बापू झाडा वर कसा गेला?

Submitted by सखा on 19 December, 2015 - 00:18

म्हणतात ना कधी कधी कलाकारापेक्षा देखील त्याची कलाकृती सुप्रसिध्ध असते. माझ्या "बापू झाडा वर गेलाच कसा?" या कवीते बद्दल असे नक्की म्हणता येईल.
मला अगदी ठार वेड्या पासून ते अती शहाण्या पर्यंत सर्वांनी अगदी आवर्जून कविता आवडल्याचे कळवले आहे.
खरं म्हणजे आज इथे या कवितेचा उल्लेख या साठी महत्वाचा आहे कि मी जे काही रामायण तुम्हाला सांगणार आहे ते सारं या कवितेमुळेच घडलं आहे.
मागच्याच महिन्यात मला माझी ही कविता बीए मराठीच्या अभ्यासक्रमात सामील करण्यात येत असल्याचे पाठ्यपुस्तक अभ्यासक्रम मंडळाचे पत्र आले आणि त्या बद्दल आमच्या महाविद्यालयाने माझा जाहीर सत्कार देखील केला. केव्हढा हा सन्मान!
आता पुढे जाण्यापूर्वी थोडासा इतिहास माझ्या बद्दल अतिशयोक्ती टाळून विनम्रपणे सांगणे जरुरी आहे. मी राज जानेमन असं फिल्मी नाव असलेला "बंडूमार झंडूमार बारकुले" महाविद्यालयातील मराठीचा अत्यंत पॉपुलर प्राध्यापक आहे. अगदी स्टार वगैरे आणि मी राहतो ही तसाच उत्तम कपडे, हिरोगिरीचा शौक,कविता लिहिणे, गिटार वाजवणे आणि तुफान व्यायाम ह्या माझ्या आवडत्या गोष्टी. मी सहा फूट उंच आणि तब्येतीने चांगलाच फिट आहे. आम्ही घरचे गडगंज त्या मुळे ती पण चिंता नाही. साधारणपणे पुण्याच्या लग्नाळू मुली बाळी मध्ये ते कसले हॅण्डसम 'सर' आहेत ना अशी चर्चा होते ना तसे सर म्हणजे मी. माफ करा यात काही आत्मप्रौढी होत असेल तर आपण आमच्या कॉलेजात चौकशी करू शकता. त्यातच अजून प्रसिद्धीचे कारण म्हणजे आमच्याच कॉलेज मधील मराठीच्या जुनिअर तरुण प्राध्यापिका मिस डॉली फुफाटे हिच्याशी माझे असलेले आणि नुकतेच संपुष्टात आलेले प्रेमप्रकरण. एखाद्या मॉडेल सारखी टकाटक दिसणारी डॉली माझी एके काळची विद्यार्थिनीच. फार लाडकी विद्यार्थिनी. स्पेशल शिकवणीला यायची माझ्याकडे. फार बहारीचे दिवस होते. मराठीला चांगले दिवस आलेले म्हणतात ना ते हेच. पुढे अर्थातच माझ्याच वशिल्याने झंडूमार मध्ये तिला नौकरी मिळाली. असो सुज्ञास अधिक सांगणे नलगे.
मात्र जेव्हा पासून आमचा ब्रेकअप झाला आहे (ते कारण पुढे कळेलच ) तेव्हा पासून डॉली फुफाटेने माझ्या जीव की प्राण असलेल्या या कवितेचा अभ्यासक्रमातून सामील होण्या आधीच उठ्या करण्याचा चंगच बांधला आहे. सह्यांची मोहीम काय, शिक्षणमंत्र्यांना पत्र काय वाट्टेल ते आता तर परिस्थिती अशी आहे की ज्यू. प्रा. डॉली फुफाटे यांनी माझ्या विरुध्ध उघड उघडच युद्धच पुकारले आहे. त्यांचे म्हणणे आहे कि माझी कविता अश्लील असून मला कॉलेजातून आणि कवितेला अभ्यासक्रमातून काढून टाकावे अर्थातच माझा त्याला विरोध आहे.
