भैरोबा-दर्शन सह्यमेळावा.. !!

Submitted by Yo.Rocks on 14 September, 2015 - 16:48

'अजून पोचायला तासभर तरी लागेल तुम्हाला.. या तुम्ही सावकाश.. वाट बघतो ' समोरून आम्हा मुंबईकरांची वाट पाहत असणाऱ्या पुणेकरांपैंकी एकाचा फ़ोन.. आमची गाडी एव्हाना कळसूबाई शिखराच्या बाजूने जात होती.. रात्रीच्या शीथल चांदण्यात निद्रिस्त झालेले ते उत्तुंग शिखर खूपच मोहक वाटत होते.. मनोमन प्रणाम करून आम्ही पुढे निघालो.. मुंबईहून दोन गाडया निघाल्या होत्या.. लवकरच राजूरला एका फाट्याजवळ पोचलो.. जिथे पुणेकरांची टेंपो ट्रेवलर आमची वाट पाहत थांबली होती..

मुंबई- पुणेकर आमने सामने येताच कडाक्याच्या थंडीतच आमची गळाभेट झाली.. सदैव एकमेकांवर खार खाणारे असे हे मुंबई- पुणेकर नव्हते.. तर आंतरजालावर मायबोली संकेतस्थळाच्या माध्यमातून एकमेकांचे याराना बनलेले जातीवंत भटके होते.. निमित्त होते.. मायबोलीवरील भटक्यांचा दुसरा 'सह्यमेळावा' ! घाटवाटांच्या कुशीत कोसळत्या पावसात झालेला पहीला वहीला सह्यमेळावा चांगलाच लक्षात राहीलेला.. आणि आता थंडीत दुसरा सह्यमेळावा पार पाडण्यासाठी एकत्र आलो होतो.. आयत्या वॉट्सअपवर दीर्घ-प्रदीर्घ असह्य चर्चा केल्यानंतर सह्यमेळाव्याचे ठिकाण निवडले गेले.. शिरपुंजेचा भैरवगड, कोथळ्याचा भैरोबा नि हरिश्चंद्रगडाचा छोटा शेजारी कलाडगड ! म्हणायला गेले तर आडवाटेवरचे किल्ले !

पुण्याचे पवन व आमचे गुगलकार ओंकार या दोघांच्या मार्गदर्शनाखाली पहाटेची मंदधुंद हवा खात आम्ही भैरवगडाच्या पायथ्याला पोचलो.. एव्हाना बरेच उजाडलेले.. सह्यमेळावा सर्वानुमते ठरत असला तरी नेहमीप्रमाणे नियोजनाची मुख्य सूत्रे सह्याद्रीमित्र ओंकार ओकनेच घेतली होती.. याच भूमिकेखातर त्याला आम्ही मुख्यमंत्रीपद देऊ केले होते.. त्यानेच माहिती काढून पायथ्याला नाश्तापाण्याची सोय केलेली.. अन्यथा अशा आडवाटेच्या ठिकाणी गरमागरम कांदेपोहे नि चहा मिळणे दुरापास्त.. पोट आधी रिकामी करून मग भारदस्त नाश्ता करेपर्यंत आमच्या मेळाव्याचे टीशर्ट संयोजक इंद्रा याने पोतडी उघडली... बऱ्याच प्रयासानंतर आमचा टिशर्ट छापण्याचा पहिला वाहिला प्रयोग इंद्राने घेतलेल्या मेहेनतीमुळे यशस्वी झाला होता.. हिरवा नि राखाडी अश्या दोन रंगाचे टिशर्ट इंद्राने साइज नुसार प्रत्येकासाठी पोतडीतून काढायाला सुरवात केली.. ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी हिरवा रंगाचे टिशर्ट परिधान केले.. दिसायला जरी पाकिस्तानी क्रिकेट टीम वाटत असलो तरी आम्ही स्वत:ला दक्षिण आफ्रिकन म्हणवून घेत होतो.. Lol अपवाद फक्त पुण्याहून काही नव्याने सहभागी झालेले सिद व त्याचा छोटू अनिरुद्ध, कुशल व जंबो !! यांच्यासाठी टिशर्टची सोय होऊ शकली नाही..

