इतर कुणी असतं, तर, ‘हे म्हणजे ‘तारे जमीं पर’, ‘रॉकस्टार’, यह जवानी है दीवानी’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ व अजून काही सिनेमांचं मिश्रण केलंय’, असं म्हणता आलं असतं. पण ‘इम्तियाझ अली’ आणि ‘इतर कुणी’ ह्यांच्यात हाच फरक आहे. उत्तम दिग्दर्शक आणि इतर दिग्दर्शक ह्यांच्यात फरक असतोच. कारण ‘कथाकथन’ (Story Telling) हीसुद्धा एक कला आहे. ती अंगभूत असायला लागते. (आठवा, ‘कट्यार काळजात घुसली’ मधले कविराजाचे ‘कला’ आणि ‘विद्या’ ह्यांच्यातला फरक सांगणारे शब्द !) उत्तम कथानक वाया घालवलेली अनेक उदाहरणं देता येतील. पण ज्याप्रमाणे आपल्या मित्रवर्गातील एखादी व्यक्ती एखादा साधासा विनोदही अश्या काही परिणामकारकतेने रंगवून सांगते की हास्याचा खळखळाट होतो, त्याचप्रमाणे इम्तियाझ अली पुन्हा एकदा एक प्रेमकहाणी सांगतो. प्रेमकहाणीचं नातं आयुष्याशी जोडतो आणि चित्रपटाकडे केवळ एक ‘मनोरंजन’ म्हणून न पाहता एक ‘कला’ म्हणूनही पाहणारे रसिक दिलखुलास दाद देतात.
का ?
कारण ह्या कहाणीतला वेद मलिक (रणबीर कपूर) प्रत्येकाने जगलेला, पाहिलेला आहे. हा ‘वेद’ दुसरा तिसरा कुणी नसून डोळ्यांना झापडं लावून धावत सुटणाऱ्या घोड्यासारखा ‘कहाँ से चलें, कहाँ के लिए’ हे खबर नसणारा नोकरदार आहे. तोच तो मर्ढेकरांच्या ‘पिपात मेले ओल्या उंदीर’ वाला सामान्य माणूस. जो कधीच, कुठेच जिंकत नसतो कारण त्याला जिंकायचं नसतंच बहुतेक. बस्स, धावायचं असतं. कारण त्याला भीती असते की जर तो थांबला, तर त्याच्या मागून बेभानपणे धावत येणारे इतर लोक त्याला पाहणारही नाहीत आणि त्याला तुडवत तुडवत पुढे निघून जातील. त्याने माधव ज्युलियनांच्या -
कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला
थांबला तो संपला
धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सापडे
ह्या ओळींचा सोयीस्कर अर्थ लावलेला आहे. त्याला बहुतेक असं वाटत असतं की तो ‘यदायदाहि धर्मस्य..’ वाला ह्याच्याही मदतीला येणार आहे म्हणून तो जबरदस्तीनेच ‘ग्लानिर्भवती’ पाळत असतो. येतो. त्याच्याही मदतीला येतो. पण त्याचं रुप ओळखता आलं पाहिजे. तेच बहुतांशांना जमत नाही. मात्र वेदला जमतं. त्याचं ‘प्रेम’ त्याला रस्ता दाखवतं. हा नेहमीचाच मसाला आहे की, ‘प्रेमाने आयुष्य बदलून टाकणं’ वगैरे. पण वेदला ते कसं आणि कितपत जमतं, त्याला होणारा साक्षात्कार नेमका काय असतो, त्यासाठी काय किंमत मोजायला लागते आणि तो कुठून, कसा व काय बनतो, हे सांगण्यासाठी एखादा ‘इम्तियाझ अली’च असावा लागतो ! नाही तर, ‘ही तर ४-५ सिनेमांची मिसळ आहे’, हा शेरा नक्की असतो !
