लायन्स क्लब पुणे सेंट्रल तर्फे स्पोकन इंग्लिश स्वयंसेवक शिक्षकांचा सत्कार!

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 31 August, 2015 - 06:54

सांगावयास आनंद वाटतो की दिनांक २८ ऑगस्ट २०१५ रोजी मायबोलीच्या माध्यमातून एकत्र येऊन स्वयंसेवा तत्त्वावर बुधवार पेठ, पुणे येथे गरजू मुलामुलींना हसत खेळत स्पोकन इंग्लिश शिकवणार्‍या आपल्या स्वयंसेवक शिक्षकांचा लायन्स क्लब पुणे सेंट्रलकडून सत्कार करण्यात आला. प्रसंगी सर्व स्वयंसेवक शिक्षकांना लायन्स क्लबने खास प्रशस्तीपत्रक प्रदान केले व गेली तीन वर्षे सातत्याने आणि निष्ठेने या उपक्रमात सहभागी होणार्‍या व आपले योगदान देणार्‍या मंडळींचे विशेष कौतुक केले.

नूतन समर्थ प्राथमिक विद्यालयात पार पडला कौतुक सोहळा!

साधारण एक आठवडा अगोदर लायन्स क्लब पुणे सेंट्रलच्या अध्यक्षा श्रीमती डोंगरे मॅडम यांचा मला फोन आला. शाळेत १५ ऑगस्टच्या कार्यक्रमाला त्यांच्या क्लबतर्फे खाऊ वाटण्यात आला तेव्हा त्यांची गाठ आपल्या स्वयंसेवक शिक्षकांशी पडली. शिक्षकांची शिकवण्याप्रतीची तळमळ, उत्साह, आपल्या सर्व व्यापांमधून वेळ काढून मुलांना समरसून शिकवण्याची त्यांची आवड आणि मुलांमध्ये 'इंग्लिश शिकवणार्‍या ताई-दादां'बद्दल असणारा जिव्हाळा पाहून त्यांनी या सर्व शिक्षकांना प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्रके देण्याचे ठरविले. रक्षाबंधनाच्या अगोदरचा दिवस सर्वांच्या सोयीने ठरविण्यात आला. डोंगरे मॅडमनी स्वतःच निमंत्रणाचे फोन आवर्जून केले. कार्यक्रम शाळेतच, सर्व विद्यार्थी व शाळा-शिक्षकांच्या उपस्थितीत पार पाडायचे ठरले.

दिनांक २८ ऑगस्ट रोजी शाळा नेहमीपेक्षा एक तास अगोदरच भरवण्यात आली. शाळेतील दुसर्‍या मजल्यावरील हॉलमध्ये फळ्यावर सुवाच्य अक्षरांत आजच्या कार्यक्रमाचे तपशील लिहिले होते. क्लबच्या अध्यक्षांनी त्यांच्या कार्याचे स्वरूप आणि या सत्कारामागील उद्दिष्ट नेमक्या शब्दांत मांडले. युवापिढीतील वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांत नोकरी-व्यवसाय करणारी समविचारी मंडळी इतर कोणतीही विशेष ओळख नसताना एकत्र येऊन देवदासींची मुले शिकत असलेल्या शाळेत असा उपक्रम करतात आणि त्यातून या शाळेत शिकणार्‍या गरजू मुलांमध्ये इंग्रजी भाषेच्या गोडीबरोबरच ज्ञानार्जनाविषयी आत्मीयता निर्माण करण्यात हातभार लावतात हेच त्यांना अतिशय प्रेरणादायी वाटले. समाजात असे काम करणार्‍या मंडळींना प्रोत्साहन हे मिळालेच पाहिजे, जेणेकरून त्यांच्यासारखी आणखी मंडळी पुढे येतील आणि आपला खारीचा वाटा उचलतील ही त्यामागील भावना कौतुकास्पद आहे. क्लबमधील काही सदस्य लक्ष्मी रोडवरील व्यापार्‍यांची मुले जिथे कधी काळी शिकत त्या ह्या नूतन समर्थ शाळेचे माजी विद्यार्थी आहेत.

