चंप्या दुधवाला....!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

मायबोलीवर प्रकाशित झालेल्या
'शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे' (http://www.maayboli.com/node/12292) आणि
वांगे अमर रहे ! (http://www.maayboli.com/node/12438)
या लेखांवर लिहिताना वाचताना मला माझा शेतीबद्दल चा एक अनुभव मांडावासा वाटला!

सन २००६ मध्ये पी.एच.डी. (रसायनशास्त्र) चा अभ्यासक्रम/संशोधन संपवुन मी भारतात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी तयारी करायला पुण्यात आलो. पण दुर्दैवाने, माझ्या छोट्या पुतण्याला कॅन्सर झाल्याने मला अभ्यास अर्धवट सोडुन त्याच्या उपचाराकडे लक्ष द्यावे लागले. चाणक्य मंडळ, पुणे अन टाटा हॉस्पिटल, मुंबई च्या खेट्या मारण्यात माझे लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचे स्वप्न कामी आले Sad मे २००७ ची पुर्व परिक्षा मी नापास झालो! आख्या आयुष्यातील नापास चा एकमेव शिक्का माझ्या माथी बसला! (सविस्तर: स्व..देश पुस्तक. ग्रंथाली प्रकाशन)

त्यानंतर जुन २००७ ला माझे लग्न झाले. Happy नोकरी अर्धवट करत होतो. पण मन रमत नव्हते. स्व्तःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचे वेड लागले होते. आय ए एस चे स्वप्न धुळीस मिळाले अन मग भले लट्ट पगाराचे नोकरी हाती असुनही मन स्थिर नव्हते. रसायन अन ऑषध उद्योगात काही करायला लागणारे मोठे भांडावल हाती नव्हते..... मग गावी काही करावे म्हणुन चाचपणी केली. बारामतीच्या सह्याद्री अ‍ॅग्रो ने आमच्या तालुक्यात दुध संकलन व शितकरण केंद्रे चालु करण्याचे योजले आहे असे समजले. आमच्या कुटुंबाचे एक हितचिंतक श्री नानाभाऊ कराडे ह्यांनी मला सविस्तर माहिती दिली... अन ७ ऑगस्ट २००७ ला बारामतीला सदर कंपनी बरोबर करार केला!

या पुर्वी दुध संकलनाचा व्यवसाय एका भावाने केलेला होता, पण त्यात त्याला तब्बल १० लाखाचा तोटा झालेला होता. त्यामुळे घरुन कुणीही ह्या उपक्रमाला आर्थिक पाठबळ देउ करित नव्हते! एकला चलो रे.......!

गावाकडील शेतकृयांकडुन्/दुध उत्पादकांकडुन दररोज दोन वेळा दुध जमा करणे व ते ३ डिग्री तापमानाला थंड करुन टॅन्कर (सह्याद्री अ‍ॅग्रो ने पाठवलेला) ने बारामतीला पोहच करणे हे कामाचे स्वरुप.

दुध संकलन व शीतकरन केंद्र चालु करण्याचा खर्च होता साधारण पाच लाख रुपये. जागा स्वतःचीच (व्होल वावर इज आवर) असल्याने फक्त कंपनीनी दिलेल्या आराखड्याप्रमाणे इमारत बांधणी चा खर्च होता. खिशात होते सत्तर हजार रुपये! काम तर सुरु केले.... मग पाया बांधुन झाल्यावर पैसे संपले:)
त्याचवेळी खुप पाउस पडला अन बांधकम जवळपास एक महिना बंद ठेवावे लागले! माती, वाळु, विटा ई ची वाहतुक पावसाने रस्ते ओले केल्याने बंद झाली होती..... त्यामुळे महिनाभर सवलत मिळाली! पैसे संपल्याचे कुणाच्या लक्षातही आले नाही Happy

तालुक्यातील तीन बॅन्काकडे कर्जाची मागणी केली. तारण देऊनही दुध संकलन केंद्रा साठी च्या पुर्वीच्या अनुभवावरुन एकाही बॅन्केने कर्ज दिले नाही. मग एका मित्राकडुन काही पैसे घेतले, अन काही कंपन्यांमध्ये काम करणार्या मित्रांनी त्यांच्या पर्सनल लोन सेवेचा वापर करुन ( व्याज दर १९%) मला तीन लाख रुपये जमा करुन दिले!

