'बोली तुझी-माझी' - प्रतिसाद स्वीकारणे बंद करत आहोत.

Submitted by संयोजक on 27 February, 2016 - 02:12

बोलीभाषेचा गोडवा काही औरच असतो. प्रत्येक बोलीभाषेचा लहेजा, ठसका, नजाकत कानाला सुखावून जातात. बोलीभाषा दर बारा कोसांवर बदलते म्हणतात. आपल्या मायबोलीवर तर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातली बोलीभाषा बोलणारे जगभर विखुरलेले लोक आहेत. यंदाच्या 'मराठी भाषा दिना'निमित्त 'बोली तुझी माझी' या उपक्रमाअंतर्गत बोलीभाषेचा गोडवा अनुभवूया आणि आपल्या बोलीभाषेनं मराठीचं शब्दभांडार समृद्ध करूया.

१. आम्ही इथे तीन उतारे दिले आहेत, त्यांपैकी तुम्हांला आवडेल त्या उतार्‍याचं तुमच्या बोलीभाषेत रूपांतर करायचं आहे.
२. 'स्वैर' भाषांतर नसावं, पण आपल्या बोलीभाषेच्या ठसक्याचं,लहेजाचं दर्शन व्हायला हवं.
३. एका आयडीने एकापेक्षा जास्त उतार्‍यांचं रूपांतर केलं किंवा एका उतार्‍याचं एकापेक्षा अधिक बोलीभाषांमध्ये रूपांतर केल्यास हरकत नाही.
४. रूपांतर करताना उतार्‍याचा क्रमांक, बोलीभाषेचं नाव, ती जिथे बोलली जाते तो प्रदेश यांचा उल्लेख करायला विसरू नका.

**************************************************************************************************************************
१. प्रिय बसंती,

केवळ एका भेटीतच तुला प्रिय म्हणण्याचं डेअरिंग (जयच्या भाषेत आगाऊपणा) करतो आहे. खरं सांगायचं तर एका भेटीतच आपण तुझ्यावर टोटली फिदा आहे. टांग्यातच 'फ्रेंडशिप' विचारणार होतो, पण जयनं बडबड करून प्रायवसीचा सत्यानाश केल्यामुळे मूड गेला. जय आपला दोस्त आहे, त्यामुळे माफ किया. मी कोल्हापूरचा आणि तुझ्या धन्नोची आई पण कोल्हापूरची हे कळल्यावर एकदम बेष्ट वाटलं, ओळख निघालीच की! सांगायची गोष्ट अशी की, तू दिलेल्या टांग्याच्या तिकिटावर तुझी वेबसाईट आणि ई-मेल होता म्हणून हा टेस्ट मेल.
"रोझेस आर रेड व्हायोलेट्स आर ब्ल्यू
बसंती आय लव यू, युवर्स ओन्ली .. वीरू"
नादखुळा हाय का नाय आपली पोएम? रिप्लाय लवकर पाठव. तोपर्यंत व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅक्टिव्हेट करून घे.

तुझा,
वीरु
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२. एकदा मात्र कहरच झाला. माझी बायको आणि मी मॉलमधे गेलो होतो. बायको कपडे बघत होती. मी हताशपणे इकडेतिकडे बघत होतो. अचानक मोठ्या भावाचा एक मित्र खूप वर्षांनी भेटला आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. बोलणं चालू असताना बायको 'मी वरच्या सेक्शनमध्ये चाललेय' असं सांगून पटकन निघून गेली. ती गेल्यावर मित्राला काहीतरी सुचलं.

तो : "बरं झालं तू भेटलास! माझा मुलगा लग्नाचा आहे, स्थळं बघतोय सध्या!"
मी : "असं का? अरे वा! कोणी असलं तर जरूर सांगीन तुला!"
तो : "तसं नव्हे! तुझी मुलगी लग्नाची आहे का विचारणार होतो! ओळखीत जमलं म्हणजे कसं बरं असतं!"
मी : "मला कुठली मुलगी? मला एक मुलगा आहे लहान! अजून शाळेत आहे तो." याला अचानक माझ्या मुलीचा कसा शोध लागला, या आश्चर्यानं मी म्हंटलं.
तो : "मग आत्ता जी गेली ती कोण होती?"
मी : "तीsss? ती माझी बायको!"