ज्या संवेदनशीलतेने इम्तियाझ अली, एका लहानपणापासून सतत मर्जीविरुद्ध झिजत राहिलेल्या व्यक्तीची मानसिकता मांडतात, ते एखादा मनोवैज्ञानिकच जाणो ! मग ते सतत आरश्याशी बोलत राहणारं एकटेपण असो की झटक्यासरशी ‘मूड स्विंग्स’ करणारं मानसिक अस्थैर्य असो की टेबलावर डोकं ठेवून एका बाजूला तोंड करून शून्यात पाहणारी असुरक्षितता असो, वेदच्या व्यक्तिरेखेला इम्तियाझ अली एकेक पैलू विचार व काळजीपूर्वक पाडतात.

रणबीरमधला सक्षम अभिनेताही हा एकेक पैलू आपलासा करतो. तो त्याच्या वेडेपणाने जितका हसवतो, तितकाच त्या वेडेपणामागच्या कारुण्याच्या छटेने व्यथितही करतो. एरव्ही माथेफिरू वाटू शकणारी एक व्यक्तिरेखा तो प्रेक्षकाच्या मनात उतरवतो आणि त्याला ती बेमालूमपणे विकतोही !
जोडीला ‘दीपिका पदुकोण’सुद्धा तितकाच सशक्त अभिनय करते. जिथे रणबीरसोबत त्याच्याइतकीच उर्जा दाखवायची आवश्यकता असते तिथे ती कमी पडत नाही आणि जिथे त्याच्या उसळून येणाऱ्या भावनांना झेलायचं असतं, तिथेही ती तितकीच कधी प्रवाही, तर कधी निश्चल राहते. ‘कॉकटेल’ आणि ‘यह जवानी है दिवानी’ मधल्या तिच्या दोन व्यक्तिरेखांचं हे एक मिश्रण होतं. जे साहजिकच आव्हानात्मक होतं. ती ते आव्हान पेलते.
संगीत ए. आर. रहमानचं आहे म्हणून ‘मस्त आहे’ असं म्हणायला हवं. काही कलाकृती आपल्या कुवतीच्या बाहेर असतातच. ‘तमाशा’मधला रहमान माझ्या कुवतीबाहेरचा असावा. मात्र हेच संगीत इतर कुणाचं असतं तर त्याला काय म्हटलं असतं, हा विचार केल्यावर वाटतं की, जर काही कमी पडलं असेल, तर संगीताची बाजूच. गाण्यांचं अप्रतिम चित्रीकरण हेसुद्धा एक इम्तियाझ अलींचं बलस्थान आहे. त्यांच्या सिनेमात गाणी कधीच घुसडलेली वाटत नाहीत आणि काही गाणी तर कथेला खूप जलदपणे पुढे नेण्यात महत्वाची भूमिका निभावतात. (उदा. ‘जब वी मेट’ मधलं ‘आओगे जब तुम ओ साजना..’ आठवा.) इथेही प्रत्येक गाणं अप्रतिम चित्रित केलं असल्याने त्या संगीताचा मला त्रास झाला नाही, इतकंच.
मात्र ‘इर्शाद कमिल’ चे शब्द मात्र सर्व गाण्यांना अर्थपूर्णही करतात, हेही खरं !
फ्रान्स, टोकियो, दिल्ली अत्यंत सुंदरपणे टिपल्याबद्दल छायाचित्रक 'एस रवी वर्मन' ह्यांचाही उल्लेख आवश्यक आहे. प्रत्येक फ्रेम कहाणीशी सुसंगतपणे कधी फ्रेश, तर कधी झाकोळलेली दिसली आहे.
सिनेमा एका वैचारिक उंचीवर आहे. त्याची मांडणी वेगळ्या धाटणीची आहे. ती कदाचित सर्वांच्या गळी उतरणार नाही. पण ज्यांना ती पटेल, त्यांना ती खूप आवडेल हे निश्चित. पण जी उंची व संवेदनशीलता एकूण हाताळणीत जाणवते ती नेमकी सिनेमाच्या शीर्षकात जाणवत नाही. ‘तमाशा’ ही शीर्षक अतिरंजित, भडक वगैरे काहीसं वाटतं. ते ह्या कहाणीशी न्याय करत नाही. सिनेमा जितका हळवा आहे, तितकंच हे शीर्षक मात्र भडक आहे.