मागच्या मेळाव्यास हजर राहिलेल्यांपैंकी बऱ्याचजणांनी टांग दिलेली.. पण नव्याने सहभागी झालेल्या भटक्यांमुळे आकडा जवळपास तसा वाढलाच होता.. मुंबईहून इंद्रा, विन्या, मनोज, रोमा, डेविल, आका, घारुअण्णा व मी असा नऊ जणांचा ताफा दोन गाडया दामटत इथवर आलेलो... तर पुण्याहून बसच केली होती.. ओंकार (सह्याद्रीमित्र), सुन्या, पवन, आशुचँप, हिमस्कूल, राकु , मल्ली, सिद व छोटू अनिरुद्ध, कुशल नि जंबो ! नाशिकचा हेम आम्हाला त्याचा 'कुंजरगड' ट्रेक करून थेट भैरोबाला भेटणार होता.. तर मायबोलीवर सुळके नि कातळकडा संबधित चढाईचे थरारक लेख टाकणारा सुनटुण्या देखील आम्हाला कलाडगड च्या पायथ्याशी भेटणार होता.. !

एकंदर मेळावा चांगलाच रंगणार असल्याची चिन्ह होती.. त्यादिशेने आमचे पहीले पाउल भैरवगडाकडे वळले.. ! पहाटेचे थंड वारे एव्हाना कोवळ्या किरणांपुढे शमलेले... भैरवगडाचा माथा व माथ्यावरील भगवे निशाण स्पष्ट दिसत होते.. आमचा हिरवा कंपू सुक्या पिवळ्या शेतातून वाट काढत डोंगराकडे निघाला .. अपवाद फक्त राकु.. जो पायदुखीमुळे काही वर येऊ शकणार नव्हता.. जल्ला मग आला होता कशाला.. गाड्या राखायला ???

काही वेळातच आम्ही श्रीक्षेत्र भैरवनाथ देवस्थान या नावाच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचलो.. हे स्थानिकांनी केलेले बांधकाम पाहून वरती जाणारी वाट चांगलीच ठळक असणार यात शंका नव्हती.. सुरवातीच्या नव्याने बांधलेल्या पायऱ्या सोडल्या तर पुन्हा पाऊलवाट सुरु होते.. परिसर एकदम शांत..चढणीची वाट डोंगराच्या सावलीखाली येत असल्याने चढाई अजुन सोईस्कर झाली.. प्रत्येकजण आपापल्या कुवतीने मागे पुढे चढत होता.. पण घारुअण्णा गरज नसतानाही फारच थरथरत होते.. की आपले वय झालेय हे भासवत होते ते कळत नव्हते.. एरवी वाघाच्या आवेशात वावरणारे अण्णा अगदीच कोकरु होऊन गेले होते.. इतके असूनही त्यांच्या मागे विनय भीड़े नि आका फोटोग्राफीच्या नादात शेवटून रमत गमत येत होते... पुढे एका वाटेवर वळसा घेत आता खिंडीच्या दिशेने वाटचाल सुरु झाली.. वाटल होत फ़क्त वाट ठळक असेल पण इथे तर चक्क रेलिंग्ज लावलेल्या दिसल्या.. नक्कीच इथे वार्षिक उत्सव वगैरे होत असावा..

- -

खिंड चढून गेलो की उजवीकडे घनचक्करला जाणारी वाट दिसते तर डाव्या हाताला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात.. त्या चढूनच भैरवगडाच्या माथ्यावर जाता येते.. नशिब इथे रेलिंग लावालेल्या नाहीत ! खिंडीतून डोंगराच्या पलीकडे लपलेली दुर्गम डोंगररांगेचा दिसणारा नजारा अप्रतिम.. आता धुक्यामुळे अंधुक दिसत असले तरी पाऊस पडून गेल्यावरती इथले वातावरण नक्कीच क्या केहना असेल...!

----

माथ्यावर पाण्याच्या बऱ्याच टाक्या विखुरलेल्या दिसतात.. एक वाट जिथे विरगळी ठेवल्या आहेत तिथे घेऊन जाते..तिथेच कड्याला खेटून गुहा आहे.. या गुहेतच भैरोबाची शेंदूर फासलेली एक मोठी मूर्ती आहे व दुसरी एक संलग्न अशी गुहा आहे जिथे बरीच ऐसपैस जागा आहे..

