चकवा

Submitted by नितीनचंद्र on 14 October, 2012 - 22:46

पार्टी संपली, सगळे डुलत डुलत बाहेर आले. चला पान खाऊ घालतो सगळ्यांना बाब्या म्हणाला. बाब्याने किक मारताच मी उस्मान्या आणि दिल्या त्याच्या मागे आपापल्या गाड्यांना किका मारुन जाऊ लागलो. अजुनही जुन्या जकात नाक्यावरच पानाच दुकान उघड होत. केवळ अंगावरचे कपडे घेऊन आलेला बाबुलाल आता दुकानाच्या वरची दोन फ़्लॅट घेऊन मोठ्ठा पानवाला झाला होता.

खरच खुपच वर्षांनी आमची मैफ़ील जमली होती. जो तो आपल्या उद्योगाला लागला होता. उस्मान्याचा आता उस्मानशेठ झाला होता. भाजी बाजारात त्याचा दलालीत जम बसला होता. मी नोकरीत होतो. दिलीपने वडीलांचे पान दुकान बंद करुन हॉटेल टाकले होते. वडा-पाव, मिसळ याच्या चलतीच्या काळात त्याचही उखळ पांढर झाल होत. बाबा बिल्डिंग मटेरीयल सप्लायर झाला होता.

बाबाला तिसर अपत्य मुलगी झाली म्हणुन आजची साग्रसंगीत पार्टी होती. एक तरी मुलगी घरात हवी त्या शिवाय घराला घर पण नाही हा विचार बाबाने अनेक वेळा बोलुन दाखवला होता. दोन मुलांच्या पाठीवर हौसेने मुलीला जन्माला घालुन बाबा खुष होता. बाबाने त्याच्या रिकाम्या फ़्लॅटवर सगळ काही व्यवस्थीत अरेंज केल होत. उत्तम व्हिस्की, सोबत सोडा, बर्फ़. स्नॅक्स साठी पनीर टिक्का, शेंगदाणे, पापड सोबत जेवणाचे डबे आणि पळापळ करणारा त्याचा नोकर अधुन मधुन सिगारेट पेटवुन देत होता. पेग भरत होता आणि भाऊ बास झाल, आता जेऊन घ्या म्हणुन आम्हाला दम पण देत होता. बसल्या जागेवर मटन भाकरी खाऊन वर आईस्क्रीम खाऊन झाल्यावर आता पानाची फ़र्माईश झाली म्हणुन आम्ही सर्व एकेकाळी चिंचवड गावाबाहेर असलेल्या जुन्या जकात नाक्यावरच्या पानाच्या दुकानावर आलो.

१२०-३०० किवाम, कच्ची पक्की सुपारी, कुणाची नुसती इलायची, उस्मानची सिगारेट सुरु झाली होती. त्याच बरोबर एअर कंडिशन्ड फ़्लॅट मधुन बाहेर पडल्यावरचा गरमपणा जाणवत होता. उन्हाळा नुकताच सुरु झाला होता. सगळ्यांची पान लागली, सिगारेट अर्ध्या झाल्या आणि उस्मानला नदीच्या पुलावर जाण्याची हुक्की आली. नकोरे उस्मान ही काय वेळ आहे का ? रात्रीचे बारा वाजुन गेलेत मी मोडता घालु पहात होतो. राज्या काय झाल तुला ? एका जमान्यात सायकलवर आपण रात्री पदमजी समोरच्या हॉटेलात जायचो आणि परत यायला किती वाजायचे याचा हिशोब नव्हतो करत.

"चलरे जरा नदीवरच्या गारव्यात बर वाटत," अस म्हणुन बाबाने मला भरीला घातल.

एका मिनीटात आम्ही नदीच्या पुलावर आलो. बारा वाजुन गेले असावेत. रस्त्यावरचे सगळे दिवे बंद होते. नदीच्या पात्रात अंधार होता. पुलावरुन नविन झालेले बिर्ला हॉस्पीटल लांबवर चमकताना दिसत होते. लोकांची वर्दळ थांबली होती. पुलावर आम्हीच काय ते चार जण होतो. आकाशात चंद्रप्रकाश नव्हता. बहुदा अमावस्या असावी. हे फ़क्त माझ्या मनात चालले होते तितक्यात उस्मानला जुनी आठवण झाली. राज्या, आठवतका ? आपण पदमजी कंपनीसमोरच्या हॉटेलात आपण कॉर्टर लावली आणि सायकलवर परत येताना आपल्याला एक ससा याच पुलावर सापडला.