असो.
‘तमाशा’ ही माझी कहाणी आहे. कदाचित तुमची आहे आणि तुमच्या ओळखीच्या अनेकांचीही असू शकते. मला ‘तमाशा'ने 'अंतर्मुख' केलंय की 'प्रभावित' केलंय, हे येणारा काळ सांगेल. तुम्हालाही किमान प्रभावित व्हायचं असेल, तर अवश्य पाहा. नाही पाहिलात, तरी चालतंय. शर्यत सुरू राहीलच.
'रॅट रेस' !
भागते रहो !
रेटिंग - * * * *
- रणजित पराडकर
http://www.ranjeetparadkar.com/2015/11/movie-review-tamasha.html
हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्ह मध्ये आज २९ नोव्हेंबर २०१५ प्रकाशित झालं आहे -

रसप वुई बोथ आर्र कर्रेक्ट
रसप वुई बोथ आर्र कर्रेक्ट !
दहा-पंधरा मिनिटे झाल्यावर पुढचा फॉर्वर्ड करत पुढच्या पाच-दहा मिनिटात !
कुठल्या थेटरात फॉरवर्ड करत
कुठल्या थेटरात फॉरवर्ड करत पिच्चर बघता येतो म्हणे?
राजाबाबू बघा .. आवडलेला शॉट
राजाबाबू बघा .. आवडलेला शॉट रीपीटही करता येतो
'राजाबाबू' मध्ये आवडणेबल
'राजाबाबू' मध्ये आवडणेबल शॉटसुद्धा आहेत होय !
रसप थोडी गल्लत होतेय, त्यात
रसप थोडी गल्लत होतेय, त्यात गोविंदा थिएटरच विकत घेतो आणि चित्रपट हवा तसा रिवाईंट फॉरवर्ड करून बघतो असा सीन आहे.. त्याला अनुसरून म्हणालेलो ते
ओक्के ! त्या पठडीतले साधारण
ओक्के !
त्या पठडीतले साधारण एखाद डझन सिनेमे गोविंदाने एकदमच ओतले होते आणि मला तरी काही टोटलच लागली नव्हती ! त्यामुळे........
राजाबाबु
राजाबाबु
तमाशा पाहिला . आधी पाहून
तमाशा पाहिला . आधी पाहून आलेल्यापैकी बहुतेक लोकांनी बोर आहे , काही समजत नाही वगैरे reaction दिलेल्या. पण इम्तियाजचा सिनेमा चुकवायचा नाही अस ठरवल्याने शेवटी पाहिलाच . आणि निर्णय न चुकल्याचा आनंद झाला.
इम्तियाज अलीने खरच छान उलगडालय सिनेमा . सिनेमाची प्रत्येक फ्रेम बोलकी आहे . सुरुवातीचा संथ सिनेमा नंतर एकदम पकड घेतो. मात्र त्यासाठी थोडा वेळ द्यायला हवाय. कुठेही कुठला प्रसंग अनावश्यक आहे असा वाटत नाही
कॉर्सिया खरंच सुंदर आहे. डोळे निवतात ती निळाई पाहून . रवी वर्मनना याबद्दल फुल्ल मार्क्स .
गाणीही चपखल आणि छान जमलीत. तुम साथ हो ने बर्याच दिवसांनी अलका याज्ञीकला ऐकायची संधी दिली. मस्त गाणं आहे .
रसपने लिहिल्याप्रमाणे हा सिनेमा रणबीरचा आहे. भूमिकेतल्या वेगवेगळ्या छट्या मस्त दाखवल्यात. दीपिकाही सुंदर दिसते . आवडून जाते
हे परिक्षण छान लिहिले आहे,
हे परिक्षण छान लिहिले आहे, शब्द/उपमा मनापासून आपसूक आलेल्या वाटतात
खरंच छान चित्रपट आहे हा...
