'भागते रहो' ते 'जागते रहो' ! (Movie Review - Tamasha)

Submitted by रसप on 28 November, 2015 - 22:51

इतर कुणी असतं, तर, ‘हे म्हणजे ‘तारे जमीं पर’, ‘रॉकस्टार’, यह जवानी है दीवानी’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ व अजून काही सिनेमांचं मिश्रण केलंय’, असं म्हणता आलं असतं. पण ‘इम्तियाझ अली’ आणि ‘इतर कुणी’ ह्यांच्यात हाच फरक आहे. उत्तम दिग्दर्शक आणि इतर दिग्दर्शक ह्यांच्यात फरक असतोच. कारण ‘कथाकथन’ (Story Telling) हीसुद्धा एक कला आहे. ती अंगभूत असायला लागते. (आठवा, ‘कट्यार काळजात घुसली’ मधले कविराजाचे ‘कला’ आणि ‘विद्या’ ह्यांच्यातला फरक सांगणारे शब्द !) उत्तम कथानक वाया घालवलेली अनेक उदाहरणं देता येतील. पण ज्याप्रमाणे आपल्या मित्रवर्गातील एखादी व्यक्ती एखादा साधासा विनोदही अश्या काही परिणामकारकतेने रंगवून सांगते की हास्याचा खळखळाट होतो, त्याचप्रमाणे इम्तियाझ अली पुन्हा एकदा एक प्रेमकहाणी सांगतो. प्रेमकहाणीचं नातं आयुष्याशी जोडतो आणि चित्रपटाकडे केवळ एक ‘मनोरंजन’ म्हणून न पाहता एक ‘कला’ म्हणूनही पाहणारे रसिक दिलखुलास दाद देतात.
का ?
कारण ह्या कहाणीतला वेद मलिक (रणबीर कपूर) प्रत्येकाने जगलेला, पाहिलेला आहे. हा ‘वेद’ दुसरा तिसरा कुणी नसून डोळ्यांना झापडं लावून धावत सुटणाऱ्या घोड्यासारखा ‘कहाँ से चलें, कहाँ के लिए’ हे खबर नसणारा नोकरदार आहे. तोच तो मर्ढेकरांच्या ‘पिपात मेले ओल्या उंदीर’ वाला सामान्य माणूस. जो कधीच, कुठेच जिंकत नसतो कारण त्याला जिंकायचं नसतंच बहुतेक. बस्स, धावायचं असतं. कारण त्याला भीती असते की जर तो थांबला, तर त्याच्या मागून बेभानपणे धावत येणारे इतर लोक त्याला पाहणारही नाहीत आणि त्याला तुडवत तुडवत पुढे निघून जातील. त्याने माधव ज्युलियनांच्या -
कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला
थांबला तो संपला
धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सापडे
ह्या ओळींचा सोयीस्कर अर्थ लावलेला आहे. त्याला बहुतेक असं वाटत असतं की तो ‘यदायदाहि धर्मस्य..’ वाला ह्याच्याही मदतीला येणार आहे म्हणून तो जबरदस्तीनेच ‘ग्लानिर्भवती’ पाळत असतो. येतो. त्याच्याही मदतीला येतो. पण त्याचं रुप ओळखता आलं पाहिजे. तेच बहुतांशांना जमत नाही. मात्र वेदला जमतं. त्याचं ‘प्रेम’ त्याला रस्ता दाखवतं. हा नेहमीचाच मसाला आहे की, ‘प्रेमाने आयुष्य बदलून टाकणं’ वगैरे. पण वेदला ते कसं आणि कितपत जमतं, त्याला होणारा साक्षात्कार नेमका काय असतो, त्यासाठी काय किंमत मोजायला लागते आणि तो कुठून, कसा व काय बनतो, हे सांगण्यासाठी एखादा ‘इम्तियाझ अली’च असावा लागतो ! नाही तर, ‘ही तर ४-५ सिनेमांची मिसळ आहे’, हा शेरा नक्की असतो !

