'बोली तुझी-माझी' - प्रतिसाद स्वीकारणे बंद करत आहोत.

Submitted by संयोजक on 27 February, 2016 - 02:12

बोलीभाषेचा गोडवा काही औरच असतो. प्रत्येक बोलीभाषेचा लहेजा, ठसका, नजाकत कानाला सुखावून जातात. बोलीभाषा दर बारा कोसांवर बदलते म्हणतात. आपल्या मायबोलीवर तर महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातली बोलीभाषा बोलणारे जगभर विखुरलेले लोक आहेत. यंदाच्या 'मराठी भाषा दिना'निमित्त 'बोली तुझी माझी' या उपक्रमाअंतर्गत बोलीभाषेचा गोडवा अनुभवूया आणि आपल्या बोलीभाषेनं मराठीचं शब्दभांडार समृद्ध करूया.

१. आम्ही इथे तीन उतारे दिले आहेत, त्यांपैकी तुम्हांला आवडेल त्या उतार्‍याचं तुमच्या बोलीभाषेत रूपांतर करायचं आहे.
२. 'स्वैर' भाषांतर नसावं, पण आपल्या बोलीभाषेच्या ठसक्याचं,लहेजाचं दर्शन व्हायला हवं.
३. एका आयडीने एकापेक्षा जास्त उतार्‍यांचं रूपांतर केलं किंवा एका उतार्‍याचं एकापेक्षा अधिक बोलीभाषांमध्ये रूपांतर केल्यास हरकत नाही.
४. रूपांतर करताना उतार्‍याचा क्रमांक, बोलीभाषेचं नाव, ती जिथे बोलली जाते तो प्रदेश यांचा उल्लेख करायला विसरू नका.

**************************************************************************************************************************
१. प्रिय बसंती,

केवळ एका भेटीतच तुला प्रिय म्हणण्याचं डेअरिंग (जयच्या भाषेत आगाऊपणा) करतो आहे. खरं सांगायचं तर एका भेटीतच आपण तुझ्यावर टोटली फिदा आहे. टांग्यातच 'फ्रेंडशिप' विचारणार होतो, पण जयनं बडबड करून प्रायवसीचा सत्यानाश केल्यामुळे मूड गेला. जय आपला दोस्त आहे, त्यामुळे माफ किया. मी कोल्हापूरचा आणि तुझ्या धन्नोची आई पण कोल्हापूरची हे कळल्यावर एकदम बेष्ट वाटलं, ओळख निघालीच की! सांगायची गोष्ट अशी की, तू दिलेल्या टांग्याच्या तिकिटावर तुझी वेबसाईट आणि ई-मेल होता म्हणून हा टेस्ट मेल.
"रोझेस आर रेड व्हायोलेट्स आर ब्ल्यू
बसंती आय लव यू, युवर्स ओन्ली .. वीरू"
नादखुळा हाय का नाय आपली पोएम? रिप्लाय लवकर पाठव. तोपर्यंत व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅक्टिव्हेट करून घे.

तुझा,
वीरु
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
२. एकदा मात्र कहरच झाला. माझी बायको आणि मी मॉलमधे गेलो होतो. बायको कपडे बघत होती. मी हताशपणे इकडेतिकडे बघत होतो. अचानक मोठ्या भावाचा एक मित्र खूप वर्षांनी भेटला आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. बोलणं चालू असताना बायको 'मी वरच्या सेक्शनमध्ये चाललेय' असं सांगून पटकन निघून गेली. ती गेल्यावर मित्राला काहीतरी सुचलं.

तो : "बरं झालं तू भेटलास! माझा मुलगा लग्नाचा आहे, स्थळं बघतोय सध्या!"
मी : "असं का? अरे वा! कोणी असलं तर जरूर सांगीन तुला!"
तो : "तसं नव्हे! तुझी मुलगी लग्नाची आहे का विचारणार होतो! ओळखीत जमलं म्हणजे कसं बरं असतं!"
मी : "मला कुठली मुलगी? मला एक मुलगा आहे लहान! अजून शाळेत आहे तो." याला अचानक माझ्या मुलीचा कसा शोध लागला, या आश्चर्यानं मी म्हंटलं.
तो : "मग आत्ता जी गेली ती कोण होती?"
मी : "तीsss? ती माझी बायको!"

