बालरंजन केंद्राच्या संस्थापिका सौ. माधुरी सहस्रबुध्दे

Submitted by Adm on 25 August, 2009 - 01:23

परिचितांमधले अपरिचित : बालरंजन केंद्राच्या संस्थापिका आणि संचालिका सौ. माधुरी सहस्रबुध्दे

काही काही लोकं ही आपल्या दैनंदिन कामामधून, इतर व्यापांमधुन वेळ काढून आपली कला/आवड उत्तम प्रकारे जोपासतात, समाजसेवेची कास धरतात किंवा केवळ छंद म्हणून सुरू केलेली एखादी गोष्ट अगदी वैश्विक पातळीवर घेऊन जातात. आणि ह्या व्यक्ती आपल्या रोजच्या परिचयातल्या असूनही त्यांची ही अपरिचित बाजू म्हणजेच त्यांची कला किंवा कार्याविषयीचा ध्यास, अभ्यास, प्रयत्न तसेच वेगवेगळे अनुभव ह्याबद्दल आपल्याला अगदी थोड्याच प्रमाणात माहिती असते. मायबोली गणेशोत्सवानिमित्त माझ्या अश्याच काही परिचितांची माझ्यासाठीही अपरिचित असलेली अशी बाजू जाणून घ्यायचा तसेच ती मायबोलीकरांसमोर मांडण्याचा हा प्रयत्न.

*****************************************************

सहस्रबुध्दे कुटुंबाची ओळख पुणेकरांना आहे ती दोन कारणांनी. एक म्हणजे त्यांची 'सकस'ची वेगवेगळी पिठं आणि पुण्यात असलेल्या १० गिरण्या आणि दुसरं म्हणजे कर्वेरोडजवळच्या भारतीनिवास कॉलनीत मुलांनी फुललेलं 'बालरंजन केंद्र'. सकसचे कामकाज सांभाळणारे श्री. श्रीराम आणि बालरंजनच्या संस्थापिका आणि संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे हे माझे काका- काकू.
समाजकार्य म्हटलं की ते केवळ वंचितांसाठी करायचं अशी एक समजूत असते. परंतु आजची विभक्त कुटुंबपध्दती, पालकांचा मुलांशी कमी झालेला संवाद, शिक्षणातली जीवघेणी स्पर्धा ह्या सगळ्यांमुळे सुखवस्तू घरातील मुलंही मनसोक्त खेळायच्या संधीला मुकतात, एकलकोंडी होत जातात. मुलांनी संध्याकाळचा वेळ मैदानावर घालवावा ह्या अपेक्षेतून 'शरीराला व्यायाम आणि मनाला शांतता' हे सूत्र ठरवून बालरंजन केंद्राची स्थापना माधुरीकाकूने १९८८ मध्ये केली. बालरंजन केंद्राच्या संकल्पनेपासून ते व्यवस्थापनापर्यंतचे संपूर्ण काम सांभाळणार्‍या आणि 'सकस'च्या कामकाजातही सक्रिय सहभाग घेणार्‍या माधुरीकाकूचे व्यक्तिमत्त्व अतिशय हरहुन्नरी. ह्या दोन मोठ्या व्यापांमधून वेळ काढून तिने सुजाण पालक केंद्र, पपेट शो आणि बालनाट्यांचे प्रयोग, स्वतःचा छंद म्हणून पत्रकारितेचा तसेच बागकामाचा अभ्यासक्रम आणि शिवाय वेळात वेळ काढून केलेली भटकंती ह्या सगळ्या गोष्टीही समर्थपणे निभावल्या. तिच्या सगळ्या कार्याची माहिती मायबोलीकरांना करून देण्यासाठी मायबोली गणेशोत्सवानिमित्त माधुरीकाकूशी साधलेला हा संवाद.

Madhuri_kaku.jpgबालरंजन केंद्राची सुरुवात कशी झाली आणि त्यामागची मूळ संकल्पना काय ?

साधारण २२ वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यावेळी माझा मोठा मुलगा सलिल ८ वर्षांचा होता तर धाकटा निखिल ५ वर्षांचा. वयाच्या पाचव्या वर्षापासून ते थेट पदवीधर होईपर्यंत प्रत्येक संध्याकाळ मैदानावर घालवणार्‍या मला, माझ्या मुलांनी संध्याकाळी घरी बसणं पटण्यासारखं नव्हतं. म्हणून मी सलिलला ग्राऊंडला घातलं. तिथे पोचवण्या-आणण्याकरता रिक्षाही लावली. पण रिक्षा दाराशी आली की हा रडायचा. कधी त्याच्या पोटात दुखायचं तर कधी शी लागायची. एकंदरीत ग्राऊंड हे प्रकरण त्याला आवडत नव्हतं कारण तिथला पूर्ण वेळचा शारीरिक व्यायाम त्याला मानवत नव्हता. त्याउलट गाणी म्हणणे, गोष्टी ऐकणे, चित्र काढणे, हस्तकला, बैठे खेळ ह्यात तो रमत असे. माझ्या मुलाच्या गरजा असलेलं असं ग्राऊंड कुठे मिळालं तर किती बरं होईल असा विचार मनात आला. पण मग माझ्या अपेक्षा पूर्ण करणारं, जिथे थोड्या व्यायामाबरोबरच अनेक गंमती-जमती असतील असं ग्राऊंड इतर कोणी दुसर्‍याने सुरु करण्यापेक्षा मीच का सुरू करू नये असंही वाटून गेलं. शिवाय मला जर माझ्या मुलाच्या ह्या गरजा आहेत असं जाणवतंय तर अशी इतरही अनेक मुलं असतील ज्यांना ह्या गोष्टी करायला आवडतील असंही वाटलं. आमच्या सोसायटीचं मोकळं मैदानही जवळच होतं त्यामुळे जागेचा प्रश्न सुटल्याने ह्या विचाराला बळकटी आली. त्यातच माझं मानसशास्त्र, सोशलवर्क आणि संपर्क माध्यमाचं शिक्षणही गाठीशी होतं. पण केवळ मला वाटून किंवा माझ्याकडे संबंधित विषयांचं ज्ञान असून भागणार नव्हतं, तर त्याची गरज परिसरातल्या लोकांना, पालकांना खरंच वाटते आहे का हेही बघणं आवश्यक होतं. मग मी पाहणी (सर्वे) करायला सुरुवात केली. आमची वसाहत ही साधरण १९६० ते ६३ दरम्यान वसली होती. त्यावेळी जी मंडळी इथे रहायला आली त्यांची नातवंडे आता ३ ते १२ वयोगटात होती. म्हणजेच माझ्या ईप्सित केंद्राला नक्कीच वाव होता. मग माझ्या मनाने उचल घेतली की हे ग्राऊंड सुरु करायचं. २३ जानेवारी १९८८ रोजी माझी मुलं सलिल आणि निखिल, त्यांचे समोरच रहाणारे दोन मित्र सिद्धार्थ आणि आदित्य अशा चार मुलांना घेऊन मी बालरंजन केंद्र सुरु केलं.

