माझ्या वाईट सवयी १ - चोरी

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2015 - 03:41

आयुष्यातील पहिली चोरी कधी केली आठवत नाही. आयुष्यातील शेवटचा वाह्यातपणा कधी केला आठवत नाही. पण आठवेल तसे सांगतो. काही एकट्याचे पराक्रम आहेत, तर बरेचसे मित्रांच्या टोळक्याने केलेले..

किशोर वयात आपले फंडे वेगळेच असतात. चोरी करणे हे गैरकृत्य कमी आणि धाडसाचे काम जास्त वाटते. अंगात किडा असणे आणि डेअरींग असणे हे समानार्थी शब्द समजले जातात. तेव्हाचे कधीचेतरी हे किस्से. आज सहज व्हॉटसपग्रूपवर विषय निघाला म्हणून उगाळले गेले, म्हटले लिहून संकलित करूया..

सुरुवात बालपणापासून करूया. वय वर्ष साधारण आठ-दहा असावे.. त्या वयातही आम्ही एवढे वस्ताद होतो की दुकानदाराची पाठ वळताच बघता बघता बरणीतले चॉकलेट काढायचो. आमच्या बिल्डींगमधले माझे दोन जवळचे मित्र या कलेतील माझे पहिले गुरू होते म्हणू शकतो. त्यांच्याच सोबतीने दोन तीन वेळा मी स्वत: देखील ही हस्तकला आजमावली होती.
पुढे मग मोठा ग्रूप बनला. अर्थात, सारेच या कलेत माहीर नव्हते, पण मोहीम फत्ते नेण्यास गरज सर्वांचीच होती. गर्दी करून जायचो आणि दुकानातून ढोकळा, गुलाबजाम, फरसाण, पुरणपोळ्या वगैरे नाना पंचपक्वांनांची रेडीमेड पाकिटे ढापायचो. त्यात एखादेच काय ते विकत घेतलेले असायचे. ते देखील एकेक रुपया कॉंट्रीब्यूशन काढून. तिथून मग जवळपासचे एखादे गार्डन वा सायकलीला टांग मारून थेट राणीबाग गाठायचो आणि पार्टीऽऽऽऽऽ..!!

राणीबागेत विदाऊट तिकीट, कंपांऊड ओलांडत शिरायचा मार्ग माहीत होता हे इथे सांगायला हरकत नाही.

पुढे मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये याची फ्रिक्वेन्सी वाढली, दुकानदारांच्या लक्षात येऊ लागले, आमच्यावर लक्ष ठेवले जाऊ लागले, आणि ही धमाल संपली!

हाच ग्रूप गॅंगचा फंडा मग फॅशन स्ट्रीटला वापरू लागलो. कपडे, बेल्ट, पाकिटे, अगदी पर्स आणि लेडीज सॅंडलही चोरलेत. अशीच गर्दी करून जायचो आणि पिशवीत टाकायचो. १००-१५० रुपयाचे काहीतरी घ्यायचो आणि किमान हजार रुपयांचा माल फुकटात घेऊन जायचो.

आजही हे घरी समजले तर खूप शिव्या पडतील. तेव्हा समजले असते तर तुडवलो गेलो असतो. घरून तर घरून, पण त्या आधी त्या फॅशन स्ट्रीटच्या विक्रेत्यांकडूनही जबरी पडली असती. त्यामुळे दोन-तीन सीजन गाजवले, आणि हा धोका लक्षात येताच थांबलो.

बाकी गणेशोत्सव-नवरात्रीत दुपारच्या वा रात्रीच्या शांत अन निश्चल वेळी, सार्वजनिक मंडळांच्या पेटीतील पैसे काड्या करत काढणे आणि त्याला देवाचा प्रसाद म्हणून स्विकारणे असे सीजनल प्रकार चालू होतेच.

तसेच आझाद मैदानावर क्रिकेट खेळताना एक नजर ईतरांच्या बॅट बॉलवर असायची. लागली हाताला की उचलली. मग त्यानंतर ती आमच्या गल्ली क्रिकेटची शान वाढवायची, किंवा शेजारच्या गल्लीत विकली जायची.

