माझ्या वाईट सवयी १ - चोरी

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2015 - 03:41

आयुष्यातील पहिली चोरी कधी केली आठवत नाही. आयुष्यातील शेवटचा वाह्यातपणा कधी केला आठवत नाही. पण आठवेल तसे सांगतो. काही एकट्याचे पराक्रम आहेत, तर बरेचसे मित्रांच्या टोळक्याने केलेले..

किशोर वयात आपले फंडे वेगळेच असतात. चोरी करणे हे गैरकृत्य कमी आणि धाडसाचे काम जास्त वाटते. अंगात किडा असणे आणि डेअरींग असणे हे समानार्थी शब्द समजले जातात. तेव्हाचे कधीचेतरी हे किस्से. आज सहज व्हॉटसपग्रूपवर विषय निघाला म्हणून उगाळले गेले, म्हटले लिहून संकलित करूया..

सुरुवात बालपणापासून करूया. वय वर्ष साधारण आठ-दहा असावे.. त्या वयातही आम्ही एवढे वस्ताद होतो की दुकानदाराची पाठ वळताच बघता बघता बरणीतले चॉकलेट काढायचो. आमच्या बिल्डींगमधले माझे दोन जवळचे मित्र या कलेतील माझे पहिले गुरू होते म्हणू शकतो. त्यांच्याच सोबतीने दोन तीन वेळा मी स्वत: देखील ही हस्तकला आजमावली होती.
पुढे मग मोठा ग्रूप बनला. अर्थात, सारेच या कलेत माहीर नव्हते, पण मोहीम फत्ते नेण्यास गरज सर्वांचीच होती. गर्दी करून जायचो आणि दुकानातून ढोकळा, गुलाबजाम, फरसाण, पुरणपोळ्या वगैरे नाना पंचपक्वांनांची रेडीमेड पाकिटे ढापायचो. त्यात एखादेच काय ते विकत घेतलेले असायचे. ते देखील एकेक रुपया कॉंट्रीब्यूशन काढून. तिथून मग जवळपासचे एखादे गार्डन वा सायकलीला टांग मारून थेट राणीबाग गाठायचो आणि पार्टीऽऽऽऽऽ..!!

राणीबागेत विदाऊट तिकीट, कंपांऊड ओलांडत शिरायचा मार्ग माहीत होता हे इथे सांगायला हरकत नाही.

पुढे मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये याची फ्रिक्वेन्सी वाढली, दुकानदारांच्या लक्षात येऊ लागले, आमच्यावर लक्ष ठेवले जाऊ लागले, आणि ही धमाल संपली!

हाच ग्रूप गॅंगचा फंडा मग फॅशन स्ट्रीटला वापरू लागलो. कपडे, बेल्ट, पाकिटे, अगदी पर्स आणि लेडीज सॅंडलही चोरलेत. अशीच गर्दी करून जायचो आणि पिशवीत टाकायचो. १००-१५० रुपयाचे काहीतरी घ्यायचो आणि किमान हजार रुपयांचा माल फुकटात घेऊन जायचो.

आजही हे घरी समजले तर खूप शिव्या पडतील. तेव्हा समजले असते तर तुडवलो गेलो असतो. घरून तर घरून, पण त्या आधी त्या फॅशन स्ट्रीटच्या विक्रेत्यांकडूनही जबरी पडली असती. त्यामुळे दोन-तीन सीजन गाजवले, आणि हा धोका लक्षात येताच थांबलो.

बाकी गणेशोत्सव-नवरात्रीत दुपारच्या वा रात्रीच्या शांत अन निश्चल वेळी, सार्वजनिक मंडळांच्या पेटीतील पैसे काड्या करत काढणे आणि त्याला देवाचा प्रसाद म्हणून स्विकारणे असे सीजनल प्रकार चालू होतेच.

तसेच आझाद मैदानावर क्रिकेट खेळताना एक नजर ईतरांच्या बॅट बॉलवर असायची. लागली हाताला की उचलली. मग त्यानंतर ती आमच्या गल्ली क्रिकेटची शान वाढवायची, किंवा शेजारच्या गल्लीत विकली जायची.