ज्या संवेदनशीलतेने इम्तियाझ अली, एका लहानपणापासून सतत मर्जीविरुद्ध झिजत राहिलेल्या व्यक्तीची मानसिकता मांडतात, ते एखादा मनोवैज्ञानिकच जाणो ! मग ते सतत आरश्याशी बोलत राहणारं एकटेपण असो की झटक्यासरशी ‘मूड स्विंग्स’ करणारं मानसिक अस्थैर्य असो की टेबलावर डोकं ठेवून एका बाजूला तोंड करून शून्यात पाहणारी असुरक्षितता असो, वेदच्या व्यक्तिरेखेला इम्तियाझ अली एकेक पैलू विचार व काळजीपूर्वक पाडतात.

tamasha_640x480_51442924553.jpg

रणबीरमधला सक्षम अभिनेताही हा एकेक पैलू आपलासा करतो. तो त्याच्या वेडेपणाने जितका हसवतो, तितकाच त्या वेडेपणामागच्या कारुण्याच्या छटेने व्यथितही करतो. एरव्ही माथेफिरू वाटू शकणारी एक व्यक्तिरेखा तो प्रेक्षकाच्या मनात उतरवतो आणि त्याला ती बेमालूमपणे विकतोही !
जोडीला ‘दीपिका पदुकोण’सुद्धा तितकाच सशक्त अभिनय करते. जिथे रणबीरसोबत त्याच्याइतकीच उर्जा दाखवायची आवश्यकता असते तिथे ती कमी पडत नाही आणि जिथे त्याच्या उसळून येणाऱ्या भावनांना झेलायचं असतं, तिथेही ती तितकीच कधी प्रवाही, तर कधी निश्चल राहते. ‘कॉकटेल’ आणि ‘यह जवानी है दिवानी’ मधल्या तिच्या दोन व्यक्तिरेखांचं हे एक मिश्रण होतं. जे साहजिकच आव्हानात्मक होतं. ती ते आव्हान पेलते.

संगीत ए. आर. रहमानचं आहे म्हणून ‘मस्त आहे’ असं म्हणायला हवं. काही कलाकृती आपल्या कुवतीच्या बाहेर असतातच. ‘तमाशा’मधला रहमान माझ्या कुवतीबाहेरचा असावा. मात्र हेच संगीत इतर कुणाचं असतं तर त्याला काय म्हटलं असतं, हा विचार केल्यावर वाटतं की, जर काही कमी पडलं असेल, तर संगीताची बाजूच. गाण्यांचं अप्रतिम चित्रीकरण हेसुद्धा एक इम्तियाझ अलींचं बलस्थान आहे. त्यांच्या सिनेमात गाणी कधीच घुसडलेली वाटत नाहीत आणि काही गाणी तर कथेला खूप जलदपणे पुढे नेण्यात महत्वाची भूमिका निभावतात. (उदा. ‘जब वी मेट’ मधलं ‘आओगे जब तुम ओ साजना..’ आठवा.) इथेही प्रत्येक गाणं अप्रतिम चित्रित केलं असल्याने त्या संगीताचा मला त्रास झाला नाही, इतकंच.
मात्र ‘इर्शाद कमिल’ चे शब्द मात्र सर्व गाण्यांना अर्थपूर्णही करतात, हेही खरं !

फ्रान्स, टोकियो, दिल्ली अत्यंत सुंदरपणे टिपल्याबद्दल छायाचित्रक 'एस रवी वर्मन' ह्यांचाही उल्लेख आवश्यक आहे. प्रत्येक फ्रेम कहाणीशी सुसंगतपणे कधी फ्रेश, तर कधी झाकोळलेली दिसली आहे.

सिनेमा एका वैचारिक उंचीवर आहे. त्याची मांडणी वेगळ्या धाटणीची आहे. ती कदाचित सर्वांच्या गळी उतरणार नाही. पण ज्यांना ती पटेल, त्यांना ती खूप आवडेल हे निश्चित. पण जी उंची व संवेदनशीलता एकूण हाताळणीत जाणवते ती नेमकी सिनेमाच्या शीर्षकात जाणवत नाही. ‘तमाशा’ ही शीर्षक अतिरंजित, भडक वगैरे काहीसं वाटतं. ते ह्या कहाणीशी न्याय करत नाही. सिनेमा जितका हळवा आहे, तितकंच हे शीर्षक मात्र भडक आहे.
असो.
‘तमाशा’ ही माझी कहाणी आहे. कदाचित तुमची आहे आणि तुमच्या ओळखीच्या अनेकांचीही असू शकते. मला ‘तमाशा'ने 'अंतर्मुख' केलंय की 'प्रभावित' केलंय, हे येणारा काळ सांगेल. तुम्हालाही किमान प्रभावित व्हायचं असेल, तर अवश्य पाहा. नाही पाहिलात, तरी चालतंय. शर्यत सुरू राहीलच.
'रॅट रेस' !
भागते रहो !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2015/11/movie-review-tamasha.html

हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्ह मध्ये आज २९ नोव्हेंबर २०१५ प्रकाशित झालं आहे -

29112015-mai-06-page-001.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण जी उंची व संवेदनशीलता एकूण हाताळणीत जाणवते ती नेमकी सिनेमाच्या शीर्षकात जाणवत नाही. ‘तमाशा’ ही शीर्षक अतिरंजित, भडक वगैरे काहीसं वाटतं. ते ह्या कहाणीशी न्याय करत नाही. सिनेमा जितका हळवा आहे, तितकंच हे शीर्षक मात्र भडक आहे.
>>