तिच्या माझ्या विरुद्धच्या कारवायात तिला मना पासून साथ देतात ते भौतिकशास्त्राचे वायफळ प्राध्यापक वाय. झेड. सुब्रमण्यम. आमच्या ब्रेकअप नंतर वाय झेड चे आणि डॉली चे बरेच गुन्तपांगलू सुरु आहे हे मला माझ्या सुत्रा कडून कळत होतेच असो मी पण काही लेचापेचा नाहीये चांगला शेरास सवा शेर आहे.
तर मित्रहो आता तुम्हाला सगळा इतिहास कळला आहे तेव्हा मला वाटते तुम्हाला कविता सांगायला आता हरकत नाही. या रोमान्टीक कवितेची सिचुएशन थोडक्यात अशी:
बापू नामक हाडकुळा आणि रिकामटेकडा परंतु पावसाळ्यात प्रेमात पडलेल्या कुत्र्या सारखा हळवा इसम आपल्या भक्कम आकाराच्या रागीट पत्नी सोबत एका नारळी पौर्णिमेला जब्राट फुगडी घालतो आणि मग पुढे त्याचा काय शेवट होतो? हेच मी या कवितेत दाखवले आहे तर मित्र आणि मैत्रिणिनो एक मस्त बाबा रामदेव छाप दीर्घ श्वास घ्या आणि वाचा:

बापू झाडा वर कसा गेला?
==================
(स्थळ काळ: नारळाचे बन आणि नारळी पौर्णिमेची रात्र)
बापू:
चल फुगडी घालू ना गडे
गोल जरा ये फिरु ना गडे

ये सोबत फुगडी घालू राणी
गोजम गिरक्या गाऊ गाणी

कोरस:
गिर गिर गिर फुलटू फुगडी
बाप्या बोंबिल बायकू तगडी

बापूला बुंगाट झान फिरीवला
झाडावरी टना टन बसिवला

बापू म्हणे:
भो ह्योच दिस मले पाहाचा असे
फांदीस लंगोट लटकला दिसे
नुस्त दातं काढू नका बोंग्याहो
शेंड्याहून खाली उतरावे कसे ?
===================

हसल्या बद्दल धन्यवाद. आपले हसणे हेच माझे समाधान. झाड फांदी कंदील लंगोट आणि फायनली बोंग्या कसा धिनचाक माहोल केला आहे कि नाही? थॅंक्स बरका. या अशाच माझ्या वृत्ती मुळे मी का पॉपुलर आहे तुम्हाला ध्यानात आले असेलच. असो.
अर्थातच सगळेच काही तुमच्या सारखे रसिक नसतात. ही माझी कविता आणि तिचा उदो उदो अर्थातच माझी एक्स डॉली फुफाटे आणि तिचा पिद्दु वाय झेड सारख्या जळकुकड्या व्यक्तींना अजिबात नाही आवडत हे दुर्दैवी सत्य. काही लोकांना अमृतही विष वाटते यात दोष कुणाचा? चालायचेच.
आमच्यातील वाद विकोपाला गेल्याने आणि कॉलेज मध्ये दोन गट निर्माण झाल्याने कॉलेजचे वातावरण खूपच गढूळ झाले. मी किवा डॉली कॉलेज सोडून जातोय की काय अशी भीती वाटून आमच्या कॉलेजच्या संस्थापकांनी आमच्याशी वेगवेगळ्या पण सविस्तर चर्चा करून हा तिढा अगदी वेगळ्या मार्गाने सोडवायचे ठरवले. मला पण त्यांची आयडिया आवडली. त्यांनी काय केले कि आमची दोघांचीही कॉलेज मधील स्टार पॉवर लक्षात घेवून आम्हाला दोघांना जाहीर चर्चेला बोलावले. "झंडूमार बंडूमार बारकुले कॉलेजकी आपकी अदालत मध्ये " मी मोठ्या आनंदात होकार दिला.