माझ्या अंगावर त्या आठवणीने काटा उभा राहिला. ती घटना्च तशी होती. आम्ही हिंजवडीच्या आठवडे बाजारासाठी म्हणुन उस्मानचा माल पोचवुन परत येत होतो. हिंजवडी ते डांगे चौक रस्ता कच्चा होता, त्यात अंधार होता. जाताना काही वाटले नव्हते पण येताना फ़ारच फ़ाटली होती. डांगे चौकात जेव्हा दिवे दिसु लागले तेव्हा जीवात जीव आला. मालाचे पैसे उस्मानच्या खिशात खुळखुळत होते. आत्ताच कुठे पिण्याचा चस्का लागला होता. पदमजी पेपर मिल समोर एक सकाळी मिसळ पाव, भजी संध्याकाळी मटन मसाला, भाकरी मिळणारे टपरी हॉटेल होते. हॉटेलच्या मागे दर्दी लोकांना पिण्याची सोय होती. स्टीलच्या ग्लासात आम्ही दोघांनी एक चपटी मोकळी केली. वर पाणी चढवुन उभ्या उभ्याच ग्लास खाली केले. रात्रीचे ११ वाजता जेवायला बसलो आणि संपता संपता घडयाळात बारा वाजले होते.

हॉटेलवाला पेंगुळला होता. आम्ही निघताच त्याने हॉटेलची फ़ळकुट लावलेली आम्ही पाहिली. माझी घाई सुरु झाली. "उस्मान्या चल रे बारा वाजले."

जाऊ रे, काय दिवे लावायचेत ? खोलीवर जाऊन पडायच तर आहे.

अधुन मधुन जेव्हा हा कार्येक्रम सुरु झाला तेव्हा मी उस्मान्याच्या खोलीवरच रात्री झोपुन सकाळीच घरी जायला लागलो. आजही तोच विचार होता.

पदमजी जवळच्या हॉटेलातुन जेव्हा आम्ही नदीच्या पुलावर आलो तेव्हा उस्मानला रस्त्यात एक पांढरा ससा बसलेला दिसला. "राज्या, तो बघ सस्सा उस्मानने हळु आवाज दिला. मायला, उद्या पण सागुती हाणु. उस्मानचे डोळे अंधारातही चकाकले. मी मागे होतो. उस्मान्या सशाच्या जवळ पोचला. उस्मान्याचा सायकल सोडुन झडप घालायचा प्लॅन होता पण ससा हललाच नाही. जणु उस्मानची वाट पहात होता. उस्मानने त्याला उचलला आणी सायकलच्या हॅडलला लावलेल्या बास्केटमधे ठेवला. आम्ही पुलाच्या दुसर्‍या टोकाला आलो तर ससा गायब झालेला.

"च्यामारी, हा ससा कुठे गेला ? " उस्मान्या ओरडला.
आम्ही मागे वळुन पाहिल तर जिथुन ससा उचलला तिथेच ससा बसलेला दिसला.
"उस्मान्या, किक बसली वाटत" मी म्हणालो " ससा उडी मारुन मागे गेला कळल नाही व्हय ?

उस्मान पुन्हा सायकल वळवुन मागे गेला. त्याने पुन्हा ससा उचलला आणि सायकल वळवुन माझ्याकडे येऊ लागला. " च्यायच बेण, उचलताना काय नाय अन नंतर उडी मारतय." अस म्हणत उस्मान्या माझ्या पर्यंत पोहोचतो तोच पुन्हा सायकलची बास्केट रिकामी.

आता आम्ही दोघ चक्रावलो होतो. पुन्हा मागे पहतो तर ससा आपल्या जागी पुलाच्या दुसर्‍या टोकाला.

उस्मान्या आता इकडे तिकडे पाहु लागला. कुठ सुतळी, काथ्या मिळाला तर बांधुन आणतो च्या मायला म्हणत होता. पण सुतळी, काथ्या काहीच सापडल नाही. आता वेळ घालवला तर तो ससा पळायचा म्हणुन उस्मानने सायकल परत मागे फ़िरवली आणि ससा पुन्हा बास्केटमधे घातला. आताच्या वेळेला हॅडल एका हाताने पकडुन एका हाताने ससा पकडुन शीळ घालत उस्मान माझ्याकडे येत होता. मी हे सगळ पहातोय पण आम्हा दोघांनाही काय झाल कळल नाही आणि ससा पुन्हा मागे बसलेला दिसला आणि बास्केटमधे उस्मानच्या हाताखाली काहीच नव्हत.

