सहजीवनातील गोडवा

Submitted by धनंजय भोसले on 5 November, 2015 - 00:22

मे महिन्यातील एक टळटळीत दुपार. एका घरगुती कार्यक्रमासाठी पाहुण्यांकडे गेलो होतो तिथे माझी मावशी सुद्धा आलेली. घरी परतत असताना तिने तिच्याकडची एक पिशवी मला दिली आणि सांगितले की यात कैऱ्या आहेत आईला म्हणावे लोणचे घाल. मी पिशवी घेतली आणि उघडून पहिले तर आत गडद हिरव्या रंगाच्या छोट्या छोट्या कैऱ्या. त्यांच्या रंग-रूपावरून खूप आंबट वाटत होत्या. कदचित म्हणूनच त्या लोणच्यासाठी वापरायला सांगितल्या असे वाटून मी ती पिशवी तशीच गाडीच्या डिकीत ठेउन घरी आलो. घरी आल्यावर डिकीत कैऱ्यांची पिशवी आहे हे विसरून देखील गेलो. असेच दोन दिवस गेले आणि गाडीत बसल्यावर गोडसर वास येऊ लागला. वास डिकीतून येतोय हे लक्षात आले. डिकी उघडून बघतो तर मावशीने दिलेली कैऱ्यांची पिशवी दिसली. आता आईची बोलणी खावी लागणार असा विचार करतच पिशवी उचलली.. गोडसर वास त्या पिशवीतून येत होता..! पिशवी उघडून पाहतो तर गडद हिरव्या रंगाच्या कैऱ्यांचे रुपांतर पिवळ्याधम्मक आंब्यात झाले होते. वीस-पंचवीस छोटे छोटे गावरान गोटी आंबे ‘आतातरी आम्हाला बाहेर काढ’ अशा अविर्भावात मझ्याकडे बघताहेत असे वाटले.

सर्वांसमवेत छान पिकलेले ते गोटी आंबे चोखून खाताना गोडीवर विश्वासच बसत नव्हता. मावशीकडून कैऱ्या घेताना रंग-रूपावरून आंबट असतील असे वाटत होते परंतु त्या पिकल्यावर मात्र मिठ्ठास चवीच्या आंब्यात रुपांतरीत झाल्या होत्या. कैऱ्यांना पिकविण्यासाठी ना आढी लावावी लागली ना अंधाऱ्या जागी ठेवावे लागले. ज्या कापडी पिशवीत मावशीने माझ्याकडे सोपवले त्याच पिशवीत कसलेही आढेवेढे न घेता गाडीच्या डिकीमधेच कैऱ्या छान पिकल्या होत्या. घरातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी त्या आंब्यांचा मनसोक्त आस्वाद घेतला. आजच्या जमान्यात ठगवणाऱ्या मार्केटिंगला भुलून, २-४ प्रजातींची कलमे करून भरघोस पिक आणलेल्या आणि रसायने वापरून पिकवलेल्या आंब्यांची चलती असते. असे महागडे कलमी आंबे खाताना जे समाधान मिळाले नाही ते हे छोटे-छोटे गावरान गोटी आंबे खाताना मिळाले.

लोणच्यासाठी दिलेल्या कैऱ्या निष्काळजीपणामुळे पिकल्याचा ठपका खावा कि नको अशा विचारातच मी मावशीला फोन लावला. लोणच्याच्या कैऱ्या पिकून त्यांचे आंबे कसे झाले आणि ते किती मधुर चवीचे निघाले याबद्दल सांगितले.

मावशी म्हणाली, 'अजून हवे असतील तर घरी ये आणि हवे तेवढे घेऊन जा.. पुढच्या वर्षी हे आंबे मिळतील कि नाही माहित नाही..!'
मी गोंधळून विचारले, 'असे का म्हणतेस?'
मावशी उत्तरली, 'हे आंबे समोरच्या काकांच्या आंब्याच्या झाडाचे. त्यांचं घर विकलं आता. नवा घरमालक हे झाड ठेवतोय कि तोडून टाकतोय काय माहित..!'