कार्यक्रमाच्या दिवशी बंडूमार झंडूमार बारकुले कॉलेजच्या स्टेट ऑफ द आर्ट भव्य ऑडीटोरीअम मध्ये सनई चौघड्यांचे सूर निनादत होते. दर्शनी भागात सुरेख रांगोळी काढण्यात आली होती. VIP आणि पत्रकार यांच्या साठी बसण्याची खास वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. प्रशस्त स्टेजवर एक अतिशय भव्य असा आपकी अदालत स्टाइल सेट उभारण्यात आला होता. एका बाजूला मोठ्ठी क्लीप्स दाखवण्या साठी सिनेमा स्क्रीन लावण्यात आली होती. त्या वर माझे आणि डॉलीचे काही पिकनिकचे, बक्षिसे घेतानाचे वगैरे चे फोटो रोल होत होते. स्टेज वर मधोमध आमच्या दोघांची नावे पाट्यावर मोठ्या अक्षरात लिहिली होती. प्रथम वर्षाच्या मुली साड्या घालून येणाऱ्या पाहुण्यांच्या हातात गुलाब पुष्प देत होत्या आणि काही लबाड पोट्टे फिरून फिरून आपल्या आवडीच्या विशिष्ट साडीच्या रांगेत येत होती. स्टेज वर जज ला बसायला एक उंच टेबल खुर्ची टाकले होते आणि आम्हाला उकडू नये म्हणून एक जुना पुराणा आठ फुटी सिलिंग फॅन डोक्यावर करकरत होता. काही म्हणा बंडूमार झंडूमार बारकुले जे काही करतात ते स्टाइल मध्ये आणि का नाही आम्ही दोघेही मराठी चे स्टार प्रोफेसर होतो ना! दोघांच्याही वर्गाना विद्यार्थ्यांची ही गर्दी होत असे माझ्या लेक्चर्स आणि तिच्या सौंदर्या साठी अर्थात.

टाळ्यांच्या कडकडात माझे नाव पुकारले गेले तेव्हा मी माझ्या महागड्या शेरवानी वरील गुलाब किंचित नीट करीत स्टेज वर गेलो. मुलींचे चित्कार काही थांबेचनात तेव्हा मी हात जोडून नमस्कार केला. मग डॉली चे नाव पुकारले गेले पुन्हा तोच माहोल या वेळी मुले थांबेनात. त्या टाळ्याच्या गजरात पिवळ्या धमक उंची साडीतील टंच उंच डॉलीला जणू काही फिल्म फेअर अवार्ड असल्या सारखे मीच हात धरून स्टेज वर आणले. आम्ही दोघानी एकत्र आमच्या ऑडीयंसला नमस्कार केला. पुन्हा टाळ्याचा कडकडात झाला तेव्हा काही पत्रकार मित्रांनी आपले भावाश्रू हलकेच पुसल्याचे माझ्या नजरेतून सुटले नाही. एखाद्या फिल्म कपल ला मिळावे असे प्रेम आपल्याला का मिळते हा आम्हाला दोघांना पडलेला प्रश्न. काय बर याचे उत्तर? टाळ्या संपताना मी डॉलीला हग केले आणि सवयीने कुजबुजलो
"वॉव डॉली यू लुक रिअली क्युट एकदम चिकणी चमेली"
"जानेमन तू पण चिकणा दिसतो आहेस" रसिकांनी जानेमन माझे आडनाव आहे हे विसरू नये.
"जिंदगी हमे कीस मोड ले आयी डॉली?" मी सेंटी झालो की हिदीत डायलॉग फेकतो.
"जानेमन 'कीस' मराठी हिंदी या इंग्रजी" इति डॉली
"आपला ब्रेकअप आणि आपण सार्वजनिक ठिकाणी असल्याने सध्या हिंदीतच" मी डोळे मिचकावीत म्हणालो.