- - - -

आम्ही मात्र गुहेच्या तोंडाजवळच ठाण मांडून बसलो नि ओळख असूनही नवख्यांसाठी ओळख परेड सुरु केली.. सोबतीला हिम्याने आणलेल्या चितळेच्या भाकरवड्या !! '.. आणि मी शाळेत शिकायला जातो' हे छोट्या अनिरुद्धचे वाक्यच काय ते ओळखपरेड मध्ये हाइलाइट करण्यासारख.. हा बच्चा खर तर आमच्यासाठी कौतुकाचा विषय होता.. आतापर्यंत तरी इतर लहान मुलांप्रमाणे कसलीही पिरपिर केली नव्हती.. उलट आमच्यासोबत उडी मारण्याचा आग्रह धरला !


( वरील प्रचि सिद व विनय भीडे यांच्या कॅमेर्‍यातून)

वाढत्या उनामुळे आम्ही लवकरच आवरते घेतले.. निघण्यापूर्वी रिकाम्या बाटल्या भरून घेण्यासाठी माथ्यावर उंच भागावरील खांबटाक्याजवळ अर्ध पब्लिक गेल तर अर्ध्यांनी उतरायला सुरवात केली.. खाली पायथ्याला पोहोचेपर्यंत अकरा वाजले नि साहजिकच उनाचे चटके असह्य होउ लागले.. तिथेच बाजूला आडोसा पाहून तरतरी येण्यासाठी पेटपुजेसाठी पंगत बसली..

आम्ही आता कोथळा गावच्या भैरोबा दुर्गच्या दिशेने निघालेलो. आमच्या मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांना शॉर्टकट विचारुन घेतला होता पण भैरोबादुर्ग येइपर्यंत गाड्यांची बरीच दमछाक करणारा रस्ता होता.. कुठच्या कुठला रस्ता होता कळतच नव्हते.. अरुंद रस्ता, नागमोडी वळणं व त्यात चढउतार इति अडचणींवर मात करत पोचलो एकदाचे !

दुपारचा एक वाजून गेलेला... टळटळीत उनात भैरोबादुर्गाची डोंगररांग चमकत होती.. छोटाच आहे तेव्हा आधी ट्रेकोबा मग पोटोबा ! पायथ्याला गाडी जितकी आत जाईल तेवढी घुसवलेली.. तिथेच रस्त्याच्या आडोश्याला गाड्या पार्क करून निघालो.. ! आता मात्र गाड्या राखणाऱ्यांची संख्या वाढली होती.. राकुसोबत घारुअण्णा, इंद्रा व अर्ध्या वाटेत परतलेला डेविल यांनी डुलक्या काढणेच पसंत केले..

भैरोबादुर्ग तसा उंचीला छोटाच पण तळपत्या उनात चढ़ाईसाठी खडतर वाटत होता.. पण वाटेत पायथ्यापासून घनदाट झाडी लागली नि सावलीतला सुखद ट्रेक सुरु झाला... त्यात स्वर्गीय नर्तक नामक पक्षीने आमच्यातल्या काही नशीबवान दोस्तांना मोहक दर्शन दिले.. एकंदर कुठल्याश्या अभयारण्यात भटकंतीला आलोय याची जाणीव झाली.. वीसेक मिनिटांच्या चढाईनंतर आपण कातळ कड्याला भिडतो.. समोरच एक छोटीशी लोखंडी शिडी बसवलेली दिसते.. ही शिडी चढून गेलो की डावीकडे एक वाट कड्याला लागूनच पुढे जाते.. आणि कातळालाच लागून असलेल्या एका मोकळ्या जागेत येतो.. इथून समोरील नजारा पाहण्यासाठी उत्तम जागा.. इथेच कातळात थोड़े वरच्या बाजूस नैसर्गिक गुहा सदृश खोबणी आहे तिथवर चढता आले तर बसून समोरील नजाऱ्याचा आनंद लुटावा..

इथे घटकाभर थांबून आम्ही पुन्हा मूळ मार्गाशी आलो..वरती चढून गेलो की डावीकडे कातळकडयावरच बसण्यासाठी चक्क दोन बाकडे बसवले आहेत.. या बाकडयांच्या मागेच पिण्याच्या पाण्याचे खांब टाके आहे.. टाक्यातले पाणी भरुन घ्यावे नि बाकडयावर अगदी निवांत बसून पाण्याचा घोट घेत समोरचा सह्याद्री पहावे... जल्ला जसा काय एकदम गार्डन मधला कपल स्पॉटच ! असो.. पुढे दूसरी भली मोठी शिडी पार केली की माथ्यावर प्रवेश !! माथ्यावर भैरोबाचे देवस्थान असल्याने गावकऱ्यांसाठी ही सगळी सोय केलेली आहे..

