माझ्या वाईट सवयी १ - चोरी

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2015 - 03:41

आयुष्यातील पहिली चोरी कधी केली आठवत नाही. आयुष्यातील शेवटचा वाह्यातपणा कधी केला आठवत नाही. पण आठवेल तसे सांगतो. काही एकट्याचे पराक्रम आहेत, तर बरेचसे मित्रांच्या टोळक्याने केलेले..

किशोर वयात आपले फंडे वेगळेच असतात. चोरी करणे हे गैरकृत्य कमी आणि धाडसाचे काम जास्त वाटते. अंगात किडा असणे आणि डेअरींग असणे हे समानार्थी शब्द समजले जातात. तेव्हाचे कधीचेतरी हे किस्से. आज सहज व्हॉटसपग्रूपवर विषय निघाला म्हणून उगाळले गेले, म्हटले लिहून संकलित करूया..

सुरुवात बालपणापासून करूया. वय वर्ष साधारण आठ-दहा असावे.. त्या वयातही आम्ही एवढे वस्ताद होतो की दुकानदाराची पाठ वळताच बघता बघता बरणीतले चॉकलेट काढायचो. आमच्या बिल्डींगमधले माझे दोन जवळचे मित्र या कलेतील माझे पहिले गुरू होते म्हणू शकतो. त्यांच्याच सोबतीने दोन तीन वेळा मी स्वत: देखील ही हस्तकला आजमावली होती.
पुढे मग मोठा ग्रूप बनला. अर्थात, सारेच या कलेत माहीर नव्हते, पण मोहीम फत्ते नेण्यास गरज सर्वांचीच होती. गर्दी करून जायचो आणि दुकानातून ढोकळा, गुलाबजाम, फरसाण, पुरणपोळ्या वगैरे नाना पंचपक्वांनांची रेडीमेड पाकिटे ढापायचो. त्यात एखादेच काय ते विकत घेतलेले असायचे. ते देखील एकेक रुपया कॉंट्रीब्यूशन काढून. तिथून मग जवळपासचे एखादे गार्डन वा सायकलीला टांग मारून थेट राणीबाग गाठायचो आणि पार्टीऽऽऽऽऽ..!!

राणीबागेत विदाऊट तिकीट, कंपांऊड ओलांडत शिरायचा मार्ग माहीत होता हे इथे सांगायला हरकत नाही.

पुढे मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये याची फ्रिक्वेन्सी वाढली, दुकानदारांच्या लक्षात येऊ लागले, आमच्यावर लक्ष ठेवले जाऊ लागले, आणि ही धमाल संपली!

हाच ग्रूप गॅंगचा फंडा मग फॅशन स्ट्रीटला वापरू लागलो. कपडे, बेल्ट, पाकिटे, अगदी पर्स आणि लेडीज सॅंडलही चोरलेत. अशीच गर्दी करून जायचो आणि पिशवीत टाकायचो. १००-१५० रुपयाचे काहीतरी घ्यायचो आणि किमान हजार रुपयांचा माल फुकटात घेऊन जायचो.

आजही हे घरी समजले तर खूप शिव्या पडतील. तेव्हा समजले असते तर तुडवलो गेलो असतो. घरून तर घरून, पण त्या आधी त्या फॅशन स्ट्रीटच्या विक्रेत्यांकडूनही जबरी पडली असती. त्यामुळे दोन-तीन सीजन गाजवले, आणि हा धोका लक्षात येताच थांबलो.

बाकी गणेशोत्सव-नवरात्रीत दुपारच्या वा रात्रीच्या शांत अन निश्चल वेळी, सार्वजनिक मंडळांच्या पेटीतील पैसे काड्या करत काढणे आणि त्याला देवाचा प्रसाद म्हणून स्विकारणे असे सीजनल प्रकार चालू होतेच.

तसेच आझाद मैदानावर क्रिकेट खेळताना एक नजर ईतरांच्या बॅट बॉलवर असायची. लागली हाताला की उचलली. मग त्यानंतर ती आमच्या गल्ली क्रिकेटची शान वाढवायची, किंवा शेजारच्या गल्लीत विकली जायची.