चोरीचा माल विकण्यावरून आठवले, आमच्या बिल्डींग शेजारी एक कंपनी होती. कसली ते माहीत नव्हते, पण लोखंडाचा बराचसा कच्चा माल एके ठिकाणी पडलेला असायचा. आम्ही क्रिकेटचा बॉल तिथे मारून तो काढायला चढायचो, आणि जोडीला जमेल तितके लोखंड सोबत घेत उतरायचो. दोन चार फेर्‍यात पुरेसे जमले की ते दूरगावच्या भंगारवाल्याचा विकायचो. अगदीच पावभाजी नाही तर किमान वडापावची पार्टी तरी सुटायची. एखाद्या अश्या सेलिब्रेशन डे ला आपण क्रिकेट खेळायला नसलो, आणि पार्टीला मुकलो, तर जीव खूप हळहळायचा. कारण फुकट खाण्यातील मजा काही औरच. आणि हा तुलनेत आजवरचा सर्वात कमी रिस्की प्रकार होता.

फुकट खाण्यावरून आठवले, लग्नात घुसून फुकट खाणे ही देखील एक प्रकारची चोरीच!
पण हे धंदे ईंजिनीअरींगला. स्टडी नाईटच्या नावाखाली कॉलेज आणि हॉस्टेललाच पडीक असायचो. खाण्यापिण्याची सोय जर जेमतेम मिळणार्‍या पॉकेटमनीमधून करू शकलो नसतो, आणि त्यासाठी घरी एक्स्ट्रा पैसे मागितले असते, तर या स्टडी नाईटस घरच्यांनी बंद केल्या असत्या. मग काय, शिक्षणासाठी काय पण! पापी पेटका सवाल म्हणत जराही लाज शरम न बाळगता नीटनेटके कपडे घालून कोणाच्याही लग्नात घुसू लागलो. आमचे कॉलेज जिथे होते तो मुंबईतील मध्यवर्ती विभाग असल्याने विवाह कार्यालयांना कमी नव्हती. पोटभर खायचो आणि वधूवरांना भरभरून आशिर्वाद देत बाहेर पडायचो.

पण रोज रोज दिवाळी नसते. हर दिन संडे नही होता. तसेच लग्नेही काही रोज रोज नसायची. असली तरी त्याच त्याच हॉलमध्ये जाऊ शकत नव्हतो.. पण जो पोट देतो, तोच अन्नही देतो. जो भूक देतो, तोच ती मिटवायचे मार्गही दाखवतो.
मेसमधून अंडी चोरणे आणि ती हॉस्टेलवर मित्रांच्या रूमवर आणून उकडणे हा एक साधा सोपा मार्ग. रात्री झोपायच्या आधी कूलरचे पाणी भरायला म्हणून आम्ही मोठा थर्मास घेऊन मेसमध्ये जायचो. तो अर्धा पाण्याने भरत त्यात अलगद अंडी सोडायचो. मेसची बत्ती गुल झाली असल्याने तिथे जवळच झोपलेल्या कर्मचार्‍यांना जराही पत्ता लागायचा नाही. मग ती अंडी रूमवर आणायचो, आंघोळीची बादली पाण्याने भरत त्यात पाणी तापवायचा हिटर सोडायचो, आणि त्यात ती अंडी उकडून घ्यायचो. मीठ-मसाला लावून, उपलब्ध असल्यास बारीक चिरलेल्या कांद्यासह, तीन-चार अंडी खाल्ली की एका रात्रीची सोय झाली.

पुढे हा प्रकार आजूबाजूच्या पोरांमध्येही प्रचलित झाला. मेसच्या अंड्यांची संख्या लक्षणीयरीत्या घटू लागली. त्यातच काही मुर्खांना अंड्याच्या कवचाची योग्य विल्हेवाट लावणे जमले नाही आणि एक दिवस हा प्रकारही बंद झाला.
रात्रीची खायची सोय बंद झाली तसे पहाटेच पोटातील कावळे किलबिलाट करू लागले. मग काय, पुन्हा अन्नाच्या शोधात भटकंती. जवळच सापडले. एक छानसे दूध सेंटर. दूधाच्या पिशव्या आमची वाट बघत पडल्या असायच्या. या आणि उचला आम्हाला. आम्ही दोनच उचलायचो. रूमवर आणून मस्त तापवून टायगर बिस्किटसह आस्वाद घ्यायचो. या आधी घरी कधी दूध प्यायलेलो ते आठवत नाही, पण आता फुकट ते पौष्टिक म्हणत ते ही गोड मानून घ्यायचो.