ह्या केंद्राला प्रतिसाद कसा होता ? आजुबाजूच्या लोकांकडून सकारात्मक तसेच नकारात्मक दोन्ही प्रतिक्रिया आल्या असतील ना?

बाकीच्यांच कशाला, कुठल्याही मराठी माणसाच्या मनात अपयशाची जेवढी भीती असते तेवढी मला स्वतःलाही होतीच. आपण मारे सुरु करू पण बंद पडलं तर? कोणी आलंच नाही तर? असे विचार माझ्या मनातही अनेकदा येऊन गेले. माझ्या काही मैत्रिणींनी "प्रत्येक संध्याकाळ कमिट करणं जमणार नाही, नवरा मुलं ह्यांच्या बरोबर संध्याकाळी फिरायला जायचं, सणवार साजरे करायचे, झालंच तर भिशी, मैत्रिणींची पार्टी असं काही करायचं हे सोडून ग्राऊंड कुठे..." असं सांगत सरळ नकार दिला. तर आसपाच्या काही ज्येष्ठ मंडळींनी "ह्याची गरजच काय? आम्ही नाही का लहानाचे मोठे झालो..तेव्हा कुठे होती अशी ग्राऊंडं?" असं म्हणत विरोध नोंदवला.
पण केंद्र सुरू झाल्यानंतर हळूहळू मुलांची संख्या वाढायला लागली. मग येणार्‍या शिक्षिकाही (ज्यांना सगळी मुलं "ताई" म्हणतात) वाढायला लागल्या. महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या आपल्या मुलांना सोडायला यायच्या त्याच पुढे ताया म्हणून यायला लागल्या कारण आपल्या मुलाला ह्याचा फायदा होतोय हे लक्षात आल्यावर त्यांचा बालरंजनमधला रस तसेच सहभाग वाढला. "आपल्या सुनांना ही बिघडवत्ये” असं वाटण्यार्‍या तायांच्या सासवाही पुढे आपल्या नातवंडांचे कार्यक्रम पहायला कौतुकाने हजेरी लावू लागल्या. बालरंजन केंद्राचा सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या मुलांनाही केंद्राची गोडी लागली. मुलं मित्रमैत्रिणींचे वाढदिवस, घरातले सणवार यापेक्ष्या अधिक प्राधान्य ग्राऊंडला देतात असं पालकांकडून माझ्यापर्यंत पोचतंच होतं. शिवाय त्याकाळी आमच्या घरी फोन नाही, माझ्याकडे स्वतंत्र वाहन नाही, आम्ही जास्त कुठे गावाला जात नाही ह्या गोष्टींबद्दल मी कुरकुरायची. पण बालरंजन केंद्र सुरू केलं ह्या सगळ्या गोष्टी माझ्या पथ्यावरच पडल्या. घरापासून ग्राऊंड २ मिनिटांच्या अंतरावर असल्याने मला वाहन लागलंच नाही आणि फार कुठे बाहेरगावी जाणं होत नसल्याने माझ्या अनुपस्थितीचा प्रश्नच उद्भवला नाही. मैदानावर अगदी कु़णीही नसलं, मुलं किंवा ताया, तरी मी तिथे असणारच असं ठरलेलंच होतं. अगदी भरपावसातही मी तिथे उपस्थित असे. त्यामुळे सुरुवातीला जरी नकारात्मक प्रतिक्रिया आल्या तरी त्याचा काहीच परिणाम झाला नाही. पुढे केंद्राला मिळणारा प्रतिसाद इतका वाढला की सध्या एकावेळी ३५० मुलं आहेत आणि शिवाय ६० ते ७० मुलं प्रतीक्षायादीत आहेत!

सलिलच्या ज्या गरज्या तुला प्रातिनिधीक म्हणून लक्षात आल्या त्या आधी कोणालाच जाणवल्या नसतील का किंवा पूर्वीच्या काळच्या मुलांच्या बाबतीत असे प्रश्न पडत नसावेत का?

पूर्वीचा काळातील मुलंही या ना त्या प्रकारे आपलं मन रमवतच होती. त्यावेळी पालकांना मुलांकडे द्यायला खूप वेळ होता असंही नाही आणि आजइतकी पाल्याबाबतची जागरुकताही नव्हती.एकत्र कुटुंबात काही व्यक्ती अशा असायच्या की ज्यांच्याकडे खूप वेळ असे. त्यांची आणि मुलांची चांगली गट्टी जमत असे. त्यामुळे सुट्ट्यांदरम्यान त्यांच्यावर कुटुंबातल्या मुलांची जबाबदारी येत असे. ह्या व्यक्ती आपल्या आवडीप्रमाणे तसेच वकूबाप्रमाणे ह्या मुलांना निरनिराळे अनुभव देत आणि मुलांची जडणघडण होई. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न असे केले जात नसावेत. सुट्टीत घरात बसवलेलं नाटक असो, शनिवारवाडा किंवा पर्वतीची सहल असो, अंगणात सर्वांनी एकत्र जमून केलेलं पॉटमधलं आईस्क्रिम असो किंवा दिवाळीचा किल्ला असो त्यातला अनुभव महत्त्वाचा. पण आता विभक्त कुटुंब पध्दतीत मुलांसाठी वेळ देणारं, मुलांना गाणी-गोष्टी सांगणारं, पुस्तकं वाचून दाखवणारं, लक्ष ठेवणारं असं कोणी असेलच असं नाही आणि त्यामुळेच बालरंजन केद्रांची गरज बर्‍याच पालकांना आता जाणवली. मोठेपणी आठवण्यासाठी आता अनेक आनंदक्षण आपल्या स्मरणकुपीत साठवून ठेवूया असं आमच्या बालरंजन केंद्राचं उद्दिष्ट आहे. आज वेळेअभावी, नियोजनाअभावी जे आनंदक्षण पालक आपल्या मुलांना देऊ शकत नाहीत ते संघटितरीत्या देण्यासाठी हा उपक्रम आहे.

