मटार पॅटिस

Submitted by मंजूडी on 12 January, 2016 - 00:21
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

इकडे गेल्या पंधरवड्यात कोणीतरी मटार पॅटिसचं वर्णन करताना 'मटाराचा लगदा भरायचा' वगैरे काहीतरी(च) शब्दरचना केलेली वाचली आणि तेव्हापासून मटार पॅटिस करण्याचे डोहाळे लागले. मटाराच्या सोललेल्या दाण्यांनी भरलेले डबे फ्रिजमधली जागा व्यापू लागले आणि मग मटार उसळ, मटार करंज्या, मटार पुलाव, मटार पोहे, उसळ पाव वगैरे करून मटार संपायच्या आत लगेचच्याच वीकेंडला मटार पॅटिसचा नंबर लावला. तसं या सीझनला फ्रिजमध्ये मटार नाहीत अशी वेळ शक्यतोवर येत नाही, पण निवांत वीकेंड मिळणं थोडं कठीण असतं. थोडी खटपटीची पाकृ आहे ही.

तर मटार पॅटिससाठी लागणारं साहित्यः

सारणासाठी :
मटार दाणे - ४ वाट्या
कांदा - १ मोठा
गाजर - १ छोटं किंवा अर्ध मोठं (पौष्टिकपणासाठी नव्हे, सारण मिळून येण्यासाठी)
टोमॅटो - १ मोठा
ओलं खोबरं - अर्धी वाटी
फोडणीचं साहित्य आणि तेल
मीठ, साखर, लाल तिखट, गोडा मसाला, गरम मसाला, धनेजिर्‍याची पूड इत्यादी सगळं चवीप्रमाणे

आवरणासाठी:
बटाटे - १० मध्यम आकाराचे
मीठ, ब्रेडस्लाईसचा चुरा
पॅटिस परतण्यासाठी तेल

क्रमवार पाककृती: 

सारणासाठी:
१. छोट्या कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून मटार दोन शिट्या करून शिजवून घ्या. मटार अगदी टणटणीत नाही राहिले पाहिजेत, पण म्हणून जास्त शिजून लगदाही व्हायला नको.
२. कांदा, टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्या, गाजर किसून घ्या.
३. कढईत तेलाची फोडणी करून त्यात कांदा, टोमॅटो परतून घ्या. मग गाजराचा कीस घालून परता. सगळं नीट शिजल्यावर मटार दाणे घालून परता.
४. ओलं खोबरं घालून परता.
५. चवीसाठी घालायचे सगळे मालमसाले घालून नीट एकत्र करा. हे सारण छान मिळून यायला हवे. पण तरीही मटार दाणे अख्खे राहायला हवेत.

तयार सारणाचा फोटो:

matar pattice saran.jpg

पॅटिसच्या आवरणासाठी:
१. बटाटे उकडून घ्या. थंड झाल्यावर किसून/ मॅश करून घ्या. बटाट्याच्या गुठळ्या राहता कामा नयेत.
२. त्यात मीठ आणि लागेल तसा ब्रेडचा चुरा घालून नीट मळून घ्या. बटाटे चिकट नसतील तर ब्रेडचा चुरा लागणारही नाही. पॅटिस नीट वळता येतील असा फर्म गोळा व्हायला हवा.

पॅटिस वळताना बटाट्याचा कचोरीएवढा गोळा घेऊन त्याची वाटी करा. त्यात मटाराचे सारण भरून छान गोल पॅटिस वळा. ब्रेडच्या चुर्‍यात घोळवून तव्यावर तेल सोडून खमंग भाजा. टोमॅटो सॉसबरोबर गर्मागर्म पॅटिस खाऊन टाका.

वाढणी/प्रमाण: 
१० मध्यम बटाटे आणि चार वाट्या मटारांचे ३० पॅटिस झाले. दोन चमचे सारण उरलं. ते कोबीच्या भाजीत ढकलून दिलं.
अधिक टिपा: 

matar pattice.jpg

माझ्या मोबाईलचा कॅमेरा गंडलाय, आणि गरमगरम पॅटिस मटकावण्याच्या गडबडीत नीट अँगल बिंगल साधून प्रेझेंटेबल फोटो काढण्याइतका वेळ मिळाला नाही, त्याबद्दल क्षमस्व! Wink

हा जरा बरा फोटो:

matar pattice 1.jpg

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही..
ये धागा कैसे क्या सुटगया मेरे डोळेके नीचेसे ( डोळ्याखालुनच स्पष्ट भाषांतर )
लय मस्त दिसताय.. मी पन बनवणार लवकरच..

मस्त रेसिपी, योग्य हातांच्या डोळ्या के नीचे ठेवतो, आणि सोबत रगडा पॅटीस वाला रगडा करायचा अर्जही ठेवतो (नुसतीपण भारीच लागत असतील)

मार डाला Proud खतरनाक फोटो आहेत. आम्ही याला बटाट्याच्या कचोर्‍या म्हणतो. उपवासाला चालणारे घटक पदार्थ वापरून पण करतात असाच प्रकार.