- - -

दूसरी शिडी चढत असतानाच दोन जण आमच्या मागून चढत आले.. बघतो तर कुंजरगड ची चढ़ाई संपवून आलेले हेम व त्याचा मित्र राहुल सोनावणे हे नाशिकवीर होते.. त्यांच्यासमवेतच मग माथा फिरलो.. माथ्यावर चार पाच पाण्याच्या टाक्या, दोन दगडी दिपमाळ नि भैरोबाचे छप्पर नसलेले देवस्थान आहे ! पण आमचे कुतूहल सभोवताली दिसणाऱ्या सह्याद्री रांगामध्ये होते.. हरिश्चंद्रागडाचा बालेकिल्ला, कुंजरगड़, घनचक्कर अश्या विविध भव्य दिव्य डोंगररांगा या भैरोबा दुर्गाला वेढा दिल्यागत भासतात..

- - -

अर्ध्या तासातच आम्ही खाली उतरायला घेतले.. एव्हाना साडेतीन वाजत आलेले.. झोपी गेलेल्यांना उठवले नि आम्ही ओंकार ने ठरवलेल्या पोटोबा स्थानाकडे रवाना झालो..

जवळच्याच डोंगरकुशीत दडलेल्या कुठल्याश्या लव्हाळे गावात उत्तम जेवणाची सोय झालेली.. भरपेट जेवणाचे ढेकर देत सगळेच सुस्तावले.. नि इथे तिथे पांगले.. या गावातून भैरोबा दुर्ग व त्याचे इतर डोंगर सवंगडी यांचा उभा डोलारा खासच दिसतो..


( हा सुंदर प्रचि सिद ने त्याच्या कॅमेर्‍यातून टिपला आहे)

आज दिवसभरात चढाई फारशी नसली तरी प्रवास फारच झाला होता.. दोन छोटे किल्ले पण रात्रीपासूनचा नॉन स्टॉप प्रवास यामुळे आलेला क्षीण घालवायचा कसा यावर पाण्यात डुंबणे हा पर्याय सगळ्यांनीच उचलून धरला.. कारण काही जणांना डूंबायचे होते तर काही जणांना डबा ऐसपैस खेळायचे होते !! जंगलाच्या कुशीत असलेला बंधारा पाण्यात डुंबण्यासाठी उत्तम जागा.. चोहुबाजूंनी हरीत सृष्टी.. बंधाऱ्याचे संथ पाणी.. काठावर घुटमळणारे खंडया, बगळे.. वेळ कसा गेला कळलेच नाही..


( हा सुंदर प्रचि सिद ने त्याच्या कॅमेर्‍यातून टिपला आहे)

पुन्हा गावात येऊन चहा बिस्किटचा आस्वाद घेत आम्ही आवरते घेतले.. खाण्या- पिण्याची उत्तम सोय केल्याबद्दल धन्यवाद मानत त्यांचा निरोप घेतला नि आम्ही पाचनईच्या दिशेने निघालो.. बऱ्याच विश्रांतीनंतर गाड्या पुन्हा प्रवसाला जुंपल्या.. पण घाटरस्त्यात ब्रेक लागले निमित्त पश्चिमेला केशरी रंगात डुबलेले क्षितीज नि त्या रंगाच्या पार्श्वभूमीवर उमटलेल्या सह्याद्री रांगेच्या आकृत्या.. त्या आकृत्यांमध्ये एक आकृती कलाडगडाची होती.. दुसऱ्या दिवशी ठरलेली शेवटची किल्ले सफर..!

पाचनई येइपर्यंत एव्हाना अंधार दाटून आला होता..पाचनई म्हणजे सुप्रसिद्ध हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचे गाव नि इथून गडावर जाणारी सोप्पी वाट तेव्हा इथे ट्रेकरलोकांची थोडीफार वर्दळ अपेक्षितच होती.. इथेसुद्धा आमच्या ओंकार साहेबांनी जेवण व राहण्याची सोय केलीच होती.. आमच्या गाड्या पार्क होईपर्यंत सुनटुण्या उर्फ़ सतीश हाजिर झाला नि आमचा कंपू संपूर्णम...