यावर काहीतरी गुळमुळीत बोलून तो सटकला, पण त्याच्या डोक्यातले विचार मला स्पष्ट दिसले - 'एवढ्यात लग्न करायचं नसेल तर तसं सांग! सरळ मुलीला बायको का म्हणतोस?'
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३. अशात तुमच्यावर परगावहून येणार्‍या पाहुण्याला घरापर्यंत मार्गदर्शन करायचा प्रसंग ओढवलाय का? माझ्यावर ही वेळ नेहमी येते (बाहेरून पुण्यात स्थायिक झाल्यामुळे येणारे-जाणारे ‘पावणे’ भरपूर असतात. एके दिवशी अचानक फोन येतो.
“हॅलो, मी आलोय पुण्यात. आहात का घरी?”
“अरे वा.. अलभ्य लाभ. कुठे उतरलात? स्वारगेटला ना?”
“नाही, पिंपरीत उतरलोय मी.”
“तिकडे कुठे?”
“कालच आलोय, भाच्याकडे उतरलोय. काम झालंय. म्हटलं जाता-जाता भेटून जावं.”
“बरं, बरं. या की मग. मी घरीच आहे”, बायकोला विश्वासात न घेता परस्पर या म्हटल्याचं एक कलम तर नक्कीच लागलं, आता सांभाळून बोलायचं.
“कसं यायचं?” आली प्रश्नपत्रिका माझ्या हातात... आपका समय शुरू होता है अब!
“सहकार नगरची बस पकडा तिथून... आणि मग..”
“बस नाही हो, गाडी आहे आपली, मारुती. कसं कसं यायचं ते सांगा..” आजकाल सोम्यागोम्याही गाडी घेतोय, आम्हीच आपले डोक्यावर पालथ्या कढया पेलत दुचाक्या पळवतोय ‘माझी गाडी, माझी गाडी’ करत.
“ओह.. मग सोप्पं आहे. बॉम्बे-पूना रोडनी संचेतीपाशी आलात ना, की मग...”
“किती वेळ लागेल साधारण?”, आलाच प्रश्न, एका वाक्यात उत्तर द्या.
“निदान २५ मिनिटं...”
“अरे बापरे... लांब आहे की हो” तरीही तुम्ही तडमडणारच, माझ्या पत्रिकेतच आहे ते, आय नो.
“..........”
“तर मग, संचेतीपासून आत वळलात की...”, लहानपणी 'थांब, तुला कापूसकोंड्याची गोष्ट सांगतो' असं नुसतं सांगून छळायचे, तसं आता मीच मला छळून घेत होतो.
“एक मिनिट, बाळूशी बोला, तोच चालवतो गाडी”. आओ ठाकूर, बाळू तर बाळू.
(बाळू : तुम्हीच बोला अन् मला सांगा की, माझी नाही ओळख...)
(पाहुणे : अरे, पत्ता समजून घ्यायला काय ओळख पाहिजे? घे तूच फोन...)
“हां, बोला”
“अरे बाळू, मी काका बोलतोय... काय म्हणतोस? आता मोठा झाला असशील ना तू”
“काका, मी डायवर हाय, कसं याचं सांगा”, घासून चरे पडलेली डीव्हीडी फसकन बाहेर यावी, तसं मला खजील वाटतं क्षणभर.
**********************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपक्रम आहे भारी.... पण खूप अवघडही आहे.

(मला तर माझी मूळची अशी बोलिभाषाच उरलेली नाही Sad
कोकणीं मराठी, पेठी मराठी, मराठवाडी, सातारा-कोल्हापुरकडची मराठी, अशी सगलीकडची सरमिसळ झाली आहे माझ्या बोलण्यात.... , सबब माझा सध्यातरी पास.. )

मुंबईत राहून कानावर पडलंय तेवढ्या मालवणीच्या जिवावर एकच वाक्य बोलीभाषेत लिहायचं धाडस करतोय, फुलाची पाकळी म्हणून. मग गजालीवाले कोणीतरी लिहितीलच इथे.

३ हाल्याच तुमच्याऽर भायेरगावसून येतल्या पावण्यांक घरापोतूर येवचो रस्तो समजवूचो प्रसंग इलोहा काय? माझ्याऽर
अशी येळ न्हेमीच येता. XX XXX XX XXX

चूभूद्याघ्या.