अचानकच खूपच जोरात प्रेक्षकांच्या हसण्याचा आणि टाळ्याचा आवाज आल्याने आम्ही दोघेही दचकलो, ओह नो! बॉडी माईक लावल्याचे दोघेही पार विसरूनच गेलो.
प्रसंगावधान राखून मी म्हणालो "तर विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो हे होते आमच्या आगामी चित्रपटातील डायलॉग". आमचा एक शिकागोचा मराठी सिनेदिग्दर्शक मित्र आमच्या जीवनावर इंग्रजीत त्याचा दुसरा सिनेमा बनवतोय. आमचा लव्ह सीन मोठ्या स्क्रीनवर दिसल्याने बहुतेक लोकांना माझी थाप खरीच वाटली. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला.
सुंदर निवेदिकेनी आमच्या क्लिप्स आणि आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनातून दोघांचा थोडक्यात परिचय करून दिला. मी कॉलेज मध्ये असताना कसा बंड आणि पैलवान होतो, डॉली कशी अभ्यासू आणि धावपटू होती, आम्हाला मिळालेल्या अनेक ढाली आणि पदकं नंतर मग गुरु शिष्य ते कॉलेज चे लैला मजनू आणि आम्ही म्हणजे झंडूमारची अजरामर प्रेम कहाणी आदी उल्लेख झाल्यावर निवेदिका म्हणाली की "सध्या सर आणि मॅडम यांची तात्त्विक भांडणे झालेली आहेत हे सर्वाना माहिती आहेच आणि ती पण एका कवितेवरून असं आम्हाला ऐकून माहितीये आणि आजच्या या मुकाद्म्यात आपण या दुराव्याची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजचे आपले जज आहेत वाय. झेड. सुब्रमण्यम. अदालत मे अपनी पैरवी ये कपल खुद करेगा!"
दोन चार टाळ्या पडून डुलत डुलत स्टेजवर आलेला लठ्ठ्या वाय झेड डॉलीला अमळ जरा जास्तच वेळ हग करून नंतर तिच्या गालाचे दोन चार वेस्टर्न मटा मटा मुके घेवून आपल्या जागी जावून मजेत मिटक्या मारीत बसला. साला भारतीय संस्कृती काही आहे की नाही. कुठल्या हरामखोराने जज म्हणून या मुकेखोराला आणले? आणी डॉली सुध्धा निर्लज्जच मस्त पैकी ओले गालपुसून टामटूम बसली. माझ्या सुत्रा कडून याला लावतोच दट्ट्या असा मी माझेच ओठ चावत विचार करीत असतानाच निवेदिकेचा आवाज घुमला.
"क्या आप मे से कोई जनता को बता सकता है की आपका झगडा क्यो हुवा"
मी डॉली कडे पहिले तशी ती आपल्या लताजी चे नकलाकार काढतात तसल्या मंजुळ आवाजात म्हणाली. "सच कहु तो इस कविता का जन्म हुवा तब मै इनके साथ थी (टाळ्या) और जब पहली बार बापू को सुना तो मेरी भी हस हस के पुरे वाट हो गयी थी. इनका वात्रट पणा मुझे आजभी बहोतही भाता है" मला अस वाटत होतं की हिने असेच मंजुळ बोलत राहावे आणि मी ऐकत राहावे पण "मराठी… मराठी मे बोलो" असे जमेल तेव्हा आणि तेव्हढेच ओरडणारी लोके ओरडली तेव्हा डॉली मराठीत बोलू लागली.
"पण मग मी त्यांना जेव्हा विचारले कि जानेमन व्हाट इज "बोन्ग्या"? त्यांनी मला काहीच उत्तर दिले नाही. त्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या ममी ला ही कविता ऐकवली तेव्हा हसून वेडी झाली पण तिने पण मला तोच प्रश्न विचारला व्हाट इज "बोन्ग्या"?