चोरीचा माल विकण्यावरून आठवले, आमच्या बिल्डींग शेजारी एक कंपनी होती. कसली ते माहीत नव्हते, पण लोखंडाचा बराचसा कच्चा माल एके ठिकाणी पडलेला असायचा. आम्ही क्रिकेटचा बॉल तिथे मारून तो काढायला चढायचो, आणि जोडीला जमेल तितके लोखंड सोबत घेत उतरायचो. दोन चार फेर्‍यात पुरेसे जमले की ते दूरगावच्या भंगारवाल्याचा विकायचो. अगदीच पावभाजी नाही तर किमान वडापावची पार्टी तरी सुटायची. एखाद्या अश्या सेलिब्रेशन डे ला आपण क्रिकेट खेळायला नसलो, आणि पार्टीला मुकलो, तर जीव खूप हळहळायचा. कारण फुकट खाण्यातील मजा काही औरच. आणि हा तुलनेत आजवरचा सर्वात कमी रिस्की प्रकार होता.

फुकट खाण्यावरून आठवले, लग्नात घुसून फुकट खाणे ही देखील एक प्रकारची चोरीच!
पण हे धंदे ईंजिनीअरींगला. स्टडी नाईटच्या नावाखाली कॉलेज आणि हॉस्टेललाच पडीक असायचो. खाण्यापिण्याची सोय जर जेमतेम मिळणार्‍या पॉकेटमनीमधून करू शकलो नसतो, आणि त्यासाठी घरी एक्स्ट्रा पैसे मागितले असते, तर या स्टडी नाईटस घरच्यांनी बंद केल्या असत्या. मग काय, शिक्षणासाठी काय पण! पापी पेटका सवाल म्हणत जराही लाज शरम न बाळगता नीटनेटके कपडे घालून कोणाच्याही लग्नात घुसू लागलो. आमचे कॉलेज जिथे होते तो मुंबईतील मध्यवर्ती विभाग असल्याने विवाह कार्यालयांना कमी नव्हती. पोटभर खायचो आणि वधूवरांना भरभरून आशिर्वाद देत बाहेर पडायचो.

पण रोज रोज दिवाळी नसते. हर दिन संडे नही होता. तसेच लग्नेही काही रोज रोज नसायची. असली तरी त्याच त्याच हॉलमध्ये जाऊ शकत नव्हतो.. पण जो पोट देतो, तोच अन्नही देतो. जो भूक देतो, तोच ती मिटवायचे मार्गही दाखवतो.
मेसमधून अंडी चोरणे आणि ती हॉस्टेलवर मित्रांच्या रूमवर आणून उकडणे हा एक साधा सोपा मार्ग. रात्री झोपायच्या आधी कूलरचे पाणी भरायला म्हणून आम्ही मोठा थर्मास घेऊन मेसमध्ये जायचो. तो अर्धा पाण्याने भरत त्यात अलगद अंडी सोडायचो. मेसची बत्ती गुल झाली असल्याने तिथे जवळच झोपलेल्या कर्मचार्‍यांना जराही पत्ता लागायचा नाही. मग ती अंडी रूमवर आणायचो, आंघोळीची बादली पाण्याने भरत त्यात पाणी तापवायचा हिटर सोडायचो, आणि त्यात ती अंडी उकडून घ्यायचो. मीठ-मसाला लावून, उपलब्ध असल्यास बारीक चिरलेल्या कांद्यासह, तीन-चार अंडी खाल्ली की एका रात्रीची सोय झाली.

