असाही एक क्लायंट

Submitted by स्वीटर टॉकर on 7 October, 2015 - 07:09

माझी मुलगी दुसर्‍या यत्तेत जाऊन शाळा सबंद वेळ सुरू झाल्यावर मी काही उद्योग करावा असं ठरवलं. बी.एस्.सी. (फिजिक्स) असल्यामुळे जनरल शिक्षण होतं पण उद्योगधंद्याला पूरक असं काही नव्हतं. मग परत कॉलेजला प्रवेश घेतला, सिंबायोसिसमधून D.C.A. केलं आणि डी.टी.पी. आणि छपाईचा व्यवसाय सुरू केला.

कोणत्याही नवीन उद्योगाप्रमाणेच हा देखील पडंत, धडपडंत, टक्केटोणपे खात, पुस्तकांपेक्षाही जास्त परिस्थितीकडून आणि गिर्‍हाइकांकडून शिकत शेवटी स्थिरावला. प्रत्येक उद्योगाची स्वतःची एक ठरलेली त्रिज्या असते. त्याच्या बाहेरचं गिर्‍हाइक त्याच्याकडे नियमितपणे येत नाही. एखाद्या पानवाल्याची अर्धा किलोमीटर असेल तर चांगल्या रेस्टॉरंटची शहरभर. जनरल छपाई करणार्यांची ही त्रिज्या तीन कि.मी. असते.

एक दिवस मगरपट्ट्याहून एका कंपनीकडून विचारणा झाली. म्हणजे माझ्यापासून सतरा अठरा कि.मी. दूर. पूर्वीच्या अनुभवावरून मला माहीत होतं की इतक्या दूरच्या स्थळाबरोबर आपली पत्रिका जमणं शक्य नाही. मी दरपत्रक पाठवलं पण फारसा रस दाखविला नाही. तरी देखील त्यांनीच पाठपुरावा सुरू केला. एक तर कित्येक कंपन्यांची कामं म्हणजे ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय्’ अशी अवस्था असते. कामं मोठी असतात पण किमती अगदी पाडून मागतात, शिवाय पैसे मिळवण्यासाठी सारखं मागे लागावं लागतं ते वेगळंच. त्यातून ही कंपनी तुर्कस्थानातली.

या कंपनीने काहीही आढेवेढे न घेता किमती मान्य केल्या. लगेचच माझ्या डोक्यात धोक्याची घंटा घणघणली! “पैशाचा अजिबात प्रॉब्लेम नाही” ह्या वाक्याचा खरा अर्थ पूर्वानुभवावरून व्यवस्थित माहीत होता. बहुदा असं असेल की या कंपनीच्या आसपासच्या प्रिन्टर्सचे पैसे तरी यांनी दिले नसतील किंवा हे प्रचंड चिकित्सक असतील ज्यामुळे दुसरे कोणी यांचं काम करायला तयार नसेल. त्यामुळेच ते इतके लांब यायला तयार झाले असणार असा माझा कयास. ऑर्डर सोडवत नव्हती आणि घेववतही. शंभर टक्के अड्व्हान्स मागितला की ते देणार नाहीत आणि सुंठीवाचून खोकला जाईल अशा कल्पनेनी मी मागितला. आश्चर्य म्हणजे ते द्यायला तयार झाले!

आता मला नाही म्हणण्याला काही कारणच राहिलं नव्हतं.

मला आठवण झाली की आमची बोट एकदा हॉन्गकॉन्गला गेलेली असताना मी घड्याळ्याच्या दुकानात गेले होते. एक महागातलं घड्याळ मी घ्यावं म्हणून विक्रेता फारच मागे लागला होता. माझी सुटका करून घ्यायला मी किंमत भन्नाट कमी करून मागितलं. तर तो द्यायला तयार झाला! मग घ्यावंच लागलं. फार दिवस चाललं नाही हे सांगायलाच नको. असो.

ती ऑर्डर पूर्ण केली. थोड्या दिवसात दुसरी आली! मी पुन्हा शंभर टक्के अड्व्हान्स मागितला. पुन्हा त्यांनी दिला. होता होता कित्येक ऑर्डर्स झाल्या. मी जास्तच बेचैन.

