हिंजवडी फेज१-प्रवास आणि प्रेक्षणीय स्थळे

Submitted by mi_anu on 29 November, 2015 - 03:19

नमस्कार!!
आपण जाणार आहोत एका छोट्या सहलीला. सहल छोटी, माहिती मोठी!!
सहल टप्पा: 'कुठूनही' ते हिंजवडी फेज १
लागणारा वेळः हा एका शब्दात उत्तर देण्याचा प्रश्न नाहीय. या प्रश्नाचं उत्तर मिळण्या साठी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या: कोणत्या वारी निघणार?कोणत्या ठिकाणाहून निघणार?कोणत्या वेळी निघणार?कोणत्या वाहनाने निघणार?'कोण' निघणार? त्याप्रमाणे उत्तर २० मिनीटे/४५ मिनीटे/१ तास/१.५ तास असे बदलू शकते.

तुम्ही कार ने किंवा दुचाकी ने येत असाल तर हे कॅलेंडर लक्षात ठेवा:
तारीख १ ते २५:
घाबरु नका, मुख्य नियम 'पुढे जाणे' हा आहे हे लक्षात ठेवा. बाकी नियम हे जमले तर पाळायचे नाहीतर सोडून द्यायचे.आपले आणि समोरच्याचे जीवन नश्वर आहे आणि देह हे एक क्षणभंगुर वस्त्र आहे, त्याच्या आतला आत्मा अमर आणि कोणत्याही अपघाताने नाश न पावणारा आहे हे लक्षात ठेवणे.
तारीख २६ ते ३१,३१ डिसेंबर्,दिवाळी,ख्रिसमस:
या दिवसात सर्व नियम नीट पाळा,वाहतूक पोलीस लायसन्स, पीयुसी(बोलीभाषेत 'प्युशी'),गाडीच्या मालकीची कागदपत्रे,हेल्मेट्,इन्श्युरन्स हे सर्व तपासण्याबद्दल आणि या वस्तूंच्या अभावाबद्दल पावत्या फाडायला आग्रही असतील.क्वचित प्रसंगी कलेक्शन नीट झाले नसले तर त्यांना खालील कारणांबद्दलही पावत्या फाडण्याचा मोह होईल.
१. एका बाजूला आरसा नाही.
२. नंबर प्लेट च्या एका आकड्याला ०.००१ मिलीमीटर चरा गेलाय
३. मागच्याला हेलमेट नाही.
४. चारचाकीचा एल नीट उचकटून काढला नाही.
५. अंगच्या (डाव्या) वळणाला रस्ता सर्व बाजूनी पूर्ण मोकळा असताना आणि सिग्नल लाल असताना वळलात.

अगदीच वेळ जात नसला आणि भांडायची भूक असली तर ट्रॅफिक पोलीसाला 'पी यु सी नसेल तर दंड करायचा हे कलम कुठे आहे दाखव' म्हणून वाद घाला किंवा 'मानकर चौकातून पिंपळे सौदागर चौकात जाताना दुचाकीवाले फूटपाथ वरुन गेले आत्ता तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म' म्हणून मर्माला हात घाला.पोलीस कळवळून 'अहो ऐकत नाही हो लोक..म्यान पॉवर कमी पडते आमची' म्हणून दु:ख ऐकवायला चालू करतील. अगदीच सोडले नाहीत पैसे तर नाव पत्ता घेऊन फेस बुकवर टाकेन पोस्ट अशा धमक्या देऊन पैसे भरा. पोलीस तुमची फेसबुक पोस्ट वाचणार नाही आणि तुम्हाला 'अन्यायाला वाचा फोडल्याचे' खोटे समाधान आणि पोलीसाला पैसे मिळतील. तुमच्यासारखे 'निषेधाचे मेल लिहीणारे, व्हर्च्युअल मेणबत्ती मोर्चा म्हणून पेज वर क्लिक करणारे,फेस बुक वर तावातावाने पोस्ट लिहीणारे पण प्रत्यक्ष दहा वाक्याचे बोलून भांडण नीट करता न येणारे' व्हाईट कॉलर मध्यमर्गीय हे आर टी ओ चे मुख्य उत्पन्न साधन आहे. अरे तुमच्याकडून पावती नाही फाडायची तर काय रॉकेल मिक्स डिझेल वर धूर काढणार्‍या सिक्स सीटर वाल्याकडून फाडायची?