चोरीचा माल विकण्यावरून आठवले, आमच्या बिल्डींग शेजारी एक कंपनी होती. कसली ते माहीत नव्हते, पण लोखंडाचा बराचसा कच्चा माल एके ठिकाणी पडलेला असायचा. आम्ही क्रिकेटचा बॉल तिथे मारून तो काढायला चढायचो, आणि जोडीला जमेल तितके लोखंड सोबत घेत उतरायचो. दोन चार फेर्‍यात पुरेसे जमले की ते दूरगावच्या भंगारवाल्याचा विकायचो. अगदीच पावभाजी नाही तर किमान वडापावची पार्टी तरी सुटायची. एखाद्या अश्या सेलिब्रेशन डे ला आपण क्रिकेट खेळायला नसलो, आणि पार्टीला मुकलो, तर जीव खूप हळहळायचा. कारण फुकट खाण्यातील मजा काही औरच. आणि हा तुलनेत आजवरचा सर्वात कमी रिस्की प्रकार होता.

फुकट खाण्यावरून आठवले, लग्नात घुसून फुकट खाणे ही देखील एक प्रकारची चोरीच!
पण हे धंदे ईंजिनीअरींगला. स्टडी नाईटच्या नावाखाली कॉलेज आणि हॉस्टेललाच पडीक असायचो. खाण्यापिण्याची सोय जर जेमतेम मिळणार्‍या पॉकेटमनीमधून करू शकलो नसतो, आणि त्यासाठी घरी एक्स्ट्रा पैसे मागितले असते, तर या स्टडी नाईटस घरच्यांनी बंद केल्या असत्या. मग काय, शिक्षणासाठी काय पण! पापी पेटका सवाल म्हणत जराही लाज शरम न बाळगता नीटनेटके कपडे घालून कोणाच्याही लग्नात घुसू लागलो. आमचे कॉलेज जिथे होते तो मुंबईतील मध्यवर्ती विभाग असल्याने विवाह कार्यालयांना कमी नव्हती. पोटभर खायचो आणि वधूवरांना भरभरून आशिर्वाद देत बाहेर पडायचो.

पण रोज रोज दिवाळी नसते. हर दिन संडे नही होता. तसेच लग्नेही काही रोज रोज नसायची. असली तरी त्याच त्याच हॉलमध्ये जाऊ शकत नव्हतो.. पण जो पोट देतो, तोच अन्नही देतो. जो भूक देतो, तोच ती मिटवायचे मार्गही दाखवतो.
मेसमधून अंडी चोरणे आणि ती हॉस्टेलवर मित्रांच्या रूमवर आणून उकडणे हा एक साधा सोपा मार्ग. रात्री झोपायच्या आधी कूलरचे पाणी भरायला म्हणून आम्ही मोठा थर्मास घेऊन मेसमध्ये जायचो. तो अर्धा पाण्याने भरत त्यात अलगद अंडी सोडायचो. मेसची बत्ती गुल झाली असल्याने तिथे जवळच झोपलेल्या कर्मचार्‍यांना जराही पत्ता लागायचा नाही. मग ती अंडी रूमवर आणायचो, आंघोळीची बादली पाण्याने भरत त्यात पाणी तापवायचा हिटर सोडायचो, आणि त्यात ती अंडी उकडून घ्यायचो. मीठ-मसाला लावून, उपलब्ध असल्यास बारीक चिरलेल्या कांद्यासह, तीन-चार अंडी खाल्ली की एका रात्रीची सोय झाली.

