५ रात्रींची कथा

Submitted by Mother Warrior on 17 January, 2016 - 21:14

गेल्या विकेंडला मला थोडे बरे नव्हते. डोकेदुखी, दातदुखी, घसादुखी अशी बरीच दुखणी एकदम आली. शनीवार रात्र अजिबात झोप लागली नाही. रविवारी दिवसा बराच काळ झोप भरून काढण्यात गेला. माझा मुलगा त्या दिवशी सरप्राईझिंगली छान राहीला. एकदाही आईच पाहिजे म्हणून रडला नाही. बाबाबरोबर एकदम व्यवस्थित राहीला. नाहीतर पूर्वी आई दिसली नाही ५ मिनिटं की शोधमोहिम चालू. तसे झाले नाही. मला रविवारी जरा बरे वाटू लागल्यावर ह्या गोष्टीचे फार आश्चर्य वाटले! मनात म्हटले अरेवा! २०१६ ची सुरूवात छानच झाली! लिटल डिड आय नो, ती वादळापूर्वीची शांतता होती.

रविवारी रात्री नेहेमीचे बेडटाईम रूटीन आंघोळ, दुध-पाणी, स्टोरीटाईम इत्यादी चालू झाले, मग मात्र आख्खा दिवस छान राहिलेल्या मुलाने इंगा दाखवायला सुरूवात केली. डायपर बदलून घेईना. चिडचिड/ किरकिर चालू. हळूहळू रडण्यात रूपांतर. बर्‍याच कष्टाने त्याला बेडरूममध्ये नेऊन झोपवला एकदाचा ९:३० ला. हुश्श केले व वरणभात खाऊन घेतला अन मी ही झोपले १०-१०:३०ला.

२:३० वाजता मुलाने मला उठवले व नेहेमीप्रमाणे दुध दे पाणी दे असे हातवारे, पॉईंट करणे चालू केले. जनरली तो रात्री अजुनही एकदा किंवा दोन्दा उठतोच ह्या कारणासाठी. अलिकडे सर्दी, खोकला दोनदा होऊन गेल्याने नेहेमीप्रमाणे त्याचे खाणे अफेक्ट झाले व आमची जेवणाची बॅटल परत चालू झाली आहे. बरेच दिवस फक्त पिडीयाशुअर पिऊन काढल्यावर आता हळूहळू चकली खाण्यापर्यंत प्रगती झाली आहे. तर ह्या सर्व कारणांमुळे त्याचे पोट भरत नाही व रात्री तो उठतोच. पण सोमवारी पहाटे २:३० ला उठला दुध पाणी मागितले पण प्यायले काहीच नाही. अर्धवट झोपेत रडायला लागला. त्याला बोल म्हटले की घशातून आवाज फुटत नाही पण मध्यरात्री, वेळी अवेळी रडताना मात्र आवाज टिपेला असतो. माझे आजारी व झोपेतले डोके अचानक खडबडून जागे झाले व त्याला शांत करण्याच्या मागे लागले. त्याचे पिक्चर कम्युनिकेशन बुक त्याच्यासमोर नाचवून काय हवे विचारले. अर्धा पाऊण तास भरपूर रडून झाल्यावर त्याने आयपॅड मागितला व नेहेमीप्रमाणे आयपॅडवर काहीतरी अ‍ॅप सुरू करून घरात पळापळी व आरडाओरडा चालू केला. (गॉड ब्लेस अवर डाउन्स्टेअर्स नेबर्स!) घरात कितीही रडाअरड व गोंधळ घातला तरी माझा मुलगा शाळेला अगदी आनंदाने व झटकन तयार होऊन जातो. तसा तो गेला. व ४ ला परत झोपेत आला. कारण शाळेत अजिबात झोपला नव्हता. पहाटे २:३० पासून जागा असणारा मुलगा दुपारचे ४ वाजले तरी झोपला नाही पाहून मी त्याचे संध्याकाळचे एबीए थेरपीचे सेशन कॅन्सल केले व त्याला झोपू दिले. व ६:३० ला बळंबळं उठवले. नाहीतर रात्रीच्या झोपेची पंचाईत.