पुढे हा प्रकार आजूबाजूच्या पोरांमध्येही प्रचलित झाला. मेसच्या अंड्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटू लागली. त्यातच काही मुर्खांना अंड्याच्या कवचाची योग्य विल्हेवाट लावणे जमले नाही आणि एक दिवस हा प्रकारही बंद झाला.
रात्रीची खायची सोय बंद झाली तसे पहाटेच पोटातील कावळे किलबिलाट करू लागले. मग काय, पुन्हा अन्नाच्या शोधात भटकंती. जवळच सापडले. एक छानसे दूध सेंटर. दूधाच्या पिशव्या आमची वाट बघत पडल्या असायच्या. या आणि उचला आम्हाला. आम्ही दोनच उचलायचो. रूमवर आणून मस्त तापवून टायगर बिस्किटसह आस्वाद घ्यायचो. या आधी घरी कधी दूध प्यायलेलो ते आठवत नाही, पण आता फुकट ते पौष्टिक म्हणत ते ही गोड मानून घ्यायचो.

आता खाण्यापिण्याचा विषय चालू आहे तर शाळेच्याही काही आठवणी आहेत.
खरे तर झाडावरची फळे पाडण्याची आणि चोरण्याची मजा आमच्या आधीच्या पिढीने किंवा ज्यांचे बालपण गावात गेले त्यांनी कदाचित जास्त घेतली असावी. पण आमच्या शाळेच्या परीसरात आवळे आणि जाम यांची चिक्कार झाडे असल्याने ते सुख आमच्याही नशिबी होते. आता ती सारी झाडे खाजगी होती, पण कंपाऊंडवरून आत उडी घ्यायची डेअरींग अंगात उपजतच होती. त्या बंगल्यांच्या कंपाऊंडच्या आधीही शाळेचे कंपाऊंड ओलांडावे लागायचे. मधल्या सुट्टीत असे शाळेच्या बाहेर जाणारे, ते देखील चोरीसाठी, मी आणि माझा एक मित्र, असे आम्ही दोघेच. जमा करून आणलेला माल मात्र वर्गात सर्वांना वाटायचो. पण अगदीच फुकट नाही, तर त्याबदल्यात त्यांच्याकडून ईतर काही मिळवायचो.

बस्स मग एके दिवशी कधी ना कधी जे घडणारच होते ते घडले. मित्राच्या दगडाने खिडकीची काच फुटली. शाळेतील एकूण एक वर्गात नोटीस फिरली. ज्या कोणी अज्ञात मुलांनी हा खोडकरपणा केला होता त्यांना तंबी देण्यात आली. आमच्या वर्गात नोटीस वाचली जात असताना काही मुलांनी आमच्याकडे बघत नेत्रपल्लवी केली. मात्र आमची नावे अज्ञातातच राहीली. आणि अज्ञानात सुख असते असे का म्हणतात ते आम्हाला समजले.

पण त्यानंतरही आम्हा दोघांची डेअरींग बघा. साधारण महिन्या दोन महिन्यांनी आम्ही एका कंपांऊंडमधील फणस तोडला. हाताने तोडता येईल एवढ्या उंचीवरच लागलेला. पण मोठ्या कष्टानेच तोडला. सकाळी तोडला. दिवसभर एका सिक्रेट जागी लपवून ठेवला. आणि संध्याकाळी घरी घेऊन निघालो. वाटेत काही जाणकारांनी खबर दिली की हा कच्चाच आहे आणि फक्त भाजी बनवायला कामाला येईल. तर आईला नेऊन द्या. अर्थात हि शक्यता बाद होती. आमच्या आयांनी त्या फणसाच्या जागी आम्हालाच चिरला असता. मग एरीयातीलच एका भाजीवाल्याला तो विकला.

तर ही चोरीची कला काही सण ही साजरे करायला कामी यायची. एक म्हणजे रंगपंचमी. कुठल्याश्या फॅक्टरीमधून आम्ही रंगाच्या पावडरीचे पॅकेटस चोरायचो. एकदम पक्का कलर. कलर गया तो पैसा वापिस. फॅक्टरीत तो नेमका कश्याला वापरायचे काही कल्पना नाही, कारण ती फॅक्टरी कसली होती हेच मुळात माहीत नव्हते. पुढे कधीतरी थोरामोठ्यांकडून समजले की त्या रंगात घातक केमिकल्स असण्याची शक्यता होती. तसे ही चोरीही बंद केली.