बी आर टी बसः
या नव्या कोर्‍या सुंदर बसेस हल्लीच नीट चालू झाल्या आहेत. बी आर टी साठी बनवलेले ऐसपैस रस्ते या आधी चालणे, धावणे,ढोल पथक सराव,कराटे क्लास, स्केटिंग क्लास,दहीहंडी समारंभ,सूर्य नमस्कार्,योगा,झुंबा,मित्र मैत्रीणी कट्टा,प्रपोज 'मारणे' यासाठीच वापरले जात असल्याने हे सर्व बंद होऊन त्यावरुन बी आर टी धावणे हा सामान्य जनांसाठी फार मोठा मानसिक धक्का होता, त्यातून लोक नुकतेच सावरले आहेत.बस ने प्रवास करणार्‍यांना 'कधी खंडीत न होणार्‍या टेंपो,कार्,दुचाक्या,पाणीपुरीच्या गाड्या यांच्या रांगातून तून वाट काढून पायी रस्ता ओलांडून मधल्या बी आर टी स्टॉप वर कसं पोहचायचं' हे नेहमीचंच कोडं आहे. पण एकदा पोहचलात की तुमच्या साठी भरपूर बस आहेत.बी आर टी च्या जवळ आणि बी आर टी ने इच्छित स्थळाच्या थोडं लांब सोडल्यावर इच्छित स्थळी कसं पोहचायचं हे तेवढं बघा.जे लोक बी आर टी मध्ये बसणार नाहीत ते 'बी आर टी चा हिरवा, बी आर टी चा लाल, पादचार्‍यांचा हिरवा,पादचार्‍यांचा लाल,दुचाकी चौचाकीसाठीचा हिरवा आणि लाल' यात आपला जायचा आणि थांबायचा सिग्नल कोणता आणि कधी हे गणित मानांना आणि डोक्याला ताण देऊन रोज सिग्नलला पाच पाच मिनीट थांबून सोडवण्याच्या प्रयत्नात आहेत.

माणूस तिथे सेडानः
'लांबलचक गाडी चालवत येणारा एकटा माणूस' हा प्रकार रस्त्यात भरपूर प्रमाणात दिसेल. लगेच 'कार्बन फूटप्रिंट' म्हणून नाकं मुरडू नये. हा माणूस कोथरुड किंवा सहकारनगर किंवा हडपसर किंवा तळेगाव वरुन येणारा असेल तर तो 'रोज इतक्या लांबून हिंजवडीपर्यंत येतो' म्हणून तो एकटा मिनीबस घेऊन आला तरी त्याला सर्व गुन्हे माफ करावे (असं त्याचं म्हणणं असतं.) राहिली वाकड, पिंपळे सौदागर, निलख, भूमकर चौक, विशालनगर इथून लाबलचक गाड्यात एकटी बसून येणारी माणसं. यांना बोललं तर ते "मला पाठदुखी आहे..मोठी गाडी वीकेंडला पूर्ण कुटुंबाला सगळीकडे फिरवायला लागते..मग काय फक्त ऑफिसला यायला नॅनो आल्टो बायका(वुमेन नाही..बाईक चे अनेकवचन) विकत घेऊ होय?गरिब माणूस आहे मी.घराचे हफ्ते भरतानाच मरतोय." ऐकवून दाखवतील. ऑफिसच्या वेळात भर वाहत्या रस्त्यात इनोव्हा/अर्टिगा/इकोस्पोर्ट उभी करुन आईसक्रिम किंवा भाजी घ्यायला थांबणारे शूरवीर आहेत हे, प्रदूषण आणि कार्बन फूट प्रिंट ची चिंता करायला लागले तर जाणार कुठे? उद्या सैनिक रणगाडा चालवताना ट्रॅफिक आणि माइलेज चा विचार करायला लागले तर? "प्रश्नाला त्याच्या जागी सोडून द्या, प्रश्न स्वतःला सोडवेल" हे ताणमुक्त जगण्याचं महत्वाचं सूत्र आहे. भारतातले कित्येक राजकारणी या सूत्राचा वापर करुन अनेक वर्षे जगलेले आहेत.