इतक्या काळज्या घेऊनही मुलगा रात्रीच्या वेळी, बेडटाईम आला की इरिटेट होतच होता. सोमवारी रात्री १ तास रडला बिफोर बेडटाईम. आयपॅड हवा म्हणे. मंगळवारी पहाटे ५ ला उठला रडत रडत. मंगळवारी शाळेतून झोपून आला. पण त्याला उठवणे भाग होते कारण सारखे थेरपीज बुडवणे चालण्यासारखे नव्हते. बळंबळं उठवल्याने अजुन त्रासला. मंगळवारी रात्री परत झोपायला त्रास. रडणं. डोक्यावर हात मारून घेणे. डायपर बदलतेवेळी मला लाथा मारणे. हळूहळू मला संध्याकाळ उलटून गेली की टेन्शन बिल्ड अप व्हायला लागले. मी थोडा विचार करता असे जाणावले की शनी-रवी-सोम मी थोडी जास्त माझ्या आजारपणाने त्रस्त होते व नेहेमीसारखी त्याच्याबरोबर खेळत वागत नव्हते. म्हणून बुधवारपासून मी खूप जाणिवपूर्वक बदल केले वागण्यात. त्याच्या आवडीची गाणी लावून नाचलो. बेडवर उड्या मारल्या. आंघोळीच्या वेळी भरपूर साबणाचा फेस केला.. पण तरीदेखील आंघोळीनंतर डायपर लावायला गेले तर अतोनात लाथा मारल्या व बेडटाईम रूटीन बद्दल असंतोष व्यक्त केला. बुध-गुरू इतके सगळे करून देखील त्याचे तँट्रम्स अजिबात कमी झाले नव्हते. हळू हळू माझे डोके बधिर होत गेले. अर्धवट झोपेत राहून राहून आता माझे डोळे इतके लहान झाले आहेत की मला लोकं चायनिज समजातात. किंवा मला क्रोनिक स्लीप डिप्रायव्हेशन्चा आजार आहे इत्यादी जोक्स मारू लागले मी. पण परिस्थिती अजिबातच सुधारत नव्हती.

गुरूवारी रात्री तर मुलाने वर्स्ट एव्हर मेल्टडाउन काय असते त्याचे प्रात्यक्षिक केले. बेडटाईमच्या वेळेस २-२.५ तास प्रचंड रडारड व अ‍ॅग्रेशन. पण ह्यावेळेस कुठेतरी रँडमली रूममध्ये बोटं दाखावणे चालू केले होते. आता मात्र माझा पेशन्स संपत चालला होता. अरे तुला काय हवंय? दुध वं की पाणी हवं? निळी बाटली हवी की लाल? डायपर का घालून घेत नाहीस? रॅश आला का? क्रिम लाऊदे.. लाथा मारू नकोस. थंडी वाजतेय का? स्वेटर घाल. उकडतय काय? स्वेटर काढ. कितीतरी पर्म्युटेशन कॉंबिनेशन्स केली पण काही नाहीच. कसाबसा रडून थकून झोपून गेला. परत ३:३०-४ ला उठून रात्रीचे रडणे कंटीन्यू केले.

ह्या सर्व गडबडीत शाळेला छान जातो, कधी नव्हे ते सर्वच्या सर्व शिक्षक, थेरपिस्ट त्याच्या नवनवीन स्किल्सबद्दल कौतुक करत आहेत. एकंदरीत खुष आहेत. ह्याच आठवड्यात त्याने इतक्या नव्या गोष्टी केल्या. सो मेनी फर्स्ट्स. थेरपिस्ट्सना स्वतःचा स्वतः टायमर संपल्यावर आयपॅड दिला, थेरपीज्च्या ठिकाणी त्याचा जिवश्चकंठश्च मिकी माऊस त्याने इतर मुलांबरोबर शेअर केला.. आयुष्यात प्रथम मोठ्या मुलांचा झोपाळा ट्राय केला. आईच्या कारमध्ये ड्रायव्हर्स सीटवर बसून व्हील हातात धरून कार चालवायचे प्रिटेंड प्ले तर पहिल्यांदा केले त्याने. इतके सगळे छान चालू असताना हा झोपायच्या वेळेला का असा करतो हे कोडेच होते.