आता खाण्यापिण्याचा विषय चालू आहे तर शाळेच्याही काही आठवणी आहेत.
खरे तर झाडावरची फळे पाडण्याची आणि चोरण्याची मजा आमच्या आधीच्या पिढीने किंवा ज्यांचे बालपण गावात गेले त्यांनी कदाचित जास्त घेतली असावी. पण आमच्या शाळेच्या परीसरात आवळे आणि जाम यांची चिक्कार झाडे असल्याने ते सुख आमच्याही नशिबी होते. आता ती सारी झाडे खाजगी होती, पण कंपाऊंडवरून आत उडी घ्यायची डेअरींग अंगात उपजतच होती. त्या बंगल्यांच्या कंपाऊंडच्या आधीही शाळेचे कंपाऊंड ओलांडावे लागायचे. मधल्या सुट्टीत असे शाळेच्या बाहेर जाणारे, ते देखील चोरीसाठी, मी आणि माझा एक मित्र, असे आम्ही दोघेच. जमा करून आणलेला माल मात्र वर्गात सर्वांना वाटायचो. पण अगदीच फुकट नाही, तर त्याबदल्यात त्यांच्याकडून ईतर काही मिळवायचो.

बस्स मग एके दिवशी कधी ना कधी जे घडणारच होते ते घडले. मित्राच्या दगडाने खिडकीची काच फुटली. शाळेतील एकूण एक वर्गात नोटीस फिरली. ज्या कोणी अज्ञात मुलांनी हा खोडकरपणा केला होता त्यांना तंबी देण्यात आली. आमच्या वर्गात नोटीस वाचली जात असताना काही मुलांनी आमच्याकडे बघत नेत्रपल्लवी केली. मात्र आमची नावे अज्ञातातच राहीली. आणि अज्ञानात सुख असते असे का म्हणतात ते आम्हाला समजले.

पण त्यानंतरही आम्हा दोघांची डेअरींग बघा. साधारण महिन्या दोन महिन्यांनी आम्ही एका कंपांऊंडमधील फणस तोडला. हाताने तोडता येईल एवढ्या उंचीवरच लागलेला. पण मोठ्या कष्टानेच तोडला. सकाळी तोडला. दिवसभर एका सिक्रेट जागी लपवून ठेवला. आणि संध्याकाळी घरी घेऊन निघालो. वाटेत काही जाणकारांनी खबर दिली की हा कच्चाच आहे आणि फक्त भाजी बनवायला कामाला येईल. तर आईला नेऊन द्या. अर्थात हि शक्यता बाद होती. आमच्या आयांनी त्या फणसाच्या जागी आम्हालाच चिरला असता. मग एरीयातीलच एका भाजीवाल्याला तो विकला.

तर ही चोरीची कला काही सण ही साजरे करायला कामी यायची. एक म्हणजे रंगपंचमी. कुठल्याश्या फॅक्टरीमधून आम्ही रंगाच्या पावडरीचे पॅकेटस चोरायचो. एकदम पक्का कलर. कलर गया तो पैसा वापिस. फॅक्टरीत तो नेमका कश्याला वापरायचे काही कल्पना नाही, कारण ती फॅक्टरी कसली होती हेच मुळात माहीत नव्हते. पुढे कधीतरी थोरामोठ्यांकडून समजले की त्या रंगात घातक केमिकल्स असण्याची शक्यता होती. तसे ही चोरीही बंद केली.

आणखी एक सण म्हणजे ३१ डिसेंबर, वर्षाची शेवटची रात्र. मोठी माणसे नवीन वर्षाचे स्वागत दारू पिऊन करायची. आम्ही बच्चे कंपनी नाचून, फटाके फोडून आणि जिंगलबॅंग नामक बुजगावणे जाळून करायचो. सांताक्लोजला आम्ही जिंगलबॅंग बोलायचो. अजब वोकॅबलरी. तर हे माणसाच्या आकाराचे बाहुले. जुन्या शर्टपॅंटमध्ये गवत कोंबून बनवले जायचे. वर डोक्याच्या जागी गवतानेच भरलेली दूधाची पिशवी आणि त्यावर मुखवटा. यात काही फटाकेही भरले जायचे, जेणेकरून जाळताना ते अधूनमधून फुटतील आणि आनंद द्विगुणित करतील.
तर इथे सांगायचा मुद्दा हा की प्रत्येक गल्लीबोळात असे कित्येक बुढ्ढे बनवले जायचे. अगदी २०-२२ डिसेंबर पासून बनवून कुठेतरी टांगले जायचे. आम्ही ३०-३१ तारखेला दुपारच्या वेळेस बाहेर पडायचो आणि जिथे जिथे हे बेवारसपणे पडलेले दिसायचे तिथून सरळ चोरून आणायचो. एखाद दिवस लपवून ठेवायचो. आणि थेट ३१ च्या बारा वाजताच जाळायला बाहेर काढायचो.