पुढे हा प्रकार आजूबाजूच्या पोरांमध्येही प्रचलित झाला. मेसच्या अंड्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटू लागली. त्यातच काही मुर्खांना अंड्याच्या कवचाची योग्य विल्हेवाट लावणे जमले नाही आणि एक दिवस हा प्रकारही बंद झाला.
रात्रीची खायची सोय बंद झाली तसे पहाटेच पोटातील कावळे किलबिलाट करू लागले. मग काय, पुन्हा अन्नाच्या शोधात भटकंती. जवळच सापडले. एक छानसे दूध सेंटर. दूधाच्या पिशव्या आमची वाट बघत पडल्या असायच्या. या आणि उचला आम्हाला. आम्ही दोनच उचलायचो. रूमवर आणून मस्त तापवून टायगर बिस्किटसह आस्वाद घ्यायचो. या आधी घरी कधी दूध प्यायलेलो ते आठवत नाही, पण आता फुकट ते पौष्टिक म्हणत ते ही गोड मानून घ्यायचो.

आता खाण्यापिण्याचा विषय चालू आहे तर शाळेच्याही काही आठवणी आहेत.
खरे तर झाडावरची फळे पाडण्याची आणि चोरण्याची मजा आमच्या आधीच्या पिढीने किंवा ज्यांचे बालपण गावात गेले त्यांनी कदाचित जास्त घेतली असावी. पण आमच्या शाळेच्या परीसरात आवळे आणि जाम यांची चिक्कार झाडे असल्याने ते सुख आमच्याही नशिबी होते. आता ती सारी झाडे खाजगी होती, पण कंपाऊंडवरून आत उडी घ्यायची डेअरींग अंगात उपजतच होती. त्या बंगल्यांच्या कंपाऊंडच्या आधीही शाळेचे कंपाऊंड ओलांडावे लागायचे. मधल्या सुट्टीत असे शाळेच्या बाहेर जाणारे, ते देखील चोरीसाठी, मी आणि माझा एक मित्र, असे आम्ही दोघेच. जमा करून आणलेला माल मात्र वर्गात सर्वांना वाटायचो. पण अगदीच फुकट नाही, तर त्याबदल्यात त्यांच्याकडून ईतर काही मिळवायचो.

बस्स मग एके दिवशी कधी ना कधी जे घडणारच होते ते घडले. मित्राच्या दगडाने खिडकीची काच फुटली. शाळेतील एकूण एक वर्गात नोटीस फिरली. ज्या कोणी अज्ञात मुलांनी हा खोडकरपणा केला होता त्यांना तंबी देण्यात आली. आमच्या वर्गात नोटीस वाचली जात असताना काही मुलांनी आमच्याकडे बघत नेत्रपल्लवी केली. मात्र आमची नावे अज्ञातातच राहीली. आणि अज्ञानात सुख असते असे का म्हणतात ते आम्हाला समजले.

पण त्यानंतरही आम्हा दोघांची डेअरींग बघा. साधारण महिन्या दोन महिन्यांनी आम्ही एका कंपांऊंडमधील फणस तोडला. हाताने तोडता येईल एवढ्या उंचीवरच लागलेला. पण मोठ्या कष्टानेच तोडला. सकाळी तोडला. दिवसभर एका सिक्रेट जागी लपवून ठेवला. आणि संध्याकाळी घरी घेऊन निघालो. वाटेत काही जाणकारांनी खबर दिली की हा कच्चाच आहे आणि फक्त भाजी बनवायला कामाला येईल. तर आईला नेऊन द्या. अर्थात हि शक्यता बाद होती. आमच्या आयांनी त्या फणसाच्या जागी आम्हालाच चिरला असता. मग एरीयातीलच एका भाजीवाल्याला तो विकला.

तर ही चोरीची कला काही सण ही साजरे करायला कामी यायची. एक म्हणजे रंगपंचमी. कुठल्याश्या फॅक्टरीमधून आम्ही रंगाच्या पावडरीचे पॅकेटस चोरायचो. एकदम पक्का कलर. कलर गया तो पैसा वापिस. फॅक्टरीत तो नेमका कश्याला वापरायचे काही कल्पना नाही, कारण ती फॅक्टरी कसली होती हेच मुळात माहीत नव्हते. पुढे कधीतरी थोरामोठ्यांकडून समजले की त्या रंगात घातक केमिकल्स असण्याची शक्यता होती. तसे ही चोरीही बंद केली.

