गझल -

Submitted by विदेश on 14 February, 2016 - 14:21

उपभोगाया मजला आता सुख हे फुरसत नाही
देवा राहू दे दु:खातच त्याविण करमत नाही

आवड मजला ना पुष्पांची का पसरवली अफवा
होती ती काट्यांची सवयच फूलहि धरवत नाही

हसतो बघुनी परका कोणी स्नेही जणु समजोनी
रस्त्यावर सामोरी दिसता अपुला फिरकत नाही

आवडतो मज माळायाला गजरा ग सखे तुजला
नाही बघवत तो सुकल्यावर यास्तव माळत नाही

रंगत चढते भान विसरुनी लोकांना हसवाया
आनंदी खोटाच मुखवटा कोणा समजत नाही

पथ काटेरी पायाखाली मज सवयीचा आहे
हिरवळ सुखदच बागेमधली मजला वाटत नाही ..
.
........... विजयकुमार देशपांडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users