पाउस थांबला अन काम सुरु झाले!

दत्त जयंतीच्या दिवशी २३ डिसेंबर २००७ ला दुध संकलन अन शितकरन केंद्राचे उद्घाटन केले! जो भाउ दुधातील माहितगार होता, त्याने केंद्र चालवायची जबबदारी उचलली. पहिल्या दिवशी १४२ लिटर दुध जमा झाले. कंपनीने सहा महिन्यात प्रतिदिन किमान दीड हजार लिटर दुध जमा व्हायला हवे असे कळवले. मग शेतकर्यांकडे मोर्चा वळवला... पण ग्रामीण भागात असे अनेक संकलन केंद्र असल्याने प्रत्येक जण उचल (अ‍ॅड्व्हान्स ) ची मागणी करु लागला.... ज्या पाच पन्नास शेतकर्‍याना बोललो, त्यांची एकुण मागणी २५ लाखाच्या पुढे गेली..... धबाडधुम! इथे शिवरात्र अन एकादशी एकसाथ चालु असताना ....!

मग शेतकर्‍यांना केवळ १) दुधाचे वेळेवर पेमेट २) दर्जेदार दुधाला दर्जेदार भाव ३) केंद्र चालवण्याचा खर्च म्हणुन दुध उत्पादकाकडुन काहीही कपात केली जाणार नाही, अश्या आश्वासनांवर (जी गेली दोन वर्षे १००% पाळली आहेत ) दुध देण्याची विनंती केली. काहींनी ती मान्य केली अन त्यांना फरक समजुन आला..... एक महिन्यात प्रतिदिन १०० अन सहा महिन्यात प्रतिदिन अडिच हजार लिटर दुध जमा होउ लागली. एका वर्षात प्रतिदिन चार हजार लिटर दुध जमा करुन महाराष्ट्रात सह्याद्री अ‍ॅग्रो च्या एकुण ५०० केंद्रा मध्ये तीसरा क्रमांक पटकावला!!! Happy

मित्रांनी दिलेले सर्व पैसे परत करु शकलो! अन अनेक नवे मित्र ही जोडु शकलो!

आज अंदाजे ४०० लहान मोठे दुध उत्पादक दररोज ४००० लिटर दर्जेदार दुध श्री बाळकृष्ण दुध संकलन व शितकरण केंद्रावर जमा करत असतात! इतर दुध केंद्रांनी आजवर लुटलेले/ कमी भाव दिलेले/ पैसे बुडवलेले लोक गेली दोन वर्षे अत्यंत समाधानाने दुध उत्पादनाचा हा पुरक उद्योग यशस्व्व्पणे करित आहेत... सकाळी किंवा संध्याकाळी जर कधी केंद्रावर बसले, तर ह्या शेतकरर्यांशी मनमोकळी बातचीत होते. लै झ्याक मजा येते! तिथुन पाय हलत नाही! Happy पुन्हा मुंबई, सिडनी ला जाउशी वाटत नाही Happy
अश्या भेटीतुन विचारांचे आदान प्रदान होते! समवयस्क अन लहान मोठे शेतकरी बांधव प्रत्यक्ष शेती करताना काय अडचणी येतात ते सांगतात...अन जमल्यास काही मेळावे भरवुन, कृषी तज्ञ बोलावुन मार्गदर्शन वर्ग आयोजित केले जातात.

