देवा मला पास कर.. अरे मूर्खा अभ्यास कर!

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

'देवा मला पास कर.. अरे मूर्खा अभ्यास कर!'
असे वाक्य वहीवर लिहिले की परीक्षेत पेपर सोप्पा जातो, पेपराच्या प्रत्येक पानावर डोक्यावर लिहिले की चांगले मार्क मिळतात अशी एक युक्ती मला शाळेत सोडायलाआणायला येणार्‍या पुष्पाने जाताना सांगितली. माझे वय ७ आणि तिचे वय १५. तिने नववीत नापास झाल्यावर शाळा सोडली होती. एवढी पावरबाज युक्ती माहिती असून तू नापास कशी झालीस? हे विचारण्याइतकी अक्कल मला वय वर्ष सातमधे नव्हती. भारीच वाटली होती ती युक्ती.
मी लग्गेच अमलात आणले ते. सर्व वह्यांवर लिहिले. पेपरात प्रत्येक पानाच्या डोक्यावर लिहायचा विचार होता पण माझा लिखाणाचा वेग इतका सुपरफास्ट असायचा की बरेचदा पेपर लिहून पूर्ण व्हायचा नाही त्यात ही ब्याद कुठे लिहीत बसा. देव बघेल तेव्हा त्याला पहिले पान दिसेलच की. असा सोयीस्कर विचार करून मी हे वाक्य फक्त पहिल्या पानावरच लिहिले.

इयत्ता तिसरीत मला तसेही बरे मार्कच पडायचे, तेवढेच याही परिक्षेत पडले. वाक्य लिहिण्याचा स्पेशल असर काही दिसला नाही. मात्र पेपरात पहिल्या पानावर लिहिलेल्या वाक्यांबद्दल वर्गशिक्षिका बाईंकडून त्यांची आख्खं विश्व इकडचं तिकडे हलेल अश्या पावरची स्पेशल थोबाडित मात्र मिळाली.

तेव्हा शिक्षकांनी थोडेफार फटके हाणले तरी पालक आकांडतांडव करत नसत त्यामुळे घरी येऊन थोबाडितचे सांगितल्यावर 'तू काय केलं होतंस?' हाच प्रश्न पहिला. उत्तरादाखल भारी युक्ती आईला सांगण्यात आली.
आईने डोक्यावर हात मारला, स्वतःच्याच. लिहिलेल्या वाक्याचा अर्थ नीट स्पष्ट करून सांगण्यात आला. अभ्यासाशिवाय, स्वतःच्या प्रयत्नांशिवाय तरणोपाय नाही हे नीटच बसवले डोक्यात. परिक्षेला जाताना देवाला नमस्कार करणे हे फारतर केलेल्या अभ्यासाचा शांतपणे विचार करण्यापुरते उपयोगी पडते. हे पक्कं बसलं डोक्यात. आणि शिक्षणाच्या पुढच्या टप्प्यांमधे अजूनच खोल कोरलं गेलं.

कट टू पाचेक वर्षांपूर्वीची एक घटना.
"आपण या भागात शूट करण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला इथले सगळे रस्ते माहिती हवेत. आत्तापर्यंत आपण तीन चार वेळा इथून गेलोय. तेव्हाच तुम्हाला रस्ता लक्षात ठेवायचा सांगितलेले आहे. आता ड्रायव्हर वेगळा आहे. त्याला मुंढरपर्यंतचा रस्ता तुम्ही सांगायचा."
दिग्दर्शकाने त्याच्या तीनही एडीजना सांगितले. रत्नागिरी शहरातून राई-भातगाव पुलाच्या मार्गे आम्हाला मुंढर गावात पोचायचे होते. रत्नागिरीत कामे आटपता आटपता संध्याकाळचे साडेसात वाजून गेले होते. मला राई-भातगाव पुलापर्यंतचा रस्ता माहित नव्हता. पुढचा फारच ओळखीचा होता. शहरातून बाहेर पडतानाचा फाटा योग्य तो निवडला आणि मग निघालो. बराच वेळ जात राह्यलो तरी राई-भातगाव पूल येण्याचे चिन्ह दिसेना. डोंगरातला रस्ता, अंधाराची वेळ त्यामुळे रस्ता चुकलोय हे लक्षात यायला थोडा वेळच लागला. बर चुकलोय तर नक्की कुठे चुकलोय हे कळायला मार्ग नाही. आता काय करायचे?
एडी १ - अं अं अं
एडी २ - रस्ता चुकलो? रस्ता चुकलो? (खिशातून फोन काढून त्यात कुठल्या तरी गुरूच्या भजनाची ऑडिओ सुरू केली.)
एडी ३ - कुणाला तरी विचारायला पाहिजे.
ड्रायव्हर - आता कसा रस्ता कळणार? ( गाडीत वाजत असलेले किशोरकुमारचे गाणे बंद करून टाकले. खिशातून मोबाइल काढून कुठल्या तरी गुरूच्या फोटोचा वॉलपेपर बघून फोन डोक्याला लावणे सुरू)

दिग्दर्शक, मी आणि एडी ३ यांच्यात अजून थोडी वाक्यांची देवाणघेवाण होऊन आहे त्या रस्त्याने पुढे जाऊया. जे पहिलं गाव लागेल तिथे विचारूया. असे ठरले. गेलो.