घरासमोरच्या अंगणातच आमचा घोळका गप्पांच्या फडात रमला होता.. एका कोपऱ्यात घारुअण्णांचा चूल पेटवण्याचा निष्फळ प्रयत्न सुरु होता.. शेवटी केडी च्या मदतीने पेटवलीच.. तर घरातल्या चुलीचा ताबा मल्ली, इंद्रा व मी घेतला होता.. सूप-पापडाचे पडघम वाजवण्याची लगबग सुरु होती...


(प्रचि विनय भीडेकडून)

अंधाराचे साम्राज्य.. रातकिड्यांचा किरकिर्राट.. हवेत सावकाशीने पण वाढत जाणारा गारवा.. एकसुरात न पेटलेल्या चूलीचा मंद प्रकाश.. गिर्यारोहण या एकमेव विषयावर चालू असलेल्या गप्पा नि हातात सूप भरलेला ग्लास... आणि काय हवे..

आमच्या कंपूत पहिल्यांदाच सामिल झालेल्या सुनटुण्यालाच बोलते केले..सुळके असो वा कातळ चढाई..त्याचे मायबोलीवर एकापेक्षा एक असे भन्नाट वृत्तांत वाचले होतेच.. बऱ्याच जणांना कुतूहल होते त्यामुळे जो तो आपापल्या बुद्धीने विचारत होता नि सुनटुण्या देखील जराही न कंटाळता सांगत होता ! अजुन एक उल्लेख सांगायचा तर हेम चे मित्र राहुल सोनावणे ह्यांनी सहयाद्रीत बचावकार्य ही मोठी कामगिरी पार पाडतानाचे आपले अनुभव कथन केले.. सागरमाथा चे सिद उर्फ़ सुनील पाटील व केडी उर्फ़ कुशल यांनी देखील एवरेस्ट बेस कँपच्या वेळचे आपले अनुभव कथन केले.. गप्पा रंगल्या असतानाच जेवण हजर झाले.. मटकीच्या उसळीत फरसाण घालून सगळ्यांनीच ताव मारला.. पुन्हा गप्पाष्टक सुरु करण्याचा बेत होता पण वाढत्या गारव्यामुळे काहीजण अंगणातच आडवे झाले नि घोरण्याचे बेसुर राग सुरु केले.. अखेरीस अर्धी मंडळी एका घरात तर उर्वरीत मंडळी दुसऱ्या घरात अशी झोपण्यासाठी पांगली गेली. या गडबडीतसुद्धा ओंकार ने आपले माउथ ओर्गान वाजवून कला सादर केली.. वासरु बांधलेल्या घरात आशुचैंप सोडला तर आम्हाला पटकन डोळा लागला.. जल्ला वासरु त्याच्याजवळ बांधलेले होते !!

नीटसे उजाडलेही नव्हते.. एव्हाना बाहेर शेताडात झुडुपामागे जाण्याची लगबग सुरु झालेली.. एकीकडे सामानाची आवराआवर सुरु होती.. बाकी टळकी चहाच्या प्रतिक्षेत गप्पा मारत बसलेले.. विषय एकच.. काल रात्री दुसऱ्या घरात घडलेला कोंबडी डांस.. रविवारी पुणेकरांसाठी दुपारच्या कोकु जेवणासाठी राखलेल्या कोंबडीने रात्री सुटकेचे अपार प्रयत्न केले.. तिला पुन्हा डांबून ठेवण्यासाठी घरकरीने विडा उचलला.. परिणामी झोपलेल्या मित्रांच्या पोटावर डोक्यावर उड्या मारत घरभर पिसांचा धुराळा उडवून दिला.. परिणामी त्या घरात झोपण्यासाठी गेलेल्यांची झोप झालीच नाही.. अपवाद एकच घारूअण्णा !!

गप्पाटप्पामध्ये चहा-नाश्ताचा कार्यक्रम आटोपला.. उशीराने सामिल झालेले हेम, राहूल व सुनटुण्यासाठी पुन्हा थोडक्यात ओळखपरेड आटपण्यात आली.. गावातूनच आमचे पुढचे लक्ष्य कोवळया उन्हात चमकत होते.. कलाडगड व त्याचा कोंबडा ही सह्याद्री डोंगररांगेची जोडगोळी उठून दिसत होती.. आम्ही मुंबईकर तिथूनच घरचा रस्ता पकडणार होतो तर पुणेकरांचा जीव त्या कोंबडीवर जडला असल्याने ते पुन्हा इथे येणार होते..