आमची प्राणप्रिय लाडकी बसंती
केवळ प्रथम भेटीमधे आपणास प्राणप्रिय संबोधण्याचे धाडस करण्यात येत आहे. सत्यवचनी असल्यामुळे प्रथमभेटीस आम्ही आपल्यावर जीव ओवाळून टाकला आहे हे कबूल करत आहे. आपल्या अश्वगाडीमधे आपणास मैत्रीसंबंधाविषयक प्रस्ताव देण्याचा विचारधीन होता परंतू आमचे परममित्र जय यांनी अतिमुख चालवण्यामुळे आपल्यात असणार्‍या एकांताचा भंग केल्याने आमचा मोहभंग झाला. अखेर जय हे आमचा परममित्र असल्यामुळे आम्ही त्यांना क्षमा केली आहे. आमच्या गावची माती आणि आपल्या अश्वाच्या मातोश्रींच्या गावाची माती एकच असल्याचे कळल्यावर मनातून आनंदाचे कारंजे निर्माण होऊन ते डोळ्यांद्वारे उतू जाऊ लागले. अखेरीस आपली ओळख अशा प्रकारे जुळून आली.
आपण देउ केलेल्या अश्वगाडीच्या प्रवासीपत्रावर आपले संकेतस्थळ आणि इपत्राचा उल्लेख दिसला म्हणून आपणास एक पोचपावती या अर्थाने इपत्र पाठवण्याची चेष्टा करत आहे.

-
आता या खाली कविता लिहिण्याचे धाडस अजिबात होत नाही. Happy

२. अहिराणी भाषा-

एक दिन भलतच व्हयनं. मी बायकोले लिसन मॉलमां गयथु. बायको कपडा दखी राह्यन्थी. मी इतलासा तोंड करी आजू बाजू दखी राह्यन्थु. इतलामां मन्ह्या दादाना मित्र गंज सालनंतर भेटना. आम्ही इकडनं तिकडनं चावळी राह्यन्थु. 'आखो वरना मजलावर जाईसनी दाखी येस' आसं बोलीसना मन्ही बायको जल्दी जल्दी निन्घी गयी. ती जाताबरोबर हाई मित्रले काहीतरी डोकामां ऊनं .

तो: चांगलं व्हयन तू भेटी ग्या! मन्हा आंडोरनं /पोऱ्यानं लगन करान शे ह्या साल. स्थळ देखी राह्यनू.
मी: आसं ? हाई तं भलतं मस्त व्हयन ! कोठे वळण व्हई ते सांगसू तुले.
तो: तस नै रे. तुन्ही आन्डेर शे ना लगननी हाई इचारानं व्हतं. काही पंधा बिंधा लागना ते बर ऱ्हास!
मी: माले कोठे आन्डेर? माले एक आंडोर शे न्हाना! अजून शाया शिकी राह्यना तो. "ह्याले कोठे मन्ही आण्डोर दिखनी" मी चकीत व्हयीसन बोल्नु.
तो: ती आते गइ ती कोण व्हती मंग ?
मी: ती????? आरे ती मन्ही बायको व्हती.

मंग तो काहीबाही बोलीसन सटकना. पण त्यान्हां डोकामां काय चाली राह्यंथ हाई माले सपष्ट दिखनं.
"इतलामां लगन नही करानं तं सांगी देवानं ना! शिधा 'बायको' म्हणी राह्यना हाऊ पोरले... भयना बाट्टोड!

हितेश. >>>
विरु म्ह्णजे 'चुपके चुपके' मधला वाहनचालक किंवा 'धूमधडाका' मधले 'याला म्हणतात शर्विलकाचा प्रतिशंखनाद' म्हणणारे जवळकर मास्तर वाटले Biggrin

मलाही हे बोली प्रकरण लिहून बघायचा मोह होतोय.. बऱ्याच दिवसात ऐकली नाही त्यामुळे काही शब्द आठवत नाहीत..

हि आमच्याकडची कोकणी मुस्लीम बोली.
बोलली जाणारा प्रदेश: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे
पहिला उतारा.

प्येरी बसंती,

आपुन एकच बारी भेटलाव पर तेरेको प्येरी बोलूसा वाटता.. (जय मना आगाव बोलनार). हयशी तुज्या वरापमदी तुला पयल्यान्दा बघितला थयशीच दिलची शिटी बजली!