Mulakhat_Photo_2.JPGबालरंजन केंद्रातल्या रोजच्या activites चं स्वरूप काय असतं ?

हल्ली शाळा, गृहपाठ, शिकवणी, तिथला गृहपाठ आणि शाळेत तसे शिकवणीला येण्याजाण्याच्या वेळा पाळण्याचे कष्ट ह्या सगळ्याचा मुलांच्या मनावर ताण येतो. हा ताण हलका करण्यासाठी तसेच मुलांचं मूलपण वाचवण्यासाठी मुलांना मनसोक्त खेळता आलं पाहिजे. खेळ खेळल्यामुळे ताकद, गती, लवचिकता, चिकाटी व समायोजन या पातळ्यांवर मुलांचा शारीरिक विकास होतो. बालरंजन केंद्रात सुरुवातीला व्यायाम, त्यानंतर खेळ, मग गाणी, गोष्टी, प्रार्थना, प्राणायाम यामुळे शरीर दमून तर मन शांत होऊन मुलं घरी जातात. व्यायाम तसचं खेळामुळे उत्साहीत झालेली मुलं प्राणायामामुळे शांत होतात आणि घरी जाऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतात. म्हणून खेळाबरोबरच प्राणायाम, प्रार्थना ह्यांनाही तितकंच महत्त्व आहे. ह्या सगळ्यामध्ये स्पर्धेचा ताण नाही, तर सहभागाला महत्त्व दिलं जातं. उपक्रमांच्या संख्यपेक्षा त्यातून मुलांपर्यंत नेमकं काय पोचतंय याचा अभ्यास केला जातो. त्यामुळे कार्यक्रमांना, उपक्रमांना तोटाच नाही. उदाहरण द्यायचं तर मध्यंतरी आम्ही पौर्णिमेच्या रात्री ८ ते १५ वर्षे वयोगटातल्या साधारण ४० मुलांना राजाराम पूल ते सिंहगड पायथा अशा सुमारे २८ किलोमीटरच्या Moon light walk ला घेऊन गेलो होतो. रात्री १२ला निघून पहाटे ५च्या सुमारास सिंहगड पायथ्याशी पोचलो. बरोबर बस असूनही सगळे जण पूर्ण अंतर चालले. ह्यातून मुलांच्या क्षमता ताणल्या गेल्या आणि एक आयुष्यभर लक्षात राहिलेला अनुभव त्यांना मिळाला. ह्यानंतर मुलांचा आत्मविश्वास खूप वाढला असं आम्हाला जाणवलं. तसंच एकदा आम्ही मुलांचा गट घेऊन लॉ कॉलेज मैदानावरचा १४ किलो कचरा गोळा करून त्याचं वर्गीकरण केलं आणि योग्य जागी पुर्ननिर्मितीसाठी नेऊन दिला. त्यावर मुलांशी चर्चा केली. आमच्या मैदानावर आता एकही कगदाचा कपटाही शोधून सापडत नाही. शेवटी संस्कार म्हणजे काय, तर एखाद्या अनुभवाचा मुलांच्या मनावर उमटलेला ठसा. कारण ह्याच ठश्याशी मुलं नंतर येणारे अनुभव पडताळून बघतात. ह्यासाठी मुलांवर काहीही लादायची गरज नाही तर योग्य ते अनुभव त्यांना देणं गरजेचं असतं.

मुलांबरोबर काम करत असतानाचा अनुभव कसा आहे?

केंद्राच्या निमित्ताने मुलांबरोबर काम करताना आम्ही तायाही मुलांबरोबरच वाढतोय, बदलतोय, नविन गोष्टींचा अनुभव घेतोय. खूपदा आपली गृहितके चुकत आहेत की काय असंही जाणवतं. आपण योजलेल्या गोष्टी त्यांना आवडत नाहीत. त्यांचं हे न आवडणंही पचवायला शिकतोय. नव्या जोमाने वेगळ्या गोष्टींची आखणी करतोय आणि आपणच समृध्द होत जातोय हा अनुभव अनुभव अनोखा आहे. उदाहरण द्यायचं झालं तर.. एकदा मी ३ ते ५ वयोगटातील मुलांना लांब ढांगा टाकत पळण्याचं महत्त्व सांगत होते. लांब ढांगा टाकल्यास आपण जास्त अंतर कापू शकतो याचं प्रात्यक्षिक प्रोफाईलमध्ये करून दाखवत होते. मग मी मुलांना विचारलं "हरीण पळताना कोणी पाहिलंय?"
"ताई, मी !" विनित म्हणाला.
"कुठे पाहिलंस?" मी विचारलं.
"टीव्हीवर." इति विनित.
"मग कसं बरं पळतं हरीण?" असा प्रतिप्रश्न त्याला करून तो काही कृती करून दाखवेल ह्या अपेक्षेने मी त्याच्यकडे पाहिलं. "पी.टी. उषा सारखं !" विनित क्षणात म्हणाला.
पी.टी. उषा हरणासारखी पळते ह्या माझ्या डोक्यातल्या गृहीतकाला विनितने हरीण पी.टी. उषासारखं पळून चांगलाच धक्का दिला होता !
अजून एक किस्सा सांगायचा तो म्हणजे मुग्धाचा. ती नव्यानेच केंद्रात यायला लागली होती. मुग्धाची आई मला मुद्दाम भेटायला आली होती. "ताई, तुमच्या केंद्रात इंग्रजी माध्यमात जाणारी मुलं जास्त आहेत असं ऐकलं. माझी मुग्धा मराठी शाळेत जाते. तिला त्याचा फारच न्यूनगंड आहे. म्हणून मुद्दाम तुमच्या कानावर घालायला आले."
दोनच दिवसात मला संधी मिळाली. जरा लवकरच खेळ संपवून मुलं प्रार्थनेला बसली होती. अजून १० मिनिटे शिल्लक होती. मी लगेच पाढ्यांची स्पर्धा घोषित केली. मराठी माध्यमाची मुलं विरुध्द इंग्रजी माध्यमाची मुलं. ह्या पाढ्यांच्या स्पर्धेत मराठी माध्यमाच्या गटाने बाजी मारली. मुग्धाची छाती अभिमानाने फुगली, हम भी कुछ कम नही! ह्या एकाच प्रसंगाने तिचा आत्मविश्वास प्रचंड वाढला. त्यानंतर मुग्धा जी ग्राऊंडला येत राहिली ती थेट दहावीत प्रवेश करेपर्यंत.
हल्लीच्या "फास्ट चॅनल सर्फिंग" च्या जमानातल्या ह्या मुलांना सतत नविन गोष्टी हव्या असतात. त्याच त्या गोष्टींमधे, खेळांमधे ह्यांचं मन फार काळ रमत नाही. त्यामुळे सतत नविन देण्याचं एक प्रकारचं आव्हानच आमच्यासमोर असत.
Mulakhat_Photo_1.JPGहल्ली सगळीकडे 'जनरेशन गॅप' विषयी बोललं जातं, इतक्या सगळ्या मुलांशी बालरंजन केंद्राच्या निमित्ताने संबंध येत असताना तुला असा अनुभव कधी आला का?

