पाऊस, तू आणि मी

Submitted by _हर्षा_ on 25 November, 2015 - 00:56

चिंब पाऊस, कॉफीचा मग आणि तू
कितीतरी वेळ बरसणारा तो आणि तुझ्याबरोबर,
तुझ्याच मिठीतून वेड्यासारखी खिडकीतल्या त्याच्याकडे
बघणारी मी...

आताशा बरसणार्‍या त्याला बघुन, हरवून जाते मी
पण तुला आठवत...भिनते पहाटेची ती निळीभोर वेळ..
समोर दिसणारं चांदणभरलं आभाळ अन् चंद्राची कोर
वार्‍याच्या अलवार झोताबरोबर घट्ट घट्ट होत जाणारी तुझी मिठी
अन् निश्चिंत मनाने टाकलेले ते उसासे... सलतात कितीतरी!

रिमझिम बरसणार्‍या त्याला बघुन आठवतोस तू..
अन् रिमझिम सरीसारख्या भेटीतली अनामिक ओढ,
कितीतरी वेळ तुझ्याबरोबर घालवलेले निरव शांततेतले क्षण
शब्दांची गाज रूंजी घालते मनात अन् समोर दिसतोस तू!

त्याची खिडकीबाहेर उधळणारी नक्षी बघुन माझ्या आरक्त
गालावरचं गुलाबीपण वेचणारा तू अन् माझ्या डोळ्यातले
भाव टिपून मला शब्दांतून मनमुक्त बरसू देणारा तू..
मला ऐकून शब्दांच्या जाळ्यात अडकून मैफीलीत रंगलेले आपण..
आठवतो आजही!

खिडकीबाहेर त्याचं चाललेलं थैमान, माझी नजर खिळलेली त्याच्यावरच
पण मन मात्र अडकून पडलेलं त्याचं सयींच्या थैमानात..
तुझ्या प्रत्येक श्वासांच्या, स्पर्शांच्या बदल्यात ती ओढ देऊन,
तुझी जागा रिक्त करून गेलेला तू.. अन्..
अन् आता खिडकीतला तो बरसायला लागतो डोळ्यातूनही..!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users