आणखी एक सण म्हणजे ३१ डिसेंबर, वर्षाची शेवटची रात्र. मोठी माणसे नवीन वर्षाचे स्वागत दारू पिऊन करायची. आम्ही बच्चे कंपनी नाचून, फटाके फोडून आणि जिंगलबॅंग नामक बुजगावणे जाळून करायचो. सांताक्लोजला आम्ही जिंगलबॅंग बोलायचो. अजब वोकॅबलरी. तर हे माणसाच्या आकाराचे बाहुले. जुन्या शर्टपॅंटमध्ये गवत कोंबून बनवले जायचे. वर डोक्याच्या जागी गवतानेच भरलेली दूधाची पिशवी आणि त्यावर मुखवटा. यात काही फटाकेही भरले जायचे, जेणेकरून जाळताना ते अधूनमधून फुटतील आणि आनंद द्विगुणित करतील.
तर इथे सांगायचा मुद्दा हा की प्रत्येक गल्लीबोळात असे कित्येक बुढ्ढे बनवले जायचे. अगदी २०-२२ डिसेंबर पासून बनवून कुठेतरी टांगले जायचे. आम्ही ३०-३१ तारखेला दुपारच्या वेळेस बाहेर पडायचो आणि जिथे जिथे हे बेवारसपणे पडलेले दिसायचे तिथून सरळ चोरून आणायचो. एखाद दिवस लपवून ठेवायचो. आणि थेट ३१ च्या बारा वाजताच जाळायला बाहेर काढायचो.

हे किस्से त्यामानाने हलकेफुलकेच पण चोरीचे काही सिरीअस किस्से आठवायचे म्हटल्यास एक फसलेली पेपर चोरी.
ईंजिनीअरींग ड्रॉईंग, आणि त्यातील भुमिती. मला जमायचे पण कैक मित्रांचे धाबे दणाणले होते. त्यांच्या डोक्यावर माझे डोके आपटून झाले तरी त्यात काही शिरत नाही हे लक्षात आल्यावर आम्ही एक सिरीअसली डेंजरस प्लान बनवला. पेपरचोरीचा. कोणते सर पेपर काढणार आहेत हे माहीत होते. जर अमुक तमुक दिवशी त्यांच्या केबिनमध्ये शोधाशोध केली तर कच्चापक्का स्वरुपातला पेपर हाती लागू शकेल असे कॅलक्युलेशन मांडले. ठरलेल्या दिवशी लंचब्रेकला सात आठ जणांना ठराविक अंतराने इशारा देण्यास उभे करत आम्ही दोघे जण सरांच्या केबिनमध्ये शिरलो. अर्थात केबिन कुलूप लावून बंद होते, पण वरतून ओपन होते. म्हणजे कोणी अचानक आल्यास आम्हाला चपळाईने निघणे शक्य नव्हते. आणि हाच धोका होता. तरी तो धोका उचलत आम्ही जवळपास दहा ते बारा मिनिटे शोधाशोध केली पण काही हाती लागले नाही. अन्यथा आमच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला असता.

असाच एक सेम टू सेम पण तुलनेत कमी धोकादायक प्रकार ईंजिनीअरींगच्याच आणखी एका वर्षाला केला होता. कमी धोकादायक यासाठी की केबिनचा दरवाजा उघडाच होता. पण यावेळचा हेतू वेगळा आणि शुद्ध चोरीचा होता. त्या सरांच्या केबिनमध्ये कॉलेजच्या लायब्ररीची कित्येक पुस्तके रचून ठेवली होती. आमचा बस्स त्यावरच डोळा होता. कसलेही विघ्न न येता मिशन सक्सेसफुल झाले आणि तब्बल दोनेक हजारांना ती पुस्तके सेकंडहॅंड बाजारात विकली गेली.