पुन्हा गाड्यांनी रस्ता धरला.. गावातून जवळ वाटत असले तरी खडबडीत रस्त्यात तो लांबलचक वाटला.. पण त्या रस्त्यामुळेच आम्ही अगदी डोंगराच्या खांद्यापर्यंत पोहोचलो...आमची पायपीट वाचली..!

आमच्यासोबत गावकारी सोबतीला असल्याने गाडी बरोबर मोक्याच्या जागी थांबवली.. डाव्या बाजूला डेरेदार वृक्षाची सावली व त्याच्या बाजूनेच एक वाट डोंगराच्या सोंडे वर नेत होती... चढायला सुरवात झाली नि घारुने माघार घेतली Lol

गडाची ऊंची फार नाही पण चढ अंगावर येणारा होता.. आमच्यातले नविन सदस्य व नावाप्रमाणेच जंबो असलेले गृहस्थ यांना वाटेतच धाप लागली.. परिणामी त्यांना वाटेतच थांबवून विश्रांती घ्यायला सांगितली. वाट थेट चढणीची असल्याने विसाव्यासाठी जागाच नव्हती.. त्यांना तिथेच आराम करायला सांगून आम्ही वरती गेलो.. तसेही वाट सोंडे वरुन सरळ असल्याने कुठुनही त्यांच्याकडे लक्ष जात होते.. कालपासून सुरु असलेल्या भटकंती मध्ये ही चढाई थोडीफार अवघड होती..

मागे वळून पाहता घनचक्कर भैरवगड ही डोंगररांग धुरसट दिसत होती.. लवकरच माथ्यानाजिक एक सोप्पा कातळटप्पा पार केला नि एक गुहा लागली.. इथेसुद्धा शेंदुर लावलेला भैरोबाच आहे.. गुहेच्या तोंडावर बसून गप्पा मारत असतानाच खालून जंबो तब्येत(पोट?) बिघडल्यामुळे आवाज देऊ लागला.. आमच्यातले मल्ली व सुन्या तातडीने त्यांना खाली घेऊन जाण्यास रवाना झाले !

आम्ही आता गुहा सोडून वरच्या बाजूस गेलो.. पुढील वाट वरती न चढता माथ्याला डावीकडून वळसा मारत जाते.. वरती एक पिण्याच्या पाण्याचे छोटे टाके आहे नि पुढे मोकळ्या जागेत शेंदुर लावलले पाषाण आहेत.. बाकी पाहण्यासारखे म्हणजे अवतीभवती दुरवर पसरलेली सह्याद्री डोंगररांग आणि या कलाडगडालाच खेटून असलेला अंगठा ! वेड लावणारी ही डोंगररांग पाहून आमच्यात डोंगर ओळखा स्पर्धा सुरु झाली.. मदतीला गावकरी नि आमचा ओंकया होताच.. मग एकीकडे नाफ्ता सुळका असो वा एकीकडे हरिश्चंद्रगडाचे बालेकिल्ला तारामती शिखर, टोलार खिंड, सादडे घाट असो तर दुसरीकडे घनचक्कर भैरवगड डोंगररांग तर दुरवर कुमशेत, आजोबा, गुहीरीचे दार, पाथरा घाट नि बरच काही... म्हटल आपल बरच काही उलथा पालथ करायच राहीलय..

भर उनातच हा सगळा नजारा बघत बसलो.. खाऊची शिदोरी उघडली गेली.. नित्यनियमाप्रमाणे उड्यांचा कार्यक्रम पार पडला.. वेळ कसा गेला कळलेच नाही.. उतरायला सुरवात करणार तोच सुन्या नि मल्ली त्या जंबोला खाली पोचवून पुन्हा वरती आले पण..


