बेटावरी किल्ला.. जंजिरे अर्नाळा !

Submitted by Yo.Rocks on 2 February, 2016 - 11:10

किल्ले अर्नाळा म्हणजे खरं तर अर्नाळा नावाच्या छोटया बेटावर बांधलेला जलदुर्ग.. जंजिरे अर्नाळा ! मुंबई पासून जवळ विरार पश्चिमेला.. जिथे वैतरणा नदी अरबी समुद्राला मिळते त्याच भागात असलेले हे अर्नाळा बेट… आतापर्यंत अर्नाळा या कुतूहलाने दोन-तीन वेळा बोलावून घेतलेले पण माझी चाल समुद्रकिनाऱ्यापर्यंत स्मितीत राहिलेली.. त्यात दोन वेळा तर बोटीत चढण्यासाठी कमरेपर्यंतच्या पाण्यात शिरणे आवश्यक असल्याने भानगडीत पडलो नव्हतो.. हो या बेटावर जाण्यासाठी अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावरून बोट असते.. पण हालत अशी की त्या बेटावर वस्ती आहे व तरीही तिथे ये-जा करणाऱ्या लोकांसाठी किनाऱ्यावर साधी जेट्टीची सोय नाही.. त्यामुळे बोट किनाऱ्याला लागत नाही.. लाटांच्या तालावर नाचणाऱ्या बोटीत आपल्यालाही मोठी कसरत करून चढावे लागते.. गुडघ्यापर्यंत दुमडलेली पँट… हातात काढून ठेवलेली चप्पल वा सामान.. साडया कमरेत खोचून असलेल्या स्त्रिया.. पोरा-टोरांना कमरेवर.. त्यात भरतीची वेळ असेल तर अजून गोंधळ.. पण यावेळी ठरवूनच जाणार होतो.. अर्थात ऐनवेळी आदल्या रात्री ठरले..

ऐन मे महिन्याचा काळ तेव्हा अर्ध्या दिवसात सगळं निपटवायचे होते.. सोबतीसाठी विरारचा माझा तगडा दोस्त नितीन साकरे त्याची तगडी बुलेट घेऊन तयार झाला.. कोवळी उनं खात अर्नाळाच्या दिशेने सुटलो.. आता विरार मध्येच राहणारा म्हटल्यावर नितीनचे वाटेत अमुक-तमुक बघेबल गोष्टींसाठी दिशादर्शन सुरु होते.. काही मिनिटांतच मुख्य विरार मागे पडले नि रस्त्याच्या दोन्ही बाजूला निसर्ग फुलताना दिसला.. कैऱ्या लागलेल्या आंब्याची टुमदार झाडं..नारळाची बाग.. फुलवलेली झेंडूची बाग वा अजून कसली तरी दुसरी शेती नि या सगळ्यांच्या मागे असलेलीे बंगले सदृश घरं.. हे पाहत असताना आमची बाईक एका घरापाशी थांबलीच.. त्या घरच्या अंगणात दोन झाडं टपोऱ्या शुभ्र जामने भरली होती तर खाली पिकलेल्या जामचा सडा पडला होता.. भर उन्हात भटकणार तेव्हा मधुर रसाळ अशी ख्याती असलेले जाम नावाचे हे फळ आयते मिळत असेल तर कशाला सोडा.. घरमालकाने परवानगीसाठी होकारार्थी मान काय हलवली नि आम्ही दोघे अधाशासारखे तुटून पडलो ! ज्या फळाला मुंबईत प्रति दोन रुपये भाव आहे त्या फळाचे मोल इथे शून्य होते नि आम्ही मात्र खजिना सापडल्यागत खुश झालो होतो.. काहीही म्हणा झाडावरचं तयार फळ तोडून तोंडात टाकणं नि बाजारात विकत घेऊन आणलेलं फळ तोंडात टाकणं यामध्ये आस्वाद पाहता जमीन-आसमानाचा फरक आहे..