हे किस्से त्यामानाने हलकेफुलकेच पण चोरीचे काही सिरीअस किस्से आठवायचे म्हटल्यास एक फसलेली पेपर चोरी.
ईंजिनीअरींग ड्रॉईंग, आणि त्यातील भुमिती. मला जमायचे पण कैक मित्रांचे धाबे दणाणले होते. त्यांच्या डोक्यावर माझे डोके आपटून झाले तरी त्यात काही शिरत नाही हे लक्षात आल्यावर आम्ही एक सिरीअसली डेंजरस प्लान बनवला. पेपरचोरीचा. कोणते सर पेपर काढणार आहेत हे माहीत होते. जर अमुक तमुक दिवशी त्यांच्या केबिनमध्ये शोधाशोध केली तर कच्चापक्का स्वरुपातला पेपर हाती लागू शकेल असे कॅलक्युलेशन मांडले. ठरलेल्या दिवशी लंचब्रेकला सात आठ जणांना ठराविक अंतराने इशारा देण्यास उभे करत आम्ही दोघे जण सरांच्या केबिनमध्ये शिरलो. अर्थात केबिन कुलूप लावून बंद होते, पण वरतून ओपन होते. म्हणजे कोणी अचानक आल्यास आम्हाला चपळाईने निघणे शक्य नव्हते. आणि हाच धोका होता. तरी तो धोका उचलत आम्ही जवळपास दहा ते बारा मिनिटे शोधाशोध केली पण काही हाती लागले नाही. अन्यथा आमच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला असता.

असाच एक सेम टू सेम पण तुलनेत कमी धोकादायक प्रकार ईंजिनीअरींगच्याच आणखी एका वर्षाला केला होता. कमी धोकादायक यासाठी की केबिनचा दरवाजा उघडाच होता. पण यावेळचा हेतू वेगळा आणि शुद्ध चोरीचा होता. त्या सरांच्या केबिनमध्ये कॉलेजच्या लायब्ररीची कित्येक पुस्तके रचून ठेवली होती. आमचा बस्स त्यावरच डोळा होता. कसलेही विघ्न न येता मिशन सक्सेसफुल झाले आणि तब्बल दोनेक हजारांना ती पुस्तके सेकंडहॅंड बाजारात विकली गेली.

जाता जाता एक शेवटचा किस्सा ज्यात थेट पैश्यांचीच चोरी होती. पीसीओचे लाल पिवळे डब्बे उघडायची मास्टर की हाती लागली होती. सगळेच नाही पण ३०-४० टक्के डब्बे तरी उघडायचे. ते शोधत आम्ही कुठे कुठे फिरायचो. अर्थात आजूबाजुला रहदारी आणि वर्दळ नाहीये हे देखील बघणे गरजेचे होते. कारण रिस्की प्रकार होता. एक लॉक उघडला की आत आणखी एक लॉक उघडायचा असायचा. पण एकदा खुलला की एकेक रुपयांचे सरासरी पाच-सहाशे कॉईन खणखण करत आमच्या खिशात पडायचे.
थोड्याच दिवसांत अक्कल आली. यात पकडलो गेलो तर कदाचित बाराच्या भावात जाऊ. आपण चांगल्या घरची मुले आहोत आणि असल्या लफड्यात आपली करीअर डावावर लावण्यात अर्थ नाही. तर या नादातूनही बाहेर पडलो.

एकंदरीत आजवरच्या सर्वच प्रकरणात, कुठे पकडलो गेलोय, कुठे मार पडलाय, कुठे मानहानी झालीय असे कधीच घडले नाही हे एक कौतुकास्पद!
त्यामुळे कधी कधी वाटते की मी ईंजिनीअर झालो नसतो तरी एखादा छोटामोठा चोर बनत आपले आणि आपल्या बायकापोरांचे पोट भरलेच असते.