If something looks too good to be true, it usually is. यावर माझा विश्वास. मग त्यांच्या Procurement Manager ना त्यांच्या इतक्या दिलदार वृत्तीचं कारण विचारलं. त्यांच्या उत्तरानी मला फारच आश्चर्य वाटलं. केमिकल्स बनविणारी कंपनी होती. कंपनीचा मालक तुर्की. नाव यिल्दिग्लू. म्हणे त्यानी सांगून ठेवलं आहे की सर्व छपाईची कामं यांच्याचकडे करायची. क्वॉलिटीत तडजोड करायची नाही पण किंमतीत घासाघीस करायची नाही!

यिल्दिग्लू! यिल्दिग्लू? कोण हा? आमचा आणि याचा काय संबंध? हा इतका फरिश्ता का बनलाय?

मी आणि स्वीट टॉकर काहीतरी निमित्त काढून त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. ऑफिससारखं ऑफिस. जमेल तितक्या लोकांना भेटलो. नाव ठेवण्यासारखं काहीच दिसलं नाही. यापुढे खाजवून खरूज काढायची नाही असं ठरवलं. या यिल्दिग्लूच्या काहीतरी गैरसमजामुळे आपल्याला बिझनेस मिळत असेल तर ठीकच आहे की. आपण त्यांना वाजवी किमती लावल्या म्हणजे झालं.

सन १९९८ ते २००८ पर्यंत व्यवस्थित चाललं होतं. अचानक ऑर्डर येणं बंद झालं. फोन केल्यावर कळलं की ती कंपनी भारतातून काढता पाय घेत होती. आता मात्र या यिल्दिग्लूपुराणाचा छडा लावणंच जरूर होतं. नाहीतर डोक्यात किडा कायम वळवळंत राहिला असता.

त्यांच्याकडून यिल्दिग्लूचा पत्ता घेऊन त्याला सविस्तर मेल पाठवून त्याच्या या निर्णयाचं कारण विचारलं. त्याच्या उत्तरानी कारण स्पष्ट झालं खरं पण आश्चर्य फारच वाटलं.

मी नुकतीच डी.टी.पी. आणि छपाई सुरू केली होती तेव्हांचा प्रसंग. नवीन धंद्यांमध्ये मालकापासून झाडूवाल्यापर्यंत सगळे आपणच असतो. स्वीट टॉकर नुकताच बोटीवरून परत सुट्टीवर आला होता. मी आणि तो दुकानात बसलो होतो. गिर्‍हाइकांची वाट बघत. त्या सुरवातीच्या काळात दिवसाचा बराच वेळ हीच activity करण्यात जायचा.

एक मनुष्य आला. मध्यपूर्व आशियाच्या लोकांसारखा चेहरा. समजायला अवघड असे इंग्रजी उच्चार. त्याच्या हातात चार कागद होते. ते त्याला टाइप करून मोठ्या फॉन्टमध्ये प्रिन्टाआऊट हवे होते. त्याच्या हातातले कागद म्हणजे संगणकावरचेच प्रिन्टआऊट वाटत होते. मी त्याला सुचवलं की सगळं पुन्हा टाइप करण्याऐवजी जर त्याची फाईल दिलीत तर अगदी स्वस्तात आणि लवकर काम होईल. मीच हे सुचवल्यामुळे त्याला फारच आश्चर्य वाटलं. हे चालू असताना स्वीट टॉकरनी ते पत्र नजरेखालून घातलं. त्यात त्याला व्याकरणाच्या बर्‍याच चुका आढळल्या. त्या सुधारून देण्याची आम्ही ऑफर दिली. त्यामुळे तो भलताच खूष झाला.

दहा मिनिटात त्याचं काम झालं. त्यानी आमचं दोनदा कौतुक केल्यामुळे स्वीट टॉकरनी एक Quote टाकला.
‘It is disheartening that we are shocked by honesty but not by deceipt’.

आम्ही हा प्रसंग विसरलो. पण तो विसरला नव्हता. तोच यिल्दिग्लू.