जाता जाता एक शेवटचा किस्सा ज्यात थेट पैश्यांचीच चोरी होती. पीसीओचे लाल पिवळे डब्बे उघडायची मास्टर की हाती लागली होती. सगळेच नाही पण ३०-४० टक्के डब्बे तरी उघडायचे. ते शोधत आम्ही कुठे कुठे फिरायचो. अर्थात आजूबाजुला रहदारी आणि वर्दळ नाहीये हे देखील बघणे गरजेचे होते. कारण रिस्की प्रकार होता. एक लॉक उघडला की आत आणखी एक लॉक उघडायचा असायचा. पण एकदा खुलला की एकेक रुपयांचे सरासरी पाच-सहाशे कॉईन खणखण करत आमच्या खिशात पडायचे.
थोड्याच दिवसांत अक्कल आली. यात पकडलो गेलो तर कदाचित बाराच्या भावात जाऊ. आपण चांगल्या घरची मुले आहोत आणि असल्या लफड्यात आपली करीअर डावावर लावण्यात अर्थ नाही. तर या नादातूनही बाहेर पडलो.

एकंदरीत आजवरच्या सर्वच प्रकरणात, कुठे पकडलो गेलोय, कुठे मार पडलाय, कुठे मानहानी झालीय असे कधीच घडले नाही हे एक कौतुकास्पद!
त्यामुळे कधी कधी वाटते की मी ईंजिनीअर झालो नसतो तरी एखादा छोटामोठा चोर बनत आपले आणि आपल्या बायकापोरांचे पोट भरलेच असते.

तर हे एक माझे झाले, आता तुम्हाला कोणाला ईथे लिहून हलके व्हायचे असेल तर व्हा बिनधास्त.
कसली भिती वाटत असल्यास सर्वांसाठी एक कॉमन डिस्क्लेमर टाकतो.
डिस्क्लेमर - या लेखात वा प्रतिसादांत, आलेले वा येणारे, बहुतांश वा सर्वच, किस्से वा कथा, काल्पनिक वा आतिशयोक्तीपुर्ण, असण्याची दाट शक्यता असून एखादी घटना खरी आहे आहे याचा सबळ पुरावा असेल तरच आक्षेप उचला. अन्यथा जय हिंद, जय महाराष्ट्र!
तुमचाच ऋन्मेऽऽष

अवांतर तळटीप - धागा काढताना शब्दखुणात चोरी टाकलेले पण ते लेखनचोरी असे दिसू लागले, जी मी कधी केली नाही. म्हणून शब्दखुण काढून टाकली.

..................................................................................................

वैधानिक इशारा - चोरी करणे वाईट आहे. कायद्याने गुन्हा आहे. पकडले गेल्यास शिक्षा होऊ शकते!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेखनचोरी- जी मी कधी केली नाही. >>
Happy

आम्ही लहानपणी एखाद्या कैरीशिवाय , काहिही चोरलं नाही, कैर्‍या चोरायला सोप्या होत्या कारण आम्ही ज्या वाडीत रहात होतो त्या डोंगरावर आमच्या घरांपुरती जागा सोडून बाकी जागा म्हणजे दुसर्‍या कुणाची आंब्याची बाग होती. ते बागवाले एखादा राखणी ठेवून बाकी वर्षभर फिरकतही नसत.

बाकी अगदी लिमलेटच्या गोळ्यांपासून पैशांपर्यंत काहिही चोरणं कल्पनेतही आणू शकत नाही.

बाकी अगदी लिमलेटच्या गोळ्यांपासून पैशांशिवाय काहिही चोरणं कल्पनेतही आणू शकत नाही.... अगदी
मागच्या महिन्यात अरुणाचलला गेलो होतो. गाडीतून फिरताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला संत्र्यांची लदबदलेली झाडं ... संत्रानगरवासी असलो तरी विकत घेऊन खाणारो.... झाडावरची ताजी फळं खायची अनावर इच्छा झाली.... ड्रायवरला जिथे कुठे मालक/रखवालदार असेल तिथे गाडी थांबव आपण परवानगीने संत्री तोडू, विकत घेऊन खाऊ.... पण दीड दोन किमी गेलो तरी अशी बाग सापडेना .... शेवटी .... पकडायला कोणी नव्हतच तरी सुध्दा धाकधुक वाटत होती ....प्रत्येकी दोन अशी दहाच संत्री तोडली ...