हो नक्कीच. आपल्या मुलांना वाढवताना पालक त्यांच्या लहानपणीच्या अनेक गोष्टी आठवत असतात. आपल्याला त्या काळी जे आवडलं ते आजच्या आपल्या लहान मुलांनाही आवडेल असा त्यांचा ग्रह असतो. ते आजच्यापेक्षा चांगलंच होतं असा थोडाफार अट्टाहासही त्यामागे असतो. 'देवबाप्पा' हा सिनेमा मला लहानपणी खूप आवडला होता. तो मी खूप रडून रडून 'एन्जॉय' केला होता. हा मुलांसाठीचा सिनेमा आहे अशी माझी ठाम समजूत होती कारण आमच्या पालकांनी तो आम्हाला आवर्जून दाखवला होता. आता असा सिनेमा बालचित्रपट महोत्सवात दाखवला जाणार होता तेव्हा ती संधी मी खचितच सोडणार नव्हते. मी मुलांना गोळा केलं आणि अमुक एका मस्त सिनेमाला जायचयं असं घोषित केलं. त्यावर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. "हा सिनेमा कलर्ड आहे की ब्लॅक अँड व्हाईट?" "त्यात आमच्या माहितीचे हिरो हिरॉईन आहेत का?" "व्हिलन कोण आहे? ढिशूम ढिशूम आहे का?" ह्या सर्व प्रश्नांची नकारार्थी उत्तरं दडवून ठेवत मी त्यांना 'नाच रे मोरा' या गाण्याचं कौतुक सांगायला सुरुवात केली. त्यात मोरपिसांचा पिसारा लावून नाच करणारी त्यातली बालनटी मला आठवत होती. सिनेमा पाहून आल्यावर माझ्या लक्षात आलं की मुलांना सिनेमा आवडला नव्हता. प्रत्यक्ष सिनेमात असलेल्या ताडाच्या किंवा तत्सम झाडाच्या झावळ्यांच्या पिसार्‍याऐवजी माझ्या मनात तो नसलेल्या मोरपंखांचा पिसारा कसा बरं फुलला होता? आता निव्वळ मारामारी नाही म्हणून मुलांना सिनेमा आवडत नाही असं म्हणावं तर 'कट्टकड कद्दू' मुलांना आवडतो. भोपळ्यांची स्पर्धा ही कल्पना, त्यातला खलनायक समशेरसिंग आणि त्यावर मात करणारी मुलांची गँग त्यांना आवडते, संथ असूनही कद्दू आवडतो. मुलं कधीकधी गोंधळात टाकतात.
काळ बदलतोय, मुलं बदलतायत, मुलांची अभिरूचीही बदलतेय.

बालरंजन केंद्रामधे 'सुजाण पालक केंद्र' पण चालवलं जातं. त्याची सुरुवात कशी झाली ?

एकदा असाच लहान मुलांचा छान सिनेमा पाहून दुसर्‍या दिवशी आम्ही त्यावर चर्चा करत होतो. मी प्रियांकाला विचारलं, "काल तू का नाही आलीस? छान होता सिनेमा. तू सिनेमा मिस केलास आणि आम्ही तुला मिस केलं.." त्यावर ती फणकारली, "काल माझ्या आईबाबांचं जोरदार भांडण झालं. मग आई एका खोलीत जाऊन झोपली आणि बाबा दुसर्‍या... मग मला कोण सोडणार?"
"अगं, तुझ्या खालचा निषाद आहे ना त्याच्या आजीला सांगायचं.. तो आला होता काल..." मी तिच्या आईबाबांचं भांडण लाईटली घेत बोलले. पण ती पुढे म्हणाली, "आईबाबा भांडले ना की मला खूप भीती वाटते..." तिला वाटणारी असुरक्षितता तिच्या नजरेतून माझ्यापर्यंत पोचली. मी तिच्या पाठीवर हात फिरवत "पुढच्या वेळेला नक्की ये हं.." इतकचं म्हटलं.
असे काही अनुभव आल्यावर केंद्राचं 'सुजाण पालक मंडळ' सुरू केलं. त्यात कधी तज्ज्ञांची व्याख्यानं, त्यांची प्रश्नोत्तरांचा तास, कधी एखाद्या विषयावर गटचर्चा, तर कधी आपल्या मुलांना शिस्त लावताना केलेले, पण फसलेले प्रयोग यांचीही दिलखुलास चर्चा पालकमंडळात होऊ लागली.

पालकमंडळीचा ह्यात सहभाग कसा आहे? त्यांची ह्या सगळ्या उपक्रमांवर प्रतिकिया काय आहे?