यिल्दिग्लूनी भावनेच्या भरात निर्णय घेतला असेल देखील, पण दहा वर्षं तो पाळला याचं स्वीट टॉकरनी कौतुक केलं. दोनदा. मग मी त्याचाच quote थोडा बदलून त्याच्याचवर टाकला. ‘It is disheartening to see you shocked by his honesty.’

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी समोरासमोर बसून गप्पा चालू आहेत समस्त ओळखींच्या लोकांमध्ये आणि त्यामध्ये स्वीटर टॉकर आपल्या व्यवसायातील एक सुखद अनुभव इतरांसोबत वाटून घेत आहेत...इतक्या साधेपणाने त्या तुर्कस्थानी फ़रिश्त्याविषयी इथे लिहिले गेले आहे....ते खूपच आवडले.

व्यवसायात अशी त-हेचे आनंददायी अनुभव गाठीशी असले म्हणजे व्यवयाय आणि संबंधित लोक यांच्याबाबत नकळत आपुलकीचे नाते आपसूकच तयार होत जाते....."यिल्दिग्लू" एरव्ही हे नाव कधी वाचनातही आले नसते पण तुमच्या लेखामुळे एक आदर्श व्यक्तिमत्व नजरेसमोर तयार झाले.

छान लिहीले आहे. आवडले. लिहीण्याची शैलीही छान आहे. लिहीत राहा.

(बाय द वे मी स्वीट टॉकर हा एकच आयडी आहे, व हे ही त्याच आयडीने लिहीले आहे असे हा लेख वाचेपर्यंत समजत होतो Happy )

मीही 'स्वीट टॉकर आला' असं वाचल्यावर वर जाऊन पाहिलं, की मग हा कोणता आयडी आहे बरं?? Proud

मस्त अनुभव आहे, फारच छान वाटलं वाचून.

कोणत्याही व्यावसायिकांना असे लक्षात राहाण्यासारखे अनुभव येत असतात पण ते असे मस्त रंगवून सांगण्याची हातोटी तुमच्याकडे पुरेपुर आहे. मजा आली वाचून.

माझ्या आजोबांनी सांगलीत त्यांच्या चाळिशीत छपाइचा व्यवसाय सुरू केला त्यांचे पण असे किस्से अनुभव ते रंगवून सांगायचे त्याचीच आठवण आली.

तुम्ही सगळेजण इतकी भरभरून मनापासून प्रतिक्रिया देता की मला भरून येतं. खरोखर.

तुम्हा सर्वांना - धन्यवाद.

माझ्या या आय डी चे कारण मी पूर्वी लिहिले आहेच, पण पुन्हा लिहिते.
बायका या 'बेटर हाफ' असतात की नाही? म्हणून 'स्वीट टॉकर' आणि 'स्वीटर टॉकर'.

कर भला सो हो भला

एखाद्या उत्तरोत्तर रंगत जाणार्‍या मैफिली प्रमाणे हे लिखाण आहे

लिहित रहा ही विनंती __/\__ Happy

कस्ला भन्नाट अनुभव आहे.....
शेवटची इंग्रजीतील विधान मराठीत सांगा कि....

तरी मला कळले ते इतकेच की कलियुगात हल्लि, जरा कुठे इकडे तिकडे पडलेले सापडले /जास्तीचे आलेले कळले, अन ते परत केले तरी "ऑनेस्टीचे" कौतुक होण्याइतपत परिस्थिति झाल्यामुळे, साध्या साध्या बाबिंनीही शॉक बसतो.
असेच काहीसे आहे का ते?