आणखी एक सण म्हणजे ३१ डिसेंबर, वर्षाची शेवटची रात्र. मोठी माणसे नवीन वर्षाचे स्वागत दारू पिऊन करायची. आम्ही बच्चे कंपनी नाचून, फटाके फोडून आणि जिंगलबॅंग नामक बुजगावणे जाळून करायचो. सांताक्लोजला आम्ही जिंगलबॅंग बोलायचो. अजब वोकॅबलरी. तर हे माणसाच्या आकाराचे बाहुले. जुन्या शर्टपॅंटमध्ये गवत कोंबून बनवले जायचे. वर डोक्याच्या जागी गवतानेच भरलेली दूधाची पिशवी आणि त्यावर मुखवटा. यात काही फटाकेही भरले जायचे, जेणेकरून जाळताना ते अधूनमधून फुटतील आणि आनंद द्विगुणित करतील.
तर इथे सांगायचा मुद्दा हा की प्रत्येक गल्लीबोळात असे कित्येक बुढ्ढे बनवले जायचे. अगदी २०-२२ डिसेंबर पासून बनवून कुठेतरी टांगले जायचे. आम्ही ३०-३१ तारखेला दुपारच्या वेळेस बाहेर पडायचो आणि जिथे जिथे हे बेवारसपणे पडलेले दिसायचे तिथून सरळ चोरून आणायचो. एखाद दिवस लपवून ठेवायचो. आणि थेट ३१ च्या बारा वाजताच जाळायला बाहेर काढायचो.

हे किस्से त्यामानाने हलकेफुलकेच पण चोरीचे काही सिरीअस किस्से आठवायचे म्हटल्यास एक फसलेली पेपर चोरी.
ईंजिनीअरींग ड्रॉईंग, आणि त्यातील भुमिती. मला जमायचे पण कैक मित्रांचे धाबे दणाणले होते. त्यांच्या डोक्यावर माझे डोके आपटून झाले तरी त्यात काही शिरत नाही हे लक्षात आल्यावर आम्ही एक सिरीअसली डेंजरस प्लान बनवला. पेपरचोरीचा. कोणते सर पेपर काढणार आहेत हे माहीत होते. जर अमुक तमुक दिवशी त्यांच्या केबिनमध्ये शोधाशोध केली तर कच्चापक्का स्वरुपातला पेपर हाती लागू शकेल असे कॅलक्युलेशन मांडले. ठरलेल्या दिवशी लंचब्रेकला सात आठ जणांना ठराविक अंतराने इशारा देण्यास उभे करत आम्ही दोघे जण सरांच्या केबिनमध्ये शिरलो. अर्थात केबिन कुलूप लावून बंद होते, पण वरतून ओपन होते. म्हणजे कोणी अचानक आल्यास आम्हाला चपळाईने निघणे शक्य नव्हते. आणि हाच धोका होता. तरी तो धोका उचलत आम्ही जवळपास दहा ते बारा मिनिटे शोधाशोध केली पण काही हाती लागले नाही. अन्यथा आमच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला असता.

असाच एक सेम टू सेम पण तुलनेत कमी धोकादायक प्रकार ईंजिनीअरींगच्याच आणखी एका वर्षाला केला होता. कमी धोकादायक यासाठी की केबिनचा दरवाजा उघडाच होता. पण यावेळचा हेतू वेगळा आणि शुद्ध चोरीचा होता. त्या सरांच्या केबिनमध्ये कॉलेजच्या लायब्ररीची कित्येक पुस्तके रचून ठेवली होती. आमचा बस्स त्यावरच डोळा होता. कसलेही विघ्न न येता मिशन सक्सेसफुल झाले आणि तब्बल दोनेक हजारांना ती पुस्तके सेकंडहॅंड बाजारात विकली गेली.

