असाही एक क्लायंट

Submitted by स्वीटर टॉकर on 7 October, 2015 - 07:09

माझी मुलगी दुसर्‍या यत्तेत जाऊन शाळा सबंद वेळ सुरू झाल्यावर मी काही उद्योग करावा असं ठरवलं. बी.एस्.सी. (फिजिक्स) असल्यामुळे जनरल शिक्षण होतं पण उद्योगधंद्याला पूरक असं काही नव्हतं. मग परत कॉलेजला प्रवेश घेतला, सिंबायोसिसमधून D.C.A. केलं आणि डी.टी.पी. आणि छपाईचा व्यवसाय सुरू केला.

कोणत्याही नवीन उद्योगाप्रमाणेच हा देखील पडंत, धडपडंत, टक्केटोणपे खात, पुस्तकांपेक्षाही जास्त परिस्थितीकडून आणि गिर्‍हाइकांकडून शिकत शेवटी स्थिरावला. प्रत्येक उद्योगाची स्वतःची एक ठरलेली त्रिज्या असते. त्याच्या बाहेरचं गिर्‍हाइक त्याच्याकडे नियमितपणे येत नाही. एखाद्या पानवाल्याची अर्धा किलोमीटर असेल तर चांगल्या रेस्टॉरंटची शहरभर. जनरल छपाई करणार्यांची ही त्रिज्या तीन कि.मी. असते.

एक दिवस मगरपट्ट्याहून एका कंपनीकडून विचारणा झाली. म्हणजे माझ्यापासून सतरा अठरा कि.मी. दूर. पूर्वीच्या अनुभवावरून मला माहीत होतं की इतक्या दूरच्या स्थळाबरोबर आपली पत्रिका जमणं शक्य नाही. मी दरपत्रक पाठवलं पण फारसा रस दाखविला नाही. तरी देखील त्यांनीच पाठपुरावा सुरू केला. एक तर कित्येक कंपन्यांची कामं म्हणजे ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय्’ अशी अवस्था असते. कामं मोठी असतात पण किमती अगदी पाडून मागतात, शिवाय पैसे मिळवण्यासाठी सारखं मागे लागावं लागतं ते वेगळंच. त्यातून ही कंपनी तुर्कस्थानातली.

या कंपनीने काहीही आढेवेढे न घेता किमती मान्य केल्या. लगेचच माझ्या डोक्यात धोक्याची घंटा घणघणली! “पैशाचा अजिबात प्रॉब्लेम नाही” ह्या वाक्याचा खरा अर्थ पूर्वानुभवावरून व्यवस्थित माहीत होता. बहुदा असं असेल की या कंपनीच्या आसपासच्या प्रिन्टर्सचे पैसे तरी यांनी दिले नसतील किंवा हे प्रचंड चिकित्सक असतील ज्यामुळे दुसरे कोणी यांचं काम करायला तयार नसेल. त्यामुळेच ते इतके लांब यायला तयार झाले असणार असा माझा कयास. ऑर्डर सोडवत नव्हती आणि घेववतही. शंभर टक्के अड्व्हान्स मागितला की ते देणार नाहीत आणि सुंठीवाचून खोकला जाईल अशा कल्पनेनी मी मागितला. आश्चर्य म्हणजे ते द्यायला तयार झाले!

आता मला नाही म्हणण्याला काही कारणच राहिलं नव्हतं.

मला आठवण झाली की आमची बोट एकदा हॉन्गकॉन्गला गेलेली असताना मी घड्याळ्याच्या दुकानात गेले होते. एक महागातलं घड्याळ मी घ्यावं म्हणून विक्रेता फारच मागे लागला होता. माझी सुटका करून घ्यायला मी किंमत भन्नाट कमी करून मागितलं. तर तो द्यायला तयार झाला! मग घ्यावंच लागलं. फार दिवस चाललं नाही हे सांगायलाच नको. असो.

ती ऑर्डर पूर्ण केली. थोड्या दिवसात दुसरी आली! मी पुन्हा शंभर टक्के अड्व्हान्स मागितला. पुन्हा त्यांनी दिला. होता होता कित्येक ऑर्डर्स झाल्या. मी जास्तच बेचैन.

If something looks too good to be true, it usually is. यावर माझा विश्वास. मग त्यांच्या Procurement Manager ना त्यांच्या इतक्या दिलदार वृत्तीचं कारण विचारलं. त्यांच्या उत्तरानी मला फारच आश्चर्य वाटलं. केमिकल्स बनविणारी कंपनी होती. कंपनीचा मालक तुर्की. नाव यिल्दिग्लू. म्हणे त्यानी सांगून ठेवलं आहे की सर्व छपाईची कामं यांच्याचकडे करायची. क्वॉलिटीत तडजोड करायची नाही पण किंमतीत घासाघीस करायची नाही!