खरंच छान चित्रपट आहे हा... मधेच थोडासा संथ वाटला.. पण हळूहळू इंटरेस्टिंग वाटू लागला.. दीपिकाचा वापर कमी केला असा नाही म्हणता येणार, उलट जेवढी तिची गरज ( रणबीरला जाणीव होण्यापुरती) आहे तेवढचं तिचं काम, कारण मुळात हा चित्रपट 'स्व' त्वाची जाणीव होण्याचा आहे आणि त्यामुळेच पर्यायाने रणबीरचा ... पण दोघांचाही अभिनय मला खूप आवडला.. रणबीर फुल्ल पिक्चर खाऊन टाकतो यार.. हॅट्स ऑफ टू इम्तियाज अली..
तुम साथ हो तो.. मस्त जमून आलयं, अलका याज्ञिकचा आवाज ब-याच दिवसांनी ऐकल्यामुळे सुखावह वाटतोय ( काही अपवाद सोडले तर त्यांचा आवाज मला विशेष आवडतं नाही) आणि हीर तो बडी सॅड हे तर एकदम सहीये.. गाण आणि पिक्चरायजेशनपण..
हीर तो बडी सॅड हे तर एकदम
हीर तो बडी सॅड हे तर एकदम सहीये> +१
तुम साथ हो तो.. मस्त जमून आलयं>>>>>>>>>>>> त्यातलं 'तुम साथ हो या ना हो... क्या फर्क है... बेदर्द थी जिन्दगी... बेदर्द है' हे मला फार आवडतं
’तमाशा’चा अर्थ- रंगमंचावरून
’तमाशा’चा अर्थ- रंगमंचावरून सादर केलेली कला. हा रंगमंच म्हणजे नक्की कोणता? समोर दिसतो तो नट-नट्या काम करत आहेत तो रंगमंच? जग म्हणजे एक रंगमंच आणि आपण नियतीच्या हातातली कठपुतळी पात्र असाही व्यापक अर्थ या तमाशाचा घेता येईल. इम्तियाझ अलीने तरी हाच व्यापक अर्थ घेतला आहे. रंगमंचावर नाचवल्या जाणार्या कठपुतळ्या निर्जीव असतात. त्यांना मन आणि इच्छा नसतात. त्यांच्या दोर्या ज्याच्या हातात असतात त्याच्या इच्छेप्रमाणे त्या बोलतात-हसतात-नाचतात. पण एक माणूस म्हणून जगाच्या रंगमंचावर जगताना आपणही नियतीच्या हातातल्या निर्जीव बाहुल्यांप्रमाणे असतो का, का आपल्याला काही दुसरे पर्याय असतात? या प्रश्नाभोवती ’तमाशा’ फिरतो.
लहानपणापासून फॅन्टसीच्या जगात वावरणार्या वेदची ही कथा आहे. राजपुत्र-राजकन्येमधलं प्रेम, हटकून त्यांच्या प्रेमात बिब्बा घालणारे व्हिलन, राजपुत्र आणि राक्षसाची लढाई आणि शेवटी सत्याचा आणि न्यायाचा होणारा विजय या फॉर्म्युलाशी त्याची ओळख एका गोष्ट सांगणार्या बाबांनी केलेली असते. जगाच्या पाठीवर कुठेही, कोणत्याही काळात प्रत्येक कथा ही अशीच घडते. वेदला ही फिलॉसॉफी प्रचंड प्रिय असते. तो तिच्याशी ’रिलेट’ करू शकतो. पण गोष्ट संपल्यावर काय? घर, वडील, नातेवाईक, शाळा, शिक्षक, गणित या वास्तव जगात त्याचा श्वास कोंडतो. कारण या जगाचा फॉर्म्युला काहीतरी वेगळाच आहे. इथे प्रेम, राजकन्या वगैरेंना स्थान नाही. इथे चालू आहे एक कधीनी न संपणारी शर्यत- अस्तित्वाची शर्यत. अभ्यास, मार्क, खूप मार्क, नोकरी, पगार, खूप पगार मिळवण्यासाठी जिथे धावावं लागतं ती शर्यत. या शर्यतीमध्ये तुम्हाला धावावंच लागतं. इथे दुसरा पर्यायच नाही. तुम्हाला ती आवडते का, तुम्हाला त्यात मनापासून भाग घ्यावासा वाटतो का हा प्रश्नच इथे गौण आहे. जगायचं आहे? व्यवस्थित जगायचं आहे? मग धावा. जीव खाऊन धावा.