अचानक माझ्या डोळ्यासमोर ते घर आणि त्यापुढे असलेला डेरेदार आम्रवृक्ष आला. मावशीकडे जाणं-येणं असल्याने तिच्या कॉलनीतील शेजारी-पाजारी माझ्या परिचयाचे. समोरच्या काका-काकुंचे घर म्हणजे एक टुमदार बंगलाच. तिथे काका-काकू दोघेच राहायचे. दोघांना एकमेकांचा आधार. मुली लग्न होऊन सासरी गेलेल्या. काका-काकूंनी बागेत बरीच फुलझाडे आणि फळझाडे लावलेली. त्यातीलच एक हा गोटी आंबा. २५-३० वर्षाचं डेरेदार झाड. दरवर्षी शेकडो आंबे लगडलेले असतात. आज ते आंबे खाण्याचा योग आला.

मी मावशीला सांगितले, ' काका-काकू कुठे भेटले तर सांग कि आंबे फार गोड आहेत.'
मावशी म्हणाली, 'अरे, समोरचे काका महिन्यापूर्वीच वारले.. त्यांच्या मागे काकूंनी घर विकून टाकले'

काका वारले हे ऐकून वाईट वाटले. त्यांच्या मागे एवढ्या मोठ्या घरात काकू एकट्या राहणे अवघड होते. त्यामुळे कदाचित त्यांनी घर विकण्याचा निर्णय घेतला असेल. काकूंना भेटावे असे वाटून मी मावशीला काकूंचा सध्याचा पत्ता विचारला त्यावर मावशीने सांगितलेली माहिती ऐकून चकित झालो.

काका-काकूंनी आधीच ठरवल्याप्रमाणे दोघांपैकी एकाच्या मृत्युनंतर जो कोणी मागे राहील त्याने एकट्याने घरात न राहता आणि या वयात कुणाही नातेवाइकाकडे राहायला न जाता वृद्धाश्रमात राहायचे. दोघांनी आधीच पुण्यातील विविध वृद्धाश्रम पाहून त्यातील एक बुक केला होता. ठरल्याप्रमाणे काकूंनी घर विकून आलेल्या पैशातील काही रक्कम स्वतःकडे ठेऊन उरलेली मुलींना समप्रमाणात वाटली.घरातील फर्निचर अनाथाश्रमाला दान केले. उरलेले सर्व सोपस्कार पार पाडून सर्व परिचितांची भेट घेऊन त्या वृद्धाश्रमात राहायला गेल्या.

मावशीकडे गेल्यानंतर समोरच्या घरातील काका-काकूंची भेट आता कधीच होणार नाही या कल्पनेने वाईट वाटले. इतक्या वर्षांचे आनंदी सहजीवन संपवून ते दोघेही अगदी ठरवल्याप्रमाणे घर सोडून गेले. सहजीवनातील गोडवा त्यांनी लावलेल्या आंब्याच्या झाडातील फळात सुद्धा उतरला हे जाणवल्याने मी मनोमन त्या दोघांनाही प्रणाम केला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवसाची सुरुवात अशा प्रसन्न वृत्ती दाखविणार्‍या लेखन वाचनाने व्हावी या परता दुसरा आनंद नाही. वर धनवन्ती म्हणतात त्याप्रमाणे लेखातील (तसेच त्यात आलेल्या व्यक्तींची....) सकारात्मक दृष्टी खूप भावली. पिकलेल्या आंब्यांची गोडी अवीट असतेच पण व्यक्ती पिकल्यानंतरही इतक्या गोड पद्धतीने स्वतःच्या उरलेल्या आयुष्याबद्दल खंबीर (खंबीरच म्हणावे लागेल) निर्णय घेऊन अंमलातही आणतात याबद्दल त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला.

काकू वृद्धाश्रमात राहायला गेल्यानंतरही त्या त्यांच्या स्वभावानुसार तिथे केवळ बसून न राहता....त्या परिसरातही कच्च्या आंब्यापासून गोडीचे आंबे आपल्या स्वभावानुसार आणत राहतील हा मला विश्वास वाटतो.

धन्यवाद धनंजय भोसले....या लेखाबद्दल.