***************

ग्रामीण भागातील शेती मध्ये दुध अन ऊस हे महत्वाचे घटक आहेत! दुधाचे काम सुरु आहे. मग ऊसाबद्दल विचार सुरु केला..... साखर कारखाना काढण्याची ऐपत तर नाही! पण एक १०० टन प्रतिदिन गाळप क्षमतेचे गुळ उत्पादन केंद्र (गुर्‍हाळ/ खांडसरी/कहाकी-काकवी) बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

काही सरकारी अन काही खाजगी बॅन्कांकडे तीस लाख रुपयाच्या प्रकल्पाला ६० लाख रुपयाचे तारण देऊनही कर्ज मिळेना! सॅटरडे क्लब ह्या मराठी व्यावसायीकांच्या संघटनेलाही साकडे घातले...पण हाती आले शुन्य! शेती अन पुरक उदयोगांची हीच खरी अडचण आहे....इथुन परतल्यावर पुन्हा प्रयत्न करेलच! Happy

यासंदर्भात सध्या काही गोष्टी करतो आहे-
१) गुळ बनवण्याच्या आधुनिक प्रक्रियेबद्दल माहीती मिळवणे.
२) ज्य लोकांची गुर्‍हाळे सध्या सुरु आहेत त्यांचेशी कायम संपर्कात राहणे.
३) कोल्हापुर/सातारा भागातील मित्रांकडुन याबद्दल अधिक माहिती मिळवणे.

....चंप्या गुळवाला!:)

प्रकार: 

चंपकराव,

आपण धडाडीने सुरू केलेला व अनेक अडचणींवर मात करून चालवलेला हा प्रकल्प यशवीरीत्या चालतोय, हे वाचून आनंद झाला.

एक शंका आहे. आपण लिहीता की सुरूवातीस शेतकर्‍यांनी अ‍ॅडव्हान्सची मागणी केली (ज्याची आपणास काहीच कल्पना नव्हती). ह्या अकल्पित समस्येवर तोड काढण्यासाठी आपण त्रिसूत्री धोरण अंगिकारलेत व त्याची चोख अंमलबजावणी आपण आतापर्यंत कसोशीने करीत आहात, ज्यायोगे शेतकर्‍यांचा विश्वास आपण संपादन केलेला आहात. ह्या त्रिसूत्रीतील एक आहे :''दर्जेदार दुधाला दर्जेदार भाव". आपल्या प्रकल्प वर्णनात आलेल्या दुधाचा दर्जा तपासायचा ह्याविषयी काहीही उल्लेख नाही, आणी हे बहुधा आपण लेखन-विस्तारभयास्तव केलेले असावे. तर प्रश्न हा की आपण आपल्या संकलन केंद्रात दुधाचा दर्जा कसा मापता? कृपया माझ्य्या विचारणेसंबंधी गैरसमज नसावा, पण ह्याच विषयावरून वरून चीनमधे गेल्या वर्षी जे भीषण भयनाट्य घडले त्याची आठवण झाली. तेव्हा ही शंका उपस्थित करीत आहे.

सेनापतींनी विचारलेली दोन प्रश्नः
०३. उत्पादकांना फॅटचा दर काय देता?
०४. एस एन एफ चा क्रायटेरीया काय आहे?
अन प्रदीप ह्यांनी विचारलेले:
संकलन केंद्रात दुधाचा दर्जा कसा मापता?