वरापमदीच थया फ्रेनशीप इचरायची, तवा मेलो जय निस्ता बरबरsss बरबरsss करूचा.. सगऱ्या मूरचा सत्यानास केलान. आपलो दोस्त हाय करके माफी दिया, नायतर थोबारच फोरला असता. मीबी म्हारातला नि तुजी आयबी म्हारातली असा मना आयशाबी बोल्ली. मनात बोल्लो, आयला, सईच ना! बोलूची गोष्ट काss थतच तुवा बुकीवर ईमेल लिवलेला. तो मयने कापी किया Wink होर उस्पेच लेटर भेजताय..

"जाल्यात गावली, मोपच मोप मासली
बसंती आय लव यू, युवर्स ओणली.. वीरू"

तू लsssय आवरली म्हनूून पोयमपर आली मेरकू.
तुज्या फोन वर व्हॉसप असल थीतनं जवाब द्येव..

तुंजाच,
वीरू

मॅगी Lol

ही मायबोली आहे-

प्रिय बसंती आयडी ,

केवळ एका प्रतिसादातच तुला प्रिय म्हणण्याचं डेअरिंग (आपल्या त्या यांच्या भाषेत टवाळखोरपणा) करतो आहे. खरं सांगायचं तर एका धाग्यातच आपण तुझ्यावर टोटली फिदा आहे. धाग्यावरच 'गटगला येतेस का' विचारणार होतो, पण त्या डुआयडीने विषयांतर करून चांगल्या धाग्याला admin ने कुलूप लावण्याची वेळ आणल्यामुळे मूड गेला.तो हा जुन्या मायबोलीपासून आपला दोस्त आहे, त्यामुळे माफ किया. मी अन्टार्क्टिका वाहत्या पानावरचा आणि तुझ्या धन्नोची आई पण अन्टार्क्टिकाची हे कळल्यावर एकदम बेष्ट वाटलं, ओळख निघालीच की! सांगायची गोष्ट अशी की, तू दिलेल्या प्रतिसादावरुन तुझं प्रोफाइल आणि विपु मिळाली म्हणून ही टेस्ट विचारपूस.
"रोझेस आर रेड व्हायोलेट्स आर ब्ल्यू
बसंती आय लव यू, युवर्स ओन्ली .. वीरू"
पाचशे प्रतिसाद मिळतील अशी हाय का नाय आपली गझल? रिप्लाय लवकर पाठव. तोपर्यंत सम्पर्क सुविधा चालतेय ना ते चेक करून घे.

तुझा,
वीरु आयडी (डु आयडी नाहीये मी खरंच. त्या यांच्या आरोपावर विश्वास ठेऊ नकोस.)

मालवणी इश्ताइल

एकदा का न्हाय लय भारी किस्सो झालो. झाला काय, मी गेलं हुतंय मॉलमधी. बाईल पन हुती. ती काय लुगडा - बिगडा बगीत हुती. माका काय त्यात रस न्हाय तर मी ह्यो आपलो उगाच ह्यथय भटकी हुतंय. तर अचानक आमच्या मोठ्या भावाचो येक मित्र गावलो. गावलो म्हंजी काय, समोरच इलो ना अगदी. तशी लयच वर्सा झाली असतील त्याका भेटोन. म्ह्नोन मग आमच्यो गजाली रंगाक लागल्यो. आमची कारभारीन, मदीच सांगोन गेली माका, 'जरा वरल्या सेक्शनात जावून येतंय हां.' तर ती गेली, आनी ह्या मित्राक काय तरी सुचला.
तो: अरे बरा झाला तू गावलंस. माझो झिल आता लाग्नाचो असा. त्याच्यासाठी स्थळा बघतंय हल्ली.
मी: व्ह्य काय? वा वा. माझ्या ओळखीत कोणाचा चेडू असात तर नक्की सांगतलय तुका.
तो: तसं न्हाय रे. तुझा चेडू असा काय लग्नाचा, असा हाड्कुचा व्हता. म्हणजे कसा आपल्याआपल्यात जमला असता ना तर झ्याक झाला असता.
मी: माका? माका खय असा चेडू? एक झीलगो हा बारको. अजून शेंबूड पुसत शाळयेत जाता. बोचो नाय धूत येत तेका अजून." ह्येका माझ्या चेडवाचो शोध कसो काय लागलो मदिच, काय कळला नाय माका.
तो: काय सांगतस काय? मगे आता गेली हयसून ती कोण?
मी: ती??? बाईल माझी!