नशीब मुंबैतल सांगताय. शनीशिंगणापूरला असता तर शनी कोपून भस्म झाले असते तुमचे.

दहावीला असताना प्रार्थना सुरू झाली की आम्ही मागच्या जिन्याने जाऊन वरच्या मजल्यावर वर्गात दप्तरं ठेवलेल्या पोरींच्या कंपासपेट्यांमधून भारी भारी पेन, पेन्सिल, रबर, पट्ट्या चोरायचो. एका मित्रामुळे मला ही सवय लागली होती. पण हा प्रकार चार पाचच दिवस चालला. एकदा एक शिपाई व्हरांड्यातून गेला आणि आम्हाला येथे काय करताय, असे हटकले. तेव्हापासून बंद. बाकी आयुष्यात चोरी नाही केली कसलीच.

मी पुढे भारताचा पंतप्रधान किंवा अमेरिकेच्या अध्यक्ष्याच्या निवडणुकीला उभा राहिलो तर माझ्या सोशल नेटवर्कवरच्या वक्तव्यांमुळे कॉण्ट्रोवर्सी निर्माण होईल म्हणून मी आत्ताच सेफ खेळून इथे लिहायचे टाळत आहे.

वेरी गूड टोचा,
याबाबत आमचे उसूल वेगळे होते. वर्गातच किंवा शाळाकॉलेजातील मुलांची स्टेशनरी चोरी म्हणजे आम्हाला विश्वासघाताचा प्रकार वाटायचा. किंवा आपल्यात एकी नाही असे वाटायचे. तसेच ईंजिनीअरींगला एका मध्यमवर्गीय स्टुडंटसाठी स्टेशनरीची किंमत काय असते याची कल्पना होती. त्यामुळे आमच्या वर्गापुरते बोलायची झाल्यास कोणाचीही स्टेशनरी कशीही विखुरली गेली असली तरी कधी चोरी नाही व्हायची. अर्थात याचा सर्वात मोठा फायदा मलाच झाला असावा कारण मला स्वताच्या वस्तू सांभाळायची जराही अक्कल नाही Happy

पण ईतर वर्गात व्हायच्या चोर्‍या. आमच्या शेजारच्या क्लासमध्येही वर्गातल्या वर्गातच बरेच व्हायच्या. तेथील मुले आम्हाला येऊन सांगायची की तुमच्या क्लासमध्ये एवढे ग्रूप असले तरी सही एकी आहे तुमच्यात..
आमच्या हॉस्टेलमध्येही शक्यतो नाही व्हायच्या चोर्‍या. एकदा सुकत घातलेले कपडे चोरी व्हायला सुरुवात झालेली. तेव्हा हॉस्टेलच्या पोरांनी पकडून संबंधितांना चोप दिलेला.
आम्हीही एकदा फिल्डींग लावून वर्कशॉपचे टूल्स चोरणार्‍या दोघा पोरांना पकडलेले. पण ते सर्व मुलींसमोर रडत गयावया करायला लागले. तर त्यांच्या करीअरचा विचार करता प्रकरण जास्त ताणले नव्हते.

आणि विशेष गोष्ट अशी की वर्गात पहिल्या क्रमांकाने पास होणारा, उत्तरं द्यायला सतत वर बोट असणारा सरांचा आवडता विद्यार्थी होतो मी … नशिब या गोष्टी उघड झाल्या नाहीत. वेळीच थांबल्या. नाहीतर वर्गात माझी काही खैर नव्हती.

अदिति, जोपर्यंत एखाद्या गोष्टीचे गांभीर्य समजत नाही तोपर्यंत ती गम्मतच ..

वेल, येस्स पेपरमधील कॉपी हे एक चोरीच झाली. पण तो एक स्वतंत्र आणि मोठा विषय आहे म्हणून यात त्यावर काही लिहायचे टाळले.

जोपर्यंत एखाद्या गोष्टीचे गांभीर्य समजत नाही तोपर्यंत ती गम्मतच ..>>

खूप खूप घातक आहे रे हे वाक्यं बाबा!
एखादा खूनी / बलात्कारी उद्या असं म्हणाला तर भयानक अवस्था होईल!