तर हे एक माझे झाले, आता तुम्हाला कोणाला ईथे लिहून हलके व्हायचे असेल तर व्हा बिनधास्त.
कसली भिती वाटत असल्यास सर्वांसाठी एक कॉमन डिस्क्लेमर टाकतो.
डिस्क्लेमर - या लेखात वा प्रतिसादांत, आलेले वा येणारे, बहुतांश वा सर्वच, किस्से वा कथा, काल्पनिक वा आतिशयोक्तीपुर्ण, असण्याची दाट शक्यता असून एखादी घटना खरी आहे आहे याचा सबळ पुरावा असेल तरच आक्षेप उचला. अन्यथा जय हिंद, जय महाराष्ट्र!
तुमचाच ऋन्मेऽऽष

अवांतर तळटीप - धागा काढताना शब्दखुणात चोरी टाकलेले पण ते लेखनचोरी असे दिसू लागले, जी मी कधी केली नाही. म्हणून शब्दखुण काढून टाकली.

..................................................................................................

वैधानिक इशारा - चोरी करणे वाईट आहे. कायद्याने गुन्हा आहे. पकडले गेल्यास शिक्षा होऊ शकते!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Kleptomania is the inability to refrain from the urge to steal items and is done for reasons other than personal use or financial gain. First described in 1816, kleptomania is classified in psychiatry as an impulse control disorder.
>>>>>
नाही असे काही नव्हते.
एक या दिवाळीचाच किस्सा. मॉलमधील एका शॉपमधून खरेदी करून बाहेर पडताना त्यांचे टुंई टुंई वाजू लागले. म्हणजे माझ्या पिशवीत ढापलेला माल होता हे दर्शवणारा आणि माझी तंतरली. हे काय झाले, माझ्या पिशवीत हे काय आणि कसे आले, कोणी टाकले मी मीच चुकून दुसर्‍या एका कपड्याबरोबर काही टाकले, आता हे लोकं माझे काय करतील, चारचौंघासमोर माझी शोभा होईल.. एक ना लाख शंभर विचार मनात आलेले.
तर बहुतेक Kleptomania असे काही माझे नसावे.

तसेच उत्तरोत्तर थ्रिल वाढणे असेही काही नव्हते. कारण ठरवून काही चोर्‍या झाल्या नाहीत. किंबहुना त्या दिवशी व्हॉटसपग्रूपवर गप्पांच्या ओघात प्रत्येक जण आपापले एखाद दुसरे किस्से सांगत होता तसे मी माझे किस्से धडाधड सांगू लागलो. बघता बघता एवढे झाले की सिरीअसली मी आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर असले काही आणि एवढे काही केलेय हे माझे मलाच झाले.
जर माझे मलाच होऊ शकते तर तुम्हालाही होऊ शकते, त्यामुळे इथे येणारे प्रतिसाद माझ्यासाठी अनपेक्षित नाहीत.

>>>> इथे अभिमानाने लिहून मिरवण्यासारखं ह्यात मुळातच काही नाही हा मुद्दा आहे. <<<<< अगदी अगदी.

इन फॅक्ट, आपण कुठे काही खाजगीत शेण खाल्ले, तर ते "जाहिर करुन सांगू नये" अन्यथा त्या शेण खाण्यासही "प्रतिष्ठा" प्राप्त होऊ शकते, हे असे चालतेच, केले तरी चालते असा अप्रत्यक्ष प्रचार/प्रसार होऊ शकतो, जे होणे अनिष्ट, इतकी तरी सद्सद्विवेकबुद्धी "पांढरपेशा म्हणवणार्‍या मध्यमवर्गीयाकडे" असायलाच हवी. वरील वर्णने जर एखाद्या गलिच्छ झोपडपट्टीत रहाणार्‍या मुलाने वा एखाद्या गर्भश्रीमंताच्या मुलाने केले असते तर मला त्यात विशेष वाटले नसते. पण "समाजाचा कणा" असणार्‍या पांढरपेश्या व्यक्तिने हे मांडावे याचे नवल व सखेद आश्चर्य वाटले.

