जमतंय का?

Submitted by मुग्धमानसी on 1 September, 2015 - 07:14

सांग सांग बाई तुला जमतंय का?
आतातरी मन सालं रमतंय का?

कंटाळा कंटाळा सारा दिस चोळामोळा
रोज रात्री फिरवावा ना पाटीवरती बोळा...
अक्षरेही तीच तीच गिरवावी किती?
गिरवले किती तरी नाही होत मोती!
पुन्हा तरी नव्यानेच गिरवावे सारे
पुन्हा पुन्हा आवरावे मनाचे पसारे
उगवणे मावळणे जन्म सारा शीण
एकच कळले - ’नाही कुणासाठी कोण!’
कळले ना आता?... तरी वळतंय का?
आतातरी मन सालं रमतंय का?

’रात्र झाली फार आता मिट डोळे नीज’
बजावतो मेंदू तरी डोळे भिज भिज
दिसभर पेंगूळते मन वेड्यागत
रातभर मन नाही मनात रमत
कण कण उजळते अंधाराची वात
कुणीतरी काळोखतं खोल आत आत
अशावेळी नेमकी ती तडकावी काच
ठिसूळ क्षणांचा सारा उतरावा माज
गांगरून मीच मला बिलगून जावे
मीच मला गोंजारून कुशीमधे घ्यावे
विचारावे ’बाळा काही सलतंय का?’
आता तरी मन सालं रमतंय का?

बघ गेली रात, आली केशरी पहाट
उशीपाशी तुझ्या शांत सारा गजबजाट
निजेचा कुठून आता पायरव येतो
भण भण डोके हळू हळू शांतवतो
जन्म जागल्याला कशी नीज ही पुरावी?
तुझ्या त्या क्षणांची पुंजी माझ्या कामी यावी!
उठावे नेटाने आणि कामाला लागावे
तेच जुने धडे पुन्हा पुन्हा गिरवावे
प्रपंचही तोच आणि कर्तव्येही तीच...
माझे मन तेच, तुझी आठवण तीच!
माझ्या असण्याचे भ्रम पावलोपावली
तुझ्या नसण्याची त्याला व्यापून सावली...
सांग... तुझ्याही पोटात काही हलतंय का?
आता तरी मन सालं रमतंय का?

वाहून जाते मी रोज रात्री थोडी थोडी
ओसरून जाते सार्‍या जगण्याची गोडी
अशावेळी असे वाटे तुझ्यापाशी यावे
जुने क्षण सांडावे नी नवीन वेचावे
माझ्याच डोळ्यांनी तुला सांगावी चहाडी
आणि तुही मुक्यानेच करावी लबाडी
निमिषात माझे सारे सारे तुझे व्हावे
माझ्या कोर्‍या पाटीवर नव्याने लिहावे
माझ्या जगण्याची ओळ तीला तुझा छंद...
असे काव्य गुणगुणताना नीज यावी मंद!
जागरण जन्मभर सरतंय का?
आता तरी मन सालं रमतंय का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली. Happy

मुग्धमानसी
कविता छान आहे , पण ' मन सालं ' च्या ऐवजी 'मन वेड ' किंवा ' मन बावर ' चांगल वाटेल अस मला वाटत ,

कृपया राग मानू नये ,

कालपासून शीर्षक वाचत आहे, पण दुसर्‍या ओळीतील 'सालं' हा शब्द वाचल्यानंतर पुढे नाही वाचता येत आहे.

नक्कीच कविता उत्तम असणार, पण माझी लिमिटेशन्स! माफ करा. Happy