जपान, जपानी आणि मी! ....भाग १

Submitted by पद्मावति on 9 October, 2015 - 09:37

'' पमीचान, यु आर अ बेरी गुड कूकर''.....माझ्या हातचा खतरर्नाक स्वयंपाक खाउन सुद्धा मला " गुड कूकर" म्हणणार्या बाईकडे मी थक्क होऊन पहात होते.

पुढे हळूहळू जपानी लोकांच्या या अती नम्रपणाची इतकी सवय झाली की मग त्यांनी मला 'यू आर बेरी स्मार्त' किंवा अगदी 'यू आर बेरी थीन' वगैरे म्हटले तरी मी अजिबात दचकायचे नाही. खरंच कौतुक करताहेत का टोमणा मारताहेत असलं फालतू टेन्शन न घेता बेधडकपणे थॅंक यू ..आरिगातो गोझाईमास म्हणून टाकायचे.
पण देश, भाषा, संस्कृती, रंग- सगळ्याच बाबतीत परक्या असलेल्या मला, या जपानी स्त्रियांनी 'पमीचान' म्हणत आपल्या वर्तुळात अलगद सामावून घेतलं होतं, अगदी सहजपणे.
जपान मधे पुरूष असो वा स्त्री, सगळ्यांनाच सरसकट नावामागे' सान' लावण्याची पद्धत आहे. जसे की अक्षय सान, अमोल सान तसेच टीना सान, गौरी सान वगैरे. नाहीतर मग 'चान' हे संबोधन. लहान मुलांना किंवा आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणीला प्रेमाने चान म्हणायची पद्धत आहे.

माझ्या मिस्टरांच्या नोकरीच्या निमित्ताने काही वर्षे आम्ही जपानी लोकांच्या निकट सहवासात घालवली. काही काळ जपानमधे आणि बराचसा काळ जपानच्या बाहेरसुद्धा या लोकांबरोबर राहिल्यामुळे त्यांची विचारपद्धती, चालीरीती, बोलण्या-वागण्याची पद्धत मला अगदी जवळून अनुभवता आली. या लेखातून मी माझ्या मर्यादित नजरेला दिसलेले, कळलेले आणि प्रचंड भावलेले जपानी समाजमन मांडण्याचा थोडाफार प्रयत्न करतेय. माझे काही अनुभव, काही निरिक्षणे, काही गमती आणि आठवणी....

जपान मधे रहातांना आम्ही आमच्या कंपनीच्या कॉलनी मधे राहात होतो. एक पंधरा वीस इमारतींची ही सोसायटी. एकेक इमारत पाच मजल्यांची. अगदी जुनं बांधकाम. रंगरंगोटी कधीतरी पुरातन काळात केलेली. लिफ्ट वगैरे लाड नाहीच. साधारणपणे सहा फुट बाय आठ फुट अशा मापाचे पाच चौकोन आखून अख्खा फ्लॅट त्यात बसवला होता.
स्वयंपाकघर, लिविंग रूम, एक आमची बेडरूम आणि गेस्ट रूम आणि बाथरूम/ टॉयलेट. हे सर्व 3००--३५० स्क्वेर फुट मधे बसविणे हे त्या आर्किटेक्ट्स चं कौशल्य होतं.
या सगळ्या घरांना जमिनीवर फरशीच्या जागी तातामी चटाया. या तातामीची जमीन दिसायला फार छान दिसते. जागा वाचवण्यासाठी घरात सगळी सरकणारी दारं असायची. तसेच आमच्या घरी सोफे किंवा झोपायला पलंग हे प्रकार नव्हतेच, ठेवणार कुठे? लिविंग रूम मधे बसायला गाद्या आणि लोडांची भारतीय बैठक आणि बेडरूममधे झोपायला जपानी गाद्या-फूतोन.