तमाशा हा शब्द हिंदीत ( मनोरंजनाचा )खेळ ह्या अर्थाने वापरातात. मराठीत ही तो (लोककलेचा ) खेळ म्हणूनच सुरुवातीस रूढ झाला होता. पण नंतर त्याला एक तुच्छतादर्शक, उपहासात्मक अर्थ मराठीत आला. हिंदीत तो मनोरंजनाचा खेळ या अर्थानेच वापरतात . शिवाजी महाराजांनी त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजी याना लिहिलेला पत्रातही 'आधी पराक्रमाचा तमाशा दाखवा ' (मगच राज्यात वाटा मागा ) असा उल्लेख आहे. या अर्थाने घेतल्यास शीर्षक भडक वाटन्याचे कारण नाही.

इम्तियाज अली, इर्शाद कमिल, रहमान, रणबीर आणि दीपिका सगळेच आवडतात. बघायचाच्च आहे..
ट्रेलर बघुन जरा मूड ऑफ झाला होता.
धन्यवाद!! चांगलं परिक्षण.. त्यामुळे बरं वाटलं Happy

पाहिला आणि आवडला देखिल. नेहमीचिच प्रेमकथा तरीही वेगळी वाटणारी कारण इम्तियाज अली.

ऑसम मुव्ही आहे.नक्की पाहा.
ट्रेलर पाहुन वाटल होत.. दिपीकावर आहे पिक्चर..बट नो.. अगेन इट व्हॉज अबोउट रणबीर.. मस्त अ‍ॅक्टींग.. मध्यतरांतर जेव्हा अस वाटायला लागत.. अरे आता दिपिका कुठे गेली... तोच ती लगेच पडद्यावर येते.हुश्श्श... Happy
शेवटच त्याने तिला घातलेल लोटांगण आनि डोळ्यांत आलेल पाणी ... अभिनय न वाटता,,त्याचा खरेपणा वाटतो. Wink

दक्शे पाहिलास तरि चालेल

दिपिका सिनेमात २०% आहे जेम तेम. हा बघायचा तर रणबिर साठि

मस्त लिहिलंय. आवडलं.

आधी बघायचाच होता पण काही निगेटिव्ह रीव्ह्यूज वाचून बेत डळमळीत झाला होता. तुमचं परीक्षण वाचून बघावासा वाटतोय Happy

सिनेमा एका वैचारिक उंचीवर आहे. त्याची मांडणी वेगळ्या धाटणीची आहे. ती कदाचित सर्वांच्या गळी उतरणार नाही. पण ज्यांना ती पटेल, त्यांना ती खूप आवडेल हे निश्चित>>>>
करेक्ट..चित्रपट चांगला आहे पण "मनोरंजक" नाही. जर "ये जवानी है दिवानी" डोक्यात ठेवुन गेले तर पदरी निराशाच पडेल.

व्हॉटसपवर मित्रांनी पकाव सिनेमा आहे, गाणी बोर आहे, पैसे पाण्यात घालवू नका असले रिव्यू दिले आहेत

इथेही एकंदरीत वैचारीक आहे पण मनोरंजक नाही असा सूर दिसतोय.

अंमळ वाईटच वाटतेय म्हणायला, कारण रणबीर माझा आवडता आहे, पण तरीही यासाठी थिएटरात पैसे नाही खर्च करणार

अत्यंत नम्र व प्रामाणिकपणे सांगतो ऋन्मेष,
तुम्हाला पटेल असा खरोखरच नाही आहे. वेळ व पैसे वाया गेल्यासारखं खरंच वाटू शकतं तुम्हाला.

आवडला मलाही.
स्वतःमधील मी शोधण्याची प्रक्रिया हा इम्तियाझ अलीचा एक प्रकारे फॉर्म्युलाच. "जब वी मेट" (आणि "हायवे") सर्वात छान भट्टी जमलेला असला तरी बाकी रॉकस्टार, लव आज कल आणि आता तमाशामध्येही कलाकारांनी मस्त काम केल्याने तेही कंटाळवाणे नाहीतच.
तमाशामधले रणबीरने फोन वाजल्यावर इंटरपोsssल म्हणणे, दीपिकाचे सेन्सॉर्ड डायलॉग, रिक्षावाल्यासोबतचा सीन, प्रेझेंटेशनमध्ये हिंदी घुसडणे असे प्रसंग भन्नाट जमलेत. शेवटचे लोटांगणही झकास.