- - -

थोडे जाम तोंडात कोंबून तर बाकी पिशवीत घेऊन आमची बुलेट पुन्हा निघाली..आता थेट किनारा गाठला.. वाळत घातलेल्या सुकटचा घमघमाट एव्हाना नाकात भरला होता.. तिथेच बाजूला जागा पाहून बुलेट उभी केली नि आम्ही किनाऱ्यावर आलो.. सकाळची वेळ.. त्यात रविवार.. साहाजिकच कोळी लोकांची वर्दळ सुरु होती..

- - -

समोर समुद्रात तरंगत्या बोटींमागे अर्नाळा बेट दिसत होते.. नि बेटावर किल्ला आहे याची ओळख करून देणारा असा अलिप्त बुरुज एका बाजूस खुणावत होता.. बेटावर जाण्यासाठी बोट आली नि मघाशी म्हटल्याप्रमाणे कसरत करत बोटीत चढलो एकदाचे ! आम्ही शॉर्ट घालूनच होतो त्यामुळे काम सोप्पे झाले..

अंतर फारसे नसल्याने दहा मिनिटातच बेट गाठले.. समोरच देवीचे भगव्या रंगाचे मंदिर दिसते.. पण आम्ही आधी किल्ल्याची वाट पकडली.. उत्तरेकडे असणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोचलो.. भरभक्कम अशा दोन बुरुजांमध्ये असलेले प्रवेशद्वार नक्कीच लक्षवेधक आहे.. दोन्ही बाजूस सोंडेत फुलमाळा असलेले गज व शरभ यांच्या प्रतिमा व सुंदर नक्षीकाम धारण केलेल्या या प्रवेशद्वाराला दिडशहाण्या लोकांमुळे मात्र गालबोट लागले आहे ही खेदजनक बाब.. एका बाजूस पाहिले तर डागडुजीसाठी खडी आणून ठेवली होती म्हणजे काम सुरु होतेे तर… किल्ल्याला अनकुल अशी दुरुस्ती होऊदे अशी मनोमन प्रार्थना करत आत प्रवेश केला..

- -

१६ व्या शतकात बांधलेल्या या किल्ल्याला पोर्तुगीज, मराठे यांचा इतिहास आहे.. नेटवर गुगलले असता बऱ्याच ठिकाणी हा किल्ला गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने १५१६ मध्ये बांधल्याचा उल्लेख आढळतो.. पण काही ठिकाणी इतिहास अभ्यासकांच्या मते या किल्ल्याची खरी बांधणी मराठ्यांच्या काळात हा किल्ला पोर्तुगीजांकडून घेतल्यावर झाली असे म्हटले गेलेय.. तसा भक्कम पुरावा म्हणून या दरवाज्याच्या वरती असणारा शिलालेख… ‘बाजीराव अमात्य मुख्य सुमति आज्ञापिले शंकरा पाश्चात्यासी वधुनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा’ इति देवनागरी लिपीतील ओळींतून थोरल्या बाजीराव पेशव्यांनीच हा किल्ला बांधून घेतल्याचे सुचित होते.. तत्पुर्वी हा किल्ला जलवाहुतुकीवर देखरेख ठेवण्यासाठी केवळ चौकी म्हणून वापरला जात असावा..

प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस अगदी प्रशस्त देवड्या आहेत.. प्रवेशद्वाराच्या आतून बाहेरील समुद्राचे दर्शन छानच होते..

इथून आम्ही उजवीकडच्या बुरुजावर चढून गेलो तर सगळीकडे सुकी मच्छी विखुरलेली.. इथल्या कोळी लोकांनी तटबंदीवरसुद्धा सरळ रेषेत सुकत घातलेली.. चालायला जेमतेम जागा ठेवलेली.. त्या तटबंदीवरुन चालतच किल्ला फिरायचे ठरवले नि आम्ही पश्चिम दिशेला वळालो.. चौकोनी आकारात असलेल्या या किल्ल्याच्या दुसऱ्या बुरुजावर गेलो.. येथून तिसऱ्या बुरुजात असलेला दुसरा दरवाजा छानच दिसतो..