पालक मंडळींना ह्याचा निश्चितच फायदा होतो आहे आणि त्यांचा सहभाग ही चांगला आहे. ह्यातल्या उपक्रमांचे चांगले परिणाम ही दिसत आहेत. त्यातून मग "मी पूर्वी माझ्या मुलांना खूप मारत होते, पण आता सुजाण पालक मंडळात यायला लागल्यापासून बंद झालं" असं कोणाच्या आईने येऊन सांगितलं तेव्हा आनंद झाला. मुलांना मारणं थांबलं आणि समजून घेणं वाढलं तेव्हा या उपक्रमाचा फायदा होतोय असं जाणवलं. आपल्या मनातलं बोलायला व्यासपीठ मिळतंय, मुलांना वाढवताना येणार्‍या शंकाचं निराकरण होतंय असा विश्वास पालकांना वाटू लागला. अधूनमधून "आमच्या आईचं वागणं हल्ली बदललंय. सारखं सारखं अभ्यास कर अभ्यास कर म्हणत नाही.." असे रिपोर्ट मुलांकडूनही यायला लागले. 'सुजाण पालक मंडळ' रुजलं तसं पालक मदत करायला पुढे येऊ लागले. एका वर्धापनदिनानिमित्त पालकांनी वर्गणी काढून केंद्राला खो-खोचे खांब दिले तर एका वर्षी बास्केटबॉलचे पोल्स ! कुणी सुट्टीतल्या वाचनालयात स्वयंसेवक म्हणून काम करायला पुढे आलं तर कुणी सहलींना मदत करतो म्हणून तायांबरोबर यायला तयार झालं. आपल्या महाविद्यालयीन जीवनात उत्तम खेळाडू असलेले रमाचे बाबा सुट्टीत मुलांना बास्केटबॉलचं कोचिंग देण्यासाठी सकाळी सहा वाजता येऊ लागले. ही पालकांची सामाजिक वाढच नाही का? तसचं पालक-स्पर्धांच्या निमित्ताने मुलांचे आई-वडिल, आजी-आजोबा केंद्राच्या अधिक जवळ आले. पालेभाज्या ओळखणं, सुळसुळीत साडीची घडी करणं अशा स्पर्धांमध्ये भाग घेऊन बाबा लोकांनी धमाल उडवून दिली. आजी-आजोबांनी चष्मा सावरत नव्या जुन्या नट-नट्या ओळखल्या. तर आया पदर खोचून पळापळीच्या खेळात भाग घेऊ लागल्या. "नंबराचं काय घेऊन बसलात, भाग घ्यायला काय हरकत आहे?" असा केवळ मुलांना उपदेश न करता पालक वर्ग तो आचरणात आणू लागला. आणि यातूनच तयार झालं बालरंजनचं मोठ्ठं कुटुंब ! ३५० मुलं , त्यांचे आई-वडिल, आजी-आजोबाच नव्हे तर त्यांचे काका, मामा, मावश्या, आत्याही ! कारण मुलांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम पहायला ही सर्व मंडळी हजेरी लावायला लावली आणि अर्थातच बालरंजनचे ताई-दादा सुध्दा !
Mualakhat_Photo_3.JPGबालरंजनच्या ह्या एव्हड्या मोठ्या व्यापात घरच्यांचा पाठिंबा तसच सहयोग कितपत होता?

घरच्यांची साथ असल्याशिवाय बालरंजन केंद्राचा एवढा पोठा पसारा उभा करणं शक्यच नव्हतं. बालरंजनच्या अनेक कार्यक्रमांध्येही घरच्यांचा सहभाग असतो. एका कार्यक्रमात स्टेजचा पडदा बिघडला तर बाबा (माझे सासरे) स्वत: पडदा ओढायला बसले होते. आता १९व्या वर्धानपनदिनापूर्वी ग्राऊंडची स्वच्छता, रंगरंगोटी आणि सुशोभन श्रीरामने (यजमान) स्वतः देखरेख करून अल्पखर्चात करवून घेतलं. सलिलची नाट्यवर्गात पार्श्वसंगीत, मेकअप, लाईट्ससाठी खूप मदत होते तर निखिल गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात आणि शिबिरात डान्स बसवतो. बालरंजनसारख्या उपक्रमालाही अनेक कायदेशीर गोष्टींची पूर्तता करावी लागते. त्या सगळ्याच्या नोंदी , फाईल्स बनवणे ह्या सगळ्यात श्रीरामची खूपच मदत होते. चोख हिशोब हे बालरंजन केंद्राचं वैशिष्ट्य जपण्याच्या कामात श्रीरामची खूप मदत होते. तसंच घरात ज्याच्या कामाचं महत्त्व ज्यावेळी असेल, त्यानुसार इतर जण आपापली कामं आखतात. उदा. नोव्हेंबर ते जानेवारी हे बालरंजनचे निरनिराळ्या कार्यक्रमांचे, त्यामुळे मी स्वतः त्यात पूर्णपणे बुडलेली असते. तर फेब्रुवारी ते मे हे मसाल्याचे महिने, त्यावेळी सगळं कुटूंब सकस, गिरण्या ह्यांचा कामात गुंतलेलं असतं.

सकसचा तसंच गिरण्यांचा कारभारही बराच मोठा आहे. तुझा त्यात नक्की सहभाग काय असतो ?