मी म्हणाले मला माहित नाही. मग माझ्या ममी ने मला सांगितले कि माझ्या आजोबांचे नाव बोंगेश्वर होते. मी म्हणाले हाऊ स्वीट? आणि तेच राजच्या कवितेतून प्रकटले असावेत कारण आमच लग्न होणार होते ना. माझ्या ममीच्या मते आजोबांचा कौलच होता तो. मी खूपच एक्साइट झाले आणि मी राज ना ते लगेच सांगितले तर हे म्हणाले माझ्या कवितेतील बोन्ग्या आणि तुझे आजोबा यांचा काहीही संबंध नाहीये"
इथे डॉलीला तीव्र दुख्खाने हुंदका आवरेना तरी ती कशीबशी पुढे म्हणाली "काय झाले असते ते हो म्हणाले असते तर? माझ्या मम्मीला किती छान वाटले असते? पण नाही, या वर जानेमन पुढे रागात म्हणाले की याचाच अर्थ असा आहे की मला कविता अजिबात कळत नाही म्हणजे पर्यायाने माझ्या मम्मीला पण (जोरात हुंदका) माय ममा माझ्या लग्ना नंतर शी विल बी लोनली. (दोन हुंदके) किती हा पुरुषी इगो. मग मी ठरवले की ठीक आहे जो पर्यंत जीवात जीव आहे तो पर्यंत यांच्या कवितेचे खरे अर्थ काढूनच राहीन नाहीतर बोन्गेश्वरांची नात नाही मी" असं म्हणून डॉलीने दोन तीन अजून सुबक हुंदके दिले. तिला रडताना बघून वाय झेड ने लगेच रुमाल आणून दिला. लोकांनी टाळ्या वाजवल्या. मी कोण टाळ्या वाजवतेय त्यांना नीट बघून घेतले.
मग परत आवाज आला.
"आप पर दुसरा आरोप है की आपकी कविता "बापू झाडा वर गेला कसा अश्लीलता की चरम सीमा है"
आता मात्र मी रागात म्हटले "माफ करा हे मात्र मला अजिबात मान्य नाहीये सांगा एक तरी अश्लील वाक्य किवा शब्द असेल तर"
"मी सांगते" असं म्हणत डॉली पुढ म्हणाली "याची दोन उदाहरणे देते आता या गाण्याची सुरवात बघा
'चल फुगडी घालू ना गडे'
'गोल जरा ये फिरु ना गडे'
"आता यात काय अश्लील आहे डॉली?" मी आश्चर्याने ओरडून विचारले.
"आता ह्याच ओळी मी माननीय जज साहेब यांना त्यांच्या मुखकमलानी उधृत करावी अशी विनंती करते" डॉली शांतपणे म्हणाले.
मुखकमल!!! या वाय झेड च थोबाड मुखकमल? हाय रे बेवफा डॉली हेच का ट्रेनीग मी तुला दिले? आता मागे वळून पाहता मला वाटते ही माझ्या विरोधकांची विचारपूर्वक गेम असावी.
मित्रहो श्रीयुत वाय झेड यांनी साउथ अक्सेन्ट मध्ये माझ्याच ओळी अशा दिव्य वाचल्या:
"ते बापू म्हणते
'चल्ल फुग्गडी घाल्लू नागडे'
'गोल्ल जरा येक्कि फिरु नागडे'
मी जोरात ओरडलो "काय?? अरे नीट म्हण की चल्ल गोल्ल काय आहे?"
त्या वर तो गाढव पुन्हा म्हणतो
'चल्ल फुग्गडी घाल्लू नागडे'
'गोल्ल जरा येक्कि फिरु नागडे'
आय्यो रामा गोविंदा चावट किरे "नागडे" इज बॅड वर्डजी आय्यो यल्लप्पा माssssफी मागतो रे "
आता मात्र लोकांनी तुफान करमणूक झाल्याने डॉली आणि वाय झेडच्या बाजूने टाळ्या वाजवल्या. मी डोक्याला हात लावला. ती वाचणाऱ्याची चूक आहे वगैरे बोलण्याच्या भानगडीतही मी अजिबात पडलो नाही. डॉली इतकी चीप खेळेल असं वाटलं नव्हतं.
