सहजीवनातील गोडवा

Submitted by धनंजय भोसले on 5 November, 2015 - 00:22

मे महिन्यातील एक टळटळीत दुपार. एका घरगुती कार्यक्रमासाठी पाहुण्यांकडे गेलो होतो तिथे माझी मावशी सुद्धा आलेली. घरी परतत असताना तिने तिच्याकडची एक पिशवी मला दिली आणि सांगितले की यात कैऱ्या आहेत आईला म्हणावे लोणचे घाल. मी पिशवी घेतली आणि उघडून पहिले तर आत गडद हिरव्या रंगाच्या छोट्या छोट्या कैऱ्या. त्यांच्या रंग-रूपावरून खूप आंबट वाटत होत्या. कदचित म्हणूनच त्या लोणच्यासाठी वापरायला सांगितल्या असे वाटून मी ती पिशवी तशीच गाडीच्या डिकीत ठेउन घरी आलो. घरी आल्यावर डिकीत कैऱ्यांची पिशवी आहे हे विसरून देखील गेलो. असेच दोन दिवस गेले आणि गाडीत बसल्यावर गोडसर वास येऊ लागला. वास डिकीतून येतोय हे लक्षात आले. डिकी उघडून बघतो तर मावशीने दिलेली कैऱ्यांची पिशवी दिसली. आता आईची बोलणी खावी लागणार असा विचार करतच पिशवी उचलली.. गोडसर वास त्या पिशवीतून येत होता..! पिशवी उघडून पाहतो तर गडद हिरव्या रंगाच्या कैऱ्यांचे रुपांतर पिवळ्याधम्मक आंब्यात झाले होते. वीस-पंचवीस छोटे छोटे गावरान गोटी आंबे ‘आतातरी आम्हाला बाहेर काढ’ अशा अविर्भावात मझ्याकडे बघताहेत असे वाटले.

सर्वांसमवेत छान पिकलेले ते गोटी आंबे चोखून खाताना गोडीवर विश्वासच बसत नव्हता. मावशीकडून कैऱ्या घेताना रंग-रूपावरून आंबट असतील असे वाटत होते परंतु त्या पिकल्यावर मात्र मिठ्ठास चवीच्या आंब्यात रुपांतरीत झाल्या होत्या. कैऱ्यांना पिकविण्यासाठी ना आढी लावावी लागली ना अंधाऱ्या जागी ठेवावे लागले. ज्या कापडी पिशवीत मावशीने माझ्याकडे सोपवले त्याच पिशवीत कसलेही आढेवेढे न घेता गाडीच्या डिकीमधेच कैऱ्या छान पिकल्या होत्या. घरातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी त्या आंब्यांचा मनसोक्त आस्वाद घेतला. आजच्या जमान्यात ठगवणाऱ्या मार्केटिंगला भुलून, २-४ प्रजातींची कलमे करून भरघोस पिक आणलेल्या आणि रसायने वापरून पिकवलेल्या आंब्यांची चलती असते. असे महागडे कलमी आंबे खाताना जे समाधान मिळाले नाही ते हे छोटे-छोटे गावरान गोटी आंबे खाताना मिळाले.

लोणच्यासाठी दिलेल्या कैऱ्या निष्काळजीपणामुळे पिकल्याचा ठपका खावा कि नको अशा विचारातच मी मावशीला फोन लावला. लोणच्याच्या कैऱ्या पिकून त्यांचे आंबे कसे झाले आणि ते किती मधुर चवीचे निघाले याबद्दल सांगितले.

मावशी म्हणाली, 'अजून हवे असतील तर घरी ये आणि हवे तेवढे घेऊन जा.. पुढच्या वर्षी हे आंबे मिळतील कि नाही माहित नाही..!'
मी गोंधळून विचारले, 'असे का म्हणतेस?'
मावशी उत्तरली, 'हे आंबे समोरच्या काकांच्या आंब्याच्या झाडाचे. त्यांचं घर विकलं आता. नवा घरमालक हे झाड ठेवतोय कि तोडून टाकतोय काय माहित..!'

अचानक माझ्या डोळ्यासमोर ते घर आणि त्यापुढे असलेला डेरेदार आम्रवृक्ष आला. मावशीकडे जाणं-येणं असल्याने तिच्या कॉलनीतील शेजारी-पाजारी माझ्या परिचयाचे. समोरच्या काका-काकुंचे घर म्हणजे एक टुमदार बंगलाच. तिथे काका-काकू दोघेच राहायचे. दोघांना एकमेकांचा आधार. मुली लग्न होऊन सासरी गेलेल्या. काका-काकूंनी बागेत बरीच फुलझाडे आणि फळझाडे लावलेली. त्यातीलच एक हा गोटी आंबा. २५-३० वर्षाचं डेरेदार झाड. दरवर्षी शेकडो आंबे लगडलेले असतात. आज ते आंबे खाण्याचा योग आला.