का कोणास ठावूक पण हा पदार्थ नुसताच ऐकलेला कधी खाल्लाच न्हवता. खाल्ला असेल तर हे मटारपॅटिस हे माहित नसेल. कचोरी सारखा असेल असं वाटलेलं. हे टिक्की सारखं दिसतंय, जमेलसं वाटतंय. बघतो करून.
मंजू, मटार उसळ तुझ्या रेसिपीने केलेली मस्त झालेली, हे पण तसंच दिसतंय, फक्त कोरडं सारण करून बटाट्याच्या पारीत भरायचं. या विकांताला नंबर लावणार. Happy

वा वा! मटार पॅटीस अगदी रूपवंत दिस्ताहेत! तेवढी आतल्या मटारांशी नजरानजर झाली असती तर बरं वाटलं असतं. येत्या वीकेंडाला करणार. (सारणात पोपट* घेतले आणि कव्हरात रताळं तर चालेल का? :P) ह्यात ओला नारळ, कोथिंबीर, हिरव्या मिर्च्या, मीठ, साखर आणि लिंबाचा रस एकत्र करून त्याचं सारण भरून नारळाचे पॅटीस पण करणार.

ह्यावरून ज्योक मारू नका. माहिती नसेल तर आपल्या त्या ह्यांना विचारा.

सिंडरेला, बटाट्याच्या कचोर्‍या का बरं?! खाल्ल्या मटारांना जागायला नको? मटारांच्यावार्‍यालाहीउभंरहायचंनाहीअसंकाहीआहेका? Proud

मृण, Biggrin

पोपट विदर्भातले वाटते Happy मस्त दिसताहेत पॅटिस ! मटारच्या दिवसात हमखास व्हायचा हा पदार्थ.
मी पण सारणात टोमॅटो नव्हता घातला कधी, आणि केलेत ते फार पूर्वी कोणे एके काळीच केले होते तेही तळून!!
पुण्यात बादशाही मधे ते वर कुणीतरी लिहिलेले उपवासाचे पॅटिस मिळायचे. त्यात नारळ मिर्ची कोथिंबीर असं सारण असायचं.अन बरोबर दही वड्याच्या दह्यासारखी चटणी! तसे गोड सारण वाले पण मिळायचे.

हे असे तोंडाला पाणी सुटायला लावणार्‍या रिसिप्या टाकणार्‍यांनी असे सर्व पदार्थ बनवून आमच्या सारख्या वाचकांसाठी खायला आणावेत त्यासाठी मा बो चे एक विशेष गटग अयोजित करावे...

Proud

हैला! फोटो आवडल्याच्या पोस्टी वाचून भरून का कायसंसं येतंय Wink

(सारणात पोपट* घेतले आणि कव्हरात रताळं तर चालेल का? फिदीफिदी) ह्यात ओला नारळ, कोथिंबीर, हिरव्या मिर्च्या, मीठ, साखर आणि लिंबाचा रस एकत्र करून त्याचं सारण भरून नारळाचे पॅटीस पण करणार.>>> ताई, तुम्हाला सर्व काही अलाऊड आहे. तुम्ही कव्हरासाठी लाल भोपळाही घेऊ शकता Wink
आई ओल्या खोबर्‍याची चटणी भरून पॅटिस करते. बर्‍याच हॉटेलांमध्ये 'फराळी कचोरी' नामक पदार्थ मिळतो त्यात नारळाचं किंचीत गोड आणि मिरचीचे बाऽऽरीक तुकडे घातलेलं सारण असतं. पण त्याच्या पारीसाठी उकडलेल्या बटाट्यात कॉर्नफ्लार घालतात बहुतेक आणि ते तळतात. कॉर्नफ्लार उपासाला चालतं का माहिती नाही, बाईंडींगसाठी कदाचित राजगिरा पीठ घालत असावेत.
पण मटार म्हणजे मटार म्हणजे मटार असतात.

अमेय, मटार पॅटिसबरोबर रगडा जमेगा नही! पांढर्‍या वाटाण्यासमोर मटाराची चव फिकीपडाते, मग खायला काही मजा नाही. मटारपॅटिस बरोबर ओल्या खोबर्‍याची चटणी किंवा टोमॅटो सॉसच पाहिजे. रगडा पॅटिसला नुसत्या बटाट्याचेच पॅटिस पाहिजेत.

मंजू, मेरा सारण तेरे सारणसे ज्यादा सुका रहता है| नही तो मेरेको वो सारण बटाटेके पारीमे भरके पारी बंद करना मुश्किल होता है|

अमेय, मटार पॅटिसबरोबर रगडा नका घेवू.

केश्वे, ते सारण यापेक्षा अजून कोरडं करण्यासाठी परतलं तर करपेलच.

मोदकाचं पुरण कसं असतं तशी कन्सिस्टन्सी पाहिजे सारणाला.... सुक्या खोबर्‍याच्या भुरभुरीत कोरड्या पुरणाची करंजी मला भरता येत नाही Happy

हा! मोदकाच्या पुरणाइतकं बरोबर. मला त्या फोटोत ते भोपळ्याचं भरीत किंवा डाळीचा चटका असतो त्या कन्सिस्टन्सीसारखं वाटलं.

मंजूडी, मस्तच रेसिपी. नक्की ट्राय करेन. मटार करंजीची रेसिपी सुद्धा दे. माबोवरच समजला हा पदार्थ. दोन्ही कधी खाल्ल नाही. रगडा पॅटीस च पॅटीस तू नुसता बटाटा वापरून कस करते? Uhoh तव्याला चिकटत नाही का??

@ आरती: तव्याला अगदी थोडे तेल लावले आणि टेंपरेचर नीट असले तर बटाटे चिकटत नाहीत तव्याला. आणि चिकटले तरी उलथन्याने हलक्या हाताने निघतात (आणि निघालेला मायलार्ड रिअ‍ॅक्शन ने तयार झालेला सोनेरी लेयर जबरदस्त लागतो..आठवणीनेच यम यम.)
बाकी इन्पुटस मूळ धागाकर्तीकडून मिळतीलच.

Pages