>> जोपर्यंत एखाद्या गोष्टीचे गांभीर्य समजत नाही तोपर्यंत ती गम्मतच ..

तुम्हाला आता तरी तुमच्या जुन्या वागण्याचा पश्चात्ताप होतोय कि नाही?

तुमच्या या लेखामध्ये अजिबातच रिग्रेट किंवा ज्यांच्या वस्तू चोरल्या त्यांच्याबद्दल सहानुभूती जाणवत नाही.
"लहान असताना मी काही चुका केल्या. तेव्हा मजा आली पण आता मागे वळून बघताना त्याबद्दल लाजिरवाण वाटतं", असा जर लेखाचा सूर असता तर बरं झालं असतं.

पहिल्या सोनेशुद्धीकरण करणार्‍या कंपनीमधे मी एक वर्षात १ किलो सोने असं टार्गेट ठेवला होतं तिथे अडिच वर्षे काढली Wink
दुसर्‍या आणी तिसर्‍या कंपनीत प्लॅटिनम आणी पॅलॅडियम चे टार्गेट होते, महागाईमुळे १.५ किलो प्रतिवर्ष, तिथे अनुक्रमे ६ आणी २ वर्षे काढली Wink

सध्या मी माझ्या साथीदारांच्या एके ४७ आणी एके ५६ च्या गोळ्या चोरतो इथे मला सध्या ४ वर्षे होत आलीत. इथलं गोळ्यांच टारगेट मी २५००० गोळ्या प्रतिवर्षे ठेवल होत. कधी कधी मी मित्रांचे कोल्टचे रिवॉल्वर पण.....

तसच इथल्या सध्याच्या कामात आमच्या दुसर्‍या एका मित्राला इतरांचे सुगंधी आणी वेगवेगळ्या चवीचे रबरी कंडोम चोरायची सवय आहे. यावर मी एक वेगळा धागा/बाफ काढणार आहे.

खूप खूप घातक आहे रे हे वाक्यं बाबा!
>>
हो खरेंय. पण हे विषयापुरतेच होते समजा.

टग्या,
तसा सूर लेखात जाणवत नाहीये कारण मागे वळून बघताना मला फारसे काही तसे जाणवत नाहीये. अर्थात हे चूक असेल तर मान्य. पण उगाच लेख संतुलित करायला, तसे नसताना खोटा आव आणावासा वाटला नाही.
त्यावेळी हे सारे करताना कधी गंमत वाटली, कधी थ्रिल, तर कधी धमाल वगैरे. व्हॉटसपवर जेव्हा हा विषय निघाला तेव्हा या आठवणी देखील मजा घेतच शेअर केल्या. याचे आणखी एक कारण म्हणजे आता हे कधी माझ्याच्याने होणार नाही. या गोष्टी बालपणीच्या आठवणींचा हिस्सा बनूनच राहणार.

बाकी ज्याने कधी कुठलीच चोरी केली नाही असा माणूस विरळाच Happy

प्रकाशजी, हा हा, मी काही ग्लॅमर वगैरे डोळ्यासमोर ठेवून नाही लिहिले हा. तसेच कन्फेशन म्हणूनही नाही. आयुष्यात आपण एवढ्या काही उडपटांग गोष्टी करतो त्या संकलित करून ठेवणे हा एकच हेतू.

भाग्या १२३,
ते बिहारमध्ये जन्म झाला असता तर शक्य होते Happy

सभ्य म्हणून ओळखले जाणारे बरेच लोक राजरोस चोरी करत असतात

पेशंटचा आरोग्य विमा आहे म्हणून जास्तीचं बिल लावणे ही चोरीच. पूर्वी केंद्र सरकारचा नोकर पेशंट म्हणून आला की पुण्यातलं हॉस्पिटल दिल्लीतले रेट लावायचं. परिणाम म्हणून ही स्कीम जवळपास बंद पडलीय. कटप्रॅक्टीस हा वेगळा विषय आहे.