'कसं' जायचं ठरवलं की मग बाकी प्रवास घरंगळत घरंगळत सावकाश पाट्या वाचत करा.सर्वात आधी ज्वेलर्स च्या पाट्या लागतील. हे ज्वेलर्स आधी 'फक्त सोनं आणि ठसठशीत कमीत कमी नक्षी आणि डाग वाले पारंपारीक दागिने' विकायचे, पण सोन्याचे भाव आकाशाला भिडले आणि गृहिणींना 'आज पाहुणे येणार आहेत त्यामुळे जीन्स कुर्ता किंवा ट्राउजर शर्ट न घालता पंजाबी ड्रेस ओढणी पोशाख करावा लागेल, किती अनकंफर्टेबल!!' वाटून कपाळाला आठ्या पडायला लागल्या तेव्हा या ज्वेलरांना 'शुद्ध सोन्याचे गोठ्, पाटल्या, हार ,तोडे ,तन्मणी' इ.इ बरोबर 'मीनाकारी,डायमण्ड,स्वोरोस्की,सिल्व्हर,ऑक्सीडाइझ्ड,प्लॅटीनम,नाजूक,ऑफिस वेअर ज्वेलरी' हे मंत्र शिकावे लागले.ज्वेलर्स हे आधुनीक काळातही 'सौभाग्य हाच खरा दागिना' या पातिव्रत्य सूत्राची जपणूक करताना दिसतील.मंगळसूत्र आणि जोडवी हा सक्तीचा दागिना आणि बारा महिने खरेदी आणि 'रेव्हेन्यू' मिळवून देणारा प्रकार, त्यामुळे जास्तीत जास्त जाहिराती मंगळसूत्र महोत्सवांच्या दिसतील.काही जाहीरातीत सिनेतारका डोळ्याइतके मोठे हिरे असलेला नेकलेस वगैरे घालून मिरवताना दिसतीलही, पण ते फक्त 'बघितले' जाणार, धंद्याला त्याचा उपयोग नाही हे सर्व सुवर्णकारांना माहिती आहेच.

त्याबरोबरच दिसणार्‍या जाहिराती या शाळांच्या.या जाहिरातींमध्ये गोंडस मुलं पायलट,डॉक्टर,खेळाडू,नर्तक,वकील(म्हणजे थोडक्यात जे व्यवसाय वेगळ्या पोशाखांनी उठून दिसतील ते सगळे व्यवसाय) बनलेली दाखवलेली असतात.'आमच्या कडे या, आम्ही तुमचं मूल पैलू पाडून दहा पंधरा वर्षांनी यातलं काहीतरी एक नक्की बनवून देतो' असा दावा करणार्‍या या जाहीराती असतात.
या जाहीराती पाहून सर्व वयोगटात वेगवेगळ्या विचारलहरी उमटतात.
-ज्यांची मुलं मोठी झालीत ते पालक "अरेच्च्या, आपण असला काही विचारच केला नव्हता नै पोराला पहिलीत घालताना? घरी आजी आजोबांचं ऐकत नव्हता म्हणून ३-४ तास शाळेत नेऊन बसवायचो." असा विचार करत पुढे जातात.
-ज्यांना अजून मुलं/बायका/नवरे नाहीत ते 'काय एकेक अतीच करतात..शाळा ही काय जाहीरात देण्याची गोष्ट आहे का?पोर जन्मलं म्हणजे शाळेत आपोआप जाणारच' असे कटाक्ष टाकत कोर्‍या चेहर्‍याने पुढे सरकतात.
-उरलेले रंजले गांजले पालक, ज्यांची मुलं यावर्षी शाळेत आयुष्यात पहिल्यांदा शिरणार आहेत ते 'ते सगळं सोडा..खाणं पिणं, गॅदरिंग,बस,पुस्तकं,डिपॉझिट सगळं मिळून वर्षाला किती हजारांना कापणार ते बोला' या नजरेने बघत फॉर्म साठी च्या रांगेत दोन दोन तास आळीपाळीने उभं करायला कोणत्या मित्रांना पटवायचं हे महत्वाचं प्लॅनिंग करत पुढे सरकतात.