या बुरुजावर जाताना तटबंदीला लागूनच डावीकडे एक मंदिर नव्याने बांधण्यात आले आहे तर उजवीकडे इथल्या स्थानिक लोकांची शेती..! हा बुरुज विशेष वाटला कारण तटबंदीवरच असलेल्या तुटक्या जीन्यावरून आपण इथे येतो.. हा बुरुज देखील बऱ्यापैंकी मोठा व या बुरुजातूनच खाली उतरण्यास गुप्त मार्ग.. चौकोनी अश्या बोगदयातून खाली उतरायला पायऱ्या.. अर्थात इथे प्लास्टिक बाटल्या नि नको त्या कचऱ्याचा खच पडलेला.. पण हा मार्ग बुजला नाही हे नशीब.. मोबाईल टॉर्चचा तात्पुरता सहारा घेत आम्ही खाली पोचलो पण.. पालघरच्या शिरगाव किल्ल्यात असा मार्ग पाहिला होता पण हा त्यामानाने सोप्पा होता.. जिथं बाहेर पडलो तिथे एक-दोन खोल्या दिसल्या.. इथेच दुसरा दरवाजा आहे.. येथील छत, नक्षीकाम सार काही मस्त मस्त.. या दरवाज्यावर देखील बाहेरून शरभ व गज यांच्या प्रतिमा आहेत.. किल्ल्याचा हा भाग बराच दुर्लक्षित वाटला… खर तर इथल्या वस्तीतल्या लोकांनीच या किल्ल्यांना जपले तरी पुरेसे.. अन्यथा दारुच्या बाटल्या, प्लास्टिक कचरा, मच्छीचा कचरा, दरवाज्यावर वा तटबंदीवर नावांची रंगोटी इत्यादी दिसले नसते.. !!

- - -

- - -

- - -

- - -

त्या दरवाज्यातून बाहेर आलो तर नितीनला ‘भोकर’ फळाचे झाड दिसले.. याच लोणचं बनवतात हे कळले मग काय किल्ले भटकंती सोडून लागलो कामाला.. पण हवी तशी भोकरं मिळाली नाहीत म्हणून जेमतेम गोळा केली.. बाहेरून या किल्ल्याची मजबूत भिंत व भिंतीला लागूनच शेतीचे मळे हे दृश्य छानच वाटत होते..

आम्ही पुन्हा दरवाज्यातून आत आलो.. इथेच थोडी पेटपूजा करून आम्ही डावीकडच्या आतल्या दरवाज्याने किल्ल्यात प्रवेश केला.. या किल्ल्यात एक तोफगोळा इथल्या एका भिंतीत अजूनही अडकून राहील्याचे नितीनने सांगितले नि आम्ही शोध सुरु केला.. ज्या दरवाज्यातून आत प्रवेश केला त्याच्या डावीकडच्या भिंतीवर बघू लागलो.. तोफगोळ्याच्या जखमा भिंतीवर उमटलेल्या दिसल्या नि काही अंतरावरच तो तोफगोळा नजरेस पडला..! हा तोफगोळा किल्ल्याच्या भिंतीवर आतल्या बाजूने असल्याने तो नक्की कुठून आला असावा यावर तर्क करत बसलो..

- - -

आता इथवर तटबंदी उतरून आलोय तेव्हा सभोवताली फेरफटका मारला.. मध्यभागी एक दर्गा आहे व बाजूलाच मोठे डेरेदार वटवृक्ष आहे.. याच आवारात विहिर देखील आहे ! तर दर्ग्यामागे वाडयाचे काही अवशेष दिसतात..तर एका बाजूस मंदीर आहे ज्याचे नव्याने बांधकाम सुरु आहे.. थोडा वेळ शांतता अनुभवून आम्ही खालूनच दक्षिण बाजूच्या भिंतीकडे गेलो.. इथे कोपऱ्यात कोठारं आहेत.. ते पाहून पुन्हा तटबंदीवर पायऱ्यानी चढून गेलो.. त्या काळात बांधलेली तटबंदी अजूनही भक्कम अवस्थेत आहे हे पाहून थक्क व्हायला होते..

- - -

किल्ला चौकोनी असून चारही कोनात एक बुरुज नि चारही बाजूच्या तटबंदीच्या मध्यभागी एकेक बुरुज आहेत.. फक्त मुख्य दरवाज्याला दोन बुरुजांचा कोट.. असे एकूण ९ बुरुजांचे संरक्षण या किल्ल्याला दिले आहे..