आता दुसरे उदाहरण डॉली म्हणाली "आता ह्या शेवटच्या चार ओळी पहा:
बापू म्हणे:
भो ह्योच दिस मले पाहाचा असे
फांदीस लंगोट लटकला दिसे
नुस्त दातं काढू नका बोंग्याहो
शेंड्याहून खाली उतरावे कसे ?"

आता ही बाई याचा काय अनर्थ लावते याचेच मला कुतूहल वाटू लागले परंतु डॉली वाय झेडलाच परत म्हणाली
"जज साहेब तुम्हीच माझ्या या फाजील दोस्ताला आपल्या मुखकमलाने समजावून सांगा कारण आपणच मला तो अर्थ आपल्या कुशाग्र बुद्धीने लक्षात आणून दिला आहे"
पुन्हा मुखकमल वारे डॉली आणि याची ती कुशाग्र बुद्धी हा काय स्वताला न्यूटन समजतो की काय?
इकडे डॉलीचे वाक्य ऐकायचा अवकाश की वाय झेड एखाद्या नामी वैज्ञानिका सारखा समजावणीच्या सुरात म्हणाला
"नो प्राब्लेम डीअर, मी तर सांगतो की हे तर फारच चावट गाणे. आता असे बघा. माणूस नेहमी वस्त्र काय घालतो? पॅंट घालतो, लुंगी घालतो झालच तर पायजमा घालतो बराबर आणि आत मधी काय घालते? अंडर पॅंट बराबर? लेट्स नॉट गो इन स्पेसिफिक्स पण नाडी वाली चट्टापट्टा, बॉक्सर etc राईट? कधी मधी रेअरली लंगोटी घालतो.
कलर कुठला का असेना पण यू सी देअर इज नथिंग बीयोंड लंगोटी इट इज फायनल डेस्टीनेशन."
फायनल डेस्टीनेशन?? अरे माझी कविता काय, हा बोलतोय काय? मला तर काहीच कळेना. मग जस्टीस वाय झेड पुढे म्हणाले.
"आता दुसरं म्हणजे अस पहा फुगडी इज व्हेरी राउंड राउंड गेम. गरा गरा गरा गरा फिरल्याने दोन्ही लोकात पुष्कळ सेंट्रीफुगल फोर्स निर्माण होते. भौतिकशास्त्र काय सांगते? बापू उडाला अन डायरेक्ट झाडा वरी गेला! इट इज नथिंग बट सॉलिड सेंट्रीफुगल फोर्स. विचार करा ओन्ली लंगोटी घालून राउंड राउंड फिरत फुगडी खेळणाऱ्या माणसाला जर समजा आपलीच वन अँड ओन्ली लंगोटी समोरच्या फांदीवर वाळत घातल्या सारखी दिसू लागल्यास काय म्हणणार?"
काय म्हणणार डोंबल? साला हा वय झेड म्हणावा तेव्हढा मूर्ख नाहीये काही तरी फंडे सांगून चांगलाच गंडवतोय जनतेला. मग पुढे म्हणतो कसा
"याला सायण्टीफिक explanation इज लंगोट क्लॉथ अँड ह्युमन बॉडी इन टोटल सेपरेशन. म्हणजे लंगोटी आन माणसाची बॉडी यांचा डायव्होर्स. प्रतीकात्मक भाषेत 'गेला माधव कुणी कड़े?' याचाच अर्थ जानेमनस कविता ह्याज न्यूडीटी. सो युअर ऑनर यांची कविता अतिशय अश्लील आहे अँड मस्ट बी बॅनड" एव्हढे बोलून वाय झेड आपली केस रेस्ट करून टाळ्यांच्या प्रचंड कडकडात खाली बसले. बोंबला काय पण तारे तोडले वाय झेड ने. स्वता:लाच युअर ऑनर म्हणतो का काय हा गंजोट स्वामी. आता डॉलीने माझ्याकडे हळूच रमी चा डाव जिंकल्या सारखे मिटीमिटी डोळे करून आनंदाने पहिले. प्रेक्षकात बसलेली बोन्गेश्वरांची कन्या म्हणजे तिची ममी अतिशय निर्विकार बसली होती. खुनशी स्त्रियाचे ते लक्षणच. कधी नव्हेतो मिळालेल्या टाळ्यांच्या कडकडाटाने वाय झेडला तर नोबेल पारितोषिक मिळाल्या सारखा उन्माद झालेला स्पष्ट दिसत होता. वन अँड ओन्ली लंगोटी कायरे चोरा. हे साले जिंकल्यातच जमा होते.