मी मावशीला सांगितले, ' काका-काकू कुठे भेटले तर सांग कि आंबे फार गोड आहेत.'
मावशी म्हणाली, 'अरे, समोरचे काका महिन्यापूर्वीच वारले.. त्यांच्या मागे काकूंनी घर विकून टाकले'

काका वारले हे ऐकून वाईट वाटले. त्यांच्या मागे एवढ्या मोठ्या घरात काकू एकट्या राहणे अवघड होते. त्यामुळे कदाचित त्यांनी घर विकण्याचा निर्णय घेतला असेल. काकूंना भेटावे असे वाटून मी मावशीला काकूंचा सध्याचा पत्ता विचारला त्यावर मावशीने सांगितलेली माहिती ऐकून चकित झालो.

काका-काकूंनी आधीच ठरवल्याप्रमाणे दोघांपैकी एकाच्या मृत्युनंतर जो कोणी मागे राहील त्याने एकट्याने घरात न राहता आणि या वयात कुणाही नातेवाइकाकडे राहायला न जाता वृद्धाश्रमात राहायचे. दोघांनी आधीच पुण्यातील विविध वृद्धाश्रम पाहून त्यातील एक बुक केला होता. ठरल्याप्रमाणे काकूंनी घर विकून आलेल्या पैशातील काही रक्कम स्वतःकडे ठेऊन उरलेली मुलींना समप्रमाणात वाटली.घरातील फर्निचर अनाथाश्रमाला दान केले. उरलेले सर्व सोपस्कार पार पाडून सर्व परिचितांची भेट घेऊन त्या वृद्धाश्रमात राहायला गेल्या.

मावशीकडे गेल्यानंतर समोरच्या घरातील काका-काकूंची भेट आता कधीच होणार नाही या कल्पनेने वाईट वाटले. इतक्या वर्षांचे आनंदी सहजीवन संपवून ते दोघेही अगदी ठरवल्याप्रमाणे घर सोडून गेले. सहजीवनातील गोडवा त्यांनी लावलेल्या आंब्याच्या झाडातील फळात सुद्धा उतरला हे जाणवल्याने मी मनोमन त्या दोघांनाही प्रणाम केला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@धनंजय भोसले, घरातले मायाजाळ वगैरे ठीकै, नॉर्मल भारतीय परिवारांत ते असतेच, पण आपण या जालात अजिबात गुरफटवून घ्यायचे नाही असे ठरवलेय आम्ही. डिटॅचमेंट मधे अटॅचमेंट असते एव्हढी गोष्ट समजली तर घरातील प्रत्येक सदस्याला मोकळेपणाने जगता येईल. ही आजच्या काळाची गरज आहे.भारतीय समाजात लोकं काय म्हणतील असा विचार करणे, पालकांनी मुलां चे इमोशनल ब्लॅकमेल करणे , वृद्धाश्रमात राहायला जाणे म्हंजे आपली स्थिती दयनीय झालीये या सेल्फ पिटीत गुरफटणे,अजिबात प्रॅक्टीकली विचार न करणे ,कॉमन आहे. हा खूप गंभीर विषय आहे, यावर विस्तृत चर्चा होणे गरजेचे आहे.
लिंबुटिंबु यावर वेगळा धागा काढणार होते.. लिंबुटिंबुजी कहाँ हो ????

छोट्या गावात खुपदा सगळे गाव मिळून वयस्कर माणसाची काळजी घेताना बघितलेय मी, पण शहरात शक्यच नसते. I remember the dialogue in Piku, where she says after certain age, old people can not look after themselves, they are to be kept alive. She does so much for him and that too with love, still I feel that she sacrifices a lot of her life pleasures for him. Though I have many loving family members, I would never want to be burden on them.

छान लेख.

वृद्धाश्रमातच का हा प्रश्न मलाही जरा पडलाच, पण वर्षू नील यांची पोस्ट अगदी पटली. हा विचार आणि मार्ग दाखवल्याबद्दल धन्यवाद.

माझी आईच्या तोंडून एक बरेचदा ऐकतो, वृद्ध जोडप्यांमध्ये बायको आधी गेली आणि नवरा मागे राहिला तर त्याचे जेवणखाण्याचे हाल होतात, सूनेवर अवलंबून राहावे लागते. त्यात काही जणांना तर साधी चहाही बनवता येत नाही. आजवर बायकोने बनवून दिलेली असते. पण तेच बाई असेल तर स्वतापुरते हवे तेव्हा बनवून खाता तरी येते.