जाता जाता एक शेवटचा किस्सा ज्यात थेट पैश्यांचीच चोरी होती. पीसीओचे लाल पिवळे डब्बे उघडायची मास्टर की हाती लागली होती. सगळेच नाही पण ३०-४० टक्के डब्बे तरी उघडायचे. ते शोधत आम्ही कुठे कुठे फिरायचो. अर्थात आजूबाजुला रहदारी आणि वर्दळ नाहीये हे देखील बघणे गरजेचे होते. कारण रिस्की प्रकार होता. एक लॉक उघडला की आत आणखी एक लॉक उघडायचा असायचा. पण एकदा खुलला की एकेक रुपयांचे सरासरी पाच-सहाशे कॉईन खणखण करत आमच्या खिशात पडायचे.
थोड्याच दिवसांत अक्कल आली. यात पकडलो गेलो तर कदाचित बाराच्या भावात जाऊ. आपण चांगल्या घरची मुले आहोत आणि असल्या लफड्यात आपली करीअर डावावर लावण्यात अर्थ नाही. तर या नादातूनही बाहेर पडलो.

एकंदरीत आजवरच्या सर्वच प्रकरणात, कुठे पकडलो गेलोय, कुठे मार पडलाय, कुठे मानहानी झालीय असे कधीच घडले नाही हे एक कौतुकास्पद!
त्यामुळे कधी कधी वाटते की मी ईंजिनीअर झालो नसतो तरी एखादा छोटामोठा चोर बनत आपले आणि आपल्या बायकापोरांचे पोट भरलेच असते.

तर हे एक माझे झाले, आता तुम्हाला कोणाला ईथे लिहून हलके व्हायचे असेल तर व्हा बिनधास्त.
कसली भिती वाटत असल्यास सर्वांसाठी एक कॉमन डिस्क्लेमर टाकतो.
डिस्क्लेमर - या लेखात वा प्रतिसादांत, आलेले वा येणारे, बहुतांश वा सर्वच, किस्से वा कथा, काल्पनिक वा आतिशयोक्तीपुर्ण, असण्याची दाट शक्यता असून एखादी घटना खरी आहे आहे याचा सबळ पुरावा असेल तरच आक्षेप उचला. अन्यथा जय हिंद, जय महाराष्ट्र!
तुमचाच ऋन्मेऽऽष

अवांतर तळटीप - धागा काढताना शब्दखुणात चोरी टाकलेले पण ते लेखनचोरी असे दिसू लागले, जी मी कधी केली नाही. म्हणून शब्दखुण काढून टाकली.

..................................................................................................

वैधानिक इशारा - चोरी करणे वाईट आहे. कायद्याने गुन्हा आहे. पकडले गेल्यास शिक्षा होऊ शकते!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"त्या ह्याला आमच्या त्या ह्यांनी बघा लहान वयात बलात्कार आणि खून करून बालसुधारगृहातून सुटताना १०००० रु आणि एक शिलाई मशीन देऊ केलंय !"
तो ज्युवेनाईल ह....खोर तुरुंगातून सुटेल आणी कुठेतरी पाणीपुरीची गाडी टाकेल. नाव बदलेल. आणि आरामात आयुष्य जगेल. आणि उतारवायत त्याला कोणीतरी पत्रकार शोधून काढेल आणि मग तो स्वतःच्या रिग्रेटस चं रडगाणं गाऊन दाखवेल. त्याने ज्या स्वरुपाचा गुन्हा केलाय तो कितीही लहान वयात केला असला तरी त्याला क्षमा नाही.

साती,
मागे डिस्कव्हरीवर वाचलेले, हुमायुन टेंडेंसी नुसार आपण नाकातल्या मेकडाला बोटावर घेतल्यानंतर त्याला चार प्रकारे ट्रीट करतो.
1. उठून हात धुतो
2. बसल्याजागीच कुठेतरी पुसतो
3. बोटांच्या चिमटीत फिरवून बॉल बनवून टिचकी मारत भिरकावून देतो
4. खातो, आणि जास्त खारट लागल्यास थुकतो