दक्षिणेकडच्या तटबंदीवरचा मधला बुरुज तसा महत्वाचा व इतर बुरुजांपेक्षा थोडा वेगळा वाटला.. येथून मुख्य प्रवेशद्वार नजरेत राहते शिवाय आतील संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवता येते.. या बुरुजाचे बांधकाम बरंच काही शाबूत आहे त्यामुळे या बुरुजावर येण्यासाठी छोटा जिना, छोटा दरवाजा, जंग्या अश्या बऱ्याच खूणा नजरेस पडतात.. आम्ही मग याच बुरुजावर टायमर फोटो काढला..

- - -

- - -

आता पुढच्या बुरुजावर गेलो.. येथून तो अलिप्त बुरुज व समुद्र जवळ.. आता आम्ही पुन्हा उत्तरेकडील बुरुजांकडे वळालो.. तत्पूर्वी मध्ये लागलेल्या बुरुजावरुन या किल्ल्यातील अष्टकोनी तळे व मंदिर छान दिसतेे.. त्या तळ्यातील काही कासवं उन खात बसले होते..

- - -

- - -

तटबंदीच्या पलीकडे अगदी लागून वस्ती आहे.. आम्ही गोल फेरा मारून आता पुन्हा मुख्य प्रवेद्वाराजवळ आलो.. इथे बुरुजावर मनोरा सदृश बांधकाम केलेले दिसते.. इकडून सगळीकडे अगदी दूरवर नजर जाते..

- - -

ऊन आता वाढत चालले होते नि आम्हाला अजून त्या अलिप्त बुरुजाकडे देखील जायचे होते… आम्ही किल्ल्याचा निरोप घेऊन बाहेर आलो.. नि आता त्या देवीच्या मंदिराकडे वळालो.. वाटेत खरवसवाल्याची गाडी आडवी आली.. घेतला चवीला.. उसाचे रसवंती गृह नजरेस पडले.. फुल ग्लासची ऑर्डर झाली.. जीव शांत झाला तसे मंदिराकडे पोहोचलो.. मंदिर बंद होते पण त्या मंदिराच्या आधी दोन- तीन घरांच्या अंगणात तुळशीचे सुंदर वृंदावन बघायला मिळाले.. देवीला बाहेरूनच नमस्कार करून आम्ही आता त्या एकल्या बुरुजाकडे चालू पडलो..

- - -

समुद्राला भरती होती त्यामुळे किनाऱ्यावरून जाणे शक्य नव्हते. गावातूनच वाट काढत आम्ही बुरुजाकडे आलो.. बेटाच्या अगदी एका टोकाला असलेला हा बुरुज टेहेळणीसाठी बांधला असावा.. हा बुरुज बऱ्यापैंकी अवाढव्य म्हणूनच की काय ‘हनुमंत’ बुरुज म्हणून ओळखला जातो.. ही वास्तू मात्र पोर्तुगीजांच्या काळात बांधली असावी असा तर्क केला जातो.. ह्या बुरुजाची बांधणी परदेशात “Martello Tower” नावाने आढळणाऱ्या छोट्या किल्ल्याच्या प्रतिकृतीशी मिळती जुळती वाटते.. गुगलवर सर्च मारले तर साधारण अश्याच आकाराच्या वास्तूंची प्रकाशचित्रे सामोरी येतात.. ह्या हनुमंत बुरुजावर जायचे तर एकाबाजूने उगवलेल्या वटवृक्षाच्या पारंब्याचा आधार घेऊन चढावे लागते.. जो मी अयशस्वी प्रयत्न केला.. अन्यथा या बुरुजात जाण्यासाठी सरळ मार्ग नाही..