शुक्रवारी मी आमच्या बेडरूमची हलवाहलव केली. माझ्या मुलाला त्याची गादी जरा कोपर्‍यात बंदिस्त ठिकाणी असलेली आवडत आली आहे. त्याला ते सेफ व कोझी वाटत असावे बहुतेक. अर्थात मला त्याला फ्लेक्झिबल बनवायचे असते म्हणून मी त्याही जागा बदलते सारख्या. पण आज मात्र त्याच्या मनासारखे होणे गरजेचे होते. त्याची गादी, आमचा बेड असे सर्व हलवले. व त्यालाही ते आवडले. येऊन बेडवर उड्या मारून गेला. मात्र बेडटाईमला बोटे कुठ्तरी दाखवून रडणे चालूच. केवळ रडणे नाही तर डोक्यावर हात थडाथडा मारून घेणे.. लाथा मारणे.. इतरांप्रती अ‍ॅग्रेसिव्ह बिहेविअर वगैरे. खूप झोप आली होती खरंतर त्यालाही. त्यामुळे तो बेडवरच होता, आडवाही होत होता पण लगेच उठून रूमच्या एका दिशेला पॉईंटींग. शेवटी मी तो कोपरा सगळा धुंडाळायला लागले. त्याला नक्की काय बॉदर होत आहे ते कळत नसल्याने, मी रूमचे पडदे उतरवले.. भिंतीवरचे घड्याळ काढले, फ्लोअर लँपची जागा बदलली.. बुकरॅकवरची पिशवी लपवली.. तरीही नाहीच.

आणि... देन.. इट डॉन्ड ऑन मी.. मला कारण समजले! मुळात ह्या सगळ्या वागण्याला अ‍ॅक्चुअली कारण होते! अन ते मला शोधता आले!!
झाले असे होते. गेल्या आठवड्यात आमचा इस्त्री करायचा आयर्निंग बोर्ड बिघडला. तो फोल्डच होईना. त्यामुळे तो उघडलेल्याच अवस्थेत आम्ही ठेवायला लागलो होतो. मुलाला त्यावर क्लाईंब करणे , त्याच्यावर उभे राहणे.. सर्फबोर्ड असल्याप्रमाणे झोपून राहणे हे सर्व आवडत होते. परंतू तिथे आमच्या रूमची बाथरूम असल्याने जायला यायला अडथळा येत होता. म्हणून मी तो उघडलेल्याच अवस्थेत तो उभा करून ठेवला होता. जेणेकरून जागा कमी व्यापली जाईल. हेच ते कारण!! आयर्निंग बोर्ड आडवा केल्याबरोब्बर रडणे थांबले. पाणी मागितले प्यायला व दुसर्‍या क्षणाला झोपून गेला. ते सकाळी ८ ला उठला! (अर्थात आज सकाळ ४ ला झाली. पण निदान रडकी, टँट्रम्सवाली नव्हती ती. रेग्युलर झोपेतून उठल्यावर परत झोपेसाठी फोकस न करता आल्याने, आयपॅडची आठवण आल्याने जे उठणे असते ते होते ते. )

पण ह्या सर्वामुळे एक समजले. आमचा मुलगा मुळात तसा उगीच रडत नाही. त्याची जुनी थेरपीस्ट म्हणायची त्याप्रमाणे प्रत्येक बिहेविअरला कारण असते. ते कारण आम्हाला कळत नसल्याने त्याची चिडचिड होते. त्या फ्रस्ट्रेशन वाढतच जाते ते एक म्हणजे त्याला शब्द बोलून सांगता येत नाही पटकन.. मोस्ट ऑफ द टाईम्स तो अशा गोष्टी कम्युनिकेट नाही करू शकत. जरी पॉईंटींग वगैरे केले तरी ते खूप रँडम आहे. अन दुसरी गोष्ट.. महत्वाची गोष्ट! आडवा आयर्निंग बोर्ड उभा ठेवला ह्या छोट्याश्या गोष्टीला तो अ‍ॅक्सेप्ट करू शकत नव्हता. बदलाशी जुळवून घेणे ही सर्वात अवघड गोष्ट आहे त्याच्यादृष्टीने. कदाचित तो उभा आयर्निंग बोर्ड त्याला एखाद्या मॉन्स्टरसारखा देखील वाटत असेल. कारण तो अजिबात त्याच्याजवळ जात नव्हता. तो इझीली बोर्ड स्वतः आडवा करू शकला असता.