यावर काहीतरी गुळमुळीत बोलून तो सटकला, पण त्याच्या डोक्यातले विचार मला स्पष्ट दिसले - 'एवढ्यात लग्न करायचं नसेल तर तसं सांग! सरळ मुलीला बायको का म्हणतोस?'
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
३. अशात तुमच्यावर परगावहून येणार्‍या पाहुण्याला घरापर्यंत मार्गदर्शन करायचा प्रसंग ओढवलाय का? माझ्यावर ही वेळ नेहमी येते (बाहेरून पुण्यात स्थायिक झाल्यामुळे येणारे-जाणारे ‘पावणे’ भरपूर असतात. एके दिवशी अचानक फोन येतो.
“हॅलो, मी आलोय पुण्यात. आहात का घरी?”
“अरे वा.. अलभ्य लाभ. कुठे उतरलात? स्वारगेटला ना?”
“नाही, पिंपरीत उतरलोय मी.”
“तिकडे कुठे?”
“कालच आलोय, भाच्याकडे उतरलोय. काम झालंय. म्हटलं जाता-जाता भेटून जावं.”
“बरं, बरं. या की मग. मी घरीच आहे”, बायकोला विश्वासात न घेता परस्पर या म्हटल्याचं एक कलम तर नक्कीच लागलं, आता सांभाळून बोलायचं.
“कसं यायचं?” आली प्रश्नपत्रिका माझ्या हातात... आपका समय शुरू होता है अब!
“सहकार नगरची बस पकडा तिथून... आणि मग..”
“बस नाही हो, गाडी आहे आपली, मारुती. कसं कसं यायचं ते सांगा..” आजकाल सोम्यागोम्याही गाडी घेतोय, आम्हीच आपले डोक्यावर पालथ्या कढया पेलत दुचाक्या पळवतोय ‘माझी गाडी, माझी गाडी’ करत.
“ओह.. मग सोप्पं आहे. बॉम्बे-पूना रोडनी संचेतीपाशी आलात ना, की मग...”
“किती वेळ लागेल साधारण?”, आलाच प्रश्न, एका वाक्यात उत्तर द्या.
“निदान २५ मिनिटं...”
“अरे बापरे... लांब आहे की हो” तरीही तुम्ही तडमडणारच, माझ्या पत्रिकेतच आहे ते, आय नो.
“..........”
“तर मग, संचेतीपासून आत वळलात की...”, लहानपणी 'थांब, तुला कापूसकोंड्याची गोष्ट सांगतो' असं नुसतं सांगून छळायचे, तसं आता मीच मला छळून घेत होतो.
“एक मिनिट, बाळूशी बोला, तोच चालवतो गाडी”. आओ ठाकूर, बाळू तर बाळू.
(बाळू : तुम्हीच बोला अन् मला सांगा की, माझी नाही ओळख...)
(पाहुणे : अरे, पत्ता समजून घ्यायला काय ओळख पाहिजे? घे तूच फोन...)
“हां, बोला”
“अरे बाळू, मी काका बोलतोय... काय म्हणतोस? आता मोठा झाला असशील ना तू”
“काका, मी डायवर हाय, कसं याचं सांगा”, घासून चरे पडलेली डीव्हीडी फसकन बाहेर यावी, तसं मला खजील वाटतं क्षणभर.
**********************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सनव Lol

तिसरा उतारा.
बोलीभाषा: कोल्हापुरी
बोलली जाते ते प्रदेशः सांगली, सातारा, कोल्हापूर

-------------------------------------------------------------------------
यौड्यात तुमच्याव परगावावनं आल्याल्या (का उगावल्याल्या ?) पावन्यास्नी घरापावतूर वाट सांगायची येळ आल्या का? आमच्याव आस्ली यळ लईंदा येती राव. भाईरनं यून शिनी पुन्यात थाईक झाल्याकारणानं, यणारं जानारं पावनं लई आस्त्याती आमच्यात.