उत्तरः शेतकर्‍यांना साधारण ११ ते १५ रुपये प्रतिलिटर भाव दिला जातो. म्हशी च्या दुधाला २२ रुपयांपर्यंत भाव मिळतो. तीन फॅट च्या खालचे दुध घेतले जात नाही.
दर्जा तपासणीसाठी (फॅट, एस एन एफ अन डिग्री ) कंपनीने दिलेले डिजीटल यंत्र वापरले हाते. त्याचबरोबर भेसळ ओळखण्यासाठी (मीठ, साखर, सोडा, युरिया ई सामान्य भेसळी बरोबरच काही केमिकल वापरली जातात) सह्याद्री ने दिलेले अ‍ॅन्टी अडल्टरेशन किट द्वारा तपासण्या केल्या जातात. दुध घेते वेळी, दुध थंड केल्यावर अन दुध टॅन्कर मध्ये भरते वेळी अश्या तीनदा ह्या तपासण्या होतात. पुन्हा, कंपनीमध्यी टॅन्कर खाली करतेवेळी एकदा तपासणी केली जाते.
-- सुदैवाने आजवर एकाही शेतकर्‍याने भेसळ असलेले दुध जमा केले नाही. माझ्या भावाला दहा वर्षाचा अनुभव असल्याने दोन मिली दुध जिभेवर घेतले कि तो दुधातील भेसळ ओळखु शकतो, त्यामुळे त्याला फसवण्याचा प्रयत्न कुणी करीत नाही...
एफ डी ए (अन्न व ऑषध प्रशासन) चे नियम या बाबतीत खुप कडक आहेत, अन ते तंतोतंत पाळले जातील, अशी सुचना सर्वांना दिलेली आहे. (अन्न भेसळ हा अजामिनपात्र गुन्हा आहे. सहा ते बारा महिने कैद अन दंड अशी शिक्षा आहे. अर्थात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने सहकारी अन सरकारी डेअरी दुधाच्या नावाखाली पांढर्‍या रंगाचा द्रव जमा करुन शहरी लोकांना पाजतात. ज्यांना हे माहिती आहे, ते शहरी लोक खात्रीचे दुध असल्याखेरीज चहा पीत नाहीत, अन अनेक जण बिन दुधाचा चहा पितात. दुधातील भेसळ हा खुप मोठा विषय आहे, त्यावर नंतर कधी वेळ मिळाल्यास लिहिल....)

--दुध साठवणुकीसाठी दुधाच्या टाक्या बेज्गियन बनावटीच्या (पाको कंपनीच्या) आहेत. त्याच्या मेंन्टेनंस व साफ सफाईच्या एस ओ पी आहेत. त्याबरहुकुम वागल्याने आजवर कधीही दुध नासले नाही. (दुधाच्या गुणवत्तेत आमची डेअरी जिल्ह्यात पहिली आहे अन महाराष्ट्रात तिसरी आहे! )

०२. ४ डीग्री तापमान येण्यासाठी BMC किती वेळ चालावावा लागतो. ?
--किर्लोस्कर चा जनरेटर आहे. चार हजार लिटर दुध ३ डिग्री ला आणण्यासाठी साधारण पाच ते सहा तास लागतात (२० लिटर डिजल प्रतिदिन) (हिवाळ्यात अन उन्हाळ्यात थोडे कमी जास्त). आता गेल्या जुलै पासुन वीज उपलध झाल्याने दोन ते तीन तास (भारनियमन वेळ असल्यास) पुरेसे होतात.

सेनापतींच्या या प्रश्नांचे उत्तर नंतर लिहितो...(या बाबीवर माझी माहिती कमी असल्याने)
०१.साधारणपणे तुम्हाला प्रतिलिटर युनिट किती येतात? इबी &डीजी.?

सविस्तर उत्तराबद्दल धन्यवाद.

अर्थात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने सहकारी अन सरकारी डेअरी दुधाच्या नावाखाली पांढर्‍या रंगाचा द्रव जमा करुन शहरी लोकांना पाजतात.

माझ्या आठवणीप्रमाणे चीनमधे शेतकरी दुधात मेलॅमाईन घालत होते. आपल्या येथेही असेच चालत असेल, तर कठीण आहे, कारण त्याचे दुष्परिणाम वाईट असतात. सह्याद्रीच्या अँटी-अ‍ॅडल्टरेशन किटने ही भेसळ शोधता येते का?

दुधाच्या भेसळीबद्दल लेख जरूर लिहावा.

पुढील प्रकल्पांसाठी तुम्हाला शुभेच्छा.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5438720.cms

अन्नधान्यात तसेच सार्वजनिक आरोग्यास धोका पोहोचेल, अशी भेसळ करणाऱ्यांना यापुढे जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात येईल, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. सध्या भेसळ करणाऱ्यांना अवघा सहा महिन्यांचा कारावास आणि एक हजार रुपयांचा दंड अशी अत्यंत कमी शिक्षेची तरतूद आहे.