सस्मित,
आपण जे म्हणत आहात तो वाईट गुण आहे की नाही माहीत नाही पण खरेच एकेकाळी मी शब्दांचा वापर शस्त्राप्रमाणे करायचो... हा माझ्याही नकळत माझा वाईट गुण बनत गेला.. तो या लेखांच्या लिस्टीत टाकता येईल.. क्रमांक 3 सुचवल्या बद्दल धन्यवाद Happy

>>>>> हुमायुन टेंडेंसी नुसार <<<<<
ओके, मग आता जहांगीर अकबर औरंगजेब इत्यादींच्या टेंडेंसीही सांगा..... की हे मुघल बादशाह त्यांच्या नाकातल्या मेकडाचे काय करायचे. Proud

आत्तापर्यंत केवळ करमणूक म्हणून ह्या मुलाचे बीबी वाचलेत अन कडक प्रतिक्रिया देण्याचे टाळले.. उगीच कशाला चिखलात पाय घाला, कारण हा मुलगा पुढे पुढे बोल णारच.. मुखमस्ती, इति वक्तव्यम.. पण रियली धिस इज डिसगस्टींग. .. Sad

त्याला "ह्युमन टेंडन्सी" म्हणायचं असेल, हुमायून नाही.
रच्याकाने https://en.wikipedia.org/wiki/Nose-picking इथली पहिलीच ओळख वाचून बघा

Nose-picking is the act of extracting nasal mucus with one's finger (rhinotillexis) and may include the succeeding action of ingesting the mucus picked from the nose (mucophagy).
some scientists argue that mucophagy provides benefits for the human body

लेख अजिबातच नाही आवडला. खरं तर प्रतिक्रिया सुद्धा नव्हतो देणार. पण काही सन्माननीय (उपरोधाने नाही) आय-डी प्रतिक्रिया देताहेत हे पाहून रहावलं नाही.

ईंटरनेट च्या आभासी जगात प्रामाणिकपणा, निर्भीडपणा, समजूतदारपणा, विचाराचा मोठेपणा दाखवणं फार सोपं असतं आणी त्याच पळवाटेचा उपयोग करून, ईगो गोंजारण्याचा प्रयत्न सोडून ह्या लेखात काहीच नाही. (अर्थात, ही माझी प्रतिक्रिया तरी वेगळं काय आहे!)

ऋन्म्या, तुला लेका खरतर एखाद्या सायकिएट्रीस्ट ला (म्हणजे मानसोपचार तज्ञ) भेटायची गरज आहे. चोर्‍या काय, नाकातली मेकडं काय. हा लेख (कि कन्फेशन??) वाचल्यावर तू अट्टल चोर वाटायला लागला आहेस!

बर्याचदा पोलीस चोर पकडल्यावर ती मुले चांगल्या श्रीमंताघरची असल्याचे निष्पन्न होते आणि थ्रिल पोटी त्यानी त्या चोर्‍या केलेल्या असतात . आपल्याला त्याचे आश्चर्यही वाटते. आता हे कसे घडत असावे याचा उलगडा व्हायला हरकत नाही...

Runmesh sagle tumchya var tutun padle ki ho .....ata tari uth sut ase vatrat dhaage kadu naye evda bodh ghyach...ek pramanik n friendly salla

राहुल 123..,फ्लर्टींग?? ही वाईट सवय असते?? मी आजवर कला समजत होतो.. प्लीज कन्फर्म करा.. खरेच तसे असेल तर फ्लर्टींगलाही घेतो लेखमालेत..

ईंटरनेट च्या आभासी जगात प्रामाणिकपणा, निर्भीडपणा, समजूतदारपणा, विचाराचा मोठेपणा दाखवणं फार सोपं असतं 
>>>>>
फेरफटका, सहमत.
हे शंभर टक्के खरे आहे म्हणूनच मी यात कोणताही प्रामाणिकपणा शोधत नाहीये.
प्रत्यक्ष आयुष्यात हे आपण उघड उघड सर्वांनाच नाही सांगू शकत हे मलाही अनुभवाने ठाऊक आहे
.
तरी मी एक प्रामाणिकपणा मात्र दाखवलाय. आयुष्यात जे काही गैर म्हणावे असे केलेय ते सारे गर्लफ्रेंडला लग्नाआधीच सांगून झालेय. पण आता माझ्या दुर्गुणांसमोर तिला गुणांचे पारडे जड वाटले म्हणा किंवा तिचे माझ्यावरचे प्रेम म्हणा, तिने मला सोडले नाही. बाकी यालाही तुम्ही माझे सुदैव किंवा दुर्दैव काहीही म्हणू शकता Happy