गिरणी हा सहस्रबुद्ध्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. ’सकस’ नंतर सुरू झालं असलं तरी गिरण्या पूर्वीपासूनच होत्या. सुरुवातीच्या काळात श्रीरामला मदत लागेल तेव्हा मी स्कूटरवरून दळणं वाहून नेण्याचे काम करत असे. नंतर ह्या कामासाठी आम्ही खाजगी रिक्षा घेतली. पुढे मी रिक्षादेखील चालवत असे. ह्याचा मला पुढे ही फायदाच झाला. "संवाद" ह्या ग्रुपतर्फे आम्ही सुमारे ५०० पपेट शो पुण्याच्या विविध भागांमधे सादर केले. त्यावेळी मी सगळे सामान आणि ह्या ग्रुपचे बाकी सदस्य ह्यांची वाहतूक ह्याच रिक्षातून करत असे.
१९९५ पासून आमच्या घरी सकसचा काऊंटर आहे. तिथे सकसच्या उत्पादनांची विक्री होते तसंच दळणंही घेतली जातात. ती दळणं गिरणीत दळून आणली जातात. ह्या सगळ्यामुळे ह्या काऊंटरवर नेहमीच गर्दी असते. जनसंपर्क हे माझं इथलं मुख्य काम. इथे आमच्या ग्राहकांशी थेट संवाद साधता येतो त्यामुळे त्यांच्या गरजा समजून घ्यायला खूपच मदत होते. ह्या भागात आम्ही अनेक वर्ष रहात आहोत तसचं बालरंजन केंद्रात येणार्‍या मुलांचा पालकवर्ग ही सकसचा ग्राहक आहे. त्यामुळे पुष्कळ लोकांशी अगदी वैयक्तीक स्वरूपाचा ओळखी आहेत. दुकानात येणारे लोक अगदी मोकळेपणाने त्यांच्या गरजा तसंच आमच्या उत्पादनांबद्दलची त्यांची मतं सांगतात. प्रभात रोड परिसरात अनेक मान्यवर राहतात, काही परदेशी विद्यार्थी राहतात. तसंच हे परदेशी विद्यार्थी, किंवा आपलेही परदेशी जाणारे लोक, त्यांना तिकडे घेऊन जाण्याच्या दृष्टीने खरेदी करतात. त्यांना विमान प्रवासासाठी विशिष्ठ प्रकारचे पॅकिंग आवश्यक असते. काहींना परदेशी घेऊन जाण्याच्या दृष्टीने औषधी पदार्थ, तसंच पिठं ह्यांची गरज असते. अशावेळी व्यवहार करताना स्वत: लक्ष घालावं लागतं. काम करणार्‍या मुलींना त्यांच्या विशिष्ठ गरजा तसचं त्यांचं इंग्रजी समजेलच असं नाही.
तसंच मी स्वत: दुकानात हजर असल्याने सगळ्या जनसंपर्काचा सकसच्या व्यवस्थापनाच्या आणि व्यवसायवृध्दीच्या दृष्टीने खूपच उपयोग होते. ग्राहकांना काय आवडतंय, काय आवडत नाहीये, बाजारातली एकूण स्थिती ह्याचीही चाचपणी करता येते. नवीन उत्पादनांच्या योजना तयार करता येतात, असलेल्या उत्पादनांमध्ये ग्राहकांच्या गरजेनुसार आवश्यक ते बदल करता येतात. सकससाठी जाहिराती बनवणं, त्यांचे मजकूर तयार करणं हे सगळंदेखील मी सांभाळते. एकूण सकसच्या संदर्भात माझी मुख्य जबाबदारी ही जनसंपर्क आणि दैनंदिन व्यवस्थापन.

बालरंजन केंद्र तसेह सकस ह्या दोन्हीची जबाबदारी म्हटलं तर तशी मोठी आणि आव्हानात्मकही. तुझी माहेरची पार्श्वभूमी ही साधारण त्यादृष्टीने पूरक होती की अगदी भिन्न होती?

माझं माहेर दौंडचं आणि आमचं एकत्र कुटुंब. माझे वडिल डॉक्टर आहेत आणि आईचा समाजसेवेच्या बर्‍याच उपक्रमांमधे सहभाग असतो. वडिल डॉक्टर असले तरी त्यांचा दृष्टीकोन कधीच धंदेवाईक नव्हता. दौंडमध्ये ते गरीबांचे डॉक्टर म्हणूनच ओळखले जायचे. भाऊ आणि वहिनी पण डॉक्टर आहेत त्यामुळे साठे हॉस्पिटल दौंडमध्ये गेल्या ६० वर्षांपासून आहे. एकत्र कुटुंबाचे सगळे फायदे मी अगदी पुरेपूर अनुभवले. संस्कारक्षम वयात ज्या ज्या गोष्टी पालकांकडून पाल्याला मिळणं आवश्यक असतं ते सगळ मला भरभरून मिळालं. हेच अगळे आयुष्यभर लक्षात राहतील असे अनुभव मी बालरंजन केंद्रामार्फत बाकीच्या मुलांना देण्याचा प्रयत्न करते. दुसर्‍यांना आनंद देण्यासाठी आधी आपण आनंदी असलं पाहिजे आणि तो बालपणाचा आनंद मी स्वत: पुरेपूर लुटला होता. दौंडसारख्या लहान गावात जरी असलो तरी घरचे सगळेच पुढारलेले आणि सुधारणावादी होते. माझी आई त्याकाळी दौंडमधली पहिली महिला गाडीचालक होती, मी दौंडमधली पहिली महिला मोटरसायकल चालक होते तर पुढे मी पुण्यातली पहिली महिला रिक्षाचालक झाले. त्यामुळे एकूण माझी माहेरची पार्श्वभूमी सकस तसेच बालरंजन ह्या दृष्टीने अनुकूलच म्हणायला हवी.

तू मधे पत्रकारितेचा तसेच बागकामाचा अभ्यासक्रम केला होतास. तो फक्त छंद म्हणून की त्याविषयीसुध्दा पुढेमागे काही योजना आहेत?

मला सतत काही ना काही नविन गोष्टी शिकायला आणि करून बघायला आवडतं. फक्त त्या गोष्टी creative हव्या आणि त्या करण्यासाठी आवश्यक असलेली सगळी साधनं सहज उपलब्ध असायला हवी. आमच्या एका गिरणीमधे बाग करण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध होती. तसंच निरनिराळे प्रयोग करून बघण्यासाठी ही पुष्कळ वाव होता. त्यामुळे मी बागकामाचा १ वर्षाचा अभ्यासक्रम केला होता. पण पत्रकारितेचा अभ्यासक्रम ही थोड्याफार प्रमाणात गरज होती. 'निर्मळ रानवारा' हे लहान मुलांचं मासिक गेले २५ वर्ष प्रसिध्द होतं आहे. मी गेले काही वर्ष त्याच्या संपादक मंडळात आहे. लहान मुलांसाठी तसेच त्यांच्या संदर्भात सतत काही ना काही लिखाण चालूच असतं. ह्या सगळ्या जबाबदार्‍या योग्य पध्दतीने पेलण्याकरता पत्रकारितेचा अभ्यासक्रम करणं मला गरजेचं वाटलं. त्यावेळी सलिल शेवटच्या वर्षाला होता आणि निखिल बारावीत होता. त्यामुळे घरातही अभ्यासाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण होतं. आम्ही तिघं जण रात्री अभ्यास करत बसायचो. अधेमधे गप्पा, कॉफी पिणं हे ही चालू असायचं. मुलांबरोबर स्वतःही परत अभ्यास करण्याचा तो छान अनुभव होता. Happy

बालरंजन केंद्राच्या आगामी उपक्रम कोणते?

