येक कळा असेलच असं नाही. ते लिहिलंत त्यात गोनिदांनी लिहिलेल्या आणि नीराबाईंनी समर्थपणे वाचलेल्या भाषणाचाही उल्लेख यायला हरकत नव्हती. असो.

यशोदा आणि तो भटका (परिक्रमावासी) या दोघांची काही काळाची भेट - त्यातून निर्माण झालेले अनामिक, नाजूक स्नेहबंध आणि शेवटी दोघांनीही स्वीकारलेले वास्तव .....

कुठलीही व्यक्तिरेखा अगदी थोड्याशा शब्दात साकारण्याचे गोनिदांचे शब्दसामर्थ्य हे प्रतिभावंत चित्रकाराच्या सफाईदार कुंचल्याइतके सहज - सुंदर .... (गोनिदांनी रंगवलेल्या सर्वच कथानायिका सर्वसामान्यांपेक्षा अतिशय उंच विचार करणार्‍या, पण मन लुभावणार्‍या असतात हे मात्र तितकेच खरे...) (सईने प्रतिसादात त्याचा उल्लेख केलेलाच आहे)

अशा जगावेगळ्या कथेची भुरळ न पडली तरच नवल ...

जिज्ञासाने जे सारे काही मांडले आहे ते अगदी नेमके आणि गोमटेही.... खूपच भावले हे लेखन...

Pages