स्वयंपाकघरात वॉटर हीटिंग नसल्यामुळे हिवाळ्यात बर्फाळ पाण्यात भांडी घासतांना मात्र मला खूप त्रास व्हायचा. लिविंग रूम आणि स्वयंपाकघर मिळून एक आम्ही एसी घेतला होता. त्याचा डक्ट बाहेर गॅलरीत होता. उन्हाळ्यात हवेत दमटपणा इतका की त्या डक्ट मधून सतत पाणी गळणार. ते पाणी गॅलरीत साचू नये म्हणून त्या डक्ट खाली मी एक बादली ठेवली होती. ती बादली दर दोन तासांनी भरून रिकामी करायला लागायची इतकी दमट हवा.

सोसायटीच्या खाली खुल्या जागेत पार्किंग लॉट आणि सार्वजनिक बाग होती. बाग म्हणजे काय होतं की प्रत्येक कुटुंबाला एक असा जमिनीचा एक चिमुकला भाग नेमुन दिला होता. त्या जागेत तुम्ही भाजी किंवा फुलं काहीही लावा. जपानी लोकांना बागकाम फार प्रिय. त्या छोट्याश्या वाफ्यातसुद्धा या बायका हौसेहौसेनी काकड्या, टोमॅटो, मिरच्या काय काय लावायच्या. सगळ्यांचाच अंगठा हिरवा.. दुपारी कधीही बघितलं की सर्व बायका डोक्यावर टोपी, बागकामाचे हातमोजे घालून बागकाम करायच्या आणि बरोबर त्यांची बच्चे कंपनी सुद्धा हातात पाण्याची झारी किंवा हातात खुरपणी घेऊन आईला मदत करायची.

या देशात खरंतर सर्व इमारती भूकंपाच्या दृष्टीने सुरक्षित साहित्य वापरुन बंधल्या असतात. पण या आमच्या इमारती जुन्या असल्यामुळे आम्हाला तशी काही सुरक्षितता नसायची. मोठा भूकंप झालाच तर पाच मजले आपल्याला उतरता येतील का अशी थोडी काळजी वाटायची.
मी तिथे असतांना मोठा धक्का कधी नाही बसला पण अधून मधून जरा झुम्मकन चक्करल्यासारखी बिल्डिंग हलायची मग सगळ्या बायका गॅलरीत येऊन भूकंप किती रिक्टर स्केल चा असावा यावर थोडीफार चर्चा करायच्या मग आपापल्या कामाला लागायच्या.

या लहान घरं असलेल्या, जुन्या आणि आणि गैरसोयी असलेल्या सोसायटी मधे राहण्याचे आमच्या सकट सगळयांचे एकमेव कारण की हे कंपनी अपार्टमेंट्स असल्यामुळे अत्यंत स्वस्त दरात आम्हाला मिळायचे. नोकरीच्या सुरुवातीच्या दिवसात आणि जपानच्या प्रचंड महागाईत ही छोटीशी घरं आम्हा सगळ्यांसाठी मोठ्या वरदानासारखी होती. लोकं वयाच्या पस्तीस-छत्तीस वर्षांपर्यंत इथे राहात असत. मग वयानुसार एक दोन प्रमोशन्स घेऊन बॅंक बॅलेन्स वाढला की मग स्वत:चे मोठे घर घ्यायचे.

वयानुसार प्रमोशन्स हे जपानी कंपनी मधे शब्दश: असते. म्हणजे सुरुवातीला इंजीनीयर म्हणून माणूस लागला की डोळे मिटून तो सांगू शकतो की आजपासून तीन वर्षांनी मला पहिली बढती मिळेल, मग त्यानंतर चार वर्षांनी दुसरी. आजपासून दहा वर्षांनी मी अमक्या अमक्या हुद्द्यावर असणार आणि माझा पगार इतका इतका असणार. म्हणजे करियर ग्राफ हा ठरलेला.
म्हणजे एखाद्याच्या हुशारीबद्दल त्याला सटासट बढती मिळेल असे नाही किंवा एखाद्याला माठपणाबद्दल बढती नाकारली असेही नाही. सगळं वक्तशीर आणि ठरलेलं.