नशिब, रोख तसाच असला तरीही लेखकु अजुनतरी या लिखाणास "माझे सत्याचे प्रयोग" असे महत्तम नाव देत नाहीये... Wink Proud काय दीडम्या? बरोबर ना? नै, तसे असेल तर यास "महात्मा ऋन्मेष" असे संबोधायला कुणाचिच हरकत नसावी. नै का? Biggrin

वरील पोस्ट लिहीताना, मी एक बाब ज्योतिषशास्त्रीय ज्ञानाचे दृष्टीने व एकंदरीत मनुष्य/मानवी स्वभावाचे आकलन करता गृहित धरतो आहे की या जगात अशी एकही व्यक्ति सापडु शकत नाही (माझ्यासहित) जिने आयुष्यात एकदाही चोरी केली नाहि वा खोटे बोलली नाही. अन तरीही, नस्त्या भिक्कार गोष्टींचे सार्वजनिक प्रकटीकरण करीत "उदात्तीकरण" करण्याचि घाणेरडी खोड गेल्या पंचवीस तीस वर्षात लागुन, ब्रिगेडी/वंचित(?) वगैरे घटकांच्या जगण्यातील "शिव्या शापादिक भाषेचे, गुन्हेगारी जगण्याचे व व्यसनी जीवनाचे" आणि तत्सम वाईट सवयींचे चक्क समर्थन करीत "उदात्तीकरण" करण्याचि व एकंदरीत समाजव्यवस्थेला "कीड" लावण्याचे जे उपद्व्याप चालू आहेत, वरील लेख त्यातीलच एक भर वाटतो. हे माझे वैयक्तिक मत होय.

साती हो Proud
म्हटलं आता लिहितोय तर सर्वच लिहून टाकावे..
किमान तीन तरी लिहावे म्हणतो

लिंबूजी,
<<< वरील वर्णने जर एखाद्या गलिच्छ झोपडपट्टीत रहाणार्‍या मुलाने वा एखाद्या गर्भश्रीमंताच्या मुलाने केले असते तर मला त्यात विशेष वाटले नसते. पण "समाजाचा कणा" असणार्‍या पांढरपेश्या व्यक्तिने हे मांडावे याचे नवल व सखेद आश्चर्य वाटले. >>

ईंटरेस्टींग वाक्य टाकलेत.
संस्कृती सांभाळायचा ठेका पांढरपेश्या मध्यमवर्गीयांवर लादलात..
अर्थ काढायला चुकत असेल तर कर्रेक्ट करा !

>>>> ईंटरेस्टींग वाक्य टाकलेत. संस्कृती सांभाळायचा ठेका पांढरपेश्या मध्यमवर्गीयांवर लादलात.. अर्थ काढायला चुकत असेल तर कर्रेक्ट करा ! <<<<<
तुम्ही बर्‍याचशा बरोबर आहात. फक्त तो ठेका "मी मध्यमवर्गियांवर लादलेला नाहीये" उलट तो ठेका जो कोणता वर्ग उचलतो, त्यासच मध्यमवर्गीय म्हणतात. अन त्यामुळेच मध्यमवर्गिय आदर्श "लादुन घेणारे" झोपडपट्टीत वा क्वचित गर्भश्रीमंतातही दिसतात. (हे माझे मत)

लेखकाने जर "मला पश्चा:ताप होतोय म्हणून मी या चुकांची कबुली देतोय" असा पावित्रा घेतला असता तर "कदाचित" मी दुर्लक्ष केले असते व लेखाकास निश्चितच महात्मा संबोधले असते, पण लेखाचा एकंदरीत उद्देश "आम्ही तेव्हा कसे कसे पराक्रम करीत होतो" हे सांगण्याचाच वाटतोय. असो.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत... Wink

ऋन्मेष, टाक लिहून!
अनिल अवचट यांनी 'स्वतःविषयी' या पुस्तकात लिहिताना बालपणीच्या एकेक आठवणी लिहिल्यात त्या तर मायबोलीवर लिहायचं धाडसही कुणी नाही करू शकणार.
तरिही त्या माणसाबद्दल मनात अतीव आदर आणि प्रेम आहे.
सो, तू ही काही लिहिलंस तरी तुझ्याविषयीचे प्रेम आटणार नाही.
पण किमान एक वाक्यं, उपरोधिक असलं तरी चालेल असं असावं की ज्यामुळे पूर्वी केलं ते चुकीचं केलं किंवा व्हायला नको होतं हे दाखविणारं असावं अशी अपेक्षा आहे.

आने दो!

पण किमान एक वाक्यं, उपरोधिक असलं तरी चालेल असं असावं की ज्यामुळे पूर्वी केलं ते चुकीचं केलं किंवा व्हायला नको होतं हे दाखविणारं असावं अशी अपेक्षा आहे. >>>> +१

धन्यवाद, आपल्या प्रतिसादांनी हुरुप वाढवला. पुढचा लेख लिहिताना हे अमुक तमुक लिहिल्यावर कोणाच्या काय प्रतिक्रिया असतील असे विचार आता मनात डोकावणार नाहीत.