वाटेत एक उजवे वळण आमचे सुटले होते त्यामुळे आम्ही पुळ्याच्या दिशेने निघालो होतो. पहिले जे गाव लागले तिथे हा उलगडा झाला. मग अजून चार पाच जणांना विचारल्यावर योग्य तो रस्ता कसा सापडेल तेही कळले. तसे गेलो. इप्सित स्थळी पोचलो. एक तासा दीडतासाचा उशीर झाला फारतर.

खाली उतरून किंवा गाडीतच बसून रस्त्याने येणार्‍या माणसाला थांबवून रस्ता विचारणे वगैरे करायला भाविक मंडळींची हिंमत होत नव्हती. कर्णकटू भजन सतत मोठ्ठ्या आवाजात ऐकणे आणि सतत फोनमधला गुरूंच्या फोटोचा वॉलपेपर बघत फोन डोक्याला लावणे यापलिकडे त्यांचे प्रयत्न जात नव्हते.

राई-भातगावच्या पुलावर आल्यावर पुढच्या रस्त्याबद्दल कुणालाच प्रश्न नव्हता. त्यामुळे पुलाशी पोचल्यावर 'चला आता प्रश्न नाही!' अशी आमची प्रतिक्रिया तर भाविक मंडळींचे भजन, नमस्कार, जप वगैरे चालूच होते. मुंढरला पोचल्यावर एडी २ म्हणे, 'स्वामींनी वाचवले!'. सर्वांनीच कपालबडवती करून घेतली तिथे.

कुणावर श्रद्धा असणे चुकीचे नाही पण प्रत्यक्ष प्रयत्न, प्रत्यक्ष मार्ग चालणे, प्रत्यक्ष कष्ट तुमचे तुम्हालाच करायचे आहेत. कोणी मार्ग बिर्ग दाखवायला येणार नसतो. आपल्यापेक्षा अनुभव जास्त असलेले लोक पॉइंटर्स देऊ शकतात. त्याचा विचार करण्याचा कदाचित उपयोग होऊ शकतो. श्रद्धेचा उपयोग फारतर मार्ग शोधताना डोके शांत ठेवायला होऊ शकतो. तुम्ही मनाने पुरेसे घट्ट असाल तर त्याचीही गरज नाही. मनाने घट्ट होत जाणे हे एका रात्रीत होत नाही. ती प्रक्रिया मोठी असते. पण आपल्याकडून प्रयत्न केल्याशिवाय ती सुरू होत नाही.

तस्मात 'अरे मूर्खा अभ्यास कर!' हेच अंतिम वगैरे सत्य...
डिंगडाँग...

प्रकार: 

येस. प्रयत्नांती परमेश्वर म्हणताना, ते प्रयत्ने "अंती"च आहे हे लक्षात ठेवलेले बरे.. त्याच्या प्राप्तीसाठीही जर प्रयत्न करावे लागतात तर अग बाकीच्या गोष्टींचा काय पाड?

आयड्या भारी पेपरावर लिहायची.. Happy
आमच्या घरून निघताना सांगायचे, पेपर सुरु व्हायच्या दोन मिनिट आधी कुलदेवतेचे नाव घे, सारे काही ठीक होईल..
आजवर घेतले नाही पण घरच्यांच्या भावन दुखवू नये म्हणून त्यांना खोटेखोटेच घेतले सांगायचो..
मात्र दोन मिनिटे डोळे बंद करून चिंतन मनन जरूर करायचो.. जेणेकरून नंतर समोर येणार्‍या पोपटाच्या डोळ्यावर कॉन्सट्रेट करायला सोपे पडायचे..

कुणावर श्रद्धा असणे चुकीचे नाही पण प्रत्यक्ष प्रयत्न, प्रत्यक्ष मार्ग चालणे, प्रत्यक्ष कष्ट तुमचे तुम्हालाच करायचे आहेत. कोणी मार्ग बिर्ग दाखवायला येणार नसतो.>>>>> + १००
मस्त लेख Happy अगदी योग्य वेळेला पोस्ट्लाय.

मनाने घट्ट होत जाणे हे एका रात्रीत होत नाही. ती प्रक्रिया मोठी असते. पण आपल्याकडून प्रयत्न केल्याशिवाय ती सुरू होत नाही. >>> तुला प्र चं ड अनुमोदन यासाठी.

मस्त लेख
कुणावर श्रद्धा असणे चुकीचे नाही पण प्रत्यक्ष प्रयत्न, प्रत्यक्ष मार्ग चालणे, प्रत्यक्ष कष्ट तुमचे तुम्हालाच करायचे आहेत. कोणी मार्ग बिर्ग दाखवायला येणार नसतो.>>>>> + १००

मनाने घट्ट होत जाणे हे एका रात्रीत होत नाही. ती प्रक्रिया मोठी असते. पण आपल्याकडून प्रयत्न केल्याशिवाय ती सुरू होत नाही. >+ १००

कुणावर श्रद्धा असणे चुकीचे नाही पण प्रत्यक्ष प्रयत्न, प्रत्यक्ष मार्ग चालणे, प्रत्यक्ष कष्ट तुमचे तुम्हालाच करायचे आहेत. कोणी मार्ग बिर्ग दाखवायला येणार नसतो. >>>> ÷ १. मस्त लिहीलेय नीधप.