"जानेमनजी आपको कुछ कहना है?" - घोषणा झाली आणि मी भानावर आलो आणि मग शांतपणे उभा राहिलो. हरलेल्या पण शूर योध्या सारखे माझ्या चेहऱ्यावर तेव्हा भाव तेवत होते असे काही प्रेक्षक आज ही म्हणतात. एक दीर्घ पॉज घेऊन मी शांत आणि गंभीर आवाजात वेळो वेळी कंप, कधी रडवेलेपण, भावनांना चोम्बाळनारे प्रश्न आणि आवाजात कसलेल्या नटा किवा नेत्या प्रमाणे योग्य चढ उतार करीत संसदेत काही चतुर नेते करतात अगदी तसे खालील भाव पुर्ण भाषण केले.
"आदरणीय आणि विद्वान वाय झेड जज साहेब (विद्वान म्हटल्यावर जज साहेब दचकले) , हजारो नट्यांचे सौंदर्य आणि मेरी क्युरी प्रमाणे असामान्य बुद्धिमत्ता जिच्या मेंदू मध्ये एकवटली आहे अशा वन अँड ओन्ली वन डॉलीजी फुफाटेजी (दोनदा जी लावल्यावर फुफाटे खचाक दचकली), प्रेक्षकात उपस्थित कै. बोंगेश्वरांच्या आदरणीय पुत्रीजी (ममीजी दचकल्या), उपस्थित सन्माननिय झंडूमारचा प्राध्यापकगण (ते पण दचकले सन्माननीय?? ) आणि माझ्या अत्यंत लाडक्या पत्रकार बंधू भगिनीनो आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणिनो (उस्फुर्त टाळ्यांचा कडकडाट).
मित्रहो मी माझ्या वरील सारे आरोप ऐकले आणि मला वाटले अरे खरेच की हे जे काही बोलतात ते अगदी खरे आहे. फाडून टाकायला हवी ती कविता कारण ती अश्लील आहे, वाईट आहे, बंडल आहे. एक क्षण होता जेव्हा माझा पण मोठ मोठ्या वैज्ञानिक शब्दांनी ब्रेन वॉश झाला मला देखील वाटले कि बरोबर आहे कशाला हवी आहे अभ्यासक्रमात अशी नीच कविता? यांनी काही समाजाचे कल्याण होणार आहे का? काही संदेश आहे का या कवितेत? ही कविता काही भाष्य करते आहे का? काय आहे असं या कवितेत की तिला एव्हढ महत्व मिळावं? काय आहे काय सांगेल का कुणी?" असं मी जोरात ओरडून विचारताच सगळेच नजरा चोरून खाली पाहू लागले वर्गात देखील मला असाच अनुभव येतो काहीही प्रश्न विचारा बहुतेक सारे खाली मुंडी घालून बसतात. इथे मी हीच ट्रिक वापरली.
"मित्रहो मी लंगोटीवाला गरीब माणूस यांच्या एव्हढे मला ज्ञान नाही पण मला एव्हढे कळते की मित्रहो कविताही अंतरप्रवाही असते एखाद्या म्हणी प्रमाणे तीच शरीर वेगळं असलं तरी आत्मा वेगळच बोलत असतो. उदा. नाकाने कांदे सोलू नकोस असं आपण जेव्हा एखाद्याला म्हणतो तेव्हा त्यातील गर्भित अर्थ वेगळा असतो.