८०% जाहीराती या तीन पैकी एका मुलभूत गरजेच्या, म्हणजेच 'निवारा'.
या जाहीराती पण भारताच्या आर्थिक तेजी मंदी च्या काळानुसार बदलत असतात. उदा:
- सर्व काही एकदम सुरळीत, सर्व उद्योग क्षेत्रांना सुवर्ण काळः
"आमच्या कडे या, दोन गॅलर्‍या एकमेकांसमोर नाहीत, अगदी तुम्हाला महिनोन महिने शेजार्‍याचे तोंडही पहावे लागणार नाही अशी छान रचना आहे आमच्या घरांची."
(हो ना!! प्रायव्हसी मिळाल्याशिवाय निवांत फेसबुक ला वेळ देऊन 'सोशल कनेक्ट' कसा वाढणार?)
"आमच्या कडे या, भारताची आठवण पण येणार नाही तुम्हाला.स्पॅनिश गॅलरी, त्याला इटालियन कठडे, आत बालीनीज बैठकीची खोली,चायनीज किचन,इजिप्तीशियन बेडरुम देऊ."
(जरा आमच्याकडे यायचे रस्ते अजून बनलेले नाहीत्,टेकडी ओलांडून गावठाणात दोन किमी कच्च्या रस्त्याने या,काय करणार आपण भारतात आहोत ना...)
"आमच्या कडे या, तुम्ही खेळ वेडे असाल तर आमच्या कडे जॉगिंग पार्क्,सायकलिंग पार्क, गोल्फ मैदान्,योगा सेंटर्,जिम,सावना(म्हणजे आमच्या भाषेत 'सोना'),स्विमिंग पूल चा आनंद घ्या."
(काय म्हणता?इथे घर घेतल्यावर इ एम आय चे पैसे कमावायला रात्रंदिवस राबावं लागतंय आणि हे सगळं वापरायला वेळ मिळत नाहीये? च्यक च्यक..जाऊद्या हो, आम्ही तसं पण हळूहळू सगळं बंद करुन फक्त जिम चालू ठेवणार आहे.)

-उद्योग क्षेत्रात मंदी
"राइट साइझ्ड होम्स"
"कोझी होम्स"
"पेंट हाऊसेस"
"आमच्याकडे या, पाच हजार भरुन बुक करा, स्टॅम्प ड्यूटी माफ, पहिल्या शंभरांना टिव्ही मोफत"
"आमच्याकडे या, घरात रहायला आल्यावर इ एम आय चालू, तोपर्यंत सुखाने जगा"

-अजून एक बिल्डरांचा वर्ग आहे जो तुमच्या 'फॅमिली टाईम' ला वाढवण्याचा आणि प्रदुषण कमी करण्याचा दावा करतो
"नऊ ते पाच ऑफिस, पाच मिनीटात घरी परत्,बच्चे खुष,बायको खुष, तुम्ही बसा गिटार वाजवत."
(पाच मिनीटात बाणेर बालेवाडी ते हिंजवडी फेज १?पहाटे तीन ला का?की प्रायव्हेट जेट विमानाने?)
"शहराच्या उलट्या बाजूला फेज ३ च्या पुढे या, ट्रॅफिक नाही,मनाला ताण नाही,दीर्घायुष्य,आरोग्य,निरोगी हृदय"
(आलोय...बायको रोज शिव्या घालतेय नातेवाईकांपासून लांब कोणत्या टेकडीवर आणून ठेवलं म्हणून.)
"आमच्याकडे या, रहदारीपासून दूर घनदाट हिरव्यागार मखमली झाडांवर चमकणार्‍या सोनेरी दवबिंदूंच्या सान्निध्यात रोज नव्याने तरुण आणि ताजे तवाने व्हा."
(याच्या साईट वर सध्या दहा रुपयाला एक अशी मिळणारी पाच रोपं आहेत फक्त, जी जास्तीत जास्त पाच फूट वाढतात.पण गाफिलपणे 'कुठाय हो ते सोनेरी दवबिंदू वालं हिरवं मखमली झाड' म्हणून बिल्डरला विचारु नका.त्याला 'ओ हे काय झाडं आहेत दिसत नाही का' पासून ते 'तुम्ही बुक करा हो शेट, ते काय तुमचा तो दवबिंदू अने मखमली झाड बिड सगला एकदम चोक्कस करुन देऊ फुडच्या धा वर्षात' पर्यंत काहीहीही उत्तरं मिळू शकतील.)