बालरंजन केंद्रातर्फे मुलांसाठी तसेच पालकांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करायचा विचार आहे. हल्ली पालकांकडून तसेच इतर आजुबाजूच्यांकडून मुलांवर एखादा विशिष्ठ शिक्का बसण्याचे प्रकार घडतात. हे अनवधानानेही असू शकतात. उदा. एखाद्या मुलाला सतत बावळट, मूर्ख, मठ्ठ असं संबोधलं जातं. अशामुळे मुलांची स्वप्रतिमा आणि आत्मविश्वास ढासळतो. काही काही वेळा हे इतक्या जास्त प्रमाणात होतं की ही मुलं कोणती गोष्ट धड करूच शकत नाहीत. कधीकधी ह्याची विरूध्द बाजूही पहायला मिळते. पालक मुलांच्या कलागुणांचं त्याच्या कुवतीपेक्षा जास्त कौतूक करतात, ज्याची परीणती over confidence मध्ये होते. पण इतर मुलांशी स्पर्धेत किंवा तुलनेत ही मुलं मागे पडतात. अश्यावेळीही नंतर मुलं आत्मविश्वास गमावून बसतात. ह्या मुलांना तसंच त्यांच्या पालकांना जरूरी ते समुपदेशन देण्यासाठी हे केंद्र उघडायचा विचार आहे. माझी शैक्षणिक पार्श्वभूमी तसेच पालक-शिक्षक केंद्रात असलेला ह्याच प्रकारचा अनुभव ह्यासाठी उपयोगी पडेल. लोकमत वृत्तपत्राच्याच्या सखीमंचतर्फेही साधारण ह्याचप्रकारच्या व्याख्यानमाला आयोजित केल्या जाणार आहेत. या व्याख्यानमालांना साधारण १०००/१२०० पालक समुदाय उपस्थित असतो. आणि लेखन चालू आहेच. परवाच मी एसाआरपीच्या सुमारे ८०० पुरूष पालकांना 'पालकत्त्व' ह्या विषयावर व्याख्यान द्यायला गेले होते आणि तो ही एक अतिशय वेगळा अनुभव होता.

बालरंजनच्या तसेच सकसच्या माध्यमातून इतक्या वर्षात अनेक अनुभव आले असतील. तर ह्यातले लक्षात रहातील असे चांगले तसेच विचित्र अनुभव कोणते?

अनुभव तर अनेक आले. पण चांगले तेवढे लक्षात ठेवायचे, वाईट ते सोडून द्यायचे.

अगदी लक्षात राहिलेल्या दोन गोष्टी इथे सांगाव्याशा वाटतात. असेच एकदा सुट्टीत पहाटे पाच-साडेपाच वाजता टेकडीवर गेलो होतो. टेकडीवरचं गवत पिवळं पडलं होतं. डिसेंबर महिन्यातल्या थंडीतलं दव त्यावर पडलं होतं, वातावरण खूपच अल्हाददायक होतं. अशा वातारणात टेकडी चढणं, भटकंती करणं हा अनुभव मुलांनी स्वतः घेण्याचा होता. हळूहळू सूर्य उगवला. सूर्याचे सोनेरी किरण गवताच्या पात्यावर पडून गवत सोनेरी दिसायला लागलं. त्यावरचे दवबिंदूही सोनेरी होऊन चमकू लागले. आम्ही सगळेच शांतपणे चाललो होतो. नि:शब्द शांतता अनुभवत होतो. प्रणवने एकदम विचारलं, "ताई, सोनेरी सकाळ म्हणतात ती हीच का?" त्याचे उद्गार ऐकून आमच्या अंगावर रोमांच उभे राहिले. सोनेरी सकाळीचा फर्स्ट हँड अनुभव प्रणवला आपल्या स्मरणकुपीत ठेवायला मिळाला होता. आम्हाला समाधान वाटलं.

दर तीन वर्षांनी येणार्‍या अधिक महिन्यात आम्ही दानाची कल्पना मुलांच्या मनात रूजावी म्हणून उपक्रम घेतो. सर्व मुलांनी काहीतरी धान्य एक-एक फुलपात्र, कपडे, पैसे असं सगळं गोळा करून वंचित मुलांसाठी काम करणार्‍या संस्थेला आम्ही देतो . एका वर्षी अशी मदत घेऊन सोबत मुलांना घेऊन एका अनाथाश्रमात गेलो. अशा स्थळभेटींचा मुलांच्या मनावर ठसा उमटताना दिसतो. तिथे जाऊन आल्यावर आईबापाविना एवढी पोरकी मुलं पाहून अंबिकाला भडभडून आलं. घरी येऊन ती खूप रडली असं तिच्या आजीने दुसर्‍या दिवशी सांगितलं. आपल्याकडे सगळं असूनही कूरकूर करणार्‍या या मुलांच्या जगाविषयीच्या जाणीवेत खूप फरक पडला. एक वेगळचं शहाणपण अंबिकाला या भेटीने दिलं.

आमच्या मायबोलीच्या सभासदांमधेही बराच मोठा पालक वर्ग आहे. तुझ्या इतके वर्षांच्या अनुभवातले काही महत्वाचे बोल त्यांचासाठी सांगू शकशील का?

सर्व प्रथम मुलाला जन्म देणं ही आपण स्वत:हून स्वीकारलेली एक मोठी जबाबदारी असते किंबहूना तो एक यज्ञ असतो ज्यात वेळ, पैसा आणि इगो ह्याची आहूती द्यावी लागते. हल्ली काम, करीयर ह्यामुळे मुलांना पुरेसा आणि उपयुक्त वेळ देता येत नाही अशी पालकांची तक्रार असते. ते थोड्याफार प्रमाणत खरं असल तरी मूल जन्माला आल्यावर मूल हीच पालकांची पहिली priority असली पाहिजे. मग मुलाची जबाबदारी कशी/कोणी घ्यायची हे पालकांनी आपापसात ठरवलं पाहिजे.
दुसरं म्हणजे पालकांनी आपल्या इच्छा मुलांवर कधीही लादू नयेत. एकाच आईवडिलांची, सारख्याच वातावरणात वाढलेली दोन मुले अगदी भिन्न असू शकतात त्यामूळे मुलांचा एकूण कल बघून त्याप्रमाणे त्याच्या करियरचे नियोजन करावे.
आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे पालकांनी आपल्यातल्या मतभेदांची / इगोची झळ आपल्या पाल्याला कधीही पोचू देऊ नये. दोन व्यक्तींमधे मतभेद हे असतातच पण ते आपापसातच सोडवावेत आणि मुलांसमोर येऊ देऊ नयेत कारण त्यामुळे मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते आणि संस्कारक्षम वयात ती हानीकारक असते. आनंदी आणि सुरक्षित बालपण हा मुलांचा हक्क आहे आणि ते मुलांना मिळवून देणं हे पालकांचे कर्तव्य आहे.