ह्या ऐकल्यावर जो सटाकलो का न्हाय तो सांगून सोय न्हाय. पण काय विचार करत गेलो असतलो ता माका कळलाच. 'नाय करायचा येवड्यात लगीन तर तसा सांग ना मायझया. पोरीक कित्या बायको म्हनतस?'

टिव्हिवरच्या चर्चासत्रातील मराठी

नमस्कार मी मिश्किल टोणगे आपले काहीपण चालतयं वर स्वागत करतो
आजचा सवाल आपण पडद्यावर दाखवलेला आहे. " बसंतीसमोर वीरू आपले प्रेम जाहीर करेल का?"
यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडीओ मधे खुद्द वीरु हाजीर आहे तसेच रामगढ स्टुडीओ मधून माझ्या खास विनंतीला मान देऊन बसंती तीच्या घोडी धन्नो सोबत आलेली आहे. त्याचबरोबर सुप्रसिध्द प्रेमावर कविता लिहिणारे पाड्गावकरसाहेब सुध्दा आले आहे. आणि प्रेमाला म्हणजे व्हॅलेंटाईन डेला रस्त्यारस्त्यांवर विरोध करणारे मारुतीसेनेचे नेते श्री. प्रताप देसाई सुध्दा मुंबई स्टुडीओ मधे उपस्थित आहे.

मिश्किलः सर्वप्रथम आपण श्री. विरू यांच्याकडे वळू. वीरू मला जाणून घ्यायचे आहे की आपले कुमारी बसंती वर प्रेम हे आपल्याला कधी आणि केव्हा कळले. ?

वीरू:- प्रथम मी आपले धन्यवाद व्यक्त करतो आपण मला या कार्यक्रमात बसंतीवर प्रेम व्यक्त करण्याकरीता आमंत्रण दिले. तसा मी माझ्या लहानपणापासून लाजाळू आहे. तुम्हाला माहीतीच असेल माझ्या लग्नाची बोलणी साठी सुध्दा माझ्या मित्राला जयला पाठवलेले.

प्रताप देसाई:- एक मिनिट तुम्ही प्रेम कुठले करतात म्हणजे माझा आक्षेप आहे. जर तुम्ही बाजीराव मस्तानी टाईप करत असाल तर आमचा पक्ष आपल्या पाठीशी उभा राहील आणि व्हॅलेंटाईन सारखे करत असाल तर बसंतीचा चाबूक आपल्या पार्श्वभागावर उमटवू.

मिश्किल :- नाही नाही . हे बघा इथे असे चालणार नाही. तुम्ही असे पार्श्वभाग असे असंसदिय शब्द वापरता कामा नये मी एक मिनिट शांत व्हा. आपल्यासोबत पाडगावकर साहेब आहे त्यांना काहीतरी बोलायचे आहे. बोला पाड्गावकरसाहेब तुम्ही बोला हे देसाई ओरडत राहणार आहे. तुम्ही बोला.

पाडगावकरः- हे बघा मुलांनो प्रेम हे प्रेम असते तुमचे आणि आमुचे सर्वांचे सेम असते. काशीबाईच्या इश्श्यमधे ही प्रेम असते आणि मस्तानीच्या इश्क मधे ही प्रेम असते.

देसाई:- अहो कॉन्व्हेंट वाले सुध्दा लव लव म्हणत प्रेम करतात पण ती आपली संस्कृती नाही. आपल्या संस्कृतीचा काही जाज्ज्वल्य अभिमान असायला हवा.

बसंती:- युं की हा काय जज्जावल बोलला.?

मिश्किलः- बसंती ते जाऊद्या आमच्या इथे रोज चालू असते. मी मुद्यावर येतो मला सांगा वीरू आपल्याला पसंद आहे का? आपण इथे एक पोल घेणार आहोत पडद्यावर बघा. ७०% लोक म्हणत आहे की वीरू जाहीर करणार आहे आणि २५ % लोक नाही म्हणत आहे. आता मला सांगा बसंती विरू आपल्यावर प्रेम आहे हे व्यक्त करणार का?

विरु:- अरे ये बाब्या..ऐक तर...

मिश्किल :- कार्यक्रमाचा एंकर मी आहे.