चंपक, कालच तुझ्या साहेबांनी अजुन ५० लाख टन दुध उत्पादनाची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. मनावर घे. [कधीतरीच बिचारे आपल्या खात्याशी संबंधीत बोलले आहेत Happy ]

चंपक, अद्भूत कर्तबगारीखातर हार्दिक अभिनंदन!

भविष्यातही आपल्या सर्वच प्रकल्पांना दैदिप्यमान यश मिळो हीच सदिच्छा!

आरती, दुध उत्पादन कमी व्हायला वेळ लागत नाही. पण वाढ व्हायला खुप वेळ लागतो. यंदाच्या लहरी पावसाळ्याने दुध उत्पादन कमी झाले आहे. हंगामात माझ्या डेअरीवर प्रतीदिन साडेचार हजार लिटर हुन अडीच हजार लिटर इतके कमी झाले होते. तीन चार महिन्याने आतशा कुठे तीन हजार पर्यंत वाढ झाली आहे.

दूधातील भेसळ या विषयावर चर्चा व्हावी म्हणून सर्च दिला असता हा धागा समोर आला. शेतीचे अनुभव वाचून सुखद धक्का बसला. नोकरीचा विचार सोडून दाखवलेल्या या धाडसाला सलाम.

सब फार्मर्स अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी लि. नेवासा तर्फे पुणे येथे ससानेनगर ला २५ डिसेंबर पासुन सुरुवात झाली आहे. स्टेट बॅन्क ऑफ इंडिया, ससाने नगर शाखेसमोर दुध विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे.

शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री सेवा उपलब्ध असल्याने निर्भेळ, शुद्ध दुध उपलब्ध आहे. ५०० मिली पाऊच रु. २०/-

champy_doodhwala.jpg

छान चम्पक... पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा...

भेसळयुक्त हा शब्द खुप वेळा वाचलेला होता. औषधात भेसळ, खव्यात भेसळ, डाळीमधे भेसळ, रॉकेल, खायचे तेल.... भेसळमुक्त वाचल्यावर थोडे फसल्यासारखे झाले. १०० % शुद्ध किव्वा अजुन दुसरा समान अर्थाचा शब्दप्रयोग जास्त परिणाम साधेल असे वाटते.

चंपक, अभिनंदन आणि शुभेच्छा!

हे दूध वितरण कोणकोणत्या भागात होते? मुंबईत / नवी मुंबईत होते का?

मध्यंतरी Type A (घातक) / Type B (पोषक) अर्थात अनुक्रमे जर्सी गायी आणि देशी गायींच्या दुधाविषयी एक पोस्ट व्हॉट्सॅपवरून फिरत होती. त्याबद्दल खात्रीशीर अधीक माहिती तुझ्याशिवाय कोण सांगू शकेल?

वर्षाअखेरीस असं काहीतरी प्रेरणादायी, सकारात्मक वाचलं की मस्त वाटतं Happy
हार्दिक अभिनंदन. अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो अशी सदिच्छा !

वर्षाअखेरीस असं काहीतरी प्रेरणादायी, सकारात्मक वाचलं की मस्त वाटतं Happy
हार्दिक अभिनंदन. अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो अशी सदिच्छा ! >>> +१

हा लेख आजच वाचला! तुम्ही गुळाच्या व्यवसायाचा अजूनही गांभीर्याने विचार करत आहात का?

शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री सेवा उपलब्ध असल्याने निर्भेळ, शुद्ध दुध उपलब्ध आहे. ५०० मिली पाऊच रु. २०/->>

सध्या नवी मुंबईत वारणा गाईचे दूध ५०० मिली १७रु आणि अमूल गाईचे दूध ५०० मिली २० रु आहे.
थेट सेवेचा ग्राहकांना किंमतीत काही फायदा होणार का?

अभिनंदन.
आज परत एकदा लेख वाचला. पुण्यातल्या ओळखीच्या लोकांना सांगतो.
तुम्हाला शुभेच्छा.

Pages