<< वैधानिक इशारा - चोरी करणे वाईट आहे. कायद्याने गुन्हा आहे. पकडले गेल्यास शिक्षा होऊ शकते! >>
---- सम्पुर्ण बाफ वर मला हे वाक्य मला खुपआवडले.

थोडे विषयान्तर करतो, उदाहरणे अनेक देता येतिल...
(अ) २००० मधे मी आयआयटी मधे लॅबमधुन घरी येत होतो... रस्त्यात एक पिशवी, पर्स पडलेली दिसली, त्या वेळी पर्स उचलायला हवी अथवा नको म्हणुन थोडा विचार केला. विचार करायचे कारण अनोळखी (रेडिओ, इलेक्ट्रॉनिक्स खेळणे) वस्तू सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास त्याला हात लावू नका असे मनावर बिम्बवले होते.
मी पर्सचे निरीक्षण केले... आणि सुरक्षा रक्षकान्च्या हवाली केले. आत काय होते मला माहित नाही.
दुसर्‍या दिवशी सिक्युरिटी ऑफिसरने त्यात काही हजारान्ची कॅश होती असे सान्गितले.

(दुसर्‍याचे) वस्तू, पैसा या मोहा पासुन चार हात लाम्ब रहावे असे सन्सकार आईने घडवले.

(ब) एका महत्वाच्या परिक्षेसाठीचा अख्खा पेपर माझ्या 'वर्ग मित्राकडे' होता... त्याला प्रश्न नेहेमीच अगोदर कळायचे असा अस्पष्टसा सन्शय वर्तुळात होता... पुर्ण खात्री करुन घेतली. त्याला माहिती असलेले सर्व प्रश्न कागदावर लिहीले (बातमी कशी काढली असेल ? परिक्षेच्या १ दिवस अगोदर तो प्रत्येकाला केवाळ १ च प्रश्न विचारायचा.... मग मी त्याने १५ मित्रान्ना वेग-वेगळ्या वेळी कोण- कोणते प्रश्न विचारले ह्याचे टिपण केले). योग्य व्यक्तीला परिक्षेच्या काही तास अगोदर दिले. व्यक्तीला प्रश्न बघुन आश्चर्य वाटले... व्यक्ती अतिशय कडक होती... फार कमी वेळात परिक्षा पेपर बदलले.... चौकशी झाली... आणि लिकेज थाम्बले.

कुणाचा तरी आर्थिक स्त्रोत बन्द झाला होता. हे प्रकरण मोठे होते... माझ्या जिवावर (हात-पाय तोडणे म्हणतात) बेतायचे बाकी होते. पुणे स्टेशनवर शोधत आले होते, मग मी प्रवासाची (रेल्वे गाडी) दिशाच बदलली.

ह्या प्रामाणिक पणा मुळे मला समाधान आणि आनन्द मिळाला... मिळतो... ज्याचे मोल पैशात करता येत नाही.

फ्लर्टींग?? ही वाईट सवय असते?? मी आजवर कला समजत होतो.. प्लीज कन्फर्म करा.. खरेच तसे असेल तर फ्लर्टींगलाही घेतो लेखमालेत..>>