(स्वामींच्या कृपेने हा लेख वाचला.)

छान लिहिलेत Happy

कपालबडवती
>>

मस्तय हा शब्द!

देवा मला पास कर.. अरे मूर्खा अभ्यास कर!>>> हे वाक्य भारी आहे Happy लेकीच्या खोलीत लावायला हरकत नाही Wink

प्रत्यक्ष मार्ग चालणे, प्रत्यक्ष कष्ट तुमचे तुम्हालाच करायचे आहेत. कोणी मार्ग बिर्ग दाखवायला येणार नसतो. आपल्यापेक्षा अनुभव जास्त असलेले लोक पॉइंटर्स देऊ शकतात. त्याचा विचार करण्याचा कदाचित उपयोग होऊ शकतो. >>> हे तर एकदम पटेश

so true!

छान लेख.
कुणावर श्रद्धा असणे चुकीचे नाही पण प्रत्यक्ष प्रयत्न, प्रत्यक्ष मार्ग चालणे, प्रत्यक्ष कष्ट तुमचे तुम्हालाच करायचे आहेत. कोणी मार्ग बिर्ग दाखवायला येणार नसतो +१

छान लिहिलयेस.

श्रद्धेशिवाय कष्ट आणि कष्टाशिवाय श्रद्धा दोन्हीही सारखेच ही मला लहानपणापासून दिलेली शिकवण आहे.
असेल माझा हरी प्रकारावर माझा मुळीच विश्वास नाही Happy

श्रद्धेशिवाय कष्ट करून यशस्वी होण्याची उदाहरणे भरपूर आहे.
कष्टाशिवाय श्रद्धेने यशस्वी होण्याचे उदाहरण नाही.

तस्मात श्रद्धा ही गरजेची गोष्ट नाही. आपण खंबीर झालो की तिची गरज पडेनाशी होते.

नी, मस्त लेख.
श्रद्धा ही गरजेची गोष्ट नाही. आपण खंबीर झालो की तिची गरज पडेनाशी होते<<<<<+१

आपण खंबीर झालो की तिची गरज पडेनाशी होते. >>
आपण खंबीर झालो की आपली स्वतःवर, आपल्या विचारंवर, कुवतीवर, बुद्धीवर श्रद्धाच असते.

दोन महाभाग रत्नागिरीसारख्या ठिकाणी (जिथे बर्‍यापैकी वस्ती आहे आणि पर्यटक येत जात असतात) रस्ता चुकल्यावर देवाला आळवत असतील तर त्यांना पुढचे लोकेशन दांडेली अथवा तत्सम जंगलात पाठवायला हवंय.

छान लिहिलं आहेस. आवडलं.

एवढे पावरबाज गुरू / स्वामी इ असताना मुळात रस्ता चुकूच का देतात, हे कळले नाही. कदाचित तो तुमच्यासारखे पाखंडी निधर्मांध सोबत असल्याचा परिणाम असावा.

रत्नागिरीसारख्या ठिकाणी << तिथे नाही. जिथे चुकलो तो व्यवस्थित निर्मनुष्य आणि अंधारी रस्ता होता.
रत्नागिरीत ते जे एक मोठं सर्कल आहे मेन रस्त्याला. तिथून अर्ध उजवीकडे की असा काहीतरी गुहागर रस्ता लागतो. (राई-भातगाव मार्गे जायचा). त्या रस्त्याला लागल्यावर शहर सोडल्यावर मग डोंगरातला गच्च झाडीचा रस्ता सुरू होतो. तिथे एका ठिकाणी राई गावाकडे जायचा फाटा आहे. तो चुकला तर तुम्ही पुळ्याच्या दिशेने जाता. तो रस्ता.
मला अधली मधली गावांची/ नाक्यांची नावं आठवत नाहीयेत तिथली. मॅपवर दाखवू शकेन.

कदाचित तो तुमच्यासारखे पाखंडी निधर्मांध सोबत असल्याचा परिणाम असावा.<< हेच बरोबर..
पण तशी तर मी निधर्मांधही नाहीये
मेरा लेबल अभीतक फिक्स नही हुआ है. Proud

कुणावर श्रद्धा असणे चुकीचे नाही पण प्रत्यक्ष प्रयत्न, प्रत्यक्ष मार्ग चालणे, प्रत्यक्ष कष्ट तुमचे तुम्हालाच करायचे आहेत. मनाने घट्ट होत जाणे हे एका रात्रीत होत नाही. ती प्रक्रिया मोठी असते. पण आपल्याकडून प्रयत्न केल्याशिवाय ती सुरू होत नाही. >>>> १००% सहमत. स्वत:वर आणि स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास असणे फार महत्वाचे. त्याचबरोबर अपयश पचवून पुढे जायची ताकद सुद्धा हवीच.

Pages