वाकड पूल संपताना एका श्रीमंत बिल्डराच्या उंदरी किंवा वानवडी किंवा तिथेच कुठेतरी असलेल्या प्रोजेक्टची एक जाहीरात आता मागच्या वर्षीपर्यंत होती. (बहुतेक या लिंकवर आहे ती स्त्री आणि तो फोटो त्या पोस्टरवर होता.लिंक स्वतःच्या जबाबदारीवर मागे किंवा शेजारी कोणी उभे नसताना उघडावी. https://www.behance.net/gallery/25103207/Marvel-Kyra )
"तुमच्या प्रायव्हेट स्विमिंग पूल मध्ये पहाटे चार ची डुबकी" असं काहीतरी शीर्षक आणि पाण्यात डुंबणार्‍या एक सुंदर आणि (जवळ जवळ शून्य)पोशाखातील भगिनी अशी जाहीरात होती. जाहीरातीने बर्‍याच गाडी चालवणार्‍या माणसांचे 'ही पहाटे चार वाजता स्विमींग पूल मध्ये का बरं जात असेल' याबद्दल वेड्यावाकड्या वेधक कल्पना करुन हृदयाचे ठोके आणि गियर्स चे गणित चुकवले होते.बायकांचे पण 'नक्की बेंचवर असेल किंवा नवरा गावी असताना घरी असेल भवानी.सकाळी मुलांना बस ला सोडून नंतर डबे करुन दळण टाकून ऑफिसात राबून नंतर एक तास गाडी चालवून घरी येऊन पोरांचे अभ्यास घेऊन स्वयंपाक झाकपाक करुन मग अंथरुणावर ये म्हणावं, नाही पहाटे चार ला डाराडूर घोरत पडलीस तर जन्मभर आयब्रो करणार नाही.' असे काहीसे प्रक्षोभक विचार यामुळे ट्रॅफिक तुंबायला लागलं. त्यामुळे गाड्या चालवणार्‍या लोकांवर दया करुन चित्रांगदा ताईंची निळ्या परकर झंपरातील सुंदर पण जास्त प्रक्षोभक नसलेली जाहीरात तिथे लावण्यात आली.

वाकड पूल ओलांडताना अवश्य बघावी अशी जाहीरात म्हणजे अमूल गर्ल ची.सध्या काय चालू आहे, यावर अगदी नेहमीच आणि योग्य आणि मार्मिक टिप्पणी करणं या जाहीरातीने वर्षानुवर्षं पाळलंय.

अजून एका प्रसिद्ध बेकर ची जाहीरात वाकड पुलाच्या टोकाला बरेच महिने होती. "आम्ही लवकरच येत आहोत..केक सोबत आनंदही घेऊन" अशा जाहीरातीतल्या 'आनं' वर जाहीरात लागल्यावर लगेच नेमकं एका उमेदवाराचं पोस्टर चिकटल्याने ते सर्वाना 'आम्ही लवकरच येत आहोत केक सोबत दही घेऊन' वाचावं लागलं आणि बर्‍याच भाबड्या न-पुणेकरांनी घरी सांगताना "पुण्यात दह्यात बुडवून केक खातात जिलबी रबडीसारखं" हा अपप्रचार केल्याचं आठवतं.