अशी ही ५ रात्रींची कहाणी. मुलं रडतातच, हट्ट करतातच. त्याबदल काहीच म्हणणे नाही. पण ही कहाणी म्हणजे पर्फेक्ट उदाहरण आहे ऑटीझम म्हणजे काय ह्याचे. किती छोट्या गोष्टी ह्याला बॉदर होऊ शकतात व त्या आम्हाला न समजल्याने कसा राईचा पर्वत होऊन बसतो ह्याचे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला लहान पणी एका अंधार्‍या खोलीत एकटे झो पावे लागे. तेव्हा अशीच भीती वाटत असे. भिंतीवर जे ओर खडे किंवा डाग असत त्यातून भूताचे आकार दिसतात असे वाटे व फार भीती वाटे. कोणी तरी सोबत असावे असे वाटे. तेव्हा टेडीबेअर कल्चर नव्हते. त्याची आठवण झाली . बाळाला उभ्या आयर्निंग बोर्ड ची भीती बसली असेल. तो कोणी तरी उभा माणूस, राक्षस बुवा असेल असे वाटले असेल व ते सांगता आले नसेल. मी माझ्या पुरती एक प्रार्थना बनवली होती व ती म्हणत मी झोपी जाई. मग काही दिवसांनी ट्रांझिस्टर मिळाल्यावर सोबत आली व गाणी कार्यक्रम जाहिराती ऐकत झोपी जाई.

तसे तुम्हाला काही करता येइल का ते बघा. देवावर किंवा कश्यावर विश्वास असेल त्याचे त्याला थोडे से शिकवणे अगदी गंपती बाप्पा मोरया. इतके जप करत झोपी जात असेल तरी चालेल. इथे फक्त अश्युअरिंग रिपिटिटिव्ह मंत्र असे च त्याचे स्वरूप आहे. देव आहे कि नाही श्रद्धा आहे कि नाही असा उहापोह अभिप्रेत नाही.

त्याचे सिक्य रिटी ब्लँकेट किंवा टेडी आहे का? त्याने ही मदत होईल. एक कॉण्स्टंट कंपॅनिअन जेणे करून एकटे वा भीती वाटणे कमी होईल.

व रेडिओ / ट्रांझि स्टर वर त्याला झोप येइल असे सूदिंग गोड संगीत, गाणे आईचा आवाज असे लावता येइल. स्पीकर वर हेड फोन्स नाही.

You are a strong lady. Take good care of yourself.

आईगं! किती त्रास झाला असेल पिल्लाला! तुम्ही केवढा पेशन्स ठेवून कोडे उलगडलेत .
>> हे नक्की की कितीही एक्सपर्ट डॉक्टर्स, थेरपिस्ट आणले तरी आई बाबा जेवढे मुलाला समजू शकतात तसं कुणीही करू शकत नाही! हॅट्स ऑफ टु यू !!>>+१

काल प्रवासात झोप झाल्याने मुलगी रात्री जवळपास २ पर्यंत जागी होती तर मी केवढी वैतागले होते, तुम्हांला ५ रात्री हा त्रास काढावा लागला, तुम्ही केवढा पेशन्स ठेवला !

>> हे नक्की की कितीही एक्सपर्ट डॉक्टर्स, थेरपिस्ट आणले तरी आई बाबा जेवढे मुलाला समजू शकतात तसं कुणीही करू शकत नाही! हॅट्स ऑफ टु यू !!>>+१११

हॅट्स ऑफ टु यू !!
तुमच्याकडे बघून कळते कि पेशन्स म्हणजे काय. >>> +१००००० .
लेकाने एक्दा रडण्याचा सूर लावला की माझी चिड्चिड होते .

अवांतर , अमा Happy . तुमच्या पोस्ट वरून कालचीच गोष्ट आठवली .
मी जाम थकून झोपेला आले होते. लेकाने उशीरा संध्याकाळी एक झोप काढली होती , त्यामुळे त्याला झोप येत नव्हती बहुतेक .
मध्येच मला उठवून , माझ्या कुशीत शिरून , " मम्मा , गाणं म्हण ना , गाणं म्हण ना " करायला लागला.
मी अर्धवट झोपेत , बेसुर , बेताल गाणं ऐकवलच. तो बहुतेक झोपला असावा लगेच.