या शर्यतीतून एकदाच ब्रेक घेऊन वेद ’कोर्सिका’ नावाच्या एका दूरच्या फ्रेन्च गावात जातो. जिथे त्याला कोणी म्हणजे कोणीही ओळखत नाही. इथे कसंही वागलं, काहीही बोललं, काहीही केलं तरी कोणालाही कळणार नाही. इथे ’नियती’ एक गंमत करते आणि वेदची गाठ पडते ताराशी. तारा वास्तव जगातली एक अत्यंत आदर्श मुलगी आहे. हुशार, श्रीमंत, स्मार्ट, आपलं काम न कंटाळता करणारी एक आदर्श तरुणी. जगण्याच्या शर्यतीत जे पहिले पाच नंबर लागतात ना, त्यापैकी एक नंबर तारा नेहेमीच पटकावत असते. या शर्यतीत धावत असूनही तारा उघड्या डोळ्यांनी जग बघू शकते. त्यामुळेच ती बंधनमुक्त वेदच्या प्रेमात पडते. हे असंही जगता येतं- उत्फुल्ल, मनासारखं, चिंतामुक्त, शांत, समाधानी याचा साक्षात्कार तिला वेद करवून देतो. पण वास्तव जगातल्या या राजकन्या आणि राजपुत्राची ताटातूट होते. त्यांनी तसं ठरवलेलंच असतं. रेसपासून तुम्हाला तात्पुरती सुटी मिळू शकते, मुक्ती नाही!
What happens in Corsica stays in Corsica असं ठरलेलं असलं तरी तारा कोर्सिका आणि वेदला आपल्या जगात घेऊन येते. नकळत, पण निश्चितपणे. सरळ चालणार्या रेषेला कधीतरी गंमत म्हणून वेडं-वाकडं जायला आवडत असेल ना? आवडत असेल की. आपण रेष सरळच जाणार असं इतकं गृहित धरलेलं असतं की तिलाही वळणं घ्यायला आवडत असेल हा विचारच आपल्या मनात येत नाही. असो. तर तब्बल चार वर्ष वेद ताराच्या मनात राहतो. तिचं एरवीचं आयुष्य उत्तमपणे चालू असतं, पण तरी एक कोपरा वेदची वाट बघत असतो. नियती परत एकदा तिच्यावर खुश होते. तारा आणि वेद परत एकदा भेटतात. पण हा वेद नसतोच. म्हणजे, वेद असतो तरी वेद नसतो. वेडंवाकडं, गोल, तिरकं, वाटेल तशी चालणारी वेदची रेषा आता एकदम सरळ झालेली असते. अशी एक रेष जी दिसायला सुंदर, नीटनेटकी असते. कुठे गडबड नाही, गोंधळ नाही. आपलं काम चोख करणारी. हजारो-लाखो रेषांच्या रेसमधली आणखी एक रेष. अशी रेष जिला इकडेतिकडे बघायची परवानगीच नाहीये, किंबहुना तिला ती परवानगी नकोच आहे. कारण एकदा सरळपणा सुटला, तर परत तिकडे येणं मुश्किल. त्यापेक्षा झापडं लावावी, म्हणजे मोहच होत नाहीत कसले. जगाच्या सरळ रेषांच्या शर्यतीत वेदने स्वत:ला ठोकूनठोकून बसवलं आहे.