अन अजुन एक कळले, की "ऑनेस्टीला" आजच्या जगातही मान देणारी लोक आहेत अस्तित्वात. Happy
नैतर इसवीसन १९९४ मधे त्यावेलच्या त्या क्षेत्रातील भारतातील नंबर वन असलेल्या कंपनीच्या प्रेसिडेंटने जेव्हा आम्ही आमच्या येथिल नविन नोकरांबाबत त्यांचि ऑनेस्टी तपासली आहे हे सांगितले, तेव्हा आम्हालाच उलट ऐकवले होते की या जगात ऑनेस्टी आहेच कुठे? अशी कशी तुम्ही ऑनेस्टी चेक केलीत? आम्ही हतबुद्ध......
कारण आमच्या येथिल काम म्हणजे प्रत्येक पेपरची किंमत काही दशहजारात (तेव्हांच्या) अन असे हजारोनी पेपर प्रोसेस करायचे (थोडक्यात सांगतो, "शेअर ट्रान्स्फर एजन्सी - रजिस्ट्रार अ‍ॅण्ड ट्रान्सफर एजण्ट"). कित्येक वेळा विशावासाने म्हणा वा बेशिस्तीने म्हणा, शेअर सर्टीफिकिटांसोबत फक्त शेअर विकणार्‍याची सही असलेले व बाकी ब्लॅन्क असलेले ट्रान्स्फर फॉर्म्स असायचे.... घपला व्हायला भरपुर चान्सेस. डोळ्यात तेल घालुन लक्ष ठेवायला लागायचे. प्रत्येक पेपर म्हणजे करन्सीच जणू. अन तरीही हा प्रेसिडेंट लेव्हलचा महाभाग, "ऑनेस्टी आहेच कुठे" असे विचारत होता, अन अर्थातच त्याच नजरेने तो आमच्यातही काय बघत होता ते कळून येतच होते. असो. विषयांतर झाले थोडे. माफी असावी.

पण आम्ही मात्र आजही, "कामाबरोबर, कामाच्या क्वालिटी/क्वांटीटी बाबत कधीही प्रतारणा करीत स्वतःच्या हाताला/मनाला/बुद्धीला " घाणेरड्या सवयी लागू दिल्या नाहीयेत. अन अर्थातच भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या बाह्य व्यावहारिक जगात असे वागण्याच्या स्वातंत्र्याचि "जबर किंमतही" मोजली आहे.

अन तरीही प्राप्त परिस्थितीमुळे मनात काही शंका उपस्थित झालीच, तर तुम्ही मांडलेल्या वरिल उदाहरणासारखी उदाहरणे, वा पुण्यातील चितळेंचे उदाहरण नजरेसमोर ठेवुन, आजही "उत्कृष्ट व प्रामाणीकतेला" किंमत मिळतेच असा विश्वास मनात परत उभारवुन घेतो, व प्रामाणिकतेचा घेतला वसा टाकून देत नाही. त्याकरता तुमचा लेख प्रेरेणादायी ठरतोय.
तुमच्या जागी अन्य कुणी अस्ता तर "देतोय ना पायजे ती किंंम्मत - ती पदरात पाडून घ्या, परवडतय म्हणूनच देत असेल ना, मग काय घेणेदेणे आहे तो कोण आहे ते समजुन घेण्याची" अशा वृत्तीने तो कोण व का या प्रश्नांची उत्तरेही शोधण्याची तोशिस कधीच घेतली नसती.

लिंबूटिंबू,

तुमच्या विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

इंग्रजी विधानांचा तुम्ही जो अर्थ लावला आहे तो बरोबर आहे.
आज आपण प्रत्येक अनोळखी मनुष्य आपल्याला लुबाडायलाच बसला आहे अशी धारणा करून घेतली आहे ही शोकांतिका आहे.

तुम्ही इतक्या संवेदनाशील ठिकाणी काम करताना जबर किंमत मोजायला लागली तरीही सातत्याने तुमच्या तत्वांना धरून राहिले आहात ही अतिशय कौतुकाची गोष्ट आहे.

तुमचा प्रेसिडेंट त्याच्या पदाला काय मार्ग अवलंबून पोहोचला असणार हे त्याच्या विचारांवरून कळतंच आहे.

तुम्ही हा लेख प्रेरणादायी ठरतोय असं लिहिल्यामुळे मला संकोचल्यासारखं होत आहे. ती माझी योग्यता नाही आणि हेतू देखील नव्हता. एक आश्चर्यकारक आणि मजेशीर गोष्ट तुमच्या बरोबर शेअर करावी एवढंच.

Pages