<<<पण किमान एक वाक्यं, उपरोधिक असलं तरी चालेल असं असावं की ज्यामुळे पूर्वी केलं ते चुकीचं केलं किंवा व्हायला नको होतं हे दाखविणारं असावं अशी अपेक्षा आहे.>> Happy किंवा जे घडले ते परिस्थितीजन्य होते असे दाखवणेही पुरेसे ठरावे.

सस्मित, डोण्ट वरी, आजवर मी असे काही केले नाही जे स्वताच्या नजरेत पडेल.

तसेही मी इथे लिहो किंवा न लिहो. जे मी केलेय किंवा जे जसा आहे ते सत्य तसेच राहणार आहे.

आजचा सुविचार - चांगले गुण दाखवावेत, वाईट गुण सांगावेत.

किंवा जे घडले ते परिस्थितीजन्य होते असे दाखवणेही पुरेसे ठरावे.>>

मला पुरेल!
Happy

>>>> किंवा जे घडले ते परिस्थितीजन्य होते असे दाखवणेही पुरेसे ठरावे <<<<
परिस्थितीजन्य म्हणताना, "नेमकी काय परिस्थिती होती" यावरच ते पुरेसे आहे वा नाही हे ठरेल.
उद्या तुम्ही म्हणाल, मला मोह पडला, भुक लागली म्हणुन अमक तमके चोरले, तद्वतच, मला मोह पडला, भुक लागली म्हणुनच अमकीतमकी...... जौद्या.... तर नुस्ते परिस्थितीजन्य होते असे दाखविणे पुरेसे ठरणार नाही....
असे ठरवले, तर यच्चयावत बलात्कारी/दरोडेखोर असे म्हणत सुटतील की "मी तेव्हा जे केले ते निव्वळ (शारिरीक/मानसिक) परिस्थितीजन्य होते, मला अति भुक लागली होती, मला अतिहाव सुटली होती, यात माझा काय दोष?"

आपल्या प्रतिसादांनी हुरुप वाढवला. >> Proud
तो कायम वाढिवच असतोय की. आम्ही वाढवला काय आणि नाही वाढवला काय, तुम्ही धाग्यांची माळ लावणारच की इथं.

अज्जिबात आवडले नाही हे! समजुन उमजुन गेलेली चोरी हा गुन्हाच. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्याच कौतुकास्पद वाटतायेत लेखकाला.

@ दीमा
प्रत्येकाच्या मनात एक मस्तानी असते .
अरे हळू ,हि गोष्ट फक्त स्वताशी बोलायची असते .
लग्नाची असली तरी ती फक्त बायको असते
आपली मस्तानी कोणालाच सांगायची नसते .
लोक म्हणतात हा व्यभिचार आहे ,
जाणून बुजून केलेला एक अविचार आहे.
बोलणारे लोक खोटारडे असतात
स्वतःपासून सुद्धा काही तरी लपवत असतात
करतील तरी काय , सगळेच बाजीराव नसतात
लोक नेहेमी असेच वागतात ,
बाजीरावाचे प्रेम ग्रेट म्हणतात
तुमच्या आमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात
येता जाता नैतिकतेचे डोस पाजतात
प्रत्येकाला ठाऊक असते मस्तानी आपली होणार नाही ,
सगळ्यांचेच नशीब काही तेवढे थोर नाही
तरीही आपली मस्तानी जपायची असते
मनाच्या कप्प्यात खोल खोल दडवायची असते .
....
( किती ते खर -कोपी पेस्ट )

एका मित्राने बालकांसाठी कथा लिहील्या होत्या.
पहिली बिडी
गुत्त्यावरून येतांना
नाय्किणीचा आक्रोश

याने बहुतेक वाचलेल्या दिसतात.

आता पुढचा धागा, "माझे पहिले..... गमन " असेल तर मानसिक तयारी ठेवावी.

कारागृह गमन हो...

लिंबूटिंबू,
यच्चयावत बलात्कारी/दरोडेखोर असे म्हणत सुटतील की....
>>>>>>
ते पकडले जातील किंवा त्यांचा गुन्हा जेव्हा जगासमोर येईल तेव्हा असे स्पष्टीकरण देतील ना. इथे धागाकर्ता स्वताच आपण जे केले ते सांगतोय जे आधी कोणाला माहीतही नव्हते. हा बेसिक फरक नाही का?