ताराला हा वेद परका वाटतो. वेद जगाशी, आसपासशी फटकून आहे म्हणूनच तो वेगळा आहे. इतर लाख-कोटी रेषांप्रमाणे सरळ होणं हे त्याच्यासाठीच घातक आहे. तारा वेदला याची जाणीव करून देते आणि वेद हादरतो. भयानक द्वंद्वात अडकतो. आपण मुळात कसे आहोत आणि आपण स्वत:ला बदलून कसे झाले आहोत याचा तो प्रथमच विचार करतो. परत एकदा तो लहानपणी गोष्टी सांगणार्या बाबांकडे जातो. बाबा म्हणतात, बाळा मी काय सांगू? मी कसं सांगू? ही गोष्ट तुझी आहे. तूच हीरो आहेस. तूच आहेस राजपुत्र, तू ठरव, काय करायचं आहे तुला? कसं जगायचं आहे तुला? वेदने चढवलेली झापडं झटकन गळून पडतात. हजारो-लाखो समांतर रेषांना छेद देणार्या आणि त्यामुळेच सर्वात लक्षवेधक ठरणार्या त्याच्या आडव्या रेषेचा प्रवास सुरू होतो.
इम्तियाझ अली याचे सिनेमे प्रेक्षकाच्या ’अंतरंगाचा शोध’ घेणारे असतात. समोर चाललेली गोष्ट बघताबघता आपणही तिच्याशी रिलेट होत जातो. ’तुम्हाला जे आवडतं तेच करा’ असा ’संदेश’ देणारे अनेक सिनेमे येऊन गेले आहेत. पण इम्तियाझचे काहीच स्ट्रोक्स असे जबरदस्त बसतात की वाह रे वाह! काहीच मोजके प्रसंग-
१) लहानग्या वेदला सतत दिसणारे राम, रावण, सीता हे त्याच्यासारखेच स्वेटर घालतात.
२) वेदचा मशीनप्रमाणे झालेला दिनक्रम. हा इतक्यांदा दाखवलेला आहे आणि त्याच प्रिसिजनने, की आपल्यालाही वेदला विचारावंसं वाटतं, काय झालंय तुला?
३) ताराच्या प्रेमात असूनही, तिच्या घरातून निघताना वेद हमखास रोज घड्याळात वेळ बघतो, अगदी न चुकता.
४) मानसिक द्वंद्वाची जाणीव झाल्यानंतर प्रेझेन्टेशन्स करताना वेद नकळत तारासारखं बोलतो- चार इंग्लिश वाक्यांमध्ये एखादा हिंदी, माप काढणारा शब्द.
५) आपल्या वडिलांना गोष्ट सांगणारा वेद ताराचा उल्लेख करतो त्या आधी एकच क्षण थांबून एक मोठा श्वास घेऊन आधी सावरतो; मग पुढे बोलतो.
इथे इम्तियाझ अली दिसतो.
सिनेमावर नि:संशय ’रॉकस्टार’ची छाप आहे. पण रॉकस्टार हे वेड आहे, तर ’तमाशा’ हे एक साकार करता येण्याजोगं स्वप्न आहे.
तरीही, तरीही एक प्रश्न उरतोच. वेदसारखे टोकाची पॅशन असलेले असे आपल्या आसपास किती असतात? खुद्द आपण तरी असतो का? ती पॅशन, ते वेड, ती आवड असलेले अगदी मोजके असतात. पाच टक्के वगैरे. आणखी एक वर्ग असतो ज्यांना दुर्दैवाने चॉईस नसतो. समोर जे येईल ते निमूटपणे नियती त्यांना स्वीकारायलाच लावते. असे असतात दहा टक्के. आणि मग उरतो आपण. तब्बल पंच्याऐंशी टक्के. आपल्याला अनेक गोष्टींची आवड असते, पण पॅशन नसते. आपण अगदी निर्बुद्धही नसतो, आपण अत्यंत बुद्धीमान वेडेही नसतो. आपण फार तर सजग असतो. हृदय आणि पोट यांच्यामधला मार्ग आपण काढतो. जमेल तसे हृदयाचे आणि मनाचे लाड करतो; पोट भरल्यानंतर; किंवा तशी तजवीज केल्यानंतर. आपण आहोत त्या ’रिक्षावाल्या’सारखे- गाण्याची आवड असलेले, बर्यापैकी गाताही येणारे, पण संसारासाठी रिक्षा चालवणारे.
