'भागते रहो' ते 'जागते रहो' ! (Movie Review - Tamasha)

Submitted by रसप on 28 November, 2015 - 22:51

इतर कुणी असतं, तर, ‘हे म्हणजे ‘तारे जमीं पर’, ‘रॉकस्टार’, यह जवानी है दीवानी’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ व अजून काही सिनेमांचं मिश्रण केलंय’, असं म्हणता आलं असतं. पण ‘इम्तियाझ अली’ आणि ‘इतर कुणी’ ह्यांच्यात हाच फरक आहे. उत्तम दिग्दर्शक आणि इतर दिग्दर्शक ह्यांच्यात फरक असतोच. कारण ‘कथाकथन’ (Story Telling) हीसुद्धा एक कला आहे. ती अंगभूत असायला लागते. (आठवा, ‘कट्यार काळजात घुसली’ मधले कविराजाचे ‘कला’ आणि ‘विद्या’ ह्यांच्यातला फरक सांगणारे शब्द !) उत्तम कथानक वाया घालवलेली अनेक उदाहरणं देता येतील. पण ज्याप्रमाणे आपल्या मित्रवर्गातील एखादी व्यक्ती एखादा साधासा विनोदही अश्या काही परिणामकारकतेने रंगवून सांगते की हास्याचा खळखळाट होतो, त्याचप्रमाणे इम्तियाझ अली पुन्हा एकदा एक प्रेमकहाणी सांगतो. प्रेमकहाणीचं नातं आयुष्याशी जोडतो आणि चित्रपटाकडे केवळ एक ‘मनोरंजन’ म्हणून न पाहता एक ‘कला’ म्हणूनही पाहणारे रसिक दिलखुलास दाद देतात.
का ?
कारण ह्या कहाणीतला वेद मलिक (रणबीर कपूर) प्रत्येकाने जगलेला, पाहिलेला आहे. हा ‘वेद’ दुसरा तिसरा कुणी नसून डोळ्यांना झापडं लावून धावत सुटणाऱ्या घोड्यासारखा ‘कहाँ से चलें, कहाँ के लिए’ हे खबर नसणारा नोकरदार आहे. तोच तो मर्ढेकरांच्या ‘पिपात मेले ओल्या उंदीर’ वाला सामान्य माणूस. जो कधीच, कुठेच जिंकत नसतो कारण त्याला जिंकायचं नसतंच बहुतेक. बस्स, धावायचं असतं. कारण त्याला भीती असते की जर तो थांबला, तर त्याच्या मागून बेभानपणे धावत येणारे इतर लोक त्याला पाहणारही नाहीत आणि त्याला तुडवत तुडवत पुढे निघून जातील. त्याने माधव ज्युलियनांच्या -
कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला
थांबला तो संपला
धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सापडे
ह्या ओळींचा सोयीस्कर अर्थ लावलेला आहे. त्याला बहुतेक असं वाटत असतं की तो ‘यदायदाहि धर्मस्य..’ वाला ह्याच्याही मदतीला येणार आहे म्हणून तो जबरदस्तीनेच ‘ग्लानिर्भवती’ पाळत असतो. येतो. त्याच्याही मदतीला येतो. पण त्याचं रुप ओळखता आलं पाहिजे. तेच बहुतांशांना जमत नाही. मात्र वेदला जमतं. त्याचं ‘प्रेम’ त्याला रस्ता दाखवतं. हा नेहमीचाच मसाला आहे की, ‘प्रेमाने आयुष्य बदलून टाकणं’ वगैरे. पण वेदला ते कसं आणि कितपत जमतं, त्याला होणारा साक्षात्कार नेमका काय असतो, त्यासाठी काय किंमत मोजायला लागते आणि तो कुठून, कसा व काय बनतो, हे सांगण्यासाठी एखादा ‘इम्तियाझ अली’च असावा लागतो ! नाही तर, ‘ही तर ४-५ सिनेमांची मिसळ आहे’, हा शेरा नक्की असतो !