- - -

एका बाजूने मात्र अगदी छोटी मार्गिका दिसते.. ही आधीपासूनच अरुंद ठेवली आहे की काळाच्या ओघात बुजली आहे हे माहीत नाही पण यातून आत शिरायचे तर सरपटून जावे लागते.. नितीनने भले कितीही मोठे प्रोत्साहन दिले तरी मी फक्त फूटभर आत जाऊन पुन्हा बाहेर आलो.. जल्ला ह्याला काय जातंय म्हणायला जा जा आत जा.. एकतर हलता येणार नाही इतकी अरुंद वाट जी पुढे दोन्ही बाजूला वळते.. बरं त्या काळोखात धाडस करून कुठल्याही एका बाजूने गेलो तरी पुढे खरच अजून वाट आहे की नाही हे माहीत नव्हते..

त्या बुरुजाच्या बाजूलाच छोटी देवळी आहे… त्या देवळीच्या छपराखाली क्षणभर विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा उष्मा झेलायला चालू पडलो.. पुन्हा गावात येऊन आम्ही आता बोट कुठून सुटते याचा शोध घेऊ लागलो.. पण त्याआधी एक गोळेवाला सामोरा आला मग तर आम्ही थांबलोच.. या बेटावरती तस बघायला गेलं तर सगळं मिळते नि आम्ही आता लस्सी गोळा हा नवीन प्रकार चाखत होतो..

एका गावकऱ्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही देवळीच्या मागच्या किनाऱ्यावर आलो.. आता भरतीची वेळ होती त्यामुळे अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावरून येणारी बोट पण मग इथवर येते.. या बेटावरच राहणाऱ्या वस्तीमधली बच्चाकंपनी समुद्राच्या लाटांमध्ये मस्त डुंबत होती.. पुन्हा एकदा कसरत करून चढलो.. आमच्या मागून त्या बच्चाकंपनीतले दोघे तिघेजण ओल्या अंगाचेच चढले.. मग कळले जशी बोट सुरु होणार तसे मग एकेक करून ते पाण्यात उडी मारणार.. रविवारचा वा सुट्टीच्या दिवशी हा त्यांचा खेळ असावा..

आम्ही किनाऱ्यावर आलो.. बोटवाल्याने जाताना प्रत्येकी १०-१२ रुपये घेतले तेवढेच.. परतीचा प्रवास पण त्याच भाड्यात.. एकंदर विरार स्टेशनापासून यायचे झाले तर प्रवासखर्च फक्त ५०-६० रुपयात.. एसटीची मुबलक सेवा आहे.. किल्ला पहायला जेमतेम दिडेक तास पुरेसा नि मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारा हा किल्ला आवर्जून पहावा.. सकाळची वेळ उत्तम कारण अर्नाळा बीच वर पिकनिकसाठी आलेल्यांची संध्याकाळी परतीच्या वेळी तोबा गर्दी असते.. बोट सेवा सकाळी साधारण सहा ते दुपारी दिडेक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार ते साडेसहा – सात वाजेपर्यंत चालू असते.. सगळं ठरल्याप्रमाणे झाले होते नि अजून अर्धा दिवस हातात शिल्लक होता.. आगाशीची भुजिंग खाऊन रविवार सार्थक लावणायाचा विचार होता खरा पण नितीनच्या मनात वेगळे होते.. भुजिंग चे पार्सल हातात टेकवले नि म्हटले घरी जाऊन खा..पण आता नॉन व्हेज खायचे आहे तर वसईला चल.. फेमस चिकन शॉर्मा खाऊ..! जल्ला त्यासाठी वसईला जायचे !! पण बुलेट राईड कोस्टल एरियातून जाणार नि वाटेत वसईचे निर्मळ गाव लागणार हे कळल्यावर का म्हणून नाही म्हणायचे.. आणि आयत्या रविवारी नॉन वेज साठी कुठे पण तयार..