तर आसाच बगा यकदिशी आवचित फोन वाजला.

"हालू........ म्या आलूया पुन्यात. घरात हायसा का?"

"आर वा! काय सांगताय? कुटं उतारलायसा? स्वारगेटाला वी?"

"न्हाय. पिंप्रीत उतारलुया."

"तकडं कुटं (कडमाडलासा) ?"

"काल आलूतू. भाच्चा आस्तूय हितं. हितलं काम झालं. मंग म्हंडलं. जाता जाता तुमची बी गाट घ्यावी."

"आसं व्हय? मंग ब्येस केलंसा. या या. म्या घरातच हाय."

आता पावन्यास्नी 'या' तर म्हंडलंय. त्ये बी मालकिनीच्या मागारीच. आता लोण्यावानी मव बोलल्याशिवाय गत नाय.

"अवं हो! पण याचं कसं? मला हिकडचं याक म्हंता ब्याक कळत न्हाय."
घ्या.... आता माजी खरी परिक्षा सुरू झाली.

"ह्य बगा... पिंपरीतनं सहकार नगरची बस सुटत्या. तिज्यात बसा. आन् मंग... "

"बस न्हाय वं... गाडी हाय आपली. फोर्व्हिलेर. म्हारुती. कसं याचं त्यवडं सांगा. की आलोच बघा बुंगाट."

"आसं व्हय... मंग लय भारी.
(आजकाल काय सोम्यागोम्याबी फोर्व्हिलेरातनं फिर्तोय राव. आन् आमीच आपलं पालथ्या कडया डोस्क्यात घालूनशिनी, हिंड्तूय आपलं टूव्हेलेरावरन)

मंग आसं करा.. बाँबे पुना रोडावनं संच्येतीबशी आलासा की मंग..."

"किस्ता यळ लागंल?" आलाच प्रेश्न. यका वाक्यात उत्तर ल्ह्या.

"तशी पंचवीसेक मिण्टं लागत्याली."

"आर त्येची बायला... लाम हाय की म..."

(व्हय! आनि तरीबी तुमी टपाकनारच! चांगला वळकतू तुमास्नी.)

"...... तर संच्येतीबस्नं आत वळ्ळासा की.....",

" यक मिण्टं. थामा म्या बाळूकड देतोया फोन. त्योच चालीवतो गाडी!"

(बर... आमाला काय बाळू आसूंद्या न्हाय तर काळू)

बाळू: आवं आता माज्याकडं आनि कश्याला. बोला की तुमीच. म्या कुटं वळकतो त्यास्नी?
पाव्हनं: आर पत्ता समजून घ्ये फक्त. त्येला काय वळक का पाळक पायजेल? हिंगं, ह्यो घे फोने आन् बोल.

"हां. सांगा की.."

"आरं बाळू. म्या काका बोल्तोय. कसा हाईस? आता गड्या लय मोटा झाला आश्शील."

"आव काका, म्या डायवर हाय. कसं याचं सांगा." आता फुडं काय बोलायचं मलाबी घटकाबर कळंना.

-------------------------------------------------------------------------
(शेवटचा संवाद मला नेमका कळला नाही.)

जयु, आसं हाय वी. बाऽऽर. संवेजोकांनी बायलीला पुरगी आनि डायवराला पोरगा आसा तिढा घालूनशिनी गमज्या बगायल्यात जणू! Happy

दुसरा उतारा.
बोली: ग्रामीण वर्‍हाडी (प्रयत्न. कारण संबंध तुटुन दोन दशके उलटली.)