वाकड पूल ओलांडल्यावर स्थानिक राजकारण्यांचे फ्लेक्स चालू होतात.याबाबत व्यासंग वाढवण्याचा चांगला काळ म्हणजे दहीहंडी. कोण किती पाण्यात आहे, कोणी बिपाशा बोलावली, कोणी सनीताई बोलावल्या, कोणी यावर्षी पुण्यातलीच मराठी मालिकेची नायिका बोलावली यावरुन नेत्यांचे 'स्टेटस' ठरते.या सर्व व्यक्ती बोलावणे हे प्रमुख उद्दिष्ठ, दहीहंडी फोडली जाईलच असं काही नसतं.

मॅरीयट हॉटेल च्या थोडं आधीपासून दुचाकी वाल्यांना विरुद्ध दिशेच्या रस्त्याच्या लेन मधून प्रवाहाविरुद्ध जायची सवलत आहे.फुग्यात भरलेली हवा जसा पूर्ण फुगा व्यापते तशी ही दुचाकीवाल्यांची एक लेन हळूहळू पूर्ण विरुद्ध बाजूचा रस्ता व्यापायचा प्रयत्न करते आणि मग एखाद्या बसवाल्याला दुचाकीवाल्यांच्या अंगावर बस जवळजवळ घालून त्यांना त्यांच्या एका लेन मध्ये हुसकवावे लागते. या सर्व गोंधळात संताराम वाईन्स कडून सर्व रहदारीच्या उलट्या दिशेने ट्रिपलसीट येणारे स्पाइक्स आणि ब्लीच्ड जीन्स वाले नवतरुण भर घालत असतात, त्यांना बर्‍याच दिवसात कोणाला शिव्या घालायला न मिळाल्याने त्यांचं रक्त सळसळत असतं. पण ज्यांनी त्यांना संताराम वाईन्स मधून बाहेर पडताना पाहिलंय ते सर्व कार आणि दुचाकीचालक चेहर्‍यावर राष्ट्रपित्याच्या तोडीचे क्षमाशील भाव आणून शांतपणे ती मुलं जाऊ देतात.संताराम वाईन्स चे गेल्या सात वर्षात झालेले झकपकीकरण आणि भरभराट यावरुन त्यांच्या लोकप्रियतेची खात्री पटावी.या मुलांना जाऊ दिलं तसंच सरपंचाच्या घरवाल्या गल्लीत आडवे जाणारे पाण्याचे टॅंकर पण एकदम शांत चेहरा करुन जाऊ द्यायचे असतात.'शांत चेहरा', 'साधी गाडी' आणि 'मराठी बोलणे' ही हिंजवडी वाहतूकीत भांडणं न करता आयुष्य जगण्याची महत्वाची त्रिसूत्री आहे.

याच सर्व गर्दीत तुम्हाला 'सिक्स सीटर' नावाचे वाहन पहायला मिळेल.नाव सिक्स सीटर असलं तरी हा जादूचा रथ प्रसंगी १७ लोक सामावून घेताना मी याची देही याची डोळा पाहिलं आहे. (हॅ!! गुंडाळतेय!! वगैरे म्हणू नका.पुढे ड्रायव्हर धरुन चार, मागे दोन सीटांवर चार चार,खिडकीत दोन्ही बाजूला एक एक, मध्ये मोठं लाकडी स्टूल टाकून तीन...मोजा आता.) या वाहनाला इंडीकेटर देणे, ब्रेक लावताना इशारा देणे इ.इ. सामान्य जनांना असलेली बंधनं नसतात, तुम्ही चालताना थांबता किंवा वळता तेव्हा इंडीकेटरचा लाईट हातात ठेवता का? नाही ना? मग असंच समजा की एक मोठा लांबरुंद ३ फूट बाय ५ फूट बाय ६ फूट माणूस चालतोय.आणि स्वतः गाडी चालवताना लक्ष ठेवा.

