मेथी मेतकुट हिवाळी धपाटा - (धपाटा प्रकार-०१)

Submitted by हर्ट on 3 December, 2015 - 23:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

# मेथीची एक ताजी जुडी
# पाव वाटी घमघमणारे मेतकुट
# ज्वारीचे पिठ - सव्वा वाटी
# लहानसा कांदा
# लसून
# जिरे
# हिरवी मिरची किंवा तिखट
# मीठ
# हिवाळा असेल तरच तिळ तेही भाजलेले. इथे हिवाळा नाही म्हणून तिळ घेतले नाही.

क्रमवार पाककृती: 

१) सर्वप्रथम मेथीची पाने धुवून निवडून घ्यावी. शक्यतोवर पानेच घ्यावी. देठ कोवळे असतील तर घ्यावे.

२) अगदी साधीशी हलकी फुलकी फोडणी देऊन मेथीची भाजी तव्यावर करावी. आच मंद ठेवली तर जास्त पाणी सुटेल. आच जास्त ठेवली तर भाजी कोरडी होईल. म्हणून आचेकडे लक्ष द्या. भाजी फोडणी घालून झाली की त्यावर बसेल असे एक ताट ठेवावे आणि एक वाफ येऊ द्यावी. वाफ आली की परत ही भाजी शिजवू नये.

३) मेथीची भाजी होईपर्यंत तुम्ही परातीमधे दोन धपाटे होतील इतके ज्वारी पिठ घ्यावे आणि पाव वाटी मेतकुट घ्यावे.

४) भाजी झाली की पिठामधे भाजी घालावी. भाजी घालण्यापुर्वी पिठ आणि मेतकुट हाताच्या बोटानी एकत्रित करावे. असे एकत्रित व्हायला हवे की पिठाचा रंग मेतकुटाच्या रंगात मिसळून जावा. मधे एक खळ करावे आणि त्यावर भाजी घालावी.

५) आता पिठ आणि भाजी हाताला कोमट पाणी लावून मळून घ्यावे. भाजीला जर भरपुर पाणी सुटले असेल तर फार उत्तम पण जर थोडे कमी पडत असेल तर पाण्याचा हात लावत लावत पिठ मळून घ्यावे. पाणी घालून/ओतून पिठ मळू नये. असे केले की उंडा बिघडू शकतो. हवे तर ताका सुद्धा वापरु शकता. पण मी खूप चवी एकत्रित करत नाही.

६) उंडा तयार झाला की लगेच पोळपाटावर ज्वारीचे पिठ समांतर पसरवून घ्यावे. आधी हातानी तळहातावर उंडा गरगरीत गोल करुन थोडासा चापट करुन घ्यावे. मग तो पोळपाटावर ठेवावा. पिठ थोडे जास्त असले की भाकरी थापताना ती पोळपाटावर फिरत फिरत तिचा परिघ वाढत जातो. भाकरी थापताना ती फिरायलाच हवी. असे नाही झाले तर तिथेच थांबा कारण ही भाकरी तुम्हाला तव्यावर टाकताच येणार नाही. शेवटी धपाटा हा भाजरीचाच एक खमंग प्रकार आहे म्हणून मी इथे भाकरी असा उल्लेख केला आहे.

७) जो तवा तुम्ही मेथीच्या भाजीला वापरला तो तवा तसाच मंद आचेवर गॅसवर ठेवावा. माझा एक स्वानुभव आहे मंद आचेवरचा स्वयंपाक रुचकर होतो. हा तवा जाड बुडाचा आहे आणि मधे खळ आहे. असा तवा पोळी, भाकरी, भाज्या सर्वांसाठी चांगला. हा तवा मी अकोल्याहून घेतला आहे. १० वर्ष झालेत मुठ अजून घट्ट मजबूत आहे. तर .. ह्या तव्यावर धपाटा खरपुस भाजावा. पहिली बाजू अशी दिसते:

८) दुसरी बाजू मी मुद्दाम करपवली कारण मग धपाटा अजून कुरकुरीत आणि चवीला छान लागतो. पण करवण्याच्या ह्या क्रियेत आपण धपाटा जाळतो तर नाही ना ह्याकडे लक्ष पुरवावे.