दीपिका छान दिसते. अगदी एखाद्या मूर्तीकाराने घडवल्याप्रमाणे तिचे अंग प्रत्यंग आखीव रेखीव आहे. तिला बघायला हा सिनेमा बघायला हवा.

छान लिहिलयं !

मला आवडला सिनेमा. इम्तियाज अली , रणबीर, दिपिका आणि रेहमान असं काँबिनेशन असल्याने पाहायचा होताचं. सुरुवातीला थोडा संथ वाटला पण कथानक पुढे जाईल तसा आवडला. नेहेमीचीच साधी ,अगदी प्रेडिक्टेबल होऊ शकेल अशी कथा जेव्हा इम्तियाज अलींच्या सिनेमांतून दिसते तेव्हा तीचे वेगवेगळे लेअर्स जाणवतात, त्यात व्यक्तिरेखांचा प्रवास असतो स्वतःला ओळखण्याचा ..तमाशामधला वेदच्या व्यक्तिरेखेचा प्रवासही असाच आहे ,चाकोरीबद्ध आयुष्यापासून वेगळं असं स्वतःच अस्तित्व शोधण्याचा ..

वेदचा शोध घ्यायचा एकमेव दुवा म्हणून वापरलेलं कॅच -२२ हे पुस्तक किंवा हॅपी प्लेस दाखवण्यासाठी वापरलेला जोकर, योग्य जागी येणारी आणि कथा पुढे नेणारी गाणी असं सगळचं छान जमलयं
एकमेव खटकलेली गोष्ट म्हणजे दिपिकाचं कॅरॅक्टर मध्यंतरानंतर अगदीचं गुंडाळल्यासारखं वाटत होतं

अत्यंत नम्र व प्रामाणिकपणे सांगतो ऋन्मेष,
तुम्हाला पटेल असा खरोखरच नाही आहे. वेळ व पैसे वाया गेल्यासारखं खरंच वाटू शकतं तुम्हाला.
>>>

येस्स रसप! मी हाडामांसारक्ताचा मुंबईकर आहे. पोस्टर बघून आम्हाला अंदाजा येतो की पिक्चर कसा आहे. मलाही स्वत:ला असेच वाटतेय, नॉट माय टाईप. जर पिक्चर मनोरंजक नसेल तर त्यातील विचार ऐकण्यासाठी मी त्याला तीन तास नाही सहन करू शकत. कारण नंतर त्या विचारांचे मी काय आचार घालणार हे माझे मला माहीत आहे Happy

सिनेमा पाहीला.. बहुतेकाना आवडणार नाही कदाचित.. मलाही सुरवातीला काय चालू आहे असच काही वाटत होत.. मग हळूहळू इंट्रेस्ट वाढत गेला.. अगदी अप्रतिम नाही पण छान आहे ! इम्तियाज ची स्टाइल हटके असते .. गाणी पण तशीच.. आवडली... वात वात वात व हीर बड़ी सॅड है सिनेमात मस्त जमून आली आहेत.. दीपिकला फार कमी फूटेज मिळालेय..

स्टोरी जरी नेहमीचिच असली तरी तद्दन मसालापट नाहिये त्यामुळे ती अपेक्षा ठेउन कुणी जाणार असेल तर अपेक्षाभंग होऊ शकतो.
रणबीर , रणबीर आणि रणबीरचा सिनेमा आहे फक्त. दिपिका दिसलिये सुंदर पण मला तिचा रोल खुप काही कमिटींग वाटला नाही. मधेच कुठेतरी रोल कापल्याचा फिल येत होता आणि शेवटी जोड देऊन चिकटवल्यासारखा.असो.
रणबीरचे तोंड पाण्यात घालुन घोड्यासारखे पाणी पिणे, टच मी नॉट चे डॉयलॉग्ज अगदी सहज आल्यासारखे.

खूप खूप सुंदर लिहीलय आणि दिग्दर्शक इम्तियाज अली. म्हटल्यावर जादा सोचनेकाच नही… पिक्चर 'प्रभावित' करणारच . नक्की पहाणारय .

'अगर तुम साथ हो 'कानाला मस्त वाटलं .घरातल्या इतर सदस्यांना ते भजनी स्टाईल वाटतंय पण मला आवडलं अधून मधून थोडं कव्वाली टाईप सुफियाना टच देण छान वाटलं

साधारण चित्रपट पासुन उत्तम असं काहीही म्हणता येईल असा... ज्याला जे हवं ते शोधुन घ्यावं.

एडीटींग आणि धुसर वाटणारं शुटींग (किंवा कलर म्हणा हवं तर) आवडलं नाही. डोळे दुखले पिक्चर बघुन Happy

Pages