(प्रचिकार - इंद्रा व सिद)

पवन्या ने चघळायला आणलेल्या चिंचगोळी मिटकावत सगळे पायथ्याला पोहोचले.. इथेच मग ग्रुप फोटो झाला नि आमची स्वारी आता शाही स्नानासाठी निघाली.. निमित्त होते आमच्या सोबतचा गावकरी वाटेत लागणारी 'पाप पुण्याची' कुंड दाखवणार होता.. गप्पटप्पा आटपून सगळे आपापल्या गाड्यां मध्ये बसले आणि निघणार तोच मनोज च्या कारचा टायर पंक्चर झालेला दिसला.. पुन्हा कावाकाव करण्यासाठी निमित्त झाले.. एक घोळका पंक्चर बद्दल आपापले ज्ञान पाजळू लागला.. तर दुसरीकडे घोळक्या घोळक्याने गप्पा सुरु.. विषय एकच भटकंती !!

लवकरच पंक्चरचे काम उरकून गाड्या निघाल्या.. वीसेक मिनिटांतच गावकऱ्याने थांबवले.. रस्त्याच्या बाजूला पाहिले तर अगदीच तळाला गेलेल्या पाण्याचे कोरडे पात्र होते.. म्हटल इथे कशी जलक्रीडा होणार.. पण त्या पात्रातून पुढे पाचेक मिनिट चालत गेलो की थेट दहा फूटी कडा लागतो.. डोकावून पाहिले तर चक्क नैसर्गिक तरण तलाव !! कड्यावरच मग सामान ठेवून सोप्पा कातळटप्पा पार करून खाली उतरलो नि पटापट पाण्यात शिरकाव केला.. पाण्याचा थंडावा काय तो वर्णावा.. पाण्यात अट्टल पोहाणाऱ्यांनी चाचपडून पाहीले तर चक्क तीन कुंड.. बारामाही पाणी असते.. त्या गावकऱ्याचे इतकी सुंदर जागा दाखवल्याबद्दल धन्यवाद मानले.. भटकंती मेळाव्याचा हा शेवट खूपच फ्रेश करून गेला..

- - - -

दोन दिवस जमून आलेल्या कंपूची आता ताटाटूट होण्याची वेळ.. कुठलीही ड्रामेबाजी न करता पार पडलेल्या सह्यमेळावाचा आढावा घेण्यात आला.. मुख्यमंत्री महोदय ओंकार ओक चे योग्य नियोजन केल्याबद्दल कौतूक नि त्याचबरोबर काही त्रुटींबद्दल हक्काने शिव्या घातल्या.. अशा गोष्टींमध्ये आमचा विनय भीडे नेता असतो हे सांगणे वेगळे !

गळाभेट फोटोशूट करून आम्ही मुंबैकरांनी परतीची वाट धरली तर पुणेकरांसाठी ती कोंबड़ी वाट पाहत होती ! नाशिकवाले त्यांच्या नाशिक रोड ला !

धमालमस्ती,गप्पा.. आडवाटेवरचे दुर्ग व माथ्यावर विराजमान असलेले भैरोबा दैवत... दोन दिवस वेगळ्याच दुनियेत वावरलो.. जिथे बाकी सगळ्याचा विसर पडलेला.. वॉट्स-अप पेक्षाही ह्या मेळाव्यानिमित्ताने आम्ही एकमेकांशी जास्त कनेक्ट झालो.. To be continued इतकेच मनाला वाटत होते...

एव्हाना आमची गाडी नेमकी कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी पोचलेली... त्या शिखरामागे पश्चिमेला तांबडा सूर्यगोल 'अलंग-मदन-कुलंग' या बुलंद त्रिकुट दुर्गावरती रेंगाळत होता... शेवटी त्याला कुलंगनेच आपल्या कवेत घेतले नि आम्ही हे दृश्य पाहण्यात हरखून गेलो ! आतापर्यंत पाहिलेल्या काही अप्रतिम सूर्यास्तापैंकी असा एक ! भटकंतीचा शेवट यापेक्षा गोड असूच शकत नाही !

हा मेळावा आटपून घरी परतायच्या आतच मनात प्रश्ण उभा राहीला.. आता पुढील मेळावा कधी.... ???

Group content visibility: 
Public - accessible to all site users

bhaaree!!

भारी!

जल्ला मला वाटले यंदाच्या मेळाव्याचा वृत्तांत असेल...तू तर लेका दुसऱ्यातच गुंतुन राहीलास....

पण भारी झाले...सगळ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.....

लईच भारी वर्णन आणि फोटू

अबे योग्या.. ह्या वर्षीच्या मेळाव्याचा वृत्तांत अजून दोन वर्षांनी टाकणार काय?

तो पण वृत्तांत लिही लवकर...

बाकी हा वृत्तांत झकास झालाय..