९) मी मेतकुटाचा हा पॅक दिक्षित फुडस मधून घेतला आहे. बावधनाला त्यांचे दुकान आहे.

अधिक टिपा: 

१) ताजी भाजी घ्या. जून भाजी घेऊच नका.
२) ताजेच मेतकुट घ्या.
३) जी मुल भाज्या खायला नन्नाचा पाढा म्हणतात त्यांना अशा पाककृतीतून पोषक घटक मिळू शकतात. आमच्या आया अशाच करत. तुम्ही पण काय झाल बाळ रडत होत ह्याच्या पावलावर पाऊन ठेवून धपाट्याची ही लुप्त होत चाललेली परंपरा पुढे न्या.

ताक - माझ्याकडे धपाट्याच्या अनेक पाककृती आहेत. म्हणून मी हा पहिला प्रकार लिहिला. ह्याला मी पुढे नेणार आहे.

धन्यवाद

बी

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोचीन, धन्यवाद. ती स्टेप लिहायची मी विसरुन गेलो. पिठ लागलेल्या बाजूला पाणी लावावे लागेल.

मंडळी सर्वाचे आभार. झब्बू बघायला आवडेल.

अरे वा, खूपच छान आहे रेसिपी आणी तू किती व्यवस्थित सर्व डीटेल्स दिले आहेस.. नक्की करून पाहणार
मेतकूट ची अ‍ॅडिशन फार आवडली, नक्कीच चमचमीतपणा येत असणार !!! Happy

मस्त बी. आवडीचा प्रकार आहे हा. नक्की कसे बनतात धपाटे हे पहिल्यांदा वाचले कारण आमच्याकडे बनत नाहीत. पण माझ्या गर्लफ्रेंडच्या घरी मस्त बनतात. तिच्या डब्ब्यात असले की अर्धाअधिक डबा मीच साफ करतो. मस्त तिखट असतात, आणि सोबत आंबट दही, नाहीतर घोट घोट ताक .. मस्त Happy

धन्यवाद . उत्तम पाकृ. सर्वांना आवडलि. मेत कुट पहिल्यांदाच रेसिपि शोधुन बनविले . रविवार खूप छान साजरा झाला. तुम्हा सर्वांना कोटि कोटि धन्यवाद . मनापासून

बी, धपाट्यात मेतकुट घालण्याची आयडिया फार आवडली.
माझ्या आईच्या माहेरी प्रवासाला धपाटे आणि टिकणारी भाजी सोबत शेंगदाण्यांची खमंग चटणी असायची त्याची आठवण आली. त्या धपाट्यांत मिक्स पीठं, हिरवी मिर्ची, लसूण आणि भरपुर कोथिंबीर चिरलेली आणिही काही मसाले असावेत. हे सर्व छान मळून त्याच्या चपात्या लाटून तव्यावर दोन्ही बाजुंना व्यवस्थित तेल लावून भाजून घ्यायच्या. मी कधी केल्या नाहीत पण जसे आठवते आहे तसे लिहीले आहे कारण ही माझी पाकृ टेस्ट करून आता ४५ वर्ष होतील. पण धपाटे, धपाटे म्हणतात ते हेच किंवा अश्या प्रकारे करतात हे तुमच्या धपाट्याच्या पाकृमुळे कळले. भाजणीच्या पीठाची थालिपिठे करते.
बी, तुमच्या आणखीही धपाट्यांच्या कृती आहेत त्या जरूर पोष्ट करा. धन्यवाद!

निशदीप, किती सुंदर आहे तुमचे नाव! अहाहा!!!

धपाटा आवडल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

Pages