बसंती:- युं की मला जास्त बोलायची सवय तर नाही आहे. वीरूची माझी ओळख टांग्यामधे झाली होती जेव्हा जय मागे बसून कानात कापूस घालत होता. मला त्याच्या बोलण्यावरून वाटले होते की हा टपोरी माझ्यामागे लागणार आहे. जय यांना त्याने लग्नाची मागणी घेऊन माझ्या मावशीकडे पाठवलेले..

मिश्किल :- ब्रेकिंग बातमी आता बसंतीने केलेल्या खुलाश्यावरून हे सिध्द होत आहे की बसंतीला हो हो बसंतीलाच आधीपासून वीरू तिच्या मागे लागलेला आहे हे ठाऊक होते. ही बातमी पहिल्यांदा तुम्ही फक्त काहीपण चालतयंवर बघत आहात. आता आपण वीरू कडे वळू त्याचा पुरता भ्रमनिरस झालेला दिसून येतोय. बोला वीरू या बसंतीच्या खुलाश्यावर आपल्याला काय बोलायचे आहे.?

वीरू:- हे बघा बसंती माझे प्रेम तुझ्यावर पहिल्या भेटीमधेच बसलेले

देसाई :- कुठले प्रेम हे आधी स्पष्ट करा. कुठले प्रेम.??

पाडगावकरः- अहो प्रेम हे प्रेम असते

वीरू:- बाजीराव - मस्तानीवाले प्रेम . पण बसंती जयमुळे मला त्यावेळेस सांगता आले नाही ते मी आता सांगत आहे. की बसंती माझे ..

मिश्किलः - एक मिनिट इथे मी आपल्याला थांबवत आहे इथे एक मुद्दा उपस्थित झालेला आहे. आता वीरू यांनी जाहीर केले की त्यांचे प्रेम हे बाजीराव-मस्तानी सारखे आहे याचा अर्थ... याचा सरळ स्पष्ट अर्थ होत आहे की वीरू यांच्या घरी त्यांची काशीबाई म्हणजे त्यांची बायको उपस्थित आहे. इथे आता चर्चेला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. वीरू यांचे लग्न झाले आहे आणि त्यांच्या घरी बायको असुन सुध्दा ते बसंतीच्या मागे लागले आहे. मी याचा तीव्र निषेध व्यक्त करतो. आणि याच्यावर वीरू यांनी स्पष्टीकरण द्यावे. अशी मागणी मी इथे आपल्यासर्वांसमोर करत आहे.

वीरू :- अहो देसाई बोलले की...

देसाई:- नाही नाही हे महाराष्ट्रात चालू देणार नाही अरे काही संस्कृती ठेवली आहे की नाही. हा लग्न झालेला बाप्प्या पोरीसोरींच्या मागे दिवसाढवळ्या लागतोय. आणि आम्ही गप्प बसायचे. नाय.

पाडगावकरः- अहो प्रेम हे प्रेम असते

देसाई:- ओ साहेब यांचे प्रेम वेगळे आहे इतकेच प्रेम म्हणजे प्रेम असते तर आधी स्वतःच्या बायको वर करावे.

वीरू:- माझी बायको कुठून..

मिश्किल: - एक मिनिट शांत बसा शांत बसा हे बघा वीरू आताच आपण माझ्या कार्यक्रमात कबूल केले. तुम्ही बाजीराव. बसंती मस्तानी याचा अर्थ काशीबाई आहे. हे बघा खोटे बोलू नका. पडद्यावरचा प्रश्न बघा. " वीरूने पहिले लग्न लपवून बसंतीला धोका दिला आहे का? हा भारतीय संस्कृतीवर हल्ला आहे का? ९०% लोक हो म्हणत आहे १० % लोकांनी नाही असा कौल दिला आहे.

पाडगावकर :- प्रश्न प्रेमासंबंधी होता ना?

मिश्किल:- या खुलाश्यानंतर बदलला.

बसंती:- युंकी वीरू तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी तुझ्याबरोबर लग्नाला तयार होणार होती पण आता नाही.
देसाई:- बसंती तो चाबूक जरा टिव्हीमधून माझ्याकडे द्या. ये बाळ्या पिंट्या अरं धरा त्याला याला संस्कृती दाखवु या.

मिश्किलः हे बघा तुम्ही ..ओ असे काय करतात... कायदा हातात .. अरे नाही..... का त्याच्या मागे लागलात.. हा माझा कार्यक्रम..... अरे जाऊ द्या. सोडा... अरे मला कशाला मारतात.. माझे एकच झाले ... सोडा मला सोडा..
डायरेक्टर प्रोड्युसर... बंद बंद शो संपला. मी मिश्किल टोणगे. पहात रहा फक्त काहीपण चालतयं .