बिच्चारं ग पिल्लू काही तरी त्याच्या मनाला टोचत होतं आणि ते तो सांगू शकत नव्हता आणि कित्ती त्रास झाला त्याला पाच रात्री. आणि तुम्हालाही.

तुमच्या पेशन्सला सलाम. माझा सात वर्षाचा लेक खुप समजूतदार आहे, मदत करतो, स्वतःची कामे स्वतः करतो तरी किती तरी चिडते त्याच्यावर मी. ... पण तुम्ही त्याचा प्रॉब्लेम समजून घेतलात आणि खुप छान हॅण्डल केलत.

स्स्स, सन वॉरियर आणि तुमची - दोघांची जिद्द कौतुकास्पद आहे. सुटलं ते कोडं ते बरं. आता कम्युनिकेशन बुक मध्ये त्या आयर्न बोर्डचे चित्र हवे.

मस्त लिहिलंय.
प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स कुठे कामी येतील!!! कामात, कुठेतरी एक छोटा 'बग' असतो, सगळे सिम्प्टम ओरडून सांगत असतात, की तिकडे बग आहे, पण वरवर कुठ्ठे काही सापडत नाही. स्टेप बाय स्टेप गेलं की समजतं, मग भारी आनंद होतो, आणि लगेच वाटतं किती ट्रिव्हिअल होतं, कसं समजलं नाही इतका वेळ! ते फिलिंग आलं. Happy

ममा वॉर्रिअर, तुम्ही दोघांनीही ५ रात्री किती मानसिक आणि शारीरिक त्रास सहन केलात ह्याची कल्पनाही करवत नाही! स्वतःचं आजारपण, स्लीप डिप्रायव्हेशन, त्यावर बाळवॉरिअराची काळजी! फिजिकली, इमोशनली ड्रेन आउट झाल्यावर त्याच्या मेल्टडाउनचं कारण समजण्याचा क्षण, आणि त्यावर उपाय केल्यामुळे रुटीन पुन्हा नॉर्मल झाल्याचा रिलीफ... किती जबरी फीलिंग असेल!

>>थेरपिस्ट्सना स्वतःचा स्वतः टायमर संपल्यावर आयपॅड दिला, थेरपीज्च्या ठिकाणी त्याचा जिवश्चकंठश्च मिकी माऊस त्याने इतर मुलांबरोबर शेअर केला.. आयुष्यात प्रथम मोठ्या मुलांचा झोपाळा ट्राय केला. आईच्या कारमध्ये ड्रायव्हर्स सीटवर बसून व्हील हातात धरून कार चालवायचे प्रिटेंड प्ले तर पहिल्यांदा केले त्याने

ही प्रगती वाचून खूप छान वाटलं. प्रिटेंड प्लेबद्दल वाचून तर जास्तच!

बग सापडल्यानंतरचे फिलिंग Happy >>> अमितव +१
मवॉ, तुम्हाला हॅट्स ऑफ टू यू !
सर्वच्या सर्व शिक्षक, थेरपिस्ट त्याच्या नवनवीन स्किल्सबद्दल कौतुक करत आहेत. एकंदरीत खुष आहेत.>>> खूप छान वाटले हे वाचून. Keep it up !!!

५ रात्रींची लढाई. खर्‍या Warrior आहात तुम्ही. तुमच्या पेशन्सला सलाम.
मुलाची इतर प्रगती वाचून आनंद झाला.

हम्म्म. खरं आहे. छान डिटेलिंग.

छोकऱ्याची प्रगती वाचून आनंद झाला. बेस्ट विशेस. Happy

मला खरच रडू आलं... काय आणि कसं केलत तुम्ही.
तुमचा प्रत्येक लेख मला स्वतःला आरशात बघायला लावतो. ह्यापेक्षा वेगळं काहीही नाही सांगू शकत
अनेकानेक शुभेच्छा. तुम्हाला पिल्लाला.

तुमचा प्रत्येक लेख मला स्वतःला आरशात बघायला लावतो. ह्यापेक्षा वेगळं काहीही नाही सांगू शकत
अनेकानेक शुभेच्छा. तुम्हाला पिल्लाला. >>>>>>> +१११११११

आभार सर्वांचे.

मलाही कारण सापडल्यावर खूपच रिलिफ मिळाला. ५-७ दिवसांचा स्ट्रेस आलेला तो निघून गेला.