माधुरीकाकूचा अनुभव सर्व मायबोलीकरांना नक्कीच उपयोगी पडेल याची खात्री आहे. एका तुमच्या आमच्या सारख्या घरगुती वातावरणातली स्त्रीही समाजपयोगी काम करून समाजाच्या विकासाला हातभार कशी लावू शकते, सामाजिक ऋण फेडण्याबरोबरच उद्योजिका म्हणूनही कशी यशस्वी होऊ शकते, याचं उदाहरण म्हणजे माधुरीकाकू. तिने तिच्या व्यापातून ह्या मुलाखतीसाठी वेळ दिल्याबद्दल मायबोलीकरांतर्फे तिचे मन:पूर्वक धन्यवाद मानून आणि तिच्या सर्व आगामी उपक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन मी तिचा निरोप घेतला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅडम , तुझ्या काकूचे विचार आणि एकूण ही सर्व वाटचाल खूप प्रेरणादायी आहे . मुलांबद्दलची त्यांची निरिक्षणे अचूक आहेत . सकाळी असं काहीतरी वाचलं की काहीतरी करायची स्फूर्ती येते . मला त्यांना भेटायला निश्चितच आवडेल .
तुझे आभार , खूप सुंदर मुलाखत घेतलीस आणि प्रश्न सुद्धा नेमके विचारलेस . Happy

खुप संदर उपक्रम. इथे माहिती दिल्या बद्दल शतशः धन्यवाद Happy
एक दोन प्रश्न आहेत. हा उपक्रम पुण्यामधे चालतो. अशा प्रकारचा उपक्रम माझ्या शहरात चालत नाही पण सुजाण पालक उपक्रमात जर मला सहभागी व्हावयाचे असेल तर होता येईल का? असा उपक्रम बाहेर गावाहुन येणार्‍या पालकांसाठी विकांताला/ सुट्टीला जोडून ठेवता येऊ शकेल का? तस शक्य असेल तर मला सहभागी व्हायला आवडेल.

दुसरं असं की जरी माझ्या रहाण्याच्या ठिकाणा जवळ अस केंद्र मुलांसाठी आत्ता नसेल तरी त्या अस ट्रेनिंग देऊन अस केंद्र (छोट्या प्रमाणावर) चालु करण्यास मदत करु शकतात का? माझी नोकरी सोडुन मला सध्या अस करण शक्य नसल तरी विकांतात माझ्या मुलीसाठी आणि तिच्या मित्र मैत्रिणींसाठी असा एखादा उपक्रम चालु करता येऊ शकेल त्या दृष्टीने त्यांचं काही मार्गदर्शन मिळू शकेल का?

माधुरीताई तुझ्या काकू? सहीच. मी त्यांच्या बालरंजन च्या एका नाटकाला मदत केली होती तेव्हा ओळख झाली होती. उत्साहाचा झरा आहेत माधुरीताई म्हणजे.

वा! मस्त उपक्रम. ग्रेट आहेत काकू. त्यांचे विचार आवडले.
गेल्या दोन तिन वर्षापासून असे विचार मनात घोळतायेत. पाहूयात काही जमतं का ते.

मस्तच !! माझी लेक ही जाते बालरंजन ला. माधुरी ताईंचे पालकांसाठीचे उपक्रम ही छान असतात, २/३ दा अटेंड केलेले.

हे जबरदस्तं आहे. मला जोsssरात... 'जय जय रघुवीर समर्थं' म्हणावसं वाटतय.
समाज घडवण्यात गुंतला आहात, माधुरीताई. जमलं तर भेटेनच पण त्याआधी तुमचे शतशः आभार. मातीमोल वाया गेली असती अशी कितीतरी रोपटी तरारून येतील, तुमच्या ह्या उपक्रमांमुळे. अनेक कुटंबांमधला आटलेला संवाद पुन्हा सुरू होईल.
माझ्या अनेकानेक शुभेच्छा! adm, आभार, मनापासून आभार.

अशी काकु तुम्हाला लाभली , भाग्यवान आहात. फारच छान उपक्रम आहेत. मी पुण्यात रहात नाही याची खंत वाटते. मुलाखत पण छान घेतलीत.
धनु.

अडम, खूप छान मुलाखत! माधुरीताईंची ओळख करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

छान झाली व्यक्तिमत्व ओळख. पुण्यात इतका सुंदर उपक्रम आहे माहित नव्हते मला...
भारतभेटीत मुलाला पाठवता येईल आता तिथे.
धन्यवाद!!

क्या बात है! नतमस्तक.

"'जय जय रघुवीर समर्थं' अगदी समर्पक. रामदासांना असाच समाज अपेक्षित होता.

खूप छान उपक्रम. मुलाखतही खूप छान झालेय. माधुरीताईचे विचार खूप आवडले. अदम तुझ्या काकूंची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

एकदम मस्त मुलाखत रे अडमा.
अतिशय छान आणि स्तुत्य उपक्रम, त्यांचे विचारही खूप आवडले.

मुलाखत छान ! माझे बाबा कामानिमित्त पुण्यात जायचे तेव्हा सकस बिस्किटे नक्कीच आणयचे.

अ‍ॅड्म, बहुतेक ह्याच ठिकाणी माझा पुतण्या गेली २ - ३ वर्ष रोज संध्याकाळी ग्राऊंड वर जातो. खुप खुष असतो तो ग्राऊंड वर जाताना आणि येताना...स्तुत्य उपक्रम...

सुंदर उपक्रम. मुलांचा इतका विचार केला आहे, तिथे येणारी मुलं नशीबवानच म्हणायची. पालकवर्गासाठी शेवटी दिलेला सन्देशही आवडला. माधुरीकाकूंचे आणि अडमचे आभार.

आदमा, खूपच छान मुलाखत...

लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठीचा खूपच चांगला उपक्रम माधुरीकाकू राबवत आहेत... त्यांना खूप शुभेच्छा..

अतिशय सुंदर उपक्रम!! आणी मुलाखतही मस्तच (विस्तृत आणी प्रवाही) झालीये. एवढे व्याप सांभाळुन असे उपक्रम करणार्‍या व्यक्तींचं कौतुकच वाटतं. अश्या एका व्यक्तिची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद!!

Pages