यिल्दिग्लू! यिल्दिग्लू? कोण हा? आमचा आणि याचा काय संबंध? हा इतका फरिश्ता का बनलाय?

मी आणि स्वीट टॉकर काहीतरी निमित्त काढून त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. ऑफिससारखं ऑफिस. जमेल तितक्या लोकांना भेटलो. नाव ठेवण्यासारखं काहीच दिसलं नाही. यापुढे खाजवून खरूज काढायची नाही असं ठरवलं. या यिल्दिग्लूच्या काहीतरी गैरसमजामुळे आपल्याला बिझनेस मिळत असेल तर ठीकच आहे की. आपण त्यांना वाजवी किमती लावल्या म्हणजे झालं.

सन १९९८ ते २००८ पर्यंत व्यवस्थित चाललं होतं. अचानक ऑर्डर येणं बंद झालं. फोन केल्यावर कळलं की ती कंपनी भारतातून काढता पाय घेत होती. आता मात्र या यिल्दिग्लूपुराणाचा छडा लावणंच जरूर होतं. नाहीतर डोक्यात किडा कायम वळवळंत राहिला असता.

त्यांच्याकडून यिल्दिग्लूचा पत्ता घेऊन त्याला सविस्तर मेल पाठवून त्याच्या या निर्णयाचं कारण विचारलं. त्याच्या उत्तरानी कारण स्पष्ट झालं खरं पण आश्चर्य फारच वाटलं.

मी नुकतीच डी.टी.पी. आणि छपाई सुरू केली होती तेव्हांचा प्रसंग. नवीन धंद्यांमध्ये मालकापासून झाडूवाल्यापर्यंत सगळे आपणच असतो. स्वीट टॉकर नुकताच बोटीवरून परत सुट्टीवर आला होता. मी आणि तो दुकानात बसलो होतो. गिर्‍हाइकांची वाट बघत. त्या सुरवातीच्या काळात दिवसाचा बराच वेळ हीच activity करण्यात जायचा.

एक मनुष्य आला. मध्यपूर्व आशियाच्या लोकांसारखा चेहरा. समजायला अवघड असे इंग्रजी उच्चार. त्याच्या हातात चार कागद होते. ते त्याला टाइप करून मोठ्या फॉन्टमध्ये प्रिन्टाआऊट हवे होते. त्याच्या हातातले कागद म्हणजे संगणकावरचेच प्रिन्टआऊट वाटत होते. मी त्याला सुचवलं की सगळं पुन्हा टाइप करण्याऐवजी जर त्याची फाईल दिलीत तर अगदी स्वस्तात आणि लवकर काम होईल. मीच हे सुचवल्यामुळे त्याला फारच आश्चर्य वाटलं. हे चालू असताना स्वीट टॉकरनी ते पत्र नजरेखालून घातलं. त्यात त्याला व्याकरणाच्या बर्‍याच चुका आढळल्या. त्या सुधारून देण्याची आम्ही ऑफर दिली. त्यामुळे तो भलताच खूष झाला.

दहा मिनिटात त्याचं काम झालं. त्यानी आमचं दोनदा कौतुक केल्यामुळे स्वीट टॉकरनी एक Quote टाकला.
‘It is disheartening that we are shocked by honesty but not by deceipt’.

आम्ही हा प्रसंग विसरलो. पण तो विसरला नव्हता. तोच यिल्दिग्लू.

यिल्दिग्लूनी भावनेच्या भरात निर्णय घेतला असेल देखील, पण दहा वर्षं तो पाळला याचं स्वीट टॉकरनी कौतुक केलं. दोनदा. मग मी त्याचाच quote थोडा बदलून त्याच्याचवर टाकला. ‘It is disheartening to see you shocked by his honesty.’

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

वा! मस्त! छान अनूभव आहे हा.:स्मित: खरच तुमचे असे अनूभव आमच्याबरोबर इथे जरुर शेअर करा. यामुळे आमचे पण अनूभव पुढे समृद्ध बनु शकतील.

Masta.. Happy

मस्त! आवडले
<<जेम्स बॉन्ड--आपल्या चांगुलपणाच फळ कोणत्या ना कोणत्या मार्गाने मिळतचं मिळत.>> अनुमोदन!

Pages