पेशन्स बद्दल- हतबलता व हेल्पलेसनेस ही पेशन्सची जननी आहे. दुसरा काही ऑप्शनच नाही आहे. प्रत्येक आई हेच करेल. मी काहीच वेगळे नाही केले.

अमा, माझ्या मुलाला गरज असेल तेव्हा मला हाक मारण्यासाठी आई सुद्धा म्हणता येत नाही. त्याला श्लोक/चँट ही कन्सेप्ट शिकवणे,अ‍ॅक्चुअल म्हणायला लावणे काहीच पॉसिबल नाही. एस्पेशली अशा स्ट्रेसफुल काळात तो सरळपणे विचार नाही करू शकत. पण मला आनंद आहे, की दोन रात्रींनंतर त्यालापॉइंट करण्याचे सुचले. इतक्या रडारडीत त्याने 'विचार' केला परिस्थिती कशी सुधारता येईल ह्याचा. त्याचे ब्लँकेट व मिकी माऊस सदोदित असतो बरोबर. मिकी माऊसमध्ये तर प्राण आले आहेत आता बहुतेक. त्या दोघांच्या गप्पा चालत असाव्यात!

गेले बरेच दिवस मी त्रासलेली ,वैतागलेली असल्यानेच की काय.. कालआज मध्ये मुलाने जरा चांगले वागून दाखवले.
मी त्याची रूम आवरत असताना त्याने दुधाच्या कपाचे चित्र आणून दिले. मी त्याला सांगितले वेट, लेट मी क्लिनअप फर्स्ट. २-४दा हाच संवाद रिपिट झाला. तो बराच पेशन्टली वाट पाहात होता, शेवटी आला.. सगळी जमिनीवरची खेळ्णी पटापटा रॅकमध्ये ठेवायला लागला. पूर्ण आवरले.. अन मला परत दुधाचे चित्र! त्याला क्लिनप आवडते पण इतके झटपट मी कधीच नाही पहिले!
दुसरी गोष्ट.. मी पर्पल मार्करने बोर्डवर पर्पल लिहिले. तर त्याने येऊन मार्कर घेतला व लिहू लागला सी ए टी. (खूप दिवसांनी लिहिले. त्यामुळे अक्षर जेमतेम रिडेबल होते) मी अवाक! एरिक कार्लच्या ब्राऊन बेअर पुस्तकात पर्पल कॅट आहे. आता त्याला इतर पर्पल गोष्टी शिकवणे व पर्पल कॅट रिअल लाइफमध्ये नसते हे शिकवणे जरूरीचे झाले आहे! Happy

तुमचा प्रत्येक लेख मला स्वतःला आरशात बघायला लावतो. ह्यापेक्षा वेगळं काहीही नाही सांगू शकत
अनेकानेक शुभेच्छा. तुम्हाला पिल्लाला>>> + १११११

नविन पोस्ट छान आहे. पर्पल कॅट Happy

_/\_ वाचताना कशाकडे बोट दाखवत असेल तो, असं झालेलं... कशाकडे ते वाचून - अवाक झाले... एवढ्या (आपल्याला छोट्या वाटणार्‍या) गोष्टीने बिचारा एव ढा हैराण झालेला? आणि त्याच्याबरोबर आई-बाबा!! बरं कारण कळलं ते!

वाचताना माझ्या मनात कपड्यांचा साबण बदलला असेल का ? जॅमीज च टेक्श्चर आवडत नसेल का ? कार्पेट शॅम्पू करवऊन घेतलं असेल का ? इतर क्लीनिंग सप्लाइज / क्रीम वगैरे बदललं असेल का असे विचार येत होते. इस्त्री चा बोर्ड तर अजिबात सुचला नसता. ग्रेट आहात .

अवांतर - पर्पल कॅट वरुन आठवले - हॅरॉल्ड् आणि पर्पल क्रेयॉन पुस्तक वाचली आहेत का बाळाबरोबर ? एकदम मजेदार आहेत .

स्वतः आजारी असताना तर सुखासुखी चिडचिड होत असते. तुमची खरोखर कमाल आहे.
तुम्हाला खूप शुभेच्छा. होपफुली तुम्हाला विश्रांती मिळाली असेल आणि आता तुमचे तब्येत बरी असेल अशी आशा.

Pages