मित्रहो या लक्षात घ्या कवितेतील लंगोटी घालणारा बापू दुसरा तिसरा कुणी नसून तुम्ही आम्ही म्हणजे सामान्य जनता आहोत"
माझ्या या विधाना नंतर सिनेमात कोर्ट सीन मध्ये आरोपी पलटल्यावर होते तशी एकच खळबळ माजली एव्हडी की वाय झेड ला ऑर्डर ऑर्डर असं मोठ्याने ओरडावे लागले.
"मग बापूची ती खतरनाक बायको कोण? असा तुम्हाला भक्कम प्रश्न पडला असेल बरोबर? " एक क्षण थांबून मी पुढे म्हणालो " मित्रहो बापूची बायको म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून ती आहे प्रतीकात्मक महागाई. हो हो तीच जीवघेणी महागाई जिच्या बरोबर रोज फुगडी घालता घालता आपण सारेच दारिद्र्याच्या शेंड्यावर येवून बसलो आहोत. सांगा बरोबर आहे कि नाही?" इथे प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडात केला.
इथ मी संधी साधून मोठ्या नेत्यां प्रमाणे पुन्हा पुन्हा लोकांना तोच प्रश्न विचारून खुंटा बळकट करून घेण्याची ट्रिक वापरली.
"सांगा बरोबर आहे कि नाही?" - मी
"आहे" - श्रोते
"सांगा बरोबर आहे कि नाही?" - मी
"आहे" - श्रोते
"सांगा बरोबर आहे कि नाही?" - मी
"आहे" "आहे" "आहे" - श्रोते
(टाळ्यांचा कडकडात)
"मग मित्रहो आता तुम्ही विचाराल आपला नायक बापू म्हणजे प्रतीकात्मक जनता ज्याला प्रश्न विचारते की-
'नुस्त दातं काढू नका बोंग्याहो'
'शेंड्याहून खाली उतरावे कसे ?'
तो बोन्ग्या कोण?" पुन्हा काही विद्यार्थी पायाचे अंगठे पाहू लागले मग योग्य तेव्हढा पॉज घेवून मी म्हणालो "मित्रहो हे दात विचकून हसणारे बोंगे म्हणजे आपले लोकप्रतिनिधी ज्यांना आपण निवडून दिलंय. तेच तर मनात आणलं तर महागाई कमी करू शकतात बरोबर कि नाही?"
"सांगा बरोबर आहे कि नाही?"
"आहे" - श्रोते
"सांगा बरोबर आहे कि नाही?"
"आहे" - श्रोते
"सांगा बरोबर आहे कि नाही?"
"आहे" "आहे" "आहे" - श्रोते
"मग फाडून टाकू कविता?"
"नाही नाही नाही"
"अश्लील आहे कविता?"
"नाही नाही नाही"
डॉली आणि वाय झेड दोघेही पार काळे ठिक्कर पडलेले पाहून प्रेक्षकांच्या जय जय कारात मी शांतपणे म्हणालो
"आय रेस्ट माय केस युअर ऑनर".
जनतेनेच निकाल लावल्या मुळे वाय झेड आणि फुफाटी चरफडत पळून जाण्याची तयारी करू लागले.
इतक्यात आवाज आला "जानेमन जी आपका युवाओ के प्रती कुछ संदेश?"
मी मनात विचार केला आता हीच वेळ आहे मास्टर स्ट्रोक खेळण्याची आणि म्हणालो " मुझे देश के नौ जवानो को इतनाही कहना है की लंगोटी हम गरीबो का पोशाख है और जो उसकी मजाक उडायेगा उसे सबक सिखाना जनता का काम है"
मग काय विचारता महाराजा आमच्या कॉलेजच्या ढोल पथकातील दांडगी पोरं ज्यांचा सोबत मी ढोल वाजवायचो ते स्टेज वर कधी घुसले कधी त्यांनी वाय झेड ची हवेत उशी केली आणि कधी वाय झेड वरच्या पंख्याला लटकून बोंबलत गरगरू लागला हे कुणालाच कळलं नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users