आता पुढचा धागा, "माझे पहिले..... गमन " असेल तर मानसिक तयारी ठेवावी.

कारागृह गमन हो...
>>>

जो समाज वेश्यागमन हा शब्द लिहायलाही फुल्ल्या फुल्या वापरतो, पण तेच समाजातून हद्दपार करू शकत नाही, तिथे मी काय लिहिणार आणि कोण काय वाचणार.

एक गम्मत सारखे वाचले तर ते लिखाण बरे आहे पण एकदा जर लहान मुलगा वे वाचेल तर तो उद्या आपल्या घरी सुद्धा याचे परिणाम दिसू लागतील..
समजा आपल्या बोस ने हे लिखाण वाचले आणि आपण engineering ला लावलेले दिवे कळले तर आपले काय होईल..
अश्या गोष्टी कृपया समाजात बोलू नयेत याने आपलीच बदनामी होण्याचा जास्त संभाव असतो.

ते परदेश गमनच्या चालीवर लिहीलेय >> ओके. जो समाज परदेशगमन हा शब्द लिहायलाही फुल्ल्या फुल्या वापरतो, तिथे मी काय लिहिणार आणि कोण काय वाचणार.

काय त्रास देताय पोराला!
त्या ह्याला आमच्या त्या ह्यांनी बघा लहान वयात बलात्कार आणि खून करून बालसुधारगृहातून सुटताना १०००० रु आणि एक शिलाई मशीन देऊ केलंय !
नाहीत आपण, ऋन्मेशला साधी शाब्बासकी देत नाही चोर्‍या केल्याबद्दल.

>>>> ते पकडले जातील किंवा त्यांचा गुन्हा जेव्हा जगासमोर येईल तेव्हा असे स्पष्टीकरण देतील ना. इथे धागाकर्ता स्वताच आपण जे केले ते सांगतोय जे आधी कोणाला माहीतही नव्हते. हा बेसिक फरक नाही का? <<<<<
फरक असेलच तर थोडासाच आहे.... चोर दरोडेखोर बलात्कारी सापडले व गुन्हा सिद्ध झाला तर कोर्टात कायद्याने शिक्षा आहे.
पण तुम्ही जे स्वानुभवाचे स्वआचरणाबद्दल लिखाण केलय, तशा "फुशारक्यांना" कायद्याने कोणतीही शिक्षा नाही झालेच तर अशा फुशारक्या मारुन कबुलीच्या नावाखाली कसलाही पःश्चात्ताप व्यक्त न करता केल्या चुकांचे उलट उदात्तीकरणच करीत आपण समाजापुढे काय आदर्श ठेवतो आहोत याबद्दलही कायद्यात कुठेही वाच्यता नाही.

समाज परदेशगमन हा शब्द लिहायलाही फुल्ल्या फुल्या वापरतो>>>> फुल्ल्या फुल्या पण नाहीत त्या, टिंब आहेत. गाळलेल्या जागा भराप्रमाणे. नेमका कोणता धागा निघेल हे माहीत नसल्याने.कारागृह गमन साठी वापर केलाय त्याचा. परदेश गमन साठी नव्हे.

कापोचे ओके. जो समाज कारागृहगमन हा शब्द लिहायलाही टिंब टिंब वापरतो, तिथे मी काय लिहिणार आणि कोण काय वाचणार.

जोक्स द अपार्ट, काय असेल वाईट सवय क्रमांक दोन हे गेस करणे एक धमाल असेल.

लिंबूजी,
कायद्याने कोणतीही शिक्षा नाही पण देवाच्या दरबारात तर असेल.

वाईट सवय क्रमांक दोन- 'सर्वांसमक्ष नाकात बोटे घालून नाकातला मेकूड खाणे' असणार बहुतेक!
Wink

जो समाज कारागृहगमन हा शब्द लिहायलाही टिंब टिंब वापरतो, तिथे मी काय लिहिणार आणि कोण काय वाचणार. >>> अर्थ नाही कळाला.

ओ कापोचे काका,
तुम्ही इथे काहुन टैमपास करुन राह्यले. फाटक लिवा की फुडं. फुडच्या भागाच्या परतिक्षेत आहो. Light 1

Pages