मटार पॅटिस

Submitted by मंजूडी on 12 January, 2016 - 00:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

इकडे गेल्या पंधरवड्यात कोणीतरी मटार पॅटिसचं वर्णन करताना 'मटाराचा लगदा भरायचा' वगैरे काहीतरी(च) शब्दरचना केलेली वाचली आणि तेव्हापासून मटार पॅटिस करण्याचे डोहाळे लागले. मटाराच्या सोललेल्या दाण्यांनी भरलेले डबे फ्रिजमधली जागा व्यापू लागले आणि मग मटार उसळ, मटार करंज्या, मटार पुलाव, मटार पोहे, उसळ पाव वगैरे करून मटार संपायच्या आत लगेचच्याच वीकेंडला मटार पॅटिसचा नंबर लावला. तसं या सीझनला फ्रिजमध्ये मटार नाहीत अशी वेळ शक्यतोवर येत नाही, पण निवांत वीकेंड मिळणं थोडं कठीण असतं. थोडी खटपटीची पाकृ आहे ही.

तर मटार पॅटिससाठी लागणारं साहित्यः

सारणासाठी :
मटार दाणे - ४ वाट्या
कांदा - १ मोठा
गाजर - १ छोटं किंवा अर्ध मोठं (पौष्टिकपणासाठी नव्हे, सारण मिळून येण्यासाठी)
टोमॅटो - १ मोठा
ओलं खोबरं - अर्धी वाटी
फोडणीचं साहित्य आणि तेल
मीठ, साखर, लाल तिखट, गोडा मसाला, गरम मसाला, धनेजिर्‍याची पूड इत्यादी सगळं चवीप्रमाणे

आवरणासाठी:
बटाटे - १० मध्यम आकाराचे
मीठ, ब्रेडस्लाईसचा चुरा
पॅटिस परतण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

सारणासाठी:
१. छोट्या कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून मटार दोन शिट्या करून शिजवून घ्या. मटार अगदी टणटणीत नाही राहिले पाहिजेत, पण म्हणून जास्त शिजून लगदाही व्हायला नको.
२. कांदा, टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्या, गाजर किसून घ्या.
३. कढईत तेलाची फोडणी करून त्यात कांदा, टोमॅटो परतून घ्या. मग गाजराचा कीस घालून परता. सगळं नीट शिजल्यावर मटार दाणे घालून परता.
४. ओलं खोबरं घालून परता.
५. चवीसाठी घालायचे सगळे मालमसाले घालून नीट एकत्र करा. हे सारण छान मिळून यायला हवे. पण तरीही मटार दाणे अख्खे राहायला हवेत.

तयार सारणाचा फोटो:

matar pattice saran.jpg

पॅटिसच्या आवरणासाठी:
१. बटाटे उकडून घ्या. थंड झाल्यावर किसून/ मॅश करून घ्या. बटाट्याच्या गुठळ्या राहता कामा नयेत.
२. त्यात मीठ आणि लागेल तसा ब्रेडचा चुरा घालून नीट मळून घ्या. बटाटे चिकट नसतील तर ब्रेडचा चुरा लागणारही नाही. पॅटिस नीट वळता येतील असा फर्म गोळा व्हायला हवा.

पॅटिस वळताना बटाट्याचा कचोरीएवढा गोळा घेऊन त्याची वाटी करा. त्यात मटाराचे सारण भरून छान गोल पॅटिस वळा. ब्रेडच्या चुर्‍यात घोळवून तव्यावर तेल सोडून खमंग भाजा. टोमॅटो सॉसबरोबर गर्मागर्म पॅटिस खाऊन टाका.

वाढणी/प्रमाण: 
१० मध्यम बटाटे आणि चार वाट्या मटारांचे ३० पॅटिस झाले. दोन चमचे सारण उरलं. ते कोबीच्या भाजीत ढकलून दिलं.
अधिक टिपा: 

matar pattice.jpg

माझ्या मोबाईलचा कॅमेरा गंडलाय, आणि गरमगरम पॅटिस मटकावण्याच्या गडबडीत नीट अँगल बिंगल साधून प्रेझेंटेबल फोटो काढण्याइतका वेळ मिळाला नाही, त्याबद्दल क्षमस्व! Wink

हा जरा बरा फोटो:

matar pattice 1.jpg

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार फार भारी रेसिपी...
तोंडाला पाणी सुटले
नक्की करुन बघणार

मस्त आठवण काढलिस अगदी.
मस्त दिसताहेत तयार पॅटिस. तव्यावर आहेत म्हणुन राहिलेत, ताटात असते तर उरलेही नसते फोटो काढण्यासाठी. Lol

वा मस्त तोपासु.

आमच्या घरात पंधरवड्याने होतातच. मुलिंचे फेव्हरेट आहेत. मटारचा सिझन नसला की फ्रोझन आणून करावे लागतात.

यम्मी..न तळता तव्यावर भाजले ते चांगले केले.मस्त पाऊस पडतोय आणि आपण टिपॉय वर पाय पसरुन टिव्ही बघतोय आणि कोणीतरी आयते हातात आणून दिले तर किती मस्त.

छान पाकृ. पॅटीस टेंप्टिंग.
सारणाचा फोटो हवा होता. फायनल प्रॉडक्ट जरा कापुन आतला गाभा (सारण) दिसेल असा ही एक फोटो हवा होता.

पूनम, आपण टिक्कीच करू. Proud
फोटो अगदी तोंपासु आहे. अगदी डिटेलमध्ये कृती दिली आहेस. अश्या पाकृ वाचल्या की पदार्थ करून पहावेसे वाटतात. नक्की करून बघणार.

सर्वांना धन्यवाद!
मटार पॅटिस करा आणि सुंदर सुंदर फोटोही द्या. जे बघून बाकीचे लोक मटार पॅटिस करायला सरसावतील.

पूनम, प्राची, बटाट्याच्या लगद्यात ब्रेडचा चुरा घातल्यावर वळायला एकदम खुटखुटीत सोप्पे होतात मटार पॅटिस. वाटल्यास थोडं तेल लावायचं हातांना, म्हणजे चिकटणार नाही बटाटा हाताला. शिवाय त्या ब्रेडच्या चुर्‍यामुळे भाजल्यावरही मस्त क्रिस्पी होतात. वाटतं तितकं कठीण काम नाही ते.

सुंदर. फोटोपण छान.

मी करते पण थोडे तांदूळपीठ घालते बटाट्यात गरज असेल तर पारी वळायला.

टोमाटो नाही घातले कधी सारणात. आता घालून बघेन.

बटाट्यात नाहीच, आतल्या सारणात कधी अजून टोमाटो टाकले नाहीत, असं म्हणायचं आहे मला. क्वचित गाजर आणि बीट टाकलं होतं पण टोमाटो नाही. Lol

Pages