लेख आवडला. सकरात्मक दृष्टीकोन बरच काही शिकवून गेला.
असे लेख वाचले की खरच एक वेगळीच उर्जा मिळते असे मला वाटते.>>>>> +१

धनंजय, लेख आवडला पण वृद्धाश्रमात जाण्याच्या निर्णयाने चकीत का झालात ? मूळात त्यात एवढे केविलवाणे काय आहे ? काळाची गरज आहे ती आणि जितक्या डोळसपणाने त्याचा स्वीकार होईल तितका चांगला.

खूप छान लेख्,मधुर आणी गोड!! Happy
काकूंनी योग्य निर्णय घेतलाय अगदी, कोणत्याही परिस्थितीत आपलं स्वातंत्र्य आणी स्वाभिमान न गमावण्याचा!!!

‘आतातरी आम्हाला बाहेर काढ’ अशा अविर्भावात मझ्याकडे बघताहेत असे वाटल>>>>>> खासचं.

काका-काकूंनी आधीच ठरवल्याप्रमाणे दोघांपैकी एकाच्या मृत्युनंतर जो कोणी मागे राहील त्याने एकट्याने घरात न राहता आणि या वयात कुणाही नातेवाइकाकडे राहायला न जाता वृद्धाश्रमात राहायचे. >>>> हे कै च्या कै वाटले. खरचं असं घडु शकतं?
कोणी एक गेला म्हणुन दुसऱ्याने त्या घरात राहायला नक्की काय प्रॉब्लेम होता?. यात नक्की कसला स्वाभिमान आहे?

माफ करा मला जरा शेवट खटकला.

सुरेख .
@जव्हेरगंज
कदाचित सहजीवनाच्या आठवणी मागे उरलेल्या जोडीदाराला अजुन एकट पाडतील ...म्हणुन असेल

उतरत्या वयात एकट्याने राहण्यात अडचण येऊ शकते. अचानक कधी पाय घरून पडणे, तब्येत बिघडणे अश्या अडचणी उदभवल्या तर वेळेवर कुणीतरी मेडिकल हेल्प करता फोन करणे, निदान धावून शेजार्यांना इन्फॉर्म करणे
अशी कामे करायला सोबती लागतोच ना .. म्हणून ओल्ड एज होम चा पर्याय मला तरी आवडतो आणी पटतो ही.
नातेवाईकांकडे , अगदी मुलाबाळांकडे ही चार दिवस पाहुणे म्हणून राहणं ठीकाय ,पण पर्मंनंटली ? नेव्हर!!! तुम्ही त्यांच्याकडे फुकट जरी राहात नसलात तरी एक प्रकारचे मिंधेपण येऊ शकते.
त्यापेक्षा ओल्ड एज होम मधे तुम्हाला तुमच्या वयाची मंडळी भेटतील, नवीन मित्रमंडळी जोडता येतील.
आणी आजकाल ओल्ड एज होम्स, फाईव स्टार च्या तोडीची ही अवेलेबल आहेत,मस्तपैकी पे अँड स्माईल!! Happy

वर्षू, खरेच किती छान विचार आहेत हे. वृद्धाश्रमात जाणे हे त्या व्यक्तीला, नातेवाईकांना, मुलांना आणि समाजालाही लाजिरवाणे वाटू नये. आजकाल एकत्र कुटुंब नसतात, घरातील सर्वच जण नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने घराबाहेर असतात आणि नसले तरी त्यांना एका वृद्ध व्यक्तीची देखभाल करणे जमेलच असे नाही. हा निर्णय वृद्धानीच आपला आपण घ्यावा, जसे इथल्या कथेत काकूंनी घेतला तसा.

@ जव्हेरगंज यांच्या प्रश्नांची उत्तरे @ वर्षू नील व प्रीतमोहर यांनी दिली यबद्दल त्यांचे आणि इतर सर्वांचे प्रतिक्रियांबद्दल आभार..! Happy

@ दिनेश : मोठ्या शहरांत असे वृद्धाश्रमात रहाणे कदाचित मोठ्या मनाने स्विकारले जात असेल पण आई-वडिलांना शेवट्पर्यंत संभाळ्णे हे मुलगा-मुलगी यांचे कर्तव्यच आहे असे मला वाटते. अर्थात तेवढे मायाजाळ घरात असायला हवे म्हणा...!!

छान!

Pages