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार..! नकळत एका मह्त्त्वच्या विषयाला अनुसरुन लेखन झाले आणि सर्वांनी त्यावर उत्स्फुर्तपणे विचार मांडले हे खरेच प्रेरणादायी आहे...!!! Happy

उत्तम लेख!

वृद्धाश्रमाबद्दल जे नकारात्मक मत साधारण समाजात आहे त्याचा फेरविचार करण्याची वेळ आलेली आहे.

मुलं म्हातारपणी आपल्याकडे पाहाणार नाहीत म्हणून नव्हे, तर तिथलं आयुष्य खरोखरच जास्त समृद्ध आहे म्हणून. जर उत्तम वृद्धाश्रमाला भेट दिली (प्रेसेंट नव्हे, व्हिसिट) तर ही वस्तुस्थिती लक्षात येईल.

मस्त लेख. कैर्‍या, आंबे आणि वृद्धाश्रम सगळेच नीट जुळून आले आहे.
नव्या घरमालकांनी झाडे तोडू नयेत म्हणजे झाले.

अतिशय सुंदर लिखाण. त्याच्या सकारात्मकतेतच गोडी आहे.
माझे मामा आणि मामी वयाच्या पासष्टाव्या वर्षात परांजपे स्कीमच्या अथश्रीत १९९० साली राहण्या साठी गेले. त्यांच्या निर्णयास विरोध झाला , परंतु त्यांना जसे हवे तसे जगले, शेवट पर्यंत चांगली शुश्रूषा झाली.
मी सुध्दा अस निर्णय घेणार आहे- लवकरच!!

>>>> सहजीवनातील गोडवा त्यांनी लावलेल्या आंब्याच्या झाडातील फळात सुद्धा उतरला हे जाणवल्याने मी मनोमन त्या दोघांनाही प्रणाम केला. <<<<
बाकी वर्णन वगैरे छान, पण हे पटले नाही अजिबात.
सहजीवनाचा काही अर्क "मुलाबाळांमधे उतरवता आला नाही' हे अपयशच म्हणावे लागेल. मुलाबाळांमधे सहजीवनाचा अर्थच उतरला नाही व वृद्धाश्रमात जावे लागले ही अपरिहार्यता होती.
त्या अपरिहार्यतेचे उदात्तीकरण होते असे वाटल्याने प्रतिसाद दिला.
याशिवाय, आज तरुण असलेल्यांनी, पोराबाळांकडे न बघता, नातेवाईक वगैरे बाजुला ठेवुन कसलीही नाती न बाळगता/जोपासता, सरळ उठुन चालु पडावे अन वृद्धाश्रमात जावे म्हणजे बाकिच्यांना त्यांची अडगळ होणार नाही, असे करण्याचा "सूप्त संदेशही" जाणवला, जो अमान्य.

सुंदर.

सरळ उठुन चालु पडावे अन वृद्धाश्रमात जावे म्हणजे बाकिच्यांना त्यांची अडगळ होणार नाही, असे करण्याचा "सूप्त संदेशही" जाणवला, जो अमान्य.

<<
लिम्बाजी,
शुध्द भारतीय सांस्कृतिक वानप्रस्थाश्रम अमान्य???
अरेरे.
कुठे नेऊन ठेवाताय हिंदुत्व माझे..

लिंबूटिंबू, पटले नाही.

लेखकाच्या आठवणीत हे काका-काकू दोघेच रहात होते. त्यांचे सहजीवन आनंदाचे होते. दोघेच आहेत म्हणून खंतावत नव्हते. हाच सहजीवनातला गोडवा. जो मागे राहील त्याने नातेवाईकांकडे न रहाता वृद्धाश्रमात रहायचे हा निर्णयही आधीच ठरवून घेतला होता. आधी स्वतंत्र रहात असाल तर जोडीदारामागे मुलाबाळांबरोबर रहाणे काहींना कठीण जाते/आवडत नाही. तडजोड म्हणून मुलांबरोबर रहाण्यापेक्षा स्वेच्छेने वृद्धाश्रमात रहाणे ठीकच. सहजीवनातला अर्क मुलांत उतरणे म्हणजे काय अपेक्षित आहे? आईवडीलांसारखे मुलांचे आपल्या जोडीदाराबरोबर आनंदाचे सहजीवन असणे की मागे राहीलेल्या पालकाच्या इच्छेचा आदर न करता त्यांनी आपल्या घरात सामावून जावे म्हणून आग्रही रहाणे?

इतरांनी तसेच करावे असे लेखात कुठे म्हटलेय?

@ स्मितू, दीड मायबोलीकर, VAISHALI, वर्षू नील, प्रिती जगताप : सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल धन्यावाद..!! Happy

Pages