आमच्या इथल्या स्त्रिया तशा पस्तीशीच्या आतल्या. वयाच्या पस्तीस-छत्तीस नंतर थोडी आर्थिक सुबत्ता आली की मग या सोसायटीमधून बाहेर, स्वत:च्या हक्काच्या घरात जायच्या. सगळ्याजणींची साधारणपणे एकसारखीच मध्यमवर्गीय पार्श्वभूमी. शिक्षण झाल्यानंतर या नोकरीला लागलेल्या. बहुतेक करून जवळ जवळ सगळ्याजणी आमच्या ( म्हणजे जिथे माझे मिस्टर काम करायचे त्या) कंपनीच्याच माजी कर्मचारी. काम सेक्रेटरीयल, क्लरिकल अशा स्वरूपाचं. काम करता करता तिथल्याच तरुण इंजीनीअर्सची ओळख. ओळखीचं रुपांतर आधी प्रेमात आणि मग लग्नात. या सर्व घडामोडींमधे वय तिशीला आलेलं त्यामुळे लग्नाची आणि मग मूल होऊ देण्याची घाई.
लग्नाआधी ऑफिस मधे काम करणार्या, फूल पाखरासारखे स्वच्छंद जगणार्या या मुली लग्न होऊन आमच्या कंपनी अपार्टमेंट (शाताकू) मधे येईपर्यंत अगदी टिपिकल चूल आणि मूल टाइप ताई, माई, अक्का बनून जायच्या. पण अतिशय उत्कृष्ट गृहिणी! फार हौसेनी संसार करतात या मुली . इतकेसे घर, तितकीच लहानशी बाग, आपली गोडम गोड मुलं आणि आपले थोडेसे गंभीर, अबोल नवरे अगदी मनापासून सांभाळतात.

त्यांच्याशी बोलतांना मी जाणून घ्यायचा प्रयत्न केला की मुलं झाल्यानंतर त्या करियर का नाही सुरू ठेवत. त्यांच्या उत्तरावरुन लक्षात आलं की या सर्व मुली फार उच्च शिक्षीत किंवा महत्वकांक्षी अशा नव्हत्या. साधारण शिक्षण आणि मग छोटे मोठे कोर्सेस करून नोकरीला लागलेल्या. करियर पाथ फार काही जोमदार नाही. नवरा मात्र छान शिकलेला स्थिर नोकरीत, योग्य सांपत्तिक स्थती असलेला असा मिळाला की त्या समाधानी असत. पुन्हा मूल झाल्यावर त्याला डेकेअर मधे पाठवणे म्हणजे सगळा आपला पगार डे केअर ला देण्यासारखंच होतं. या देशात बाकी सर्व गोष्टींप्रमाणेच ही सुविधा पण खूप महाग. मग आपणच घरी राहून फुल टाइम गृहिणी का न बना? हा विचार. यामधे जपानच्या पारंपरिक जुन्या पुरुषप्रधान संस्कृतीचाही मोठा पगडा आहेच. या देशात नोकरी करणार्या स्त्रियांचं प्रमाण जरी खूप असलं तरी वरच्या जागांवर, सीनियर लेवल वर स्त्रियांचं प्रमाण कमी दिसतं. उघडपणे कबूल नाही करणार कदाचित पण स्त्रीची पारंपरिक चूल आणि मूल ही प्रतिमा इथे आदर्श मानली जाते. आता नवीन पिढीत मात्र हे प्रमाण खूप कमी होत आहे, सुदैवाने.

या आमच्या सोसायटीमधे दर महिन्यात एक सामूहिक साफसफाई (सोजी)चा दिवस असायचा. त्या दिवशी सकाळी आम्ही सर्व बायका आपापला झाडू, पुसपास करायला स्वच्छ फडकी घेऊन बिल्डिंग च्या खाली उतरायचो. पुढचे दोन एक तास पार्किंग लॉट, सोसायटीचे रस्ते, बगिचा सर्व गोष्टींची साफसफाई व्हायची. तसं तर सोसायटीच्या साफसफाई साठी सफाई कर्मचारी यायचेच. कॉलनीची स्वच्छता ही काही आमच्या महिन्यात एकदा होणार्या सोजी वर अवलंबुन होती असे अर्थातच नाही पण तरीही ही प्रथा लोकं अगदी मनापासून पाळायचे.