आता पुन्हा दोन्ही बाजूला फुलझाडीचा बगीचा, शेती.. अश्या मस्त रस्त्यावरून भटकंती झाली.. कळंब बीच करून आम्ही निर्मळ गावात आलो.. नितीनला या परिसरात भरमसाठ कमळं असलेले तळे माहीत होते व तेच पाहण्यासाठी इथे आलो होतो.. संपूर्ण तळ कमळाच्या पानांनी हिरवेगार झालेले.. पाणी दिसतच नव्हते.. या संपूर्ण हिरव्या कार्पेटवर गुलाबी रंगाची मोठमोठी कमळं फुललेली.. अगदी शेकडोच्या संख्येने !! निव्वळ सुंदर ! त्या टळटळीत उन्हात आम्ही दोघंच तळ्याच्या काठावर घुटमळत होतो.. मोठ्या देठाची कमळं आकर्षून घेत होती.. शेवटी एकतरी कमळ घ्यावे बरोबर त्यासाठी प्रयत्न सुरु झाले.. काठापासून दोन हात लांब असलेले एक कमळं मोठ्या प्रयासानंतर नितीनच्या हाती लागले.. !

- - -

कळंब बीचवर थोडी भुजिंग चवीला खाल्ली होती.. पण आता नितीनने त्याच्या आवडत्या स्पॉटवर आणले होते खास चिकन शॉमोरा खाण्यासाठी.. भटकंतीची अखेर अश्या खादाडीने झाली की सगळं कस संपूर्णम वाटते..

घडयाळाचा काटा दोन वर आला होता पण नितीन चा उत्साह काही कमी झाला नव्हता.. मस्त भटकंती झाली व आता खादाडीच्या मूड मध्ये होता.. अजुन दोन-तीन ठिकाणं दाखवतो चल म्हणत होता.. पण तेवढयात त्याला घरून जेवण वाट बघतय असा फोन आला म्हटल्यावर काय करणार.. त्याने गुपचूप नालासोपारा स्टेशनला सोडले.. पुन्हा कधीतरी या परिसरात अशी भटकंती करू म्हणत आम्ही अलविदा केले.. अर्नाळा भेटीच्या निमित्ताने आमचीही बरीच दिवसांनी भेट घडलेली.. व आता रविवार चांगला सार्थकी लागल्याचे समाधान घेउन आम्ही परतीची वाट धरली..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुजिंग नि शॉमोरा म्हटल्यावर बाकिच्या लेखाचा 'जल्ला तुझा लक्षन' असे झाल Wink लहान असताना बघितलेला किल्ला, परत जायला हवे असे वाटले तुझे वाचून.

सुंदर !

बापरे.अमेझिंग ट्रेक.. सीरियसली!!!
शेकडो कमळं.. वॉव!!

,'प्लास्टिक बाटल्या नि नको त्या कचऱ्याचा खच पडलेला; अरेरे.. ऐतिहासिक काय आणी काय.. कस्चा कस्चा अभिमान नाही .. Uhoh Angry

रच्याकने भुजिंग ??म्हंजे काय??
आणी त्या कपारी वजा एंटरंस मधे साप, विंचू इमॅजिन केले.. बरं झालं जास्त आत नाही गेलास.. Happy

अप्रतिम !
आमची एक मावशी अर्नाळ्याला होती. लहानपणीं अनेक वेळां तिथं जात असूं . किल्ल्यातही एक-दोनदां गेलो होतो पण इतक्या बारकाईनं नव्हता पाहिला. खूप बरं वाटलं प्रचि बघून व वर्णन वाचून.[ क्रिकेट खूप चालायचं त्या वेळीं अर्नाळ्याच्या किनार्‍यावर. नारळाच्या झाडांच्या पार्श्वभूमिवर, समुद्र किनार्‍यावरचे वारे खात क्रिकेट बघताना वे. इंडीजमधे कसं क्रिकेट चालत असेल याची कल्पना यायची !]

यो मस्त लिहिल आहेस.सुंदर प्रचि
सोपार्याचा प्राचिन स्तुप राहिला पहायाचा पुन्हा केव्हातरी. Happy

वर्षूदि - भुजिंग विरारची वल्फ फेमस डिश आहे, रोस्टेड चिकन बटाटे आणि पोहे यांचा अप्रतिम संगम असतो.
विरारच्या म्हात्रे कुटंबाकडे याचे पेटंट आहे. त्यांच्या पिढ्या भुजिंग चा वारसा पुढे चालवताहेत.

यो....मस्त रे. मी जाईन तेव्हा, तुझ्या लेखाचा मला उपयोग होईलच.

सविस्तर वर्णन !