ज्या संवेदनशीलतेने इम्तियाझ अली, एका लहानपणापासून सतत मर्जीविरुद्ध झिजत राहिलेल्या व्यक्तीची मानसिकता मांडतात, ते एखादा मनोवैज्ञानिकच जाणो ! मग ते सतत आरश्याशी बोलत राहणारं एकटेपण असो की झटक्यासरशी ‘मूड स्विंग्स’ करणारं मानसिक अस्थैर्य असो की टेबलावर डोकं ठेवून एका बाजूला तोंड करून शून्यात पाहणारी असुरक्षितता असो, वेदच्या व्यक्तिरेखेला इम्तियाझ अली एकेक पैलू विचार व काळजीपूर्वक पाडतात.

tamasha_640x480_51442924553.jpg

रणबीरमधला सक्षम अभिनेताही हा एकेक पैलू आपलासा करतो. तो त्याच्या वेडेपणाने जितका हसवतो, तितकाच त्या वेडेपणामागच्या कारुण्याच्या छटेने व्यथितही करतो. एरव्ही माथेफिरू वाटू शकणारी एक व्यक्तिरेखा तो प्रेक्षकाच्या मनात उतरवतो आणि त्याला ती बेमालूमपणे विकतोही !
जोडीला ‘दीपिका पदुकोण’सुद्धा तितकाच सशक्त अभिनय करते. जिथे रणबीरसोबत त्याच्याइतकीच उर्जा दाखवायची आवश्यकता असते तिथे ती कमी पडत नाही आणि जिथे त्याच्या उसळून येणाऱ्या भावनांना झेलायचं असतं, तिथेही ती तितकीच कधी प्रवाही, तर कधी निश्चल राहते. ‘कॉकटेल’ आणि ‘यह जवानी है दिवानी’ मधल्या तिच्या दोन व्यक्तिरेखांचं हे एक मिश्रण होतं. जे साहजिकच आव्हानात्मक होतं. ती ते आव्हान पेलते.

संगीत ए. आर. रहमानचं आहे म्हणून ‘मस्त आहे’ असं म्हणायला हवं. काही कलाकृती आपल्या कुवतीच्या बाहेर असतातच. ‘तमाशा’मधला रहमान माझ्या कुवतीबाहेरचा असावा. मात्र हेच संगीत इतर कुणाचं असतं तर त्याला काय म्हटलं असतं, हा विचार केल्यावर वाटतं की, जर काही कमी पडलं असेल, तर संगीताची बाजूच. गाण्यांचं अप्रतिम चित्रीकरण हेसुद्धा एक इम्तियाझ अलींचं बलस्थान आहे. त्यांच्या सिनेमात गाणी कधीच घुसडलेली वाटत नाहीत आणि काही गाणी तर कथेला खूप जलदपणे पुढे नेण्यात महत्वाची भूमिका निभावतात. (उदा. ‘जब वी मेट’ मधलं ‘आओगे जब तुम ओ साजना..’ आठवा.) इथेही प्रत्येक गाणं अप्रतिम चित्रित केलं असल्याने त्या संगीताचा मला त्रास झाला नाही, इतकंच.
मात्र ‘इर्शाद कमिल’ चे शब्द मात्र सर्व गाण्यांना अर्थपूर्णही करतात, हेही खरं !

फ्रान्स, टोकियो, दिल्ली अत्यंत सुंदरपणे टिपल्याबद्दल छायाचित्रक 'एस रवी वर्मन' ह्यांचाही उल्लेख आवश्यक आहे. प्रत्येक फ्रेम कहाणीशी सुसंगतपणे कधी फ्रेश, तर कधी झाकोळलेली दिसली आहे.

सिनेमा एका वैचारिक उंचीवर आहे. त्याची मांडणी वेगळ्या धाटणीची आहे. ती कदाचित सर्वांच्या गळी उतरणार नाही. पण ज्यांना ती पटेल, त्यांना ती खूप आवडेल हे निश्चित. पण जी उंची व संवेदनशीलता एकूण हाताळणीत जाणवते ती नेमकी सिनेमाच्या शीर्षकात जाणवत नाही. ‘तमाशा’ ही शीर्षक अतिरंजित, भडक वगैरे काहीसं वाटतं. ते ह्या कहाणीशी न्याय करत नाही. सिनेमा जितका हळवा आहे, तितकंच हे शीर्षक मात्र भडक आहे.
असो.
‘तमाशा’ ही माझी कहाणी आहे. कदाचित तुमची आहे आणि तुमच्या ओळखीच्या अनेकांचीही असू शकते. मला ‘तमाशा'ने 'अंतर्मुख' केलंय की 'प्रभावित' केलंय, हे येणारा काळ सांगेल. तुम्हालाही किमान प्रभावित व्हायचं असेल, तर अवश्य पाहा. नाही पाहिलात, तरी चालतंय. शर्यत सुरू राहीलच.
'रॅट रेस' !
भागते रहो !