येकदा तं भाऊ लय कहर झाला. मी अन मायी बायको मॉलमंदी गेल्लो. ते लागली कपडे पायले न मी असाच इकडं तिकडं पाउन रायलो होतो भैताडावानी.
तवा मले माया दादाचा दोस्त दिसला. लय वर्षानं भेटुन रायला होता. म्हने "काय म्हंते धंदापानी?” म्हटलं "चालु हाय बावा. तुयी तब्येत हालली गड्या, खात पेत न्हाई का?" त्यानं खिशातनं काहाडला खर्रा, म्हने खातं का बे? म्या म्हनलं दे थोडा. दोघंबी खर्रा खात बोलुन रायलो होतो धंद्यापान्याच. तवा मायी बायको आली अन म्हने "आवं, वरते यक सेक्शन हाय, तिथं चालली मी हां" आन गेली पन बातच. ते गेली न दोस्ताले काहीतरी सुचलं.

त्यो: "बेस झालं गड्या तू भेटला. मायं पोट्टं हाय लगनाचं. रिश्ता पाउनच रायलो आम्ही त्येच्यासाठी."
मी: "आस्सं! चागलं हाय ना. आली कोनी माया पायन्यात तं सांगीन तुले."
त्यो: "अब्बे तसं न्हाई भाउ. तुयी पोट्टी हाय काय लगनाची? म्हंजी कसं, असं वयखीत जमलं तं काय पाय लागते? येकदम बेस!"
मी: "अबे मले कुठं हाय बे पोट्टी? यक पोट्ट हाय बा लायनं. शायेमंदी शिकुन रायलं ते." यानं कोनता शोध लावला इचिभैन माया पोट्टीचा?
त्यो: "अब्बे त मंग ते आत्ता गेल्ली ते कोन होती?"
मी: "तेsss? ते तं मायी बायको हाय!"

मंग गडी सटपटला. काहीबाही बोलला असाच अन चालला गेला. पन त्याले काय वाटलं असन हे माया तं लक्षात आल्लं. "नसन आत्ता लगन करायचं तं सांग ना भाऊ, पन आपल्या्च पोट्टीले बायको काऊन म्हतं गड्या!."

धमाल लिहिताय सगळे Lol

गजा, एक नंबर! Rofl
आल्याल्या - याचा उच्चार करताना कणभर 'ल' जास्तीचं लावलं जातं, तो उच्चार कानात घुमला मस्त... Lol

तकडं कुटं, याक म्हंता ब्याक, किस्ता यळ लागंल, हिंगं Biggrin लहानपणी आजोळी पाहिलेले सगळे एक से एक नमुने डोळ्यांसमोर उभे राहिले... मजा आली Biggrin