---

२. एकदा मात्र कहरच झाला. माझी बायको आणि मी मॉलमधे गेलो होतो. बायको कपडे बघत होती. मी हताशपणे इकडेतिकडे बघत होतो. अचानक मोठ्या भावाचा एक मित्र खूप वर्षांनी भेटला आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. बोलणं चालू असताना बायको 'मी वरच्या सेक्शनमध्ये चाललेय' असं सांगून पटकन निघून गेली. ती गेल्यावर मित्राला काहीतरी सुचलं.

तो : "बरं झालं तू भेटलास! माझा मुलगा लग्नाचा आहे, स्थळं बघतोय सध्या!"
मी : "असं का? अरे वा! कोणी असलं तर जरूर सांगीन तुला!"
तो : "तसं नव्हे! तुझी मुलगी लग्नाची आहे का विचारणार होतो! ओळखीत जमलं म्हणजे कसं बरं असतं!"
मी : "मला कुठली मुलगी? मला एक मुलगा आहे लहान! अजून शाळेत आहे तो." याला अचानक माझ्या मुलीचा कसा शोध लागला, या आश्चर्यानं मी म्हंटलं.
तो : "मग आत्ता जी गेली ती कोण होती?"
मी : "तीsss? ती माझी बायको!"

यावर काहीतरी गुळमुळीत बोलून तो सटकला, पण त्याच्या डोक्यातले विचार मला स्पष्ट दिसले - 'एवढ्यात लग्न करायचं नसेल तर तसं सांग! सरळ मुलीला बायको का म्हणतोस?'

२--- खरी कोल्हापुरी ( प्रयत्न फक्त )

अवो, येकडाव निस्ता घोळ झाल्याला बरं का ! म्हंजी त्याचं असं झालं का म्या अन आमची कारभारीण मॉलमदी गेल्तो. कारभारीण कापडं बघत हुती, अन म्या बापडा खुळ्यावानी हितं तितं बघत हुतो. त्या टायमाला आमच्या आप्पाचा दोस्त दिसल्याला. म्हंजी लई सालानं बगा. आता भेटल्यावर हिकडचं तिकडचं बोलनं व्हनारच कि. तर आमची कारभारीण म्हणली, आता बोला निवांत मी वाईच माडीवरचा माल बगून बगून येतो. ( आनि हिकडंच र्‍हावा, नायतर जाशीला कुटतरी अन मी बसतू हुडकत तुमास्नी. कुनी अस्तुरी बगशीला अन जाशीला तिच्यामागनं पाह्य )

त्यो : अंदा पोराचं लगीन करावं म्हंतोय, त्याच्यासाठी पोरी बगतूया .
म्या : लई झ्याक, कुनी आस्ली वळकीत तर सांगतू कि.
त्यो : आरं तसं न्हवं मर्दा. तूझ्या तूलाबी ल्येक हाय न्हवं का. आपल्याआपल्यात सोयरीक जमली तर ब्येस अस्तय.
म्या :ल्योक ? मला कुटली रं ल्योक. योकच पोरगा हाय अन तोबी साळंला जातूया न्व्हवं का . ( मला कळंना ह्येला यो जावाईशोद कुटनं लागल्याला त्यो. )

त्यो : आरं मग आता हुती ती कोन रं ?
म्या : आरं इच्याबना, ती कारभारीन न्ह्व्वं का माजी ?

त्याउप्पर त्यो कायबाय बोलेल्ला अन चालू लागल्याला. पण त्येच्या टाळक्यात काय चाल्यालं त्ये नीटच कळल्यालं बरं का, म्हनला असल अरं न्हाई द्याची ल्येक तर न्हाई म्हणावं माण्सानं, उगा ल्येकीला बायकू म्हणू ने मर्दा.
(तर आता प्वाँईटाचा मुद्दा असा हे, बरं का पावनं... आमची कारभारीण लाखात योक हाय बरं का ! न्हाई म्हंजी एवडं सांगूनशान तूमच्या डोस्क्यात शिरल्यालं नस्ल तर... )

मस्त उपक्रम आहे हा! सगळ्यांच्या पोस्ट्स देखील भारी! मज्जा येत्येय वाचायला Happy

Pages