तुम्ही जर ऑफिस बस च्या वेळात या चौकात दुचाकीवर असाल तर एकमेकांशी स्पर्धा करणार्‍या दोन बस च्या मध्ये चिणून जवळ जवळ अनारकली बनण्याचा अनुभव टाळा. चारचाकी मध्ये असाल तर गाडीचे आरसे किंवा कोपरे खरचटत जाणार्‍या दुचाक्यांकडे बघून रक्त उकळवणे सोडा.विकारांवर विजय मिळवणे ही मोक्षाची पहिली पायरी आहे.क्लच प्लेट जळणे,गाडी ला पोचे,चरे पडणे या गोष्टी होतच राहतात. सुंदर गोंडस बाळाला आपण नाही का काजळाची तीट लावत?

आता तुम्ही घरातून निघाल्यावर बर्‍याच मिनीटांनी किंवा तासांनी हिंजवडी फेज १ मध्ये पोहचला आहात. 'अब तो मंझील से बेहतर लगने लगे है ये रास्ते' अशी तुमच्या अवस्था नक्की झाली असेल. घाबरु नका, बेहतर रास्ते आहेतच परत जाताना.गणपतीचे दिवस, आय पी एल चे दिवस, पालखीचे दिवस, नवरात्रीचे दिवस,लाँग वीकेन्ड आधी चा दिवस, मोठ्या सुट्टीनंतरचा दिवस अशी या प्रवासाची वेगवेगळी विलोभनीय रुपे आहेत, तेही अनुभव घ्यायला विसरु नका.
(समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट लिहिलंय, मी_अनु ! झक्कास उपहार अन तूफान विनोदी ! यातले बरेचसे अनुभव स्वतः घेतले असल्यामुळे
प्रत्येक परिच्छेदाला हसत होतो. :-)))

काही वाक्यांना गडाबडा लोळणार याचा अंदाज अाल्याने घरच्यांनी आधीच जागा करून दिली :-)))

एकंदरीतत लई भारी !

जबरदस्त!
बाय द वे...
एक बातमी ऐकली.. म्हाळुंगे ते हिंजवडी फेज १ च्या नियोजित रस्त्याला म्हाळुंगे ग्रामस्थांचा तीव्र विरोध झाल्याने तो प्लॅन बासनात ठेवला गेलाय. सौ. सुप्रिया सुळे आधी पाठपुरावा करत होत्या पण आता युतीचे सरकार असल्याने हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यात त्यांना काही फायदा नाही त्यामुळे पुढे काही आताच होणे कठीण दिसतेय.

मस्तं लिहीलय. फेज ३ चा अनुभव असल्याने पुढच्या - विप्रो चौक, इन्फोसिस, कॉड्रॉन इ. प्रेक्षणीय स्थळांची कमतरता जाणवली.

हॅहॅहॅ...
आता ई स्क्वेअर चालू झाल्यापासून बाणेर, विशाल नगर, पिंपळे सौदागर कडची लोकं संध्याकाळी बाहेरून येतात आणि यु टर्न घेऊन वाहनांची ओसंडून वाहणारी नदी पार करून डी मार्ट कडे आत घुसायचा प्रयत्न करतात. मज्जानी लाईफ

फार दिवसांत ह्या रस्त्यावर जाणं झालं नाहीये.. पण सगळे पंचेस परफेक्ट आहेत.. आणि जागांचे उल्लेख तर तिथे उभे राहूनच लिहिल्यासारखे वाटत आहेत..

मस्त लिहलय!
हिंजवडीच्या रस्त्यावर कंपनी बस एकदम बेस्ट.... उलट जितके जास्त ट्रॅफिक तितकी जास्त झोप होते Wink

वाह.. भारी लिहिलं आहे. हिंजवडी सारख्या रस्त्यावर लिहिताना केलेलं सुक्ष्म निरिक्षण ते ही इतकं मन लावून.. कमालच आहे. तिथल्या स्थानिकांमधे मोडत असल्याने एवढा फारसं कधी वाटलं नव्हतं पण आता भुंगा... हे असं पण आहे तर हिंजवडी आणि रस्ते ! Wink