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर

http://www.ranjeetparadkar.com/2015/11/movie-review-tamasha.html

हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्ह मध्ये आज २९ नोव्हेंबर २०१५ प्रकाशित झालं आहे -

29112015-mai-06-page-001.jpg

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला 'तमाशा' जबरदस्त आवडलाय आणि अपीलही झालाय. शुक्रवारी पाहिला, त्यानंतर शनिवारी 'कट्यारही' पाहिला, पण तरीही मनात , विचारात 'तमाशा'च आहे. त्याचे लेअर्स उलगडतीये कळत -नकळत. इंटेलीजन्ट डायरेक्शन, मीनींगफूल फ्रेमस, कथेशी सुसंगत म्युझिक आणि सगळ्यांनी कथा- पटकथा समजून उमजून केलेले अभिनय ! मला भिडलाच टोटल.
(सध्या इतकंच. कारण ह्यावर निवांत लिहावं इतका विचार झालाय. पण लिहायला वेळ नाही. त्यामुळे इनजस्टीस करण्यात अर्थ नाही सिनेमाला आणि त्यावरच्या विचारांनाही)

रणबीर हाडाचा अभिनेता आहे(च)... दिपीका असेही पडद्यावर छानच दिसते.
(बहुतेक एव्हडच पुरेसं आहे असं दिग्दर्शकाला वाटलं असावं ?) जिथे पटकथाच झोपते तिथे बाकी कुणि 'जागे' असायचं कारण नाही, रेहमान सकट. रणबीर आणि स्प्लिट पर्सनालिटी तेही गंभीर प्रकरण, आणि दिपीका 'काऊन्सेलर' इथे ऊर्वरीत व्यावसायिक समीकरणेही पार झोपलीच...!
jab we met 'in Corsica' in bit of role reversal and with some dark shades....
result: first 15 min of hottest chemistry magic on screen followed by boring routine, over stretched family issues, psychological mess, finally ending with lost spontaneity.
ईतकही गॄहीत धरू नका राव बापड्या प्रेक्षकाला. Happy

अगदीच ५ पैशाचा भरकटलेला तमाशा आहे.... चित्रपटगृहात कुणाचेही पैसे वाया जाऊ नयेत म्हणून ईथे अगदई ऊशीराने(?) प्रतीसाद देण्याची ऊठाठेव...! [ I don't do or qualify for paid reviews anyways!]

unfortunately its too early for Ranbeer to break away from 'Yeh Jawaani...' type image which has worked for mass acceptance across all such films, and quite futile for Deepika to do anything outside light, gorgeous looking roles, for mass acceptance..!

बाकी चालू देत.. एकंदरीत गेल्या काही वर्षात चित्रपटांची आवड निवड आणि त्यामागचे संदर्भ 'भयंकर' बदलले आहेत असे सर्व प्रतीसाद वाचल्यावर वाटते.

बाकी, प्रदर्शीत होण्यापूर्वीच मस्तानी च्या पिंगा व दिलवाले च्या गेरुआ ची ईतकी चर्चा आहे की प्रदर्शीत झाल्यावर ईथे किमान दहा बाफ निघतील अशी अपेक्षा आहे.

the famous quote: "... entertainment, entertainment, and entertainment..."

काल पाहिला.

दिग्दर्शकाला जे सांगायचय ते माझ्यापर्यंत पोहचले. दिग्दर्शकाने ते गोष्टीरुपाने नायकाच्याच तोंडून वदवले आहे - अगदी थेट. मग पोहचणारच ना ? पण त्यात कुठलीच कल्पकता नव्हती, तरलता तर दूरचीच गोष्ट.