तिसरा उतारा
मालवणी भाषा

गावसून येणार्या पावण्यांका घरपरेंत येवचो पत्तो सांगूचो प्रसंग तुमच्यार ईल्लो हा काय कधी? माझ्यार ही येळ सदीच येता. कोकणात्सून येवन पुण्याक स्थायिक झाल्याकारणानं आमच्याकडे सदीचे कोण ना कोण पावणे चलतच आसतत. तर त्येचा झाला. त्येदिवशी असोच एका पावण्याचो फोन ईल्लेलो.
"हॅलो, मिया पुण्यात ईलेलय. तुमी घरी आसास काय?"
"अरे वा, होय. खय उतारलास ता? स्वारगेटाकच मा?
" नाय वो, पिंपरीक उतरलय"
"थयसर खय?"
"कालच ईलय पुण्याक तर भाच्याकडे उतरलेलय. आता काम सरला तर म्हटला जाता जाता तुमकाय भेटान जावया."
"बरा बरा येवा येवा आमी घरीच आसव."
बायलेक न ईचारता पावण्यांका येवचा आवताण परस्पर दितय म्हंजी एक कलम आदीच लागताला. आता काय सांभाळून घेवचा लागतला.
ईतको ईचार करतय तवसर प्रश्नपत्रिका हातात ईलीच... " कसा येवचा?"
चला टायम चालू झालो तुमचो.
"असा करा.. सहकार नगरची बस पकडा.. मगे थयसून.."
"बस नाय वो. गाडी आसा आपली... मारुती. कसा येवचा तितक्या सांगा..." (आवशीक खावक आजकाल जो उठता तो गाड्ये घेता. आमी आपले डोक्यात उल्टे टोप घालून 'माझी गाडी माझी गाडी' करत दोनचाकीच ढकलतव आजून..)
"अस्सा अस्सा! तर सोप्प्या आसा. बॉम्बे-पूना रस्त्यानं संचेतीपाशी ईलास की मगे... "
"किती येळ लागात तरी ?" प्रश्न ईलोच
"तरी बघा २५ मिन्टा..."
"बाबा माझ्या.. बराच लांब आसा वो" ( तरी पण तुमी येशातच. माझ्या पत्रिकेतच लिवला हा तसा. ठावक हा माका.)
......
तर मगे संचेतीपासून आत ईलास की... (ल्हान आसताना आमी पोरा 'थांब तुका कापूसकोंड्याची गोष्ट सांगतय' म्हणून एकमेकाचे कळ काढीत रवू.. ताच आता मीच माका करुन घेय होतय.)
"एक मिनिट थांबशात, वायच बाळग्याशीच बोला. तो गाडी चालयता मा." (ये मेल्या ये... बाळगो तर बाळगो.)
{बाळू: तुमीच बोला आणि माका सांगा. माझी खय वळख आसा त्येंच्याशी
पावणे: मेल्या पत्तो समजून घेवक वळख कित्या होयी तुका? धर फोन घे }
"हा, बोला"
रे बाळग्या, मिया काका बोलतय तुझो ? काय म्हणतस? आता मोठो झालो आसशीत मा. येदो होतस तेव्हा बगलेलय तुका.
"काकानू मी डायवर आसय. ता कसा येवचा तितक्या सांगा....." (कर्माची कथा!! ह्या म्हणजे असा झाला करूक
गेलो गणपती, पण झालो मारूती.. )
_________________
शेवटी जरा जमलं नाही

पहिला उतारा.
कोकणात दर दोन मैलावर भाषेचा लेहेजा थोडा बदलतो. आमचे गाव देवगड जवळ. इथली भाषा मालवणातली मालवणी नाही, गोव्यातली कोकणी नाही आणि बाल्या लोकांची बोली सुद्धा नाही. तसे मला आमची भाषा पण तितकी येत नाही. हा उगीच एक प्रयत्न!

गे वासंते,

एका भेटीतच तुका अशा जवळीकीने हाक मारुचा धाडस करतंय हो! जय माका आगाव म्हणतंय, पण खरा सांगायचा तर येका भेटेतच मीया तुजेवर फिदा झालंय गो! टांग्यातच तुका विचारणार होतंय पण तो मायझयो जय आडवो इलो. दोघांत तिसरो! माझो मुडच हॉफ झालो. दोस्त हाय म्हणान माफ केलंय... गे! अगे मी देवगडचो आणि तुज्या धन्नोची आयस पण तिकडचीच कळाल्यावर एकदम बेष्ट वाटला गो! तुजे टांग्याचे टिकटावर तुजो इमेल होतो म्हणान ही मेल लिवतंय...
"रोझेस आर रेड व्हायलेट्स आर ब्लू
वासंते आय लव यू गे आय लव यू"
कशी वाटली माजी पोएम? पटापटा उत्तर दे गो... अन तोवर कसकाय(व्हॉट्सअ‍ॅप) पण चालू करून घे.

फक्त तुझोच,
वीरू

देवगडची बोली मस्त. नवऱ्याला दाखवेन. मला नाही ब्वा येत बोलता. तसं घरात प्रमाण मराठीच बोलतातना त्यामुळे नाहीच येत. कोणी बोललं तर शहरी भाषेत उत्तर देते. नवरा तिथेच लहानाचा मोठा झाल्याने त्याला येते.

Pages