मला तर दरदरुन घाम फ़ुटला होता. राज्या पळ .... चकवा हे... उस्मानने आरोळी दिली आणि मागे न पहाता आम्ही सायकलवर उभे राहुन सायकल हाणत घर गाठले. रात्रभर आम्हाला झोप नव्हती मला तर स्वप्नात ससा मोठा मोठा होत म्हशी येवढा झालेला दिसला होता. त्याच्या पुढे आठवडे बाजाराला भाजीपाला उस्मान दिवसाच पोचवु लागला आणि मी परत कधी रात्रीचा पुलावर नाही गेलो.

काय राज्या.. कशी फ़ाटली होती आपली ? उस्मान मला म्हणत होता. माझी आज पिलेली सगळी उतरली. "ए चला रे एक तर शनिवार, त्यात अमावस्या. आपल घरी चला "मी म्हणालो.
"च्यायला, हा राज्या असा नव्हता." बाबा आणि दिलीप माझ्याकडे पाहुन हसत होते कारण ही स्टोरी आम्ही दोघांना रंगवुन रंगवुन सांगीतली होती. जे घडले त्यावर बाबा आणि दिलीपचा तेव्हाही विश्वास नव्हता आणि आत्ताही. " तुम्हाला प्यायची सवय नव्हती त्यात तुम्हाला डुप्लीकेट क्वॉर्टर मिळाली असल." बाबाचा वीस वर्षांपुर्वीचा डायलॉग परत मारत बाबा म्हणाला.
" अरे, कधी कधी भास होतो त्याला चकवा म्हणतात व्हय ? " दिलीप आम्हाला तेव्हाही आणि आत्ताही समजावत होता.

दिलीप आणि बाबा आमच्याकडे बघुन हसत होतो. मी तो प्रसंग आठवुन घाबरलो होतो आणि उस्मान स्टाईलमधे झुरके मारत काही घडलच नाही असा उभा होता. आमच लक्ष एकमेकांकडे होत तेव्हड्यात बाबाच्या मागे हनुसुतार उभा दिसला. त्याच्या पाठीवर थाप मारत तो म्हणाला
"चकवा कसला भासच असल. आपल्या चिंचवडात मी इतकी वर्ष आहे. रात्री कवापण काम संपवुन येतो. मला नाही कधी चकवा लागला या पुलावर." आता वस्ती वाढली. सोडीयमचे दिवे आले. ते हॉस्पीटल झालय. यका जमान्यात मला थोडी भिती वाटायची या पुलावर, पण आता अजिबात नाय.

बाबा आणि दिलीप पुन्हा हसायला लागले. हनु सुताराच्या हातावर टाळी देत बाबा म्हणाला
" यांना मी कवाच सांगतोय इकड चकवा बिकवा काही नाही. मनाचा खेळ आहे तुमच्या."

"बर, जरा करंट दे "म्हणुन हनु सुताराने आपल्या वरच्या खिशातुन सिगारेट काढली आणि दिलीपच्या सिगारेटने पेटवली. पुन्हा सायकलवर टांग मारुन हनु सुतार गेला. पुढच्या क्षणाला तो दिसेनासा झाला आणि सर्वात आधी बाबा म्हणाला " उस्मान, हनु सुताराचा ह्याच पुलावर खुन झाला होता ना ? पंधरा वर्ष झाली असतील."

"हो की रे," झटका लागल्यासारखा मी आणि उस्मान दोघेही ओरडलो.

पुढच्या मिनीटाला आम्ही न बोलता घरच्या रस्त्याला लागलो होतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण ही गोष्ट आहे की अनुभव??????>> ह्या प्रश्नाच उत्तर कृपया देवु नये.
दिलच तर ही फक्त काल्पनिक गोष्ट आहे असच द्यावं. Wink

छान Happy

नितीनचंद्र, ही कथा एका ब्लॉगवर ब्लॉग संग्रहण या हेडिंगखाली कॉपी-पेस्ट केलेली आहे. तुमचे नाव असले तरी मायबोलीची लिंक मात्र दिलेली नाही. http://hivaatdurjate.blogspot.de/2013/08/16-september-2010-0539-common.html इथे पहा.

मस्त.. पण माझ्यामते फक्त वाट चुकुन पुन्हा पुन्हा त्याच जागी येऊन थांबणे.. थोडक्यात वाट न सापडण्याला 'चकवा' म्हणतात. कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.

लैच ड्यँजरस Proud

पण त्या पुलावर भिती वगैरे वाटेल की नाही माहीत नाही कारण रात्री १२ ला सुद्धा वहानांची वर्दळ असते तिकडे आताशा.

Pages