सत्कार समारंभाची काही क्षणचित्रे

collage edited.jpg
प्रशस्तीपत्रकांसमवेत व लायन्स क्लब सदस्यांबरोबर स्वयंसेवक-शिक्षक

WA0057edited.jpg
स्वयंसेवक शिक्षक टीम : निकिता, पूर्णिमा, मानसी, अरुंधती, अश्विनी, अदिती आणि दीपक.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मानकर मॅडम यांनीही याप्रसंगी आपल्या या सर्व उपस्थित शिक्षकांचे मनापासून कौतुक केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या. अनेक शिक्षक व्यवसाय-नोकरीतून सुट्टी न मिळाल्यामुळे सत्कार समारंभास उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु कार्यक्रमासाठी त्यांनी आपल्या शुभेच्छा कळविल्या. Happy

स्पोकन इंग्लिश शिकणार्‍या मुलांचे अपडेट्स

नूतन समर्थ प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीपर्यंतचेच वर्ग आहेत. परंतु सातवीनंतर इतर शाळांमध्ये गेलेली व वरच्या इयत्तांमध्ये शिकणारी शाळेची मुले स्पोकन इंग्लिशच्या दर शनिवारी होणार्‍या तासाला वेळ मिळेल तशी आवर्जून हजेरी लावतात. नव्या शाळेत गेल्यावर झालेला आनंद, तिथे मिळालेला आत्मविश्वास आणि आधीच्या शाळेची येणारी आठवण अशा संमिश्र भावना त्यांच्या बोलण्यातून प्रकट होत असतात. सध्या सातवीच्या वर्गात गेलेल्या मुलांना आधीच्या वर्षी शिकवलेली इंग्रजी गाणी चाल - ठेका आणि त्याबरहुकूम हावभावांसकट तोंडपाठ आहेत हे आधीच्या शिक्षकांचे मोठे यशच म्हणावे लागेल. कारण सर्वसामान्य मुलांपेक्षा या मुलांचा विश्वास मिळवणे, त्यांचे लक्ष वेधून घेणे आणि त्यांना शिकवली जाणारी गोष्ट आत्मसात करावी असे वाटण्याइतपत त्यांच्या मनात त्या गोष्टीबद्दल आवड निर्माण करणे हे खरोखर आव्हानाचेच काम आहे. शाळेच्या बाहेर इंग्रजी भाषेशी दुरूनही संबंध न येणार्‍या मुलांना आठवड्यातून एका तासाच्या अवधीत जे काही शिकविले जाते ते लक्षात राहाणे व त्यांना ते लक्षात ठेवावेसे वाटणे यापरीस वेगळी दाद अशी ती काय असते? याअगोदरच्या स्पोकन इंग्लिशच्या शिक्षकांची आजही शाळेत आठवण काढली जाते हीदेखील त्याचीच खूण म्हणता येईल.

यंदाच्या वर्षी आपल्या टीममध्ये अदिती व पूर्णिमा या ताज्या दमाच्या शिक्षकांची भर पडली असून समीर, मानसी व निकिता यावर्षीही तितक्याच तळमळीने मुलांना शिकवत आहेत. यावर्षी शाळेतील मुलांची संख्या निरनिराळ्या परिस्थितीजन्य कारणांमुळे बरीच रोडावली असल्यामुळे जरी स्वयंसेवक शिक्षकांची संख्या कमी असली तरी शाळेत उपस्थित असणार्‍या मुलांसाठी पुरेशी आहे.

(फोटो सौजन्य : लायन्स क्लब पुणे सेंट्रल)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा फार अभिमान वाटला.

सर्व टीमचे अभिनंदन व लायन्स क्लब ने खुप चांगली दखल घेतली.

पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

सर्व टीम चे अभिनंदन आणि कौतुक.

खूप अभिमान वाटला..

पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!

प्रतिसाद देणाऱ्या व कौतुक करणाऱ्या सर्वजणांचे मन:पूर्वक आभार! तुमचे प्रोत्साहन व शुभकामना अशाच सतत पाठीशी राहोत. खूप छान वाटतं तुमच्या आश्वासक शब्दांनी! Happy

अरे वा वा.. मस्तच..
अशा कामात सातत्य राखणे नेहमीच आव्हनात्मक असते..
सम्पूर्ण चमू बद्दल आदर वाटतो ..
पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा Happy