क्या बात!
Wink

उदय वेरी गूड Happy
आपला किस्सा ऐकून मलाही एक आठवला.
आमच्या कॉलेजजवळील एका पानटपरीवर आम्ही दोन मित्र उभे होतो. मी सिगारेट पित नाही त्यामुळे हे पुढच्या लेखात येणार नाही. तर आम्हाला तिथे कोणाचेतरी पडलेले पाकीट सापडले. आत चेक केले तर साधारण 1200 रुपये आणि सोबत एका मुलाचे आयडी कार्ड सापडले. आमच्याच जवळच्या कॉलेजचा आणि हॉस्टेलला राहणारा मुलगा होता. माझ्याबरोबर जो माझा मित्र होता तो चौर्यकलेत माझाही बाप होता. पण तरीही आम्ही दोघांनी एकमताने आणि एकदमच विचार केला की त्याचे पाकीट परत करूया. ते आम्ही त्याच्या हॉस्टेलला जमा केले आणि त्याचे धन्यवाद घेण्यास न थांबता तिथून निघालो.
खरे तर प्रामाणिकपणा आणि आमचा फारसा काही संबंध नव्हता त्या वयात. तरीही आम्ही असे केले. कदाचित कॉलेज स्टुडंट बाबत असलेले आमचे उसूल यामागे असावेत. किंवा आयते पडलेले मिळालेल्या पैश्यात ते थ्रिल आम्हाला गवसले नसावे.. आणि हा आता एक आठवला पण असे बरेच किस्से निघतील.. खरंच मानवी मनाचा उलगडा होणे अवघडच.. इथे आपल्या मनाचे गणितही आपल्याला समजत नाही..

घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात् रासभारोहणम्। येन केन प्रकारेण प्रसिद्धः कुऋ भवेत्। >>>

काय अर्थ असावा बुवा ? हे संस्कृत असावं अशा संशयाने थोडा प्रयत्न करतो.

भिंतीतल्या घटांना पटदिशी छिद्र पाडून आतल्या (धा/सोन्याच/सो) राशीवर उभे राहून, ऋ येन केन प्रकारे कुप्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतो.

गूढार्थ : भिंत म्हणजे माबोभिंत. अर्थात ऋ ची भिंत. या भिंतीवर वाचकरूपी माठ आपल्या विवेकास छिद्रे पाडून प्रतिक्रियांची रास लावतात. या प्रतिक्रियांमुळे येन केन प्रकारेण प्रसिद्धी मिळवण्याच्या आपल्या हेतूमधे बाळ ऋ यशस्वी होतो असे आपणास श्लोककर्तीने समजावून सांगितलेले आहे.

पटं = पटदिशी Proud
भारी ल्यांग्वेज आहे संस्कृत

प्रसिद्धः कुऋ >> ऋ येन केन प्रकारे कुप्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतो.
कु हे ऋ साठी वापरलेय हो, प्रसिद्धीसाठी नाही Happy

पण श्लोकाचा अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद.
संस्कृत मी १०० मार्काला घेतलेले, त्यात ९८ गुण पडलेले, तरीही त्याची बोंब आहे. यावरून आपली शिक्षणपद्धती किती रट्टेबाज आहे हे समजून येते.

एक नक्की झालं,
तुम्ही ऋ ला प्रेमु शकता तुम्ही ऋला दुस्वासु शकता,
पण तुम्ही ऋला इग्नोरु शकत नाही.

ऋबा, पुढचा विषय काय आहे बरे ?

घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात् रासभारोहणम्। येन केन प्रकारेण प्रसिद्धः कुऋ भवेत्।
<<
फुटका घडा (घेऊन) फाटकी वस्त्रे (लेवून) केली गाढवावर सवारी.
घट : घडा. मातीचे भांडे.
पट : कपडे.
रासभ : गाढव.
येनकेन प्रकारे प्रसिद्धि मिळण्याशी कारण.

(प्रसिद्धः पुरुषो भवेत्। अस आहे मुळात.
रासभारोहणाऐवजी, कुर्याद्वा गर्दभध्वनिम् । हा पाठभेद.)

<<संस्कृत मी १०० मार्काला घेतलेले, त्यात ९८ गुण पडलेले, तरीही त्याची बोंब आहे.>>
----- ९८ मार्क कसे मिळाले तो स्वातन्त्र बाफ चा विषय आहे... Happy

Pages