धमाल लिहीले आहे :). आधी मला वाटले खरेच माहिती व तेथील बिल्डिंग ची चित्रे वाला लेख आहे म्हणून उघडायला वेळ लागला. पुण्यातील मित्रांकडून ऑफिस ला जायला लागणारा वेळ दोन भागांत विभागून सांगितलेला नेहमी ऐकलेला आहे - हिंजवडीच्या एण्ट्रन्स पर्यंत अर्धा तास, आणि मग ऑफिसपर्यंत पोहोचायला अमुक वेळ अशा स्वरूपात. त्यावरून कल्पना आहे.

मात्र हिंजवडीच्या बाबतीत "हिंजेवाडी" नावाचा एक कल्ट आहे त्याबद्दलही थोडी माहिती द्यावी ही विनंती Happy

Lol
जबरी निरिक्षण. !

ह्यात ते मधून उलट येणारे लोकं राहिले. ते हेड लाईट लावून येतात. जणू काही त्यामुळे सरळ बाजूने येणार्‍यांना काहीही त्रास होणार नाही अन त्यांनी निमूटपणे जागा सोडावी.

मस्त.
फेज वन वाले पुण्यात्मे आहेत. आम्ही रौरव नरकातले ३ र्या फेजातले. ३-१ येतानाच तोंडाला फेस येतोय. त्यात कं. बस ट्रॅफिक जामात तुंबली, की काळ्या खडकाजवळचे डासेस फोडून काढतात.बसमधील काही सुंदर्‍यांना सफोकेशनमुळे मरणार्‍या माणसांपेक्षा केस न उडावेत म्हणून खिडक्या बंद हव्या असतात.

बादवे प्रवासातील दोन तीन अजून इन्ट्रेस्टींग गोष्टी...

अमूक अमूक भाऊ, दादा, तात्या ह्यांच्या भगिनी/वहिनी,/स्नुषा वगैरे (वॉर्ड मधे महिला आरक्षण असल्याने) ह्यांचे ग्रामपंचायतीतून बिनाविरोध निवड झाल्यामुळे केरळी नवरीच्या वरताण सोन्याने मढलेले फोटु ...

फेज ३ मधल्या हेलिपॅडवर, एका ९० च्या आज्जीचे पुण्यस्मरण असलेला लई मोठा फ्लेक्स बरेच दिवस होता. स्थानाचे प्रयोजन समजले नाही.

काही व्यवसायाच्या अनुशंघाने येणारी (की आड येणारी) नावे ?
डोळ्याचे मोतीबिंदू पेशल हॉस्पिटल - डॉ. पोखरण्कर
मॅटीर्नीटी होस्पिटल - डॉ. कात्रे

फेज ३ मधल्या हेलिपॅडवर, एका ९० च्या आज्जीचे पुण्यस्मरण असलेला लई मोठा फ्लेक्स बरेच दिवस होता. स्थानाचे प्रयोजन समजले नाही. >>

च्च. अहो तिकडे बाजूच्या देहूमध्ये तुकाराम विमानाने सदेह वैकुंठाला गेले. इकडे आज्जींना निदान हेलिकॉप्टर तरी हवे. असे नातूमंडळी म्हणत असतील.

नशीब माझ्या नवर्‍याला माबोची माहिती नाही. घरापासुन ६ km असलेली MNC सोडुन ४२ km दुर, फेज ३ मधली ऑफर मी घेउ नये म्हणुन रोज नविन कारणं घेउन येतो आहे. (मला ३५% हाइकचा मोह आवरत नाहीए. ) हा लेख त्याने वाचला तर मी हिंजेवाडी मधला जॉब कधीही घेवु शकणार नाही. आणि मी पण थोडी घाबरलेच आता. Happy

मस्त आणि पर्फेक्ट! मी सद्ध्या हिंजवडी सुटल्याच्या आनंदात आहे! पण एकदा माझ्याबरोबर खराडीला येतेस का? अजून एका लेखाला सणसणीत माल पुरेल ही ग्यार्‍यांटी!!

Pages