म्हणून हा सिनेमा अधिक भिडतो. मला भिडला. कारण ती रिक्षा मीही रोज चालवते आहे. असे वेदसारखे पॅसेंजर अधूनमधून येऊन जातात. तेच आनंदाचे, समाधानाचे क्षण.
पूनम, अगदी अगदी. कुठे ठेउ
पूनम, अगदी अगदी. कुठे ठेउ तुला. हेच ते हेच ते

मस्त लिहीले आहेस पूनम आता
मस्त लिहीले आहेस पूनम
आता तर बघायलाच हवा हा सिनेमा
पूनम, भारी लिहिले
पूनम, भारी लिहिले आहेस.
दिपिका पण भन्नाट आहे
तमाशा बघितला. मला आवडला.
तमाशा बघितला. मला आवडला. रणबीर कपूरनं फार मस्त काम केलं आहे. बॉससमोर टेबलवर बसून त्याची माफी मागत असतो, ते पण एका कॅरेक्टरमध्ये घुसून तो सीन आणि वर अमेय यांनी लिहिलेले सीन्स फार मस्त जमले आहेत. दीपिका फारच छान दिसते आणि काम पण चांगलं झालं आहे. गाणी आवडली. हीर म्याड वालं फार आवडलं
इथे वर "‘तारे जमीं पर’, ‘रॉकस्टार’, यह जवानी है दीवानी’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’" या सर्व चित्रपटांची नावं आली आहेत. मी जवानी-दिवानी वगळता उरलेले सर्व बघितलेत आणि 'तमाशा'शी कुठल्याही कोनातून कम्पॅरिझन एकाचं पण होणार नाही असं वाटलं. रॉकस्टार आणि तमाशा?
टिपिकल करीयर चॉइसेस न निवडता आपल्या आवडीच्या क्षेत्रात करीयर करणे ही थीम असलेला दुसरा एक गाजलेला चित्रपट नाही आठवला का कुणाला?
पूनम, तू सगळाच पिक्चर इथे का
पूनम, तू सगळाच पिक्चर इथे का उलगडला आहेस? अजून थिएटरमध्ये चालू आहे ना?
मला हा सिनेमा ओपनिंग
मला हा सिनेमा ओपनिंग टायटल्सपसूनच बोअर झाला.
शूम्पी +१ गाणी पण नाही आवडली
शूम्पी +१
गाणी पण नाही आवडली , ती चक्क रेहमानची आहेत हे नंतर कळले
वर जितके कौतुक केले आहे
वर जितके कौतुक केले आहे तेव्हढा काही खास नाही सिनेमा.
वैचारिक उंची वगैरे..? तारे जमीनपर आणि ३ इडियट इतकीच आहे, कदाचित कमीच.
काही थिम्स भंपक आहेत. जरा बरा होत असलेला सिनेमा जिथे तिथे विदुषक दाखवून अजून खाली आणला आहे.
वर टोक्यो 'टिपले' आहे असे म्हंटलय... खरंच रसप?
फुजी पर्वताची एक स्टॉक इमेज आहे आणि एक शॉट ज्यात क्यामेरा गाडीत घेउन रात्रीच्या निऑन साइन्स दाखवल्या आहेत. असे टिपणे असते?