जपानमधे अशा सामूहिक उपक्रमांचे फार महत्व असते. या सर्व लोकांमधे माझा देश, माझं शहर किंवा माझी सोसायटी या विषयी एक सशक्त सामजिक बंधिलकीची भावना असते. हे लोकं स्वत:च्या भावना तीव्र पणे व्यक्त करत नाही पण लहानपणापासून ही सामजिक जबाबदारी यांच्या मनावर अशी काही बिंबवली जाते की श्वास घेण्याच्या सहजतेने ही लोकं या अशा सामूहिक उपक्रमांमधला आपापला वाटा उचलतात. माझ्या मिस्टरांच्या ऑफिस मधे सुद्धा महिन्यातुन एकदा ऑफीस समोरच्या बागेची अशीच सफाई मोहिम असायची. कंपनी सी ई ओ पासून शॉप फ्लोर वरच्या कर्मचार्यापर्यंत प्रत्येक जण यात सामील व्हायचा.

स्वच्छता, वक्तशीरपणा, सचोटी या बाबतीत जबाबदारीचे तीव्र भान असणारे हे लोक काही बाबतीत अतिशय उदासीन असतात. मला खूप खटकणारी यांची गोष्ट म्हणजे अतिरेकी धूम्रपान. ट्रेन स्टेशन्स, दुकानं, रेस्टोरेंट्स, ऑफीस सगळीकडे अगदी बिनदिक्कत या लोकांचे धूम्रपान चालू असते. आपल्याबरोबर आपण दुसर्यांच्याही तब्बेतिला धोक्यात टाकतोय किंवा साधे बेसिक मॅनर्स सुद्धा या वेळी ही लोक गुंडाळून ठेवतात.
मद्यपान करून गाडी न चालविण्याच्या बाबतीत मात्र हे लोक अगदी काटेकोर असतात. रात्री कुठे बाहेर डिनर/ /ड्रिंक्स ला जायचे असेल तर ही लोक सरळ ट्रेन किंवा बस ने जाणार आणि येतांना त्यांच्या बायका गाडी घेऊन त्यांना पिकअप करायला येणार, अगदी शिस्तीत.
म्हणजे दारू प्यायची किंवा नाही हा ज्याचा त्याचा वैयत्तिक प्रश्न आहे पण प्यायल्यावर रस्त्यावर गाडी चालविणे हा मग मात्र वैयत्तिक प्रश्न राहात नाही मग तो सामाजिक गुन्हा ठरतो. तिथे झीरो टॉलरन्स! धूम्रपानाच्या बाबतीत मात्र हा काटेकोरपणा कुठे जातो काय माहीत.

असो. एकूण या देशात माझे मस्तं मजेत दिवस चालले होते. नवीन गोष्टी, नवीन ठिकाणं पहात होते. चुकत होते, धडपडत होते तरीही नित्य नवीन शिकत होते.
अशातच आमच्या बदलीचे वारे सुरू झाले आणि एक दिवस संध्याकाळी हे त्यांच्या बॉस कडून बदलीचा आदेश घेऊन घरी आले. आमच्या कंपनीच्याच अमेरिकेतील ब्रांच मधे आमची बदली झाली होती.
हा देश सोडायची हूरहुर तर होती पण अमेरिकेला जाण्याची उत्सुकताही तेव्हडीच होती. नवीन देश, नवीन मित्र , नवीन संस्कृती अनुभवायला मिळणार याची गंमत वाटत होती.
पॅकिंग करायला मूविंग कंपनीचे लोक आले त्यांनी आमचं अगदी इतकेसे समान दोन तीन तासात पटापट बांधून ट्रक वर चढविले. लहान घर असल्याचा एक मोठा फायदा आमच्या लक्षात येत होता. ठेवायचं कुठे म्हणून आम्ही कमीत कमी गोष्टींचा संचय केला होता. त्या अत्यंत कमी असलेल्या सामानामुळे आमचं झट पॅकिंग, पट मूविंग झालं होतं.