'तमाशा' सुरू होतो आणि मग ती रिबीन भूतकाळात शिरते. तिला काही ठराविक वेळानंतर वर्तमानात चालू असलेल्या तमाशाशी पिन-अप केले आहे. त्यामुळे एक छान फोर्म तयार झालाय. रणबीरने उत्तम अभिनय केलाय आणि दिपिका मधून मधून सुंदर दिसली आहे. एवढ्या मुद्दलावर चित्रपट आवडणे कठीण गेले - मला तरी!

उत्स्फुर्तता, एकाच्या क्रियेवर दुसर्‍याची प्रतिक्रिया यानेच तमाशा खुलतो. ते एकमेकात नीट गुंफले गेले तर तमाशा खूप मनोरंजक होउ शकतो. हा तर चित्रपट असल्याने (live performance नसल्याने) ती गुंफण नीट करायची पटकथारुपी सोय पण होती. पण ती नीटशी वापरलीच गेली नाहीये.

स्वतःला काऊन्सेलर म्हणवणारी तारा 'समोरच्या माणसाचे वागणे इतके भिन्न कसे?' याचा जराही विचार न करता वेदच्या मनावर क्रूर आघात करते ही गोष्टच मुळात खटकली. काऊन्सेलर आहे ना ती ?
तारा वेदच्या प्रेमात पडलीये. वेद तिच्या प्रेमात पडलाय असे मला तरी कुठेच जाणवले नाही. 'आता नोकरी आहे, नायिकेला आपण आवडतोय. मग रुटीनचा भाग म्हणून लग्न करुया' अशाच भावनेने तो तिला मागणी घालतो. त्यामुळे तिच्या प्रतिक्रियेने तो भ्रमिष्ट होतो हे जराही पटत नाही.
मागणी घालतानाची ताराची प्रतोक्रिया ही वेदचे भले व्हावे ह्या उद्देशाने नक्कीच आलेली नसते. त्यामुळे आपल्या यशाचे श्रेय तिला देऊन तिला लोटांगण घालणारा वेद चांगलाच खटकतो - अगदी डोक्यातच जातो.
चित्रपटाचा हायलाईट म्हणजे वेदच्या तोंडी असलेली गोष्ट. ती तरल, अनेक पदरी असायला हवी होती. अगदी नेमके सांगायचे तर 'लाइफ ऑफ पाय' सारखी! पण नेमकी तीच अतिशय रोकठोकपणे सांगितली आहे. आणि तिथे चित्रपट सपशेल आपटतो.

कधीकधी आपण स्वतःला विसरून भलत्याच दृष्टीने एका विशिष्ट ठिकाणी वागतो. तेव्हा त्या ठिकाणी असणार्‍या व्यक्तींच्या नजरेत आपणल्याभोवती एक वलय निर्माण होते. ते वलय जेव्हा तुटते तेव्हा त्याव्यक्तीची प्रतिक्रिया शॉकिंगच असते. हे आपल्याला माहीत असते की मी वेगळा वागलोय समोरच्या व्यक्तिला नाही. त्यामुळे आघात वेदच्या मनावर नव्हे तर ताराच्या मनावर झालेला असतो. न माहीत असणार्या वेदच्या स्वभावामुळे शॉक तिला बसतो. वेदला तर सर्व ठाऊक असते. त्याच्यानुसार ताराने अ‍ॅक्सेप्ट करायला पाहिजे की मी असा वेगळा वागलो मी स्वभाव बदलला तरी चालेल. ? खरतर ते वागणे जे होते तोच वेदचा मुळ स्वभाव आहे पण खुद्द वेदच अ‍ॅक्सेप्ट करायला घाबरत असतो या दबावात असल्याने करत नाही. ताराला स्वतःला ओळखुन असल्याने वेदला स्पष्ट सांगते. हे जे जीवन जगतोय्स ते उधारीचे कातडीबचाव आहे. तु असा नाही बॉक्स मधे गुरफटून बसलेला आहे. बाहेर ये.
एका सुरक्षित परिघामधे अंधारात आयुष्य घालवणार्‍याला जेव्हा आपण प्रकाश दाखवून बाहेर ओढतो तेव्हा तो सुरुवातीला प्रतिकार करतोच. तेच वेद ने सुरुवातीला केले ( तिच्या घरी जाऊन तमाशा केला तो हाच प्रकार आहे)

@योग,

>> I don't do or qualify for paid reviews anyways! <<

ह्याचा रोख माझ्यावर तर नाही ना ?

Pages