वर म्हंटल्या प्रमाणे जमीनपर आणि ३ इडियट पाहिले असतील तर स्टोरी लिहायला काही उरत नाही.
गाण्याचे शब्द? काय बोलावे त्यावर... वतवत वतवत वत वतवत वतवत वतवत असली धन्य ध्रुपदे आहेत.
फक्त एक कोणते तरी गाणे जरा बरे होते. कोणते ते ही आठवत नाही. पण ते काही मिनिट सुसह्य झाले होते हे आठवतेय.
काही काम नसेल, वेळही जात नसेल, झोपही येत नसेल, तर सिनेमा पाहायला हरकत नाही.
संगीत झोपू देणार नाही आणि सादरीकरण जागू देणार नाही.
रणबीरची विचित्र स्प्लिट पर्सोनॅलिटी काय पाहणार?
दिपिका पाहायला जायचे असेल तर जा. पण दिपिका मध्यंतरा नंतर जवळपास गायब होते.
अहो 'ध्रुपद' नाही हो..
अहो 'ध्रुपद' नाही हो.. 'ध्रुवपद' म्हणा. 'ध्रुपद' ही एक प्रकारची गायकी असते.
टोकियोचा उल्लेख केलाय कारण चित्रपटात एका प्रसंगापुरतं टोकियो आहे म्हणून. एकंदरीतच छायाचित्रण नेत्रसुखद आहे, इतकंच म्हणायचं होतं.
)
(जर 'टोकियो' लिहिलं नसतं, तर कुणी तरी तिथूनही बोललं असतं. 'का हो ? त्यात टोकियोसुद्धा आहे की !' करायचं तरी काय गरिबाने !
काही काम नसेल, वेळही जात
काही काम नसेल, वेळही जात नसेल, झोपही येत नसेल, तर सिनेमा पाहायला हरकत नाही.
>>
हे मी त्या दिवशी केले.
अठ्ठावीसाव्या मिनिटाला आली.
थोडक्यात पाच झोपेच्या गोळ्या आहेत चित्रपटात
@ पूनम >>>> मस्त पोस्ट
@ पूनम >>>> मस्त पोस्ट
आवडली.
पूनम, तुमची पोस्ट आत्ता
पूनम,
तुमची पोस्ट आत्ता वाचली. कारण सविस्तर होती आणि खूप मनापासून लिहिल्याचं पहिल्या काही वाक्यांतच जाणवलं होतं, म्हणून शांतपणेच वाचायची होती.
खूप विचारपूर्वक तुम्ही हा सिनेमा पाहिलात. अशा लोकांमुळेच इम्तियाझ अली बनतात.
मस्त..!!
मला पण लैच बोअर झाला
मला पण लैच बोअर झाला मूव्ही.
काहीही नविन सांगतलेलं नाही. तेच ते तेच ते नव्या अॅक्टर्स सोबत. वेगळं काही नाही.
रणबीर आणि दिपिका आवडतात पण तरीही बोअर झाला मूव्ही.
गाणी तद्दन फालतू
निनाद,
निनाद,
पूनम.. सुंदर पोस्ट.
पूनम.. सुंदर पोस्ट.
खूप नाही पण थोडासा आवडलाच
खूप नाही पण थोडासा आवडलाच तरीही..
बराच आधी पाहिला, चित्रपटा
बराच आधी पाहिला, चित्रपटा पेक्शा तुमच परिक्षण आवडलं.......चित्रपट नाही आवडला तितकासा....
इम्तियाझ अलीने आता दुसरे देखिल विषय निवडायला हवेत.... बरेचसे चित्रपट स्वःताला शोधण्याच्या त्याच त्याच कथानका वर बेतलेले असतात.
सस्मित, प्राची, गजानन, अंकु,
सस्मित, प्राची, गजानन, अंकु, दिनेश- धन्यवाद!
तुमच्या धाग्यावर टाकलेल्या माझ्या पोस्टचे स्वागत केल्याबद्दल रसप तुम्हाला स्पेशल धन्यवाद
Pages