जनतेच्या कामाशी थेट संबंध येणा-या सरकारी नोकयांबद्दल बोलायलाच नको. पण टेंडरमधे टक्केवारी ठेवणारे वरीष्ठ बाबू लोक देखील मुलांबर चोरी वाईट आहे असे संस्कार करीत असतात. अनेकदा अशा लोकांची मुलंही संधी मिळाल्यानंतर भ्रष्टाचार करतातच.

टॅक्स बुडवणारे अनेक उद्योगपती आहेत. तर बँकांना बुडवणा-या उद्योगात आदराने नाव घेतले जाणारे उद्योगपती आहेत. नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट्स मधे अशाच लोकांचा वाटा मोठा आहे. घरात दोन नंबरचा पैसा येताना मुलांनी पाहीलेला असेल तर चोरी करणे वाईट पण अफरातफर, भ्रष्टाचार नाही असे संस्कार त्यांच्यावर होत नसतील का ?

मोठमोठ्या चो-या म्हणजे अक्कलहुषारी किंवा भाग्य असा सार्वत्रिक समज होन बसलाय . छोट्या , भुरट्या चो-या हा मात्र तुच्छतेचा विषय आहे. दोन्हीही वाईटच.

Tumhi kharech engineer ahat ka .....ka degree pan chorli

भाग्य१२३, हा प्रश्न मला आहे अस समजुन उत्तर देत आहे.
खरतर सांगु की नको, पण युन्व्हर्शिटी वाल्यांनी माझा बाबुराव आपटे केला.....म्हंजे त्याचं अस झालं बघा. त्रितीय वर्षात लैच म्हणजे लैच वर्ष काडली राव, आपणहुन एक दिवस डिग्री ठेवली हातात नायतं असापण एक जण तयार हुता १५,००० मदे.

अतिशय विचित्र आणि निषेधार्ह आहे हे सारे.
सर्वात मोठी हाईट म्हणजे ते वाक्य, "जर काही झालो नसतो तर चोर होऊन घर चालवले असते"
सर्वात मोठे वाईट म्हणजे, या सर्व गोष्टींची चवीने चर्चा करणे कोणताही अपराधीपणा न बाळगता.
अशा लोकांना घरचे चांगले संस्कार नसतात असे नाही, पण मुळात त्या व्यक्तीचा स्वतःचा अहंकार आणि उद्दामपणा एवढा जास्त असतो की त्यापुढे बाकी सगळे कःपदार्थ.
बर गंमत म्हणुन एखाद वेळेस काही केले तर समजू शकतो, पण इथे तर एकाहून एक प्रकार चढत्या भाजणीने केलेले आहेत.
मानसशास्त्राचे अभ्यासक सांगू शकतील अशा मानसिकतेची कारणमिमांसा !

वि.सु. : जे लोक असे वागतात, त्यांना उद्देशून जनरल लिहिलेले आहे. कृपया हे असे सगळे चालते हो समाजात तुम्ही पण फारच सिरिअसली घेता, इ. इ. लिहून मला उपदेश करण्याचा प्रयत्न करू नये. काही ठराविक लोकांनी तर अजिबातच करू नये. Happy

सर्वात मोठी हाईट म्हणजे ते वाक्य, "जर काही झालो नसतो तर चोर होऊन घर चालवले असते"
>>
अहो महेश हे मी गंमतीने लिहिले होते.
आज माझ्यातील पापभीरूपणा पाहता मी असले काही करायची डेअरींग नाही करू शकणार.
पण येस्स एकंदरीतच हे लिखाण तुम्हाला हे चोरीचे उदात्तीकरण वाटत असेल तर निषेधार्ह हा आरोप मी मान्य करतो.
अवांतर - हाच निकष धूम सारख्या चित्रपटांनाही लागू.

साती आणि महेश >>> अनुमोदन

बर गंमत म्हणुन एखाद वेळेस काही केले तर समजू शकतो, पण इथे तर एकाहून एक प्रकार चढत्या भाजणीने केलेले आहेत>>> हेच वाटले आणि ते फार भयानक आहे Sad

Pages