बदलीची ऑर्डर हातात पडल्यापासून बरोब्बर दहाव्या दिवशी आम्ही नारिता विमानतळावरून डेट्रॉइट ला जाणार्या विमानात बसलो....'पूर्वरंग' मनात साठवून घेत आम्ही आता 'अपूर्वाई' च्या दिशेने निघालो होतो.

क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय. सामुहिक सोजीचा अजिबात अनुभव नाही. अर्थात कंपनी कॉलनी नसल्यामुळे असेल. कुठे होती ही तुमची कॉलनी?

क्रमश: .. हे फार आवडले Happy मस्तच लिहिलेय

सगळ्या बायका गॅलरीत येऊन भूकंप किती रिक्टर स्केल चा असावा यावर थोडीफार चर्चा करायच्या मग आपापल्या कामाला लागायच्या.>> Happy

इतकं सहज आणि ओघवतं.. वा !
पुढच्या भागाची वाट बघतोय,
स्त्रियांना नोकरी न करु देण्याबाबत जर्मनीमधेही असाच विचार करतात, असे एका माहितीपटात बघितले.

मस्त गं पमासान!! Happy

होकाईदो मधे सपोरो ला माझ्या मैत्रीणीकडे काही दिवस गेले होते,खूप आवडला मला हा भाग. त्यामानाने टोकियो
तितकं नव्हतं आवडलं..
पुरुषप्रधान संस्कृती चा नमुना तिथे पदोपदी आढळतो मात्र!! आमच्या जर्मन मित्राची जपानी बायको, तो ड्रा यवर च्या सीट वर तर ती कायम मागे बसायची , त्याला रिस्पेक्ट द्यायला.. तिला मूल झालं तेंव्हा तीन महीने तिच्या आई ने तिला , तिच्या बेडरूम मधे झोपू दिलं नाही,का तर नवर्‍याची रात्री झोपमोड होईल म्हणून.तिने ही हा नियम काटेकोरपणे पाळला. मित्राने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण नो उपयोग!!

एकदा तिथल्या देवळात कसली तरी पूजा अर्चना करायला आलेल्या परिवारातील सासू,सासरे,नवरा आणी दोन मुलं पुढ्च्या बाकावर तर बायको एकटीच मागच्या बाकावर बसली.. खूप आश्चर्य वाटलं होतं हे सगळं विटनेस करताना..
बाकी त्यांची टापटीप, मृदू बोलणं , सॉफ्ट्,नाजूक हालचाली बघतच राहाव्या.. Happy

मस्त लिहिले आहे. अर्थातच पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत Happy

एकुणच मला चीन आणि जपानबद्दल फार कुतुहल आहे.

खूप छान लिहिलेय . अणुस्फोटनंतर राखेतल्या फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणाऱ्या जपानबद्दल कुतूहल आहे. तो सामूहिक जबाबदारीचा पॅरा आवडला. या अश्या संस्कारामुळेच जपान आज पुढे आह

अजून लिहा े

फारच छान !
तुमचे अनुभव, निरिक्षण आणि ते सारे वर्णन करण्याची शैली सर्वकाही फारच भारी आहे. Happy

अतिशय सुरेख आणि ओघवते लिहिले आहे.
१९९१ ते २००० दरम्यान १५ -२० वार्या अन वास्तव्य झाले आणि अनेक आठवणी जाग्या झाल्या.
मी जपान च्या पुण्यात रहात होतो. क्योतो ला////मित्सुबिशीत काम अन अनेक मित्र , त्यांचे कुटुंबिय ,,,, खूप संस्मरणीय अनुभव जागे झाले.
खूपच छान

Pages